सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
23 Aug 2015 - 1:39 pm
गाभा: 

सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे...

आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय? जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील गरिब मध्यमवर्गीय?

ऐंशीच्या दशकात टीवी, कार्स, फोन्स, बंगलोज हे फक्त अतिश्रीमंत, धनाढ्य व गर्भश्रीमंत लोकांकडेच होते. त्यांच्याशिवाय जे ही भारतीय होते ते सर्व गरीब? माझ्यामते तर अभियंता, डॉक्टर असणारे, मोठ्या कंपनीत, बँकेत नोकरी असणारे, स्कूटर, घर वैगेरे असणारे सुखवस्तू, सेटल्ड समजले जात होते. गरीब नाही. सुशिक्षित व सुखवस्तू घरांमधे या मुलांना योग्य त्या संधी मिळणे यात काय मोठं आहे? की उगाच कि...त्त्ती गरीब होते म्हणून त्यांचे फुकाचे कौतुक.

अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.

माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का?
की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो?
कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या?

मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का?

तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.

प्रतिक्रिया

डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे सोडले.
तुम्ही 'लोकमत' वाचणे सोडा.
टक्याला 'संध्यानद' वाचणे सोडायला सांगु.
मी 'एकमत' वाचणे सोडतो.
मापं ना ' मटा ' सोडायला सांगु.

एकुणच व्रुत्तपत्रे वाचणे सोडु.हाकानाका.

नाखु's picture

27 Aug 2015 - 7:15 pm | नाखु

शिवाय खाजगी वाहिन्यांवरच्या (दूरदर्शनवरील नाही) कोंब्डा-कुत्री झुंजी पाहणे सोडणे जास्ती हितकर आहे.

अनुभवी नाखु

गॅरी ट्रुमन's picture

23 Aug 2015 - 1:50 pm | गॅरी ट्रुमन

ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.

मी ८० च्या दशकात विशीमध्ये नव्हतो तरीही एक मुद्दा---

आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?

सुंदर पिचाईंविषयी मला विशेष काही माहिती नाही आणि ते खरोखरच गरीब कुटुंबातले होते की नाही हे पण मला माहित नाही. पण आय.आय.टी आणि स्टॅनफर्डमध्ये शिकणे हा गरीब नसल्याचे लक्षण आहे हे मला नक्कीच मान्य नाही. आय.आय.टी मध्ये शिक्षणासाठी कर्ज मिळते.आणि आय.आय.टी मध्ये चांगल्या ग्रेड आल्यास त्या आधारे स्टॅनफर्डमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळू शकतो.तेव्हा या दोन आधारांवर कोणीही गरीब नव्हते हे सिध्द करता येण्याजोगा हा सक्षम मुद्दा नाही.

संदीप डांगे's picture

23 Aug 2015 - 2:15 pm | संदीप डांगे

सुंदर पिचई यांच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्याच माध्यमांमधे अशीच माहीती उपलब्ध आहे. स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं. शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे. आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात. सुपर३० उगाच सूरू झाले नाही. आयआयटी व गरिबांचा प्रवेश यावर माध्यमांमधे बरीच चर्चा झाली आहे मागे.

हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

गॅरी ट्रुमन's picture

23 Aug 2015 - 2:54 pm | गॅरी ट्रुमन

स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं.

तसे असेल तर सुंदर पिचाई एकदम श्रीमंत म्हणायला हवेत. आजच्या काळात स्टॅनफर्डची फी आणि कॅलिफोर्नियात दोन वर्षे रहायचा खर्च याचा आकडा एखाद कोटीपर्यंत सहज जाईल.त्याच तुलनेत त्यावेळीही असणार असे धरायला हरकत नसावी.

शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे.

अशा आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये शिकायला स्टेट बँक गेल्या अनेक वर्षांपासून विनातारण कर्ज देत आली आहे.असे कर्ज विनातारण आणि गॅरेंटरशिवाय कर्ज स्टेट बँकेची त्या संस्थेच्या आवारातलीच शाखा देते आणि केवळ अ‍ॅडमिशन लेटरवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या इतर कुठल्याही शाखेत शिक्षणकर्ज घ्यायचे असेल तर मात्र तारण, गॅरेंटर इत्यादी प्रकार असतात.

आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात.

कोट्याला आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी आय.आय.टी जे.ई.ई साठी कोचिंग क्लासच्या फॅक्टर्‍या ८० च्या दशकातही होत्या का? आणि आय.आय.टी मध्ये कोणी विद्यार्थी असेल तर तो कोचिंग क्लास मधूनच गेला असेल आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून गेला नसेलच असे कशावरून?

हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

इतकं मनावर नका घेऊ हो :)

संदीप डांगे's picture

23 Aug 2015 - 3:03 pm | संदीप डांगे

इतकं मनावर नका घेऊ हो :)

नाही हो ;-)

वडिल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर असलेले अभियंता, घर, स्कूटर, इ. गोष्टी बाजूला ठेवून फक्त आयआयटी प्रवेश इतकाच निकष लावला तर गरीब श्रीमंत कोण हा प्रश्नच उरत नाही.

चर्चेत एखाद्याचं विधान चुकीचंच कसं हे सिद्ध करायला सिलेक्टीव रीडींग पुरेसं असतं.

मी कलेक्टीव अ‍ॅनालिसिस मांडत आहे. तुम्ही त्यातलं ज्यावर वाद घालता येईल तेवढंच वाक्य उचलून पिचई ला बेनेफिट ऑफ डाइट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो गरीब असूही शकतो असे म्हटलं आहे. पण इतर परिस्थिती त्या विधानाविरूद्ध आहे हे लक्षात घेतलेले नाही. तुम्ही आयआयटी बद्दल उल्लेख मनावर घेऊ नका. पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं. यासंबंधीत लिंक्स देतो सावकाश.

चिरोटा's picture

24 Aug 2015 - 3:02 pm | चिरोटा

पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं
७० व ८०च्या दशकातल्या जे.ई.चे अनेक लोक पाहिलेत तर आय.आय.टी. मोठ्या शहरांतील सुशि़क्षित मध्यम्वर्गीयांना अ‍ॅक्सेसेबल होती असे म्हणता येते.क्लासेस प्रकार खूप कमी होता. अग्रवाल व ब्रिलियंट ट्युटोरियल्स हे प्रामुख्याने होते.ह्यांची फी पण वाजवी असायची(९० साली अग्रवाल-२३०० रुपये)
बहुतांशी परीक्षा देणारे व पास होणारे हे मुंबई,पुणे,दिल्ली,चेन्नई,कोलकाता... अशा मोठ्या शहरांमधून असायचे.
साधारण २ लाख परी़क्षार्थी व त्यातून २००० जागा,म्हणजे १:१०० असे गुणोत्तर.

मी अशीच मागे एकदा जपानच्या प्रिन्सेस नोरिको ची बातमी वाचली होती. त्यात ती राजघराण्याच्या बाहेर एका साध्या माणसाशी ( राजघराण्याच्या तुलनेत तसा नाही ) लग्न करणार होती. आता नविन जीवन राजघराण्याच्या बाहेर एका सामान्य माणसाबरोबर व्यतीत करावे लागेल या संघर्षाची कल्पना आल्याने तिने प्रिपरेशन करायला सुरुवात केली
ती स्वतः स्वतःच्या कारने सुपरमार्केट पर्यंत गेली. तिने स्वतः ( हो स्वतःच्या हाताने काहि वस्तु खरेदी करुन कार्ट मध्ये टाकल्या) नंतर त्या कार्टीने तीने बिलींग केले. परत सर्व सामान स्वतः कारमध्ये टाकुन घरी गेली.
असतो एकेकाचा गरीबीशी संघर्ष
दुसरा कॉन्ट्रास्ट आपल्याकडे मुबलक पहायला मिळतो.
एक महाश्वेतादेवींच्या मुलाखतीत वाचलेल आठवतय बिरसा मुंडा चा पत्ता सांगितला की साक्ष दिली पोलिसात नक्की आठवत नाही अस काहितरी एका आदिवासीने केल तर का कशाच्या बदल्यात
तर त्याला दोन रुपये आणि पोट भरुन भात खायला दिला म्हणुन.
त्यात त्या म्हणतात त्या आदिवासींसाठी आयुष्यात एकदा तरी पोट भरुन भात खायला मिळणे म्हणजे खुप च मोठी गोष्ट होती.
दे आर सो पुअर यु नो ते सर्व बिचारे एका खराटा मारुती ८०० मध्ये पिकनीक ला जातात

लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड नसावा बहुतेक. कोणत्या मासिकातील/ वर्तमानपत्रातील बातमीला कितपत महत्व द्यायचे हे आपण नक्कीच ठरवू शकतो. असो.

संदीप डांगे's picture

23 Aug 2015 - 2:55 pm | संदीप डांगे

ताई,

लोकमत व सुंदर पिचईचे हे फक्त एक उदाहरण दिलंय. अशा स्वरूपाच्या बातम्या विविध लोकांबद्दल विविध दर्जाच्या विविध माध्यमांतून येतंच असतात. माध्यमांमधून यशस्वी लोकांनी कसा खडतर प्रवास केलाय अशा कहान्या नेहमीच येतात. त्यांच्या प्रवासाचा खडतरपणा अधिक - लार्जर दॅन रीअल लाइफ- रंगवण्याच्या अहमहमिकेने त्या कधी कधी हास्यास्पद व बनावट होतात हेच पिचईच्या निमित्ताने सिद्ध झालं इतकंच.

