शेअर गुंतवणुकीला जुगार म्हणणे योग्य आहे का?

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 4:46 pm

माझे बाबा घरूनच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करतात. एके दिवशी बाबांबरोबर मी शेअर ट्रेडिंगचे लाइव ट्रेनिंग घेत असताना बाबांचा मित्र घरी आला, माझ्या डोक्यात टपली मारली व म्हणाला जुगाराचे ट्रेनिंग चाललेय वाटत ? बाबा गालातल्या गालात हसले, त्यांनी आपली खुर्ची स्क्रीनपासून बाजूला घेतली व ट्रेडिंगची सूत्रे माझ्याकडे दिली. मित्राला बसावयास खुर्ची दिली. (बाबांचे हे मित्र विज्ञानाचे पदवीधर होते परंतू गावाकडे वडिलोपार्जित २५-३० एकर शेती होती व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय स्वीकारला आज ते यशस्वी बागायतदार म्हणून ओळखले जातात.) बाबांनी आपला मोर्चा मित्राकडे वळवला. त्यानंतर बाबा व त्यांच्या मित्रामध्ये झालेले संभाषण जेवढे मला कळाले व आठवले ते आपल्यासमोर मांडतो.

बाबा : जुगार म्हणजे काय ?
मित्र : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते.
बाबा : तू कधी जुगार खेळला आहेस ?
मित्र : नाही.
बाबा : शेअर्समध्ये कधी पैसे गुंतविले आहेस ?
मित्र : नाही.
बाबा : मग तू शेअर्सच्या ट्रेडिंगला जुगार कसा म्हणतोस ?
मित्र : बर्‍याच लोकांनी शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे कमावलेत. काहींनी शेअर ट्रेडिंग मध्ये नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे ऐकले आहे.
बाबा : शेतीतही बर्‍याच लोकांनी पैसे कमावलेत व काहींनी शेतीत नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे मीही ऐकले आहे.
मित्र : म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे?
बाबा : शेती व्यवसायात व शेअर ट्रेडिंग मध्ये बरेच साम्य आहे.
मित्र : ते कसे ?
बाबा : १) शेती करायला जशी जमीन आवश्यक असते तसे शेअर ट्रेडिंगसाठी demat account ची आवश्यक असते.

२) चांगले पिक येण्यासाठी शेताची योग्य ती मशागत करावी लागते ,तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळावा ह्यासाठी अगोदर गुंतवणुकीच्या संदर्भात सखोल अभ्यास करावा लागतो.

३) कोणतेही पिक घेण्यापूर्वी त्या पिकाला पोषक असे हवामान बघितले जाते,त्यानंतर योग्य त्या जातीचे बी निवडले जाते. जास्त उतारा देणारे बियाणे थोडे महाग घ्यावे लागते त्याप्रमाणे चांगला परतावा देणार्‍या कंपन्यांचे शेअर थोडे महाग घ्यावे लागतात. चांगल्या कंपन्या निवडणे हे अभ्यासाने व अनुभवाने ठरवता येते.

४) पिकांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निंदनी ,खुरपणी, खत व रोगापासून बचावासाठी किटकनाशक फवारणी वेळोवेळी करावी लागते.
आपल्या portfolio मध्ये एखाद्या कंपनीमुळे गुंतवणुकीचे गणित चुकत असेल तर योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणुकीचा तोल सांभाळण्यासाठी वेळोवेळी portfolio कडे लक्ष द्यावे लागते.

५)शेतमालाचे भाव जसे मागणी व पुरवठा ह्यावर अवलंबून असतात तसेच शेअर्सचे भावही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात.

६) अप्रमाणित बियाणे. खते व कीटकनाशके वापरल्यामुळे जसे शेतीचे नुकसान होऊ शकते त्याप्रमाणे penny stock मध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होऊ शकते.

७) सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊ शकतो तसाच कंपन्यांच्या नफातोट्या वरही होऊन कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावरही होऊ शकतो.

८) जागतिक मंदी,रुपया डॉलरचा विनिमय दर,बँकेच्या कर्जाचा दर,हवामान, नैसर्गिक आपत्ती इ. शेतीवर व शेअरबाजारावर परिणाम होतो.

शेअर ट्रेडिंग व शेतीत महत्वाचे फरक म्हणजे

१) शेतमाल विकाण्यासाठीच दलाली द्यावी लागते.
शेअर्स खरेदी व विक्रीसाठी दलाली द्यावी लागते.

२)शेअर्स खरेदी विक्री भावात पूर्ण पारदर्शकता असते. शेतीमाल विक्रीत ह्याचा पूर्ण अभाव.

३)शेअर्स विक्रीत दलाली व कर वगळून खात्यात पैसे जमा होण्याची खात्री असते. शेतीमाल विक्रीत अशी खात्री नसते.

४) खेळते भांडवल उपलब्ध असल्यास शेअर्स ट्रेडिंग अधिक व्यवहार करता येतात. स्वतःच्या मालकीच्या मर्यादित जमिनीमुळे अधिक लागवड करू शकत नाही.

५)शेअरच्या गुंतवणुकीतून नफा होण्यास काळाची मर्यादा नसते, काही सेकांदापासून ते काही वर्षांपर्यंत असू शकतो. शक्यतो पूर्ण वाढ झाल्याशिवाय पिक बाजारात विकता येत नसल्यामुळे नफा कमावण्याची संधी घेता येत नाही.

६)नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे शेतीमालाचे १००% नुकसान होऊ शकते परंतू संकटाची चाहूल लागल्यास stop लॉस लावून शेअर्स विकून तोटा कमी करता येतो व १००% नुकसान टाळता येते.

मित्रा आता तूच सांग जुगार कोण खेळतोय ते ?

अर्थव्यवहारप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Mar 2015 - 8:13 pm | मदनबाण

एकदम "मार्मिक" लिहलं आहे !
सध्या शेतातली रोपटी अजुन उलटी कशी झाली नाहीत याचा विचार करतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'

गेली काही वर्षे अगदी माफक प्रमाणात शेअर्स मधे खरेदी-विक्री करते आहे. हे तुलनात्मक लिखाण फार आवडले.

सुधीर जी's picture

4 Mar 2015 - 4:04 pm | सुधीर जी

जबरि

काळाच्या ओघात व्यावहारिक शहाणपण सुद्धा बदलले जात असते.

पूर्वी, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.

आता, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हेच खरे.

पाषाणभेद's picture

7 Mar 2015 - 8:26 am | पाषाणभेद

शेती हा जुगारच हाय हे माहीत व्हते हो.

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2015 - 11:23 am | पिवळा डांबिस

गेली एकोणीस वर्षे शेअरबाजारात आहे पण मला ही असं ह्या टाईपचं विश्लेषण सुचलं नव्हतं!
तुमचं हार्दिक अभिनंदन!!!!!

मार्मिक गोडसे's picture

10 Mar 2015 - 3:40 pm | मार्मिक गोडसे

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

सध्या शेतातली रोपटी अजुन उलटी कशी झाली नाहीत याचा विचार करतोय...

लेख लिहिण्यामागे तसा उद्देश नक्किच नव्हता.

आपल्या मराठी लोकांचा शेअर गुंतवणूक/व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषित असतो, ह्या व्यवसायबद्दल आदराची भावना फारच कमी असते..
एखाद्या समारंभात माझ्या बाबांची ओळख फक्त नाव व नाते इतकीच करुन दिली जाते, समोरच्याने काय करतात विचारल्यास जवळचे नातेवाईक काढता पाय घेतात. बाबांनाच आपण काय व्यवसाय करतो हे सांगावे लागते.बर्‍याचदा समोरच्याची प्रतिक्रीया ही लेखातील मित्रासारखीच असते.
शेअर गुंतवणूकीला जुगार समजू नये हाच माझा लेख लिहिण्यामागे उद्देश होता.

टायटल वरून काहीच अंदाज लागत नव्हता आत काय असेल त्याबद्दल....किंबहुना नेहमीचेच वाद असतील असं वाटलेलं. पण लेख अगदीच नाविन्यपुर्ण निघाला....जरा वेगळं टायटल द्यायचा विचार करा ही विनंती...

मार्मिक गोडसे's picture

25 Jun 2015 - 3:17 pm | मार्मिक गोडसे

धन्यवाद सं.मं.

मित्रहो's picture

25 Jun 2015 - 3:55 pm | मित्रहो

ठराविक मुदतीसाठी गुंतवणुक करुन नफा मिळवणे ठीक. मग डेली ट्रेडींगचे काय? कुठल्याच कंपनीचे भवितव्य एका दिवसात तेवढे बदलत नाही जेवढे त्या कंपनीचे शेअर्स चढतात किंवा उतरतात. त्याला जुगारच म्हणावे असे नाही पण तो काही फार विचारपूर्वक केलेला व्यवहार असतो असेही नाही.

उगा काहितरीच's picture

25 Jun 2015 - 4:19 pm | उगा काहितरीच

खुसखूशीत !

जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही.
एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं
ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही.
एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं
ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

dadadarekar's picture

27 Jun 2015 - 7:31 pm | dadadarekar

यात एकाचा तोटा व दुसर्‍याचा फायदा होतो.

