मेपोल - एक आनंदोत्सव

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
29 Sep 2015 - 2:10 pm

नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्‍याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.

मेपोलांचे सध्याचे स्वरुप आधूनीक पोलांचे असले तरीही उपलब्ध ऐतिहासीक संदर्भा नुसार जंगलातील वृक्ष मुळे तोडून मैदानात आणून रोवणे त्याच्या फांद्या छाटून घरोघरी आपपाल्या घराबाहेर लावणे आणि मैदानात रोवलेल्या खोडास फुले. फुल माळांनी सुशोभीत करून सांस्कृतिक कार्यक्रम पारपाडणे असे सर्वसाधारण स्वरुप आहे. जंगलातील वृक्ष मुळे तोडून मैदानात आणून रोवणे त्याच्या फांद्या छाटून पूजा करणे ह्याचे वर्णन महाभारताच्या आदीपर्वात नमुद शक्रोत्सवाच्या जवळ जाणारे तर मेपोलाच्या भोवतालच्या सामुहीक फेरनृत्याची जुनी चित्रे पाहता गुजराथी गरब्याची प्रकर्षाने आठवण यावी. मेपोलाच्या सामुहीक फेरनृत्यास इंग्रजांनी लांब रंगी बेरंगी रिब्बना लावून त्या रिब्बंनांसहीत फेरनृत्य करण्याचे आगळेच मोहक रुप दिले आहे.

ख्रिश्चनादी अब्राहमीक धर्मांच्या धर्ममार्तंडांना या मेपोलाचा इतिहास काठीपूजेपासून चालू झालेला असल्यामुळे अब्राम्हण्यम आहे. (अब्राहमीक धर्मांना हा सण नकोसा असल्यामुळे हिंदूंनी त्यावर आपला आधिकार दाखवण्यास हरकत नसावी -हिंदुधर्मीयांचा युरोमेरीकेतील लोकसंख्येचा टक्का सहज वाढेल :) ह.घा.) धर्मांची बंधने झुगारून १४ फेब्रुवारी जशी साजरी होते तशी १ मे साजरी होताना दिसते. म्हणजे कॉन्व्हेंटातून मूलांना त्या दिवशी शाळेत न पाठवल्यास सरकारी कायद्याने इंग्लंडात पालकांना जबर दंड होऊ शकतो. ख्रिश्चनांनी आणि विशेषतः प्रोटेस्टंटांनी मेपोल संस्क्र्तीवर केलेल्या सांस्कृतीक अत्याचाराचा वेगळा धागा होऊ शकेल किंवा पुढे मागे वेगळा धागा करण्याची इछा आहेच. वर महाभारताचा उल्लेख केला म्हणजे प्रत्यक्षात काठीपूजेचे उत्सव भारतातून सुरु झाल्याचे दावे लगेच करता येणार नाहीत, आमेरीका खंडात देवक स्तंभांची परंपरा होती युरोपात मे पोल आणि ओक वृक्षाची आर्चना दिसते. तर आशियात अगदी सायेबेरीया मंगोलिया चिन ते खाली पार पूर्व आशिया भारताकडे येताना ब्रह्मदेश; भारताच्या आठही दिशा; पुढे मध्यपूर्व मग मध्य एशिया मध्ये अशेरा काठ्यांच परंपरा आहे.

असो विकिमिडीया कॉमन्सवरची काही छायाचित्रे देतो तुम्हीही युट्यूबावरील लिंका द्या परदेश स्थित मराठी असाल आणि मेपोल जवळून अनुभवला असेल तर तुमचे अनुभव सांगा. मेपोलची अधिक ज्ञानकोशास उपयूक्त माहितीही देण्यास हरकत नाही पण या धाग्यावरील माहिती पूर्ण प्रतिसाद मध्ये मराठी विकिपीडियावर लेख तयार करण्यासाठी आम्ही चकटफू मध्ये वापरणार म्हणून आपले प्रतिसाद लेखन कॉपीराइट मुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.

स्विडन मधील एका मे पोलाची उभारणी (वस्तुतः हे छायाचित्र युकेच्या जुन्या मेपोल वर्णनांशी अधिक जुळत असण्याची शक्यता वर्णनांच्या वाचनावरुन तरी वाटते.)

maypole sweeden

मे पोल उभारणीचे १९व्या शतकातील एक चित्र विकिमिडीया कॉमन्सवर छायाचित्रास Frederick Goodall Raising the Maypole असे नाव दिले आहे.

maypole

हे एक रंगीबेरंगी मेपोलाचे छायाचित्र
maypole

इंग्लडातील मेपोल नृत्ये मेपोल काठीस रिब्बन सोडलेल्या असतात सहभागी लोक त्यास धरून नृत्यकरतात.

maypole dance

Maypole dance

इंग्लंडा आणि युरोपातील शाळेतील मुले मेपोलाभोवती फेर धरुन नृत्य करताना
maypole dance

may pole dance

maypole dance

may pole dance

आमेरीकेत साजरे होत असलेले अंग्रेजी पद्धतीचे मेपोलनृत्य

maypole dance

जर्मनीतील एक मेपोल दृष्य
maypole germany

Prangstangen म्हणजे काही गावात खालील प्रमाणे मेपोलांना फुलांनी सजवले जाते आणि मेपोलांची शोभायात्रा वगैरे काढली जाते.
maypole

सर्व छायाचित्र सौजन्य : विकिमिडीया कॉमन्स

संस्कृतीकलानृत्यधर्मइतिहाससमाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

मेपोलविषयी पहिल्यांदाच समजले. धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

29 Sep 2015 - 6:37 pm | मधुरा देशपांडे

मार्च ते जुन या दरम्यान बरेच कार्निव्हल्स असतात, त्यातले काही बघितलेही आहेत, पण मेपोल बद्दल माहित नव्हते. इथली जवळची मेपोल ची ठिकाणे बघुन ठेवलीत. पुढच्या वर्षी जाण्याचा योग आल्यास फोटो अवश्य शेअर करेन.

माहितगार's picture

1 Oct 2015 - 7:55 pm | माहितगार

माझे स्वतःचे सध्या चार सहा वेगवेगळ्या ठि़काणी लक्ष असल्यामुळे प्रतिसादांना उत्तरे देण्यास विलंब होत आहे. आपल्या प्रतिसादा बद्दल आभारी आहे.

अजून एक माहिती हवी आहे. Betende Bäume हा जर्मन विकिलेख वृक्षपुजे बद्दल आहे का आणि तसे असेल तर त्यात काय लिहिले आहे याची संक्षीप्त माहिती हवी आहे.

आपल्या मे महिन्यातील मेपोल व्हिजीट झाल्यास आपल्या छायाचित्र वृत्तांताची प्रतिक्षा असेलच कारण मी धागालेखातील सगळे वर्णन आंतरजालीय वाचनातून लिहिले आहे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांचे वर्णन वाचण्यास निश्चित आवडेल.

मधुरा देशपांडे's picture

1 Oct 2015 - 8:43 pm | मधुरा देशपांडे

तुर्किश प्रकार दिसतो आहे. प्रार्थना करणारे वृक्ष असे काहीसे बहुतेक. सविस्तर माहिती काढुन सांगते.

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2015 - 6:11 pm | मधुरा देशपांडे

या पेजवरील जर्मन फारच अवघड आहे. त्यावर गुगलुनही बाकी काही माहिती मिळाली नाही. पण मला समजले ते असे की, तुर्कस्तानातील काही भागांमध्ये, वार्‍यामुळे ज्या झाडांच्या फांद्या हलतात, ती झाडं प्रार्थना करतात असा तेथील लोकांचा समज आहे. म्हणजे त्यावेळी वृक्षतोड करायची नाही वगैरे. पण ज्या झाडांच्या फांद्या वार्‍याने हलत नाहीत, रिजिड आहेत ती झाडे प्रार्थना करत नाहीत असे काहीसे. याशिवाय जी काही माहिती दिली आहे, ती बरीच डोक्यावरुन गेली. :) कुणालातरी विचारुन अधिक माहिती मिळाल्यास सांगेन.

माहितगार's picture

30 Sep 2015 - 1:18 pm | माहितगार

ब्रिटीश आणि युरोपीय लोक भारतात बराच काळ होते पण हा मेपोल अथवा अगदी त्याचे उल्लेखही त्यांच्या कडे उत्सव ज्या प्रमाणात होत असे त्यामानाने आपल्या फारसे वाचनात येत नाहीत. प्रत्येक गोष्टीस हाइप आणि कमशिअलायझेशक करणारी मंडळी याला अनुल्लेखाने मारते हे पाहून गंमत वाटते यास कारण त्यांच्याकडी कर्मठ मुर्तीपुजा विरोधकांचा कर्मठपणा आहे का काय अशी शंका येते.

गेल्या दोनचार दिवसात मी भारतीय उपखंडातील काठी पूजा इंग्रजी विकिपीडीयावर नोंदवली जावी म्हणून लेख लिहिण्यास घेतला असता प्रत्यक्ष नाही पण कर्मठांनी अप्रत्यक्ष विरोध अगदीच जोरदार केला तेव्हा हे मेपोल प्रकरण काय आहे म्हणून अभ्यासले. आत्ताच पाहिले उत्तर आमेरीका खंडातील मूळ आदीवासींचा सन डान्स ही सुद्धा काठी पूजा असावी, त्या सन डान्स मधला छातीला पियर्सींग प्रकार खरेच नकोसा वाटणारा आहे पण पण तेवढ्यासाठी म्हणून नाही तर केवळ त्यात काठ्यांचा वापर आहे म्हणून तर त्यांच्या जुन्या धार्मिक परंपरांचा त्यांच्या भाषेतून उपयोग होतो म्हणून आमेरीका आणि कॅनडाच्या सेक्युलर सरकारांनीसुद्धा कायदे करून त्यांच्या परंपरा मोडून काढण्याचा सगळाच प्रकार भारतीयांच्या दृष्टीने शॉकींग आहे. आपल्याला यातले काहीच माहित नसते. एनी वे हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

ते आणी मेपोल यामध्ये साम्य दिसतेय...

