राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जनातलं, मनातलं
27 Aug 2008 - 6:28 pm

भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे. हे चौघही उत्तर-दक्षीण-पूर्व-पश्चीम अश्या भारताच्या ४ टोकांतुन जन्मले मात्र त्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला आहे. या पैकी एकाने तर भारताच्या सीमाहि ओलांडल्या आहेत. भारताचा इतिहास या चार व्यक्तींशिवाय कदापि पूर्ण होणार नाहि इतके अलौकीक-प्रचंड आणि विस्मयकारक काम त्यांनी करुन ठेवलय.

ही चौघाच डोळ्यासमोर का आली?? तर याचं पहिलं उत्तर "माहित नाहि!" असंच आहे. मात्र विचारांती थोडस तुटक आणि अंधुक उत्तर मिळत - "हे चौघही उत्तम विध्यार्थी होते, हे चौघही उत्तम गुरु होते, हे चौघही द्रष्टे होते आणि महत्वाचं म्हणजे ह्या चौघांकडे "चारीत्र्य" होते, शुचिता होती." या चार गुणांमुळेच आपले सुस्पष्ट ध्येय आणि अढळ निष्ठा त्या चौघांकडे होती. त्यांचा जन्म ही त्या काळची गरजच होती. आणि काळाची गरज म्हणण्यापेक्षाही जणु काळाने/नियतीने यांचा जन्म होणारच अशी मांडणी केली होती. एखाद्या महानाट्यात एका पात्राने रंगमंचावर प्रवेश करावा आणि बघता बघाता त्या संपूर्ण रंगमंचाचा ताबा घेउन लोकांना स्तिमीत कराव, तसे ते चौघे आले - त्यांनी पाहिलं - त्यांनी जिंकल. विष्णुच्या अवतार संकल्पनेवर कोणाचा विश्वास बसला नाहि तरी हे चार अवतारच असावेत असे यंच्या ’इतिहासाकडे’ बघुन पटत.

वर म्हंटल्याप्रमाणे हे चौघ उत्तम विद्यर्थी होते, आणि ते ज्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य होते मुळात त्याच व्यक्ती असामान्य होत्या. आणि उलट त्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य बनण्यासाठी त्या ’शिष्यांची’ पात्रता असणं जास्त महत्वाचं होतं. या चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. याचेच उत्तर म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी असणे हा गुण उपजतच त्यांच्यात होता. ते जे शिकले ते त्यांनी आचरणात आणलं त्याने इतरांचं भलं कसं होईल याचा विचार केला. त्यानी आपल्या गुरुंचे पांग फेडले.

पुढे ते स्वत: गुरु झाले आणि आपलं कार्य चालवणारी अनेक माणसे त्यांनी घडवली. या पैकी दोघांनी राजकारणात येणार्‍या पिढ्यांना पाठ घालुन दिले तर इतर दोघांनी समाजकारणात. आणि त्यांचा कालखंडही आलटुन पालटुन आहे. म्हणजे सर्वप्रथम राजकारण मग समाजकारण मग परत राजकारण आणि सरते शेवटी समाजकारण अशी कालानुरुप मार्गदर्शक तत्वे आणि क्रिया त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घडवल्या. यापैकी पहिल्या दोघांचा कालखंड हा हजार वर्षांच्या अंतराने आलाय मग परत हजार वर्षे गेली आहेत आणि शेवतच्या दोघांत फक्त काहि शे वर्षांचे अंतर आहे. सगळं कसं अगदी ठरल्या सारखं घडत गेलय. इथे मी समाजकारण आणि धर्म हे एकमेकांत गुंतले असल्यानं संपुर्ण प्रक्रीयेलाच समाजकारण म्हंटलं आहे. त्यात "लोकांनी धारण केलेला आहे तो अथवा जो लोकांना धारण करतो तो ’धर्म’" या व्याख्येचा वापर अपेक्षीत आहे. म्हणुन त्यातील दोघंजण हे धर्माचे पालन अथवा समाजकारणच करत होते असं म्हणता येईल. उरलेल्या दोघांनीही देव-देश-धर्म यांना दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्व दिल्याचं दिसतं.

आता "द्रष्टा" म्हणाजे काय ते या चारही जणांकडे बघुन समजतं. क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा सामान्य माणुस हा शक्यतो मी-माझा या पलिकडे विचार करत नाहि. काळाची पाऊले त्याला ओळखता येत नाहित. उलट ती ओळखता येत नाहित म्हणुनच तो सामान्य ठरतो. मेंढरासारखे एकाच्या मागे दुसरा त्यामागे तिसरा असे करत आयुष्य घालवतो. मात्र समाजाच्या आखुन दिलेल्या चौकटितुन काहि माणसे बाहेर पडतात, त्यांना काळाची पाऊले ओळखता देखिल येतात. तशी ते आपली कृती ठरवतात ज्याने संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य उज्वल होते, त्यांनाच "द्रष्टा" म्हणता येईल. नुसता ’नेता’ होणेच कर्मकठीण आहे "द्रष्टा" होणे तर दुरच राहो. मात्र ही चार व्यक्तीमत्वे उपजतच द्रष्टेपण घेउन आली होती असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.

आणि त्यांच्याकडे द्रष्टेपण होतं म्हणुनच ते समर्थ नेतृत्व करु शकले. शेकडो वर्षांनंतरचा विचार करुन त्यांनी आपली धोरणे आखली ती राबवली, कदाचित म्हणुनच तत्कालीन समाज अथवा त्या नंतरच्या पिढ्या तग धरुन राहु शकल्या. अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते. या चौघांपैकी दक्षीणेतील द्रष्ट्याने तर उभ्या हिंदु धर्मावर हिमालया इतके कधीहि न फिटणारे उपकार करुन ठेवले आहेत. तर पश्चीमेकडील द्रष्टा तर ’हिंद्दुहृदयसम्राट’ बनला असे कार्य करुन गेलाय.

"चारीत्र्य" हे तर यांच महत्वाचं बलस्थान. माया-मदिरा-स्त्री यांच्या आहारी ते कधीच गेले नाहित. या चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि. आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती.

वरील पूर्ण लेखामधुन "ते" चौघे कोण हे सुज्ञांच्या लक्षात आलेही असेल. मात्र त्यांच्या कालखंडानुसार मी त्यांची नावे प्रकट करतो - "आर्य चाणक्य, आदि शंकराचार्य, छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद" वरील प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाबत चपखल बसते.

तक्षशीला गुरुकुल असो, जिजाऊसाहेब असोत अथवा रामकृष्ण परमहंस असोत यांचे शिष्यत्व पत्करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि नुसतं पेलुन फायदा नाहिये तर त्यावर आपल्या कार्याची प्रत्युंचा देखिल चढवता आली पाहिजे.

मुळात भारतभू हि पुण्यभूमी असल्याने असे सुपुत्र तिच्या पोटि जन्माला आले. आणि ते केवळ भारतभुमीचे सदभाग्य नसुन या चौघांचेही सुदैव आहे असेच म्हणावे लागेल कारण राष्ट्रापेक्षा कोणीचि मोठा नसतो हीच त्यांची शिकवण आहे. तरीही त्यांचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या चौघांच्या चरीत्राचा एल लक्षांश अर्थ जरी समजला आणि त्या समजलेल्या चरीत्राच्या शतांशा इतकाहि त्यांचा किमान एक गुण आपण आपल्यात उतरवु शकलो तरी ’भारत’ समजला असे म्हणायला हरकत नाहि. नुसते ’मेरा भारत महान!’ असे वर्षातुन दोनदा म्हणायच आणि मग आपल्या कृतीने आपल्या देशाला कमीपणा येईल असे वागायचे याला भारत समजला असे नाहि म्हणता येत.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. यातले दोन जण "योद्धा संन्यासी" होते, एक "महागुरु" होता आणि एक जण "श्रीमंत योगी" होता. ’राजयोग आणि कर्मयोग’ यांच अजब मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात होतं. यांनी ठरवलं असतं तर जगातली सर्व सुखं त्यांच्या पायाशी सहज आली असती. मात्र यांनी ’सोन्याचे पलंग’ वापरल्याचं कोणी ऐकले नाहिये. त्यांनी कधी कोणाचे वाईट केले नाहि. मात्र आपल्या मातृभूमीवर होणारे अत्याचार थांबवुन तिला संपन्न करण्यासाठी शक्य ते उपाय योजल्यांच दिसतं थोडक्यात या चौघांना "आचरल्यास" भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.एक दिवस भारताच्या महसत्तेचा तारा क्षीतीजावर पुन: उगवल्याशिवाय नाहि राहणार.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

इतिहाससमाजराजकारणप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

विकास's picture

27 Aug 2008 - 8:24 pm | विकास

चांगले विचार.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते.

भारताला महासत्ता बनवण्यासाठी वरील आणि अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तसेच त्यावरून सावरकरांच्या शिवाजीला उद्देशून म्हणलेल्या (लताने गायलेल्या) ओळी आठवल्या, ज्यात ते "आम्हाला" म्हणजे "जनसामान्यांना" काय दे हे सांगतात... हे गूण फक्त शिवाजीतले त्यांनी दाखवलेत कारण ते एकत्रीत त्या व्यक्तिमत्वात दिसतात जे (व्यक्तिमत्व) तमाम मराठी माणसाला आपले वाटते. इतर अनेक नेतृत्वात (ऐतिहासिक विशेषकरून) ते दिसू शकतील..

जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी

ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाहू दे
ती शक्ती शोणितामाजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुजज्या

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 8:59 pm | आजानुकर्ण

मात्र "थोडक्यात या चौघांना 'आचरल्यास' भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे" हे वाक्य कळले नाही.

या चौघांना आचरायचे म्हणजे काय करायचे याचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल.

आपला,
(आचरट) आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 8:48 pm | आजानुकर्ण

अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते

बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे.

उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत.

आपला,
(हिंदू) आजानुकर्ण

विकास's picture

27 Aug 2008 - 9:42 pm | विकास

ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे.
उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत.

बहुतांशी सहमत आणि योग्य मुद्दा! :-)

काही मला वाटणारे फरक - (या चर्चेत कदाचीत गौण मुद्दा)

हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत.

मोहेंजेदडो आणि हडप्पा ह्या संस्कृती होत्या म्हणण्या पेक्षा नागरी व्यवस्था होत्या ज्यांचे कौतूक आजही संस्कृतीपेक्षा नगररचना शास्त्रापुरते मर्यादीत होते. पण त्या विस्तृत प्रमाणावात हिंदू संस्कृतीच्याच भाग होत्या जी आपण म्हणल्याप्रमाणे र्‍हास झालेली नाही.

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 9:48 pm | आजानुकर्ण

हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत.

बरोबर. आणि भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का?

आपला,
(हिंदुत्त्ववादी) आजानुकर्ण

विकास's picture

27 Aug 2008 - 10:12 pm | विकास

भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का?

सिव्हीलिझेशनचा भाग म्हणून हिंदू म्हणता येतील. पण धर्म म्हणून त्यांचा धर्म वेगळाच आहे आणि तसे असण्यात काही गैर नाही. दुर्दैवाने "हिंदू" हा शब्द धर्माला चिकटला असल्याने आणि ते पण भारतात विशेषकरून त्यातून गैरअर्थ निघतात.

अवांतरः मधे कधीतरी मी या संदर्भात लिहीले होते, पण गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, वातावरण बदलावरून असलेल्या कार्यक्रमात गेलो होतो. तेंव्हा पाण्यावरून एक परीसंवाद होता. त्यात एक युरोपमधील उच्च अधिकारी स्त्री विकसनशील देशातील पाण्यावरून बोलत होती. त्यात तिने भारतातील व्यक्तींचा उल्लेख हा "हिंदू" म्हणून केला "इंडीयन" म्हणून नाही. कारण अनेक शतके ते तसेच ऐकतात. थोडक्यात हा त्यांच्यासाठी भौगोलीक शब्द आहे.

अतिअवांतर: अमेरिकेतील नेटीव्हांना ज्यांना भारतात आपण "रेड इंडीयन" म्हणतो त्यांना बर्‍याचदा येथे फक्त, "इंडीयन" म्हणतात. कारण जेंव्हा येथे युरोपातून लोकं आली तेंव्हा त्यांना हीच "इंडीया" वाटली होती आणि म्हणून ते "इंडीयन्स". अर्थात मी पहील्यांदा ते जेंव्हा ऐकले तेंव्हा "ऑफेन्सिव्ह" वाटले. नंतर समजले...

तेंव्हा शब्दांचे अर्थ जरी भौगोलीक आणि राजकीय सीमांनी ठरतात तसेच धर्माधारीत पण जर असले तर तसे शब्द सार्वजनीक करण्याचे टाळावे. थोडक्यात संस्कृतिचा भाग असले तरी, "ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध " यांना हट्टाने हिंदू म्हणावे असे मला वाटत नाही.

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:33 pm | आजानुकर्ण

ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो आणि रस्त्यांवर गारूडी साप घेऊन फिरतात असा विचार करतात, असे 'इथे'च वाचले आहे. त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे कारण नाही!

आपला,
(देशी) आजानुकर्ण

एकलव्य's picture

28 Aug 2008 - 5:14 pm | एकलव्य

ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो ....

कधीतरी कोणीतरी अशा तर्‍हेचे अजूनही बोलतो हे खरे आहे. पण अलिकडे हे अज्ञानमूलक नसून थोडेसे खोडसाळपणाकडे असते. मला कोणी असे म्हणाल्यास माझे उत्तर तयार असते - हो आमच्याकडे तीन हत्ती आहेत. नुसता हत्ती ठेवणे बरं नाही, हत्तीणही पाळावी लागते ना. घरामागच्या तळ्यात दिवसरात्र डुंबत असतात. मस्त मजा येते.

ही उपरोक्त प्रतिक्रिया वगळता अन्य कोणतीही प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली नाही. असो....

(महाभारतीय) एकलव्य

प्रियाली's picture

27 Aug 2008 - 9:06 pm | प्रियाली

वर आलेले मुद्दे पुन्हा उगाळत नाही परंतु,

चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि

सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत.

शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)

ऋषिकेश's picture

27 Aug 2008 - 10:21 pm | ऋषिकेश

लेख आवडला. किंचीत शब्दबंबाळ वाटला.
असो, या चार जणांचं महत्व वादातीत आहेच पण

ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा

हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि.

अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:26 pm | आजानुकर्ण

काय हे. गांधी? :$

आपला,
(स्वयंसेवक) आजानुकर्ण

नीलकांत's picture

27 Aug 2008 - 11:24 pm | नीलकांत

लेख छान झालाय. या चौघांपैकी आद्य शंकराचार्यांबद्दल जास्त माहिती नाही. मात्र त्या सर्वांचं काम मोठंच आहे.

नीलकांत

प्रियाली's picture

27 Aug 2008 - 11:34 pm | प्रियाली

रामदास का तुकाराम?

चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का?

शिवाजी महाराज रामदासांना उमेदीच्या काळात भेटल्याचे आठवत नाही. जेव्हा भेटले तेव्हा आधीच प्रस्थापित होते त्यामु़ळे वरील प्रश्न इथे लागू होत नाही असे वाटते.

तुकारामांशी त्यांची भेट त्यामानाने लवकर झाली असावी असे वाटते.

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:37 pm | आजानुकर्ण

शिवाजीराजे उमेदीच्या काळात तुकारामांनाही भेटले नाहीत आणि रामदासांनाही भेटले नाहीत.
याबाबत रामदास आणि तुकाराम यांचे काही आक्षेप नसतील. मात्र असे म्हटले की रामदास आणि तुकारामांची ब्र्यांड अँबेसिडरशिप करणार्‍यांना ते कमीपणाचे वाटते. (शिवाय जातीयवादी असे लेबलही लागते) त्यामुळे हा मुद्दा काढला नाही.

'सोने आणि धन आम्हा मृत्तिकासमान' या तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. मात्र त्याबाबत पुन्हा कधीतरी.

आपला,
(क्रमशः) आजानुकर्ण

दोयल's picture

28 Aug 2008 - 2:25 am | दोयल

चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

विकास's picture

28 Aug 2008 - 2:30 am | विकास

चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

मात्र असली प्रतिक्रीया नस्ता फाटा फोडत आहे असे वाटत नाही का?

एखादा लेख वगैरे लिहील्यावर जर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया आल्यातर त्याचे दोन अर्थ होतात - एक म्हणजे लोकांनी वाचले. दुसरे म्हणजे त्यांना काय वाटते ते सांगितले आणि त्यावर चर्चा सुरू झाली...थोडक्यात फाटा फोडला वगैरे काही वाटत नाही.

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 3:05 am | प्रियाली

जर ताबडतोब प्रतिक्रिया येणार्‍या संकेतस्थळावर लेख टाकला तर त्यातील त्रुटी दाखवणे, शंका विचारणे, वेगळे मत मांडणे इ. लोक करणारच तेव्हा उगीच असले विषयाशी संबंधीत नसणारे प्रतिसाद देऊन नस्ते फाटे फोडण्याची गरज नाही.

विसोबा खेचर's picture

28 Aug 2008 - 8:40 am | विसोबा खेचर

विकास आणि प्रियालीशी सहमत आहे...

सदर लेखात मला कोणतेही विषयांतर जाणवत नाही आणि फाटे फोडले गेले आहेत असे वाटत नाही....

तात्या.

राघव's picture

28 Aug 2008 - 12:27 pm | राघव

सुंदर लेख.
चौघे कोण अन् चौघेच का याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण असे म्हणता येईल की या चौघांमुळे एक राष्ट्र म्हणून खूप बदल घडला.

चाणक्यांनी राजनीतीचा पाया परत मजबूत केला.
शंकराचार्यांनी धर्म, रूढी, रीतीरीवाज याबद्दल असणार्‍या मानसिकतेत काळानुरूप योग्य बदल घडवून आणला.
शिवरायांनी तर धर्मरक्षण केलेय, नाही तर काय झाले असते ती कल्पना पण करवत नाही.
विवेकानंदांनी सगळ्यांना भारताची ओळख करून दिली अन् राष्ट्रभिमान जागृत केला जे अत्यंत महत्वाचे होते त्याकाळच्या परिस्थितीत; किंबहुना आजही आहे.

या सर्वात चाणाक्यांचे स्थान इतर तिघांच्या मानाने थोडे कमी वाटू शकेल पण त्यांनी सांगितलेल्या नीतीच्या विस्मराणामुळेच नंतर पृथ्वीराज चौहान सारखा नेता हकनाक हारला अन् परकियांच्या घनघोर आक्रमणांना वाटा फुटल्या.

इतका छान लेख लिहील्याबद्दल पुन्हा अभिनंदन.

मुमुक्षू

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 12:32 pm | सौरभ वैशंपायन

"बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. "

"हिंदु धर्मावर" आणि "वैदिक संस्कृतीवर" अनेक धार्मिक, सामाजिक, राजकिय आक्रमणे झाली याबाबत कुणाचे दुमत नसावे.
तुमच्या वरील वाक्यातील आक्षेप नीट लक्षात घेता मी हिंदु आणि वैदिक असे दोन भाग केले आहेत. मात्र दोन्हि गोष्टि एकमेकांपासुन फारश्या वेगळ्या नाहित. ख्रिश्चन, मुस्लिम, बौध्द, जैन हे मु़ख्यत्वे धर्म आहेत यांना संस्कृती कितपत म्हणता येईल हा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. त्यातुन ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांनी त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर पसरवला आहे हे सत्य आहे त्यामुळे त्यांना संस्कृती म्हणावं का? आणि बौध्द-जैन तत्वांबाबत म्हणाल तर ती हिंदु धर्माचीच नवी रुपे आहेत.
एक उदाहरण घ्यायचे झाले तर यज्ञ हि वैदिक संस्कृती आहे जी ग्रीकांची देखिल होती ते सुध्दा यज्ञ करीत. पण आज तिथे ख्रिश्चन धर्म पसरला आहे, रोमन संस्कृती हि आज फक्त अवषेशांच्या रुपाने उभी आहे. पारसिक संस्क्रुती झोपवणारे ग्रीक कालांतराने स्वतः कालाच्या उदरात गडप झाले. मात्र वैदिक संस्कृती व हिंदु धर्म दोन्हि आजहि तग धरुन उभे आहेत. सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं. आदि शंकराचार्यांनी बुध्द धर्माने मिळमिळित केलेला भारत पुन्हा नव्या ताकदिने उभा केला. गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्णकाल समजला जातो त्यावेळि अगदि कंबोडिआ पर्यंत आपले राज्य पसरले होते. नंतर खुळचट कल्पनांनी भारताचे नुकसान केले. मात्र फक्त एकाच भूमीत आपले पाय रोवुन देखिल हिंदु धर्माचा अथवा वैदिक संस्क्रुतीचा नाश झाला नाहि. तेच इतर साम्राज्यांचा व संस्कृतींचा विनाश झाला हे मला ठळक पणे दाखवुन द्यायचय.

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 12:46 pm | सौरभ वैशंपायन

धन्यवाद!

हेच चौघे का? याचे उत्तर तुम्हि दिलेत याचा मला आनंद होतोय!

या चौघांचा काल बघता त्या काळी त्यांच्या सारखेच काम करणारा दुसरा झाला नाहि.

एकछत्री भारतीय साम्राज्य हे स्वप्न प्रथमतः चाणक्यांनी बघितल. म्हणुन खर तर राष्ट्रपिता एकच आर्य चाणक्य. जे राष्ट्र घडवतात तेच राष्ट्रपिता म्हणावले जाऊ शकतात.

बुध्द धर्माच्या अतिक्रमणाने भारतीय पुरुषार्थाची अतोनात हानी झाली. मिन्यांडर्(मिलींद) बुध्द धर्म स्वीकारुन आपले साम्राज्य वाढवु पाहत होता आणि आम्हि आंधळेपणाने महान बौध्द राजा म्हणुन त्याला अजुनहि डोक्यावर घेतो. हा असला आचरट्पणा थांबवण्याचे कार्य आदि शंकराचार्यांनी केले. बौध्द धर्म जवळपास भारतातुन पिटाळुन लावला. पुढे मुस्लिम आक्रमकांनी नालंदा ३ वेळा जाळले आणि बुध्द धर्माच्या अहिंसेचा संपुर्ण पराभव झाला.

मात्र त्याला उत्तर दिले शिवरायांनी. तलवारीला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. पुढे बाजीरावांनी दिल्लीला धडक दिली. तर राघोबांनी अटकेवर. शस्त्र हेच शास्त्र टिकवुन ठेवते हेच अंतिम सत्य आहे. आत्यंतिक अहिंसेने काय होतं हे तिबेटच्या रुपाने आपण बघतोय नाहि का?

आणि विवेकानंदांचे कार्य तर इतके अलौकिक आहे कि त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर "या विवेकानंदाने काय केले आहे हे जाणुन घ्यायला दुसर्‍या विवेकानंदालाच जन्म घ्यावा लागेल!" विवेकानंदांनी हिंदु धर्माला शिकागो येथिल परीषदेत ज्या ताकदिने पुढे आणले त्या बद्दल विवेकानंदांचे कार्य हे दुसरे शंकराचार्य जन्माला आले होते असेच करावे लागेल.

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 12:59 pm | सौरभ वैशंपायन

"हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या."

-------------------------

आपण सांगितलेल्या व्यक्ती या मोठ्या आहेत यात वाद नाहि मात्र यांच्या समकालीन लोकांची लिस्ट मोठी आहे. गांधी, टागोर,नेताजी हि लोकं समकालीन होती. एकवेळ तुम्हि टिळकांचे नाव घेऊ शकता अगदी त्यांचे खंदे विरोधी शाहु राजे सुध्दा टिळक गेल्यावर म्हणाअले होते "मर्दानी माणुस गेला आता लढायचे कोणाशी? त्यांच्या मागे सगळाच पोरकटाअंचा बाजार. आम्हि एकत्र आलो असतो तर मोठे काम केले असते. पण दोघेहि चुकलो. नको इतके ताणाले!" आणि नंतरची १९४७ पर्यंतची ती वेळच अशी होती की एकाच वेळी शेकडो सारख्या ताकदिची माणसे वावरत होती ,डावपेच टाकत होती. मात्र वरील चौघांचा काल बघता अथवा त्यांचे कार्य बघता ते कार्य दुसर्‍याने क्वचित अथवा मु़ळिच केले नव्हते किंवा केले असले तरी त्याला अपयश आले होते उदा. शहाजी राजांनी केलेला स्वातंत्र्याचा प्रयत्न.
आर्य चाण्यक्यच्या आधी आपले राज्य आणि आपण इतकाच हेतु होता. पांडवांनी राजसुर्य केला देखिल पण अशी कितीशी भुमी त्यांनी जिंकली? उलट भूमी न जिंकता फक्त "तु मोठा! हा कर घे आणि जा!" या प्रकाराने राजसुर्य यज्ञ होत असे. मात्र चाणक्याने एकच राज्य या उद्देशाने मोठि भूमी एकाच साम्राज्याखाली आणली. आदि शंकराचार्यांच्या कार्याला तर तोड नाहि कोणी झाला नाहि कोणी होणारहि नाहि. शिवरायांच्या समकालीन छत्रसाल बुंदेला लढत होता पण बुंदेल्याला वाट शिवरायांनीच दाखवली. शिवाय बुंदेल्याने साम्राज्य उभे केले पाहिजे अशी महत्वाकांक्षा धरल्याचे दिसत नाहि मात्र तेच शिवरायांनी "थोरली मसलत" नेहमी डोळ्या समोर ठेवुन कार्य केले आणि हि थोरली मसलत म्हणजेच "दिल्ली".

ऋषिकेश's picture

28 Aug 2008 - 1:26 pm | ऋषिकेश

मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या चार जणांचं महत्व वादातीत आहेच . तेव्हा ते वेगळं पटवण्याची गरज नाहिच / नव्हती.

प्रश्न इतकाच पडला की या चार जणांना समजून घेऊन सध्याचा भारत समजता कसा येईल? (कदाचित शिवरायांचा प्रभाव आधुनिक भारतावर काहि अंशी जाणवतो) .पुन्हा भारत म्हणताना मी केवळ सुशिक्षित - वाचक असा भारत म्हणत नाहि आहे. तर खरा ज्यात ३०-४०% लोकांना अक्षर ओळखही नाहि, १५-१७% लोकांना आपण कोणत्या देशात राहतो याचं उत्तर देता आलं नाहि इ. इ. (आकडेवारीला पाठबळ देणारे दुवे घरी गेलो की शोधुन देतोच) भारत म्हणतो आहे.
तुम्हीच विचार करा अश्या भारताला ओळखण्यासाठी समजा एखाद्या परकीयाने चाणक्य, विवेकानंद, शिवराय आणि आद्य शंकराचार्य अभ्यासले तर त्याला खर्‍या आधुनिक भारताची ओळख होईल का?

पुन्हा एकदा नमुद करतो मुळ लेखातील व्यक्ती या आदरणीय, स्फुर्तीस्थाने निश्चितच आहेत. परंतू त्यांचा काळ खूप पूर्वीचा असल्याने त्यांचे आपण केवळ विचार घेऊ शकतो. जिथे योग्य आहे तिथे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शतो. परंतू सध्याचा भारत ओळखायला सध्याच्या जनमानसावर पगडा असलेल्या प्रमुख व्यक्ती घेतल्या इतकंच. (त्याही चारच घ्यायच्या होत्या म्हणून नाहितर लोकमान्य, सावरकर, बाबा आमटे आदी मंडळी आहेतच)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 5:55 pm | सौरभ वैशंपायन

दुर्दैवाने परकियांनी भारताला ओळखले म्हणुनच त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ओळखले असे मी म्हणालो कारण एका इंग्रज अधिकार्‍याने १८१८ नंतर हुकुम काढला महाराष्ट्रातील किल्ले ओस पडतील असे बघा, त्यांच्या नित्याच्या वाटा बुजवुन टाका कारण शिवाजी लोकांच्या मनात जिवंत राहिल तोवर आपण इथे तग धरु शकणार नाहि. आणि म्हणुनच १८१८ नंतर रायगड आणि अनेक महत्वाचे गड हे तोफांचा मारा करुन झोपवले. तिथे वाट अडचणीची करुन टकली. आणि हेच ल़क्षात घेऊन टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला. तो अगदि बंगाल पावतो पसरला. त्यातुनच इंग्रजांना बायकी वाटणार्‍या बंगाल मधुन खुदिराम बोस उभे राहिले. शिवरायांची प्रेरणा घेऊन किती जणांनी आपले आयुष्य देशाला समर्पित केले याचा इतिहास आपल्याला माहितच असेल.

मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत. कौटिलिय अर्थशास्त्राचे नियम आजहि राजकारणातले सर्वोत्तम नियम समजले जातात. राजेशाहि गेली अन्यथा आजहि कौटिलिय अर्थशास्त्र वापरता आले असते यात शंका नाहि.
शिवरायांची युध्दनीती आज लष्करात धडा म्हणुन वापरतात.

या चौघांना समजुन भारत कसा जाणुन घेता येईल या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे - यांची अनेक तत्वे हि आजहि लागु पडतात. मुळात ते द्र्ष्टे होते हि गोष्ट माझ्यासाठि खुप महत्वाची आहे.

चाणक्याच अर्थशास्त्र व राजनिती.
आदि शंकराचार्यांची वैदिक धर्मा वरील निष्ठा व त्याचे पुनरुत्थान करायला घेतलेले कष्ट.
शिवरायांची युध्दनीती आणि माणसे जमावण्याची कला.
विवेकानंदांची आधुनिक तरुणाईला जोश देणारी विचारसरणी.
यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे. आणि या चौघांकडेहि कॉमन असलेली गोष्ट म्हणाजे धैर्य, ज्याला स्थल कालाच्या सीमा नसतात.

प्रत्येक देशाचा-मातीचा एक स्वभाव असतो असे माझे मत आहे तो भूभाग कितिहि आधुनिक झाला तरी त्या भूमीचा मुळ स्वभाव बदलत नाहि. या मातीतुनच हि चार माणसे घडली होती.

मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत

:
:
:

यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे.

अगदी मान्य. प्रश्न हा नाहि की या व्यक्तींची पात्रता काय. प्रश्न हा आहे की या व्यक्तींच्या अभ्यासाने आधुनिक भारत पर्यायाने समाजाची जडणघडण कशी कळेल? माझा मुद्दा बहुदा आपल्याला कळला नसावा हा माझ्या लिखाणाचा दोष समजून आता अगदी उदा. देऊन सांगतो
"समजा माझा / तुमचा एखादा परदेशी / देशी मित्र म्हणाला मला भारतात यायचंय तेव्हा भारतातील समाज कसा आहे? त्यांच्या समस्या काय? शक्तीस्थाने काय? भारत हा बाकी जगापेक्षा वेगळा आहे पण तो नक्की कसा आहे? मला भारतात येण्या आधी एक कल्पना म्हणून भारत समजून घ्यायचाय. खरंतर यासाठी बरंच वाचावं लागेल? पण अश्या चार व्यक्तींची नावं मला सांग ज्याच्याबद्दल वाचून मला हल्लीच्या भारतील समाजरचना, संस्कृती, विचार, आचार आणि संस्कार ढोबळपणे कळून येतील"
व त्यावेळी जर मी आपण सांगितलेल्या वक्ती सांगितल्या तर मग त्याने भारत अतिशय प्रज्ञावंत देश आहे. तिथे तत्त्वज्ञान, अर्थकारण, धर्म आणि क्षात्रधर्माचा उत्तम मिलाफ आहे. पण भारतात घरासमोर हत्ती आहेत असा विचार केल्यास नवल नाहि ;) [शेवटी थोडे ह. घ्यावे आणि भावना समजून घ्याव्यात]

आपण सांगितलेल्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात बरेच कार्य/संशोधन/पराक्रम केले आहेत आणि त्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो / व्हावाच. परंतू भारताची सद्यस्थिती, समाजरचना वगैरे समजून घ्यालला सध्याच्या जिवंत पिढीवर ज्या व्यक्तींचा बहुमताने पगडा आहे त्यांचाच विचार करावा लागेल. तुमच्यावर उपरोल्लेखित व्यक्तींचा पगडा आहे. पण तुमच्यासारखे आजच्या भारतात किती आहेत असे वाटते? अगदी शिवरायांच्या नावाने गोंगाट करणार्‍यांपैकी किती जणांनी राजा शिवछत्रपती (अथव असे कोणतेही चरीत्र्)एकदा देखील वाचले असेल व त्यांच्यावर त्याचा परिणाम वगैरे झाला आहे असे तुम्हाला वाटते? ;)

तेव्हा, तुम्ही दिलेल्या वक्तीचा अभ्यास करून काहि अपेक्षा धरून भारतात आलेला मनुष्याचा कीती मोठा अपेक्षाभंग होईल विचार करा. म्हणून मी म्हणत होतो की उपरोल्लेखित व्यक्ती असामान्य आणि थोर असल्या (आहेतच!) तरी आधुनिक भारतावर (राजकारणावर नव्हे हा! )त्यांचा फारसा प्रभाव राहिलेला वाटत नाहि .

आपल्या यादीतील विवेकानंद व शिवराय हे तुलनेने हल्लीचे नेते असल्याने भारतातील काहि समाजघटकांवर त्यांचा काहिसा प्रभाव जाणवतो हे कबूल

-(सपष्ट) ऋषिकेश

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 1:16 pm | सौरभ वैशंपायन

"सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)""

-----------------------

माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.

संन्यासी नसणे आणि अविवाहित राहणे यांचा काहि संबध नाहि. शिवाय त्यांचे माता-पिता यांचा अंत जसा झाला ते बघता लग्नासाठी त्यांच्यावर दबाव टाकणारे कोणीच नव्हते. हा मनुष्य धेय्यासाठि पछाडलेला होता आणि आपले जिवन त्यांनी त्यालाच वाहिले होते. विवाह केलाच पाहिजे असा नियम कुठेहि नाहिये. उलट चाणक्यच त्यांच्या अर्थशास्त्रात हेर हे विवाहित नसतील तर उत्तम असेच म्हणातात. आणि "हेर" हे एखाद्या कळत्या मुला-मुली पासुन ज़ख्ख म्हातारा-म्हातारी पर्यंत कोणीहि असत.
वेश्या वृतीच्या जोगिणींना हेर नेमावे असेहि कौटिल्य म्हणतो. आता जोगिण असुन वेश्या वृत्तीची कशी ?हा प्रश्न आपल्याला पडेलहि मात्र 'देवदासी' हा प्रकार काहिसा तसाच आहे. त्याचेह आधीचे रुप जोगिण भिक्षुकीण असे होते. अश्या स्त्रीयांचा वापर हेर म्हणुन करावा हे चाणक्याचे वाक्य आहे.

राहता राहिला शिवरायांचा मुद्दा. तर शिवरायांची ८ लग्ने झाली होती व हि लग्ने सोयरीक या गोष्टिसाठि केली होती. त्यावेळची परीस्थिती बघता हि ८ लग्ने सांभाळायची(राज्याभिषेका पर्यंत ५(कि ६??) दोन(?) पत्नींचा तोवर मृत्यु झाला होता. ) कि राज्याचा व्याप सांभाळायचा हि चिंता होती. म्हणुनच मी दुर्लक्ष केले असे न म्हणता अधिक महत्व दिले नाहि असे म्हंटले आहे.

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 2:45 pm | प्रियाली

माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.

संदर्भ आता जालावरील देणे म्हणजे शोधायला हवेत परंतु चाणक्य अविवाहीत निश्चित नव्हते. त्यांच्या पुत्राचे, नातवाचे इ. संदर्भ वाचलेले आहेत. तत्कालीन समाजरचनेनुसार चाणक्यांना अविवाहीत राहण्याचे काहीही कारण नाही. विवाहासाठी दबाव टाकावा लागतो असे वाटत नाही. ध्येयासाठी जीवन अनेकांनी टाकले - गांधींपासून, शिवाजीपर्यंत पण सर्वांचे विवाह झाले होते. ध्येय आणि विवाह यांचा परस्परसंबंध नाही. संन्यास आणि अविवाहीत राहणे यांचा नक्की आहे.

चाणक्यांनी हेरांबद्दल लिहिले हे ठीक पण चाणक्य स्वतः [उघड]हेर नव्हते. त्यामुळे हेराचा मुद्दा इथे का यावा तेच कळल नाही. याहूनही पुढची गोष्ट अशी की चाणक्य आणि कौटिल्य हे एक होते का वेगळे यावर अनेक तज्ज्ञांचे वाद आहेत. (परंतु तो वेगळा मुद्दा)

वर एका प्रतिसादात सिकंदराबद्दल वाचले. सिंकदर बॅबिलोनियात मेला इ.स्.पूर्व ३२३ मध्ये. भारत सोडला इ.स.पूर्व ३२६ मध्ये. चाणक्यांचे योद्धा म्हणून किंवा ब्राह्मण सल्लागार म्हणून कोठेही कार्य त्या काळात नाही, त्याकाळात ते विशीत असावेत. सोळाव्या वर्षी तक्षशीलेला अध्ययनासाठी गेल्याचा उल्लेख वाचला आहे आणि त्यानंतर तेथेच अध्यापनाचे कार्य सांभाळल्याचा. म्हणजे बहुधा शिकून अध्यापन करत असावेत (वयाचा फारसा संबंध नाही ) आणि त्याकाळात ते फार प्रस्थापितही नव्हते. तक्षशीलेत सिकंदराला अटकाव झालेला नाही. ज्या माळवा आणि इतर प्रांतात झाला त्यांचा आणि चाणक्याचा संबंध नाही. तक्षशीलेवर स्वारी केली असता, तिथे जी वाताहत झाली त्यातून चाणक्य पाटण्याच्या दिशेनेच गेल्याची ऐतिहासिक शक्यता जास्त.

असाच सनावळ्यांचा गोंधळ रामदास आणि तुकारामांबद्दल. इतिहासाचा विचार केला असता, रामदास आणि तुकाराम हे राजांना गुरुस्थानी असतील पण ते राजांचे गुरू नसावेत. राजांचे गुरू त्यांचे आई-बाप, दादोजी आणि तत्कालीन राजकारण.

सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं.

कोणत्या काळात?

आता शिवरायांबद्दल, मी आठ लग्नांबद्दल बोलत नाही, त्याचा मराठी साम्राज्याशी काय संबंध? सोयरिक साधून मराठे बांधून ठेवणे इतकाच असावा. संभाजी आणि सोयराबाईच्या अंतर्गत राजकारणाकडे महाराजांनी लक्ष पुरवले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता. बाप आणि नवरा आणि राज्याच्या भविष्याची चिंता म्हणून या गोष्टींना महत्त्व देता आले असते. राज्याचा युवराज घडवण्यात महाराज कमी पडले. (पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे महाराजांना सर्वच करणे शक्य होते असे नाही पण त्यांनी या गोष्टींना महत्व दिले नाही, हे मुद्दामहून सांगण्यासारखेही काही नाही)

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 6:22 pm | सौरभ वैशंपायन

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.
चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.
चाणक्य त्यावेळि गुरुकुलात शिकवत होते. आणि त्यांच्या हाताखाली चंद्रगुप्त, अक्षय अशी मुले शिकत होती आज त्यातील काहि विद्यार्थ्यांची नावे मिळतात. सिकंदराविरुध्द मालवक, क्षूद्रक इ.इ. गणाराज्यांनी युध्द केले होते. सिकंदराने पौरवाला हरवले खरे मात्र परीस्थिती बघुन त्याने पौरवाला राज्यावरुन काढुन टाकले नाहि. अंभीने सिकंदराला मदत केली व पुढे त्यामुळे पौरवाकडुन आपल्या राज्याला धोका होऊ नये म्हणुन सिकंदराला मध्यस्थी करायला लावुन पौरवाशी सोयरीक जुळवली, त्याच्या मुलीशी लग्न केले. पुढे सिंहारण्य या माजी सेनापतीला हाताशी धरुन चाणक्याने सिकंदरा विरुध्द विरोधाची फळी उभी केली. सिकंदाराच्या सेनेतील अंतर्गत कुरबुरीमुले सिकंदराने परतीचा रस्ता धरला तेव्हा सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.
पुढे मगध साम्राज्याच्या आजुबाजुच्या राजांशी हातमिळवणी करुन नंदा विरुध्द कारस्थाने करुन नंद वंशाच उच्छेद केला. व जेव्हा मगधाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या त्या राजांना रस्त्यातुन अनेक प्रकारे हटवुन चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते.

आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती. महाराज जौहराच्या वेढ्यातुन निसटुन उगीच विशाळगडावर गेले नव्हते. विशाळगडाची भौगोलिक परीस्थीती या कारणा बरोबर विशाळगड हे महाराजांचे सासर होते जिथे दगा होण्याची शक्यता नव्हती या कारणासाठिच महाराजांनी विशाळगडाला जवळ केले. अजुन महाराजांच्या आयुष्यातले काहि प्रसंग सांगता येतिल. आणि युवराज-महाराणी यांच्या संघर्षाबाबत म्हणाल तर महाराजांना खरच तिथे लक्ष द्यायला वेळ नसावा. महाराज वर्षातले किमान ६ महिने राजधानी बाहेर असायचे पुढे तर दिड वर्षांच्या द्ख्खन मोहिमेवर गेले आणि तिथुनच तंट्याला सुरुवात झाली.

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 6:38 pm | प्रियाली

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.

कशाबद्दल क्रांतिकार्याची दिक्षा? चाणक्य युद्धनिती शिकवत होता का? (राजनीती किंवा अर्थशास्त्र शिकवत असावा असे मला वाटते) कुठे बंडाळी, अव्यवस्था सुरु होती की चाणक्य क्रांतीकारी निर्माण करत होता? की सिकंदर चालून येतो आहे म्हणून तो ग्रीक सैन्याविरूद्ध विद्यार्थ्यांची फळी निर्माण करत होता? तक्षशिलेत असताना चाणक्य हा एक सामान्य तरूण अध्यापक होता. बाकी, काहीही योगदान नाही. चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असल्याबद्दल आजच कळले. असावाही मला फारशी कल्पना नाही परंतु चंद्रगुप्त सिकंदराच्या सैन्यातून लढल्याच्याही कथा-आख्यायिका सांगितल्या जातात. चंद्रगुप्ताचे वय त्याकाळात १३-१४ असल्याने तो कितपत लढला असावा याचीही कल्पना नाही आणि चंद्रगुप्त भारताच्या वायव्येकडे राहिला होता यालाही काहीही ऐतिहासिक पुरावे नाहीत.

आहेत त्या सर्व कपोलकल्पित कथा.

चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.

बांधली पण ती मगध साम्राज्याविरुद्ध. वायव्य भारतात अशी फळी बांधल्याचे मी कोठेही वाचलेले नाही पण संदर्भ आवडेल.

सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.

क्रांतिकारकांनी नाही, लहान मोठ्या गणराज्यांनी गनिमी काव्यांनी हल्ले करून मारले आणि चाणक्यांचा किंवा त्याच्या तथाकथित दूरवर पसरलेल्या शिष्यांचा यात काहीही संबंध नसावा.

तक्षशीलेची वाताहत, युद्धपरिस्थिती वगैरेतून सुटका करून चाणक्य पाटलीपुत्राच्या दिशेने गेला. तेथे नंदाच्या दरबारी त्याने नोकरी स्वीकारली. आपल्या हुशारीमुळे वर चढला आणि हेकटपणा मुळे मूर्ख नंदाची मर्जी गमवून बसला आणि मगध साम्राज्याशी वैर धरले. ही परिस्थिती येईपर्यंत तो मगधसाम्राज्यातील एक राजकारणी म्हणून प्रसिद्धी पावलेला होता आणि म्हणूनच आजूबाजूच्या लहान-मोठ्या राज्यांशी हातमिळवणी करू शकला.

आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती.

हे तर मी म्हटलेलेच आहे पण बळकटी शासन करत नाही. महाराजांच्या आठ लग्नांबद्दल माझे काहीच म्हणणे नसल्याने मी त्यावर विषय वाढवत नाही. युवराज आणि महाराणींचा तंटा मात्र खूप जुना होता आणि महाराजांचे त्याकडे दुर्लक्षच झाले.

सौरभ वैशंपायन's picture

28 Aug 2008 - 6:56 pm | सौरभ वैशंपायन

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत? कारण चाणक्य अथवा चंद्रगुप्त यांची अचुक जन्म तारिख कोणालाच माहित नाहि. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात. सिकंदराशी अंभीने हातमिळवणी केल्याची बातमी आल्यावर त्यांनी हि फळी बांधायला सुरुवात केली होती. राजाच नाकर्ता निघाल्यावर काय करणार? संदर्भा साठि भा.द.खेर यांचे चाणक्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचा. शिवाय अजुन अनेक पुस्तके मिळतील. शिवाय चंद्रप्रकाश द्विवेदि यांची चाणक्य हि सिरीअल लागायची सध्या तिच्या सीडिज मिळतात. चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि. अगदिच कोणावरहि विश्वास ठेवा असे मी सांगत नाहिये.

तुम्हि म्हणता तसे तो नंदाच्या दरबारी होता कि नव्हता याबाबत दे़खिल दुमत आहे. मात्र चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 7:03 pm | प्रियाली

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असण्याचा आणि १२-१४ वर्षांचा असण्याचा आणि एकत्रित अनुमानाचा संबंध काय? चंद्रगुप्ताचे वय इतिहासकारांनी निश्चित केले आहे. त्यानुसार जन्म सुमारे इ.स्.पूर्व ३४० ते ३३५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. अचूक तारखा माहित असण्याचा प्रश्न नाही. नंदराज्याचा कालावधी, मौर्यराज्याचा कालावधी, चंद्रगुप्ताचा शासनकाळ, त्यानंतर आलेले राजे यावरून हे वय निश्चित केले जाते.

चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात.

चाणक्याने चंद्रगुप्ताला विकत घेतले, चंद्रगुप्त नंदाचा अनौरस पुत्रच होता, नंदाने त्याला पितृत्व नाकारले होते वगैरे वगैरे या फक्त आख्यायिकाच आहेत. त्यांना पुष्टी देणारे कोणतेही संदर्भ नाहीत.

चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि.

चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ज्ञानाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही परंतु त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्यांनी सांगितलेल्या घटना प्रमाण मानाव्या असे कुठे आहे? यासंदर्भात मी पार्थसारथी बोस, डॉ. बरुआ यांचे लेख काही काळापूर्वी वाचले होते, कोणीही चाणक्याने सिकंदराविरुद्ध लढाई लढण्याबद्दल म्हटलेले नाही. ग्रीकांचा इतिहास वाचलेला आहे. त्यात तत्कालीन अनेक लहान मोठ्या राजा किंवा सेनानींची नावे आहेत..कुठेही चाणक्याचे नाव नाही.

चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

चाणक्याचा अपमान याच कारणासाठी झाला की तो नंदाच्या दरबारी होता, नंदाला सल्ल्यांची नाहीतर हुजर्‍यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते.

लिखाळ's picture

28 Aug 2008 - 3:23 pm | लिखाळ

सौरभ,
लेख ठिक वाटला. वक्तृत्व स्पर्धेतले भाषण असते त्या धाटणीचा वाटला.
लेख शेवटीसुद्धा कोठलीच ठोस माहिती वा मत मांडत नाही त्यामुळे तो वाचून संपल्यावर टाळ्या वाजवण्यापलिकडे हातात काहिच राहिले नाही.

>>आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती.<<
या सारख्या वाक्यांमुळे मला तसे वाटले असेल कदाचित. असो.

पण,
आपण निवड केलेल्या चारही व्यक्ती या नक्कीच अनेक शतके भारतावर, त्याच्या संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या आहेत हे सत्यच. यांबद्दल आपल्याला वाटणारा आदरसुद्धा योग्यच आहे.
शंकराचार्य आणि विवेकानंद यांनी भारतभ्रमण करुन भारताचा, तेथील लोकांचा स्वभाव ओळखला होता. मला त्यांच्या समाजकारणाचा हा भक्कम पाया वाटतो. पुढे झालेल्या रामदास आणि इतरही काही संत (आणि समाजसेवकांनी) मंडळींनी भारतभ्रमण करुन रावा पासून रंकापर्यंत सर्व समाजजीवन जवळून पाहिल्यामुळेच त्यांना सामाजिक स्थितीवर काही ठोस मते बनवता आली आणि उपाय योजता आले असे वाटते. सध्याच्या नेत्यांनी कितीही प्रवास केला तरी ते एक तर्‍हेच्या प्रभावळीत राहुन प्रवास करतात. त्यांना हे भान येणे शक्य दिसत नाही.

आपले इतरही काही लिखाण वाचले. आवडले.
शुभेच्छुक
--लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2008 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आणि चर्चा दोन्ही वाचत आहे. लेख सोपा करता आला असता या विचारांशी सहमत.

आपण लेखासाठी निवडलेल्या श्रेष्ठ माणसांनी भारतीय मनाला नेहमीच भुरळ घातली आहे. इतिहासाची आठवण यासाठी करावी की, भविष्यातली पावलं दमदार पडावी. इतिहासातील चरित्र /विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण महासत्तेकडे कुच केले पाहिजे हा लेखनातला आशावाद आवडला.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते.

हम्म, नक्कीच बनवू शकते. पण सुरुवात कुठून करायची ? त्याचे जर विवेचन आले असते तर, लेखाला चार चांद लागले असते, असो आपले लेखन आम्ही आवडीने वाचत असतोच , लगे रहो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे