लालीची गोष्ट भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Oct 2015 - 1:56 pm

भाग १

लाली थोडी हिरमुसली. पण तिचा तिच्या माईवर पूर्ण विश्वास होता. ती बर म्हणाली आणि शीलाचा हात सोडून संस्थेच्या दारातून आत गेली. लालीला वाटल होत की निर्मला ताई तिला जवळ बोलावतील तिच्याशी बोलतील. पण तस काहीच झाल नाही. ती रात्र नेहेमीप्रमाणे गेली. आणि मग त्यानंतरच्या २-३ रात्री देखील.
पण ३ दिवसांनंतरच्या रात्री निर्मला ताईंनी सर्व मुलांना एकत्र केल आणि विचारल;"कोणा-कोणाला रात्र शाळेत जायचं आहे? त्यांनी हात वर करा बघू. लालीला खूप आनंद झाला. तिने लग्गेच हात वर केला. तिथेच एक अनोळखी थोडे म्हातारेसे आजोबा बसले होते. त्यांच्या हातात बरेचसे कागद होते. त्यांनी एक एक मुलाला आणि मुलीला जवळ बोलावून त्यांची माहिती विचारली आणि लिहून घेतली. मग ते सर्व मुलांना म्हणाले;"तुम्हाला मी इथेच येऊन शिकवणार आहे. आपण अगोदर पहिली दुसरीचा अभ्यास सुरु करू. ज्याला जे जमेल ते आणि तस त्यांनी शिकायचं बरका!"

आणि लालीच्या आयुष्यातला अभ्यास सुरु झाला. रोज माईबरोबर परत जाताना आता लाली सारखी तिच्या अभ्यासाबद्ध्ल बोलत असायाची. असेच बरेच महिने गेले. शीला अधून मधून लालीला विचारायची;"का ग लाली तुझ्या ताई कशा आहेत? त्या तुला माझ्या बद्धल विचारतात का ग?" लाली आपला अभ्यास चालू ठेवून म्हणायची;"नाही ग माई. तुझ्याबाद्धल का विचारतील? तू काय आमच्या शाळेत येतेस का?" शीला मनातून अस्वस्थ व्ह्यायची पण तिने लालीला ते कधी कळू दिल नाही.

आणि एक दिवस लाली संस्थेच्या दारातून बाहेर आली तिच ओरडत;" माई तुला उद्या ताईंनी बोलावलं आहे. सगळ्या मुलांच्या आईला बोलावलं आहे."

शीला गोंधळली. "सगळ्यांच्या? का ग लाली?"

मोठ्या माणसांप्रमाणे डोक्याला हात मारत लाली म्हणाली;"माई आमची परीक्षा झाली ना? म्हणून...."

दुसऱ्या दिवशी शीला धडधड्त्या मनाने लालीच्या संस्थेत पोहोचली. एक दोघी तिथे उभ्या होत्या तिच्याच सारख्या. थोड्या वेळाने एक एकीला आत बोलावत होते. काही वेळ थांबल्यावर शीलाला पण आत बोलावले. शीला दबकत दबकत आत गेली. आत लालीच्या ताई आणि अजून एक माणूस बसला होता. ताईंनी शीलाला बसायला सांगितले. पण ती अवघडून उभीच राहिली. ताई हसल्या आणि म्हणाल्या;"शीला बाई तुमची मुलगी खूप हुशार आहे बरका. आम्ही फक्त पहिलीचा अभ्यास इथे सुरु केला होता. पण लालीने चौथी पर्यंत मजल मारली आहे. खूप चांगली मुलगी आहे ती. हे दामले सर. हेच मुलांचा अभ्यास घेतात. सर, तुम्हीच बोला."

दामले सिरानी शीलाकडेआपल्या चष्म्यातून एक कटाक्ष टाकला आणि हसत म्हणाले;"अहो शीतलताई तुमची लाली लाखात एक आहे. खूप शिकवा तिला. तुम्हाला इथून तिच बाहेर काढेल. तिला तुम्ही इथे नका राहू देऊ."

ताई आणि सारंच बोलण एकून शीलाच्या डोळ्यात पाणी उभ राहील. तिने हात धरून उभ्या असलेल्या लालीचे खाली वाकून माटामाट मुके घेतले आणि धावत जाऊन ताईंचे पाय धरले, म्हणाली;"ताई ... साहेब... तुमच्या हवाली करते हो माझी मुलगी. मला तिला खुप शिकवायची आहे हो. तिला या चिखला मधून बाहेर काढायची आहे. तुम्ही म्हणाल ते करेन मी."

"अग हो हो!" उभे राहात निर्मला ताई आणि दामले सर एकदमच म्हणाले. निर्मला ताईंनी तिला उठवल. आणि लालीला पाणी आणायला पाठवलं. मग ताईंनी तिला समजावलं, म्हणाल्या;"हे बघ शीला, तुझी मुलगी तुझ्याजवळच राहील. फक्त तिला इथे पाठवत जा. आम्ही तिचा अभ्यास करून घेऊ. सगळ ठीक होईल बघ."

शीला डोळे पुसत उभी राहिली आणि परत परत दोघांना धन्यवाद देत लालीचा हात धरून निघाली. बाहेर येताच तिने पदराला बांधलेले दहा रुपये काढले आणि लालीला विचारल;"बोल बेटा काय खायचं आहे तुला? आज तू म्हणशील ते. आज चहा पाव नाही खायला देणार मी तुला." माईकडे बघत लाली मनापासून हसली. दोघींनी मग ठेल्यावरचा डोसा खाला. आज माईचा आनंद गगनात मावत नव्हता. ती प्रत्येकाला लालीचा पराक्रम सांगत होती. आणि सांगताना रडत होती. लाली मात्र एका कोपऱ्यात बसून माईकडे बघत होती. तिला ताईंनी जवळ बोलावून जे सांगितलं होत ते आठवत होत. ताई म्हणाल्या होत्या;"लाली बेटा ही फक्त पहिली पायरी आहे. आत्ता कुठे तू सुरवात केली आहेस. पण असच मन लावून तू जर अभ्यास करत राहिलीस तर खरच तू एक वेगळा इतिहास घडवशील. मी तुझ्याबरोबर आहेच. आता मी तुला वेगवेगळी पुस्तक वाचायला देत जाईन. ती नक्की वाचत जा. तू तुझ्या वयापेक्षा जास्त समजूत दार आहेस. कारण तू ज्या परिस्थिती आहेस तिथे साधभोळ राहून चालणार नाही हे तुला माहीत आहे. बेटा स्वतःला आणि तुझ्या माईला सांभाळ ह." त्यावर लालीने मनापासून मान डोलावली होती.

निर्मला ताईच निरीक्षण बरोबरच होत. आता लाली १० वर्षांची झाली होती. आणि तिच्यातला बालीशपणा अलीकडे अगदी गायब झाला होता. ती संस्थेत यायची पण इतर मुलांबरोबर मस्ती करण तिने अजिबात बंद केल होत. ती बरी आणि तिची पुस्तक आणि अभ्यास बरा असच असायचं. महिन्यानमागून महिने गेले. लाली शिकत होती मोठी होत होती.

मात्र अलीकडे अम्मा लालीला वरचेवर बोलावून घ्यायची. शीलाला हे आवडत नव्हत. पण तिला यावरचा उपाय काही केल्या सुचत नव्हता. तिने एक दोन वेळा निर्मला ताईना एकटीने भेटायचा प्रयत्न केला पण ताई कायम कोणाबरोबर तरी असायच्या. आणि शीलाला इतरांसमोर लालीबाद्धल काही बोलायची इच्छा नव्हती.

लाली १४ वर्षांची झाली होती. तिच शरीर बोलायला लागल होत. मुळात सुंदर असणारी लाली आता वयात येते आहे हे कोणी आंधळाही सांगू शकला असता. शीलाचा जीव भविष्याचा विचार करून घाबरा होत होता. ती अजूनही लालीला सोडायला आणि आणायला जायची. एकदिवस माई आणि लाली निघाल्या आणि अम्माने शीलाला बोलावून घेतले.

"शीला बेटी जरा मेरी पीठ दबादेना. बोहोत दर्द हो रहा हे." अस म्हणून अम्म्हाने शीलाला जवळ बसायला सांगितले. तिने लालीकडे बघितले आणि म्हणाली;"अरे लाली तू तो बोहोत बडी दिखाने लागी हे रे. क्या उमर हे तेरी अभी?"

शीलाने झपकन लालीला स्वतःच्या मागे लपवले आणि तिच उत्तरली;"अभी पाढनेकी उमर हे उसकी अम्मा. "

अम्मा हसली आणि म्हणाली,"अरे क्या करेगी पढके? पैसा ही कमायेगी ना? वो तो अभी भी कमा सकती हे वो. अरे शीला क्यो आपना और इसका खून जला रही हे? मुझसे छीपाएगी तू उसको मगर तुझे पता नही उस संस्था में कौन जाता हे कितना पढता हे वो सब मालिक को खबर रेहेता हे. समझी? और फिर कूच दिनोके बाद तो उसका संस्था जाना बंद होते हि वाला हे. बस कर ये नखरा." आणि जोरजोरात हसायला लागली.

शीलाच्या तळपायातली आग मस्तकात गेली. पण अचानक लालीने तिचा हात जोरात ओढला. आणि शीला भानावर आली. काही न बोलता लालीचा हात धरून ती तिथून निघाली. त्या दोघी रस्त्याला लागेपर्यंत अम्माच दहाडल्या सारख हसण एकू येत होत.

दोघी न बोलता चालत होत्या. शीलाच्या मनातली घालमेल लालीला कळत होती पण ती शांत होती. कारण तिने मनात एक निर्णय घेतला होता. आता स्वस्थ बसून चालणार नाही याची तिला कल्पना आली होती. संस्थेच्या दारात पोहोचल्यावर मागे न बघता लाली आत गेली.

परतीच्या प्रवासात शीलाच्या मनाला अनेक विचारांनी होत;" काय असेल लालीच्या मनात? कस सोडवू तिला या चक्रव्यूहातून? कोणाशी बोलू मी?"

आज लाली खूपच गप्प आहे हे निर्मला ताईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. लाली आता सातवीची परीक्षा देणार होती. त्यामुळे सरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होत. इथल प्रत्येक मुल आपापल्या कुवतिनुसार प्रगती करत होत. दामले सर सर्वांवर खुश होते. परीक्षेच्या दिवसात ते स्वतः मुलांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी जायचे. मुलांचे नाव त्यांनी रात्र शाळेत नोंदवले होते. आणि केवळ त्यांच्या भरोशावर त्या शाळेने या सर्व मुलांना प्रवेश दिला होता.

"लाली परीक्षा तोंडावर आली आहे. पण तू गेले २-३ दिवस अभ्यास करताना दिसत नाहीस." शेवटी वाट बघून निर्मला ताईनी लालीला छेडल. लाली शून्यात नजर लावून बसली होती. ती दचकली आणि एकदम निर्मलाताईच्या मांडीत कोसळून रडू लागली.

"ताई माझी ही शेवटची परीक्षा आयुष्यातली. अजुनेक सुखी तयार होणार बघा." लाली हमसून हमसून रडत म्हणाली. निर्मलाताई म्हणल्या;"लाली मला माहित आहे सगळ. अग मी तुझ्या आईला देखील कल्पना दिली होती की लालीला इथून बाहेर काढायला हव. अगदी पहिली भेट झाली ना आमची तेव्हाच. आणि मी देखील तेव्हाच ठरवलं होत की लाली इतरांसारखी तेच आयुष्य नाही जगणार. तू हार मानु नकोस. आपण नक्की मार्ग शोधू या."

निर्मलाताईच्या आश्वासक बोलण्याने लाली शांत झाली. त्या पुढे म्हणाल्या;"फक्त तू मी आणि तुझी माई काहीच करू शकत नाही लाली. पण माझ्या मनात एक मार्ग दिसतो आहे. मी तुला सांगेन काय ते. पण तोपर्यंत फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. कारण तुझ्या आयुष्यात जर काही बदल घडणार असेल तर तो फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच होणार आहे."

निर्मलाताईशी बोलल्यावर लाली एकदम शांत झाली आणि जोरात अभ्यासाला लागली. परीक्षा अगदी तोंडावर आली होती. लाली अभ्यास आणि फक्त अभ्यास करत होती. त्यामुळे तिला लक्षात आल नव्हत; पण अलीकडे शीला खूप अस्वस्थ असायची. तिने अम्माच्या नकळत हळूहळू थोडे पैसे बाजूला ठेवायला सुरवात केली होती. स्वतःचा सकाळचा पाव तिने बंद केला होता. दिवसभरातला चहा पण अगदी १-२ कपवर आला होता. अलीकडे ती कोणत्याही कस्टमरला नाही म्हणत नव्हती आणि अम्माला कळणार नाही अश्या प्रकारे एखाद-दुसऱ्या कस्टमरचे पैसे परस्पर लंपास करत होती.

परीक्षा सुरु झाली. सात पेपर्स. दामले सरांनी सर्व मुलांना थोड लवकरच बोलावलं होत. परीक्षेची शाळा थोडी दूर होती आणि चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शीला लालीला सोडायला निघाली तेव्हा दारात उभ्या अम्माने कुत्सितपणे शीलाकडे बघितले.

"देख तेरी परीके पर मै कैसे काटती हु." अस म्हणून तिने लालीचा गालगुच्चा घेतला आणि शीलाला लाथ मारली. लाली संतापली. पण शीलाने तिचा हात धरला आणि ती चालु पडली.

एक एक पेपर पार पडत होता आणि शीलाचा जीव अस्वस्थ होत होता. आज लालीचा शेवटचा पेपर होता. लाली निघायची तयारी करत होती. शीला तिच्या जवळ आली आणि म्हणाली ;"लाली आज चनिया-चोली घाल." लाली एकदम गोंधळली. पण तिला बोलायला वेळ न देता शीला म्हणाली,"मी बोलते तस कर. प्रश्न नको आहेत मला. आत दोन कुर्ते आणि पायजमे घाल. वर चनिया-चोली घाल आणि निघ. अवतार दिसशील किंवा संशय येईल अस काही केलस तर चामडी सोलून ठेवीन." एवढच बोलून शीला दुसरीकडे गेली. लालीला काहीच कळले नाही. पण तिने माई म्हणते म्हणून अंगात दोन कपडे घातले आणि वर चनिया-चोली घातली. शीला आणि लाली निघाल्या. आज शीला मनापासून देवाची प्रार्थना करत होती की आज अम्माने लालीला बघू नये. पण नशिबाने घात केलाच. अम्मा समोर आली. तिने लालीकडे बघितले आणि तिचे डोळे चमकले.

"छोरी तू तो पटाका लग रही हे रे. चल छोड पेपर वेपर आजा आजसेही कामपे." अम्माने लालीचा हात धरला आणि म्हणाली. शीला एरवी भडकली असती. पण आज तिला काय झाले होते कोण जाणे. तिने अम्माकडे गयावया केली. "छोड अम्मा उसकू . आज उसका आखरी पेपर हे." अम्मा हे एकून एकदम मोठ्याने हसली. तिने लालीचा हात सोडला आणि म्हणाली;"क्या? आखरी हे? ठीक ठीक. जा फिर. मै उपर बात करती इसके लिये. शीला इसका नया नाम क्या होगा सोचा हे क्या तुने? चल, मैने अभी परी बोला ना... तो आजसे..... ना ना... कालसे तू परी बनेगी." आणि मग आपल्याच नादात आत निघून गेली. ती जाताच शीलाने लालीचा हात धरला आणि ती तिथून वेगाने बाहेर पडली.

समोर दामले सर इतर मुलांबरोबर उभे होते. ते दिसताच शीलाने लालीच्या हातात पैसे कोंबले आणि म्हणाली;"लाली बेटा परीक्षेच्या नंतर तुला रंगा भेटेल. तो नेईल तिथे जा. हे पैसे घे. माझी काळजी करू नकोस. आणि आत्ता काही विचारू पण नकोस. मी काय बोलते आहे ते निट एक.... आज तू इथे परत येणार नाही आहेस. रंगा तुला कुठेतरी लपवून ठेवणार आहे. सगळ शांत झाल की तुझ्या ताई तुला त्यांच्याकडे बोलावून घेतील."

हे अस अचानक माई काय बोलते आहे ते लालीला कळेना. तिच्या डोळ्यात पाणी उभ राहील. "माई मी नाही जाणार तुला सोडून. अम्मा तुला मारून टाकेल." ती म्हणाली.

"वेड्यासारख करू नकोस लाली. आणि रडू पण नकोस. सरांना काही माहित नाही. जर तू पळून जाणार आहेस हे लक्षात आल तर ते तुला नेणार नाहीत. आणि अम्मा मला नाही मारणार. तुला गायब करते आहे न मी. ती ते सगळे पैसे माझ्याकडून वसूल करणार. मी नाही मरत एवढ्यात. जोवर हा थोबडा रंगवून चांगला आहे तोवर माझी किंमत आहे. बेटा तुला मिठीत घ्यायचं होत ग. पण तेही शक्य नाही. कारण आपल्यावर अम्माच्या मुस्तान्द्यांची नजर असणार कुठूनतरी. त्यांना जरा जरी शंशय आला तर तुझी आणि माझी मरम्मद एकसाथ. पोरी स्वतःला सांभाळ. आणि तुझी माई तुझी वाट बघते आहे हे विसरू नकोस." शीला एवढ बोलेपर्यंत त्या दामले सरांपर्यंत पोहोचल्या होत्या.

"अहो ताई किती उशीर." अस म्हणून दामले सर मुलांकडे वळून म्हणाले;"चला रे निघूया." आणि सार्वजण चालू लागले.

"मागे वळून बघू नकोस. सरळ नेहेमिप्रमाणे चालत जा... जा बेटा" शीला म्हणाली. आणि मनावर दगड ठेऊन लाली निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही किंवा डोळ्यातून पाणी काढले नाही. ती चालत होती. आणि शीला काही क्षण थांबून मागे फिरली.

कथा

प्रतिक्रिया

वाचले दोन्ही भाग. वाचकाला पुढे काय ह्या हिंदोळ्यावर ठेऊन लालीची गोष्ट निरोप घेते. पुढे काय झाले असेल ह्यावर विचार करण्यात तसा अर्थ नाही. अजून एक सुखी अडकली नसेल अशी आशा करतो.

ज्योति अळवणी's picture

11 Oct 2015 - 5:35 pm | ज्योति अळवणी

एकुण ४ भागात गोष्ट पूर्ण केली आहे. लालीची गोष्ट positive आहे.