माहितगार's picture

30 Sep 2015 - 2:54 pm | माहितगार

या काठी प्रकारांचा अभ्यास करताना सारखी नवनवी माहिती मिळते आहे. आयुष्य सगळ महाराष्ट्रात जाऊन मला 'बगाड' प्रकार आपला प्रतिसाद वाचे पर्यंत माहित नव्हता. जरासे गूगल केले पण तुम्ही आणि अन्य मिपाकर या धाग्यात बगाड बद्दल अधिक माहिती अवश्य द्यावी, मराठी विकिपीडियावर लेख लिहीण्यास सोपे जाईल

ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरील बगाडची प्रथा उल्लेखानुसार काही वेगळेच दिसते आहे.

राघवेंद्र's picture

1 Oct 2015 - 12:25 am | राघवेंद्र

बगाड 'अग बाई अरेच्या' सिनेमात पाहता येईल.

https://en.wikipedia.org/wiki/Aga_Bai_Arrecha!

पहिल्यांदाच कळली ही माहीती.

सानिकास्वप्निल's picture

30 Sep 2015 - 9:11 pm | सानिकास्वप्निल

मेपोलबद्दल प्रथमचं माहिती समजली.
लेखन आवडले.
धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2015 - 11:53 pm | श्रीरंग_जोशी

मेपोलविषयी प्रथमच कळले. या धाग्यातली फोटोजची निवड आवडली.

इथे अमेरिकेत नेटिव्ह अमेरिकन्सच्या संस्कृतीची खूण म्हणून त्यांच्या कोन शेप्ड हट्सच्या प्रतिकृती काही ठिकाणी उभारल्या जातात व त्यावर रंगीबेरंगी सजावट केली जाते.

या लेखनासाठी धन्यवाद.

माहितगार's picture

1 Oct 2015 - 8:12 pm | माहितगार

नेटिव्ह अमेरिकन्समध्ये निव्वळ पवित्र देवक-स्तंभ या स्वरुपात्ले स्तंभ असावेत पण सोबतच ख्रिश्चनपूर्व काठी-पूजा काही जमातीततरी निश्चितपणे होत असावी सूर्यपूजा करणार्‍या एका जमातीत स्तंभपूजा दिसते त्यावर छातीच्या भागात पिअर्सींग केल्यामुळे त्यावर आमेरीकन राज्ये आणि कॅनडात बंदी असे नंतर या बंदी उठवली), त्यांनी आपल्या परंपरा गोपनीय पद्धतीने जपल्या अजूनही बाहेरच्या नॉन नेटीव्हना सहज प्रवेश नाही छायाचित्रे काढण्यास अनुमती नसावी, अजून एका ओमाहा नावाच्या जमातीत देवतेचीच स्तंभ स्वरुपातच पूजा होत असे ती ख्रिश्चन प्रसारामुळे बंदपडली असावी अगदी त्यांचा पुज्य स्तंभ आणि वस्तु संग्रहालयास दान झाले होते आणि तब्बल शंभर वर्षांनतर काही ओमाहांना स्वतःच्या परंपरांची परत जाणीव झाल्यामुळे त्यांनी ते संग्रहालयातून परत मिळवून परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयास केला असावा.

उपरोक्त काही माहिती इंग्रजी विकिपीडियावर असूनही शोधणे सोपे जात नाही. कर्मठ ख्रिश्चन आमेरीकन त्या पुजा परंपरा आहेत हे स्विकारण्यास तयार नसावेत तर जमातींनाही नसता इतरांचा जाच नको म्हणून प्रसिद्धी नको असावी म्हणून हि माहिती शोधण्यास आणि संगती लावण्यास जड जाते आहे पण आपणास या विषयावर काही माहिती आणि संदर्भ मिळाल्यास विकिलेख विकासासाठी हवे आहेत.

आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळात जेवढे मागे जात राहतो तेवढे एकमेकापासून दूरवर पसरलेल्या मानवसमाजांमध्ये दंतकथा, समजूती, प्रथा, सोहळे, इ संबंधी समान सुत्रे सापडतात.

राजकीय, सांस्कृतीक, सामरीक आणि जागतिकीकरणाच्या आक्रमणांमुळे अश्या अनेक प्राचीन भाषा, धर्म, प्रथा आणि राजकीय-सामाजीक व्यवस्था नष्ट होत गेल्या, होत आहेत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले असे पुरावे नष्ट होण्याने मानवी संस्कृतीची वाटचाल खात्रीलायकरित्या नक्की करण्यातल्या अडचणी वाढत आहेत.

