घर एकटे बागेसह......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Aug 2015 - 4:40 pm

घर एकटे बागेसह ...........
घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते,
एकेक झाडमाड अंतरीचे गुज येथे सांगते.

पुसट लाल संकासूर बोलतो न काही
उचलूनी फांद्या परी आकाशाकडे पाहतो
कोण आले, कोण गेले, राहिले न कोणी
तरी दाराशी स्तब्धसा, वाट कुणाची पाहतो?

सरताना बहर तसा, कळ्या दोन हासल्या
'मोगराच मी सुगंधी, जरा अजून बहरतो
पावसाची वाट पाहण्या, कळ्यांतून झुरतो
श्रावणाची झड येता, मी पानांतून मिटतो!'

शुभ्र अनंताचे कसे, विरागीच अडसर
उचलेना पाऊल पुढे, वा मागेही अधिरे
मौनात त्याच्या, प्रश्न किती साधेसुधे!
उत्तरे खरीखुरी, तरी का मन बावरे?

तुळस एकटी अकारण,रोखुनिया बघते
पावलांचे ठसे माझ्या, मोजूनिया पाहते
जुन्याखोल ओळखीवर नव्यानेच हासते
अंतरिचे रिक्तपण मग, वाकुनिया वेचते.

वेलींच्या मिठीतला माड उंच एकाकी
मोहाचा गंध नाही, पण स्पर्शाने थरथरतो!
अंगणाचे ओलेपण उलून येते फळांफुलांत,
विरक्त बाग भवताली,
पण चाफ्याने कोण घमघमतो?

घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते
एकेक झाडमाड अंतरिचे गुज येथे सांगते!

पूर्व प्रसिद्धी दै.सकाळ.

भावकविताकविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

14 Aug 2015 - 5:01 pm | वेल्लाभट

चांगली आहे ! आवडली

जडभरत's picture

14 Aug 2015 - 7:29 pm | जडभरत

मस्स्स्स्सत!
संकासुर म्हणजे काय?

शिव कन्या's picture

15 Aug 2015 - 6:05 am | शिव कन्या

वाचत असल्याबद्दल धन्यवाद .
संकासूर हे फुलाचे नाव आहे. तसेच
संकासूर हे दशावतारी नाटकातील एक पात्र पण आहे.
तसा दोघांचा काही संबंध नाही.

एस's picture

14 Aug 2015 - 8:25 pm | एस

खूपच छान!

एक एकटा एकटाच's picture

15 Aug 2015 - 6:51 pm | एक एकटा एकटाच

आवडली