भास

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
29 Aug 2008 - 6:55 pm

होऊन कान्हा
येईन पुन्हा
करण्यास गुन्हा
का बोल तुझे
स्मरतात मला

तोडून बंध
होऊन धुंद
आवेग अंध
का ओठ तुझे
डसतात मला

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला

अनिरुद्ध अभ्यंकर

कविता

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

29 Aug 2008 - 6:59 pm | लिखाळ

मस्त कविता !!
फार सुंदर.
--लिखाळ.

नारदाचार्य's picture

29 Aug 2008 - 7:07 pm | नारदाचार्य

काही लिहिलंत. छान आहे कविता ही.

अप्रतिम कविता.
:)

मनस्वी's picture

29 Aug 2008 - 7:15 pm | मनस्वी

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

राघव१'s picture

29 Aug 2008 - 7:22 pm | राघव१

खूप आवडली कविता. मस्त लिहिलीयेत!!

राघव

बर्‍याच दिवसांनी तुझी कविता बघून फ्रेश वाटले!

विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला

हे फारच छान!

(खुद के साथ बातां : वर्षभर घरापासून दूर रहायचे म्हणजे व्हायचेच असे भास बाबा रंगा, समजून घे! ;) )

चतुरंग

धनंजय's picture

29 Aug 2008 - 8:37 pm | धनंजय

सुंदर विरहभावना.

पण :
"डसतात" शब्द आवडला नाही. "डसणे"ची अर्थच्छटा पिडाकारकच असते, बहुधा. "चावणे" मधला चावटपणा नाही, की "छळणे" मधली छुपी प्रीती नाही. (त्यामुळे शेवटच्या कडव्यातला "छळणे" शब्द मात्र अगदी योग्य वाटतो.)

आता प्रेमाच्या आवेगातही तुझे ओठ मला "डसतात", आणि भेट नकोशी होते, असा अर्थ काढला तर "डसतात" योग्यच आहे, पण मग कडवे बाकीच्या कवितेच्या विरही रसाचा भंग करते.

आजानुकर्ण's picture

30 Aug 2008 - 12:28 am | आजानुकर्ण

'डसणे' मध्ये थोडीशी इरॉटिक छटा आहे. (रोम्यांटिक नसली तरी तो वेगळा प्रणयच आहे.) विशेषतः लावण्यांमध्ये हा शब्द वापरला जातो. 'डसला ग बाई डसला' किंवा 'माझ्या ढेपेला मुंगळा डसला' अशा ओळी प्रसिद्ध आहेत.

'मर्‍हाटी लावणी संग्रह' मध्ये खालील ओळी वाचल्याचे आठवते.

डसला कांत विंचू मज हा लहरी ।
येती मज प्रेमसुखाच्या लहरी ||

- नवरारुपी लहरी विंचू डसल्याने प्रेमसुखाच्या विषाची झिंग चढली आहे-

किंवा

डसला विंचू मदन हा शरीरासी
पलंग क्षणभर तरी स्वस्थ धरा हो

(याबद्दल काय बोलणार!)

त्यामुळे बंधतोडून धुंद होऊन आवेग अंध झाले की ओठ चावण्याऐवजी डसतील असे वाटते.

आपला,
(अननुभवी) आजानुकर्ण

प्रतिसाद उडण्याची शक्यता असल्याने खरडवहीतही पहा.

आपला,
(चिंतामुक्त) आजानुकर्ण

सर्किट's picture

30 Aug 2008 - 12:34 am | सर्किट (not verified)

प्रतिसाद आवडला.

(इश्काची इंगळी देखील डसतेच. चावत नाही.)

मी कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मला "डसणे" आवडले होते.

आता पुन्हा वाचली, तरी आवडले.

अनिरुद्ध, छान आहे कविता.

-- सर्किट

नाही पटले - डसणे हे "इंगळी" आणि "विंचू" यांच्यामुळे आले आहे.

प्रिय व्यक्तीचे ओठ डसणे असे बहुधा लावणीसंग्रहात सापडणार नाही.

"इश्काची तरुणी डसली" किंवा "कांत मला डसला" नाही पटत.

