गृहिणी......आदरांजली-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2015 - 9:58 am

आदरांजली-२

इस्मत चुगताई : (१९११-१९९१)
त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या.

त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे. मला वाटते अजूनही स्त्रीकडे बघण्याचा पुरुषाचा दृष्टीकोन फारसा बदललेला नसावा.

असो. त्यांच्या एका आगळ्या कथेचा हा मराठी अनुवाद त्यांच्या स्मृतीस अर्पण.

गृहिणी :
नवीन मोलकरीण मिर्झाच्या घरी आली आणि साऱ्या मोहल्ल्यामधे खळबळ उडाली. सफाई कामगार जो मोठ्या मुष्किलीने एखादा झाडू मारुन पळ काढत असे तो जमीन झिजेपर्यंत झाडू मारु लागला. गवळी जो बरणीत पाण्याचा थेंब बघून कटकट करीत असे तो रतीब घालून लगेच फुटू लागला.

बहुधा कोणीतरी नवस फेडण्यासाठी तिचे नाव लाजो ठेवले असावे कारण शरम आणि लाज यांच्याशी तिचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. काय माहीत कोणाच्या पोटी जन्मली? रस्त्यावर तुम्ही आम्ही टाकलेल्या तुकड्यावर पोसत लहानाची मोठी झाली. जेव्हा वयात आली तेव्हा तिची अवस्था ‘एक तूही धनवान है गोरी बाकी सब कंगाल’’ अशी झाली. लवकरच मोहल्ल्यावर ओवाळून टाकलेल्या मवाल्यांच्या संगतीत तिला जवानीची रहस्ये उलगडली. एखाद्या मोकाट उधळणाऱ्या घोडीप्रमाणे ती उधळली.

मोजून मापून देण्याघेण्याची तिच्याकडे पद्धतच नव्हती. भरभरुन सूख द्यायचे, भरभरुन सूख घ्यायचे. मोबदला मिळाला तर घ्यायचा नाहीतर दानधर्म !

‘‘लाजो तुला काही लाजलज्जा, अब्रू, शरम वाटते की नाही !?’’ आम्ही तिला विचारत असू.

‘‘वाटते ना !’’ ती निर्लज्जपणे लाजत मुरकत उत्तर देत असे.

‘‘एक दिवस आंबट खाणार तू.’’ आम्ही हसत हसत तिला टोमणे मारत असू. पण लाजोला याची पर्वा होती कुठे ? ती तर आंबटगोड दोन्हीही तेवढ्याच ताकदीने पचवे.

पण लाजो दिसण्यास एकदम निरागस, काजळाविनाच काळेभोर डोळे, सरळ छोटे पांढरे शूभ्र दात, गोरापान रंग आणि चाले तर अशा नजाकतीने की बघणाऱ्यांची वाचा बसे पण त्यांचे डोळे बोलू लागत.

मिर्झा अविवाहीत होते. रोट्या थापून थापून ते वैतागले होते. त्यांची एक छोटीशी किराणाची टपरी होती ज्याला ते ‘जनरल स्टोअर’ म्हणत. त्या दुकानामुळे त्यांना लग्न करण्यासाठी वेळ मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे होते. कधी धंद्यात इतकी मंदी येई की ते दुकान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असे. कधी कधी इतकी गर्दी असे की त्यांना मान वर करण्यासही वेळ मिळत नसे तर मुंडावळ्या बांधण्याचा प्रश्नच नव्हता.

मिर्झाचा एक मित्र होता बक्षी. त्याला लाजो एका बस स्टॉपवर सापडली. त्याच्या बायकोला नववा लागला होता व घरी मोलकरीण हवीच होती. तो तिला घरी घेऊन आला. त्याची बायको बाळंत झाल्यावर त्याने तिला घराबाहेर काढली. अर्थात लाजोला याची सवय होती. आत्तापर्यंत तिची सगळी घरे अशाच प्रकारे मारहाण होऊन सुटली होती. पण बक्षीला लाजोची सवय झाली होती. त्याला तिची कींव आली. आता त्याला परदेशी नोकरी मिळाल्यामुळे त्याने विचार केला,

‘हिला मिर्झाकडे सोडले तर? नाहीतरी मिर्झा कोठीवर पैसे फेकतो, या मोफत मिळणाऱ्या मालाचीही चव घेतील.’

‘‘ला हौल विलाकुवत !’’ मिर्झा गरजले.

"मी असल्या बाईला घरात ठेऊन घेऊ म्हणतोस? क्या पागल हो गया क्या ? मिर्झा करवदले.

‘‘अरे मियाँ ऽऽऽ विचार तरी कर. घरातले सगळे काम करेल’ बक्षीने समजावले.

‘नाही रे बाबा ! नसती बला माझ्या गळ्यात बांधू नकोस ! एवढेच असेल तर तुझ्याबरोबर का नाही घेऊन जात? मिर्झाने विचारले.

‘‘माझ्या एकट्याचे तिकीट आले आहे. सगळ्या मोहल्ल्याचे नाही’’ बक्षीने वैतागून ऊत्तर दिले.

हे बोलणे चालले असतानाच लाजोने मात्र मिर्झाच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. आपला परकर लंगोटासारखा कसून, हातात बांबूच्या टोकाला बांधलेला झाडू घेऊन ती घरभर साफसफाई करत फिरत होती. जेव्हा बक्षीने तिला मिर्झाच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. तिने बक्षीलाच पातेली मांडणीवर रचायला सांगितले व स्वत: पाणी भरण्यास नळावर गेली.

‘तुला पाहिजे असेल तर घरी सोडू का ?’ बक्षीने मधेच तिला अडवून विचारले.

‘चल बाजूऽऽऽऽ हट ! तू काय माझा नवराऽऽऽ आहेस का मला माहेरी सोडायलाऽऽऽऽ ? तू तुझा रस्ता पकड. मी इकडे काय करायचे ते बघून घेईन !’ लाजोने उलट उत्तर दिले. बक्षीने ते ऐकताच शिव्यांची बरसात केली, ‘एवढी आखडतीये कशासाठी हरामजादी?’ लाजोने त्यापेक्षाही भयंकर शिव्यांची लाखोली सुरु केल्यावर बक्षीसारख्या लफंग्यालाही घाम फुटला. बक्षीने पळ काढल्यावर, घाबरगुंडी उडालेल्या मिर्झानेही मशिदीत पळ काढला. मशिदीत घाम पुसत मिर्झा विचार करु लागला, ‘फुकटचा खर्च वाढणार, शिवाय चोऱ्या करेल ते वेगळेच ! नसती बला !! पण जेव्हा मिर्झा नमाज पढून संध्याकाळी घरी आले तेव्हा मात्र त्यांचे पाय थबकले. जणूकाही त्यांची अम्मीच वरुन खाली आली होती. पाण्याचा माठ, त्यावरील भांडे एवढेच काय सगळे घरच चमकत होते.....

‘‘मियाँ खाना लावू काऽऽऽ ? लाजोने बारागावचे पाणी प्यायले होते.

‘जेवण ?’

‘‘तयार आहे. गरम गरम रोट्या वाढते. तुम्ही बसाऽऽऽ !’’ उत्तराची वाट न बघता ती स्वयंपाकघरात चालती झाली. आलूपालकची भाजी, तडका दिलेली डाळ शेवटची अम्मीजीच्या हातची खाल्ली होती. त्याची आठवण येऊन मिर्क्षाने आवंढा गिळला.

‘‘पैसे कुठून आणलेस ?’ मिर्क्षाने विचारले.

‘‘बनियाच्या दुकानातून सामान उधार आणलेऽऽऽऽ’’ लाजो

‘‘माझे आई मी तुझ्या परतीचे भाडेही देतो. तू जा !’’

‘‘जाऊऽऽऽऽ ?!’’

‘‘हो ! हा धंदा मला परवडणार नाही.’’

‘‘कोऽऽऽऽण मागतय पगार ?’’

‘‘मिर्च्या जास्त तर पडल्या नाहीत नाऽऽऽ?’’ लाजोने गरमागरम फुलका मिर्झाजींच्या ताटात वाढताना विचारले.

मिर्झाला वाटले, सांगावे, ‘मिरच्याच मिरच्या झाल्यात.’ पण लाजो धडाधड फुलक्यावर फुलके वाढत सुटली होती जणू काही आत कोणीतरी फुलके शेकायलाच बसले आहे.

‘हं ऽऽऽऽऽऽ ठीक आहे. चला उद्या सकाळी बघता येईल’ असा विचार करुन मिर्झाजी त्यांच्या खोलीत गेले. आयुष्यात प्रथमच घरात ते व एक बाई झोपत होती. काय माहीत त्यांच्या मनात कसल्या विचारांचा कल्लोळ उठला होता. दमले होते, झोपले.
सकाळी उठल्यावर मिर्झाने प्रथम लाजोला तयार होण्यास सांगितले.

‘नाही मिया, मीऽऽ तर जाणार नाही.’ लाजोने निक्षून सांगितले.

‘‘माझ्या हातचे जेवण आवडले नाही का? झाडूपोछा नीट केला नाही का ?’

‘‘नाही नाही तसं काही नाही !’
‘मग काऽऽऽऽय चूक झाली?’’ लाजो चिडून म्हणाली.

खरे तर लाजोचा जीव खुळावला होता.
तिचे पाहताच क्षणी प्रेम बसले होते.
मिर्झावर नाही मिर्झाच्या घरावर !
‘मालकिण नसल्यावर घर आपलेच झाले ना ? घर पुरुषाचे असते थोडेच ? तो तर पाहुणा असतो’ लाजोने मनाची समजूत घातली. ‘तो मेला बक्षी नालायक होता. माझी व्यवस्था त्याने एका गोठ्यात केली होती. ती म्हैस तर केव्हाच मेली होती पण तिचा दर्प लाजोच्या नसानसात घर करुन बसला होता. शिवाय त्या बक्षीचे मेल्याचे रंगढंग सांभाळावे लागत ते वेगळेच !’

इथे ती घरची राणी होती. तिने पाहताच क्षणी मिर्झा एक साधा सरळ माणूस आहे हे जोखले होते. आणि मिर्झा खरोखरच पाहुण्यासारखे वागायचे. घरी यायचे, समोर लाजो जे ठेवेल ते चुपचाप खायचे. जेवढे लागतील तेवढे पैसे द्यायचे. एकदोन वेळा हिशेब मागितला पण मग त्यांचा विश्र्वास बसला, की ‘लबाड नाही.’ ते सकाळी जात व संध्याकाळी परत येत. लाजो दिवसभर घरकाम करे, अंगणात नळाखाली अंघोळ करे व मनात आलेच तर शेजारी रामुच्या आजीकडे जाऊन बसत असे. रामू मिर्झाच्या दुकानात पडेल ते काम करीत असे. तोंडभर फोड असलेला १३/१४ वर्षाचा रामू लाजोवर लगचेच लट्टू झाला. त्यानेच लाजोला मिर्झा कोठीवर कंजरीकडे जातात ही बातमी दिली. ती ऐकल्यावर मात्र लाजोवर वीज कोसळली. ‘फुकटचा खर्च ! या कंजरी डाकिणी असतात, डाकिणी ! मग मी कशासाठी आहे ?’ ती स्वत:शीच पुटपुटली.

आजवर ज्या ज्या घरात ती राहिली होती, त्या सर्व मालकांना तिने सर्वस्व भरभरुन देऊन खुष ठेवले होते. इथे येऊन तिला एक आठवडा झाला पण मिर्झाने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. ते तिच्या जिव्हारी जखम करत होते. स्त्री-पुरुष संबंधाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन फारच व्यापक होता. या संबंधातून निर्माण होणारे प्रेम तिच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंदाचा अनुभव होता.

वयात आल्यावर तिचे या प्रेमावर प्रेम जडले होते म्हणाना.

ना आई ना आजी. काय चांगले नि काय वाईट हे लाजोला कोण समजावणार ? या बाबतीत लाजो आणि शेजारच्या मांजरीत काही फरक नव्हता. ती मांजर आसपासच्या सगळ्या बोक्यांच्या उपकारांना आपला हक्क मानत होती. तसे लाजोला इकडून तिकडून बोक्यांचे आवाज ऐकू येत होते, पण ती नाही गेली. ती आता मिर्झाची नोकर होती. गेली असती तर लोक मिर्झावर हसले असते, म्हणून नाही गेली. इकडे मिर्झाची बर्फाची लादी झाली होती पण आतून ज्वालामुखी भडकला होता. ते जाणूनबुजून घरापासून दूर दूर राहू लागले. मिर्झाजींच्या ह्रदयाची अवस्था फारच दोलायमान झाली. मोहल्ल्यात तर त्यांच्या ह्रदयाला घरे पडत. ज्याच्या त्याच्या ओठांवर लाजोचेच नाव होते. कोणी म्हणे तिने आज गवळ्याचे गाल बोचकारले तर कोणी सांगे पानवाल्याच्या थोबाडावर शेण फेकून मारले. रस्त्यात लाजोला शाळामास्तर भेटले तर ते रस्त्यातच शिकवणी सुरु करीत. तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकून मौलवीही मशिदीबाहेर येत व आयातुल कुर्सीच्या जपाचा बहाणा करीत.

