नूपुरताईंना पत्र

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जनातलं, मनातलं
23 Aug 2015 - 1:50 am

नूपुरताई,

नमस्कार.

तुम्ही मला ओळखत नसला तरी मी तुम्हाला ओळखतो. मराठी असलात, तरी तुम्ही इंग्रजी वळणाच्या कुटुंबात वाढलेल्या आहात. त्यामुळे माझं हे पत्र -छोटं असलं तरी- वाचताना जरा त्रासच होईल. बरं, इतर कुणाकडून वाचून घेता येण्यासारखंही नाही. कारण तुम्ही जिथं आहात तिथून दूरदूरपर्यंत कुणी मराठी बोलणारा-वाचणारा सापडताना कठीण आहे.

पण वाचनाची सवय नसल्यानं होणारा त्रास तुम्हाला फारसा जाणवायचा नाही. कारण ज्या क्रूर अग्निदिव्यातून तुम्ही जाताय, त्यापुढे हे सर्व क्षुल्लक आहे.

तुम्हाला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखत असलो, तरी पत्र लिहावं असं मात्र आजच वाटलं. कारण पत्रकार अविरूक सेन यांनी तुमच्यावर लिहिलेलं पुस्तक काल हातात आलं आणि पहाता पहाता वाचून संपलं. रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते. दिवा बंद केला आणि डोळे मिटून पडलो. पण एक भयंकर भीती खोलवर वळवळू लागली. सोबत पोळून काढणारा एक हतबुद्ध संताप.

हे कसं होऊ शकतं?

एक सरळसाधं मध्यमवर्गीय कुटुंब हां हां म्हणता उध्वस्त होतं. पोलीस, न्यायालयं, माध्यमं, सरकार कुणाला त्याची पर्वा रहात नाही. त्यावेळी छाती पिटणारे आम्हीही आता सारं विसरून जातो. तुमची एकाकी लढाई मात्र चालूच रहाते..

पण मनातली संतापाची ज्वाला भडकणार, तोच स्वतःबद्दलची एक अनावर शरम सांडपाण्यासारखी त्यावर वाहून आली. त्या काळ्या ओघळात मला माझं भेसूर, ओंगळवाणं प्रतिबिंब दिसलं.

मला स्पष्ट दिसलं, की मी तुमच्या कुटुंबाबद्दल इतका विचार का करतोय, इतका का कळवळतोय.

कारण तुम्ही माझ्यासारख्या आहात असं मी ठरवलेलं आहे. माझ्यासारख्या मराठी. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय. माझ्यासारख्या सुशिक्षित. माझ्यासारखी गाडी, उच्चभ्रू वसाहतीत सदनिका असलेल्या. माझ्यासारखीच स्वप्नं असलेल्या.

माझ्या मुलीसारखीच एक मुलगी असलेल्या.

जर तुमच्या जागी कुणी गरीब, आदिवासी, किंवा इतर जाति-धर्म-भाषेची व्यक्ती असती तर मी ही शोकांतिका पेपरचं पान उलटायच्या आत विसरून गेलो असतो. पेज थ्री वरच्या कुणा नव्या ललनेचा फोटो न्याहाळत चहाचे घुटके चालू ठेवले असते. माझ्या देशातली किडकी, निगरगट्ट, आसुरी, रक्तपिपासू राज्यव्यवस्था मला दिसलीच नसती. कुठलंही पुस्तक वाचून.

तुम्ही आणि तुमचे पती गुन्हेगार नाहीत असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं. पण ते का वाटतं हे सांगता येत नाही. अविरूक सेनचं पुस्तक वाचल्यावर तसं मत झालंय हे खरं. पण त्याआधीही मला तसं वाटत होतं. कारण तुमच्या कुटुंबात मी माझ्या कोषाची प्रतिमा पहात होतो. मीच नव्हे, तर माझ्यासारखे हजारो त्याच एका कारणासाठी रोज टीव्ही लावून बसत होते..

तुमची शोकांतिका माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण तिनं माझा बुरखा टराटरा फाडलाय. मला हे दाखवून दिलंय की मीसुद्धा एका हिंस्र, स्वार्थी कळपातलं एक श्वापद आहे. माझे अश्रू ओघळतायत ते फक्त बळी गेलेल्या आरुशी तलवारसाठी आणि उत्तर प्रदेशातील दासना तुरुंगात गावगुंडांच्या संगतीत शिक्षा कंठणाऱ्या राजेश तलवार आणि नूपुर चिटणीस-तलवारसाठी.

