ना गंवाओ नावक ए नीमकश..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 3:11 pm

फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच.

त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं. मी आज फक्त शब्दार्थ देतोय आणि मैफिलीतल्या मित्रांना त्यातून काही सापडतंय का ते सांगायचा अर्ज करतोय.

ना गंवाओ नावक ए नीमकश दिल ए रेजा रेजा गंवा दिया
जो बचे है संग समेट लो तन ए दाग दाग लुटा दिया

तो जो माझ्यावर सोडण्यासाठी अर्धवट खेचलेला बाण आहे ना, तो वाया घालवू नका.. पुन्हा भात्यात ठेवा.. कारण माझं हृदय आधीच विदीर्ण झालेलं आहे. आणखी बाणांची आता गरज उरलेली नाही..चिंध्या आधीच उडल्याहेत.

जे दगड हाती उरलेत ना तुमच्या, तेही आता माझ्यावर फेकू नका.. सांभाळून ठेवा.. कारण ठेचलेलं, घाव खाल्लेलं, वळ उमटलेलं , रक्ताच्या डागांनी भरलेलं माझं शरीर आधीच गमावलंय..

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो
वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया

मला जीवन देणारे, माझे हितचिंतक, पोशिंदे यांना ही आनंदाची बातमी द्या आणि त्याचवेळी त्या पूर्ण शत्रूंच्या फळीलासुद्धा हे कळवा..की जिवावर जे ओझं, देणं घेऊन जगत होतो त्याचा हिशोब मी आज पुरा केला..

इथे एकतर कसलीतरी अंतकालीन मोक्षावस्था भासते किंवा कोणासाठीतरी हे बलिदान दिलं.. विशेषतः कोणासाठीतरी झगडताना हे बलिदान दिलं, त्यामुळे माझी त्यांच्या बाबतीतली जबाबदारी किंवा ऋण यातून मी आज मुक्त झालो असा अर्थ असू शकेल. कदाचित काहीतरी "व्यक्त" केल्याने ही शिक्षा झाली, पण त्याला वाचा फोडल्याने ते ओझं उतरलं असंही असेल.

करो कजजबीं पे सर ए कफन मेरे कातिलोंको गुमां न हो
कि गुरुर ए इश्कका बाँकपन पस ए मर्ग हमने भुला दिया

माझा मृतदेह जेव्हा दफनासाठी तयार कराल तेव्हा डोक्यावर कफन तिरकं बांधा..

इथे एक संदर्भ घेतला पाहिजे की, डोक्यावरचं वस्त्र तिरकं बांधणे हे एक काहीसं बंडखोरीचं किंवा खास व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. त्याचे इतरही अर्थ असू शकतील.

तर ..

माझा मृतदेह जेव्हा दफनासाठी तयार कराल तेव्हा डोक्यावर कफन तिरकं बांधा..
नाहीतर मला संपवणार्‍यांना असं वाटायला नको की तो माझा प्रेमाचा गर्व, तोरा मरणानंतर मी लगेच सोडून दिला..

उधर एक हर्फकी कुश्तनी यहां लाख उज्र था गुफ्तनी
जो कहा तो सुनके उडा दिया जो लिखा तो पढके मिटा दिया

इथे "कि" चा अर्थ इक्वल टू असा होतो. त्या बाजूला म्हणजे विरोधी पार्टीकडे एकच शब्द होता तो म्हणजे "मारा".. केवळ एकशब्दी थंड निष्ठुर सजा सुनावली गेली होती. आणि माझ्याकडे लाखो शब्द होते माझ्या समर्थनाचे.. माझ्या वकिलीसाठी लाखो व्हॅलिड कारणं मी देऊ शकत होतो, अन दिलीही..

पण.. जे जे काही मी बोललो ते तुम्ही, म्हणजे शासनकर्त्यांनी, ऐकून उडवून लावलं आणि त्याउपर जे जे मी लेखी दिलं तेही वाचून पुसून टाकलंत.

जो रुके तो कोह ए गिरां थे हम जो चले तो जां से गुजर गये
रह ए यार हमने कदम कदम तुझे यादगार बना दिया

या ओळी जरा गूढ आहेत. मुळात अनेकदा शेवटच्या शेरात शायर आपलं नाव गुंफतो. तसं इथे दिसत नाही.

शब्दार्थाने असं दिसेल की जेव्हा मी थांबलो, तेव्हा पर्वतासारखा स्थिर राहिलो.. सर्वार्थाने निश्चल, आणि (मला वाटतं) निर्विकार, संयमी राहिलो. आणि जेव्हा जायची वेळ झाली तेव्हा जिवानिशी गेलो.

इथे जिवानिशीऐवजी कदाचित जिवाच्याही पलीकडे निघून गेलो..जगण्याच्याही पलीकडे निघून गेलो.. किंवा अमर झालो असाही काहीतरी अर्थ निघू शकेल..

पण शेवटच्या ओळीत मात्र फैझ म्हणतो की अरे दोस्ताच्या रस्त्या, किंवा खुद्द मित्रच असलेल्या रस्त्या..तुझ्यावरचं प्रत्येक पावला पावलाला तुला कायमचं स्मरणीय बनवलं.. जणू हा पूर्ण रस्ताच एक स्मारक बनला.

इथे पुन्हा नेमकं कोणाला उद्देशून कवी बोलतोय हे कळत नाहीये.

या पूर्ण गझलेत मला क्लासिक प्रियकर प्रेयसी असं काही न दिसता प्रस्थापित समाजाविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला आणि एकतर्फी लढ्यात शेवट झालेला बंडखोर दिसतो.

बर्‍याचदा पूर्ण चित्र दिसत नाही आणि अंधुक रेषा घुसमटवत राहतात तसं या गझलेबाबत माझं होतं.

......

ऐका.. मग बोलूच..

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

वा! अजून एक गज्जलांजली.

ही गज़ल थोडी अमूर्त वाटते आहे.

फैझने अनेकदा मातृभूमी ला, देशाला प्रेयसी ची जागा देऊन लिहिलं आहे ('लैला-ए-वतन' असं एका कवितेत लिहिलंय. आणखीही बरेच असे संदर्भ आहेत). तो अर्थ इथे घेतला तर प्रकाश पडतो नाही का? 'रहे-यार' मधील यार म्हणजे 'देश' (असं मला वाटतं).

पुन्हा पुन्हा वाचल्यावर कळणा-यांपैकी एक...
फैझ हे एक स्वतंत्र विश्व आहे..

सुरेख, गवि !

यात खूपच न कळणारे शब्द आहेत. त्यामुळे गविंनी लावलेला अर्थ तसाच आहे का कळणे कठीण.

अजया's picture

16 Jul 2015 - 8:22 am | अजया

जरा कठीण गेली समजायला.परत परत वाचुन अर्थ लावत होते.
गविंच्या या उपक्रमाला मात्र दाद द्यायला हवी, गझलांच्या सागरातले निवडक मोती अर्थासहित पेश करण्याच्या.

अरेच्चा, हा धागा वाचलाच गेला नव्हता.
विविध गझलांवर तुम्ही अजूनही लिहावं.

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 12:01 pm | जॉनविक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2019 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, कधी लिहिलं रे यांनी.
धागा कसं काय सुटला.

दिल की चोटो ने कभी चैन सए रहने न दिया
जब चली सर्द हवा मैने तुझे याद किया.

अजून लिहा सर.

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 2:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वाह गवि, जियो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2019 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो
वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया

मला प्रियकर प्रेयसी असेच दिसले. धन्स.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे