मी!

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
17 Nov 2007 - 10:07 am

ना शोधितो किनारा
ना धुंडितो निवारा
मी धुंद वादळाशी
अविराम झुंजणारा

चुंबावया नभाला
झेपावतात लाटा
उद्दाम कालियाचे
शिर मीच ठेचणारा

दर्या अथांग माझी
टाकी गिळून नाव
तेजाळ रत्नगुंफा
तिमिरात शोधणारा

आयाळ पिंजणारा
झोंबे पिसाट वारा
दुर्दम्य निश्चयाचे
मी शीड रोवणारा

धावून ये घनांची
रणधुंद मत्त सेना
मी नेत्र शंकराचा
अंगार ओकणारा

आभाळ फाडुनी ये
बिजली कडाडणारी
नी निग्रही ध्रुवाशी
रणनाळ जोडणारा

--अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

17 Nov 2007 - 11:10 am | प्रमोद देव

खूपच सुंदर रचना!

आयाळ पिंजणारा
झोंबे पिसाट वारा
दुर्दम्य निश्चयाचे
मी शीड रोवणारा

ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2007 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशोकराव,
कविता मस्त आहे, लिहीत राहा.

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:18 pm | विसोबा खेचर

चुंबावया नभाला
झेपावतात लाटा
उद्दाम कालियाचे
शिर मीच ठेचणारा

दर्या अथांग माझी
टाकी गिळून नाव
तेजाळ रत्नगुंफा
तिमिरात शोधणारा

तशी संपूर्ण कविताच लय भारी आहे परंतु वरील दोन कडवी विशेष आवडली!

तात्या.