नेपाळ सोडून दूरदेशी आलेल्या अभागी हेमराज भंजाडेसाठी मात्र कधी डोळ्याची कडाही ओलावलेली नाही.

(प्रेरणा: पत्रकार अविरूक सेन यांचे 'आरुशी' हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक.)

समाजजीवनमानविचारसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

या प्रकरणातलं गौडबंगाल काही सुटत नाही. त्या चिटणीस आहेत हे मी पण मध्ये वाचलं. त्यांची एक चुलत / मावस बहीण यु के च्या मेडिया मधे आहे. तिने तिच्या ब्लॉग वर या संदर्भात लिहिलेलं वाचण्यात आलं. ते वाचल्यावर अजुन च गोंधळ वाढला. एक टक्का जरी शक्यता असेल ते निर्दोष असण्याची तरी मला विचार करुन पण अंगावर काटा येतो की त्यांची मानसिक अवस्था काय असेल. एक उच्चभ्रु कुटुंब भारतात परदेशातुन परत जातं, आणि काहीच्या काही प्रकार घडतो. यात खरं खोटं काय आहे कोण जाणे. पण एक आई वडील आपल्या मुलीचा खुन करुन इतकं थंड माथ्याने तो पचवु शकतील आणि त्याचे पुरावे लपवायचा प्रयत्न करतील हे माझ्या वरण भात मनाला अजुन ही झेपत नाहीये. तुमचा सिस्टीम वर विश्वास असतो किंवा नसतो, माझा तो आहे त्यमुळे त्यांना उगाचच गोवलं आहे हे देखील पटत नाही. असं कुणी का त्यांना गोवेल? बरं जे पर्यायी आरोपी होते ते "हेल्प" सदरात काम करणारे होते, त्यांची इतकी पोह्च नक्कीच असु शकत नाही की त्यांन वाचवायला यांना अडकवलं.
तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचा गोषवारा पण लिहिलात तर बरं होईल. काय पुरावे सादर केलेत या पुस्तक लेखकाने त्यांना निर्दोष सिद्ध करायला?

पुस्तकाचे परीक्षण लिहिणे हा उद्देश नव्हता. पण गोषवारा थोडक्यात सांगता येईल.

तपासयंत्रणांनी (पोलीस आणि सी बी आय) पुरावे गोळा करताना ज्या अक्षम्य चुका केल्या आणि जो कमालीचा ढिसाळपणा दाखवला, त्यामुळे संपूर्ण तपासाचा पाया कोसळला. जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा स्वतःची कातडी वाचवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सरळ आईबापांना लक्ष्य केले.

यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा, की भारतीय (खास करून उत्तर भारतीय) समाजातले दोन परस्परविरोधी पूर्वग्रह इथे एकमेकांशी झगडताना दिसतात.

पहिल्या दिवशी जेव्हा नोकर "गायब" आहे असे दिसले (कारण गच्चीवर जाऊन पहायचे राहून गेले होते), तेव्हा पोलिसांनी जणू केसचा उलगडा झाला असून फक्त गुन्हेगाराला पकडणे बाकी आहे अशा थाटात तपास सोडून दिला. ना बोटांचे ठसे उचलले, ना गुन्हेस्थळ सील केले, ना इतर संशयितांची चौकशी केली. कारण निव्वळ सामाजिक पूर्वग्रह. दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा नोकराचा मृतदेह गच्चीवर सापडला तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला.

याउलट जेव्हा खटल्याची सुनावणी सुरू झाली, तेव्हा तलवार कुटुंबीय ज्या उच्च-मध्यमवर्गीय समाजगटात मोडतात, त्या गटाबद्दलचे पूर्वग्रह सातत्याने त्यांच्या विरोधात जाऊ लागले. त्यांचे वागणे-बोलणे, चारित्र्य, सवयी यांबद्दल बिनदिक्कत विधाने केली गेली. बेजबाबदार माध्यमांनी ती उचलून धरली आणि न्यायालयातही जणू काही ती पुरावाच आहेत अशा थाटात उच्चारली गेली. पुरावेही वेचून-निवडून सादर केले गेले. तपासयंत्रणेने केलेल्या गंभीर चुकांकडे न्यायमूर्तींनी संपूर्ण दुर्लक्ष केले.

यातली कोणतीही बाब तलवार पतिपत्नीच्या हातात नव्हती. पण फळं मात्र ते तुरुंगात बसून भोगत आहेत असा निष्कर्ष लेखकानं काढला असून मी त्याच्याशी सहमत आहे.

विजय तेंडुलकरांनासुद्धा असं काही सुचलं नसतं. सत्य हे कल्पनेहून भयानक असते असं म्हणतात तेच खरं.

निदान उच्च न्यायालयात तरी आरुशी-हेमराज आणि तलवार मातापिता यांना न्याय मिळेल अशी आशा.

पुस्तक मुळातून वाचा अशी शिफारस करतो.

रेवती's picture

23 Aug 2015 - 4:29 am | रेवती

नक्की काय झालय हे मलाही कळलेलं नाही. जसजसे ते प्रकरण खोदायला जाऊ तसतसे काहीतरी भयानक वाटायला लागते. दिवसचे दिवस त्यात अडकायला होते. आजकाल मनोरंजनाशिवायचे सिनेमे आणि या अशा बातम्या आपण होऊन वाचणे (काही महिने तरी) बंद केले आहे. नको असले तरी इतके ऐकायला येते, दिसते की गप्प बसावेसे वाटते.

विवेकपटाईत's picture

23 Aug 2015 - 12:47 pm | विवेकपटाईत

नोएडात मराठी बोलणारे आणि समजणारे लोक भरपूर राहतात. माझे बरेच परिचित तिथे राहतात. सार्वजनिक गणेशोत्सवा पासून ते इतर मराठी कार्यक्रम हि होतात.

माझ्या एका ओळखीच्या पोलीस मित्राने म्हंटले होते आरुषीच्या खुनाचा तपास तर २ तासात लागला असता. जर पोलीस कुलूप तोडून वर गच्ची वर गेले असते. मस्त डाव होता. २ तासात पोस्टमोर्टन पूर्ण होते. लागलीच तिला जाळल्या जाते. हेमराजच्या देहाची ओळख हि दाखविली नाही. आश्चर्य म्हणजे संध्याकाळी हेमराजचा देह गच्चीवर सापडला तरीही पोलिसांनी त्यांना हरिद्वारला जाऊ दिले. त्याच रात्री अस्थी (३ दिवशीच्या जागी), हरिद्वारला विसर्जित केल्या जाते. बहुधा दुसर्या दिवशी हेमराजचा मृत देह ठीकाण्यावर लाऊन. हेमराज खून करून नेपालला पळून गेला. आरुषी च्या खुनाचा आरोप हेमराजच्या डोक्यावर टाकायचा षड्यंत्र फसला. मग दुसर्या नौकरांवर तो आळ लावण्याचा प्रयत्न केला. (अप्रत्यक्ष रूपेण सीबीआय सुद्धा तलवार दंपतीला मदत केली).

नौकर कृष्णा तर्फे एक योग्य वकील मैदानात उतरला आणि सरकारला पुन्हा दुसरी सीबीआयची टीम नेमायला भाग पडले. शेवटी आपल्या क्रूर कर्माचे फळ ते भोगत आहे.

त्याच दिवशी एका वाहिनी वर आरुषीचा एक mms झळकला होता तो पाहिल्यावर खुनी कोण हे ओळखणे काठीन नव्हते. तेंव्हाच दिल्ली आणि प. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कळून चुकले होते. शिवाय दुसर्या दिवशी एका वाहिनी वर गच्चीवर जाणार्या जिन्यावर ओघळणारे लांबवत रक्ताचे डाग पाहून कुणाला हि कळले असते. हेमराजच्या प्रेताला खालून वर नेल्या गेले आहे. (कुठला दबाव होता पोलीसने व्यवस्थित तपास नाही केला. मेडिकल माफियाचा दबाव ????).

केसच्या सुरुवाती पासूनच मिडिया, पोलीस यंत्रणा सर्वांनी मिळून निर्दोष नौकराना लक्ष्य केले. ते नौकर आज कसे जीवन जगतात आहे. याचा विचार करणे जास्त गरजेचे. त्यांच्या साठी अश्रू गाळणे अधिक योग्य.

बाकी NOIDA हे organ transplant करता ओळखल्या जाते. ..... जास्ती माहिती झाल्यामुळे मजबुरी मध्ये हातातून गेलेल्या पोरीचा खून करावा लागला असेल. हे हि एक कारण असू शकते. हेमराज घरात असल्यामुळे त्याला हि ठीकाण्यावर लावले.

यशोधरा's picture

23 Aug 2015 - 2:39 pm | यशोधरा

बापरे..! :(

चलत मुसाफिर's picture

23 Aug 2015 - 4:26 pm | चलत मुसाफिर

विवेक पटाईत साहेब,

तुम्ही स्वतः तिथे रहात असल्यामुळे तुमचे म्हणणे विचारात नक्कीच घ्यायला हवे. पण तलवार दंपती हे दंतवैद्य आहेत, शल्यचिकित्सक नव्हेत. खून कुणी केले/ केले नाहीत याबद्दल तर्क लढवणे किंवा त्या दोघांच्या निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट देणे हा एक भाग आहेच. पण या गुन्ह्यावरील मतमतांतरे ही बरीचशी पूर्वग्रहदूषितच असतात असे मला वाटले, म्हणून हे पत्र लिहिले.

आईबाप निर्दोष असावेत असे आपले मला वाटते, पण त्याचे कारण सांगता येत नाही असे वर म्हटलेलेच आहे.

स्रुजा's picture

23 Aug 2015 - 5:19 pm | स्रुजा

:(
त्या एमेमेस मध्ये काय होतं? तिने काही मैत्रिणींना भीते वाटते वगैरे किंवा आई बाबांबद्दल बोलली होती का काही?

प्यारे१'s picture

23 Aug 2015 - 3:04 pm | प्यारे१

एकाच धाग्यावर दोन अत्यंत विरोधी मतं.
एक मत धागा आणि नंतरच्या प्रतिसादात आलेलं लेखकाचं पुस्तक वाचून बनलेलं मत तर दुसरं त्या भागात राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरीकाचं.

नेमकं खरं काय यात????

पद्मावति's picture

23 Aug 2015 - 3:24 pm | पद्मावति

या प्रकरणातलं काय खरं काय खोटं काही कळत नाही. कधी असे वाटते की पोलिसांनी आपली अकार्यक्षमता लपवायला आई वडिलांवर दोष मारला का? कोणाचे काय इण्टरेस्ट्स या प्रकरणात गुंतले आहे. दुसर्या कोणाचा गुन्हा पाठीशी घालण्यासाठी यांना तर नाही अडकविले? आधुनिक वीच हंटिंग चा प्रकार आहे का? पण मग मुद्दा असा आहे की पोलिसांना पुरेसे आणि ठाम पुरावे मिळाल्याशिवाय पोलिस सुद्धा प्रत्यक्ष आई वडलांवर आरोप करण्याची रिस्क घेतील का? आणि कोर्ट सुद्धा न्यायनिवाडा करतांना सगळ्या बाजुंचा विचार करणारच. एकूण गौडबंगालच आहे सगळं.

विवेकपटाईत's picture

23 Aug 2015 - 7:08 pm | विवेकपटाईत

सर्व काही सूर्य प्रकाशा एवढे स्वच होते.
१. पोलीस येण्याचा आधीच साफ सफाई
२. गच्चीची चाबी पोलिसांना दिली नाही आणि कुलूप हि तोडू दिले नाही. (मुलीचा खून झाला आहे, पोलिसांना मदत करण्याएवजी त्यांना तिथून घालविण्यात जास्त रस दाखविला). पोलिसांनी हि प्रयत्न केला नाही (कुणाचा दबाव होता)
३. शीघ्र पोस्टमार्टेम (२-३ तासात).
४. प्रेताला अग्नी देण्याच्या ४-५ तासाच्या आत अस्थी गोळा केल्या आणि तडक हरिद्वार. (अस्थी ३र्या दिवशी गोळा करतात, पहिल्यांदाच असे घडले असेल).
५. हेमराज दोषी आहे, असे सांगून पोलिसांना गुमराह करणे.

चलत मुसाफिर's picture

23 Aug 2015 - 9:32 pm | चलत मुसाफिर

तुमचे म्हणणे नक्कीच विचारार्ह आहे. पण खुनाच्या गुन्ह्यामागे motive हा महत्वाचा भाग सिद्ध व्हावा लागतो. तुम्ही जो अवयव तस्करीचा मुद्दा मांडताय त्याचा संपूर्ण खटल्यात कुठेही उल्लेख झाला नाही. आणि पोलीसांनी जो अनैतिक संबंधांचा motive मांडला तो मला अजूनही पटत नाही.

चलत मुसाफिर's picture

23 Aug 2015 - 9:37 pm | चलत मुसाफिर

Narco analysis आणि brain mapping या दोन्ही विज्ञाननिष्ठ चाचण्यांमध्ये, तलवार पतिपत्नी सत्य बोलत आहेत असेच निष्कर्ष निघाले. (असे पुस्तकात लिहिले आहे)