वैनी ……… १

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 6:04 pm

.
गावकरणीची पाणंद आता ओळखू येत नाही . दोन्ही बाजूच्या कडवीच्या झुडुपांची गच्च कमान जाऊन तिथं चिरेबंदी भिंत झाली . चिंचेचं झाड आणि मैदानाच्या जागी श्री रामेश्वर कॉम्प्लेक्स उभं राहिलं . पाणंदीच नावही बदललं .आता तिला श्री रामेश्वर गल्ली म्हणतात. गावाचं शहर होताना झालेल्या असंख्य बदलातील हा एक . . जुन्या घरांच्या बिल्डिंगी झाल्या . गावातील सागरगोटे, सावरी , बकुल , रायवळ, चिंच अशी निरुपयोगी झाडं तोडून तिथं नारळ, आंबा आणि काजूची खणखणीत पैसा देणारी झाडं आली . जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या . घरोघरी कोर्ट केसेस चालू झाल्या . वकिलांच्या धंद्याला तेजी आली . गावातल्या मोकळ्या जागा झपाट्याने कमी झाल्या . ज्या काही चुकून उरल्या त्यासुद्धा काटेरी कुंपणात बंदिस्त झाल्या . ह्याच्या त्याच्या परड्यातून जाणारे शॉर्टकट्स संपले आणि घरं , माणसं दुरावली.
तीस वर्षं !! त्या जुन्या प्रसंगानंतर आजतागायत या वाटेला गेलो नव्हतो .पण आज सुटका नव्हती. आई मागेच लागली होती ,"सरूला जाउन महिना झाला . गावकारीण गेली तेव्हा तू इथं नव्हतासच . अनायासे आता आलायस तर निदान वैनीला भेटून जा . बरं दिसत नाही अस" . वैनीला न भेटण्याचं आईला पटेल असं कारण माझ्याकडं नव्हत. मी नाईलाजानं पाणंदीत शिरलो .
गावकारीण आमची शेजारीण ! बाजूचं गिरणीवाल्याचं घर सोडून पलीकडे रहायची . बाजूच्या नाट्यगृहात नाटकं असली की नाटकवाल्यांची रात्रीच्या जेवणाची सोय करणं हा तिचा मुख्य उद्योग . याशिवाय ती चार घरी धुण्या भांड्याच काम करी. पण ते आपलं वरखर्चासाठी. तिची एक वाईट खोड होती . कुणाचं लक्ष नसलं तर पडलेला नारळ , पेरू आंबा हळूच ओच्यात घालून घरी न्यायला ती घाबरत नसे . ही सवय सर्वांना माहित होती . शेजारच्या गिरणी वाल्याची बायको मधून मधून तिची झडती घेई . तेव्हा ओच्यात एखादा नारळ , किंवा डाळिंब काही बाही सापडे . मग मोठमोठ्यानं भांडणाचा आवाज ऐकू येई . दोन दिवस गावकारीण कामावर येत नसे . पण परत तिसऱ्या दिवशी ती भांडी घासताना दिसे . आमची कामवाली सुट्टीवर गेली की गावकारीण बदली कामाला येत असे. ती आली की आई हळूच डोळ्यांनी आम्हाला खूण करायची. मग आम्हा भावंडांपैकी कुणातरी एकाची रखवालीची ड्यूटी लागे . ती जाईपर्यंत तिच्या आसपास आम्ही घुटमळत राहू . तिच्याही ते लक्षात येई. मग ती म्हणायची , "तुमच्या घरी काय चोरुची नाय मी . जावा तुम्ही हयसून, बिंदास्त रवा. " ते ऐकल की आमचीच चोरी पकडली गेल्यासारखं काहीसं वाटे . पण आम्ही तिथंच थांबून रहायचो. कारण तिथून बाजूला गेलो की आई रागावणार हे माहित असायचं . आई म्हणायची , "(चोरी)केल्यावर बोलणं बरं दिसत नाही म्हणून आधी करूच देऊ नये". आई तिला स्वताहून आंबे , नारळ जांभ देत असे पण तेच कुणी न सांगता उचलून नेलेलं आईला आवडत नसे . अर्थात तिने आमच्या घरी कधी काही चोरले नाही हेही खरे!. ती नेऊन नेऊन काय तर आंबे नारळ न्यायची. बरं , तिच्याकडं ते नव्हतं असही नाही कारण कोकणातल्या प्रत्येकाकडं ही झाडं असतातच . आता वाटतं चोऱ्या करणं ही तिला परिस्थितीनं लावलेली सवय होती. हे सगळं आठवून वाईट वाटतं .
गावकारणीचा नवरा लवकर गेला . त्याच्या मागून खंबीरपणं तिनं संसार हाकला . तिला तीन मुलं . मोठी सरू, मागची लीला आणि धाकटा बळवंत .सरू वडिलांसारखी काळी बुटकी होती, तिचं तोंड जन्मापासून वाकडं होतं . चालताना ती बदकासारखी चाले. खूपच विचित्र दिसे . तिचं लग्न काही होत नव्हतं. पहिली दुसरीत तिनं शाळा सोडली आणि आईबरोबर धुण्या भांड्याची कामं धरली. मधली लीला दिसायला बरी होती . चौथीत चार वर्षे काढल्यावर तिनंही शाळा सोडली . दिवसभर ती नट्टापट्टा करण्यात बिझी असे . बघावं तेव्हा आरशासमोर असते म्हणून गावकारीण तिला सतत रागवत असे . लीला नाटकवाल्यांच्या स्वयंपाकाला मदत करी . प्रसिध्द नट नट्या, त्यांची लफडी , कोण किती प्यालं . कोण ओकलं , कोणाकोणाचं वाजलं या गोष्टी तिच्यामुळे अख्ख्या गावाला माहिती होत. बळवंत अत्यंत नाजूक मुलगा . पोरीसारखा दिसायचा , पोरीसारखंच चालायचा, माना वळवून बोलायचा . तो मुलगा की मुलगी याबद्दलही आम्हाला शंका होती . मुलं त्याला चेष्ठेनं बळवंतराव चिडवायची . बळवंतरावला सुद्धा शाळा झेपली नाही. शाळा सोडल्यावर त्यानं गावातल्या एका बेकरीत जी नोकरी पकडली ती आजपर्यंत.
गावकरणीच्या परड्यात अंजिराचं झाड होतं आणि समोर मोठ्ठ मैदान . त्याच्या कडेला चिंचेचे झाड . आम्ही संध्याकाळी तिथं चिंचा पडायला, काजी खेळायला जायचो . मैदानात संध्याकाळी व्हॉलीबॉलचा खेळ रंगे . गावातले सगळे टगे तिथे खेळायला येत. काही ना काही निमित्त करून ( आईच्या भाषेत फुकट गेलेल्या) तरुण मुली त्यांना बघायला तिथं येत असत. मग खेळणाऱ्याना अजूनच जोर येई . कुणा कुणा मुलीला कुणा मुलाच्या नावाने चिडवण्याचा खेळ चाले . लाईन, आयटम वगैरे शब्द आम्ही तिथं शिकलो. सरू संध्याकाळी बरेचदा तिथे खेळ बघायला येई . आम्ही तिला चिडवायचो, ' सरू तुझे सर कधी येतले?" त्या चिडवण्याला काहीच अर्थ नव्हता. ते प्रथम कुणी सुरु केले तेही आठवत नाही . पण सरू ते ऐकून खुश होई आणि आम्हाला तिच्या घरचे अंजीर देई. तिच्याशी बाकी कुणी मुली मुले बोलत नसत . ती एकटीच इथं तिथं करी आणि काळोख पडला की घरी निघून जाई.
एक दिवस सकाळी त्यांच्या घरातून बोंबाबोंब ऐकू आली. गिरणवालीकडून कळलं की नाटकाच्या जेवणाचे कॉन्ट्राक्ट आणणाऱ्या सुरेशबरोबर लीला पळून गेली होती. काही वेळात ही.. गर्दी जमली . "मुलगा माहितीतला आहे, लग्नाचा खर्च वाचला " अशी गावकरणीची समजूत घालून आजूबाजूच्या लोकांनी तिला शांत केलं . दोन दिवसांनी हिरवी साडी , गळ्यात मंगळसूत्र , हातात हिरव्या लाल काकणांचा चुडा भरलेली लीला सुरेशबरोबर आम्हाला पाणंदीतुन जाताना दिसली. आम्हा पोरांना जणू जग जिंकून सिकंदर परत आलाय असंच त्यांचं कौतुक वाटलं, विस्फारल्या डोळ्यांनी आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सुरेश तर अगदी अमिताभचा अवतारच! आधीच कडका , त्यात ती बेल बॉटम प्यांट गोगल , केसांची झुल्फं ! काय तो रुबाब ! आम्ही सगळ्यांनी तेव्हा ठरवलं , लग्न करायचं तर अस्स ! डेरिंगबाज ! थोड्या वेळात गावकारणीचं घर माणसांनी फुलून गेलं. दोन दिवसापूर्वी बोंबाबोंब करणाऱ्या गावकारणीनं आज मात्र शांतपणं मुलीला ओवाळलं. जावयबापू म्हणून सुरेशचं स्वागत केलं. काहीच तमाशा घडत नाही हे बघून जमलेले बघे थोड्या वेळानं निराशेनं परत गेले .
लग्न लीलाचं झालं पण बदलली मात्र सरू . दुसऱ्या दिवशी आम्ही तिला नेहमीप्रमाणं चिडवलं आणि सरू असली भडकली म्हणून सांगू . आम्ही घाबरलो . हे काही नवीनच घडत होतं. त्यानंतर ती रोजच सर्वांशी उगाच भांडण उकरून काढू लागली. इथेच का बसला , ही मुलं माझ्याकडं वाईट नजरेनं बघतात वगैरे वगैरे. आम्हाला अंजीर मिळणं बंद झालं. आम्ही एकमेकांना म्हणू लागलो , सरू पिसाळली .
बळवंतराव क्वचितच मैदानावर येई. आला तरी कधी खेळत नसे , त्याला कोणी खेळायला घेतही नसे. पण एक दिवस बळवंतराव लाजत लाजत मैदानावरच्या सगळ्यांना साखर वाटू लागला . आणि त्याचं लग्न ठरल्याचं आम्हाला कळलं .झालं ,सगळ्या टग्यांना चिडवायला एक नवीन विषय मिळाला . बळवंतराव अगदीच साधा. त्याला हे चिडवणं देखील समजलं नाही . तो ज्याला त्याला उत्तरं देत राहिला आणि मुलांना हसायला नवी नवी कारणं देत राहिला .
दुसऱ्या दिवशी गावकारीण लग्नाचं आमंत्रण द्यायला आमच्या घरी आली . तिच्याकडून कळलं , मुलगी त्यांच्या लांबच्या नात्यातली होती. जिथं रस्ता नाही , वीज नाही अशा अगदी आतल्या खेड्यात तिचं घर होतं . वडील नव्हते. परिस्थिती गरीब , अंगावर घालायला धड कपडे नाहीत ,कधी घर आणि खेड्याबाहेरचं जग न पाहिलेली मुलगी. त्यात जाड , काळी. दाताच्या फळ्या . त्यामुळे तिच लग्न होत नव्हतं . आणि बळवंतरावला तरी कोण मुलगी देणार होतं ? पगार जेमतेम , अंगात कसली धमक नाही. त्यामुळे " वेताळाक नाय बाइल आणि भावकाईक नाय घो" अशी परिस्थिती . मुलीवाले लग्न लाऊन द्यायला तयार झाले आणि लग्न ठरलं .
लग्नाच्या दिवशी सक्काळपासून लाऊडस्पीकरवर गाणी सुरु झाली . उठी उठी गोपाळा पासून बाळा जो जो रे पर्यंत आणि लेक लाडकी या घराची पासून सून सायबा सून पासून सगळी गाणी घासून झाली आणि बळवंतरावचं लग्न दणक्यात पार पडलं . दुसऱ्या दिवशी पूजा होती. त्या दिवशी सरूला मी ओळखलेच नाही. सरू पहिल्यांदाच साडी नेसली होती. तिच्याकडे आज चहा करण्याचं, सगळ्यांना शीरा देण्याचं काम होते . ती आमच्याशी मुळीच बोलली नाही. वैनी नव्या साडीत, अबोलीच्या गजऱ्यात, खणा नारळाच्या ओट्यात झाकली गेली होती . तिच्या डोळ्यात इतका उत्साह आणि आनंद होता की त्यावेळी ती मला खूप सुंदर दिसली . वैनीची आणि माझी ती पहिली भेट.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

21 May 2015 - 6:12 pm | जेपी

छान जमलय..
पुभाप्र..

रेवती's picture

21 May 2015 - 6:53 pm | रेवती

कथा आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

21 May 2015 - 6:58 pm | जयंत कुलकर्णी

कथा लिहिण्यासाठीची स्टाईल आपल्याकडे आहे..... जरुर लिहीत रहा.....

चुकलामाकला's picture

22 May 2015 - 9:37 am | चुकलामाकला

धन्यवाद काका, पण चुकांच्या संदर्भात आपले मार्गदर्शन आवडेल!

पैसा's picture

21 May 2015 - 8:25 pm | पैसा

खूप छान लिहिलंय. पुढचा भाग लवकर लिहा. माझ्या अगदी ओळखीच्या वातावरणातली कथा आहे ही!

कथा छान आकार घेतेय.पुभाप्र.

पाणंद शब्दानेच आजोळची याद झाली! सुरेख लिहिलं आहे, आवडलं.

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 9:55 pm | सानिकास्वप्निल

मस्तं लिहिले आहे
कथा आवडली.

दमामि's picture

21 May 2015 - 10:04 pm | दमामि

वैनी १ , वैनी...२ किती वैन्या आहेत हो तुम्हाला?

अद्द्या's picture

21 May 2015 - 10:05 pm | अद्द्या

सुरुवात छान जम्लिए

येउन्दे पुढचा भाग

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 10:16 pm | सतिश गावडे

छान सुरुवात झाली आहे.

या कथेच्या निमित्ताने आमच्या आत्मुदादाच्या वयजूवैनीची आठवण झाली.

रामपुरी's picture

21 May 2015 - 10:57 pm | रामपुरी

पु भा प्र

इशा१२३'s picture

21 May 2015 - 11:07 pm | इशा१२३

आवडली कथा!पु.भा.प्र.

बॅटमॅन's picture

21 May 2015 - 11:35 pm | बॅटमॅन

मस्तच!!!!

स्रुजा's picture

22 May 2015 - 12:08 am | स्रुजा

वाह ! छन लिहिलंय खुप. लवकर येऊ द्या पुढचा भाग

स्रुजा's picture

22 May 2015 - 12:09 am | स्रुजा

"छान" असं वाचा.

स्पंदना's picture

22 May 2015 - 6:47 am | स्पंदना

छानच सुरवात.

चुकलामाकला's picture

22 May 2015 - 8:29 am | चुकलामाकला

आवर्जून वाचल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!

चित्रगुप्त's picture

22 May 2015 - 8:36 am | चित्रगुप्त

सुंदरच. पुढील भाग लवकर यावा.

सस्नेह's picture

22 May 2015 - 8:52 am | सस्नेह

वळणे घेत रमतगमत जाणारी कथा.

पाटील हो's picture

22 May 2015 - 11:11 am | पाटील हो

खूप छान.

अनुप ढेरे's picture

22 May 2015 - 11:25 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय! आवडलं!

नाखु's picture

22 May 2015 - 11:47 am | नाखु

दमदार सुरुवात.
स्वगतः असं नेमकं कधी लिहिता येईल आपल्यला !

उमा @ मिपा's picture

22 May 2015 - 4:07 pm | उमा @ मिपा

अगदी ओळखीचं वातावरण, तुम्ही वर्णन इतकं चपखल केलंय, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं वाचताना, एकेक माणसं सुद्धा दिसू लागली. कथेचा वेगही अगदी योग्य राखलाय. आवडली कथा, पुढचा भाग लवकर लिहा प्लीज.

आदूबाळ's picture

22 May 2015 - 4:30 pm | आदूबाळ

चुकलामाकला भाऊ - एक नंबर जमलंय की हो! पुढचा भाग कधी टाकताय? सारखी भुणभूण करत राहीन.

कपिलमुनी's picture

22 May 2015 - 4:44 pm | कपिलमुनी

फक्कड जमलीये ओ कथा !

छान सुरुवात! फारच सुंदर वातावरणनिर्मिती केली आहे.. आता पुढचा भाग वाचते.

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 10:29 am | नूतन सावंत

सुरेख जमलीये कथा.

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 10:29 am | नूतन सावंत

सुरेख जमलीये कथा.