✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शेअर गुंतवणुकीला जुगार म्हणणे योग्य आहे का?

म
मार्मिक गोडसे यांनी
Mon, 03/02/2015 - 16:46  ·  लेख
लेख
माझे बाबा घरूनच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करतात. एके दिवशी बाबांबरोबर मी शेअर ट्रेडिंगचे लाइव ट्रेनिंग घेत असताना बाबांचा मित्र घरी आला, माझ्या डोक्यात टपली मारली व म्हणाला जुगाराचे ट्रेनिंग चाललेय वाटत ? बाबा गालातल्या गालात हसले, त्यांनी आपली खुर्ची स्क्रीनपासून बाजूला घेतली व ट्रेडिंगची सूत्रे माझ्याकडे दिली. मित्राला बसावयास खुर्ची दिली. (बाबांचे हे मित्र विज्ञानाचे पदवीधर होते परंतू गावाकडे वडिलोपार्जित २५-३० एकर शेती होती व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय स्वीकारला आज ते यशस्वी बागायतदार म्हणून ओळखले जातात.) बाबांनी आपला मोर्चा मित्राकडे वळवला. त्यानंतर बाबा व त्यांच्या मित्रामध्ये झालेले संभाषण जेवढे मला कळाले व आठवले ते आपल्यासमोर मांडतो. बाबा : जुगार म्हणजे काय ? मित्र : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते. बाबा : तू कधी जुगार खेळला आहेस ? मित्र : नाही. बाबा : शेअर्समध्ये कधी पैसे गुंतविले आहेस ? मित्र : नाही. बाबा : मग तू शेअर्सच्या ट्रेडिंगला जुगार कसा म्हणतोस ? मित्र : बर्‍याच लोकांनी शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे कमावलेत. काहींनी शेअर ट्रेडिंग मध्ये नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे ऐकले आहे. बाबा : शेतीतही बर्‍याच लोकांनी पैसे कमावलेत व काहींनी शेतीत नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे मीही ऐकले आहे. मित्र : म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे? बाबा : शेती व्यवसायात व शेअर ट्रेडिंग मध्ये बरेच साम्य आहे. मित्र : ते कसे ? बाबा : १) शेती करायला जशी जमीन आवश्यक असते तसे शेअर ट्रेडिंगसाठी demat account ची आवश्यक असते. २) चांगले पिक येण्यासाठी शेताची योग्य ती मशागत करावी लागते ,तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळावा ह्यासाठी अगोदर गुंतवणुकीच्या संदर्भात सखोल अभ्यास करावा लागतो. ३) कोणतेही पिक घेण्यापूर्वी त्या पिकाला पोषक असे हवामान बघितले जाते,त्यानंतर योग्य त्या जातीचे बी निवडले जाते. जास्त उतारा देणारे बियाणे थोडे महाग घ्यावे लागते त्याप्रमाणे चांगला परतावा देणार्‍या कंपन्यांचे शेअर थोडे महाग घ्यावे लागतात. चांगल्या कंपन्या निवडणे हे अभ्यासाने व अनुभवाने ठरवता येते. ४) पिकांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निंदनी ,खुरपणी, खत व रोगापासून बचावासाठी किटकनाशक फवारणी वेळोवेळी करावी लागते. आपल्या portfolio मध्ये एखाद्या कंपनीमुळे गुंतवणुकीचे गणित चुकत असेल तर योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणुकीचा तोल सांभाळण्यासाठी वेळोवेळी portfolio कडे लक्ष द्यावे लागते. ५)शेतमालाचे भाव जसे मागणी व पुरवठा ह्यावर अवलंबून असतात तसेच शेअर्सचे भावही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात. ६) अप्रमाणित बियाणे. खते व कीटकनाशके वापरल्यामुळे जसे शेतीचे नुकसान होऊ शकते त्याप्रमाणे penny stock मध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होऊ शकते. ७) सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊ शकतो तसाच कंपन्यांच्या नफातोट्या वरही होऊन कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावरही होऊ शकतो. ८) जागतिक मंदी,रुपया डॉलरचा विनिमय दर,बँकेच्या कर्जाचा दर,हवामान, नैसर्गिक आपत्ती इ. शेतीवर व शेअरबाजारावर परिणाम होतो. शेअर ट्रेडिंग व शेतीत महत्वाचे फरक म्हणजे १) शेतमाल विकाण्यासाठीच दलाली द्यावी लागते. शेअर्स खरेदी व विक्रीसाठी दलाली द्यावी लागते. २)शेअर्स खरेदी विक्री भावात पूर्ण पारदर्शकता असते. शेतीमाल विक्रीत ह्याचा पूर्ण अभाव. ३)शेअर्स विक्रीत दलाली व कर वगळून खात्यात पैसे जमा होण्याची खात्री असते. शेतीमाल विक्रीत अशी खात्री नसते. ४) खेळते भांडवल उपलब्ध असल्यास शेअर्स ट्रेडिंग अधिक व्यवहार करता येतात. स्वतःच्या मालकीच्या मर्यादित जमिनीमुळे अधिक लागवड करू शकत नाही. ५)शेअरच्या गुंतवणुकीतून नफा होण्यास काळाची मर्यादा नसते, काही सेकांदापासून ते काही वर्षांपर्यंत असू शकतो. शक्यतो पूर्ण वाढ झाल्याशिवाय पिक बाजारात विकता येत नसल्यामुळे नफा कमावण्याची संधी घेता येत नाही. ६)नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे शेतीमालाचे १००% नुकसान होऊ शकते परंतू संकटाची चाहूल लागल्यास stop लॉस लावून शेअर्स विकून तोटा कमी करता येतो व १००% नुकसान टाळता येते. मित्रा आता तूच सांग जुगार कोण खेळतोय ते ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
19002 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

ज्यात एकतर भरपूर फायदा होतो

मार्मिक गोडसे
Wed, 07/08/2015 - 12:02 नवीन
ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते असा जुगार ह्या शब्दाचा अर्थ. स्टॉप लॉस मुळे शेअरमधील गुंतवणूक जुगार ठरत नाही. फ्युचर आणि ऑप्शन हे प्रोडक्ट खरे तर आपल्या पोर्ट्फोलिओच्या संरक्षणाकरिता वापरले गेले पाहीजे, एखादा त्याचा वापर फक्त ट्रेडिंगसाठी स्टॉप लॉस (हे महत्वाचे) न लावता करत असेल तरच तो जुगार ठरू शकतो अन्यथा नाही. जसा एखाद्या कंपनीच्या फ्युचर व ऑप्शनने त्या मूळ कंपनीला काही फायदा होत नाही तसा कमोडिटीतील वायदा व्यवहारानेही मूळ शेतीला काहीही फायदा होत नाही. तेथेही गोदामात माल कमी असताना ज्यादा मालाचे व्यवहार होतात.
  • Log in or register to post comments

हो, पण ते शेती हा व्यवसाय

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 12:27 नवीन
हो, पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत. सट्टेबाज करत असतात. सट्टेबाजांसाठी कमोडीटी, मेटल्स, शेअरबाजार यात काहीही फरक नाही. तुम्ही आता तेलाच्या भावानुसार व्यापा-याकडे दहा लाख जमा करा आणि दिवाळीतल्या भावानुसार वरचा नफा काढून घ्या. त्यासाठी तेल विकत घेण्य़ाची गरज नाही. या व्यापाराशी शेतीचा काहीच संबंध नाही. स्टॉप लॉस हे प्रिव्हेन्टीव्ह मेजर आहे. एकंदर बाजारावर नियंत्रण आणण्य़ाचे साधन नाही. बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

पण ते शेती हा व्यवसाय

मार्मिक गोडसे
Wed, 07/08/2015 - 14:16 नवीन
पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत.
करू शकतात आणि करतातही. राजस्थानातील ठरावीक समाज शेती,साठवणूक,व्यापार व कमोडिटी ट्रेडिंग करतात उदा. गवार उत्पादन.
बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.
असे मी कुठे म्हटलेच नाही. जो गुंतवणूक करतो तो स्टॉप लॉस लावणार, प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्टॉप लॉस वेगळा असणार त्यामुळे साहजिकच बाजाराची घसरण रो़खण्याशी त्याचा संबंध येउ शकत नाही.
  • Log in or register to post comments

उपप्रतिसाद देताना लेख दिसत

arunjoshi123
Wed, 07/08/2015 - 16:29 नवीन
उपप्रतिसाद देताना लेख दिसत नाही, अन्य प्रतिसाद दिसत नाहीत, म्हणून ... =======================================================================
शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली.
सहमत. अशी तुलना अनाठायीच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या अर्थहिन आहे. हायपोथेटिकली, कोणी शेतकरी आपली "शेत लिमिटेड" ही कंपनीच लिस्ट करू शकतो. मग प्रत्यक्ष शेती करणे आणि शेत लिमिटेडचे समभाग खरीदणे, विकणे यात तुलना करणे म्हणजे वेल्डींग, मशिनिंग करणे आणि टाटा मोटर्सचे समभाग घेणे यांत तुलना केल्यासारखे आहे. मूळ लेखाच्या लेखकाचा उद्देश वेल्डर आणि टाटा मोटर्सच्या समभागांची देवाण घेवाण करणारा यांची आर्थिक/मौलिक तुलना करण्याचा दिसला. गुंतवणूक वा उपजिविका ही कंझर्वेटीव अप्रोचवर आधारित, मानवी गरजा भागवायच्या कृतींना समांतर जाणारी, एखाद्या तुक्क्यात आपल्या संपत्तीचे बरेवाईट न करणारी अशी असावी. शेती व समभागबाजार यापैकी काय असं आहे, काय नाही, इ इ. त्या अंगाने मी वरील विचार मांडले होते. =====================================================================
पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे
पंटर्स माहिती, अभ्यास इ इ नसलेले आहेत असे सिद्ध झालेले असतानाही, केवळ ट्रेड वाढवण्यासाठीच्या त्यांच्या कृतींना बळी पडत, पैसे गुंतवणे नक्कीच चूक आहे. पण इंट्रिन्सिकली व्यवसायात सल्ला घेण्यात काही अनिष्ट नसावे. ========================================================================
ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील.
भाग १: या विधानावर आपण पुनश्च सुक्ष्म विचार करावा (वा मला करायला लावावा) अशी विनंती आहे. प्रत्येक व्यवसायात भांडवल - गुंतवणूक - प्रोजेक्ट - ऑपरेशन -उत्पादन - होलसेल- रिटेल (ट्रेडिंग)-उत्पन्न अशी साखळी असते. किमान असल्या ट्रेडिंग अ‍ॅक्टीवीटीवर अर्थातच कोणाचेही काही ऑब्जेक्शन नसायला हवे. शेअरबाजारातली शेअर्सची ट्रेडिंग अर्थातच या ट्रेडिंगपेक्षा खूप भिन्न आहे हे मान्य करूयात. शेअरबाजारातली दीर्घकालीन गुंतवणूक बुद्ध्या व्यवसाय केल्याप्रमाणेच आहे आणि तिच्यासाठी आपल्याला आदर आहे हे प्रतिसादात दिसते. पण कंपन्यांच्या व्यवसायांच्या मालकीच्या अल्पशा अंशांची रोजच्या रोज खरेदी विक्री करणे मौलिक आहे का, जुगार आहे का, बेकायदेशीर असावे का, अर्थकारणासाठी अनिष्ट आहे का, इ इ प्रश्न पडणे साहजिक आहे. हा चर्चेचा विषय आहे. ------------------------ भाग २: त्यापूर्वी आपण थोडे स्टॅट्स पाहू. १. भारतात २.५ कोटी पब्लिक शेअरट्रेडर्स असावेत. (फार नक्की आकडा शोधण्यात अर्थ नाही.) २. साधारणतः ५५०० कंपन्या लिस्टेड आहेत. ३. इथे खाली एका टेबलमधे २००७ मधे पब्लिक शेअर होल्डिंग १३% होती असे लिहिले आहे. http://finmin.nic.in/reports/Discussion%20Paper%20Public%20Holdings.htm ४. या टेबलमधल्या अन्य बर्‍याच फंडांचे अंतिम मालक सामान्य लोक आहेत. जसे, म्यूच्यूअल फंड. ५. इथे सार्‍या लिस्टेड भारतीय कंपन्यांना २०१४/२०१७ पर्यंत किमान पब्लिक होल्डींग २५% आवश्यक आहे/असेल असे लिहिले आहे. http://articles.economictimes.indiatimes.com/2014-10-09/news/54827541_1_30-listed-psus-public-shareholding-cent-public-holding मालकीच्या इतक्या व्यापक बाजारात ट्रेडर्स नसले तर ...? ----------------------- भाग ३: इथे मी प्रो- शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंग काही आर्ग्युमेंट्स करायचा प्रयत्न करतो. १. मला दीर्घकालीन गुंतवणूक कळते असे मानले तरी माझ्याकडे कधी पैसे आहेत नि कधी पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे हे बिंदू जुळतील का? कधी पैसे काढायचे नि कधी पैसे घरी हवे आहेत हे बिंदू जुळतील का? हे शेवटपर्यंत जुळलेच नाही तर मी शेअरबाजारात गुंतवणूक करूच नये कि काय? २. रोजच्या रोजच आर्थिक जगात आणि आर्थिक जगाबाहेर एकूणच (पर्यायाने एकूणच शेअरबाजारावर) ज्या घटना घडतात त्याचे सुक्ष्म वा मोठे, लघुकालीन (वा दीर्घकालीन -पण इथे रिडंडंट) परिणाम व्यवसायांवर (पर्यायाने शेअरच्या किमतीवर) होत नाहीत काय? काही लोकांना दीर्घकालाची अंधता असू शकते पण लघुकालाची दृष्टी शार्प असू शकते. ३. दीर्घकालाची गुंतवणूक खूप अनालिसिस नंतर होते. आदर्शतः अनालिस्टांच्या नुसार कधी गुंतवणूक करायची नि कधी काढून घ्यायची याबद्दलचा निष्कर्ष सगळ्यांप्रमाणे समान निघण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे लवकरच आकर्षक एन्ट्री प्राईस वाढून अनाकर्षक होणार. म्हणजे बाजाराची दिशा एकच -वर. किंवा उलटे. मग दीर्घकालीन गुंतवणूकदारांपेक्षा रिस्कच्या आणि परताव्याच्या वेगळ्या अपेक्षा असणारांचे काय? वास्तविक ट्रेडर्स हे आपल्या भिन्न प्रकारच्या अप्रोचमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराला लिक्विडीटी प्रोवाइड करून देतात. हा खूप महत्त्वाचा रोल आहे. ४. प्रोमोटर्स, इ ची होल्डींग सोडली तर उरलेल्या भागात अनेक फंडांच्या रुपात सामान्य लोकांची अप्रत्यक्ष होल्डींग खूप असते. म्हणून इथे "रेग्यूलर प्राइस डिस्कवरी" होत राहणे गरजेचे असते. ट्रेडर्स नसतील तर हे असंभव वाटते. ५. लघुकालीन ट्रेडींग हे तुम्ही जे पैसे हरवणे अफोर्ड करू शकता त्यावरच करणे अभिप्रेत आहे. ती संपूर्ण उपजिविका म्हणून अभिप्रेत नाही. ७. अंततः- मला जो गाडेवाला टमाटे विकतो, त्या टमाट्यांचे रिटेल भाव देखिल सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतात. तरीही तो त्याने ज्या किमतीला टमाटे घेतले आहेत त्यावर बिझनेस करतो. कारण आपल्याला नफा होईल असा व्यवहार होईल अशी त्याची अपेक्षा असते. मग एखाद्या फायनान्शियल इंस्ट्रूमेंटमधे ट्रेड करणे विशेष गैर का मानावे? इथे अर्थातच मी अशा ट्रेडींगमधे गैरव्यवहार करणारे लोक सोडून बोलत आहे. गैरव्यवहारावरील टिका आणि व्यवसायावरील टिका हे भिन्न मुद्दे आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. =========================================================== भाग ४: लघुकालीन ट्रेडिंग जुगार मानता येणार नाही. कारण जुगारासाठी जे रिस्क रिटर्न काँबो आहे, तसा प्रकार ट्रेडिंगमधे होत नाही. शेअरचे मूल्य कंपनीच्या मूल्यावर आधारित आहे. ट्रेडिंग गुंतवणूकदारांच्या भावना, अभ्यास, इ इ कितीही हेलकावे खात असल्या तरी त्यांना एक आधार आहे. १०० रुपयाचा शेअर २-३ दिवसात कोणत्या बँडमधे राहिल याला बर्‍यापैकी मर्यादा आहे. इथेही होत्याचा नव्हता होणे प्रकार होतो, पण तो अन्यत्र सर्व व्यवसायांत देखिल होतो. शॉर्ट टर्म ट्रेडिंग मूर्खपणाने कसेही करणारे अनेक जण असतात हा भाग वेगळा, पण त्यामुळे तो प्रकार जुगार ठरत नाही. अन्य लोक तो व्यवस्थित करत असतात. ------------------------------------- भाग ५- इथे आपण ट्रेडिंगच्या कायदेशीर/बेकायदेशीरपणा बद्दल पाहू. जुगाराचं स्वरुप (रिस्क -रिटर्न काँबो) भलतंसलतं असतं. १. छापा पडला तर अर्धे राज्य आणि राजकुमार/री आणि काटा पडला तर एक मिनिटात शिरच्छेद. २. हा खेळ खेळणे बंधनकारक नाही. ३. हा खेळ खेळायला १ रु द्यावा लागेल. इथे असला जुगार मानवतेच्या मौलिक अंगांना स्पर्श करतो. शुद्ध जुगार हा आर्थिक, म्हणजे मूल्यवाचक असायला हवा, मौलिकतावाचक नाही. जुगारात जसा माणूस बरबाद होतो तसा व्यवसायातही होतो. दोहोंत फरक काय? कदाचित तडकाफडकीचा! धुंदीच्या क्षणी आयुष्य बर्बाद करून घ्यायच्या जागा देशात नसाव्यात असे सरकारला वाटू शकते. तिथे बंदीचा विचार करता येईल. बाजारात अव्वाच्या सव्वा जास्त रिस्क आणि अव्वाच्या सव्वा रिटर्न असा काँबो गुंतवणूक ऑफर करण्याचा नि अशी गुंतवणूक स्वीकारण्याचा अपेटाईट असू शकतो. मग पहिला प्रश्न असा आहे कि शॉर्ट टर्म ट्रेडिंग असला प्रकार आहे का? दुसरा प्रश्न असा आहे कि सरकारने त्याला नियामित करावे काय वा एका मर्यादेबाहेर असा अपेटाईट, बाजार बेकायदेशीर ठरवावा काय? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना लघुकालीन ट्रेडर्सना नेहमी तोटा होता नि नेहमी तो दुसर्‍या (promoters and institutional investors)प्रकारच्या गुंतवणूकदारांना अक्र्यू होतो असे आहे काय? असे झाले असते हे मार्केटच संपले असते. आणि हे लोक जुगारी आहेत आणि लॉस झाला तरी कधी ना कधी फायदा मिळेल म्हणून जुगारी वृत्तीने पैसे लावत असतात असे म्हणावे तर या गुंतवणूकीत तशी अव्वाच्या सव्वा काय सव्वा देखिल रिटर्न मिळत नाहीत. प्रोमोटर्स इ इ ची पार्टी चालली असताना त्यांच्यातले दाणे वेचणारे हे छोटे उंदीर आहेत. स्टॉक मार्केट हा झीरो सम गेम नाही. यात जुगारी फायदा अजिबातच नाही. या मार्केटचे सरासरी रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट १% ते २५% (वार्षिक) यामधे काहीतरी असेल. (मला कल्पना नाही.) आता उरतो प्रश्न दिवसाला ५% ते ८% (सेलिंग पोहोचेपर्यंत) बदल झाला तर रिटर्न किती मिळाले. दिवसाला ५% म्हणजे वर्षाला १८ पट परतावा!!!! १८००% रिटर्न!!!!! इथे तो जुगार वाटायला चालू होतो! पण असा हिशेब करणे चूक आहे. हे गेन्स नंतर पुसले जातात नि मार्केटच्या सरासरी इतकेच रिटर्न मिळते. त्सुनामीच्या उंचीवरून भरतींची उंची मोजू नये. अगदी दुकानात माल विकताना १० सेकंदांत १००रुच्या मालावर १० रुपये मिळाले तर आपण रिटर्न तशी मोजतो का? पूर्ण महिन्यात काय होते ते पहायला पाहिजे. पहिला प्रश्न (हा प्रकार जुगार आहे का?) इथे सोडवला जातो व दुसरा (बेकायदेशीर, अनैतिक ठरवावा काय?) उद्भवत नाही. =================================================================== वायदा बाजार - समजा एका शेअरचा भाव आज ३००० रुपये आहे. तो शेअर ३ दिवसांनी ३१०० चा होणार याची मला खात्री आहे (वाटते). नाही झाला तर जो काही तो तोटा सहन करण्याची माझी इच्छा नि पात्रता आहे. पण माझ्याकडे रुपयेच ३०० आहेत. माझे हे ज्ञान वाया जावे का? मी बाजारापासून दूर राहावे का? हे झाले सामान्य बाजाराचे चित्र. कोणी जण ३ दिवसांनी हा शेअर आज ३० रु प्रिमियम घेऊन (म्हणजे ३०३० ला), बाजारात काही किंमत असेना, विकायचे प्रॉमिस करतोय. वायदा बाजारात ट्रेडिंग करण्याची सामान्य माणसाची अफोर्डेबिलिटी वाढते. मग तो चांगला का वाईट? ============================================ मी इथे केवळ, शॉर्ट टर्म शेअर ट्रेड नि जुगार इतक्याच विषयावर तांत्रिक मतांतरे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संक्षेपात मत न मांडता येणे हा दोष मान्य आहेच. शॉर्ट टर्म शेअर ट्रेड मधले गैरव्यवहार नि अन्य बाबींवरची आपली मते यांचेशी सहमती आहे.
  • Log in or register to post comments

शेती, शेअर बाजार आणि जुगार या

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 21:17 नवीन
शेती, शेअर बाजार आणि जुगार या तिन्ही धंद्यात प्रावीण्य मी मिळवलेले नाहीये. तुमचा अभ्यास दांडगा आहे याची नोंद घेतो.त्याबद्दल कौतुक. तुलनेचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे याबद्दल धन्यवाद. खूप खोलात जाण्याची आवश्यकता नाही. गुंतवणूक आणि त्रेडींग यात फरक आहे असं माझं मत आहे. हाय रिस्क हाय गेन हे सूत्र कुठल्याही धंद्याला लागू होतं अ, त्यामुळे लिमिटेड रिस्क घेतली तर नुकसानीची शक्यता कमी होते त्याचप्रमाणे फायदा ही कमी होतो. जुगारात, रेसमधेही नियमित फायद्यात असणारे लोक पाहण्यात आहेतच. त्यांची मतं वेगळी असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मूळात जुगाराकडे वाईट नजरेनेच पहायला हवं का?

सुधीर
गुरुवार, 07/09/2015 - 10:44 नवीन
@arunjoshi123 दोन्ही दीर्घ प्रतिसाद आवडले. फ्यूचर/ऑपश्न आणि इंट्राडे ट्रेडींग या दोन्हींच्या उपयुक्ततेबद्धल मी सहमत आहे. जुगार म्हणजेअमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव. या न्यायाने केवळ शॉर्ट टर्म शेअर ट्रेडींगच नव्हे इक्विटी मधली लाँग टर्म गुंतवणूकीलाही जुगार म्हणता येईल. (एक ऑड आउटकम असे आहे की, एका ठराविक पाच वर्षात एफडी निफ्टीला आउट-परफॉर्म करते) मूळात जुगाराकडे वाईट नजरेनेच पहायला हवं का? हा खरा प्रश्न आहे. मी कसिनोच्या मशीन्स मध्ये पैसे उडवलेत (खात्री पण होती सगळे पैसे हरणार आहे). पण तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन मूल्यांचं सुख पैसे बुडाल्याच्या दु:खा पेक्षा अधिक होतं. पोर्टफोलिओची डाउनवर्ड रिस्क हेज करण्यासाठी मी ऑपश्नस मध्ये पण ट्रेडींग करतो. पण ती काउंटर रिस्क घेतल्यामुळे मला इंडेक्सला आउटपरफॉर्म करण्याची संधी मिळते. (वर म्हटल्याप्रमाणे जुगार हा दरवेळेला आर्थिक असेलच असे नाही. माझे लग्न झालेले मित्र तर मला नेहमी म्हणतात लग्न पण एक जुगार आहे असं म्हणून. ;) असो.) कुठलीही कृती म्हटली की भावना आल्याच. मग पैशाचे व्यवहार तरी कसे अपवाद असतील. माणसं परफेक्ट रॅशनल डिसिजन मेकर्स नसतात. अगदी साधी एफडी करण्याचा निर्णय घेतला तरी (जस्ट एक उदाहरण म्हणून). त्याला कारणं आहेत. १. सगळी माहिती उपलब्ध नसते. (आजूबाजूला कुठल्या खाजगी/सरकारी बँका आहेत? एफडीवर रेट काय आहेत?) २. बर्‍याच वेळा असलेल्या माहीतीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नसते. (कॉग्निटिव्ह स्किल्स. कुठल्या बँकेची अ‍ॅसेट क्वालिटी चांगली आहे? एनपीए किती आहेत वगैरे). त्यामुळे उपलब्ध माहिती आणि ज्ञान याच्या आधारे माणसं "समाधान होईल" असा जो काही निर्णय घेतात त्याला बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणतात. प्रॉस्पेक्ट थिअरी आहे बिहेविअरल फायनान्स मध्ये. खूप रोचक आहे. लोक जुगाराकडे-लॉटरी तिकीटांकडे कसे पाहतात त्यावर. जुगाराचे २ सेट पाहू. पहिल्या सेट मध्ये तुम्ही अ किंवा ब निवडा. दुसर्‍या सेट मध्ये क किंवा ड. पहिला सेटः अ) २५% खात्री(प्रोबॅबिलीटी) आहे की तुम्हाला ३००० रुपये फायदा होईल. ब) २०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये फायदा होईल. अ) का ब) हे तुमचं उत्तर ठरवा. दुसरा सेट दोन टप्यांचा आहे. पहिला टप्पा: ७५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र होणार नाही आणि तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. २५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र व्हाल. दुसरा टप्पा: क) १००% खात्री आहे की तुम्हाला ३००० रुपये मिळतील. ड) ८०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये मिळतील. क) का ड) हे तुमचं उत्तर ठरवा. हा सर्वे जेव्हा करण्यात आला तेव्हा धक्कादायक रित्या हे समोर आले की ६५% लोकांनी अ आणि ब पैकी ब निवडला आणि त्याच लोकांपैकी ७८% जणांनी क आणि ड पैकी क निवडला. गणिताच्या (प्रोबॅबिलिटीच्या) भाषेत अ - क आणि ब - ड हे समसमान आहेत आणि कुणीही रॅशनल माणूस ब किंवा ड निवडेल. कारण त्यांचे एक्सपेक्टेड रिटर्न्स (प्रोबॅबिलिटी * मिळणारा फायदा) सेम आहेत. अ) ०.२५ * ३००० = ७५० ब) ०.२० * ४००० = ८०० क) (०.२५ * १.० ) * ३००० = ७५० ड) (०.२५ * ०.८) * ४००० = ८०० याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते. १०० रुपये फायदा झाल्यावर २५ क्ष आनंद होणार असेल तर १०० तोटा झाल्यावर २५ क्ष पेक्षा अधिक दु:ख होते म्हणून ही थिअरी असं म्हणते की माणसं रिस्क अव्हर्स पेक्षा लॉस अव्हर्स असतात. जुगाराच्या बाबतीत मिळणारा संभाव्य फायदा हा होणार्‍या संभाव्य तोट्या पेक्षा अधिक अनंदादायी असला तरच माणसं जुगार खेळतात.
  • Log in or register to post comments

याला केनमन ने "आयसोलेशन

arunjoshi123
Tue, 07/14/2015 - 13:48 नवीन
याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते.
http://market.subwiki.org/wiki/Isolation_effect इथे आयसोलेशन इफेक्टचे मूलभूत वर्णन दिले आहे. आपल्या उदाहरणांत आयसोलेशन मधे दिलेली ऑप्शन्स कोणती व बेसलाईन सहित दिलेली कोणती हे स्पष्ट करण्याची विनंती. ======================================
जुगार म्हणजे अमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव.
ज्या गुंतवणूकित एक्सपेक्टेड रिटर्न हे इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे हे खरोखरच सुनिश्चित आहे (तुमचे पैसे जाणार हे म्हणण्याची पद्धत) आणि रिस्क खूप जास्त आहे (मिळाले तरच खूप पैसे मिळणार) अशा गुंतवणूकीला जुगार म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

थोडक्यात

सुधीर
Tue, 07/14/2015 - 22:21 नवीन
पहिल्या सेट मधले दोन जुगार हे बेसलाइन आहेत. पहिल्या सेट मध्ये ब) निवडणे आणि दुसर्‍या सेट मध्ये (दोन्ही पायर्‍या एकत्रित धरून) ड) निवडणे सम-समान आहे. दुसरा सेट दोन पायर्‍यांचा (आयसोलेशन्स) बनविल्याने, पहिल्या पायरी नंतर क) जुगार काही जणांना ड) पेक्षा जास्त आकर्षक वाटतो. (काहीसं कौन बनेगा.. मध्ये 'पडाव' पार केल्यानंतर, जेव्हा एखादं उत्तर १००% माहीत नसते आणि सगळ्या हेल्पलाईन संपलेल्या असतात, तेव्हा काही माणसं कन्फर्म पैसे घेऊन न खेळता एक्झीट मारणं पसंद करतात काहीसं तसचं) वरचं उदाहरण मी सीएफए लेव्हल ३ च्या करीक्युलम बुक मध्ये वाचले होते. [नुकतेच ;) ] म्हणून शेअर केले. जुगार नेमकं कशाला म्हणावे हे माहीत नाही. जुगार व्यक्तीसापेक्ष असतात असा काहीसा तुमच्याच वरच्या प्रतिसादातला धागा पकडून मी सर्वव्यापक जुगार काय असू शकतो असा विचार केला. कदाचित त्यात काही उणीवा असूही शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा