विषाणू

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
6 Dec 2014 - 2:07 pm

मनोगत

दूरच्या काळात, मंगळावर घडलेली ही कथा. अर्थात, त्यावेळी मराठी किंवा इतर भाषा नव्हत्या. थांबा, तुम्ही नीट समजावून घेतले नाही बहुदा! इतर भाषा नव्हत्या, म्हणजे, भाषाच नव्हत्या. माणसे होती, पण ती देखील आज आपल्याला समजणार नाहीत अशी! जेथे ही कथा घडली तेथे माणूस होता, पण त्याला ना मन होते, ना भाषा! जे काही होते, ते कालच्या काळापेक्षा खुपच वेगळे, आपल्या समजण्याच्या बाहेरचे. म्हणून, आजच्या वाचकांसाठी त्यांना समजेल अशी सादर केली आहे.
----------------------------------

उपोद्घात
मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्

आत्मा जेव्हा ज्ञान आणि भावना ह्या दोन्हींचा संपर्क तोडतो तेव्हा त्याला एक असीम शांतीची अनुभुती होते. अशी अनुभुती भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाच्या एका क्षणात झाली. मानवाला बंधक करणा-या दोन गोष्टी - ज्ञान आणि मन ह्यांवर पूर्णत: विजय मिळविणे म्हणजेच महापरिनिर्वाण. मर्त्य मानवांमधे फ़क्त भगवान बुद्धांनाच ते साधले होते.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}}{}

विषाणू निवारक केंद्रात सिंतूर आणि गॆबी हे दोन विषेश अधिकारी एका महत्वाच्या चर्चेसाठी एकत्र आले होते. एरवी सगळे काम घरी बसूनच व्हायचे. पण गुप्तता पाळायची असली की भेटीमधूनच चर्चा होत. मंगळ मानवाच्या अस्तित्वालाच धोका पोहोचू शकेल अशा काही शक्यता समोर आल्या होत्या. त्या विषयी अधीक संशोधन करण्यासाठी म्हणून पृथ्वीवर काही पेशंटसना पाठवून तिथल्या वातावरणात काही नोंदी करणे आवश्यक होते. हे सगळे कसे करायचे ह्याचे प्लानींग करण्यासाठी आजची मिटींग होती.

“तू पेशंटची यादी तयार केली आहेस नां” सिंतूरनी गॆबीला विचारले.
गॆबीने सगळी नावे सिंतूरमधे उलगडली.
एकेक करून त्या पेशंटसची सगळी माहिती सिंतूरनी तपासली. मेंदूचक्रवात निवारक फ़वारे घेणारे लोक. कमी अधीक प्रमाणांत त्रास होणारे. सगळे व्यवस्थितच होते.
आता ह्यामधे कंट्रोल ग्रुप म्हणून हा त्रास नसणारे दोन तीन लोक घातले की की लिस्ट पूर्ण होईल. “कंट्रोल ग्रुप म्हणून निरोगी अशा कोणाचे नांव सुचविले आहेस कां?” सिंतूरनी विचारले.
“नाही अजून. पण तो काही प्रॊब्लेम नाही. पृथ्वीवर इतक्या कालानंतरची पहिलीच ट्रीप ही! पुष्कळ लोक तयार होतील...” खिडकीकडे पहात थोड्याशा तंद्रीमधेच गॆबी म्हणाला...”मी देखील तयार आहे!”
सिंतूरने त्याच्याकडे रोखून पाहिले. महत्वाचे काम समोर पडले असतांना गॆबीचा असला विनोद त्याला आवडला नाही. “ हे पहा, हे धोक्याचे काम आहे. तिथून आल्यावर तुला काही त्रास सुरू झाला तर?”
चांचणी ग्रुप संबधित इतर तयारी झाल्यावर दोघांनी मिळून कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला.

इरा सत्तराव्या मजल्यावरील बाल्कनीत शांतपणे डोळे मिटून बसली होती. खाली वेगळाल्या उंचींवर जोडलेल्या इमारतींचे जाळे पसरले होते. त्या जाळ्यामधून सुळकन इकडून तिकडे जाणारी हवाई वाहने. त्यामधून आपापल्या कामाच्या जागी जाणारे लोक. नेहमीचेच द्र्ष्य! वर संपूर्ण आकाशावर कायम संरक्षक चादर पांघरलेली. त्यातून अंधुक दिसणारे बाहेरचे आकाश!. आणि कायम खुणावणारा पृथ्वीचा बारीक निळा ठिपका!
इतक्यात मंगळ समाचारचे पत्रक डोक्यात उलगडले गेले. “खूप काळानंतर पृथ्वीवर प्रवासी यात्रा सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पुर्वी तेथे काही अपघात झाले होते. प्रवासी कंपन्यांनी पृथ्वीवर यात्रा सुरू कराव्या अशी संघटित विनंती केली होती. सरकारने अपघातामागील कारणे पुन्हा तपासली. काढलेल्या निष्कर्शाप्रमाणे निवडक प्रवासी कंपन्यांना तेथे मोहीमा नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.”
मेंदूमधे उमटलेल्या स्त्रोतांनी इराच्या न्युरल वेब मधे जुने वादळ भणाणले. तीच गच्च्पणाची भावना! जणू प्रचंड भोवरे गच्चपणाचा बांध तोडून बाहेर उसळायला लागणार आहेत अशी. इराने पटकन उठून नाकात न्युरल स्प्रे मारला. न्युरॊन्सला शांत करणारे द्रव्य काम करू लागले. इराला लगेच बरे वाटले. इराला अधुनमधून “मेंदूचक्रवा्ताचे” झटके यायचे. मंगळावरील साधारण १० टक्के लोकांना मेंदुचक्रवाताचा त्रास होता. आदिम मानवाच्या जीन्समधील बाधित भाग काही लोकांमधे मधूनच प्रभाव दाखवायचा. डॊक्टरांनी इराला सांगितले होते त्रास झाल्याबरोबर न्युरल स्प्रे नाकात फ़वारला की ताबडतोब बरे वाटेल. फ़वारा मारताच इरा सावरली. पृथ्वीवर प्रवासी मोहीम घेऊन जायला मिळू शकेल ह्या विचाराने ती खूप उत्साहित झाली.

“आकाशगंगा पर्यटन” ही मंगळावरची एक यशस्वी पर्यटन कंपनी होती. कंपनीच्या व्यवस्थापकांमधे ईरा ही जास्त अनुभवी होती. पृथ्वीवर पुढची सहल नेण्याचा ब्रेनोग्राम इरांत उमटला. तिच्या अत्याधुनिक जीवाट्रॊनिक्स वेगाने काम करू लागल्या. “पुरातन मानवाचा इतिहास” हा तिचा विषेश अध्ययनाचा विषय होता. पृथ्वीवर प्रवासी घेऊन जायला तिला आवडले असते. पण मंगळाचा अधिपती रुद्रमणीने पृथ्वीवर प्रवासी मोहिमा नेण्यास बंदी घातली होती. आधी अशा प्रवासी मोहीमा निघायच्या. एका मोहिमेत अपघात झाल्यानंतर अधिपतीनी पृथ्वी मोहिमांवर पूर्ण बंदी घातली होती. अपघाताची सगळी माहिती लष्करी कायद्यांनुसार गुप्त ठेवली गेली होती.

इराने आजचा ब्रेनोग्राम पुन्हा उलगडला. “पृथ्वीवर पंधरा प्रवाशांची सहल न्यायची आहे. उद्या संध्याकाळी ऊड्डाण केंद्रात हजर व्हा. प्रवासाचे माहिती पत्र आणि सुरक्षेच्या सुचना गाभ्यातील नेहमीच्या ठिकाणी आहे. तो उलगडून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.” याचा अर्थ हा होता की पर्यटन कंपन्यांच्या लॊबींगला दाद देऊन अधिपती रुद्रमणी-संकुलाने पृथ्वी पर्यटनाला परवानगी दिली होती.

इरा भराभरा तयारीला लागली. खूप कामे समोर पडली होती. पृथ्वीवर पहिली प्रवासी मोहीम नेण्याच्या जबाबदारीचे नियोजन कसे करायचे ह्याची तिला पूर्ण कल्पना होती. पण अचानक समोर ठाकलेल्या कार्यभाराने तिच्या पोटात खड्डा पडला. पौष्टीक कारंज्यामधून उर्जा भरून घेताच तिला तरतरी आली. मोहिमेत येणा-या प्रवाशांना सुचना पाठवून झाल्या. मोहिमेच्या आवश्यक माहितीची कार्डे अधिपतींच्या कक्षात फ़ाईल केली. तिने बॊसला अल्फ़ा-नळी जोडली. त्याच्याशी सगळा संवाद नेहमीप्रमाणे घरी बसूनच साधता येणार होता. पण तो म्हणाला, माझ्या ऒफ़ीसमधेच ये.

हे एकताच इराला थोडे आश्चर्यच वाटले. ऒफ़िसमधे कामाला जाण्याची वेळ फ़ारच थोड्या प्रसंगी यायची. आज बॊसने अल्फ़ा-नळीवर सुचना न देता भेटायला बोलावले, म्हणजे महत्वाची मिटींग असणार. इराने कपबोर्डमधे टांगलेला वेलीपानांपासून बनलेला झगा निवडला. पृथीवर म्हणे अशा वेली, फ़ुले जमिनीवर उगवावी लागायची! किती मागसलेले आणि अडाणी लोक होते ते! इथे तर पाहिजे तशी फ़ुले, वनस्पती, अगदी मोठाले वृक्ष देखील अणुछापकामधून दहा मिनीटांत छापून मिळतात. प्लास्टोफ़्लाबनी छापलेली विविध आकाराची रंगीबेरंगी फ़ुले, वेली. घराघरात आणि बाहेर मौल्समधे, रस्त्यावर सगळीकडे हीच वनराई पसरलेली. महिन्यापुर्वीच इराने सभारंभासाठी असावा म्हणून फ़ुलापानांचा इविनींग झगा आणला होता.

“हे पहा इरा, मला काहीही घोटाळे नकोत. ही पहिली मोहीम अगदी छान झाली पाहिजे. कंपनीचे भवितव्य ह्यावर विसंबून आहे. पृथ्वी पर्यटनातून अमाप निधी उपलब्ध होणार आहे. कंपनीसाठी तसेच अधिपतींसाठी तो फ़ार महत्वाचा आहे. मला प्रवाशांकडून कुठल्याही तक्रारीं नकोत. तसेच अधिपतींकडून देखील नियम मोडले गेल्याची पत्रे नकोत. प्रवासी खूष व्हावेत म्हणून आपण एक खास परवानगी घेतली आहे. अंभिक सरोवराला लागून असलेल्या रिसॊर्ट मधे तुमची उतरण्याची सोय आहे. हा भाग फ़क्त सरकारी अधिका-यांसाठी राखून ठेवलेला आहे. पण केवळ आपल्या कंपनीसाठी तो मिळविण्यात मी यशस्वी झालो. पाचव्या वैश्विक युद्धात नष्ट होण्याआधीची पर्वतराजी, सरोवरे आणि वनराई तिथे खास प्रवाशांसाठी निर्माण केली आहे. आसपास दीड हजार अंतराघ्रांपर्यंत आदिवासींचा मागमूस देखील नाही. पुरातन काळातील राहणी कुठल्याही धोक्याशिवाय बघता येईल. तसेच जमिनीत लागवड केलेल्या पदार्थांपासून आदिवासी पद्धतीने शिजविलेली उर्जा तुम्हाला तिथे घेता येईल. आपल्या उर्जा कारज्यांपेक्षा हा वेगळा प्रकार प्रवाशांना नक्कीच आवडेल.”

शिजविलेले अन्न तोंडात चाऊन आदिम मानवाप्रमाणे उर्जा मिळवायच्या कल्पनेने इराला हसू फ़ुटले. एरवी कारंज्यामधून उर्जा घेऊन तरतरी मिळविणारे दहा-पंधरा मंगळ मानव कुठलासा हिरवा चोथा चघळून पोटात ढकलताहेत. कसे वाटेल? पण पुरातन काळात थोडावेळ डोकाविण्यापुरते ठिक आहे! “सर तुम्ही काळजी करू नका. मी सगळे व्यवस्थित बघेन.”
“मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी तुला पाठवित आहे. मात्र माझा विश्वास धुळीत मिळवू नकोस. तिथून काहीही वस्तू इथे आणायची नाही हा महत्वाचा नियम, तू आणि सगळे प्रवासी पाळतील ह्याची जबाबदारी तुझी आहे. कुठलेही विषाणू इथे येऊ नाहीत ह्यासाठी अधिपती मंडळ जागरुक आहे”
इराने पुन्हा एकदा कंपनी अधिका-यांना खात्री दिली की ती सगळ्या नियमांचे काटेकोर पालन होते आहे ह्याकडे लक्ष देईल.

पृथ्वी यात्रा सुरू झाली. इराने आपला सगळा प्रवासी गट नीट बघून घेतला. पाच तरुण, चार तरुणी, दोन वरिष्ठ नागरिक, आणि चार किशोरवयीन असे सहकारी प्रवासी होते. यानात बसल्या बसल्या सगळ्यांचा एकमेकांशी अल्फ़ा सुरू झाला. प्रवाशी नेता ह्या अधिकाराने इराला सगळ्यांचे संवाद नीट उलगडता आले. त्यांची उत्सुकता, पुरातन भुमीवर जाण्याचे थोडेसे भय, आणि डोक्यात कितीतरी प्रश्न! इराने हे बरेचदा बघितले होते. तिने वेळ न दवडता आपले प्रास्ताविक भाषण त्यांच्यात उलगडायला सुरवात केली.

“सुस्वागतम. आकाशगंगा पर्यटनच्या पृथ्वी यात्रेत आपले स्वागत. आपले नारदभ्रमरी यान फ़क्त तीन चंडतासांत पृथ्वीवर पोहोचणार आहे. पाचव्या विश्वयुद्धात नष्ट होण्याआधीची पुरातन पृथ्वी आपणास बघायला मिळेल. प्रवाशांसाठी केलेल्या खास रिसॊर्टवर आपण रहाणार आहोत. आसपासचा निसर्ग बघायला आपण जाऊ आणि फ़िरून थकल्यावर आदिम जेवणाचाही आनंद घेता येईल.”
“ह्हॆ! म्हणे आदिम जेवणाचा आनंद!” एका किशोर मुलाने त्याच्या मित्राला आल्फ़ा केला. “मी तर असले काहीही खाऊन बघणार नाही. मागे एकदा पिकनिकमधे उर्जा कारंजे बिघडले होते तेव्हा असला चोथा चघळला होता. मला तर उलटीच झाली होती.” त्यांचा हा संवाद झाल्या झाल्या इराला बाकिच्यांचे देखील अल्फ़ा उलगडू लागले. तो गलबला उलगडून इराचे डोके भणभणले. तिने आल्फ़ा स्विकार बंद केला आणि आपले भाषण पुढे सुरू केले.

“तुमच्या पैकी काही जणांना माहित असेल, पण सहलीसाठी पुन्हा सांगते. पाचव्या विश्वयुद्धात पथ्वीवरील मानवाची प्रचंड हानी झाली आणि ते पुन्हा आदिवासी अवस्थेत पोहोचले. विश्वयुद्धात सर्व नष्ट होणार हे जाणून विविध क्षेत्रातील निवडक तज्ञ व्यक्तींनी आधीच खबरदारी घेऊन ठेवली होती. एक हजार नागरिक त्यावेळचे तंत्रज्ञान आणि संस्कृती घेऊन मंगळावर वस्तीला आले. ईथे सर्व क्षेत्रात मानवाने प्रचंड प्रगती केली. पुरातन मानवांना ग्रासणारे दोन विषाणू- भाषा आणि मन ह्यांचे संपुर्ण उच्चाटन करण्यात मंगळ निवासी मानवाला यश आले. सर्वप्रकारच्या भाषा आपोआपच नष्ट झाल्या. थेट मेंदूत आल्फ़ा करण्याची सोय झाल्यामुळे कुठल्याही शब्दांची गरजच राहिली नाही. सर्व संवाद थेट न्युरल लहरींनी होऊ लागले. मन नावाच्या भयानक विषाणूं समुहाचा डीनएमधून संपूर्ण नायनाट केल्यामुळे सर्व मंगळ निवासी मानव एकसंध झाला. आज आपण ह्या प्रगत अवस्थेत पोहोचलो आहे. आदिवासी मानवापासून आपण सगळ्याच अर्थाने खूप दूर आलेलो आहोत. तरिही आपल्याला आपले मूळ ठिकाण बघण्याची आतुरता आहे. तिथे पोहचल्यावर पुरातन सृष्टी आपल्याला दिसेल. तिचा फ़क्त तेथेच आनंद लुटा. तेथून कोठलीही वस्तू आणणे हे धोक्याचे आहे. काहीही आणायला परवानगी नाही. हे लक्षात ठेवा.”

क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

6 Dec 2014 - 2:55 pm | सस्नेह

पुभाप्र

रिम झिम's picture

6 Dec 2014 - 2:59 pm | रिम झिम

पु. ले. शु.

प्रीत-मोहर's picture

8 Dec 2014 - 8:45 am | प्रीत-मोहर

उत्सुकता

मंदार कात्रे's picture

15 Dec 2014 - 1:27 am | मंदार कात्रे

मराठी- ईंग्रजी तसेच पारिभाषिक शब्दांचा वापर सहजतेने होत नाहीसे वाटतेय. बरेच शब्द वाचतान अडखळल्यासारखे होतेय , एकतर सरळ इंग्रजी व्वपरलेत तर बरे वाटेल

पैसा's picture

15 Dec 2014 - 8:41 am | पैसा

आता दोन्ही भाग एकदम वाचते!