बेकार तरुण's picture

30 Jun 2015 - 9:06 am | बेकार तरुण

तुमची समजुन चुकीची आहे
शेअर मार्केट हाहि झीरो सम गेमच आहे, ईतर कोणत्याहि खेळाप्रमाणेच

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2015 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे

मग शेवटी मोठा जुगार कोणता? शेती कि शेअर मार्केट?

शेती किंवा शेअरबाजार हे दोन्हीही इटसेल्फ जुगार नसून ते कोणत्या मार्गाने वापरले (किंवा तिथे कोणत्या विचाराने व्यवहार केले) यावर जुगार ठरतो.

हे फक्त शेती किंवा शेअरबाजारालाच लागू नाही. जुगार ही प्रवृत्ती आहे. कोणत्या जिलबीवर माशी बसेल यावरुनही जुगार खेळता येतो. एकूण सारासार विचार, अभ्यास यांचे श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार.

याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही.

पण एमू पाळल्याने एका लाखाचे दोन वर्षात वीस लाख होतील असं कुठूनतरी ऐकून.. एमूशेतीच्या जगातल्या इतर सिनारिओचा अभ्यास न करता, त्यांची स्थिती काय आहे ते न पाहता, एमूचं मांस दावा केल्याप्रमाणे खरंच उत्तम आहे की वातड आणि बेचव आहे, त्याला खरंच फाईव्हस्टार हॉटेलांत मागणी आहे का? एमूच्या अंड्याचे काय बनवतात? ती कोण विकत घेईल? या कशाचाही अभ्यास न करता.. त्याच शेतीत एमूशेती करण्यासाठी डायरेक्ट पाच लाखाचे एमू खरेदी करुन आणणं हा जुगार.

त्याचप्रमाणे जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला, मालामाल व्हाल, रात्रीत कोट्याधीश व्हाल असं कुठेतरी "ऐकून" तिथे पाच लाख "लावणे" हाही जुगार.

क्रिकेट, खेळ, हवामानशास्त्र, हळदीचे भाव इ इ इ सर्व फिल्ड्समधे जुगार खेळता येतो. त्याचा फिल्डशी संबंध नसून विचारपद्धतीशी संबंध आहे.

संदीप डांगे's picture

30 Jun 2015 - 1:27 am | संदीप डांगे

बेशर्त सहमती. यापेक्षा उत्तम प्रतिसाद काय असावा?

प्यारे१'s picture

4 Jul 2015 - 7:09 pm | प्यारे१

+111
आम्ही गवि आणि त्यांच्या टंकनिकेच्या प्रेमात त्यामुळेच आहोत ;)

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2015 - 7:35 pm | टवाळ कार्टा

टंचनिका ना??

आमच्याकडे ती नसल्यानंच हा घोळ झाला बघा.
होय टंचनिकाच! ;)

सुबोध खरे's picture

30 Jun 2015 - 9:45 am | सुबोध खरे

श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार.
शंभर नंबरी बात आणि नेमका प्रतिसाद.
गवि शेठ. मान गये

द-बाहुबली's picture

30 Jun 2015 - 10:12 am | द-बाहुबली

हम्म.. शेअर्स जमिनीत उगवत नाहीत.

ऋतुराज चित्रे's picture

30 Jun 2015 - 10:15 am | ऋतुराज चित्रे

याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही.
लेखकाच्या मित्राच्या मते जुगार म्हणजे-
मित्र : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते.
येथे कमी तोटा होतो असे म्हटलेले नाही.

मित्राचे म्हणणे खरे मानले, तर त्या लॉजिक प्रमाणे
६)नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे शेतीमालाचे १००% नुकसान होऊ शकते परंतू संकटाची चाहूल लागल्यास stop लॉस लावून शेअर्स विकून तोटा कमी करता येतो व १००% नुकसान टाळता येते.
अशा वेळी शेती हा जुगारच ठरतो. भले शेतकरी जुगाराच्या भावनेतुन शेती करत नसला तरी.
स्टॉप लॉस बद्दल लेखकाशी सहमत.
तुलनात्मक लिखाण आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2015 - 10:25 am | प्रकाश घाटपांडे

मला तर बाबा जीवण हाच एक जुगार वाटतो. मोठ्या मोठ्या मान्सांनी तसे म्हन्ले बी हाये!

चौकटराजा's picture

30 Jun 2015 - 10:43 am | चौकटराजा

ज्या ज्या कृति चा परिणाम होताना दोन परस्पर विरोधी उत्तरे घेऊन येण्याची शक्यता असते अशी प्रत्येक कृति जुगार असते.जीवन एक जुगार .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jun 2015 - 1:38 pm | निनाद मुक्काम प...

शेअर मार्केट व शेतीची तुलना आवडली
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापेक्ष्या जागेत गुंतवणूक करणे जास्त सोपे नाही का निव्वळ कोणाचे एकूण एखाद्याने उपनगरात जागा विकत घेतली तरी
काही वर्षात तिची किंमत वाढणार ती किती प्रमणात वाढणार ह्या साठी त्या जागेला भविष्यात येणारे महत्व काही वर्षांच्या त्या भागातील जागांचा वाढणारा दर ह्यावर नफ्याचे प्रमाण अवलंबून असते
अगदी टोकाची परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज जागांचे भाव पडत नाहीत तेव्हा ते अधिक सुरक्षित व सोयीहे नाही का
म्हणजे निव्वळ ऐकीव माहितीवर सुद्धा जागेत गुंतवून नफ्याची खात्री देता येते.उद्द ठाणा डोंबिवली मुलुंड पुणे मुंबई बद्दल बोलूच नका गेल्या दहा वर्षात जागांचे वाढलेल्या किमती पहा ,

चौकटराजा's picture

30 Jun 2015 - 6:25 pm | चौकटराजा

प्रशांत महासागरात अचानक एक मोठे बेट वर आले तर जागांचे भाव एकदम कोसळतील. तात्पर्य कसलीही गुन्तवणूक सदाची फायदेशीर नसते. बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की.

संदीप डांगे's picture

1 Jul 2015 - 3:55 am | संदीप डांगे

बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की.

सहमत. २०३० च्या तरुणांची गत १९७५ च्या तरूणांसारखी होईल. (आठवा: नो वॅकन्सीचे बोर्ड, झिजणार्‍या चपला दाखवणार्‍या चित्रपटातल्या फ्रेम्स.)

सुधीर's picture

1 Jul 2015 - 11:13 am | सुधीर

लेखकाच्या आणि प्रतिसादकर्त्यांच्या भावनांशी सहमत आहे. फक्त एवढेच की, शेती हा व्यवसाय आहे आणि फार कमी लोकांचा पूर्ण वेळ गुंतवणूक (इक्विटीमधली) हा व्यवसाय असतो. शेतीमधून सृजनतेचा जो आनंद शेतकर्‍याला मिळेल तो कदाचित गुंतवणूकीतून मिळणार नाही. शेती व्यवसाय करून सुद्धा शेतकर्‍याला इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. पण शेतकरीच काय, बराच शहरी मध्यम वर्ग इक्विटी अ‍ॅसेट क्लास पासून थोडा दूरच आहे. लोकांचा अजूनही गुंतवणूकीच्या पारंपारीक मार्गांवर जास्त विश्वास आहे. मग ते परंपरागत आलेली सोन्यातली गुंतवणूक असो वा जमीनीतली असो. २% जास्त मिळतायत म्हणून लोकं बुडीत जाऊ शकणार्‍या पतपेढी- क्रेडीट सोसायटीतल्या मुदत ठेवींवरची जोखीम स्विकारायला तयार असतात पण इक्विटी अ‍ॅसेट क्लासकडे जुगार म्हणून पाहतात. डायव्हर्सीफाईड इक्विटी अ‍ॅसेट क्लास छोट्या कालावधीत तोटा देऊ शकतो वा मुदत ठेवीपेक्षा कमी परतावा देऊ शकतो. पण दीर्घ कालावधीमध्ये तो मुदत ठेव, सोनं आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटपेक्षा अधिक परतावा "देऊही शकतो".

अभ्यासाबरोबर अजून एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे इमोशनल बायसेस. कारण गुंतवणूक म्हटली की भावना आल्या. या भावनांच्या आहारी जाऊन कधी कधी आपण टाळता येण्याजोगी जोखिम घेत असतो. हे बायसेस कमी कसे करायचे याचा आभ्यास अलिकडच्या काळात विकसित होत आहे.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

2 Jul 2015 - 10:14 pm | मनोज श्रीनिवास जोशी

जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला हा हा हा.
अपोलो , एम.आर.एफ. , मिशलीन च्या लायनीत जिल्बीभूषण टायर्स ही गोड कल्पना करून बेफाम हसतो आहे ग.वी.

palambar's picture

4 Jul 2015 - 4:04 pm | palambar

एक प्रकारे जुगार आहे, कारण काही ऊत्पादन नाहि,सेवा नाही.

खटासि खट's picture

5 Jul 2015 - 10:25 am | खटासि खट

हाच संवाद पुन्हा एकदा बदलून पाहूयात. इथे बाबा हा उल्लेख या लेखात धागाकर्त्याचे बाबा म्हणून झालेला असल्याने तिथे नवं आणि या लेखाशी संबंध नसलेलं पात्रं घेऊयात. अर्थात धागाकर्ते वौयक्तिक घेणार नाहीत ही खात्री आहेच.

रतन खत्री : जुगार म्हणजे काय ?
साने गुरुजी : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते.
रतन : तुम्ही कधी जुगार खेळला आहात ?
साने गुरुजी : नाही.
रतन : शेअर्समध्ये कधी पैसे गुंतविले आहेस ?
साने गुरुजी : नाही.
रतन : मग तुम्ही शेअर्सच्या ट्रेडिंगला जुगार म्हणून का हिणवता ? जुगार हा ही तितकाच लाभकारक धंदा आहे.
साने गुरुजी : बर्‍याच लोकांनी जुगारामध्ये पैसे कमावलेत. काहींनी जुगारात नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे ऐकले आहे.
रतन : शेतीत, शेअर ट्रेडींगमधेही बर्‍याच लोकांनी पैसे कमावलेत व काहींनी शेतीत, शेअरट्रेडींगमधे नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे मीही ऐकले आहे.
साने गुरुजी : म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
रतन : शेती व्यवसाय, शेअर ट्रेडिंग व जुगारामध्ये बरेच साम्य आहे.
साने गुरुजी : ते कसे ?
रतन : १) शेती करायला जमीन आवश्यक असते, शेअर ट्रेडिंगसाठी demat account आवश्यक असते तसंच जुगारासाठी कॅसिनो क्लबमधले सदस्यत्व, मटक्याच्या अड्ड्यावरची पत किंवा ऑनलाईन लॉटरीचं केंद्र यांची आवश्यकता असते. आणखी एक प्रकार म्हणजे घोड्याची रेस. यात रेसकोर्स वर बुकीकडे खातं किंवा पत असणे आवश्यक असतं.
२) चांगले पिक येण्यासाठी शेताची योग्य ती मशागत करावी लागते , गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळावा ह्यासाठी अगोदर गुंतवणुकीच्या संदर्भात सखोल अभ्यास करावा लागतो तसंच जुगारात कुठले आकडे येऊन गेलेले आहेत, कुठले अद्याप आलेले नाहीत, कुठला पॅटर्न चालू आहे यावरून आता कुठला आकडा फुटण्याची शक्यता आहे याची शक्यता गृहीत धरता येते. घोड्याच्या रेसमधेही घोड्यांचा अभ्यास, कुठल्या घोड्याने कुठल्या रेस किती जिंकल्या याचा चार्ट, जॉकीचा इतिहास याचा अभ्यास करावा लागतो.

३) कोणतेही पिक घेण्यापूर्वी त्या पिकाला पोषक असे हवामान बघितले जाते,त्यानंतर योग्य त्या जातीचे बी निवडले जाते. जास्त उतारा देणारे बियाणे थोडे महाग घ्यावे लागते, चांगला परतावा देणार्‍या कंपन्यांचे शेअर थोडे महाग घ्यावे लागतात. चांगल्या कंपन्या निवडणे हे अभ्यासाने व अनुभवाने ठरवता येते. अगदी तसच मटका, जुगार, सट्टा आणि रेस याबाबतीतही आहे. ऑनलाईन लॉटरी, परराज्यातल्या शेवटच्या अंकाच्या लॉट-या, मटका आणि रेस यातून अनुभवाने चांगला पर्याय निवडता येतो. यातला चांगला पर्याय हा थोडा महाग असतो पण त्यात परतावा जास्त मिळू शकतो.

४) पिकांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निंदनी ,खुरपणी, खत व रोगापासून बचावासाठी किटकनाशक फवारणी वेळोवेळी करावी लागते. आपल्या portfolio मध्ये एखाद्या कंपनीमुळे गुंतवणुकीचे गणित चुकत असेल तर योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणुकीचा तोल सांभाळण्यासाठी वेळोवेळी portfolio कडे लक्ष द्यावे लागते.
आपल्या चार्टमधे न आलेल्या आकड्यांचे गणित चुकत असल्यास पॅटर्न बदलावा लागतो. उदाहरणार्थ चार्टमधे शंकरपाळी पॅटर्न अंदाज चुकवत असाल्यास करंजीहा पॅटर्न लागू करून पहावा लागतो. काही आकडे कमी करावे लागतात. रेसमधेही हे लागू पडतंच.

५)शेतमालाचे भाव जसे मागणी व पुरवठा ह्यावर अवलंबून असतात, शेअर्सचे भावही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात.
असंच ज्या आकड्याला जास्त मागणी असेल त्यावर आकडा फुटण्याचे गणित अवलंबून असते. लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात. पण मटक्याच्या बाबतीत तुम्हाला हवा तो आकडा मिळतोच मिळतो.

६) अप्रमाणित बियाणे. खते व कीटकनाशके वापरल्यामुळे जसे शेतीचे नुकसान होऊ शकते त्याप्रमाणे penny stock मध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होऊ शकते,
फक्त पंटर्सच्या टीप्सवर विश्वास ठेवून स्वत:चा अभ्यास केला नाही तर नुकसान होते.

७) सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊ शकतो तसाच कंपन्यांच्या नफातोट्या वरही होऊन कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावरही होऊ शकतो.
सरकारच्या कायदेविषयक शिथिलतेच्या धोरणात बदल झाले की धंद्यावर परिणाम होऊ शकतो. सरकारची धोरणे आणि पाऊस यांचं सांगता येत नाही.
इत्यादी इत्यादी...

मित्रा आता तूच सांग जुगार कोण खेळतोय ते ?

सदर प्रतिसाद टंकताना याआधीचा प्रतिसाद उमटलेला आहे असा विश्वास होता, तो पेज रिफ्रेश केल्याने धुळीस मिळालेला आहे. काय नव्हतं त्या प्रतिसादात. नीळकंठराव कल्याणींच्या पिताश्रींनी त्यांना थोबाडीत मारून सट्टा आणि व्यवसाय यातला फरक समजावून सांगितलेला सीन होता, ती शिकवण लक्षात ठेवून यशस्वी झालेला एक जिद्दी तरूण होता.
सट्टा आणि धोका यातला फरक समजावणारा उपदेश होता. स्वत: भाव ठरवता येत नसतानाही आणि पावसाच्या लहरीच्या धोक्यावर अवलंबून असतानाहि शेती हा व्यवसाय करणा-यांचा गौरव होता. शेती आणि शेअर ट्रेडींग यातल्या आवश्यकतेचा उहापोह होता, गरज निर्माण करून भाव खाली वर करून फायदा काढण्यातलं तंत्र समजावून सांगणारा बोध होता.

पण पावसाप्रमाणेच नेटमधे येणारा व्यत्यय हा प्रतिसाद खाऊन गेला आणि एका सभ्य प्रतिसादाची नावावर लागू पाहणारी नोंद जालीय इतिहासातून नाहीशी झाली. आता आहेत पुन्हा मेलबॉक्स आणि व्यनी मधे येणा-या शिव्याशापांची बरसात... भाग्य कोणास चुकलें हो ?

ऋतुराज चित्रे's picture

5 Jul 2015 - 10:57 am | ऋतुराज चित्रे

लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात.

पण लॉटरीची तिकीटं अगोदरच छापलेली असतात ना? काही कळलं नाही बुवा.
लेख नीट वाचावा लागेल.

खटासि खट's picture

5 Jul 2015 - 11:29 am | खटासि खट

पण लॉटरीची तिकीटं अगोदरच छापलेली असतात ना? >>>> BWARRR

चौकटराजा's picture

5 Jul 2015 - 1:29 pm | चौकटराजा

कोणता तरी आकडा यावाच लागतो तो कोणता आणायाचा यात काही पण काहीशीच शिस्त असते. तो आकडा ठरला की त्याची तिकिटे त्या तारखेची कमी छापण्याचा डाव खेळ्ला जातो.

ऋतुराज चित्रे's picture

5 Jul 2015 - 3:38 pm | ऋतुराज चित्रे

मला असं म्हणायचे आहे की, जर का लॉटरीची तिकिटे बाजारात नसतील तर तिकिटाचा ठराविक नंबर अगोदर बूक कसा करता येतो? तुम्ही म्हणता तसे छापण्या अगोदर बुकिंगची सुविधा असेल तर त्या तारखेची तिकिटे कमी छापल्याने बक्षिसाची रक्कम वाटून हातात कमी रक्कम मिळेल.

खटासि खट's picture

5 Jul 2015 - 6:25 pm | खटासि खट

कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी.

या क्षेत्राकडे मराठी लोकांचा पाहण्य़ाचा दृष्टीकोण पूर्वग्रहदुषित असल्याने फारशी माहीती नाही. यातले जे जाणकार असतात त्यांना दहा वाजले की तिकीटाचे वेध लागतात. कारण समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात. म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही. पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो.
मणिपूर सारख्या राज्यातून येणारी तिकीटे ही प्रत्यक्षात गुप्ता, चावला आदी आडनावाची माणसेच छापत असतात, फक्त मणिपूर सरकारला त्या लॉटरीपोटी काही पैसे दिलेले असतात.

ऋतुराज चित्रे's picture

5 Jul 2015 - 10:10 pm | ऋतुराज चित्रे

आता तुमच्याच उदाहरणाचा आधार घेतो,
समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात
ओ.के.
म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही.
आपण म्हणता त्याप्रमाणे ९ ह्या आकड्याची मागणी समजा १०,००० आहे तिकिटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगितल्यामुळे वाढीव गरजेप्रमाणे तिकिटे मिळतातही. पुढे आपण म्हणता,
पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो.
ज्यांनी तिकिटे बूक केली,ती मिळालीही मग बाजारात तिकिटांच्या तुटवड्याने काय फरक पडतो?

खटासि खट's picture

6 Jul 2015 - 6:34 am | खटासि खट

तुम्हाला आधीच ब्वॉर म्हटलं होतं, तुम्ही पुन्हा समजावून घेण्याचा स्टॅण्ड घेतला.
तर आता पुन्हा ब्वॉर !!

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

5 Jul 2015 - 10:37 pm | अरवीन्द नरहर जोशि.

शेती कायमच हरणारा जुगार आहे. अनुभवावरून सांगत आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2015 - 1:55 pm | श्रीगुरुजी

हा जर कायमच हरणारा जुगार आहे तर हा जुगार खेळणारे अजून किती वर्षे या जुगारात पैसे घालविणार आहेत?

जुगार खेळणारा कायम हरत गेला तर एक वेळ अशी येते की त्याचा खिसा रिकामा होतो व त्यानंतर तो पुढे जुगार खेळू शकत नाही. परंतु हा जुगार खेळणारे दरवर्षी हरूनसुद्धा दरवर्षी नव्याने जुगार खेळायला पैसे आणतात तरी कोठून? द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखी यांना अक्षय भरलेला खिसा लाभलेला दिसतोय.

ऋतुराज चित्रे's picture

6 Jul 2015 - 11:29 am | ऋतुराज चित्रे

खरच सांगतो, मला तुमच्या 'ब्वॉर' चा अर्थ अजुनही कळालेला नाही.
कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी.
आपल्यामुळे लॉटरीत हमखास फायदा होउ शकतो हे पटले. एकदा हाही अनुभव घ्यावा असे वाटले,परंतू मला तुमच्या प्रतिसादात वरील दोन वाक्ये ( तिकीटे बूक व तिकिटांचा तुडवडा) परस्परविरोधी वाटली व धोका वाटला. उद्या मला ठरावीक नंबरची तिकीटे नाही मिळाली आणि माझे नुकसान झाले, तर लॉटरी माझ्याकरता जुगार ठरू शकेल, म्हणुन मी आपल्याकडे चौकशी करतो.
आपला मठ्ठ शिष्य.

उद्या अपहरणाचा धंदा यश देणारा धंदा आहे असं एखाद्याने पटवून देणा-या शैलीत सांगितलं तर त्या धंद्यात उडी घ्यावी का ? बाकी आशयनिर्मूलनापरांत रुपके,दृष्टांत, दाखले, उदाहरणे यावर खल होणे हे मानवी विकासाचं लक्षण आहे.

ऋतुराज चित्रे's picture

6 Jul 2015 - 3:39 pm | ऋतुराज चित्रे

चांगल्या लेखावर मटक्याची कच्ची वीट लावण्याच्या आपल्या भुसभुशीत प्रयत्नांची कीव आली. काय तो मराठी बाणा आणला होता, म्हणे कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी.
गिर्‍हाईक बघितल्यावर एकदम खिडकी बंद?
शेवटी खटासी खेटला मठ्ठ

खटासि खट's picture

6 Jul 2015 - 7:19 pm | खटासि खट

ब्वॉर !!!

arunjoshi123's picture

7 Jul 2015 - 3:07 pm | arunjoshi123

कृती:
उद्देशांच्या आधारावर मानवी कृतींचे खालील प्रकारे विभाजन करता येईल -
१. गुंतवणूक
२. अन्य मानवी भावना थेट पूर्ण करावयासाठी केलेली कृती
३. वरील दोहोंचा ओव्हरलॅप असलेली कृती
================================================================================
रियल रिटर्नः
प्रथमतः गुंतवणूक करताना आपल्याकडे नक्की कशात गुंतवणूक करायची याबद्दल अनेक पर्याय उपलब्ध असतात. इतके मूल्य इथे गुंतविले तर इतका परतावा असं जे गणित मांडतात, अंदाज घेतात त्याला नॉमिनल रिटर्न म्हणतात. आपल्याला खरा रस रियल रिटर्न मधे असतो.
रियल रिटर्न = नॉमिनल रिटर्न - रेट ऑफ इन्फ्लेशन

गुंतवणूकीच्या कालाअंती प्रत्येकच माणसासाठी, किमान एका देशात, महागाई तीच असणार आहे. तेव्हा जिकडे नॉमिनल रिटर्न जास्त तिकडे गुंतवणूक करावी असे वाटणे साहजिक आहे. काही गुंतवणूकींत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न असते. उदा. फिक्स्ड डिपॉझीट, बॉंड्स,इ. पण प्रत्येकच गुंतवणूकीत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न नसते. उदा. कोणताही व्यवसाय, शेती, स्टॉक मार्केट, इ.

आर्थिक परिस्थिती वा समोरच्याची नियत वेगळी निघाल्याने, व्यवसायाबद्दलचे वा आर्थिक वातावरणाबद्दलचे अंदाज चुकीचे निघाल्याने, सुनिश्चित करार असो वा नसो, प्रत्येक गुंतवणूकीत परताव्याची काय अपेक्षा केली होती आणि प्रत्यक्ष काय परतावा मिळाला यात तफावत निघते.
=======================================================================
रिस्कः
ही तफावत डोळ्यासमोर ठेऊन सर्वसाधारणपणे मागचा इतिहास पाहता प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकीत किती परतावा मिळतो याचा एक आडाखा बांधता येतो. जेव्हा "जवळजवळ प्रत्येक" परतावा या अपेक्षित परताव्याच्या आसपासच मिळतो तेव्हा अशा गुंतवणूकींना लो रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. बाँड्स. कोणता परतावा अपेक्षित परताव्यापासून किती दूर असेल जास्त अनिश्चित असते तेव्हा अशा गुंतवणूकींना हाय रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. शेअर्स.

आपण जर मराठी फॉर रिस्क वा हिंदी फॉर रिस्क असे गुगलाल, तर धोका वा जोखिम असे शब्दार्थ मिळतील. वास्तविक हा शब्द संख्याशास्त्र (statistics) आणि अर्थशास्त्र या दोहोंची समाईक संज्ञा आहे. (इंग्रजीत संशोधन जास्त आणि संज्ञांची वाणवा हा एक दुष्ट प्रकार आहे. ते एक असो.) या शब्दाचा सामान्य अर्थ धोका असा घेतला तर अभिप्रेत धन बाजू त्याने कन्व्हे होत नाही. शिवाय "मोअर रिस्क मोअर रिटर्न" अशी एक म्हण कुप्रसिद्ध झाली आहे. ती रिस्क शब्दाची ॠण बाजू लपवते. रिस्क म्हणजे परताव्यांचे standard deviation from mean return. म्हणून रिस्क शब्दाला गुंतवणूकीच्या संदर्भात अनिश्चिती म्हणावे, धोका वैगेरे नाही.
================================================================
रिस्क- रिटर्न कॉम्बो:
ज्यात परतावा मिळतो त्या प्रत्येकच प्रकाराला गुंतवणूक म्हटले तर प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या रिस्क आहेत.
श्रीमंताघरी जन्म घेणे, वारश्याने संपत्ती मिळणे - ० गुंतवणूक , अनंत टक्के परतावा, ० रिस्क
गिफ्ट मिळणे, श्रीमंत देशात जन्म - तेच
करंट अकाउंट - ० परतावा, नगण्य रिस्क
सेविंग अकाउंट - ३-४% परतावा, जुजबी रिस्क
जी-सेक, बँक डिपॉझिट, बाँड्स - थोडी जास्त रिस्क, जास्त परतावा
शिक्षण, नोकरी - असेच पुढे
स्टॉक्स - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा
व्यवसाय, ट्रेडींग (चालू करणे,), शेती- अजून जास्त रिस्क, जास्त परतावा
जुगार - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा
(आपल्यामते वरील क्रम वेगळा असू शकतो.)

लोक नोकरी सोडून व्यवसाय करताना "रिस्क घेतली (मागे कधी नव्हती)" म्हणतात, पण ते नीट मांडले तर 'व्यवसाय सेटल होईपर्यंत' उपजिविकेतील "रिस्क वाढवली" असे म्हणायला पाहिजे कारण नोकरीत देखिल रिस्क होतीच.

(जास्त परतावा नि कमी रिस्क अशा गुंतवणूका बाजारात का नसतात हे नंतर कधीतरी.)
===========================================================================
जुगारची रिस्कः

प्रत्येक गुंतवणूकीत काय काम करावे, काय करू नये याबद्दलचा एक expertise असतो. जे लोक हे सगळे कंट्रोलेबल पॅरामीटर्स व्यवस्थित हाताळतात त्यांना नशीबाने साथ दिली तर अर्थातच त्यांना जास्त परतावा मिळेल.

आता कोणत्या गुंतवणूकीच्या कृतीस जुगार ठरवावे, किती जास्त रिस्क घेणे जुगारी मानावे याची थ्रेशोल्ड कशी ठरवावी?
एक उदाहरण घेऊ. मटका लावताना, दहापैकी नऊ आकड्यांवर ० शून्य रुपये नि एका (बसलेल्या) आकड्यावर ८ रुपये याप्रमाणे,
= (9/10)*0+(1/10)*8 = 0.8, म्हणजे सरासरी परतावाचा -२०% आहे. आकडा लागला तर ७००% परतावा आहे. नाही लागला तर ०%. इथे सर्वसाधारणपणे जे व्हायचे तेच होत गेले तर गुंतवणूकदार नेहमी आपली २०% गुंतवणूक हरवून बसेल. मग अशी गुंतवणूक करावी का?
या गुंतवणूकीचे स्वरुप पहा. गुंतवणूक १ रुपया, सरासरी परतावा उणे २० पैसे, रिस्क २ रु ५३ पैसे !!! जिथे सरासरी परतावाच ऋण आहे तिथे केवळ नशीब आपल्या बाजूने चालेल असा आडाखा बांधणे म्हणजे जुगार असे म्हणता येईल.
==============================================================
शेती नि शेअर बाजारः

शेती आणि शेअर बाजार यांच्यातील गुंतवणूका नि त्यांचे उपप्रकार यांच्यात भिन्न भिन्न प्रकारचे परतावे नि रिस्क असू शकतात. दोन भिन्न गुंतवणुकांत रिस्क भिन्न असेल तर पैकी एक जुगार ठरत नाही. शिवाय गुंतवणूक ही सहसा १००% आर्थिक नसते, नसावी. माणसाला कशाचे ज्ञान आहे, कशात रुचि आहे, कशाचा तो नंतर तज्ञ बनू शकतो, त्याच्या भावना काय आहेत, इ इ गुंतवणूकीत देखिल महत्त्वाचे असायला पाहिजे/असू शकते. उदा. शेती कशी करावी, ती करायच्या पद्धतीत काय बदल करावेत याबद्दल माझी चार मते असली तरी अ‍ॅज सच शेती या विषयाबद्दल माझ्या व्यक्तिगत भावना पावित्र्यवाचक आहेत. याशिवाय शेतीविषयक भावना पावित्र्यवाचक असणे हे मागासलेपणाचे आहे असे मानणे मी अनिष्ट नि अनावश्यक मानतो.
शेअर मार्केट बद्दल देखिल लोकांचे अनेक गैरसमज आहेत, निगेटीव भावना आहेत. मूलतः शेअर बाजाराला जुगार यासाठी म्हणू नये कि शेअरची स्वतःचे काही मूल्य नसते. जे मूल्य असते ते कंपनीच्या व्यवसायाचे असते. एका विशिष्ट कंपनीच्या नावे चाललेल्या व्यवसायाचे वा व्यवसायांचे दिलेल्या वेळी काय मूल्य आहे याबद्दल प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, अंदाज वेगवेगळा असतो. त्याशिवाय, हे मूल्य काळामानाप्रमाणे कसे बदलेल याबद्दलही प्रत्येक व्यक्तिची भावना वेगवेगळी असू शकते. हे लोक वेगवेगळ्या फोरमवर एकत्र येतात तेव्हा शेअरच्या किमती (न बोलता?) निगोशिएट करतात नि किंमत बदलत राहते. व्यवसायाची मालकी असंबंधित लोकांनी शेअर केली नि ती विकली वा विकत घेतली तर तो जुगार कसा? शेअर बाजार ही अर्थव्यवस्थेची (पर्यायाने देशाची) मंदिरे असतात. नि सहसा पवित्र (शेअर बाजार) नि अपवित्र (जुगार) शब्द एकत्र करू नयेत. शेअर बाजार नसते तर... तर ...अर्थकारणात, समाजकारणाचा दृष्टांत देऊन, समाजसुधारणच झाल्या नसत्या तर म्हटल्यासारखे आहे. जर शेती नसल्याने लोक भुकेने मरतील असे मानले तर शेअर मार्केट नसल्याने जे व्यवसाय छोटे मोठे नाहीत वा जे व्यवसाय सरकार करू शकत नाहीत ते झालेच नसते असे मानावयास स्थान आहे.

अर्थातच सगळं काही इतकं आदर्श नसतं. आता काही शेतकरी शेतीत वा स्टॉक ट्रेडर्स शेअर बाजारात जुगार खेळत असतातच. त्यांचं रिस्क रिटर्न समीकरण भलतंसलतं असतं (त्यांच्यामते त्यांचा अभ्यास असतो), पण म्हणून ही क्ष्रेत्रेच (शेती वा शेअर बाजार ही क्षेत्रे) मानवतेच्या पातळीवर जुगार ठरत नाहीत.

कमी ज्ञान असल्यामुळे देखिल शेतीत वा शेअर बाजारात कोण्या माणसाची रिस्क वाढेल. पण या प्रकाराला देखिल व्यक्तिशः मी जुगार म्हणणे टाळेन.

म्हणून शेअर बाजार वा शेती यांच्यातील गुंतवणूकीच्या, परताव्यांच्या आणि अनिश्चितांची जाण असेल तर तिकडे आरामात गुंतवणूक करावी.
===================================================================
जुगार - एक मानवी मूल्यः

उरता उरतो तो प्रश्न म्हणजे शुद्ध जुगार (हे ही सब्जेक्टीव आहे तरी एक अनिष्ट गुंतवणूकीची पद्धत म्हणून स्वीकारली तरी) एक अनिष्ट मानवी मूल्य आहे काय? याचं उत्तर देखिल काळंपांढरं नाही. कधीकधी मला जो जुगार वाटत नाही तो पुढच्याला वाटतो. म्हणजे मी म्हणतो रिस्क कमी आहे नि पुढचा मानतो कि ती जास्त आहे. अशावेळी मी स्वतःला जुगारी नव्हे तर धाडसी मानत असेन. जुगारात मनोरंजन मूल्य आहेच. आपण समृद्ध असताना समोरच्याची आर्थिक काळजी घेऊन खेळलेला जुगार फार तामसिक मानता येणार नाही. जुगार माणूस आपल्या अन्य मूल्यांशी देखिल जोडू शकतो. उदाहरणार्थ कोणी केवळ भारतीय क्रिकेट टीमवर बेट लावतो, पाकिस्तानची टिम किती का सशक्त दिसेना. देशाभिमान! वा वाटते कि दरवेळी मलाच कळते कि कोणती टीम फॉर्मात आहे. मग त्या टीमवर (पर्यायाने स्वतःच्या अभ्यासावर, आत्मविश्वासावर) बेट लावतो. कुठे कोणी मी केवळ आणि केवळ माझे नशीब एका विशिष्ट संदर्भात किती जोरदार हेच आजमावत असतो, दैव इ अभ्यासत असतो. इथे सर्वत्र जुगार हे अन्य मानवी मूल्य प्रकट करावयाचे साधन आहे. म्हणून कोण्या कृतीस जुगार म्हणाताना त्यात किती ऋणभाव लिंपायचा आहे यात तारतम्य बाळगावे.

खटासि खट's picture

8 Jul 2015 - 8:55 am | खटासि खट

सुंदर विवेचन.
या आधी दिलेला एक प्रतिसाद वाहून गेला. नंतर पुन्हा टंकण्याचा आळस आला. पण हा प्रतिसाद पाहून थोडं कष्ट घ्यायला हरकत नाही असं वाटण्याइतपत उत्साह आला. नव्याने लिहीण्याचा प्रयत्न करतो.

शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली. (इतरांचं मत वेगळं असू शकतं). तुलना करायचीच म्हटली तर कशाचीही करता येते असं वाटलं. वरच्या माझ्या प्रतिसादाचं मूल्य त्यापेक्षा जास्त नाही.

शेअर बाजाराकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यात गैर काही नाही. जर ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील. जसे शेअर बाजाराचे पायदे तोटे सांगता येतात तसे अट्टल जुगारी जुगाराचेही सांगू शकतो. रेसप्रमाणे शेअर बाजार सुद्धा बेभरवशाचा असू शकतो. पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे आणि ट्रेडींग करणे हे जुआगारासारखेच आहे. शेअर बाजारात कंपन्यांकडचे सगळे शेअर्स नसतात. त्यात रोख आणि वायदे असे दोन प्रकार आहेत. रोख म्हणजे माझ्याकडे एखाद्या कंपनीचे अमूक शेअर्स आहेत ते मी विकायला काढले तर जितके शेअर्स विक्रीला उपलब्ध आहेत त्यांचा व्यवहार होणे. हा झाला नेहमीचा व्यवहार. पण एखाद्या कंपनीच्या शेअरबाजाराला मागणी आहे म्हणून सर्वच्या सर्व ग्राहकांना रेल्वेच्या वेटींग लिस्टप्रमाणे तिकीटे देणे हा झाला वायदे बाजार. एखाद्या कंपनीचे सर्वच शेअर्स काही शेअर्स बाजारात विक्रीला असतात असं नाही. जास्तीत जास्त दहा टक्के हा सर्वसाधारण आकड समजू. म्हणजे ९०% शेअर्स हे कंपनीच्या संचालक मंडळ, विविध प्रकारचे गुंतवणूकदार आणि किरकोळ यांच्याकडे असतात. ते शेअर बाजारात नसतात. पण या दहा टक्क्यांच्या जोरावर शंभर टक्के शेअर्सचा वायदा करायचा आणि जसजसे शेअर्स उपलब्ध होतील तसतसे तुम्हाला देण्यात येतील हा त्यात व्यवहार होत असेल तर तो वायदा गट. यात गंमत अशी आहे की हे शेअर्स हातात न पडताच वायद्याच्या जोरावर त्यांची विक्रीही होते. म्हणजे प्रत्यक्ष शेअर्सचं ट्रेडींग न होता खरेदी विक्री होऊन मधल्या मधे मार्जिन काढलं जातं. प्रत्यक्षात त्या शेअर्सची मालकी काही गुंतवणूकदाराच्या हाती आलेली नसते. या प्रकारच्या व्यवहारात गुंतवणूक हे उदीष्ट नसतं. याला सट्टाच म्हणायला हवं.

थोडक्यात कृत्रिम गरज किंवा भीती निर्माण करून किंमतीतल्या चढ उतारांमधे लाभ करून घेणे याला ट्रेडींग म्हणतात. यात जुगारापेक्षा काय वेगळं असतं ?

कंपनीच्या कार्यक्षमता, पत आणि भांडवलाप्रमाणे शेअर्सची किंमत वाढत जाणे हे ट्रेडींग मधे कुठेही अपेक्षित नसतं. सुरक्षित गुंतवणूकदार मात्र फायद्यात राहणा-या कंपनीत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतो. अर्थात तरीही त्यात धोका हा असतोच. कारण कंपनीची पक्षी धंद्याची वाटचाल ही अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यात प्रतिकूल बदल झाले तर फटका बसू शकतो. या प्रकारच्या धंद्याची तुलना शेतीशी केलेली आवडेल. डोळसपणे जो धोका पत्करला जाऊ शकतो तो इथे अपेक्षित आहे.

शेती आणि ज्ञानदान यांच्याकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोण आता बदलत चालला आहे. पूर्वी हे क्षेत्रं पवित्र या अर्थानेच पाहीलं जात असे. त्यामुळं नफा तोटा या तत्त्त्वाला फाटाच होता. म्हणूनच बहुसंख्य समाजाला व्यापारात गती नाही. त्यातच शेती मधे आपल्या उत्पादनाचा भाव आपण ठरवू शकत नाही ही गोची आहे. म्हणूनच नवीन पिढी शेती करायला नाखूष असते. शेतकरी नवरा नको ग बाई म्हणून जवळपास बहुतेक मराठी वृत्तपत्रांमधे विशेष लेख आलेत. कारण मुलींना आपलं होणारं मूल हे बेभरवशाच्या धंद्याच्या जोरावर मोठं व्हावं असं वाटत नाही. एखाद्या पिकाला भाव मिळणे आणि नेमकं त्याच वेळी ते पीक आपल्या शेतात तोडणीसाठी उपलब्ध असणे हा योग नेहमी येत नाही म्हणूनच शेतकरी उस उत्पादनाकडे वळू लागले. सर्वांनी साखरच पिकवली तर मग लोकांनी खायचं काय हा प्रश्न जरी रास्त असला तरी शेतक-याला फायदा होत नसेल तर त्याने तो धंदा का करावा हा प्रश्नही आहे. पूर्वीचा लोकांचा दृष्टीकोण आता बदलतो आहे.

यावर उपाय करण्यासारखे आहेत. पण फायद्यात चालणारी शेती हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. नागरीकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण्यांच्या वाढतात त्यामुळेही असेल कदाचित समस्या कायम राहत असतील.

मार्मिक गोडसे's picture

8 Jul 2015 - 12:02 pm | मार्मिक गोडसे

ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते असा जुगार ह्या शब्दाचा अर्थ. स्टॉप लॉस मुळे शेअरमधील गुंतवणूक जुगार ठरत नाही.
फ्युचर आणि ऑप्शन हे प्रोडक्ट खरे तर आपल्या पोर्ट्फोलिओच्या संरक्षणाकरिता वापरले गेले पाहीजे, एखादा त्याचा वापर फक्त ट्रेडिंगसाठी स्टॉप लॉस (हे महत्वाचे) न लावता करत असेल तरच तो जुगार ठरू शकतो अन्यथा नाही.
जसा एखाद्या कंपनीच्या फ्युचर व ऑप्शनने त्या मूळ कंपनीला काही फायदा होत नाही तसा कमोडिटीतील वायदा व्यवहारानेही मूळ शेतीला काहीही फायदा होत नाही. तेथेही गोदामात माल कमी असताना ज्यादा मालाचे व्यवहार होतात.

खटासि खट's picture

8 Jul 2015 - 12:27 pm | खटासि खट

हो, पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत. सट्टेबाज करत असतात. सट्टेबाजांसाठी कमोडीटी, मेटल्स, शेअरबाजार यात काहीही फरक नाही. तुम्ही आता तेलाच्या भावानुसार व्यापा-याकडे दहा लाख जमा करा आणि दिवाळीतल्या भावानुसार वरचा नफा काढून घ्या. त्यासाठी तेल विकत घेण्य़ाची गरज नाही.
या व्यापाराशी शेतीचा काहीच संबंध नाही.

स्टॉप लॉस हे प्रिव्हेन्टीव्ह मेजर आहे. एकंदर बाजारावर नियंत्रण आणण्य़ाचे साधन नाही. बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.

मार्मिक गोडसे's picture

8 Jul 2015 - 2:16 pm | मार्मिक गोडसे


पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत.


करू शकतात आणि करतातही. राजस्थानातील ठरावीक समाज शेती,साठवणूक,व्यापार व कमोडिटी ट्रेडिंग करतात उदा. गवार उत्पादन.

बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.


असे मी कुठे म्हटलेच नाही. जो गुंतवणूक करतो तो स्टॉप लॉस लावणार, प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्टॉप लॉस वेगळा असणार त्यामुळे साहजिकच बाजाराची घसरण रो़खण्याशी त्याचा संबंध येउ शकत नाही.

उपप्रतिसाद देताना लेख दिसत नाही, अन्य प्रतिसाद दिसत नाहीत, म्हणून ...
=======================================================================

शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली.

सहमत. अशी तुलना अनाठायीच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या अर्थहिन आहे. हायपोथेटिकली, कोणी शेतकरी आपली "शेत लिमिटेड" ही कंपनीच लिस्ट करू शकतो. मग प्रत्यक्ष शेती करणे आणि शेत लिमिटेडचे समभाग खरीदणे, विकणे यात तुलना करणे म्हणजे वेल्डींग, मशिनिंग करणे आणि टाटा मोटर्सचे समभाग घेणे यांत तुलना केल्यासारखे आहे.

मूळ लेखाच्या लेखकाचा उद्देश वेल्डर आणि टाटा मोटर्सच्या समभागांची देवाण घेवाण करणारा यांची आर्थिक/मौलिक तुलना करण्याचा दिसला. गुंतवणूक वा उपजिविका ही कंझर्वेटीव अप्रोचवर आधारित, मानवी गरजा भागवायच्या कृतींना समांतर जाणारी, एखाद्या तुक्क्यात आपल्या संपत्तीचे बरेवाईट न करणारी अशी असावी. शेती व समभागबाजार यापैकी काय असं आहे, काय नाही, इ इ. त्या अंगाने मी वरील विचार मांडले होते.
=====================================================================

पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे

पंटर्स माहिती, अभ्यास इ इ नसलेले आहेत असे सिद्ध झालेले असतानाही, केवळ ट्रेड वाढवण्यासाठीच्या त्यांच्या कृतींना बळी पडत, पैसे गुंतवणे नक्कीच चूक आहे. पण इंट्रिन्सिकली व्यवसायात सल्ला घेण्यात काही अनिष्ट नसावे.
========================================================================

ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील.

भाग १:
या विधानावर आपण पुनश्च सुक्ष्म विचार करावा (वा मला करायला लावावा) अशी विनंती आहे.
प्रत्येक व्यवसायात भांडवल - गुंतवणूक - प्रोजेक्ट - ऑपरेशन -उत्पादन - होलसेल- रिटेल (ट्रेडिंग)-उत्पन्न अशी साखळी असते. किमान असल्या ट्रेडिंग अ‍ॅक्टीवीटीवर अर्थातच कोणाचेही काही ऑब्जेक्शन नसायला हवे. शेअरबाजारातली शेअर्सची ट्रेडिंग अर्थातच या ट्रेडिंगपेक्षा खूप भिन्न आहे हे मान्य करूयात. शेअरबाजारातली दीर्घकालीन गुंतवणूक बुद्ध्या व्यवसाय केल्याप्रमाणेच आहे आणि तिच्यासाठी आपल्याला आदर आहे हे प्रतिसादात दिसते. पण कंपन्यांच्या व्यवसायांच्या मालकीच्या अल्पशा अंशांची रोजच्या रोज खरेदी विक्री करणे मौलिक आहे का, जुगार आहे का, बेकायदेशीर असावे का, अर्थकारणासाठी अनिष्ट आहे का, इ इ प्रश्न पडणे साहजिक आहे. हा चर्चेचा विषय आहे.
------------------------
भाग २:
त्यापूर्वी आपण थोडे स्टॅट्स पाहू.
१. भारतात २.५ कोटी पब्लिक शेअरट्रेडर्स असावेत. (फार नक्की आकडा शोधण्यात अर्थ नाही.)
२. साधारणतः ५५०० कंपन्या लिस्टेड आहेत.
३. इथे खाली एका टेबलमधे २००७ मधे पब्लिक शेअर होल्डिंग १३% होती असे लिहिले आहे.
http://finmin.nic.in/reports/Discussion%20Paper%20Public%20Holdings.htm
४. या टेबलमधल्या अन्य बर्‍याच फंडांचे अंतिम मालक सामान्य लोक आहेत. जसे, म्यूच्यूअल फंड.
५. इथे सार्‍या लिस्टेड भारतीय कंपन्यांना २०१४/२०१७ पर्यंत किमान पब्लिक होल्डींग २५% आवश्यक आहे/असेल असे लिहिले आहे.
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-10-09/news/54827541_1_...

मालकीच्या इतक्या व्यापक बाजारात ट्रेडर्स नसले तर ...?
-----------------------
भाग ३:
इथे मी प्रो- शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंग काही आर्ग्युमेंट्स करायचा प्रयत्न करतो.
१. मला दीर्घकालीन गुंतवणूक कळते असे मानले तरी माझ्याकडे कधी पैसे आहेत नि कधी पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे हे बिंदू जुळतील का? कधी पैसे काढायचे नि कधी पैसे घरी हवे आहेत हे बिंदू जुळतील का? हे शेवटपर्यंत जुळलेच नाही तर मी शेअरबाजारात गुंतवणूक करूच नये कि काय?
२. रोजच्या रोजच आर्थिक जगात आणि आर्थिक जगाबाहेर एकूणच (पर्यायाने एकूणच शेअरबाजारावर) ज्या घटना घडतात त्याचे सुक्ष्म वा मोठे, लघुकालीन (वा दीर्घकालीन -पण इथे रिडंडंट) परिणाम व्यवसायांवर (पर्यायाने शेअरच्या किमतीवर) होत नाहीत काय? काही लोकांना दीर्घकालाची अंधता असू शकते पण लघुकालाची दृष्टी शार्प असू शकते.
३. दीर्घकालाची गुंतवणूक खूप अनालिसिस नंतर होते. आदर्शतः अनालिस्टांच्या नुसार कधी गुंतवणूक करायची नि कधी काढून घ्यायची याबद्दलचा निष्कर्ष सगळ्यांप्रमाणे समान निघण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे लवकरच आकर्षक एन्ट्री प्राईस वाढून अनाकर्षक होणार. म्हणजे बाजाराची दिशा एकच -वर. किंवा उलटे. मग दीर्घकालीन गुंतवणूकदारांपेक्षा रिस्कच्या आणि परताव्याच्या वेगळ्या अपेक्षा असणारांचे काय? वास्तविक ट्रेडर्स हे आपल्या भिन्न प्रकारच्या अप्रोचमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराला लिक्विडीटी प्रोवाइड करून देतात. हा खूप महत्त्वाचा रोल आहे.
४. प्रोमोटर्स, इ ची होल्डींग सोडली तर उरलेल्या भागात अनेक फंडांच्या रुपात सामान्य लोकांची अप्रत्यक्ष होल्डींग खूप असते. म्हणून इथे "रेग्यूलर प्राइस डिस्कवरी" होत राहणे गरजेचे असते. ट्रेडर्स नसतील तर हे असंभव वाटते.
५. लघुकालीन ट्रेडींग हे तुम्ही जे पैसे हरवणे अफोर्ड करू शकता त्यावरच करणे अभिप्रेत आहे. ती संपूर्ण उपजिविका म्हणून अभिप्रेत नाही.
७. अंततः- मला जो गाडेवाला टमाटे विकतो, त्या टमाट्यांचे रिटेल भाव देखिल सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतात. तरीही तो त्याने ज्या किमतीला टमाटे घेतले आहेत त्यावर बिझनेस करतो. कारण आपल्याला नफा होईल असा व्यवहार होईल अशी त्याची अपेक्षा असते. मग एखाद्या फायनान्शियल इंस्ट्रूमेंटमधे ट्रेड करणे विशेष गैर का मानावे?
इथे अर्थातच मी अशा ट्रेडींगमधे गैरव्यवहार करणारे लोक सोडून बोलत आहे. गैरव्यवहारावरील टिका आणि व्यवसायावरील टिका हे भिन्न मुद्दे आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
===========================================================
भाग ४:
लघुकालीन ट्रेडिंग जुगार मानता येणार नाही. कारण जुगारासाठी जे रिस्क रिटर्न काँबो आहे, तसा प्रकार ट्रेडिंगमधे होत नाही. शेअरचे मूल्य कंपनीच्या मूल्यावर आधारित आहे. ट्रेडिंग गुंतवणूकदारांच्या भावना, अभ्यास, इ इ कितीही हेलकावे खात असल्या तरी त्यांना एक आधार आहे. १०० रुपयाचा शेअर २-३ दिवसात कोणत्या बँडमधे राहिल याला बर्‍यापैकी मर्यादा आहे. इथेही होत्याचा नव्हता होणे प्रकार होतो, पण तो अन्यत्र सर्व व्यवसायांत देखिल होतो.
शॉर्ट टर्म ट्रेडिंग मूर्खपणाने कसेही करणारे अनेक जण असतात हा भाग वेगळा, पण त्यामुळे तो प्रकार जुगार ठरत नाही. अन्य लोक तो व्यवस्थित करत असतात.
-------------------------------------
भाग ५-
इथे आपण ट्रेडिंगच्या कायदेशीर/बेकायदेशीरपणा बद्दल पाहू. जुगाराचं स्वरुप (रिस्क -रिटर्न काँबो) भलतंसलतं असतं. १. छापा पडला तर अर्धे राज्य आणि राजकुमार/री आणि काटा पडला तर एक मिनिटात शिरच्छेद.
२. हा खेळ खेळणे बंधनकारक नाही.
३. हा खेळ खेळायला १ रु द्यावा लागेल.
इथे असला जुगार मानवतेच्या मौलिक अंगांना स्पर्श करतो. शुद्ध जुगार हा आर्थिक, म्हणजे मूल्यवाचक असायला हवा, मौलिकतावाचक नाही. जुगारात जसा माणूस बरबाद होतो तसा व्यवसायातही होतो. दोहोंत फरक काय? कदाचित तडकाफडकीचा! धुंदीच्या क्षणी आयुष्य बर्बाद करून घ्यायच्या जागा देशात नसाव्यात असे सरकारला वाटू शकते. तिथे बंदीचा विचार करता येईल.

बाजारात अव्वाच्या सव्वा जास्त रिस्क आणि अव्वाच्या सव्वा रिटर्न असा काँबो गुंतवणूक ऑफर करण्याचा नि अशी गुंतवणूक स्वीकारण्याचा अपेटाईट असू शकतो. मग पहिला प्रश्न असा आहे कि शॉर्ट टर्म ट्रेडिंग असला प्रकार आहे का? दुसरा प्रश्न असा आहे कि सरकारने त्याला नियामित करावे काय वा एका मर्यादेबाहेर असा अपेटाईट, बाजार बेकायदेशीर ठरवावा काय?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना लघुकालीन ट्रेडर्सना नेहमी तोटा होता नि नेहमी तो दुसर्‍या (promoters and institutional investors)प्रकारच्या गुंतवणूकदारांना अक्र्यू होतो असे आहे काय? असे झाले असते हे मार्केटच संपले असते. आणि हे लोक जुगारी आहेत आणि लॉस झाला तरी कधी ना कधी फायदा मिळेल म्हणून जुगारी वृत्तीने पैसे लावत असतात असे म्हणावे तर या गुंतवणूकीत तशी अव्वाच्या सव्वा काय सव्वा देखिल रिटर्न मिळत नाहीत. प्रोमोटर्स इ इ ची पार्टी चालली असताना त्यांच्यातले दाणे वेचणारे हे छोटे उंदीर आहेत. स्टॉक मार्केट हा झीरो सम गेम नाही. यात जुगारी फायदा अजिबातच नाही. या मार्केटचे सरासरी रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट १% ते २५% (वार्षिक) यामधे काहीतरी असेल. (मला कल्पना नाही.)
आता उरतो प्रश्न दिवसाला ५% ते ८% (सेलिंग पोहोचेपर्यंत) बदल झाला तर रिटर्न किती मिळाले. दिवसाला ५% म्हणजे वर्षाला १८ पट परतावा!!!! १८००% रिटर्न!!!!! इथे तो जुगार वाटायला चालू होतो! पण असा हिशेब करणे चूक आहे. हे गेन्स नंतर पुसले जातात नि मार्केटच्या सरासरी इतकेच रिटर्न मिळते. त्सुनामीच्या उंचीवरून भरतींची उंची मोजू नये. अगदी दुकानात माल विकताना १० सेकंदांत १००रुच्या मालावर १० रुपये मिळाले तर आपण रिटर्न तशी मोजतो का? पूर्ण महिन्यात काय होते ते पहायला पाहिजे. पहिला प्रश्न (हा प्रकार जुगार आहे का?) इथे सोडवला जातो व दुसरा (बेकायदेशीर, अनैतिक ठरवावा काय?) उद्भवत नाही.
===================================================================
वायदा बाजार -
समजा एका शेअरचा भाव आज ३००० रुपये आहे. तो शेअर ३ दिवसांनी ३१०० चा होणार याची मला खात्री आहे (वाटते). नाही झाला तर जो काही तो तोटा सहन करण्याची माझी इच्छा नि पात्रता आहे. पण माझ्याकडे रुपयेच ३०० आहेत. माझे हे ज्ञान वाया जावे का? मी बाजारापासून दूर राहावे का?
हे झाले सामान्य बाजाराचे चित्र.

कोणी जण ३ दिवसांनी हा शेअर आज ३० रु प्रिमियम घेऊन (म्हणजे ३०३० ला), बाजारात काही किंमत असेना, विकायचे प्रॉमिस करतोय. वायदा बाजारात ट्रेडिंग करण्याची सामान्य माणसाची अफोर्डेबिलिटी वाढते. मग तो चांगला का वाईट?
============================================
मी इथे केवळ, शॉर्ट टर्म शेअर ट्रेड नि जुगार इतक्याच विषयावर तांत्रिक मतांतरे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संक्षेपात मत न मांडता येणे हा दोष मान्य आहेच. शॉर्ट टर्म शेअर ट्रेड मधले गैरव्यवहार नि अन्य बाबींवरची आपली मते यांचेशी सहमती आहे.

शेती, शेअर बाजार आणि जुगार या तिन्ही धंद्यात प्रावीण्य मी मिळवलेले नाहीये. तुमचा अभ्यास दांडगा आहे याची नोंद घेतो.त्याबद्दल कौतुक.
तुलनेचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे याबद्दल धन्यवाद. खूप खोलात जाण्याची आवश्यकता नाही.
गुंतवणूक आणि त्रेडींग यात फरक आहे असं माझं मत आहे. हाय रिस्क हाय गेन हे सूत्र कुठल्याही धंद्याला लागू होतं अ, त्यामुळे लिमिटेड रिस्क घेतली तर नुकसानीची शक्यता कमी होते त्याचप्रमाणे फायदा ही कमी होतो. जुगारात, रेसमधेही नियमित फायद्यात असणारे लोक पाहण्यात आहेतच. त्यांची मतं वेगळी असू शकतात.

@arunjoshi123 दोन्ही दीर्घ प्रतिसाद आवडले. फ्यूचर/ऑपश्न आणि इंट्राडे ट्रेडींग या दोन्हींच्या उपयुक्ततेबद्धल मी सहमत आहे.

जुगार म्हणजेअमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव. या न्यायाने केवळ शॉर्ट टर्म शेअर ट्रेडींगच नव्हे इक्विटी मधली लाँग टर्म गुंतवणूकीलाही जुगार म्हणता येईल. (एक ऑड आउटकम असे आहे की, एका ठराविक पाच वर्षात एफडी निफ्टीला आउट-परफॉर्म करते) मूळात जुगाराकडे वाईट नजरेनेच पहायला हवं का? हा खरा प्रश्न आहे. मी कसिनोच्या मशीन्स मध्ये पैसे उडवलेत (खात्री पण होती सगळे पैसे हरणार आहे). पण तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन मूल्यांचं सुख पैसे बुडाल्याच्या दु:खा पेक्षा अधिक होतं. पोर्टफोलिओची डाउनवर्ड रिस्क हेज करण्यासाठी मी ऑपश्नस मध्ये पण ट्रेडींग करतो. पण ती काउंटर रिस्क घेतल्यामुळे मला इंडेक्सला आउटपरफॉर्म करण्याची संधी मिळते. (वर म्हटल्याप्रमाणे जुगार हा दरवेळेला आर्थिक असेलच असे नाही. माझे लग्न झालेले मित्र तर मला नेहमी म्हणतात लग्न पण एक जुगार आहे असं म्हणून. ;) असो.)

कुठलीही कृती म्हटली की भावना आल्याच. मग पैशाचे व्यवहार तरी कसे अपवाद असतील. माणसं परफेक्ट रॅशनल डिसिजन मेकर्स नसतात. अगदी साधी एफडी करण्याचा निर्णय घेतला तरी (जस्ट एक उदाहरण म्हणून). त्याला कारणं आहेत. १. सगळी माहिती उपलब्ध नसते. (आजूबाजूला कुठल्या खाजगी/सरकारी बँका आहेत? एफडीवर रेट काय आहेत?) २. बर्‍याच वेळा असलेल्या माहीतीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नसते. (कॉग्निटिव्ह स्किल्स. कुठल्या बँकेची अ‍ॅसेट क्वालिटी चांगली आहे? एनपीए किती आहेत वगैरे). त्यामुळे उपलब्ध माहिती आणि ज्ञान याच्या आधारे माणसं "समाधान होईल" असा जो काही निर्णय घेतात त्याला बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणतात.

प्रॉस्पेक्ट थिअरी आहे बिहेविअरल फायनान्स मध्ये. खूप रोचक आहे. लोक जुगाराकडे-लॉटरी तिकीटांकडे कसे पाहतात त्यावर.

जुगाराचे २ सेट पाहू. पहिल्या सेट मध्ये तुम्ही अ किंवा ब निवडा. दुसर्‍या सेट मध्ये क किंवा ड.

पहिला सेटः
अ) २५% खात्री(प्रोबॅबिलीटी) आहे की तुम्हाला ३००० रुपये फायदा होईल.
ब) २०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये फायदा होईल.

अ) का ब) हे तुमचं उत्तर ठरवा.

दुसरा सेट दोन टप्यांचा आहे.

पहिला टप्पा: ७५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र होणार नाही आणि तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. २५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र व्हाल.

दुसरा टप्पा:
क) १००% खात्री आहे की तुम्हाला ३००० रुपये मिळतील.
ड) ८०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये मिळतील.

क) का ड) हे तुमचं उत्तर ठरवा.

हा सर्वे जेव्हा करण्यात आला तेव्हा धक्कादायक रित्या हे समोर आले की ६५% लोकांनी अ आणि ब पैकी ब निवडला आणि त्याच लोकांपैकी ७८% जणांनी क आणि ड पैकी क निवडला.

गणिताच्या (प्रोबॅबिलिटीच्या) भाषेत अ - क आणि ब - ड हे समसमान आहेत आणि कुणीही रॅशनल माणूस ब किंवा ड निवडेल. कारण त्यांचे एक्सपेक्टेड रिटर्न्स (प्रोबॅबिलिटी * मिळणारा फायदा) सेम आहेत.

अ) ०.२५ * ३००० = ७५०
ब) ०.२० * ४००० = ८००
क) (०.२५ * १.० ) * ३००० = ७५०
ड) (०.२५ * ०.८) * ४००० = ८००

याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते.

१०० रुपये फायदा झाल्यावर २५ क्ष आनंद होणार असेल तर १०० तोटा झाल्यावर २५ क्ष पेक्षा अधिक दु:ख होते म्हणून ही थिअरी असं म्हणते की माणसं रिस्क अव्हर्स पेक्षा लॉस अव्हर्स असतात. जुगाराच्या बाबतीत मिळणारा संभाव्य फायदा हा होणार्‍या संभाव्य तोट्या पेक्षा अधिक अनंदादायी असला तरच माणसं जुगार खेळतात.

याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते.

http://market.subwiki.org/wiki/Isolation_effect इथे आयसोलेशन इफेक्टचे मूलभूत वर्णन दिले आहे.
आपल्या उदाहरणांत आयसोलेशन मधे दिलेली ऑप्शन्स कोणती व बेसलाईन सहित दिलेली कोणती हे स्पष्ट करण्याची विनंती.
======================================

जुगार म्हणजे अमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव.

ज्या गुंतवणूकित एक्सपेक्टेड रिटर्न हे इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे हे खरोखरच सुनिश्चित आहे (तुमचे पैसे जाणार हे म्हणण्याची पद्धत) आणि रिस्क खूप जास्त आहे (मिळाले तरच खूप पैसे मिळणार) अशा गुंतवणूकीला जुगार म्हणता येईल.

सुधीर's picture

14 Jul 2015 - 10:21 pm | सुधीर

पहिल्या सेट मधले दोन जुगार हे बेसलाइन आहेत. पहिल्या सेट मध्ये ब) निवडणे आणि दुसर्‍या सेट मध्ये (दोन्ही पायर्‍या एकत्रित धरून) ड) निवडणे सम-समान आहे. दुसरा सेट दोन पायर्‍यांचा (आयसोलेशन्स) बनविल्याने, पहिल्या पायरी नंतर क) जुगार काही जणांना ड) पेक्षा जास्त आकर्षक वाटतो. (काहीसं कौन बनेगा.. मध्ये 'पडाव' पार केल्यानंतर, जेव्हा एखादं उत्तर १००% माहीत नसते आणि सगळ्या हेल्पलाईन संपलेल्या असतात, तेव्हा काही माणसं कन्फर्म पैसे घेऊन न खेळता एक्झीट मारणं पसंद करतात काहीसं तसचं) वरचं उदाहरण मी सीएफए लेव्हल ३ च्या करीक्युलम बुक मध्ये वाचले होते. [नुकतेच ;) ] म्हणून शेअर केले.

जुगार नेमकं कशाला म्हणावे हे माहीत नाही. जुगार व्यक्तीसापेक्ष असतात असा काहीसा तुमच्याच वरच्या प्रतिसादातला धागा पकडून मी सर्वव्यापक जुगार काय असू शकतो असा विचार केला. कदाचित त्यात काही उणीवा असूही शकतील.