आजानुकर्ण's picture

30 Aug 2008 - 12:50 am | आजानुकर्ण

विंचू हे मदनाचे रुपक आहे. आणि पती ऊर्फ कांत हा साक्षात मदनच.

त्यामुळे ए=बी आणि बी=सी म्हणून विंचू = पती.

पतीचे ओठ = विंचवाची नांगी.
डसले.

आपला,
(उतारा) आजानुकर्ण

(ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.)

विंचवाचे रूपक मध्ये आल्याशिवाय डसण्याची क्रिया संदर्भात येत नाही. याला उत्प्रेक्षा म्हणावी पाहिजे तर. (म्हणजे उपमान-उपमेयाच्या फरकांकडे उत्प्रेक्षा=दुर्लक्ष करून एकाचे नसलेले गुण दुसर्‍याला चिकटवणे.) पण ते उपमान आणि उपमेय काय आहेत त्यांचा उल्लेख काव्यात व्हावा लागतो.

डसणे हा शब्द काही विशिष्ट कीटक-जिवाणूंसाठी आरक्षित आहे. म्हणजे विंचू इंगळी साप, वगैरे डसतात.
कुत्रा, डास, माणूस (आणि चणे!) वगैरे चावतात - ते डसत नाहीत.

मदन/इश्कासारखी या कवितेतली "तू" इंगळी किंवा नागीण असेल, तर त्या रूपकशब्दाचा स्पष्ट उल्लेख व्हावा लागेल.

"देवा, तुझ्या पायांभोवती मी भुणभुणतो आहे" असे म्हटले तर बहुधा अर्थाच्या दृष्टीने वाचकाला ते कोड्यात पाडेल. कदाचित "भुणभुणणे" शब्दाचा नावडता अर्थ समोर येईल.
"देवा, तुझ्या पदकमलाभोवती मी भुंगा होऊन भुणभुणतो आहे," असा दुवा स्पष्ट दाखवावा लागेल बहुतेक. मग संदर्भ बघून हे भुणभुणणे भक्तिभावाचे वाटेल.

अवांतर : उत्प्रेक्षा म्हणजे बळेच दुर्लक्ष करून सुंदर वैचित्र्य साधण्यासाठी उपमान-उपमेयांचे फरक म्हणजे फरक नाहीतच जणू म्हणून फरकच "साम्य" म्हणून सांगायचा, असा मी अर्थ लावतो. (उत्प्रेक्षा शब्दाचा सामान्य अर्थ दुर्लक्ष असा आहे.) सर्किट - याबद्दल तुमचे काय मत आहे?

आजानुकर्ण's picture

30 Aug 2008 - 2:38 am | आजानुकर्ण

डसणे हा शब्द विशिष्ट किटकांसाठी आरक्षित आहे हे पटले नाही. चित्त यांची ही कविता बघा.

काळजाला पिसू नये कोणी
हाल इतका पुसू नये कोणी

जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी

कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी

यामध्ये विंचू, सर्प किंवा इंगळी तत्सम प्राणी वा कीटक नाहीत तरीही डसू हा शब्द इथे परफेक्ट बसतो.

आपला,
(मुद्देसूद) आजानुकर्ण

अजून काही

वैभव जोशी यांची ही ओळः

लाटांवर उठती लाटा, तृष्णेला फुटती वाटा
वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा

आणि ही

मज डसून गेली कुठली, चांदरात सळसळणारी
देहावर दंश दिसेना, पण काया तळमळणारी

श्रीकृष्ण राऊत यांची ही ओळ

केली होती जरी परीक्षा गर्भजलाची;
चौथ्यानेही मुलगी होउन डसली चिंता.

सलील वाघ यांच्या या ओळी

कवितांमधून ठार लयीत
एकदा मला एक कोणतंतरी
फूल सापडलं होतं म्हणजे
फूल असं नाही
फुलासारखंच काहीतरी
ते मी तुझ्याकरता
दोनशेपानी वहीत
जपून ठेवल होतं फार
हमसाहमशी. तू दिसताक्षणीच
शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं
मी तुला कसं कळवू कायम ठेवू
कवितेतनंच

आपला,
(तर्कदुष्ट) आजानुकर्ण

पिसणे, हाल (करणे? - हाल कोणी पुसल्यास काय संदर्भ आहे?), जीव घेणे, बोचकारणे, डसणे, वगैरे... बघता त्या कवितेचा रस कुठलातरी वेगळाच आहे. या सर्व दु:खदायक गोष्टी सरळसरळ उपमाने आहेत.

एका लांबलच यादीत पिसणार्‍या अवजारासारखे पिसणे, डसणार्‍या जिवाणूसारखे डसणे, बोचकारणार्‍या टोकासारखे बोचकारणे, वगैरे अध्याहृत असणे तितके कोड्यात पाडत नाही.

अन्य उदाहरणांतही चांदरातीच्या डसण्यानंतर कवी दंश शोधतो, वगैरे स्पष्टीकरणे येतात.
(आणि मला वाटते, वरील उदाहरणांपैकी सर्वच कविता चपखल शब्दयोजनेच्या दृष्टीने धडे म्हणून घेऊ नयेत.)

वाटलेच तर सामांतर्याने अनिरुद्ध यांच्या कवितेत ओठ डसणार्‍या कुठल्यातरी जिवाणूसारखे डसतात असा अर्थ निघेल.

तरी अनिरुद्ध यांनी खाली स्पष्टीकरण दिलेच आहे. त्यांना ओठ नव्हे, तर आठवण=इंगळी असे रूपक वाचकाच्या मनात जागवायचे होते. ते चित्र पटण्यासारखे आहे, फक्त पहिल्या वाचनात मला स्पष्ट नव्हते.

मात्र ,

वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा

मध्ये ती दु:खदायक नाही. डसणे हे क्रियापद चावणे चे सुपरलेटिव म्हणून वापरली जाते असे असावे.
अर्थात डसणे चा अर्थ कंटेक्स्ट बेस्ड इरॉटिक किंवा दु:खदायक दोन्ही असावा

माफ करा. फारच कीस काढला मी.

आपला,
(क्षमाप्रार्थी) आजानुकर्ण

सर्किट's picture

30 Aug 2008 - 3:08 am | सर्किट (not verified)

डसणे हा शब्द काही विशिष्ट कीटक-जिवाणूंसाठी आरक्षित आहे. म्हणजे विंचू इंगळी साप, वगैरे डसतात.
कुत्रा, डास, माणूस (आणि चणे!) वगैरे चावतात - ते डसत नाहीत.

विदर्भातील ग्रामीण मराठीत "चावणे" हे क्रियापदच नाही. सर्व प्राणी (माणसासह) डसतात.

डास हा कीटक चावण्या ऐवजी डसायला हवा, कारण "डसणारा" म्हणजे डास, नाही का ?

एकनाथांनी मात्र विचू चावला, असे म्हटले आहे. विंचू डसला असे नाही.

थोडक्यात काय, की डसणे आणि चावणे हे इंटरचेन्जेबली वापरता येते.

-- सर्किट

मेघना भुस्कुटे's picture

2 Sep 2008 - 6:55 am | मेघना भुस्कुटे

कर्णाशी सहमत.
कविता ज-ब-रा.

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

30 Aug 2008 - 2:20 am | अनिरुद्ध अभ्यंकर

धनंजयशेठ,
प्रथम प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
ही संपुर्ण कविता ही भुतकाळात घडून गेलेल्या आठवणींवर आहे..
त्यामुळे आज जेव्हा तो आवेग आठवतो तो ओठांचा स्पर्श आठवतो तेव्हा ती आठवण आता इंगळीच्या डंखा सारखी त्रास देते ,वेदना देते म्हणून 'डसतात मला' अशी शब्द रचना केली
अनिरुद्ध

धनंजय's picture

30 Aug 2008 - 2:32 am | धनंजय

चालेल. फारच गोष्टी अध्याहृत आहेत. म्हणजे "आठवण" आणि "इंगळी" ही मूळ उपमान-उपमेय जोडीच शब्दांकित नाही. त्यामुळे डसणारे ते ओठच आहेत, (ओठ/कुठलासा डसणारा जिवाणू = उपमान-उपमेय जोडी) असा गैरसमज व्हायची शक्यता आहे.

स्पष्टीकरण दिल्यानंतरचे चित्र कवितेच्या रसाला पोषकच आहे.

दत्ता काळे's picture

29 Aug 2008 - 8:03 pm | दत्ता काळे

अनिरुध्दा

ते मन पिसे
कवितेत दिसे
हा विरह असे
कि, त्रास असे ?
कळते फक्त
तुझेच तुला

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2008 - 8:42 pm | स्वाती दिनेश

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला
वा.. क्या बात है !
स्वाती

बेसनलाडू's picture

29 Aug 2008 - 9:36 pm | बेसनलाडू

कविता आवडली. पुनर्वाचनाचा आनंद वेगळाच. धन्याशेठच्या म्हणण्याकडे लक्ष/त्याचे स्पष्टीकरण द्यावे/दिल्यास उत्तम, तुमची भूमिका स्पष्ट होईल.
(आस्वादक)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

30 Aug 2008 - 12:30 am | आजानुकर्ण

माझ्या परीने स्पष्टीकरण दिले आहे.

आपला,
(आगाऊ) आजानुकर्ण

ऋषिकेश's picture

29 Aug 2008 - 10:38 pm | ऋषिकेश

संपूर्ण कविता आवडली.. भावोत्कट!

- ऋषिकेश

आजानुकर्ण's picture

30 Aug 2008 - 12:31 am | आजानुकर्ण

केशवराव,

कविता आवडली. पाडगावकरांकडून तुम्ही थोडेसे शाहीर प्रभाकरांकडे निघालात याचा आनंद होतो.

आपला,
(चाहता) आजानुकर्ण

घाटावरचे भट's picture

30 Aug 2008 - 2:21 am | घाटावरचे भट

अभ्यंकर साहेब,

अप्रतिम कविता....खूपच आवडली...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन's picture

30 Aug 2008 - 2:23 am | नंदन

कविता, अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रेवती's picture

30 Aug 2008 - 3:21 am | रेवती

कविता वाचताना पहेली सिनेमातल्या खाली है तेरे बीना दोनों अखियां गाण्याची आठवण झाली.

रेवती

मदनबाण's picture

30 Aug 2008 - 4:00 am | मदनबाण

मस्तच !!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 7:20 am | विसोबा खेचर

वा! एक वेगळीच कविता रे अनिरुद्धा! आवडली....!

तात्या.

मनीषा's picture

30 Aug 2008 - 12:07 pm | मनीषा

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

खूपच छान !!!

पंचम's picture

30 Aug 2008 - 2:02 pm | पंचम

जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

प्रमोद देव's picture

30 Aug 2008 - 2:34 pm | प्रमोद देव

कविता आवडली म्हणून स्वरबद्ध केली.
इथे ऐकता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2008 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली, देव साहेब मस्त स्वरबद्ध केली बरं का कविता !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

30 Aug 2008 - 11:28 pm | ऋषिकेश

काका,
कविता छान स्वरबद्ध झाली आहे. अभिनंदन!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसुनाना's picture

30 Aug 2008 - 5:50 pm | विसुनाना

एका विशिष्ट लयीतली ही कविता आवडली.
विशेषतः -

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

'डसणे' वर झालेला संवादही माहितीपूर्ण.

कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींची एकच ओळ बरी वाटली असती.
कान्हा हा शब्द मात्रांच्या दृष्टीने खटकला.

सर्वसाक्षी's picture

30 Aug 2008 - 7:28 pm | सर्वसाक्षी

अनिरुद्ध,
आज चीनमध्ये ही कविता वाचायला आणि "दैवी"आवाजात ऐकायला बरे वाटले.

ईश्वरी's picture

31 Aug 2008 - 7:09 am | ईश्वरी

छान कविता . आवडली.
तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला

ह्या ओळी खासच.

प्रमोद काकांची चालही छान.

ईश्वरी

सैरंध्री's picture

31 Aug 2008 - 7:13 am | सैरंध्री

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

सुरेख कविता. शब्दयोजना समर्पक वाटली. कवितेतला नाद ही आवडला.
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci

अजिंक्य's picture

31 Aug 2008 - 2:45 pm | अजिंक्य

मस्त कविता!

तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला

हे फारच छान!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

1 Sep 2008 - 1:28 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

सुमीत भातखंडे's picture

1 Sep 2008 - 2:56 pm | सुमीत भातखंडे

कविता आवडली