लेखकाच्या अश्या अनवट विषयांसंबंधीच्या कुतुहलाबद्दल आणि त्यांच्या माहितीचे उत्खनन करण्याच्या चिकाटीचे प्रचंड कौतूक आहे !

माहितगार's picture

1 Oct 2015 - 8:28 pm | माहितगार

काळात जेवढे मागे जात राहतो तेवढे एकमेकापासून दूरवर पसरलेल्या मानवसमाजांमध्ये दंतकथा, समजूती, प्रथा, सोहळे, इ संबंधी समान सुत्रे सापडतात.

राजकीय, सांस्कृतीक, सामरीक आणि जागतिकीकरणाच्या आक्रमणांमुळे अश्या अनेक प्राचीन भाषा, धर्म, प्रथा आणि राजकीय-सामाजीक व्यवस्था नष्ट होत गेल्या, होत आहेत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले असे पुरावे नष्ट होण्याने मानवी संस्कृतीची वाटचाल खात्रीलायकरित्या नक्की करण्यातल्या अडचणी वाढत आहेत

+१ काही परंपरा सहभाग घेणार्‍यांसाठी त्या त्या क्षणी लक्षणीय असतात परंतु त्याची माध्यमांनी निटशी दखल न घेतल्याने परंपरा आणि त्याचे पुरावे पाहता पाहता काळाच्या आड जातात.

या माहिती उत्खनन मात्र खरेच बरेच कठीण जात आहे. अब्राहमीक कर्मठ लोकांना हा इतिहास आणि परंपरा जतन करून नकोशा असाव्यात त्यामुळे माहितीचा उल्लेख न करणे, केलाच असेल तर माहितीत पक्षपातीपणा ठेवणे अगदी इंग्रजी विकिपीडिया अनसेन्सॉर्ड असणे अपेक्षीत आहे पण मी त्यांच्या नाही आपल्या भारतीय परंपरांची दखल घ्यावयास गेलो तर तुम्ही मिस-इन्फॉर्म करत आहात ऑफेन्सीव कंटेंट आता भारतीय असो अथवा उपरोक्त मेपोल असोत अथवा आदीवासींसी स्तंभपूजा परंपरा यात ऑफेंसीव्ह काय आढळते ? अप्रत्यक्ष दबाव टाकणे असा अनुभव येतो आहे. असो.

आपल्या प्रतिसादासाठी आभार

पद्मावति's picture

1 Oct 2015 - 2:09 pm | पद्मावति

मेपोल विषयी इतकी माहिती पहिल्यांदाच मिळाली. धन्यवाद.

माहितगार's picture

1 Oct 2015 - 8:31 pm | माहितगार

इतरत्र व्यस्त असल्यामुळे प्रतिसादांना उत्तरे देण्यास विलंब होत आहे. आपणा सर्वांना प्रतिसादांसाठी धन्यवाद

मदनबाण's picture

2 Oct 2015 - 6:00 am | मदनबाण

नविन माहिती कळाली. :)
बाकी,लाल पोशाखातील ललना पाहुन उगाच क्षणभर ऑक्टोबर फेस्ट चे चित्र समोर आले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho Gaya

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2015 - 7:48 am | कैलासवासी सोन्याबापु

मेपोल भारतात सुद्धा आहे की राव, म्हणजे बागड़ वगैरे प्रकार सोडुन अस्सल प्रकार मेपोल ह्या नावाने, जुन्या पिढीतल्या कुठल्या ही क्रीड़ा शिक्षकाला विचारा, (माझे बाबा क्रीड़ा शिक्षक होते व् त्यांस पोरांना मेपोल ची प्रॅक्टीस देताना व मेपोल परफॉर्म करताना मी स्वतः पाहिले आहे २६ जानेवारी अन १५ ऑगस्ट ला) साधारण १२-१५ फुट उंच पोल, त्याला वरती गोलाकार कड्या ८-१० प्रत्येक कड़ी ला एक वेगळ्या रंगाची सॅटिन ची रिबन अन तिचे खालचे टोक एक विद्यार्थ्याच्या हाती (असा साधारण १० मुलांचा+ एक शिक्षाकाचा चमु) त्या मेपोल तंबू च्या आत २ पोरे खांब पकडून उभी किंवा हनुमान बैठकीत असत (क्राउच पोजीशन) अन स्टैंड वर ड्रम घेऊन शिक्षक उभा असे , ड्रम च्या तालावर गोल गोल फिरणे, अल्टरनेट विद्यार्थी खाली बसणे उभा राहणे वगैरे प्रकार असत मूवमेंट चे ज्याच्यामुळे फरफरणाऱ्या रिबन्स चे एक सुंदर दृष्य तयार होत असे अन त्याला पार्श्वसंगीत म्हणुन ड्रम चे बीट्स असत

माहितगार's picture

2 Oct 2015 - 9:22 am | माहितगार

ग्रेट हे माहित नव्हते, १५ ऑगस्ट २६ जानेवारी म्हणजे तसा अलिकडील प्रकार झाला, पण क्रिडा शि़क्षकांना याची माहिती ब्रिटीशांनी भारत सोडण्यापुर्वीच शिकवला असण्याची अथवा भारतात अँग्लोइंडीयन समाजाने मेपोल साजरे केलेच नसतील असे नाही त्यांच्याकडूनही माहित झाले असू शकेल; संदर्भासाठी आंतरजालावरची कदाचित जुनी ब्रिटीश वृत्तपत्रे शोधावी लागतील.

एकुण मेपोल प्रकरण रोचक आहे, माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

माहितगार's picture

2 Oct 2015 - 9:31 am | माहितगार

तुमचे बरोबर दिसते टाइम्स ऑफ इंडीयाचा क्रिडा शिक्षकांकडून प्रशिक्षणाचा अलिकडील एक संदर्भ दिसतो आहे, टिमवर्क वगैरे उद्देश असावा. ब्रिटानिका एनसायक्लोपिडीयतही भारतात मेपोल असल्याचा उल्लेख दिसतो आहे.

माहितगार's picture

2 Oct 2015 - 9:45 am | माहितगार

राणी सरकार नावाच्या कलकत्त्याच्या अँग्लो इंडीयन स्त्रीने DANCING ROUND THE MAYPOLE: GROWING OUT OF BRITISH INDIA नावाचे पुस्तक लिहिले ब्रिटीश पत्रकार मार्क टुलींचे कलकत्त्याच्या टेलिग्राफ मधिल पुस्तक परिक्षणाच्या निमीत्ताने आहवणी रोचक आणि भारतातल्या अँग्लोइंडीयन लोकांच्या अ‍ॅटीट्यूडची माहिती देतात. (लोकमान्य टिळकांच्या लेखनात अँग्लोइंडीयन्सच्या पत्रकारीते बद्दलची सातत्याची नाराजीस लोकमान्यांचे तत्कालीन अनुभव कारण राहीले असतील का असे हे परीक्षण वाचून वाटले)

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2015 - 9:56 am | कैलासवासी सोन्याबापु

मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो नेहरू शताब्दी वर्ष १९८९ पासुन चा आहे, स्वर्गीय राजीव गांधी ह्यांनी ते वर्ष नेहरू शताब्दी वर्ष म्हणुन घोषित केले होते, तसेच पहिला मेपोल चा वापर त्रिवेंद्रम नॅशनल गेम्स / युथ गेम्स (खेळांचे स्वरुप क्लियर झाले नाही) मधे "युवक संगठन कौशल्य प्रकार" म्हणुन झाले चे समजले त्या नंतर राजीव गांधी ह्यांनीच आयोजित केलेल्या "भारतीयम" ह्या क्रीड़ा सांस्कृतिक कॅम्प दरम्यान मेपोल परत एकदा "कौशल्य संघटनशक्ति अन युवा कला" म्हणुन सादर करण्यात आला व तेव्हापासुन काही वर्षे मेपोल, फ्लॅगमार्च, ट्रैम्पोलिन हे प्रकार जिल्हास्तरावर अस्तित्वात राहिले, महाराष्ट्रात मेपोल हा स्थानिक संस्कृती सोबत मर्ज करण्यात आला होता (तसेच त्याचे स्वरुप होते मेपोल हा यूनिटी फॅक्टर अन इतर स्थानिक कला हा डाइवर्सिटी फॅक्टर) तर, महाराष्ट्रात मेपोल हा लेझीम पथक सोबत संलग्न होता, म्हणजे पार्श्वसंगीतात ड्रम (बिग ड्रम) अन लेझीम चा ताल अन त्या तालावर रिबन धरलेल्या चमु ची चित्ताकर्षक मूवमेंट,त्यात लेझीम पथक मेपोल च्या अवतीभवती सुंदर आकार (स्वस्तिक, त्याच्या केंद्रस्थानी मेपोल वगैरे) बनवत असत

(माहिती चा स्त्रोत निवृत्त प्राचार्य/ क्रीड़ा शिक्षक वडील)

महाराष्ट्रात मेपोल हा स्थानिक संस्कृती सोबत मर्ज करण्यात आला होता

खूपच छान कल्पना, आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.

आपण म्हणाल्यामुळे मेपोल इन इंडीया या शब्दांवर शोध घेतल्या नंतर आणखी गुजराथी गरब्यात गोफ दांडीया हा प्रकार आणि तामिळनाडूत Kolattam नावाची नृत्यपंपराही मेपोल प्रमाणेच दिसते अर्थात इंग्रज आल्या नंतर मूळपरंपरेत बदल झाले का इंग्रजांनी यांचे पाहून त्यांच्या परंपरेत बदल केले हा वेगळ्या शोधाचा विषय असावा.

मस्त कलंदर's picture

3 Oct 2015 - 12:53 am | मस्त कलंदर

हो.. हे अजून कसं कुणी म्हटलं नाही याचं आश्चर्य वाटलं होतं.

wind , wind, wind the bobbin
wind , wind, wind the bobbin!!
Hill, toe, tap.. tap.. tap..

wind , wind, wind the bobbin
wind , wind, wind the bobbin!!
pull... pull.. clap, clap, clap!!

हे गाणं आणि ड्रम-बिगुलाच्या तालावर वेगवेगळे आकार करणे असले प्रकार केल्याचे आठवतेय. 'होंगे कामयाब' देखील नाचासह शिकवले होते अगदी त्याच सुमारास.

मस्त कलंदर's picture

3 Oct 2015 - 12:55 am | मस्त कलंदर

आपला मेपोल वरून चौथ्या फोटोत आहे तसा होता

राही's picture

2 Oct 2015 - 11:29 am | राही

आपल्याकडे गोफ विणण्याचा प्रकार फुगडीसदृश खेळात असतो. गोफ विणू ग गोफ विणू, अर्ध्या रात्रीत गोफ विणू हे गाणेही (ह्या फक्त दोन ओळीच) माहीत आहे. पण हा प्रकार कितपत जुना आहे हे सांगता येत नाही. या प्रकारात मध्यभागी एक खांब, त्याला अडकवलेल्या रंगीबेरंगी फिती किंवा गोंड्याच्या लांबलचक रेशीमलड्या आणि भोवती त्यातली एक एक लडी हातात घेऊन मुली फेर धरतात. खांबाऐवजी एक उंच मुलगीसुद्धा मध्ये उभी राहाते. मुलींच्या एकमेकींना ओलांडण्याच्या हालचालीतून एक सुंदर साखळी विणली जाते. मग ती तशीच उलट्या (अँटिक्लॉकवाइज़) हालचालींनी उसवायची आणि रिबिनी/लड्या सुट्या करायच्या. याचाच थोडा कॉम्प्लिकेटेड प्रकार म्हणजे रिबिनींऐवजी तलम साड्या घ्यायच्या आणि त्या एका बाजूने वेगवेगळ्या तर्‍हांनी उलगडून मोरपिसार्‍याचे, कमळफुलाचे वगैरे आकार निर्माण करायचे.
गंगाधर गाडगीळांनी त्यांच्या एका कथेत ते प्रिन्सिपल असताना त्यांच्या कॉलेजमध्ये मुलींनी फोक-डान्स म्हणून गोफ नृत्य करताना काय गोंधळ घातला होता आणि तो गोफ गुंतून मुली त्यात कश्या गुरफटल्या होत्या याचे धमाल वर्णन केले आहे.

माहितगार's picture

2 Oct 2015 - 12:09 pm | माहितगार

रोचक, हे माहित नव्हते आत्ता जरासे गूगलल्यानंतर कोकण संंबंधीच्या काही शोधात गोफनृत्याचा उल्लेख येतो आहे असे दिसते. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर गोफनृत्याचा उल्लेख स्त्री गीतात आलेला दिसतो आहे. आणि बालकवींच्या 'अरूण पूर्व समुद्री छटापसरली' या कवितेत गोफनृत्याचा उल्लेख आहे. अर्थात प्राचीन संतसाहीत्यात उल्लेख दिसत नाहीत केवळ त्या मानाने अलिकडील मराठी साहित्यात दिसतात असे तुर्तास तरी म्हणावे लागेल.

(बालकवींचे काव्य कॉपीराइत फ्री असले आणि च्योप्यपेस्त करण्या जोगे असले तरीही ट्रांसलिटरल ऑर्गने सुविधा च्योप्यपेस्त बंद करून ठेवली आहे, अशा संदर्भ नमुद करण्याच्या वेळी हेच काम विकिस्रोतात असते तर सहज नकलडकवता आले असते)

असो बालकवींच्या श्रावणमासी हर्षमानसी मध्ये गोफाचा सुरेख उल्लेख आला आहे तो मराठी विकिस्रोतातून :

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे!

....पुढे मराठी विकिस्रोतावर

राही's picture

2 Oct 2015 - 1:38 pm | राही

गोफ हा शब्द मराठीत बर्‍यापैकी प्रचलित आहे. गोफ म्हणजे एक प्रकारची वेणी. सोन्याच्या तारेचा गोफ असतो. छडा, साखळी असते. साखळीत दुवे असतात. गोफात चटईच्या विणीने चारपाच लड्यांचा गोलाकार रज्जु विणला जातो. (सुंभाची वीण.) काळी पोत किंवा बारीक काळे मणी या विणीत विणून साधे मंगळसूत्र बनते.
गोफ विणण्यासाठी दोन किंवा अधिक धागे आलटून पालटून एकमेकांखालून काढावे लागतात. त्यामुळे धाग्यांचा एकमेकांना विळखा पडतो. बालकवींनी दोन इंद्रधनुष्ये एकमेकावर उगवल्याचे दृश्य गोफासारखे दिसत आहे असे म्हटले आहे.

शारिरिक शि़क्षण अभ्यासक्रमात (बीपीएड) हा पाहिल्याचे आठवते. माझ्या शाळेत पण असायचा. त्यासाठीचे खांब क्रिडासाहित्यच्या गोडाउनमध्ये कोपर्‍यात असायचे. पट्ट्या गुंडाळून. त्याला गोफच म्हणले जाई. अल्टरनेट बसायचे, लांब जायचे, गोल फिरायचे असे प्रकार असतात.
अजून एक अ‍ॅडिशन म्हणजे ह्या पट्ट्याच्य दुसर्‍या टोकाला लेझिम बांधून तो खेळला जातो. तसाच गोफ विणला जातो आणि सोडवला जातो. पाहाण्यास अत्यंत अप्रतिम दृश्य असते. काही गणेशमंडळे गणपतीच्या मिरवणुकीत हा लेझीमगोफ आवर्जून खेळत. डॉल्बी, डिजे अन ढोलाचा पुणेरी नाद लागला, हे सारे संपायलेय आता. :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2015 - 2:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

अमरावती च्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बहुतेक अजुनही शिकवतात हे बीपीएड एमपीएड ला

स्वाती दिनेश's picture

2 Oct 2015 - 11:40 am | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण लेख आवडला,
स्वाती

पैसा's picture

2 Oct 2015 - 4:09 pm | पैसा

रत्नागिरीला काही ठिकाणी होळी म्हणजे उंच सुरमाड आणून जमिनीत पुरतात, त्याला हार फुले वगैरे वहातात, त्याची पूजा करतात. मात्र ते झाड जाळत नाहीत तर तोडतात. अजून काही ठिकाणी अशी होळी तोडण्याची प्रथा असू शकेल.

माहितगार's picture

2 Oct 2015 - 6:03 pm | माहितगार

हि माहिती रोचक आहे. ( बाकी जाळणे वाली होळी आयर्लँड आणि इराणातही आहे)

हे सर्व सण-विधी मुख्यतः एकाच कल्पनेशी जोडलेले आहेत. ती म्हणजे मध्यभागी काठीसारखे काहीतरी रोवून त्याभोवती वर्तुळाकार फिरणे. वर्तुळ हा भौमितिक आकार आदिमानवाला कुतूहलजनक वाटला असेल. आकाशातले ग्रहगोल, सूर्य-चंद्र वर्तुळाकार होते. पर्वत दुरून शंक्वाकृती दिसत होते. वार्‍यापावसाचा एकाच बाजूने मारा नसलेल्या खंडांतर्गत प्रदेशात जमिनीचे उंचवटे घन-अर्धवर्तुळाकार (हेमिस्फेरिक) दिसले असतील. मग मानवाने आपल्या मृतांच्या स्मृती जपण्यासाठी गोल किंवा लंबगोल आकार निवडले असतील. त्याभोवती दगड रचले असतील. नंतर स्तूप बांधले असतील. स्तूप (प्राकृत ठूप)चे मराठीतल्या अनेक शब्दांशी नाते आहे. ठूप, ठेप, ढेप, टेप, टेंब, टेंबूक, टेंगूळ, टेपाड, टेकाड वगैरे तर आहेतच पण टूम्ब, डोम हे परकीय शब्दसुद्धा आहेत. तर वर्तुळ हा आकार सहजसाध्य. आदिम मानवाच्या आवाक्यातला. सुरुवातीची जमिनीवरची ओबडधोबड वर्तुळाकार स्मारके नंतर प्रगत अश्या घुमट, कलश, डोम अशा स्ट्रक्चर्समध्ये रूपांतर पावली.
आदिम मानवाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वर्तुळ हा फॉर्म निवडला. सर्वांनी हातात हात गुंफून ते विस्तारले की झाले मानवी वर्तुळ. केंद्राभिमुख रचनेत सगळे जण एकमेकांना पाहू शकत, प्रतिसाद देऊ शकत. परिघावरचे सगळे बिंदू समान. कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही, कोपर्‍यात नाही. आदिम संस्कृतीचे एक लक्षणच. पण वर्तुळाला केंद्राशिवाय अस्तित्व नाही. फेर धरता धरता मानवी वर्तुळ विसकटू शकत होते, दुसरीकडे भरकटू शकत होते. म्हणून मग केंद्रनिश्चितीसाठी मध्ये काहीतरी ठेवण्याची प्रथा पडली असेल. एखादा दगड, छोटी वाळकी काठी वगैरे. आजही फेराच्या गाण्यात मध्ये काहीतरी असते. मग तो गर्भदीप (गरबा) असो वा हत्तीची प्रतिमा.
तर ही खूण सर्वांना दिसावी म्हणून उंच काठी निवडली गेली असेल. उंची ही हळू हळू उच्चतेशी, अतिमानव्याशी जोडली गेली असेल. मानवापेक्षा उच्च ते सर्व लांबीरुंदीउंचीने मानवापेक्षा मोठे असायला हवे. मग असे एक उंच प्रतीक काठीच्या रूपात कल्पिले गेले असेल, त्याला देवत्व प्राप्त झाले असेल/बहाल केले गेले असेल.
शिवाय काठी ही आदिमानवाला एक बहु-उपयोगी नैसर्गिक वस्तू वाटली असेल. दगडी हत्यारे बनवण्याआधीच्या काळात झाडाची फांदीकाठी हे एक प्राथमिक हत्यार होते असेल, लहानसहान प्राण्यांच्या शिकारीसाठी, झाडावरची फळे तोडण्यासाठी, जमिनीतले कंद उकरण्यासाठी उपयोगी ठरले असेल. तांड्याने भटकताना तांड्यापासून न भरकटण्यासाठी, एकत्र राहाण्यासाठी उंचावलेली काठी ही खूण ठरली असेल. जंगलातून उंचसखल जमिनीवर चालताना आधार झाली असेल, किंवा त्याही आधी, उत्क्रान्तिपटावर ताठ उभा राहू शकणारा आदिमानव निर्माण होण्याआधीच्या मानवसदृश प्राण्याने ताठ उभे राहाण्याची धडपड करताना झाडाच्या फांदीचा आधार घेतला असेल. कोण जाणे.
काठीच्या महत्त्वाची संकल्पना मानवाच्या संज्ञाप्रवाहात शिरून ती कसकशी उत्क्रान्त झाली असेल या विषयी तर्क करणे रंजक आहे. यातल्या काही संकल्पना पुरातत्त्व, मानववंशशास्त्रात सापडतीलही, किंबहुना सापडतीलच. पण ती शास्त्रे धुंडाळण्यापूर्वी हे आपले नुसते काही तर्ककुतर्कवितर्क.

माहितगार's picture

2 Oct 2015 - 10:44 pm | माहितगार

स्तूप (प्राकृत ठूप)चे मराठीतल्या अनेक शब्दांशी नाते आहे. ठूप, ठेप, ढेप, टेप, टेंब, टेंबूक, टेंगूळ, टेपाड, टेकाड वगैरे तर आहेतच पण टूम्ब, डोम हे परकीय शब्दसुद्धा आहेत.

रोचक संगती, टेपाड-टेकाड पटलेही अर्थात टेकाड बद्दल अजून एक वेगळा विचार होता पण ते नंतर पुन्हा कधी.

काठीच्या महत्त्वाची संकल्पना मानवाच्या संज्ञाप्रवाहात शिरून ती कसकशी उत्क्रान्त झाली असेल या विषयी तर्क करणे रंजक आहे. यातल्या काही संकल्पना पुरातत्त्व, मानववंशशास्त्रात सापडतीलही, किंबहुना सापडतीलच.

होय हे रंजक आहे खरे, मी सध्या या विषयावर इंग्रजी विकिपीडियावर काम करतो आहे, जेवढ्या जमतील तेवढ्या संकल्पना इंग्रजी विकिपीडियातील पोल वर्शीप विषयावरच्या नव्या लेखात गेल्या आठवड्यापासून संकलीत करीत आहे, बरेच ऑनलाइन संदर्भ शोधून ठेवले आहेत, लेख आत्ताही बर्‍यापैकी लांबीचा आहे तरीही लेख पूर्ण होण्यास अजून चार सहा महिने जातील असा कयास आहे.

राही's picture

3 Oct 2015 - 2:56 pm | राही

लेख उत्कृष्ट होईलच.
शुभेच्छा.

माहितगार's picture

3 Oct 2015 - 4:26 pm | माहितगार

:) आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, मराठी विकिपीडियावरील लेख उत्कृष्ट करूच, खरे म्हणजे मला दक्षिण भारतातील काठी पूजांची दक्षिण भारतीयांकडून नोंदी करून हव्यात म्हणून इंग्रजी विकिपीडियावर लेख चालू केला (आपले दक्षिण भारतीय बांढव हिंदीला हातही लावत नाहीत म्हणून) पण प्रांजळपणे खरे सांगावयाचे तर इंग्रजी विकिपीडियावरील लेख निष्पक्षपणे पूर्ण करण्यासाठी सध्यातरी (अब्राहमीक) कर्मठांच्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. कारण काठी पुजेच्या सप्रेशनचा इतिहास वर्तमानात टिकवून ठेऊ इच्छिणारे महाभाग सध्यातरी लेखनात बर्‍यापैकी अडथळे उभे करून आहेत (या सप्रेशन प्रकारावर वेगळा चांगला लेख होईल इतपत माहिती जमली आहे.) सध्या जेवढे जमले तेवढे ढकलतो आहे.