यशोधरा's picture

23 Aug 2015 - 4:23 pm | यशोधरा

अहो साहेब ठीके की. सुंदर पिचाई म्हणजे काही आयुष्य जगायचा मापदंड नव्हेत. आता ते दारिद्र्यरेषेखाली जगले नसतील पण म्हणून त्यांनी जे साध्य केलं त्याचं क्रेडिट कमी होतं का? बरं, ज्यांनी बातमी दिली आहे त्यांनी कितपत तपासून दिली आहे, तो एक अलाहिदा मुद्दा. आणि तसंही पिचईच्या खडतर प्रवासाची किती लोकांना पडली आहे, असं वाटतं तुम्हांला? लोक आता वाचतील, पुढच्या अर्ध्या तासात विसरतील. कोणत्याही बातमीचे हेच प्राक्तन आहे आणि असते.

'भारतीय मूळ' असलेल्या आणी सध्या परदेशी वास्तव्यास असलेल्या [यातील बहुतेक जण ग्रीन कार्ड मिळालेले किंवा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले] लोकांचे गुणगान करत राहणार आहोत, हा प्रश्न आहे. बाकी लहानपणीची गरीबी / श्रीमंती वगैरे चालु द्या...

चिरोटा's picture

23 Aug 2015 - 3:53 pm | चिरोटा

अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.

खरे आहे.८०च्या दशकात्, फोन साठी प्रतिक्षायादी असायची.बहुतांशी लोकांकडे त्यामुळे फोन नसायचा.टी.व्ही. वा गाडीचेही तसेच.प्रस्थापित व्यवस्थेत 'नेत्रदीपक' यश मिळाले की थोडेसे गरीबीचे,'हालाखीच्या दिवसांचे' भांडवल करणे ही पद्धत आहे.एखादी कंपनी बर्यापैकी मोठी झाली की मग तिचे प्रवर्तक आमची कंपनी कशी 'गॅरेज स्टर्टअप' होती हे दिमाखाने सांगतात. त्या गॅरेजचे फोटो मग मोठ्या नियत्कालिकांत 'ते दिवस' शिर्षकाखाली
छापून येतात. अनेक वेळा ही गॅरेजेस श्रीमंत वस्त्यांमध्ये असतात व त्या गॅरेजचा आकारही आपल्या १ बी.एच.के.पेक्षा मोठा असतो.

नंदन's picture

23 Aug 2015 - 4:03 pm | नंदन

ब्लूमबर्ग.कॉमवर गेल्या वर्षी पिचाईंवर एक लेख/प्रोफाईल आला होता. त्यातल्या दुसर्‍या पानावर (दुवा) हे सारे स्कूटर - टेलिफोन - स्टॅनफर्ड इ. उल्लेख आहेत. तेदेखील पिचाईंनीच सांगितलेले दिसताहेत. (आता हा त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग किंवा वैट्ट, वैट्ट, दुष्ट अमेरिकन पत्रकारांनी तत्कालीन भारतीय मध्यमवर्गाला हिणवण्यासाठी रचलेले कारस्थान, यावर अजून एक वायफळाचा मळा पिकवता येईल.)

तर अलीकडच्या बातम्यांत अनेक वृत्तपत्रांनी बातमी देताना या ब्लूमबर्गी लेखाकडे निर्देश केला. मी 'लोकमत'मधली बातमी वाचलेली नाही; पण तुमच्या कैफियतीवरून असं दिसतंय की बहुधा त्या पत्रकारूने असले दुवे/निर्देश देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या मगदुराप्रमाणे थेट अनुवादाची पाटी टाकलेली असावी. त्यातही तपशीलाच्या चुका आहेतच. उदा.

Pichai excelled at school and won a coveted spot at the Indian Institute of Technology in Kharagpur, where he studied engineering. After graduating, he won an additional scholarship to Stanford University to study materials science and semiconductor physics. Pichai’s father tried to take out a loan to cover the cost of the plane ticket and other expenses. When it didn’t come through in time, he withdrew $1,000 from the family’s savings—more than his annual salary. “My dad and mom did what a lot of parents did at the time,” Pichai says. “They sacrificed a lot of their life and used a lot of their disposable income to make sure their children were educated.”

मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली नाही. बाकी नक्की किती खरं किती खोटं हे करण्यापेक्षा तो मनुष्य दोनवेळा खाऊन पिऊन सुखी असावा असा निष्कर्ष निघू शकेल, जे चांगलेच आहे. अर्धपोटी वगैरे कोणीच रहायला नकोय. आवश्यक ते पाटी, दप्तर, पुस्तकं मिळाली असावित हेही चांगलच आहे. आमच्या आजूबाजूला राहणार्‍या दोनेक जणांनी नक्की काय केलं म्हणजे आपली मुलं अशा पोझिशनला पोहोचतील? त्यांना आपण सुंदर पिचाई व सत्या नाडेला यांच्या जीवनावर माहिती द्यायला हवी का अशी चर्चा व्हॉटस अपवर केली असे नवरा म्हणत होता. पण तेवढेच! मग विषय संपला. त्या चर्चा करणार्‍यांचाही उत्साह संपला असावा कारण पुढे काही झाले नाही.

श्रीनिवास टिळक's picture

24 Aug 2015 - 12:24 am | श्रीनिवास टिळक

सुंदर पिचाई हे गरीब का श्रीमंत परिस्थितीत वाढले हे ठरवणे अधिक करून संदर्भावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणता येईल तर अमेरिकन संदर्भात ती गरीब ठरेल. पण यापेक्षा अधिक महत्वाची आणि विचारणीय बाब अशी कि सत्य नाडेला[Microsoft] शिव नाडर [HCL Technologies] आणि सुंदर पिचाई [Google] हे तिघेही त्यांच्या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या नवीन पिढीला आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात.

असंका's picture

24 Aug 2015 - 12:55 am | असंका

एक शंका आहे, कुणी प्लीज सांगेल का-

एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ?

की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

पगला गजोधर's picture

24 Aug 2015 - 9:43 am | पगला गजोधर

एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ?
की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

हे मात्र १+ निरीक्षण आपले, कंफ्युज्ड(नसलेले), अकौंटंट साहेब

श्रीरंग_जोशी's picture

24 Aug 2015 - 10:36 am | श्रीरंग_जोशी

सत्या नाडेला व सुंदर पिचाई हे दोघेही जागतिक किर्तीच्या कंपन्यांत (अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट व गुगल) बर्‍याच खालच्या पदावरून सुरुवात करून सिइओ पदापर्यंत पोचले.

शिव नाडर एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. वयानेही (७० वर्षे) ते इतर दोघांपेक्षा बरेच मोठे आहेत.
सुंदर पिचाई यांची गुगलच्या सिइओपदी नियुक्ती झाल्यावर फेसबुकवर सत्या नाडेला व शिव नाडर यां दोघांच्या फोटोज बरोबर त्यांचा फोटो फिरवला जात होता. तुमचा प्रतिसाद त्या फेसबुक पोस्टवरून प्रेरित आहे का?

उगा काहितरीच's picture

24 Aug 2015 - 12:57 am | उगा काहितरीच

ते गरीब होते कि नाही ही बाब गौण आहे. ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

द-बाहुबली's picture

24 Aug 2015 - 1:14 am | द-बाहुबली

ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

बरोबर. आणी सुंपिला गरीब म्हटल्याने जर एखाद्या गरीब व्यक्तीला वर उठण्याची जिद्द मिळत असेल तर अजुन सुरेख...

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 10:41 am | संदीप डांगे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद!

फार थोड्या लोकांना लेखाचा उद्देश आणि रोख नेमका कळला. कदाचित मलाच नीट लिहिता आले नाहीये.

प्रश्न, सुंदर पिचई हा खरंच गरिब होता की नव्हता, आता काय आहे, कसा यशस्वी झाला वैगेरे नाहीच आहे. कुण्या गरिबाने श्रीमंतच होउ नये असे काही मी म्हटले नाही. सुंदर पिचईचे केवळ एक उदाहरण घेतले आहे. तसेही राहुलजींच्या मते गरिबी ही एक सापेक्ष मानसिकता आहे. ;-)

असो.

थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.

आम्ही फार गरिब होतो, आमच्या चौघांत मिळून एकच कार होती, एकच घर होते, तीनच वेळेला जेवत होतो, आठवड्यातून एकदाच मल्टीप्लेक्सला जात होतो, वर्षातून एकदाच फॉरेनट्रीपला जात होतो, आईकडे दहाच किलो सोन्याचे दागिने होते, आमची फक्त पाचशे एकर बागायती शेती होती. इत्यादी कहान्या तीस वर्षांनी काही मुले सांगतील कदाचित

मुद्दा संदर्भाचा आहे. त्यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याकाळाला आजच्या काळाप्रमाणे किंवा अमेरिकन दृष्टीकोणातून बघणे विसंगतीपूर्ण आहे व ते हास्यास्पद होते असे म्हणायचे होते. त्याकाळातले जनजीवन, समाजकारण, आर्थिक परिस्थितीतून उद्भवणारे प्रसंग इत्यादी बाबी आजच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. कारण ऐंशीचे दशकातली टीनेजर मंडळी आणि ९५ नंतर जन्मलेली टीनेजर मंडळी यांच्या आकलनात फार फरक आहे. कष्ट, गरीबी, अभाव याचा जो काळ ऐंशीच्या दशकातल्या टीनेजरनी बघितला तो नंतरच्या पीढीने बघितलाच नाही. आज मोलकरणीचा मुलगाही स्मार्टफोनसाठी जीवघेणा हट्ट करतो, त्याला आईचे कष्ट, पैशाची अनुपलब्धता, इत्यादी गोष्टी समजतच नाहीत. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असले पाहिजे असाच अट्टाहास सर्वत्र दिसतो. ऐंशीच्या दशकात मुलांमधे ह्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्याकाळात स्कूटरवर फिरलो, रि़क्षातून शाळेत जायचो, तीन खोल्यांचे घर ह्या गरिबी किंवा अभावाच्या गोष्टी नसून सुखवस्तूपणाच्या द्योतक आहेत. पण आजच्या काळात जर त्यांना गरिबीच्या, अभावाच्या प्रातिनिधिक म्हणून सादर केल्यात तर आजच्या पीढीला खरी गरिबी काय होती हे कळणारच नाही.

माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.

थांबतो. धन्यवाद!

द-बाहुबली's picture

24 Aug 2015 - 12:27 pm | द-बाहुबली

जेंव्हा घवघवीत यश हातात येते. त्या वेळी अशा व्यक्तीच्या नकारात्मक बाजुही गुणगान गायल्या प्रमाणे वाखाणल्या जातात(उदा. स्टीव जोब्स) व अपयश असेल तर तर सकारात्मक बाजुचीही निंदा केली जाते... कमी मिळकतीचे जिवन अत्यंत हालाखीचे दारिद्र्यावस्थेतले चितारले जाते... कोणाला चायवाला समजले जाते... कोणाला भिकारी... ये सब चलते रहतायं.सुंदरच्या गरीबीची वास्तवअवास्तव वर्णने वाचुन एका खर्‍या गरीबाला जर वर जाण्याची उर्मी अन दिशा मीळाली तरी ते सर्व न्याय ठरते. सो लेट्स से हिप हिप हिप हुर्रे फॉर बिइंग पुर सुंदर...

थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.

:) येस. असे असतात खरे... पण ते फार दिशाभुल करु शक्तात असे वाटत नाही.

माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.

सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

प्यारे१'s picture

24 Aug 2015 - 12:34 pm | प्यारे१

>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

ऑरे दादा, ई चोलबे ना.
मिपावर सुन्दर धागे कुणी काढले असते मग????
डांगे अण्णा हलकं घ्या.
गरीबी ही मानसिक अवस्था आहे या आदरणीय राहुलजी यांच्या मताशी सहमत असलेला

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 2:25 pm | संदीप डांगे

डांगे अण्णाच हलके आहेत, म्हणून मिपावर धागे काढत असतात. तस्मात चिंता नसावी!

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 2:16 pm | संदीप डांगे

सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.

तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

रुस्तम's picture

24 Aug 2015 - 2:34 pm | रुस्तम

सहमत..

माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.

तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

छान विचार. आपणही जेंव्हा एखाद्याबाबत बोलतो/धागे काढुन मत व्यक्त करतो (उदा. सुंदर पिचाइ) त्याबाबत वैयक्तीक होत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा तेही मुर्खांचेच लक्षण असेल.

माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.

तुम्ही जर गुगलचे सिएओ झालात तर मला तुमचा अभिमान वाटेल असे मी विधान केले आहे तर यात तुम्हाला झोंबण्यासारखे/ अथवा मुर्ख लक्षन काय आहे अथवा मुद्दा सोडुन काय आहे ? कारण मुद्दा कोणाला कोनीतरी कोणी बनल्यावर वाटणार अभिमान हाच मुद्दा आहे नाही का जर आपण वैयक्ती लिखाण करत नाही आहोत तर ? तुम्ही तुमचे कामधंदे सोडुन मिपाचे संपादक बनलात तरी मला अभिमान आहे हे विधानही अजिबात वैयक्तीक व मुद्दा सोडून नाही जर चर्चेचा मुद्दा अभिमान केंव्हा वाटावा हा असेल तर. आणी नसेल तर मुळात प्रथम तो कोणी घुसडला...

शेवटी तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही पण तुम्ही गुगलचे सिइओ बनला असता तर मला जास्त अभिमान वाटले हे फक्त मी एक निरीक्षण नोंदवतो.

हायला! ते पिचई पण तुम्हाला असेच म्हणाले तर! :D

आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण
१९८१ साली आय आय टी ची फी रुपये २५०/- सहामाही साठी होती. ( माझ्या भावाचा प्रवेश असल्याने माहिती आहे) आणि व्ही जे टी आय ची रुपये १८०/ -
स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना एक तर शिष्यवृत्ती असे किंवा शिक्षण कर्ज सहज मिळे ज्याचा हप्ता दोन वर्षानंतर सुरु होत असे जेंव्हा तो विद्यार्थी अमेरिकेत डॉलर मध्ये कमवू लागत असे. त्यामुळे या गोष्टी गरिबांना सुद्धा परवडत असत.
बाकी सुंदर पिचई जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील हे गरिब मध्यमवर्गीय नव्हे तर मध्य मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गात गणले जाऊ शकतील.
तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

गॅरी ट्रुमन's picture

24 Aug 2015 - 12:51 pm | गॅरी ट्रुमन

तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

+१०००००.

+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? एक लाख वेळा सांगताय की अशी अमुक एक गल्लत कुणी करू नका? आणि कुणी केलीये अशी गल्लत ?

वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यावर तुम्हीच अशी गल्लत केल्याचं दिसतंय...कारण धागाकर्त्याच्या लेखाचा विषय हा सुंदर पिचाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा हा नसून, त्यांच्याबद्दल आलेल्या लेखातली त्यांच्या नजरेला आलेली विसंगती हा होता.

आणि तुम्ही मात्र ते गरीब असले तरी काही काही मार्गांनी त्यांना आणि एकंदरीतच गरीबांना कर्ज, शिष्यवृत्ती वगैरे मिळून असे शिक्षण घेणं शक्य असल्याचं मत मांडलं आहेत. म्हणजे गरीबांना उच्च शिक्षण परवडत असे हा मुद्दा आपणच तर आणला होतात चर्चेत?

गॅरी ट्रुमन's picture

24 Aug 2015 - 2:30 pm | गॅरी ट्रुमन

+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने?

हो आहे. एनी प्रॉब्लेम?

ह्म्म्म...बाकीचं वाचलेलं दिसत नैये. असो. तुमची मर्जी.

अस्वस्थामा's picture

24 Aug 2015 - 2:45 pm | अस्वस्थामा

हो आहे. एनी प्रॉब्लेम?

ही ही ही.. बाकी क्लिंटन भौ अम्रिकेसारखेच मस्त अ‍ॅटिट्युड घेऊन वावरत असता हे भारीय. :)

असंका's picture

24 Aug 2015 - 2:48 pm | असंका

:-))

हो ना . आणि देशासाठी काहीही न करता परदेशात संपूर्ण योगदान देणार्यांचं एवढं कौतुक कशाला ? का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .
इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ? त्याच्या गावाला केक बिक
कापला जातो का ? बावळटपणा नुसता

गॅरी ट्रुमन's picture

24 Aug 2015 - 1:42 pm | गॅरी ट्रुमन

इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ?

असे काही लोक सांगू शकाल का?

द-बाहुबली's picture

24 Aug 2015 - 2:13 pm | द-बाहुबली

का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .

हो. काय त्रास आहे तुम्हाला ? इथे एक भारतीय म्हणून आत्मविश्वास नुकताच कुठे तरुणांमधे उभारु लागला आहे त्यांची स्वप्ने आत्ता कुठे विस्त्रुत (विस्तृत न्हवे ब्रॉड) होत आहेत मग हा सुर कशाला ?

नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?

- भारताबद्दल प्रचंड अभिमान असलेला पण विषेश प्रेम नसलेला.

गॅरी ट्रुमन's picture

24 Aug 2015 - 2:19 pm | गॅरी ट्रुमन

नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?

योगदान अगदीच दिले नाही असे नाही. भारतासाठी योगदान भारतात राहूनच देता येते असे नाही.परदेशात चांगले काम करून भारत या नावाचा दबदबा निर्माण करायला हातभार लावणे हे पण भारतासाठीच योगदान आहे. अमेरिकेतील ज्यू लॉबीमुळे अमेरिका इसराएलला फार काही करू शकत नाही.तसा दबदबा जगभर भारतीयांचा व्हायला हवा. आणि हो आत्मविश्वास तर नक्कीच साजरा करायला हवा.

- भारताबद्दल प्रचंड प्रेम असलेला पण विषेश अभिमान नसलेला (गॅरी ट्रुमन)

द-बाहुबली's picture

24 Aug 2015 - 3:18 pm | द-बाहुबली

सहमत आहे. पण ही बाब लोकांना सामजावणे अवघड असते ज्यांना भारतातुन निघुन जाणार्‍या व्यक्ती देशाप्रती काहीच देणे ठेवत नाहीत असे मानतात. आणी स्वतःलाच त्यांच्यापासुन तोडुन घेतात.

इरसाल's picture

24 Aug 2015 - 1:57 pm | इरसाल

ज्यांच्या नावातच "पिचलेले" असावेत असा धडधडीत अर्थछटा प्रतित करणारा "पिचाई" शब्द येतोय त्याच्या गरीबीवर काय शिंतोडे उडवत आहात.(शिंतोडे उडवु र्‍हायले बे ?)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2015 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे होऊ द्या की गवगवा जरासा सुंदर पिचईंचा !

आतापर्यंत हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच भारतीय लोक जगातल्या पहिल्या पाचात असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोचलेत. त्यात एका भारतियाची भर पडली ही काय अभिमानाची गोष्ट नाही ? शिवाय असा माणूस भारतातल्या निम्न/मध्यम वर्गातून काय अगदी सधन वर्गातून आला असला तरी जागतीक स्तरावर (आणि मुख्य म्हणजे अमेरिकन प्रणालीतून पुढे आलेल्यांशी) स्पर्धा करून ते पद मिळवणे ही विशेषच गोष्ट नाही का ?

अश्या लोकांचे जरासे जास्त वाढवून वर्णन केले गेले (सुंदरचे तसे वर्णन झाले असा माझा अजिबात दावा नाही) तर ते इतर अनेक महत्वाकांक्षी भारतियांना प्रेरणादायक ठरून... "हे पण होऊ शकते" इतकी जरी त्यांच्या मनाची खात्री झाली तरी सुंदरचा विक्रम मोडणारा दुसरे सुंदर२,३,४,५ व्हायला मदतच होईल, नाही का?

शिवाय, सम्राटांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि औद्योगिक धुरीण यांच्या संबंधींच्या लोकवदंता (अनेक्डोट्स) हे साम्राज्ये, सत्तास्थाने आणि उद्योग अधिकाधिक वाढविण्यासाठी मोठे उपयोगी साधन आहे, हे व्यवस्थापनातले सर्वमान्य तत्व आहे.

त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2015 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात आपण निकम्म्या भ्रष्ट नेत्यांच्या नावाच्या पाट्या आणि फ्लेक्स आपण रोज बघतोच आहोत ना ?... त्याला आपण विरोध करतो काय ?

पिचईसारख्यांची एखाद्या वेळची थोडी वाढवून सांगितलेली स्तुतीही भारतीयांमध्ये काहीतरी सकारत्मकच फरक घडवेल. तिला उगी विरोध कशाला ?!

असंका's picture

24 Aug 2015 - 2:42 pm | असंका

थोडी वाढवून सांगितलेली

म्हणजे बदल करून सांगितलेली...

तिला उगी विरोध कशाला ?!

आहे अशी बातमी न सांगता लेखकाच्या मनाप्रमाणे केलेले बदल हे धोकादायकच. त्यात तुम्ही असे बदल हवेसे, असे बदल नकोसे हे नाही ठरवू शकत. कारण हितसंबंध हे परस्परावलंबी आणि परस्परविरोधी दोन्ही प्रकारचे असतात. या अनिश्चित जगात ज्या ज्या गोष्टींनी अनिश्चितता वाढते, तिला विरोध करायलाच हवा. त्याला "उगीच विरोध" म्हणणं योग्य नाही.

बातमी वाचताना मला अशी शंका मनात यायला नको की या लेखकाने काही तरी बदलून लिहिलं आहे. त्याने अनिश्चितता निर्माण होइल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2015 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या प्रतिसादावर अगोदर...

त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

असे लिहिले आहे ! :)

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 7:31 pm | संदीप डांगे

सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं म्हणून बर्‍याच लोकांना खटकलेलं दिसतंय. कुणाला काही स्वतःहूनच खटकवून घ्यायचं असेल तर माझा नाइलाज आहे. जणू पिचईबद्दल आकस ठेवूनच मी हा धागा लिहिलाय असं काहींच्या प्रतिसादात जाणवतंय. अनिवासी/मूळ भारतीयांच्या परदेशातल्या यशाने हुरळणारे व त्यांना नाके मुरडणारे असे बहुतेक दोन गट जालावर नेहमीच दिसतात. असे काही विषय दिसले की दोन्ही गट आपआपली हत्यारे परजून युद्धात उतरतांना बघितलेत. त्याबद्दल कुठे 'मोकळं' व्हायच्या कायम तयारीत असलेले हा धागा मिळायलाय तर पूर्वग्रहदूषित मनाने वाटेल ते टायपत सुटलेत. इथे नुसतं सुंदर पिचई एवढे दोन शब्द लिहिले असते तरी तेच झाले असते. अशा लोकांना धाग्याचा खरा उद्देश कळूनही ते जर आपल्याला वाटेल तो अर्थ काढत हुज्जत घालण्याच्याच प्रवृत्तीचे असतील तर त्याला माझा काही इलाज नाही.

विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या धाग्यावर तरी काही लोक तेच करत आहेत.

चर्चेचे मुद्दे/प्रश्न काय होते?

माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का?
की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो?
कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या?
मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का?
तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.

माझ्या धाग्यात वा प्रतिसादात सुंदर पिचई वा त्यांच्या यशाबद्दल कुठलाही खोचक उल्लेख वा रोख नाही. माझा रोख केवळ आणि केवळ दोन काळातला फरक माध्यमांत कसा दाखवला जातो याचे उदाहरण देणे यावर होता. त्यावर काही माहिती मिळावी, त्याकाळातला मध्यमवर्ग, आताचा मध्यमवर्ग, बदलते राहणीमान, विचार यावर चर्चा व्हावी असा उद्देश होता.

राहता राहिला तो सुंदर पिचई बद्दलच्या माझ्या वैयक्तिक मताचा प्रश्न, जो फारच क्षुल्लक आहे माझ्यासाठी. तर त्यांनी जे यश मिळवले त्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची कंपनी उभारली असती तर हा अभिमान (माझ्या मनात असलेला, इतरांनीही तसेच वाटून घ्यावे असे नाही) द्विगुणित झाला असता. बरेच भारतीय मोठ्या विदेशी कंपन्यांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजकाल त्यात काही नवल-विशेष नाही. येणार्‍या भारतीय पिढ्यांसमोर असे नोकरपेशा आदर्श ठेवण्यापेक्षा स्टीव जॉब्स, बील गेट्स, झुकरबर्ग, बन्सल्स, मित्तल, इत्यादी 'समस्यांवर उपाय शोधून त्याचे व्यवसाय तयार करणार्‍या व जगाच्या व्यवहाराची भाषा बदलणार्या लोकांचे' आदर्श ठेवणे 'माझ्या वैयक्तिक मतानुसार' आवश्यक आहे. याचा अर्थ नोकर्‍या करणारे फक्त पाट्या टाकतात असे माझे मत आहे असे नाही. ज्याला जिथे योग्य संधी मिळते, मग भले ती नोकरीत असो, व्यवसायात असो, भारतात असो वा परदेशात असो, त्याने त्या संधीचे सोने केले तर मला आनंदच वाटेल. तिथे वादाचा मुद्दाच कुठे येतो?

इथे कोण भारतीय, अभारतीय, इथे राहिले, तिकडे गेले, भारतासाठी काय केले वैगेरे प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय कुठेही राहू दे, त्यांनी स्वतः काहीतरी निर्माण करावे, शोधावे, उद्योग उभारावे. एक भारतीय म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. त्यांनी किती गरिबीत दिवस काढले यावर रोख असल्यापेक्षा त्यांनी जगात काय बदल घडवले, काय योगदान दिले यावर चर्चा व्हाव्यात असे माझे मत आहे.

माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.

लेख व प्रतिसादांत माझी भूमिका/मतं मांडली आहे. याउपर योग्य त्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असेल तर स्वागत आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

25 Aug 2015 - 10:26 pm | वॉल्टर व्हाईट

एकंदरीत तुमचा अनाठायी कौतुक करण्याला विरोध आहे तर! लक्षात आले.

द-बाहुबली's picture

26 Aug 2015 - 7:24 pm | द-बाहुबली

माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.

विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या प्रतिसादात तरी असेच आपले कडुन घडले आहे. पण अर्थातच आपण त्याला किंमत देणार नाही असे (म्हणत) असल्याने आपण विरोधाभासी लिहता म्हणायची द्वीरुक्ती टाळतो.

बाकी प्रतिसाद उल्लेखनीय.

बाबा योगिराज's picture

26 Aug 2015 - 7:52 pm | बाबा योगिराज

खाबुजीचा फेक्मत आला की धागा प्रगतीच करत जातो. लवकरच हा धागा सम्बर लम्बरी होवो हिच का ही ही इच्छा.

जय खाबुजी.

पैसा's picture

26 Aug 2015 - 10:13 pm | पैसा

"तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं..

१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे.

मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय.

सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.

पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत.

१९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते.

माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.

पैसा's picture

26 Aug 2015 - 10:47 pm | पैसा

आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.

गुगल होतं काय तेव्हा पण? मला वाटलेलं तो याहूचा जमाना होता....

पैसा's picture

26 Aug 2015 - 11:02 pm | पैसा

गुगल सर्च तेव्हा बीटा अवस्थेत होतं. पण होतं.

शब्दबम्बाळ's picture

26 Aug 2015 - 11:03 pm | शब्दबम्बाळ

टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव

काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D
अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत...
आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)

पैसा's picture

26 Aug 2015 - 11:06 pm | पैसा

=)) अगदी अगदी!

काय बरोब्बर बोललात वा! अगदी असंच वाटायचं....!

बॅटमॅन's picture

27 Aug 2015 - 12:36 pm | बॅटमॅन

हा हा हा, एकदम हळवे केलेत जुन्या आठवणींनी.

रेवती's picture

27 Aug 2015 - 10:27 pm | रेवती

आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.

व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्‍यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात...

काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...

गॅरी ट्रुमन's picture

27 Aug 2015 - 10:30 am | गॅरी ट्रुमन

चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली.

वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.

पैसा's picture

27 Aug 2015 - 10:34 am | पैसा

वन बीएचके ते. तेव्हा तीन बेडरूम्स म्हणजे ३ खोल्यांचे घर असे म्हणत नव्हतेच.

स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे.
कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच.
स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.

शरभ's picture

27 Aug 2015 - 1:16 pm | शरभ

एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ?

भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय.
मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता
मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं
आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Aug 2015 - 4:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत.
सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष
सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष.
सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष.
सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष.
सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष.
सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.

राही's picture

27 Aug 2015 - 5:32 pm | राही

भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्‍या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही.
साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्‍यांचा भात वाढला.
नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला.
दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Aug 2015 - 7:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काय रे हे राही?

कंजूस's picture

27 Aug 2015 - 7:30 pm | कंजूस

काही कळलं नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Aug 2015 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या कंपनीचे सी.इ.ओ. झाले

माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.

असंका's picture

27 Aug 2015 - 10:44 pm | असंका

एक नंबर कप्तानसाहेब!

शरभ's picture

28 Aug 2015 - 12:24 pm | शरभ

हा असला उदो उदो करुन काय मिळनारे?
अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.