या सगळ्याला वैतागून मिर्झा त्यादिवशी घरी आले. लाजो त्यावेळी न्हाऊन चुलीसमोर बसली होती. ओले केस खांद्यावर मोकळे सोडले होते. तिचे लालबुंद गाल खुलले होते. डोळे धुराने धुंद झाले होते. मिर्झाला असे अवेळी घरी आलेले बघून तिचे नाजूक ओठ विलग झाले..... ते बघून मिर्झा कशालातरी अडखळले व धडपडले.

खाली मान घालून मिर्झाजींनी रोटी खाल्ली व लगेचच मशिदीत जाऊन बसले. पण त्यांना तेथे करमेना. काहीतरी घरी विसरले होते. त्यांना कळेना की आज त्यांना घराची एवढी ओढ का लागली आहे....आजवर असे कधी झाले नव्हते. जेव्हा घरी आले तेव्हा लाजो दरवाजात कोणाशीतरी भांडत होती मिर्झाला पाहताच तो पळून गेला.....

‘कोण होतं?’ मिर्झाने संशयाने दरडाऊन विचारले.

‘रघूऽऽवाऽऽऽऽऽ’

‘रघूऽऽऽऽऽवा?’ मिर्झा एवढी वर्षं दुध घेत होते पण त्यांना त्या गवळ्याचे साधे नावही माहीत नव्हते.

‘होऽऽऽ रघू दुधवाला ! हुक्का ताजा करु मियाँ ?’ लाजोने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

‘नको ! काय म्हणत होता ?’

‘किती दुध आणू ते विचारत होता मेला !’

‘मग तू काय म्हणालीस?’

‘मी म्हटले, मुडदा बसविला तुझा! नेहमी घालतोस तेवढं घाल !

‘मग?’ मिर्झाने विचारले

‘मग काय...मी म्हटले हरामी, तुझ्या अम्मीला रेड्याचे दुध पाज....’

‘उल्लूचा पठ्ठा ! हरामी आहे साला ! बंद कर दुध. मी स्टोअरमधून येताना आणत जाईन’.

त्या दिवशी जेवण झाल्यावर मिर्झाने कडक इस्त्रीचा कुडता व अचकन चढविली. कानामागे अत्तराचा फाया ठेवला व मनगट हुंगत, काठी हातात फिरवत ते बाहेर पडले. ते पाहताना लाजोच्या जिवाला घरे पडली. जळून तिचा कोळसा झाला. तिने नाचाणारीच्या नावाने बोटे मोडत शिव्यांची लाखोली वाहिली.

‘‘मिर्झाला समजत नाहीए का ? पण तसे कसे शक्य आहे ?’’

मिर्झा कोठीवर पोहोचले तेव्हा कंजरी तिच्या पहिल्या गिऱ्हाईकांना निरोप देत होती म्हणून चिडून मिर्झा लालाच्या कोठीवर पोहोचले. तेथे महागाई आणि राजकरणावर जीव ओतून वाद घातल्यावर ते घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते.
पलंगाच्या उशाशी एक सुरई व्यवस्थित ठेवली होती पण मिर्झाच्या ते लक्षात नाही आले. स्वयंपाकघरात एका कट्ट्यावर एक मटका ठेवला होता. मिर्झाने घटाघटा पाणी प्यायले पण तहान अजूनच भडकली. लाजोच्या सुंदर, गोऱ्यापान, मांसल पोटऱ्या आतील दरवाजामागून डोकावत होत्या. तिने कुस बदलल्यावर तिच्या पायातील कडी एकामेकावर आपटून आवाज झाला. तिने झोपेतच तंगड्या आजूनच ताणल्या. मिर्झाने पाण्याचा अजून एक ग्लास रिचवला.

‘ला हौल विला कुवत’ चा नारा लावत मिर्झा पलंगावर लेटले. पण डोळा लागेना. कुस बदलून बदलून अंगाची लाही झाली, पाणी पिऊन पिऊन पोटाची मोट झाली. दरवाजाआडून कडी जरा जास्तच वाजू लागली. एक अनामिक भिती त्यांचा गळा घोटू लागली. ‘उधम माजवणार हरामजादी’ ते मनाशी म्हणाले. पण सैतानाने त्यांना पुढे ढकलण्यास सुरुवात केली होती. पलंगापासून ते त्या मटक्यापर्यंत त्यांनी मैलभर तरी चकरा मारल्या होत्या. आता त्यांना दम धरवेना. त्यांच्या मनात तेवढ्यात एक पापभिरु विचार आला, ‘जर लाजोच्या तंगड्या एवढ्या उघड्या राहिल्या नाहीत तर कदाचित त्यांनाही एवढी तहानही लागणार नाही. विचार जसा त्यांच्या मनात प्रबळ झाला तशी त्यांची हिंम्मत वाढली. ‘‘नामुराद!, उठली तर काय समजेल कोणास ठाऊक.’’ पण बचावासाठी तेवढा धोका पत्करायलाच लागणार होता. मिर्झाने चपला पलंगाखाली सोडल्या व हलक्या पायाने, श्र्वास रोखून ते पुढे झाले. त्यांनी पटकन तिचा घाघरा खाली ओढला. पण पुढच्याच क्षणी त्यांना वाटले की बिचारीला उकडत असेल..... थोड्यावेळ मिर्झा तेथेच बघत थरथर कापत उभे राहिले. मग जड अंत:करणाने मागे फिरले. ते दरवाजाच्या चौकटीपाशी पोहोचले असतील नसतील त्यांच्यावर अस्मानी कोसळली. लाजोने कूस बदलली मिर्झाला जाताना पाहून तिने मिर्झाला आत ओढले. मिर्झाची वाचा बसली. मिर्झावर असले अत्याचार आजवर झाले नव्हते. ते हाय हाय करत हात जोडत राहिले अन् लाजोने त्यांची लाज लुटली........

सकाळी मिर्झा लाजोला इतके लाजत होते जणू काही नववधू. पण लाजोच्या डोळ्यात काल रात्रीची एकही खूण नव्हती. नेहमीप्रमाणे गुणगुणत तीने पराठ्याच्या पिठात तूपाची धार धरली होती व एका हाताने माशा हकलत होती. मिर्झाला वेगळीच काळजी होती. ‘ही मऊ लागले म्हणून खणणार तर नाही ?’

दुपारचे जेवण घेऊन लाजो जेव्हा दुकानात पोहोचली तेव्हा तिच्या चालण्यात एक वेगळाच ठुमका होता. लोक तसेच लाजो आल्यावर वस्तूंचा भाव विचारण्यासाठी दुकानात गर्दी करायचे. आज तर काय.... दुकानात आल्यावर लाजेखातर ते काहीतरी खरेदीही करत. लाजोही पटकन गिऱ्हाईकाला पाहिजे त्या वस्तू बांधून द्यायची. शिवाय सामानासोबत ढीगभर नखरे व हसू मोफत मिळायचे ते वेगळेच. थोड्याच वेळात ती इतकी विक्री करायची जी मिर्झाला संध्याकाळपर्यंत करण्यास जमत नसे.
पण आज मिर्झाला ते खटकत होते.

मिर्झाचा डामडौल आता एखाद्या राजापेक्षाही जास्त होता. मिर्झाजी चांगलेच गुटगुटीत झाले. लोकांना त्याचा हेवा वाटू लागला. पण त्यामागचे कारण माहीत असल्यामुळे लोक त्यांच्यावर जळू लागले. इकडे मिर्झा बेचैन झाले. लाजो मिर्झाची काळजी घेऊ लागली आणि मिर्झा तिचे दिवाने झाले. त्यांची दिवानगी वाढली आणि लोकांच्या नजरेत त्यांना वेगळेच भाव दिसू लागले. लाजो एखाद्याला कसे वेड लाऊ शकते हे त्यांना चांगलेच माहीत होते. त्यांना जगाची भिती वाटू लागली. एक नंबरची निर्लज्ज ! बाजारात येई तेव्हा बाजारात वादळ उठे. कोणाकडे बघून स्मितहास्य कर तर कोणाला ठेंगा दाखव, कोणाला लाडीक शिव्या दे तर कोणाला शिव्यांची लाखोली वहा.... असे नाना नखरे करत महाराणी बाजारात पाऊल टाकत. ते बघून मिर्झाचे रक्त उकळत असे. ते म्हणत,

‘ तू जेवण घेऊन दुकानात येऊ नकोस.’

‘का बरंऽऽऽऽऽ’ लाजो पडलेल्या चेहऱ्याने विचारे.

घरी बसून कंटाळे. त्यापेक्षा दुकानात बरे होते. तिचा वेळ मजेत जायचा.
पण जर कधी ती दुपारचे जेवण घेऊन दुकानात नाही आली तर मात्र मिर्झाच्या मनात संशयाचे काहूर उठे......‘काय गुण उधळत असेल अल्ला जाने’ ते विचार करीत. जास्तच झाल्यावर मिर्झा वेळी अवेळी संशयाचे निरसन करण्यासाठी घरी येत. मिर्झा घरी आल्यावर त्यांची थकावट दूर करण्यासाठी लाजो लगेचच त्यांना बिलगे. त्यावर ‘अशा निर्लज्ज बाईचा संशय नाही येणार तर काय होणार? असे वाटून मिर्झा अधिकच संशयाने तिच्याकडे पाहत.

एक दिवस अशीच जासूसी करण्यासाठी मिर्झा अचानक घरी आले तर लाजो दरवाजातच रद्दीवाल्याबरोबर खिदळत उभी होती. मिर्झाला पाहिल्यावर त्या रद्दीवाल्याने पळ काढला.
मिर्झाने लाजोला आत ढकलले, तिचा गळा पकडला व दोन कानाखाली ठेऊन दिल्या. एक लाथही घातली.

‘‘काय चालले होते ?’ मिर्झाने दरडावून विचारले. मिर्झाच्या नाकपुड्या रागाने फुलल्या होत्या.

‘हरामजादा शेराला दहा आणे देत होता. मी म्हणाले, आपल्या आईला जाऊन दे हरामजादे !’

रद्दीचा बाजारात आठ आणे चालला होता. ते आठवून मिर्झाने लाजोला अजून एक लाथ घातली. त्याचे कारण मात्र लाजोला कळले नाही.

‘‘तुला कोणी सांगितला होता हा उद्योग ?’’ मिर्झा रागाने फणफणले व बुटाच्या नाड्या सोडू लागले.

पण एका दिवशी मात्र सगळ्याची हद्द झाली. त्यांच्या अब्रूचे पार धिंधवडे निघाले. घरी परत येताना त्यांना लाजो गल्लीतील पोरट्यांबरोबर कबड्डी खेळताना दिसली. खेळताना तिचा घाघरा हवेत फडकत होता. मुले तर निरागसपणे कबड्डी खेळत होती हो, पण त्यांचे बाप ? त्यांचे बाप उडणाऱ्या घाघऱ्याची मजा घेत होते. आळीपाळीने सगळ्यांनी तिला ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण मिर्झासाठी तिने सगळ्यांना ठुकरावून लावले. मिर्झांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. खाली मान घालून त्यांनी तो रस्ता पार केला. जमलेले मिर्झाकडे पाहत फिदीफिदी हसत होते.

‘राग तर बघा ! जणू काही त्यांची लग्नाची बायको आहे !’

लाजो त्यांना अशी चिकटली होती की बस्स !. त्यांचे दुकानात लक्ष लागेना. कोणी जास्त पैसे देऊन तिला ठेऊन घेतले तर ? नामुराद लोभी आहे ! पण तिच्यावाचून राहण्याच्या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला. त्यांची झोप उडाली.

‘मिर्झा मियाँ निकाह का नाही लावत ?’ त्यांची दिवसेंदिवस वाढणारी बेचैनी पाहून मियाँ मिरानने विचारले.

‘ला हौल विलाकुवत ! या उठवळ बाईशी हे पवीत्र नाते कसे जोडू ? मोहल्ल्यात घाघरा उधळत फिरत असते. आता ती त्यांची लग्नाची बाई कशी हो़ऊ शकते ? मिर्झाने विचारले.

पण संध्याकाळी घरी आल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. लाजोचा पत्ता नव्हता. हलकट लाला तर तिच्या मागेच लागला होता. चोरुन लपवून नाही तर तो सगळ्यांच्या समोरच तिला म्हणाला होता, ‘कोठी नाही बंगला देतो लाजो, विचार कर !’. मिरान मियाँ मिर्झाचे दोस्त म्हणवत पण त्यांनीही लाजोला त्यांच्याकडे जाण्यासाठी नजराणा देऊ केला होता म्हणे. मिर्झा चिंताग्रस्त होत विचार करत बसले असतानाच लाजो आली. ती रामूच्या आजीची पाठ चोळण्यासाठी गेली होती. त्याच क्षणी मिर्झाने निर्णय घेतला. ‘खानदानची इज्जत इ. गेले जहन्नूममधे. लाजोशी निकाह लावून तिला घरी आणावेच लागेल.’

‘कशालाऽऽऽऽ मियाँ ?’ लाजोने न समजल्यामुळे विचारले.

‘का ? अजून कुठेतरी गुण उधळायचा विचार आहे वाटते’ मिर्झा चिडून म्हणाले.

"छी छी ! शर्म करो मिर्झा ! मी कशाला कुठे जाऊ ? लाजोने फणकाऱ्याने उत्तर दिले.

‘‘तो रावसाहेब म्हणतोच आहे की बंगला देतो म्हणून’’ मिर्झा.

‘‘छी छी मियाँ, मी थुंकणार सुद्धा नाही त्याच्या बंगल्यावर ..... चप्पल फेकली मी त्याच्या थोबाडवर....’’ लाजो ठसक्यात म्हणाली.

‘‘मग......’ पण लाजोला हे समजत नव्हते की लग्न करण्याची काय आवश्यकता होती. ती तर जन्मोजन्मी त्यांचीच होती आणि राहणार होती. मग अशी काय चूक तिच्या हातून झाली की मिर्झाला अचानक लग्नाची आवश्यकता वाटू लागली? पण असा मालक तर मागच्या जन्माची पुण्याई म्हणूनच मिळतो. लाजोने या आयुष्यात अनेक ठेचा खाल्ल्या होत्या. मिर्झा तिला देवदुतासमान न भासल्यास नवलच. तिचे सगळे आशिक तिचे मालक झाल्यावर तिला बदडून काढायचे व बाहेर फेकायचे. मिर्झाने कधी तिला साधे फुलही फेकून मारले नव्हते. हं एकदा खाल्ला होता मार तिने पण त्यावेळी ते तिचे आशिक होते....मिर्झा तिच्यावर प्रेम करीत. मिर्झाने तिला कपड्याचे दोन जोड घेऊन दिले व सोन्याच्या बांगड्याही दिल्या. तिच्या आख्ख्या घराण्यात (?) कोणी सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या की नाही कोणास ठाऊक.

मिर्झाने हा निर्णय रामूच्या आजीच्या कानावर घातल्यावर तिलाही धक्का बसला.

‘हे मियाँ कशाला हे लोढणे गळ्यात अडकवतोस ? ती नखरे करतीए का ? दोन लाथा घाल चुडेलच्या कमरेत ठीक होईल ! जिथे लाथांनी काम होतेय तेथे लग्नाची काय जरुरी?’

पण मिर्झाचे आपले एकच टुमणे, ‘माझी आहे तर माझ्याशी निकाह व्हायलाच पाहिजे’.

‘‘काय ग भवाने तुला धर्माची ओढ लागली आहे का ?’’ रामूच्या आजीने विचारले...

‘नाही मैय्या..... मी तर त्यांना आपलेच मानते’’ लाजोने लाजत उत्तर दिले.

लाजो होती मोठी प्रेमळ. ती तर तिच्या घटका दोन घटकेच्या गिऱ्हाईकालाही पती मानून त्याची सेवा करायची. तिने त्याबाबतीत कधीही कंजूसी केली नव्हती. तिथे पैशाचा हिशेबच नव्हता. जे दिले ते भरभरुन दिले, जे घेतले तेही भरभरुन. मिर्झाची तर गोष्टच वेगळी. त्यांना देण्यात आणि त्यांच्याकडून हिसकवण्यात लाजोला जो आनंद मिळायचा त्याची तुलना स्वर्गाशीही होणार नाही. बाकी सगळे मिर्झापुढे कुत्रे होते कुत्रे ! तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. निकाह, लग्न, शादी ही कुमारींची होतात आणि जशी समज आली तेव्हापासून ती कुमारी नव्हतीच. ती कोणाची पत्नी होण्यास लायक नाही हे तिने मिर्झाच्या हातापाया पडून, हात जोडून विनविले. ती रडली भेकली पण मिर्झाच्या डोक्यात निकाहचे भूत संचारले होते. शेवटी एका मुहुर्तावर इशाच्या नमाजानंतर निकाह पार पडला. सगळा मोहल्ला अंगात संचारल्याप्रमाणे निकाहमधे सामील झाला. मुली ढोल घेऊन लग्नाची गाणी म्हणत घरोघर फिरल्या. कोणी नवरदेवाकडून तर कोणी नवरीकडून.
अखेरीस मौलवीने औपचारिकता म्हणून विचारल्यावर मिर्झाने हसून होकार भरला व मिर्झा इर्फान बेग व लाजो उर्फ कनिझ फातिमा एकमेकांचे नवराबायको झाले.

प्रथम मिर्झाने काय केले असेल तर तिच्या लेहेंग्यावर बंदी घातली व एक घट्ट बसणारा पजामा व कुडता लाजोला शिवला. कनिझ फातिमाला दोन मांड्यामधे येणाऱ्या कापडाची सवय नव्हती. ‘हे काय नवीन झंजट !’ ती मनात म्हणाली. पहिली संधी साधून तिने ते कपडे काढून खाले फेकले व डोक्यातून लेहेंगा घालणार तेवढ्यात मिर्झा आले. ते आल्यावर दचकून कनीझ फातिमाने तो लेहेंगा सोडून दिला, तो सरळ तिच्या पायाशी पडला. ‘‘ला हौल विलाकुवत’’ मिर्झा ओरडले. घाईघाईने त्यांनी पलंगावरची चादर ओढली आणि लाजोच्या अंगाभोवती गुंडाळली. काय माहीत मिर्झाने कसले लंबेचौडे भाषण ठोकले, पण लाजोला तिची काय चूक झाली हे शेवटपर्यंत कळले नाही. पूर्वी मिर्झा असल्या नाजूक प्रसंगात छातीवर हात ठेवत. तिला बिचारीला काही समजले नाही. आता मात्र मिर्झाने तो लेहेंगा उचलला व खरोखरंच चुलीत फेकला. लाजो तेथेच रडत बसली. चादर दूर करुन तिने आपले शरीर न्याहाळण्यास सुरुवात केली. ‘‘कुठे कोड तर नाही फुटले ?’’ नळाखाली न्हाताना ती सारखी आपले डोळे पुसत होती. नेहमीप्रमाणे सिरवीचा मिठू छतावर पतंग उडविण्याच्या बहाण्याने तिला न्याहाळत होता. पण आज लाजो इतकी खिन्न होती की ना तिने त्याला ठेंगा दाखविला, ना शिव्या दिल्या, ना त्याला दगड मारले, ना त्याला जोड्याने धमकावले. तिने शांतपणे आपली शाल अंगाभोवती गुंडाळली व घरात गेली.

जड अंत:करणाने तिने तंग पजामात कसेबसे पाय घातले. ही कटकट कमी होती की काय म्हणून नाडी आत गेली. ओरडून ओरडून घसा सुकल्यावर बिल्लो आली तेव्हा सुटका झाली. कोणा मुर्खाने हे बंद तयार केले कोणास ठाऊक. सारखे सोडा बांधा.....लाजो मनाशीच करवदली.

मिर्झा संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा लाजोची आत गेलेल्या नाडीशी झटापट चालू होती. ती असहाय्यपणे नाडीचे एक टोक हातात धरुन उभी होती. रडायचीच बाकी होती. ते बघून मिर्झाला तिची कींव आली. त्यांनी तिला कवेत घेतले. बऱ्याच झटापटीनंतर आत गेलेले नाडीचे टोक हातात आले. या प्रसंगानंतर तिची पजाम्याबद्दल एवढी तक्रार राहिली नाही, पण एक नवीन गंभीर प्रश्र्न उद्भवला. लग्नाआधी लाजोचे जे नखरे मिर्झाला घायाळ करत असत तेच आता त्यांना बायकोचा थिल्लरपणा वाटू लागला. ‘हा बाजारु थिल्लरपणा घरंदाज स्त्रीला शोभा देत नाही’ ते लाजोला समजावत.

त्यांच्या स्वप्नातली पत्नी त्यांना मिळाली नाही हे खरे. त्यांनी तिच्या प्रेमाची भीक मागावी, तिने त्यावर लाजावे. तिने लाजून नकार द्यावा मग त्यांनी हट्ट करावा, तिने रुसावे मग त्यांनी तिचा रुसवा काढावा. पण लाजो तर रस्त्यावरचा दगड होती. तिच्यात पलंगावरच्या फुलांचे गुण कुठून असणार? रागावून्, ओरडून मिर्झाने तिला सरळ केली. शेवटी मिर्झाने लाजोची एक गृहकृत्यदक्ष गृहिणी केली तर !

हंऽऽऽएक मात्र झाले. आता त्यांना संशयाने घरी पळण्याची घाई नव्हती. ते दुकान बंद झाल्यावर रमत गमत इतर नवऱ्यांप्रमाणे मित्रांशी गप्पा ठोकून घरी येऊ लागले. उगाच कोणी बायकोचा गुलाम म्हणून नावं ठेवायला नको !. प्रेयसीचे कितीही नखरे पुरुष सहन करु शकतो पण बायकोचे एकदोन उणे शब्द मर्द सहन नाही करु शकत. लाजो घरी एकटी असते म्हणून त्यांनी घरी एक मोलकरीण ठेवण्याचा प्रस्ताव मांडला मात्र, लाजो रागाने पेटलीच. तिच्या डोळ्यात रक्त उतरले. लाजोला मिर्झा इतर नवऱ्यांप्रमाणे आता कंजरीकडे जातो हे माहीत होते पण घरात एक बाई..... कोणी तिच्या चकचकीत भांड्याला हात लावणार, तिच्या स्वयंपाकात लुडबुड करणार ही कल्पनाच तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे होती.

‘तिची तंगडी मोडून तिच्या हातात नाही दिली तर माझे नाव लाजो नाही’ तिने ठणकावले. मिर्झाला दोघीत/तिघीत वाटणे
तिला मान्य होते पण घर...शक्यच नाही तिथे तीच एकटी मालकीण होती. मग मिर्झा लाजोला जणू काही विसरुनच गेले. आठवडा आठवडा ‘हो!’ ‘नाही!’ यापुढे संभाषण जाईना. जोपर्यंत ती बेवारस होती तो पर्यंत ती सर्वांना हवीहवीशी होती. मोहल्ल्यातील सगळे तिच्या मागे मागे करीत. आता तिने एका सभ्य माणसाशी निकाह केल्यामुळे ती आता लाजो राहिली नाही. ती आता मोहल्ल्याची ‘मावशी’ ताई, किंवा बेटी झाली. घराच्या पडद्याआडून तिच्याकडे एखादा कटाक्ष टाकण्याचीही कोणाची हिंमत नव्हती. याला फक्त एकच अपवाद होता तो म्हणजे सिरवीचा मिठ्ठू. तो मात्र लाजोशी प्रामाणिक राहून अजूनही छपरावर पतंग उडवित असे.

मिर्झा सकाळी कामाला गेल्यावर घरातले आवरुन लाजो नळावर आंघोळीला जात असे. नळ तसा आडोशालाच लावला होता. शिवाय बरेच दिवस झाले, लाजोनेही कोठीकडे पाहण्याचे सोडून दिले होते.

त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मिर्झा मित्रांबरोबर मौजमजा करायला गेले. उशीरा परत आले व सकाळी गडबडीत आवरुन दुकानात चालते झाले. लाजोही त्यामुळे गाल फुगवून बसली होती तेवढ्यात तिची नजर छपरावर मिठ्ठूवर पडली. त्याच्या नजरेला जणू भाले फुटले होते. बस्स तिच्या ओल्या अंगात ते घुसले. हरामजाद्याचा बऱ्याच दिवसांनंतर त्यादिवशी पतंग कटला. मांजा तुटला व लाजोच्या पाठीला घासून गेला. लाजोच्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली व तिने तशीच उघड्या अंगाने घरात धाव घेतली. एक वीज चमकली व समोरच्या कोठीवर कोसळली. मग तिच्या लक्षात आले ‘ती नळ तसाच सोडून आली होती’. तशीच मागे पळाली व नळ बंद करुन आली. यानंतर हलवायाच्या दुकानातून काहीतरी मागविण्यासाठी जेव्हा जेव्हा लाजो पडदा बाजूला करे तेव्हा लाजोच्या नजरेस मिठ्ठू पडे. तो आसपासच घुटमळत, ती कधी दिसते याची वाट पाहत बसे. एकदा तिने असाच पडदा बाजूला केला.

‘ऐ मिठ्ठूऽऽऽऽ दिवसभर असाच शेणाच्या पो सारखा बसणार आहेस का इथे?. जा हलवायाकडून दोन कचोऱ्याऽऽऽ आणून दे रेऽऽऽ आणि चटणीत मिरे जरा जास्त घाऽऽऽल म्हणावंऽऽ.’ मिठ्ठूचे काळीज हलले.

लाजोला आता जर आंघोळ करताना मिठ्ठू छपरावर दिसला नाही तर बादलीच्या खडखटाने ती त्याला जागे करायची. आख्ख्या गावावर ज्या प्रेमाची तिने मुक्तहस्ते बरसात केली होती ते सगळे आता मिठ्ठूच्या दिमतीस हजर होते. मिर्झाने एखाद्या वेळेस जेवण घेतले नाही तर ती ते अन्न थोडेच टाकून देत असे ? एखाद्या भुकेलेल्याला ते ती देत असे आणि आता सगळ्यात गरजवंत मिठ्ठूशिवाय कोण भेटणार?

इकडे मिर्झा, लाजोच्या पायात निकाहचे खोडे अडकविले व ती आता आदर्श गृहिणी झाली म्हणून निवांत झाले. एक दिवस मिर्झा दरवाजावर उभे राहिले आणि त्यांनी पहायला नको ते पाहिले. त्यांना बघून लाजोला हसू आले. मिठ्ठू घाबरुन जो पळाला तो तीन गावे पार केल्यावर थांबला. मिर्झाने लाजोला इतके मारले की दुसरी कोणी असती तर ती मेलीच असती. त्याच क्षणी गावात वणव्यासारखी बातमी पसरली की मिर्झाने लाजोला व मिठ्ठूला एकत्र पकडले. लाजोला बेदम मारहाण झाली आहे व मिठ्ठू गायब आहे. मिर्झाच्या तोंडाला काळे फासले गेले. खानदानाचे नाक कापले गेले. लोक तमाशा बघण्यास लगेच जमा झाले. पण जे व्हायचे होते ते होऊन गेल्यामुळे सगळे भलतेच निराश झाले.

‘रामूची आजी घेऊन गेली आहे ! जगेल बहुधा !’ लोक कुजबुजत होते.

तुम्हाला वाटेल एवढे जोडे खाल्ल्यावर लाजो आता मिर्झाचे तोंडही बघणार नाही. पण तोबा ! शुद्धीवर आल्यावर लाजोने प्रथम मिर्झाची चौकशी केली. तिचे आत्तापर्यंतचे मालक काहीच काळात तिचे आशिक होत होते. मग पगाराचा प्रश्न आल्यावर फुकटची मारहाण व हकालपट्टी. मिर्झाने आजपर्यंत तिच्या अंगाला हात लावला नव्हता. तिचे जुने मालक तर तिला इतरांना उधारही देत असत. मिर्झाने मात्र तिला आपले मानले होते. तिच्यावर हक्क सांगितला. जरी तिचा ते हल्ली वापर करीत नसत तरीसुद्धा त्यांचे तिच्यावर किती प्रेम होते. दरवाजावर मिर्झा येरझारा घालत होता. सगळ्यांनी तिला समजावले की जगायचे असेल तर पळून जा पण तिने ऐकले नाही.

‘‘मी तिला ठार मारणार ! ’ मिर्झा गुरगुरत होते. मिरान मियाने त्यांना कसेबसे थोपविले. लाजो जिवंत होती आणि तिने त्यांचे नाक कापले होते. जगाला कसे तोंड दाखविणार होत ते ?

‘मिर्झा असल्या बाईसाठी फासावर जाणार तू ?’

‘पर्वा नाही मला त्याची !’

‘मियाँ तलाक दे हरामजदीला ! ती चांगल्या घरची असती तर वेगळी गोष्ट होती.’

मिर्झाने जागेवरच तिला तलाक दिला. मेहेर म्हणून एकूण बत्तीस रुपये व तिचे कपडेलत्ते रामूच्या घरी पोहोचते केले. लाजोला तलाकची बातमी कळल्यावर तिच्या जिवात जीव आला. सुटकेचा निश्वास सोडला तिने. जणू डोक्यावरचे मोठे ओझे उतरले. तिला निकाह पटलाच नव्हता. त्यामुळेच ही कटकट झाली, ती म्हणाली. ‘चला एक पाप गेले’.

‘मियाँ फार नाराऽऽज तर नाहीत नाऽऽऽऽ ?’ तिने रामूच्या दादीला विचारले.

‘मला तुझे तोंडही बघायचे नाही. जा काळे कर कुठेतरी’ रामूची दादी म्हणाली.

मिर्झाच्या तलाकची बातमी वणव्यासारखी मोहल्ल्यात पसरली. लालाने लगेचच निरोप पाठवला,

‘लाजो बंगला तयार आहे.’

‘त्यात तुझ्या अम्माला नेऊन बसव.’ लाजोने शिव्या दिल्या.

एकूण बत्तीस रुपयातील दहा तिने रामूच्या दादीला खर्चापोटी दिले,व तंग पजामा विकून टाकला. पंधरा दिवसात लाजो परत उभी राहिली. मास झडून कंबख्त अजुनच सुंदर दिसू लागली. जोडे खाऊन जणू तिचे रुप चमकू लागले. जेव्हा कचोरी किंवा पान आणण्यास बाजारात जाई तेव्हा तिच्या ठुमक्याने बाजारगल्लीत परत खळबळ माजू लागली. इकडे मिर्झाच्या ह्रदयावर ओरखडे उठत होते. एक दिवस लाजो पानवाल्याशी वेलचीच्या दाण्यावरुन पंगा घेत होती. तो भांडणाची मजा घेत होता. मिर्झाने तोंड लपवत रस्ता पार केला.

‘मियाँ तू आता तिला तलाक दिला आहेस ना ? मग तुझा तिच्याशी काय संबंध? ’’ मियाँ मिरानने मिर्झाला समजविण्याचा प्रयत्न केला.

‘ती माझी लग्नाची बायको होती ! हे तिचे वागणे मला सहन होत नाही’. मिर्झा चिडले.

‘मग काय झाले ? आता तर नाहीना तुझी बायको? आणि खरं सांगायचे तर ती तुझी कधी नव्हतीच.’

‘मग निकाहचे काय ?’ मिर्झा म्हणाले.

‘कसला निकाह ?

‘निकाह झालाच नाही मिर्झा !’

‘म्हणजे ?’

"असल्या बेवारस आगापिछा नसलेल्या बाईशी निकाह मंजूर नाही ! असला निकाह हराम !’ मिरानने फतवा झोडला.

‘म्हणजे निकाह झालाच नाही !’ मिर्झा खुष होत म्हणाले.

‘मुळीच नाही’ मिरान मियाँने खात्री दिली. नंतर मुल्लाजींनीही याला दुजोरा दिला की हरामी औलादशी निकाह कायदेशीर नाही.

‘म्हणजे निकाह नाही तर आमचे नाकही नाही कापले गेले !’ मिर्झा खुष होत म्हणाले.

‘चला डोक्यावरचे एक मोठे ओझे उतरले !’ मिर्झा म्हणाले.

‘बिलकूल नाही !’ मिरान मियाने खोडा घातला.

‘अरे कमाल आहे ! म्हणजे तलाकही नाही झाला !’

‘मिर्झा निकाह नाही तर तलाक कुठला ?’

"हंऽऽऽऽऽऽ मिर्झाने मोठा नि:श्वास टाकला. ‘म्हणजे मेहेरचे बत्तीस रुपये वायाच गेले म्हणायचे.’ मिर्झाला मोठे दु:ख झाले. मिर्झाचा लाजोशी निकाह झालाच नव्हता ना तलाक झाला.. ही बतमी मोहल्ल्यामधे वेगाने पसरली.
ही आनंदाची बातमी लाजोपर्यंत पोहोचल्यावर लाजोच्या खुषीला पारावार राहिला नाही. डोक्यावरुन ओझे उतरले. तिच्या दृष्टीने निकाह-तलाक एक दु:स्वप्न होते. सगळ्यात जास्त आनंद तिला याचा झाला की मिर्झाचे नाक कापले गेले नाही. तसे झाले असते तर गजहब झाला असता.

‘मी हरामी बेवारस होते म्हणून बरे झाले बाई ! जर माझ्या आईबापाचा पत्ता असता तर तो मेला निकाह वैध ठरला असता.’ ती मनात म्हणाली.

रामूच्या घरात बिचारीची घुसमट होत होती. आजपर्यंत ती कधीच घराची मालकीण झाली नव्हती. तिला घराची काळजी लागली होती. मोलकरीण चोऱ्या करतात म्हणून गेले कित्येक दिवस मिर्झाने घराला झाडूही लावला नव्हता. ‘जळमटाची झुंबरे लटकत असतील’ ती मनात म्हणाली.
मिर्झा स्टोअरला जात असताना लाजोने त्याची वाट अडविली.

‘मियाँ उद्यापासून कामाला येऊऽऽऽऽऽऽ?’

‘ला हौल विलाकुवत !’ असे म्हणून मिर्झा लांब लांब ढांगा टाकत निघून गेले.
मनात विचार आला, ‘ मोलकरीण तर ठेवावीच लागेल ! या हरामजादीला यायचे असेल तर येऊ देत !’
लाजोने काही उद्यापर्यंत वाट पाहिली नाही. मिर्झा घरात नसताना लाजो छतावरुन घरात घुसली. लेहेंगा कसला व कामाला भिडली.

संध्याकाळी जेव्हा मिर्झा दुकानातून घरी आले तेव्हा त्यांना घर बघून असे वाटले की त्यांची आईच स्वर्गातून परत आली आहे. घर साफ, स्वच्छ, उदबत्तीचा घमघमाट, सुरईवरचे चकचकीत भांडे बघून त्यांचा जीव भरुन आला. खाली मान घालून ते चुपचाप मटण व गरमागरम रोटी खात राहिले. लाजो शेजारी बसून काहीच झाले नसल्यासारखे शांतपणे मिर्झाला पंख्याने वारे घालत होती.

रात्री लाजोने स्वयंपाकघरात सतरंजी पसरली. मिर्झाला परत तहान लागली. लाजोच्या पायातील कडी वाजल्यावर मिर्झा तळमळत कूस बदलत होते. त्यांना तिच्यावरच्या अन्यायाची टोचणी लागली होती. अपराधीपणाची भावना त्यांचा मेंदू कुरतडत कुरतडत त्यांच्या ह्रदयाला जाऊन भिडली....

‘ला हौल विलाकुवत’’ ते गरजले.

‘ला हौल विलाकुवत’’ मिर्झा ताडकन उठले व आत जाऊन त्यांनी त्यांच्या गृहकृत्यदक्ष गृहिणीला मिठीत घेतले.

मुळ कथा : इस्मताआपा
वरील मराठी भाषांतर : जयंत कुलकर्णी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2015 - 10:24 am | पिवळा डांबिस

मस्त कथा.
अतिशय आवडली!!!

मृत्युन्जय's picture

12 Mar 2015 - 10:51 am | मृत्युन्जय

कथा प्रचंडच आवडल्य गेली आहे.

नेत्रेश's picture

12 Mar 2015 - 11:02 am | नेत्रेश

अनुवादही मस्त जमला आहे

खंडेराव's picture

12 Mar 2015 - 12:37 pm | खंडेराव

कथाही चांगली आणि अनुवाद जबरदस्त. कुठेही वाटत नाही कि या भाषेतील नाही कथा. खुप कमी वेळेस असे होते.
नैसर्गिक अनुवाद.

धन्यवाद.

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2015 - 1:14 pm | अत्रन्गि पाउस

फारच सुरेख ...

भिंगरी's picture

12 Mar 2015 - 1:17 pm | भिंगरी

अनुवादाला +१ श्रेणी

या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे. मला वाटते अजूनही स्त्रीकडे बघण्याचा पुरुषाचा दृष्टीकोन फारसा बदललेला नसावा.

सहमत.

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2015 - 1:56 pm | पिलीयन रायडर

अत्यंत सुंदर कथा! अतिशयच आवडली..!!

आणि काका.. किती सुंदर अनुवाद करता हो! मानलं तुम्हाला.. कुठेही अनुवाद वाचत आहोत असं वाटलच नाही...

सौंदाळा's picture

12 Mar 2015 - 2:01 pm | सौंदाळा

सुंदर कथा आणि अनुवाद

सस्नेह's picture

12 Mar 2015 - 2:19 pm | सस्नेह

आणि चपखल अनुवाद.
कथेची वळणे इतकी नैसर्गिक आहेत की कित्येक न पटणाऱ्या गोष्टीही खटकल्या नाहीत !

मदनबाण's picture

12 Mar 2015 - 2:40 pm | मदनबाण

जबराट !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracy

इशा१२३'s picture

12 Mar 2015 - 3:09 pm | इशा१२३

सुरेख अनुवाद.

स्वाती२'s picture

12 Mar 2015 - 6:24 pm | स्वाती२

सुरेख अनुवाद! फार आवडली कथा.

नगरीनिरंजन's picture

12 Mar 2015 - 6:48 pm | नगरीनिरंजन

कथा आणि अनुवाद दोन्ही आवडले.

पैसा's picture

12 Mar 2015 - 9:49 pm | पैसा

मूळ कथा आणि तिचा सुरेख भावानुवाद!

रेवती's picture

12 Mar 2015 - 10:34 pm | रेवती

अनुवाद आवडला.

रामपुरी's picture

12 Mar 2015 - 10:37 pm | रामपुरी

सुंदर अनुवाद आणि त्याहून सुंदर कथा

बोका-ए-आझम's picture

13 Mar 2015 - 2:18 am | बोका-ए-आझम

अप्रतिम अनुवाद आणि अप्रतिम कथा!

खटपट्या's picture

13 Mar 2015 - 3:51 am | खटपट्या

निव्वळ अप्रतिम.
का माहीत नाही, पण वाचताना सारखा ओम पुरी नजरेसमोर येत होता. या सारख्या भुमिका त्याला खूप छान जमतात. यावर एक सुंदर चित्रपट किंवा मालिका बनू शकते.

जवळ जवळ तीन वर्षापुर्वी हीच कथा वाचली होती. कुठेतरी मासिकात वाचल्याचे आठवते आहे. नक्की संदर्भ आठवत नाहीत. पण "रोशोमान" जेंव्हा सुरु होती फ्रेम बाय फ्रेम त्याच काळात ही कथा वाचल्याचे आठवते आहे.

जयंत कुलकर्णी's picture

13 Mar 2015 - 8:41 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद ! म्हटल्याप्रमाणे अजून एका कथेचे भाषांतर करायचे राहिले आहे मग ही मालिका बंद करेन.....

सुंदर कथा!!....खुप दिवसांनंतर काहीतरी वेगळे वाचले.

गजानन५९'s picture

13 Mar 2015 - 6:26 pm | गजानन५९

जबरदस्त अनुवाद जयंत काका hats of to you...

आणि अनेक आभार माझ्यासारख्याला अशा प्रतिभावान लेखकांची ओळख करून दिल्याबद्दल

मनीषा's picture

15 Mar 2015 - 12:08 am | मनीषा

अजून एक सरस अनुवाद ..