शेवळाची भाजी

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
3 Jul 2015 - 5:13 pm

पहिला पाऊस पडला की,एखाद्या आठवड्याभरात बाजारात शेवळं दिसू लागतात.त्यासोबत काकडंही. मातकट,किरमिजी रंगांच्या साधारण सात ते आठ इंची जणू एखाद्या फुलाच्या कळ्याच जणू.एखादीतून तिचा पिवळसर कोंब,एखादीतून चक्क जांभळा कोंब दिसतोय. साधारण आठवडाभरच निसर्गाचे हे नवल पाहायला मिळते आणि पुढची आठ/दहा दिवसात अंतर्धानही पावते. एरवी भाजीच्या तजेलदार रंगरुपाबाद्द्ल चोखंदळ असणारी मी या मातकट,किरमिजी भाजीच्या दर्शनाने खूष होते.भाजीवालीला दर विचारते. नेहमीपेक्षा चढाच दर असतो या भाजीचा.एका जुडीत पाच किंवा सहा नग. आणि एका जुडीची किंमत ती कधीच सांगत नाही.”पन्नासला तीन”,तिचा आवाजही आज बदललेला.भावासारखाच चढा.

“अग, काय काहीही.”मी गुळमुळीतपणे.

“मग,मीच चार घेतल्यात पन्नासला,आता एवढ्या पावसात बसायचं तर मला तेवढे नकोत का ?”
भाजीवालीचा आवाज अजून चढाच.

“हो ग,पण नेहमीच्या गिर्हाईकाला समजून द्यायला हवं की नाही?”अजूनही माझा आवाज खालीच.”बोल काय भावाने देणार नक्की बोल.”
इतक्यात दुसरं कोणी गिर्हाईक तिथे येतं,आता मी हातात घेऊन निरखत असलेल्या जुडीला पाहून विचारतं,”कसली आहे हो भाजी?”मी आता माझ्याच नादात भूतकाळात पोचलेली असते.पाहिलांदा ही भाजी कधी पहिली आणि कधी खाल्ली ते आठवत असते.माझ्या माहेरी एकूण २८ बिऱ्हाडांची बिल्डींग.माझ्या जन्माच्या आधीपासून सगळे एकत्र राहणारे.कोणाचेही पोर कोणाच्याही घरात शिरून जेवायचे ते दिवस. काही घरांमध्ये तिसऱ्या पिढीची लागणे झालीयत.अजूनही तिथे हेच वातावरण आहे.
मी लहान होते तेव्हा पासून शेजारच्या पाटील काकांची - त्यांना सगळे बंधू म्हणत - बहीण मढहून ही भाजी आणून करीत असे.आत्या सुगरण तर होत्याच पण आम्हीही त्याची भाचरुंडे असल्यासारख्याच ही नवलाईची भाजी खायला आम्हालाही बोलवत असत.या आठवणीत बुडालेली मी, त्या जुडीकडे बघत उत्तर देते.”शेवळाची.”प्रतिप्रश्न येतो. ‘’कशी करतात?”. आता मी त्यांना ती भाजी कशी करायची हे सांगताना साफ करायची हे सांगू लागते ते ऐकून, “अरे बापरे, मग हा बाकीचा कचराच का?यातून किती भाजी निघणार?”असं म्हणत,’वेडीच दिसतेय’,असा कटाक्ष टाकत त्याला हवी असलेली भाजी घेऊन निघून गेलेलं असतं.

भानावर येत मी पुन्हा जरा मोठ्याने विचारते,”अग,बोल ना?”

“किती घेणार?”आता भाजीवालीचा आवाज थोडा कमी झालेला.

“ऐकलंस ना आता,किती कचरा निघणार ते? म्हणजे १०-१२ जुड्या तर हव्यातच.नीट समजून सांग बरं भाव.” आता मी अजून मोठ्याने बोलते.

“घ्या तर पन्न्साच्या चार.” भाजीवाली उदारतेचा आव आणून.

पण मी कसली खट.”नाही हं पन्नासच्या पाच दे,नाहीतर नको बाई.एकत्र या भाजीचा टाटोप मोठा.न् इतकी महाग नेऊन परवडली तर पाहिजे.”माझा आविर्भाव पाहून भाजीवाली मला,’घ्या तर ’असे सांगून पिशवीत दहा जुड्या भरते वर दोन जुड्या टाकते नि म्हणते.”वैनी मलापण थोडी भाजी द्याल का चाखायला?ठराविक लोकच ही भाजी नेतात.पण त्यांना सांगायची लाज वाटते.”मी हसून कबूल करते.”पण आज काही ही भाजी व्हायची नाही,उद्या करीन आणि पाठवीन हं” म्हणत मी निघते.
ती पुन्हा काकडांची आठवण करते. ही काकडं म्हणजे पण निसर्गाची एक कामालच.या खाजरया भाजीच्या वेळी ही फळं तयार झालेली असतात. डोंगरी आवळ्याची लहान आवृत्ती जशी देसेल तशीच हिरवट पोपटी दिसतात.पण बिया मात्र गोल असतात.आवळ्यारख्या कंगोरेदार नसतात.पण चवही तशीच लागते.ज्या आद्य रांपिणीने त्याचा उपयोग सर्वप्रथम केला असेल तिला आणि तिच्या कल्पनाशक्तीला साष्टांग नमस्कार. ती दुसऱ्यापिशवीत काकडं घालून देताना मी सांगते.”अग नकोत,मी चिंच वापरते.”कारण ही काकडं ठेचा,त्याच्या बिया काढा.मग वाटून त्यांचा रस काढा.ही पायरी गाळायला मला माझ्या एका वहिनीच्या आईने शिकवलीय.तेवढाच कमी खटाटोप.

घरी आल्यावर इतर स्वयंपाक उरकून जेऊन निवांत मी आणलेली शेवळं घेऊन बसते.ही भाजी अशी दिसते.
.

.

वरच्या फोटोत दिसणारा मधला कोंब काढून त्याच्या खालच्या भागावर दिसणारा जर्द पिवळा किंवा कधी केसरी,कधी लालसर
भाग आणि त्यावर असणारा क्वचित् खसाखशीसारखे दाणे असणारा भाग कडून उरलेला भाग घेते.आणि पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घेते.

आता चिरण्याचे काम,अतिशय बारीक चिरून भाजी पुन्हा चाळणीत घालून धुवून घेते. एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते.आता ही भाजी बुडेल इतके पाणी पातेल्यात घेऊन त्यात घालते.त्यात एक चमचा कोकम आगळ घालते.झाकण ठेऊन रात्रभर तशीच ठेवते.याचे कारण म्हणजे या भाजीला भयंकर खाज असते.तिचा सर्वात सुंदर दिसणारा भाग टाकून द्यावा लागते ते तेवढ्यासाठीच.

.

दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून घेऊन कढईत.दोन तीन पाळ्या तेल घालून त्यात भाजी टाकून इतर कामाला सुरवात करते.मध्ये मध्ये भाजी ढवळत रहाते.चर्र.....चर्र आवाज येतच असतो,हा आवाज बंद होत नाही तोपर्यंत भाजी ढवळणे सोडत नाही.जेव्हा हा आवाज बंद होईल तेव्हा परतणे थांबवते.आता कुठे ही भाजी पुढच्या संस्कारासाठी तयार झालेली असते.अशी परतण्याची क्रिया करण्याची टिप जाईवहिनींच्या आईची. ही पायरी खूप काळजीपूर्वक करते कारण त्यामुळे भाजी अजिबात म्हणजे अजिबात खाजत नाही.

एव्हाना नवरा मटणखिमा घेऊन आलेला असतोच. या भाजीची पण गम्मतच.शाकाहारी जितकी छान लागते तितकीच मांसाहारीही.खिमा घालून करा;कोलंबी घालून करा;सोडे घालून करा;करंदी घालून करा’किंवा हरभरा डाळीचा भरडा घालून करा;वालाचे किंवा मुगाचे बिरडे घालून करा, ती मस्तच लागणार.तुम्ही ती कशीही करा पण आता मात्र मी मटणखिमा घालून ही भाजी करायला घेते.तुमच्यासाठी पुढे कृती देते आधी.

साहित्य:-

१. एक वाटी परतलेली शेवळाची भाजी.

.

२, एक वाटी मटणखिमा. (कोलंबी वापरल्यास लहान आकाराचीच वापरावी.सोडे वापरल्या तासभर भिजवून लहान तुकडे करून वापरावेत.भरडा किंवा वाल वापरल्यास अर्धी वाटी भरडा भिजवून वापरा.तो भिजून दुप्पट होतो.वालाचे किंवा मुगाचे बिरडे मात्र जेवढयास तेवढे घ्यावे.)

.

३. दीड चहाचा चमचा आले +लसूण+मिरची +कोथिंबिरीचे वाटण. हे माझ्याकडे तयार असते.त्यासाठीचे प्रमाण,अर्धी वाटी आले सोलून त्याची चाकत्या+१ वाटी सोललेला लसूण+दोन मिरच्या+वाटीभर कोथिंबीर.

४. दोन मध्यम कांदे. बारीक चिरून आणि एका कांदा जाड उभा चिरून

५. अर्धी वाटी खवलेलं खोबरं

६. खडा मसाला-५/६ काळी मिरी,अर्धा इंच इंचदालचिनी तुकडा,दोन लवंगा,हरभरा डाळीएवढा जायफळ तुकडा.छोटा तुकडा हळकुंड,एक चमचा धणे,चवीनुसा र८-१० सुक्या लाल मिरच्या.मी ७ ते ८ वापरते.एक तमालपत्र(हकुंड आणि जायफळतुकडा यांच्याऐवजी मी दोन्हीची पावडर वापरली आहे.)

.
७. तेल.

८. मीठ.

९.. आले+लसूण पेस्ट १ चहचा चमचा

.

१०. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.

.

११. चिंचेचा कोळ दोन चहाचेचमचे.(एच्छिक) (घालायचं असेल तर शेवठ्च्या उकलीआधी घालावा.)फोटो नाही.)

कृती:-
१. खिमा धुऊन त्याला आले+ लसूण+ मिरची +कोथिंबिरीचे वाटण चोळावे आणि तासभर ठेवावे.

२. जाड कापलेला कांदा थोड्या तेलावर भाजून घ्यावा.त्यातच खोबरे टाकून भाजावे.हेधोन्ही भाजले की मध्ये थोडी जागा करून थोडे तेल टाकून तमालपत्र वगळतासगळा खडामसाला मसाला मिर्च्यांसह घालून वर अर्धी कोथिंबीर घालून त्यावर कांदा खोबऱ्याचे आच्छादन करून गॅस बंद करावा.थंड झाले की मिक्सरमधून बारीक वाटावे.

३. आता ज्यात भाजी परतलेली ती कढई गॅसवर ठेवावी.कढईत तेल असतेच. हवे असल्यासच थोडे तेल घालून चिरलेला कांदा घालून परतावे.

.

४. खिमा घालून परतावे.खिम्याचा रंग बदलला की दोन वाट्या गरम पाणी घालून शिजू द्यावे.

.

५. खिमा शिजला की परतलेली भाजी घालावी.वाटण घाल मिक्सर धुऊन मसाल्याचे पाणी घालावे.लागल्यास अजून थोडे गरम पाणी घालावे.

६. दोन चार उकळी घेऊन उतरावी.अंगासरसा रस ठेवावा.वर काथिंबीर पेरून सादर करावी.
.

७.वडे किंवा पुरी, चपाती,भाकरी(तांदूळ किंवा ज्वारी)सोबत वाढावी.

या भाजीची नाजुकता पाहिली तर वडे किंवा पुरीच हवी,पण माझी आवड भाकरी.
.

भाजीवालीचा वाटा दोन भाकरींसोबत पोचवून मी जेवायला बसते आणि केलेल्या खटाटोपाला न्याय देते.जोडीला आत्यांची आठवण असतेच.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Jul 2015 - 5:34 pm | मुक्त विहारि

एक वेगळ्या प्रकारची भाजी सांगीतल्याबद्दल, मनापासून धन्यवाद.

(स्वगत: ही भाजी बहूदा हॉटेल मध्ये मिळत नसावी.आता, आम्हाला कोण खायला देणार?)

स्पंदना's picture

3 Jul 2015 - 6:03 pm | स्पंदना

चांगलीच घाटा वाटायची भाजी दिसते आहे. केळीचे कोके पण असेच करतात। फ़क्त एव्हढा मसाला नसतो.

बाकी पाककृती मस्तच!

आदूबाळ's picture

3 Jul 2015 - 6:11 pm | आदूबाळ

जबरदस्त दिसतीये भाजी.

खरं तर काय आवडलं सांगू का? पंचेंद्रियांच्या आस्वादाचे अनुभव सुटे सुटे नसतात. त्यामागे काहीतरी आठवणी, स्टोर्‍या, किस्सेही असतात. साहित्य + कृती = पदार्थ या कोरड्या समीकरणापेक्षा या स्टोर्‍या ऐकण्यात जास्त मजा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 7:23 pm | अत्रुप्त आत्मा

@ पंचेंद्रियांच्या आस्वादाचे अनुभव सुटे सुटे नसतात. त्यामागे काहीतरी आठवणी, स्टोर्या, किस्सेही असतात. साहित्य + कृती = पदार्थ या कोरड्या समीकरणापेक्षा या स्टोर्या ऐकण्यात जास्त मजा.>> +++१११ यहीच बोल्ता हैय।

भाजी इतकाच लेखंहि सुंदर!

शेवळांची अगदी साग्रसंगीत रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद!!

एस's picture

3 Jul 2015 - 6:33 pm | एस

अहाहा!

स्वाती दिनेश's picture

3 Jul 2015 - 6:37 pm | स्वाती दिनेश

पावसाळा सुरू झाला की आमच्या कडे बाळकुमहून आमची देवकी आंबेवाली भाज्या आणायला सुरूवात करायची. हिरवी लांब कापाची वांगी, भारंगी, वाळूतली मेथी, शेवळं,काकडं.. अहाहा.. काय आठवण करून दिलीत सुरंगी तुम्ही..
स्वाती

काय बात हैं सुरंगीताई! खूप दिवसांनी पाहिली ही भाजी.

सोंड्या's picture

3 Jul 2015 - 7:28 pm | सोंड्या

सुरन्गीजी खुपच छान माहिती दिलीत आपण.
आमच्या कडील पद्धत साधारण वेगळी असते
साफ करून चिरलेली भाजी आमसूला बरोबर उकडतात. चाळणीने गाळूण भाजी वेगळी केल्यावर राहिलेले पाणी पुरणाच्या कटा प्रमाणे फोडणी देउन झणझणीत असं सार करतात. . त्याला शेवळोणी अस म्हणतात
राहिलेली भाजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतात
अथवा चुलीवर टांगलेल्या उतनावर* पसरवून वाळवतात.
वाळलेली भाजी वर्षभर चांगली राहाते व सुकट, बटाट्यात, डाळीत छान लागते फक्त जरा स्मोकी फ्लेवर.महागाईच्या वेळी आमच्याकडील सर्वसामान्य शेतकरी कातकरी व ठाकरं आशाच रानभाज्यांवर गूजारा करतात.
* - उतन म्हणजे बांबूच्या काड्यांची पातळ चटई जी पावसाळ्यात चूलीवर 2 फुट वर टांगतात त्यावर मासे, मूरी, कोलबी, रानभाज्या पसरवून वर्षभरासाठी वाळवतात.

कं लिवलंय!कं लिवलंय!मस्त मस्त.
या सर्वच पावसाळी भाज्या आमच्या भागातल्या प्रसिध्द आहेत.लोक लांबुन लांबुन घ्यायला येतात.पण मी जरा लांब असते.कधी वेळ मिळणार अशा उपद्व्यापाच्या भाज्यांसाठी.पण तुमचं वाचुन प्रेर्णा मिळते का बघते!

इशा१२३'s picture

3 Jul 2015 - 7:43 pm | इशा१२३

मस्त लिहिलय ताई!
तुमच्यामुळे नविन भाजीची ओळख झाली.हि भाजी बघण्यात नाही.चव बघणे तर दुरच.
तुम्ही वर्णन मात्र छान केलय.

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 8:24 pm | सतिश गावडे

या भाजीविषयी थोडसं: पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणात डोंगर माथ्यावर आणि उतारावर ही भाजी उगवते. मुंबईत येणारी भाजी ठाणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील कातकरी लोक पुरवतात.

बरेच वेळा ही भाजी (शिजवण्यापूर्वी) अंगाला लागल्यास अंगाला खाज सुटते. तसेच शिजवताना पाणि उकळेपर्यंत न शिजवल्यास घशात खकावते. ("शुद्ध मराठीतील शब्द खवखवते. ;) )

याच सुमारास कांद्याच्या पातीसारखी पाती असणारी भाजी उगवते. कोकणात तिला "पेवाची भाजी" म्हणतात.

कांद्याच्या पातीसारखी पाती असणारी भाजी उगवते.

आमच्याकडे तिला फोडशी म्हणतात. फोडशी, टाकळा, कवळा, कर्टोली (कंटोळी) सगळ्या पावसाळी भाज्या आठवल्या.

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 8:33 pm | सतिश गावडे

टाकळा अफलातून असते राव. आधी उकडून काढायची, कुस्करून त्यात तिळकुट टाकायचे आणि बारीक चिरलेल्या कांद्याबरोबर तेलात परतायची. तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी अशी काही लागते. आहा... नुसत्या आठवणीने हळवा झालो. :)

टाकळा आणि फोडशी आवडती. कधी आजी आली आणि एखादवेळेस जवळपास भोपळ्याचा वेल असला की भोपळ्याची पानं, त्यात भर म्हणून थोडी भेंडी निव्वळ कांदा मिरचीवर परतून!! अप्रतिम भाजी.

सुबोध खरे's picture

3 Jul 2015 - 9:25 pm | सुबोध खरे

"स्वयंपाक घरातील विज्ञान"
अळू शेवळे या वर्गातील भाज्या( वनस्पती) स्वतःचे चरणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कॅल्शियम ओक्झलेट(raphide) चे स्फटिक बाह्यांगावर निर्माण करतात. यामुळे या भाज्या नीट न शिजवता खाल्या तर फार खवखव सुटते." खाई त्याला खवखवे" हि म्हण यातूनच आली आहे. ( हे सुई सारखे टोकदार स्फटिक घशाला टोचतात आणि सूज आणतात)यासाठी या भाज्या नीट शिजवल्या पाहिजेत किंवा आपण त्यात चिंच घालतो. ( चिंचेतील टारटरिक आम्ल हे स्फटिक विरघळवण्याच्या कामाला येते).
पहा
https://en.wikipedia.org/wiki/Raphide
बाकी लेख आणि त्यातील फोटो फार छान आहेत.
पण हि भाजी कधी खाल्ल्याचे आठवत नाही. कुणी करून देईल का?

उगा काहितरीच's picture

3 Jul 2015 - 8:44 pm | उगा काहितरीच

करून बघण्याची शक्यताच नाही. पण कुणी करून दिली तर मात्र खाईल.
(आमंत्रणाच्या प्रतिक्षेत...)

त्रिवेणी's picture

3 Jul 2015 - 9:15 pm | त्रिवेणी

मस्त लिहिलय तै.
कधी येवू भाजी khyayla.

सानिकास्वप्निल's picture

3 Jul 2015 - 10:13 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकक्रुती, मस्तं भाजी.
लिहिलयं ही मस्तं .

वेगळीच् भाजी..छान ओळख करुन दिलीत..

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2015 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त अनवट पाकृ !

माझ्या लहाणपणी पावसाळ्यात कातकरी, ठाकूर लोक जंगलात, माळरानांवर नैसर्गिकरित्या उगवणार्‍या अनेक प्रकारच्या भाज्या आणत असत. प्रत्येकीची काहीतरी खास वेगळी पाकृ असायची. मात्र आई आग्रहाने अश्या भाज्या बनवायची. त्यामुळे, त्यांची नावे विस्मृतीत गेली असली तरी चव खास असायची हे ध्यानात आहे.

याच सुमारास कांद्याच्या पातीसारखी पाती असणारी भाजी उगवते. कोकणात तिला "पेवाची भाजी" म्हणतात.

ही आवडती होती. अजून एक फताड्या रूंद पानांची भाजी यायची त्याची अळूच्या पानांसारख्या वड्या बनविल्या जायच्या, त्या तर खासच आवडायच्या. नाव अर्थातच विसरून गेलोय.

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 10:58 pm | सतिश गावडे

अजून एक फताड्या रूंद पानांची भाजी यायची त्याची अळूच्या पानांसारख्या वड्या बनविल्या जायच्या, त्या तर खासच आवडायच्या. नाव अर्थातच विसरून गेलोय.

ही "तेरी"ची भाजी. पानांचा आकार अळूच्या पानांसारखाच मात्र प्रमाणाने बरीच मोठी. फताडी. रंग अळूपेक्षा फिकट हिरवा आणि चवीला जाणवण्याईतपत तुरट. पावसाळ्यात कोकणात खेडेगावांमध्ये मुबलक उपलब्ध असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2015 - 1:45 am | डॉ सुहास म्हात्रे

तेरी नाही. तेरी जवळ जवळ सगळ्याच गावांत बर्‍याच पाणथळ ठिकाणी आढळते. मी म्हणतो त्या वनस्पतींच्या पानांची जरी अळूसारखी वडी बनवत असले तरी ही पाने बरीच जाड असतात आणि रानावनातच, तीही पावसाळ्यातच, सापडतात. त्यामुळे ती नेहमी ठाकूर-कातकरी यांच्याकडून विकत घेताना पाहिले आहे. त्यांच्या तळलेल्या वड्यांची चव मात्र भन्नाट असते.

सतिश गावडे's picture

4 Jul 2015 - 10:46 am | सतिश गावडे

आमच्याकडे मी "वड्यांची पाने" म्हणून प्रकार पाहिला आहे. याचा वेल असतो. पाने साधारण आपल्या पंजाच्या आकाराची असतात. मुगाचे पीठ किंवा बेसनचा थर पानावर पसरून त्याची गुंडाळी केली जाते. आणि मग वाफेवर शिजवून त्यानंतर तेलात परतली जाते.

अर्थात तुम्ही म्हणत आहात ती पाने वेगळी असतील कदाचित.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2015 - 12:33 am | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक तीच ही पाने असावीत. आकाराने अळूच्या पाणांपेक्षा लहान पण जास्त जाड असतात. त्यांच्या अळूच्या वडीसारख्याच वड्या करतात.

राही's picture

14 Jul 2015 - 5:52 pm | राही

मायाळू तर नव्हे? पण ही पाने अळूच्या पानांपेक्षा मोठी नसतात.

बाप रे, मला या भाज्या माहिती पण नाहीत. एका खजिन्याला मुकल्यासारखं वाटतंय. सुरंगी ताई तुझ्या लेखन कौशल्याला दाद ! काय छान खुलवली आहेस भाजी :)

नूतन सावंत's picture

4 Jul 2015 - 9:00 am | नूतन सावंत

मुवि, उगा काहीतरीच,त्रिवेणी,खरेसाहेब;पुढच्या वेळी केली की तुम्हाला व्यनि करेन.

आदूबाळ,तुम्ही म्हणता ते अगदी खरंय.

अतृप्त,सूड,स्वॅप्स,स्वाती दिनेश,अजया,यशो,इशा१२३,सानिका,सृजा, धन्यवाद.

सोंडयाजी,

चुलीवर टांगलेल्या उतनावर* पसरवून वाळवतात.
वाळलेली भाजी वर्षभर चांगली राहाते व सुकट, बटाट्यात, डाळीत छान लागते फक्त जरा स्मोकी फ्लेवर

तुमच्याकडील म्हणजे कुठली?मीपण पुढच्यावेळी जास्त भाजी आणून ओव्हनमध्ये वाळवून पाहीन.उतन म्हणजे ओव्हनचा भारतीय अवतार.
रच्याकने वाळवलेली भाजी विकत मिळू शकेल का?म्हणजे मूवि,उगा काहीतरीच,त्रिवेणी वगैरेंची सोय होईल.*विंक*

सगा,सूड म्हणतात त्याप्रमाणे आम्हीही या भाजीला फोडशीच म्हणतो.पावसाळी भाज्या मलाही फार आवडतात.जागुताईचा पावसाळी भाज्यांचा धागा प्रसिद्द आहेच.सूड यांनी वर उल्लेखिलेल्या शिवाय नाली,कुटू,,कोरळ या भाज्याही मी शोधून शोधून आणते आणि करतेसुद्धा.तुम्ही सांगितल्य्प्रमाणे टाकळ्याची भाजी करून पाहीन.

डॉ.म्हात्रे,अनवट हेच विशेषण या भाजीला योग्य आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2015 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार

खरच अनवट पाककृती.
अशी काही भाजी असते हेच माहीत नव्हते.
पुण्यात कुठे मिळू शकेल?

पैजारबुवा,

मितान's picture

4 Jul 2015 - 10:42 am | मितान

नवीनच भाजी !
शोधते आता आमच्याइथल्या मंडईत..

कविता१९७८'s picture

6 Jul 2015 - 8:53 pm | कविता१९७८

नवीन??

मी लहानपणापासुन पाहत आले , येताना मिळाली तर घेउन येईन तुझ्यासाठी

शेवळं मंडईत नाय सापडायची. कोकणात, नाय तर गेला बाजार मुंबईत तरी जायला हवं. ;)

सोंड्या's picture

4 Jul 2015 - 1:21 pm | सोंड्या

आमच्याकडील म्हणजे मुरबाड-शहापूर परिसरात. शेवळं वाळवून फार थोडी (quantity) होतात त्यामुळे विकत भेटण्याची शक्यता कमी आहे (उतनावर वाळवलेले मळ्याचे मासे भेटतात :) ). इथे कुणी ओळखीचे, आप्त असतील तर 1-2 भाजीपुरतं भेटुन जातील.

पैसा's picture

6 Jul 2015 - 7:58 pm | पैसा

खूप छान लिहिलंय!

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2015 - 8:04 pm | टवाळ कार्टा

कोणाचातरी/कस्लातरी खिमा केल्याशिवाय कै करतच नै का तुम्ही :D

आज एक वेगळीच भाजी बघायला मिळली. धन्स, एका नविन भाजीची ओळख करुन दिल्या बद्दल. :)
आता मी ही भाजी कुठे शोधु?

कविता१९७८'s picture

6 Jul 2015 - 8:54 pm | कविता१९७८

तु कुठे राहतेस?? पुण्यात??

स्वाती२'s picture

6 Jul 2015 - 8:24 pm | स्वाती२

शेवळाची भाजी फार आवडते पण त्याही पेक्षा तुमची लिहायची पद्धत आवडली. भाजीवालीला भाजी-भाकरी देवून तिचाही आत्मा तृप्त केलात हे खासच!

उमा @ मिपा's picture

7 Jul 2015 - 5:53 pm | उमा @ मिपा

क्या बात है!
भाजीची चव फर्मासच असणार. तुम्ही लिहिलंय अगदी खासम खास.

पद्मावति's picture

7 Jul 2015 - 5:54 pm | पद्मावति

भाजी तर छान दिसतेच आहे पण रेसिपी सांगण्याची स्टाइल एकदम मस्तं.

मयुरा गुप्ते's picture

8 Jul 2015 - 12:23 am | मयुरा गुप्ते

शेवळाची खीमा घातलेली भाजी... शेवळाची कणी घालुन केलेलि भाजी.. शेवळाच्या वड्या... शेवळाची सुका बाजार घालुन केलेली भाजी... ओहोहो.. आजी खुप मस्त करायची. आईचीही सुरेख होते.
काही काही पदार्थांची चव अखंड रेंगाळते नं त्यातलीच हि एक भाजी.
बहुत खुब. खुमासदार लिहिलं आहेस.

-मयुरा.

पिलीयन रायडर's picture

8 Jul 2015 - 5:59 pm | पिलीयन रायडर

इथे चर्चा झालेल्या भाज्यांपकी एकही मला माहित नाही. कसल्या लिमिटेड गोष्टी खाते राव मी..छे...

आता जरा शोधाशोध केली पाहिजे..

लेख एकदम फक्कड!!!

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:24 pm | दिपक.कुवेत

वर उल्लखलेल्या भाज्यांपैकि 'टाकळा' फक्त एकून माहिती आहे....भाजी करुन खाणं तर दुरचं. पावसाळ्यात येणार्‍या भाज्यांपैकि मला फक्त "भारंग" भाजी माहित आहे आणि ती मला अजीबात आवडत नाहि. बाकी पाकृ सांगण्याची पद्धत एकदम क्लास.

शेवळं, केनी, कुर्डू, फोडशी, भारंगी, कोरळा, बांबूचे कोंब, लुच्ची, अळू, सुरणाचं फूल, सुरणाचा अगदी कोवळा पाला, घोळू, चवळीचे कोवळे तुरे (बोखे), लाल भोपळ्याचे कोंब, लाल भोपळ्याच्या कळ्या, अळू, तेरं, मोहरी, शेवग्याची पानं, शेवग्याची फुलं, अगस्त्याची फुलं, माचोळ, खापर्‍या, हरभर्‍याचा पाला, करडई, चंदन बटवा वगैरे वगैरे. जोडीला लाल माठ, राजगिरा, चवळई, चाकवत, आंबाडी, वगैरे.

राही's picture

14 Jul 2015 - 5:48 pm | राही

लेख आवडला आणि आठवणीसुद्धा.
मुंबईत अजूनही शेवळं खूप ठिकाणी मिळतात. गिरगाव, भायखळे, परळ, दादरला तर हमखास आणि होलसेल, माटुंगा रोडवर विश्वेश्वराच्या देवळाअलीकडे, पारले पूर्व, अंधेरी पश्चिम, गोरेगाव पूर्व-पश्चिम, बोरिवली पश्चिम, दहिसर, विरार, मुळुंद, ठाणे(चिक्कार आणि स्वस्त.) पण अगदी थोडे दिवस मिळते. दुसर्‍या पावसात ही भाजी कुजते. पाने कुजतात, कंद तसेच जमिनीत राहातात आणि पुढच्या वर्षी पहिल्या पावसात उगवतात.
जाता जाता. : शेवळं निवडल्यानंतर चिरण्याआधी धुवून घ्यावी. अलीकडे फुड प्रोसेसरवर चिरता येते. (अळू आणि केळफूलसुद्धा.) चिरलेली भाजी तेलावर चांगली परतून घेतली की खवखव निघून जाते. भाजी अगदी आवळून/आळून येते. ही आवळलेली भाजी डीप फ्रिजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात दोन तीन महिने टिकते.

गामा पैलवान's picture

3 Oct 2015 - 12:26 am | गामा पैलवान

राही,

तेलावर परतायची नसेल तर काकडं घालावी लागतात. काकडांच्या रसामुळे खाज निघून जाते. शेवळांच्या जुडीसोबत काकडंही विकायला ठेवलेली असतात. पण काकडं न घालता केलेली शेवळांची भाजी पहिल्यांदाच ऐकली.

आ.न.,
-गा.पै.