ढेमश्याची भाजी

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
20 Jun 2015 - 2:14 am

सर्वप्रथम पाककृती द्यायला अक्षम्य उशीर झाला, ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

म्हणजे त्याचे असे झाले, की फोटो मी एका मोबाइल मध्ये काढले आणि ऐनवेळी त्या मोबाइलची बॅटरी संपली.सुदैवाने दुसरा मोबाईल होता. त्यात काही फोटो काढले. पहिला मोबाइल मुलाने पळवला आणि त्यातील फोटो त्याच्याकडून डिलीट केल्या गेले.त्यामुळे ढेमसे आणि साहित्य, ह्याचे फोटो नाहीत.

जमल्यास फोटो मिळाले तर बघतो.

ढेमस्याचे फोटो तुम्हाला गूगलबाबा देतीलच, पण खालील लिंक बघीतलीत तरी चालेल.

गूगल इमेज सर्चमधील ढेमसे

तसे आमचे नातेवाईक जगभर पसरलेले आहेत. आजोबांची आणि पणजोबांची पुण्याई.त्यात पण विदर्भात जरा जास्तच.
वर्धा-नागपूर भागात हिवाळ्यात जायला मी नेमीच तयार असायचो पण तिथल्या उन्हाळ्यात जायला मी जरा नाखूषच असायचो.

आई मग मला बरीच आमिषे दाखवायची. आईस्क्रीम (लाकडी पॉट भाड्याने आणून आणि भावंडांनी कष्ट करून बनवलेले), नीरा इ.

तरीपण मी बधत नसे. शेवटी आई म्हणायची. "काका तुझ्यासाठी स्पेशल ढेमश्याची भाजी बनवणार आहेत."

ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडायची.

आमच्याकडे वांगी, कांदे-बटाटे रस्सा, टॉमॅटो सूप, तोंडली, गवार आणि ढेमश्याची भाजी पुरुष मंडळी बनवतात आणि घरातील इतर मंडळी खातात. ह्या भाज्या बनवता आल्याशिवाय आमच्या घराण्यातील पुरुष लग्नाच्या बाजारात उभे रहात नाहीत.(तसा अलिखित नियमच, आमच्या घराण्यात आहे, असे समजलात तरी हरकत नाही.)

नमनाला इतके तेल भरपूर झाले.

१. निसर्ग आणि इतर (अति)आवश्यक गोष्टी.......

ही भाजी उन्हाळ्यातच करायची. जसजसे उन चढत जाते, तसतशी ही भाजी अधिकाधिक चवदार होत जाते.एकवेळ स्वर्गात अमृत नसेल तरी चालेल पण, ह्या भाजीच्या जोडीला, आमरस हा हवाच.

त्यातही नागपूर भागातले असाल तर दशहरी उत्तम. मी वलसाडला रहात असतांना मी आमरसासाठी केशर आंबा वापरत असे.केशर किंवा दशहरी इथे न मिळाल्याने, ह्यावेळी हापूस आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी केली.

ही भाजी बर्‍यापैकी मसालेदार असल्याने, घरात पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा असावा.त्यातूनही माठातले किंवा सुरई मधले थंड पाणी असेल तर फार उत्तम. आमच्या प्रकृतीला फ्रीजचे पाणी झेपत नाही.

एखादा मस्त रविवार असावा. भरपूर नाश्ता झालेला असावा आणि बाजारात केशर किंवा दशहरी मिळायला सुरुवात झालेली असावी.बायकोने कुर्ड्या केलेल्या असाव्यात आणि आज सकाळीच तिने सांडगे वाळत घातलेले असावेत.अशावेळी आपण बाजारात फेर-फटका मारायला जावे आणि ताजी ढेमसे दिसावीत.(ही भाजी अशी अचानक करण्यात जास्त मज्जा आहे.)

आता ढेमसे मिळालीच आहेत, तर जरा १-२ डझन आंबे पण आणावेत. दशहरी आणि केशर रोज ताजे आणावेत.इति आमचे तीर्थरूप.

