नूपुरताई,
नमस्कार.
तुम्ही मला ओळखत नसला तरी मी तुम्हाला ओळखतो. मराठी असलात, तरी तुम्ही इंग्रजी वळणाच्या कुटुंबात वाढलेल्या आहात. त्यामुळे माझं हे पत्र -छोटं असलं तरी- वाचताना जरा त्रासच होईल. बरं, इतर कुणाकडून वाचून घेता येण्यासारखंही नाही. कारण तुम्ही जिथं आहात तिथून दूरदूरपर्यंत कुणी मराठी बोलणारा-वाचणारा सापडताना कठीण आहे.
पण वाचनाची सवय नसल्यानं होणारा त्रास तुम्हाला फारसा जाणवायचा नाही. कारण ज्या क्रूर अग्निदिव्यातून तुम्ही जाताय, त्यापुढे हे सर्व क्षुल्लक आहे.
तुम्हाला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखत असलो, तरी पत्र लिहावं असं मात्र आजच वाटलं. कारण पत्रकार अविरूक सेन यांनी तुमच्यावर लिहिलेलं पुस्तक काल हातात आलं आणि पहाता पहाता वाचून संपलं. रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते. दिवा बंद केला आणि डोळे मिटून पडलो. पण एक भयंकर भीती खोलवर वळवळू लागली. सोबत पोळून काढणारा एक हतबुद्ध संताप.
हे कसं होऊ शकतं?
एक सरळसाधं मध्यमवर्गीय कुटुंब हां हां म्हणता उध्वस्त होतं. पोलीस, न्यायालयं, माध्यमं, सरकार कुणाला त्याची पर्वा रहात नाही. त्यावेळी छाती पिटणारे आम्हीही आता सारं विसरून जातो. तुमची एकाकी लढाई मात्र चालूच रहाते..
पण मनातली संतापाची ज्वाला भडकणार, तोच स्वतःबद्दलची एक अनावर शरम सांडपाण्यासारखी त्यावर वाहून आली. त्या काळ्या ओघळात मला माझं भेसूर, ओंगळवाणं प्रतिबिंब दिसलं.
मला स्पष्ट दिसलं, की मी तुमच्या कुटुंबाबद्दल इतका विचार का करतोय, इतका का कळवळतोय.
कारण तुम्ही माझ्यासारख्या आहात असं मी ठरवलेलं आहे. माझ्यासारख्या मराठी. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय. माझ्यासारख्या सुशिक्षित. माझ्यासारखी गाडी, उच्चभ्रू वसाहतीत सदनिका असलेल्या. माझ्यासारखीच स्वप्नं असलेल्या.
माझ्या मुलीसारखीच एक मुलगी असलेल्या.
जर तुमच्या जागी कुणी गरीब, आदिवासी, किंवा इतर जाति-धर्म-भाषेची व्यक्ती असती तर मी ही शोकांतिका पेपरचं पान उलटायच्या आत विसरून गेलो असतो. पेज थ्री वरच्या कुणा नव्या ललनेचा फोटो न्याहाळत चहाचे घुटके चालू ठेवले असते. माझ्या देशातली किडकी, निगरगट्ट, आसुरी, रक्तपिपासू राज्यव्यवस्था मला दिसलीच नसती. कुठलंही पुस्तक वाचून.
तुम्ही आणि तुमचे पती गुन्हेगार नाहीत असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं. पण ते का वाटतं हे सांगता येत नाही. अविरूक सेनचं पुस्तक वाचल्यावर तसं मत झालंय हे खरं. पण त्याआधीही मला तसं वाटत होतं. कारण तुमच्या कुटुंबात मी माझ्या कोषाची प्रतिमा पहात होतो. मीच नव्हे, तर माझ्यासारखे हजारो त्याच एका कारणासाठी रोज टीव्ही लावून बसत होते..
तुमची शोकांतिका माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण तिनं माझा बुरखा टराटरा फाडलाय. मला हे दाखवून दिलंय की मीसुद्धा एका हिंस्र, स्वार्थी कळपातलं एक श्वापद आहे. माझे अश्रू ओघळतायत ते फक्त बळी गेलेल्या आरुशी तलवारसाठी आणि उत्तर प्रदेशातील दासना तुरुंगात गावगुंडांच्या संगतीत शिक्षा कंठणाऱ्या राजेश तलवार आणि नूपुर चिटणीस-तलवारसाठी.
नेपाळ सोडून दूरदेशी आलेल्या अभागी हेमराज भंजाडेसाठी मात्र कधी डोळ्याची कडाही ओलावलेली नाही.
(प्रेरणा: पत्रकार अविरूक सेन यांचे 'आरुशी' हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक.)
वाचने
3007
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
या प्रकरणातलं गौडबंगाल काही
परस्परविरोधी पूर्वग्रहांची लढाई
In reply to या प्रकरणातलं गौडबंगाल काही by स्रुजा
नक्की काय झालय हे मलाही
नोएडात मराठी बोलणारे आणि
बापरे..! :(
In reply to नोएडात मराठी बोलणारे आणि by विवेकपटाईत
शक्य आहे
In reply to नोएडात मराठी बोलणारे आणि by विवेकपटाईत
:(
In reply to नोएडात मराठी बोलणारे आणि by विवेकपटाईत
एकाच धाग्यावर दोन अत्यंत
छान लिहिलय.
सर्व काही सूर्य प्रकाशा एवढे
विसंगती दिसतात.
In reply to सर्व काही सूर्य प्रकाशा एवढे by विवेकपटाईत
अजून एक मुद्दा
In reply to सर्व काही सूर्य प्रकाशा एवढे by विवेकपटाईत