आपण आणलेली ढेमशी बघून, बायकोने पोळ्यांची कणिक जरा जास्तच मळायला घ्यावी आणि पोळ्या करून, तिने स्वयंपाक घर आपल्या ताब्यात द्यावे.

तर मंडळी आता स्वयंपाकघर आपल्या ताब्यात आलेच आहे आणि बायको पण नाही.अशावेळी शांततेने आपण भाजी करायला घेवू या.

मोबाइल फोन बायकोकडे द्या. अशावेळी माझी बायको, मी स्वयंपाक करत आहे,असे बिनदिक्कत सांगते.(तिची सासू सोडून, इतरांना)

२. साहित्य......

अ) कांदे २ (दर ४ ढेमश्यामागे)
ब) लसूण (एका ढेमश्यामागे १)
क) आले १ ईच (दर ४ ढेमश्यामागे)
ड) तीळ १ चहाचा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)
इ) बडीशोप १ चहाचा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)

टीप ====> बडीशोप भाजून घेणे.

ई) खोब्रे १ मोठा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)
उ) एक इंच दालचिनी (आवळ-जावळ कुटून, (दर ४ ढेमश्यामागे))
ऊ) मिरे ४ (दर ४ ढेमश्यामागे)
ए) लवंगा ४ (दर ४ ढेमश्यामागे)
ऐ) मसाला पावडर ====> ही मी ऐन-वेळी बनवतो.त्याची कृती.

छोले मसाला + मालवणी मसाला + चिकन मसाला + मटण मसाला + संडे गरम मसाला + लवंगी मिरच्यांचे तिखट + लोणचे मसाला.....एकुण अर्धी वाटी (दर ८ ढेमश्यामागे)

ओ) एक वाटी तेल
औ) चवी पुरते मीठ
अं) टोमॅटो (ऐच्छिक....मला आवडतात, म्हणून मी घेतो.)
अ:) खसखस (ही हवीच.त्याशिवाय अ: अ: असे खाणारे म्हणत नाहीत)

चला सगळे साहित्य परत एकदा नजरेखालून घ्या आणि आता आपण कृतीकडे वळू या.

३. कृती.....

सर्व प्रथम ढेमशी चिरून घ्या.

आता कढई तापायला ठेवा.आंच जरा जास्तच ठेवा.

कढई तापली की, आंच कमी करून खालील पदार्थ एकामागोमाग टाका.

टीप : एक पदार्थ टाकून झाला, की मग १०-१५ सेकंद ढवळा आणि मग दुसरा पदार्थ टाका.

थोडक्यात, पदार्थ टाकायचा.१०-१५ सेकंद परतायचे आणि मग दुसरा.आंच कमीच ठेवा.मसाला करपता कामा नये.(बायको लक्ष ठेवून आहे.आयुष्यभर बोलणी ऐकण्यापेक्षा, पदार्थ करपू नये, इकडेच लक्ष असू द्या.)

पदार्थाचा क्रम

१. कांदे
२. लसूण आणि आले
३. मिरे आणि लवंगा
४. खोब्रे
५. दालचिनी
६. बडीशोप
७. तीळ
८. खसखस
९. टोमॅटो

टोंमॅटो थोडे अर्धवट शिजले, की मग गॅस बंद करून कढई खाली उतरवा.

४. आता एका मोठ्या कढईत एक वाटी तेल तापायला ठेवा.आंच कमी.बायको त्यावेळी स्वयंपाकघरात नसेल तर, तेलाचे प्रमाण अजून थोडे वाढवलेत तरी चालेल. (जवळ असेल तर एक-दोन चमचे नक्कीच टाका.ती डोळे वटारून बघेल.तिच्याकडे दुर्लक्ष करा.)

,

५. आता एकीकडे दुसर्‍या कढईतल्या मसाला, मिक्सर मधे घाला आणि त्याची ग्रेव्ही(मराठी शब्द????????) करून घ्या.

,

जर तुम्ही प्रथमच ग्रेव्ही वाली भाजी करत असाल तर, आधी ग्रेव्ही करून मग, ४थ्या पायरीकडे वळा.

६. कढईतले तेल तापले की आंच थोडी मोठी करा आणि ही गेव्ही त्या तेलात टाका आणि परतायला सुरुवात करा.

,

१०-१२ सेकंद परतून झाले की मग आंच कमी करा.

आता छान मस्त खमंग सुवास घरभर पसरत असेल आणि आता ह्याच वेळी बायको आमरस काढायला सुरुवात करेल.

मसाल्याच्या बाजूला तेल सुटायला लागले, की मग चिरलेली ढेमशी टाका.

,

आता २-४ मिनिटे ढेमशी ढवळत रहा.

कढईवर झाकण ठेवा आणि त्या झाकणावर पाणी ठेवा.

टीप : ह्या भाजीत शक्यतो पाणी घालायचे नाही.ढेमश्यात पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते.नुसत्या तेलावर ही भाजी शिजवायची,तरीपण जर मसाला खाली लागत असेल तर, थोडे पाणी घालायला हरकत नाही.पदार्थ करपण्यापेक्षा आणि नंतर परत बायकोची बोलणी खाण्यापेक्षा, पदार्थ पाणचट झाला तरी हरकत नाही.प्रयोग म्हणून, ढेमश्याचा रस्सा केला आहे, असे सांगावे.(आपण नाही का, धागा शतकी व्हावा म्हणून "पुणे" ह्या शब्दाचा वापर करत.तसेच आहे.)

अधुन-मधून परतत रहा.मसाला खाली लागता कामा नये.

ढेमशी शिजली की रंग बदलतात. साधारण शिजलेल्या तोंडली सारखा रंग येतो आणि चमच्याने सहज तुकडा पडतो.आता चवी पुरते मीठ घालून परत एकदा, २-३ मिनिटे, भाजी नीट परतून घ्यावी.

हे असे झाले की, ढेमश्याची भाजी झाली, हे ओळखावे आणि पुढील तयारी करावी.

७. तयारी (ही हवीच)

ही भाजी आज आपण आपल्या बायकोला खायला घालत आहोत.त्यामुळे ही भाजी खायचा पहिला अधिकार तिचा.

एका बाऊल मध्ये ही भाजी घ्या. दुसर्‍या बाऊल मध्ये आमरस घ्या.(आमरसात तूप आणि थोडी मिरपूड घाला.)

एका ताटात हे २ बाऊल अधिक चटणी/कोशिंबीर घ्या.

एका हातात ताट आणि दुसर्‍या हातात माठातले पाणी भरलेला ग्लास घेवून, हा नजराणी बायकोला पेश करा.

ती एक घास खाते आणि टच्चकन तिच्या डोळ्यातून एक-दोन थेंब पाणी ओघळते.

आपण तिचे अश्रू पाहून, पाण्याचा ग्लास तिच्या ओठी लावावा आणि म्हणावे,"पुढच्या वेळी भाजीत जरा तिखटाचे प्रमाण कमीच करीन."

ती हसून म्हणते," नाही हो. भाजी मस्तच झाली आहे.डोळ्यात जरा कचरा गेला होता."

तिचे आपल्यावरील प्रेम आपल्याला समजते आणि आपण परत एका सुखी दिवसाचे धनी होतो.

प्रतिक्रिया

रातराणी's picture

20 Jun 2015 - 2:23 am | रातराणी

आधी फोटो पाहिले. तुमच्या उत्साहाला आणि लेखन शैलीला _/\_ :)

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2015 - 2:39 am | श्रीरंग_जोशी

किमान एक वर्षापासून रेवतीतैंनी तुमच्यामागे या पाकृसाठी धोशा लावला होता. अखेर तो दिवस (भारतात रात्र) उगवलाच.

सुरुवात तर एकदम हळवं करून गेली. नागपूरला महालमध्ये माझे आजोळ आहे. आजोबांचा दुधाचा व्यवसाय होता. घरच्याच दुधाचे लाकडी पॉटमधले आइसक्रीम उन्हाळात एकदा खायला मिळायचे :-) . तसेच दशहरी आंब्यांचा रस, हाय हाय हाय :-) .

ढेमशांची रस्सा भाजी प्रथमच पाहिली. आमच्याकडे बटाट्यांची परतून केलेली भाजी असते तशीच ढेमशांचीही केली जाते. बादवे ग्रेव्हीसाठी मराठी शब्द रस्सा चालून जावा.

तपशीलवार कृती, फोटो आवडले. शेवट तर यकदम रोमँटिक हो.

या पाकृसाठी अहं लेखासाठी दंडवत.

बादवे एक वर्षापूर्वीच अमरावतीला ढेमशांची भाजी खाल्ली असल्याने फारसा हळहळलो नाही :-) .

अखेर तो दिवस (भारतात रात्र) उगवलाच.
हा हा.
नक्कीच! मुविंनी कृती जागून लिहिलीये........म्हणजे रात्री जागलेत व शब्दालाही जागलेत. ;)
या पदार्थाबरोबर आमरसाची जोडी असल्याची माहिती नवीन समजली.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2015 - 2:55 am | प्रभाकर पेठकर

ढेमसे म्हणजे गुजराथीत 'टिंडा' म्हणतात ते का?

भाजी नक्कीच करून पाहिली जाईल. भाजीत तेल आणि बायकोला मस्का जरा जास्तच वाटतो आहे. पण, निदान, भाजीचा प्रयोग करून पाहिनच.

आमच्या बाबांच्या आगामी आणि अद्याप अप्रकाशित "सुखी संसाराची गुरुकिल्ली - एक का अनेक" ह्या १७ खंडांचा अभ्यास सुरु आहे.

त्यातल्या १५व्या खंडातील, अध्याय २२वा मध्ये "बायकोला मस्का मारल्याशिवाय, तर्रीवाली भाजी मिळत नाही." असे एक वाक्य आहे.

आमचे बाबा त्रिकालाबाधित सत्य बोलत असल्याने, आम्ही पण हा प्रयोग करून बघीतला.सध्या थोडे-फार यश मिळत आहे.

नाखु's picture

20 Jun 2015 - 8:52 am | नाखु

पा कृ अफाट आजतागायत ही भाजी खाल्ली नाही. मंडईत ढेमासे पाहिएलेत.
ता क: ग्रंथाचे काही खंड वाचावयास मिळाले तर (परतीच्या बोलीवर) नाहीतरी चिमण आणि दातरू साठी एक प्रवचनाचा कारेक्रम ठेवायचा आहेच.

भाजीची प्रतीक्षा करणारा
नाखुस

पुढच्या आकुर्डी फेरीत आणतो.

जमल्यास आमच्या डोंबोलीला अलात तर फार उत्तम.

बाबांची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो.

मधुरा देशपांडे's picture

20 Jun 2015 - 3:12 am | मधुरा देशपांडे

काय लिहिलंय झक्कास. दशहरी, केशर आणि ढेमशाची भाजी..सगळेच वर्षानुवर्षांच्या आठवणीत घेऊन जाणारे.
अत्यंत आवडती भाजी आहे ही. आम्ही घरी पण वर रंगाभाऊंनी दिलंय तशी करतो किंवा मग भरली ढेमशी, भरल्या वांग्यांचा मसाला करतो साधारण त्याच पद्धतीने. ही पद्धत नवीन कळली. पुढची जी भारतवारी उन्हाळ्यात होईल, तेव्हा आंब्याबरोबरच ढेमशाची भाजी अग्रस्थानी असेल यादीत. मागच्या तीन वर्षात खाल्ली नाहीये. भ्यांSSSS
वेगळ्या पाकृसाठी आणि नोस्टॅलजिक करणार्‍या लेखनासाठी धन्यवाद!!

खरंच सलाम! फारच भारी लेखनशैली आणि इतक्या रात्री जागून एवढं छान, कंटाळा न करता लिहायचं म्हणजे कमाल आहे!

ढेमसं भारतात कधीच खाल्लं नाही. इथे मिळालं तर नकीच करुन पाहीन. पण एक वाटी तेल पचनी पडणं अवघड आहे :)

रेवती's picture

20 Jun 2015 - 5:32 am | रेवती

पाकृबद्दल धन्यवाद मुवि! तुम्ही माफी मागू नका हो. अशाने मी कबूल करून न दिलेल्या पाकृबद्दल तर गवि आणि सूड मला साष्टांग नमस्कारच करायला लावतील.
तुमची पाकृ सांगण्याची पद्धत आवडली. साहित्य पाहून तर नवशिक्यांचीही चूक होणार नाही. तुम्ही ऐनवेळी जो मसाला करून घालता हे व्हेरिएशन असावे असे धरून चालतीये कारण माझ्याकडे मिरचीपूड, छोले मसाला वगळता बाकीचे मसाले नाहीत. मग मूळ मसाल्याला जमेस धरून वाटण (ग्रेव्ही) करीन. आमच्याकडे हळूहळू टिंडे येऊ लागतील. भाजी केली की फोटू देईनच.पुन्हा धन्यवाद.
(ही वाखू साठवतिये).

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 7:35 am | मुक्त विहारि

ते ऐच्छिक ह्या सदरात मोडतात.

साधा गरम मसाला आणि रश्श्यासाठी वापरलेला मसाला, असला तरी चालतो.

रेवती's picture

20 Jun 2015 - 4:27 pm | रेवती

ओक्के.

जुइ's picture

20 Jun 2015 - 6:04 am | जुइ

आली एकदाची ढेमशांच्या भाजीची पाकृ. ही भाजी कधीच खाली नाहीये. इथे मिळाले तर करुन बघीन. मसाले एवढे नाहीयत.त्यामुळे जे आहेत ते घालुन करुन पाहीन.

रेवाककाला तुम्ही ज्या क्षणी/मिनीटी/ताशी/दिवशी/महीनी/वर्षी वचन दिलात तेंव्हाच मी फ्रोझन सेक्शन मधुन हे ढेमशे/टींडा आणुन ठेवलेत. आजवर ते फ्रीज मध्ये पडुन या दिवसाची वाट पहात होते. आता मी त्यांना मोक्षाला पाठवेन.
धन्यवाद!!
आता लेख आणि पाककृती....हाय हाय मुवी!! भारतवर्षात असही एक घराण असावं जेथे स्वयंपाकघरात झारा चालवल्याशिवाय लग्नाची संमत्ती मिळत नसावी?
अन तो पदार्थ प्रथम पत्नीला चाखण्यास मिळावा? ऐकावं ते नवलच!!

उगा काहितरीच's picture

20 Jun 2015 - 8:42 am | उगा काहितरीच

जब्राट लेखन! आमच्याकडे याला दिलपसंद असे फँसी नाव आहे .

कंजूस's picture

20 Jun 2015 - 8:52 am | कंजूस

कलाकार सलाम!!!

विवेकपटाईत's picture

20 Jun 2015 - 9:35 am | विवेकपटाईत

ही माझी अत्यंत आवडीची भाजी. सर्वात चांगली गोष्ट केवळ हिरवीमिरची, गोडामसाला, धने पावडर किंवा नुसती कोथिंबीर आणि भरपूर तेल (शेंगदाण्याचे) असले तरी मस्त भाजी बनते. दिल्लीत दशहरी सहज उपलब्ध असल्यामुळे हा! हा! तोंडाला पाणी येत आहे. आज घराजवळ शनी बाजार लागणार आहे. उद्या नक्कीच ही भाजी करेल.

तुमच्या दिल्लीतच ही भाजी पहिल्यांदा खाल्ली होती. जेंव्हा बाजारात लाल भोपळा, टिंडा आणि भिंडी एवढेच मिळायच्या दिवसात!

पैसा's picture

20 Jun 2015 - 9:49 am | पैसा

किती छान लिहिलंय! झक्कास. असं काही वाचण्यासाठी एक वर्ष वाट बघायची तर विशेष काही नाही!

स्पा's picture

20 Jun 2015 - 10:26 am | स्पा

कधि येऊ जेवायला काका?

अफाट लिहिलय

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 10:36 am | मुक्त विहारि

कट्टा करायला आम्ही नेहमीच तयार असतो.

प्रचेतस's picture

20 Jun 2015 - 10:36 am | प्रचेतस

लै भारी लिहिलंय.

नूतन सावंत's picture

20 Jun 2015 - 10:47 am | नूतन सावंत

वा!मूवि वा!क्या बात है.मजा येऊन राह्यला ना राव.

भाजीपेक्षा पाकृ-लेखन खमंग !

पद्मावति's picture

20 Jun 2015 - 11:43 am | पद्मावति

आहा.. ढेमश्याचि भाजी......
अप्रतिम......तुमची रेसेपी तर सही आहेच पण लिहीण्याची पद्धत त्याहूनही छान आहे. ढ़ेमशयाची भाजी, आमरस, कुरडया वाह, वाह......शेवटच्या काही ओळि तर A-क्लास!!

के.पी.'s picture

20 Jun 2015 - 2:08 pm | के.पी.

हा .... हे ढेमसे म्हणजे वेलवांगं बहुतेक.
कधी मिळालं तर करुन बघेन म्हणते. वाखु साठवतेय :)
बाकी पाकृ+लेखन मस्तच!!

चिगो's picture

20 Jun 2015 - 3:56 pm | चिगो

मस्त पाकृ.. लेखनशैलीपण झकास.. माझ्या माहितीत ह्या भाजीत हरभर्‍याची भिजवलेली डाळपण घालून केल्या जाते.

अवांतरः विदर्भाकडे केल्या जाणार्‍या, किंबहुना महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या कुठल्याही पारंपारीक पाकृच्या भाजीत भरपुर तेल घातल्या जाते. कदाचित त्याकाळातल्या काबाडकष्टाच्या जीवनात जास्त तेल-तूप खाल्ले गेले तरी पचवल्या जायचे. ढेमश्याची, आलू-वाग्यांची, कोहळ्याची, पोपटीचे दाणे-वांग्याची ह्या सगळ्या भाज्या ज्यांच्या चवीची लहानपणेची आठवण आहे, त्या आता खायची हिंमत होत नाही आणि कमी तेलात केलेल्या भाजीची चव मनातल्या चवीशी जुळत नाही. नागपुरी सावजी मटणासारखीच, विणकर घरांतली 'डाळ-कांदा' म्हणून हरभर्‍याची ओली डाळ आणि भरपुर कांदा घालून केलेली एक भाजी असते. तेल बघूनच घाम येतो..

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2015 - 4:48 pm | स्वाती दिनेश

ढेमशाची भाजी, तिचे तुमच्या घराण्यातले ऐतिहासिक महत्त्व, (घरी आणि मिपावर )सादर करण्याची पध्दत सगळेच आवडले.
स्वाती

प्यारे१'s picture

20 Jun 2015 - 7:00 pm | प्यारे१

पाकृ मस्त.

नुकत्याच आपल्या ठरलेल्या डील नुसार (मला आठवत आहे तुमचं काय ते बघा ;) ) 'नेश्ट टैम' मी 'माल' आणला की परतीबरोबर तुम्ही ढेमसे खिलवा!

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 8:46 pm | मुक्त विहारि

एप्रिल-मे मध्ये आलात तर नक्कीच....

आणि ते पण आमरसा-सकट....

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2015 - 9:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

ढेमश्याची भाजी अजून खाल्ली नाही. मिपावर त्या भा़जीची रामायणाइतकीच लांबलचक चर्चा आणि आरोपप्रत्यारोपांचे महाभारत पाहत्/वाचत असताना उत्सुकता ताणली गेली होती. आता मुविंनी शब्द पाळल्यामुळे, ती भाजी या सगळ्याला न्याय देणारी असावी अशी खात्री वाटते... फायनल मत भाजी खल्ल्यावरच (ती सुद्धा, आमरसाबरोबरच) दिले जाईल ;) :)

मुविंनी आपल्या लेखनशैलीने आणि फोटोंनी मिपाकरांचे मन जेवढे जिंकले, तेवढेच (किंवा कांकणभर जास्तच) स्वतःच्या गृहमंत्र्यांचे ! ;)

असंका's picture

20 Jun 2015 - 10:07 pm | असंका

गेल्या आठवड्यातच मातोश्रींच्या मागे लागून ढेमशी करायला लावली होती. इथे इतकी डीमांड आहे माहित असतं तर फोटो तरी नक्कीच काढून ठेवले असते. .. ह्म्म!!

एस's picture

20 Jun 2015 - 10:19 pm | एस

बायकोला खुश करायची ही धमाल पाककृती एकदा आवर्जून करण्यात येईल.

मित्रहो's picture

20 Jun 2015 - 11:34 pm | मित्रहो

पाककृती आणि लिहीण्याची पद्धत आवडली. मजा आली.
नागपूर वर्ध्याला बऱ्याचदा लग्नात सुद्धा ढेमशाची भाजी असते. ती बहुदा भरलेल्या ढेमशाची असते.
आमच्याकडे ही भाजी पुरुषांनीच करायची असले काही नियम नसल्याने आम्ही आजवर ही कशी करतात यावर फार विचार केलेला नाही. घरी बायकोला ढेमशाची भाजी फार आवडते त्यामुळे चिरलेले ढेमशाची किंवा भरलेल्या ढेमशाची मसाला कमी जास्त करुन भाजी होतच असते. फक्त दरवेळेला आमरस असेलच असे नाही.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

21 Jun 2015 - 9:46 am | मनोज श्रीनिवास जोशी

सुरेख पाककृती आणि तितकेच सुरेख वर्णन. शेवट तर फारच तरल आणि भावनोत्कट ! रविवार सत्कारणी !!

सुहास झेले's picture

21 Jun 2015 - 10:31 am | सुहास झेले

मस्तच... आमच्या घरी ढेमसे आवडीने केले जातात.. :)

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 11:30 am | टवाळ कार्टा

मी अजून कधी खाली नाहिये पण लिहिण्याची स्टैल भारी :)

सांरा's picture

21 Jun 2015 - 8:50 pm | सांरा

मस्त ढेमशाच्या भाजीच्या जेवणानंतर ताणून देतांना ही पाकृ वाचणारा मी पहिलाच असेन. काय योगायोग आहे !!! पाकृ नवीन आहे. आई नाहीतर ताईच्या मागे लागावे लागेल...

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2015 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

येतोच आता तुमच्याकडे... तसाही अधिकमास सुरु आहेच.
तेंव्हा, अधिकस्य अधिकम् ढेमसंफलम् ;)

सानिकास्वप्निल's picture

22 Jun 2015 - 1:27 pm | सानिकास्वप्निल

ढेमसे कधी खाल्ले नाही पण पाककृती व वर्णन आवडले :)

जरा आधी मिपा उघडून बघायला हवं होतं, शन्वारी पुरणपोळीऐवजी ढेमसे आमरस असा बेत केला असता मग!!

झकासराव's picture

22 Jun 2015 - 4:25 pm | झकासराव

ही पण कला आहे का अंगात. :)

भारी आहे.
पहिल्यान्दाच ढेमसे म्हणजे काय ह्याचे आकलन झाले.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jul 2015 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

Dhemse-Bhaji-web

ढेमसे भाजी आणि आमरस.... आज आत्मा तृप्त झाला. धन्यवाद मुवि.

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:06 pm | दिपक.कुवेत

पाकॄ वाचूनच तोंडला पाणी सुटले आणि त्यात काकांनी फोटो टाकून तर अजूनच जळवले....