सायकलींग करताना..

Primary tabs

मोदक's picture
मोदक in भटकंती
17 Sep 2014 - 9:04 pm

सायकलींगच्या धाग्यावर मिळालेला प्रतिसाद आणि मिपाकरांचा उत्साह बघुन ट्रेक करताना.. सारखीच हा धागा काढायची कल्पना सुचली.

"काहीतरी वेगळे" या कल्पनेवरून माझी सायकलींगची सुरूवात झाली. सायकलची निवड आणि पुढची प्रगती त्या धाग्यात आली आहेच. या धाग्यात आपण सायकलींग करताना घ्यावयाची काळजी आणि इतर माहितीची देवाणघेवाण करू.

महत्वाचे - पुढील सर्व माहिती भारतात वापरल्या जाणार्‍या हौशी सायकलींगच्या अनुषंगाने दिली आहे. रेसींग सायकल किंवा अतीप्रगत सायकलसाठीची माहिती वेगळी असू शकते.
मी निष्णात सायकलपटू नाही. त्यामुळे एखादी माहिती बरोबर नसेल तर बिन्धास्त सांगा. मलाही नवीन शिकायला मिळेल.

**********************************************************************************************
सायकलचे प्रमुख भाग-

.


सायकलची निवड.

आपण कोणत्या प्रकारच्या रस्त्यावर सायकल चालवणार आहोत आणि का चालवणार आहोत; एखादी रेस, इव्हेंट की स्वान्तसुखाय; त्यानुसार सायकलचा प्रकार ठरवावा. सायकलमध्ये मुख्यतः चार प्रकार असतात

BMX सायकल

.

ही सायकल मुख्यतः कसरतीचे प्रयोग आणि प्रदर्शनीय कार्यक्रमांमध्ये करामती करण्यासाठी वापरतात. (मी हायब्रीड सायकलवर कसरतीचे प्रयोग करून आपटल्याने या सायकलच्या वाटेस गेलो नाही ;) )

रोडबाईक

.

ही रेसींग सायकल म्हणून आपल्याला परिचित आहे. वजनाला एकदम हलकी, सायकलचा एकंदर आकार आणि बसण्याची व्यवस्था एरोडायनामिक्स विचारात घेवून तयार केलेले असतात. हवेचे कमीतकमी घर्षण, विशिष्ट प्रकारचे गुळगुळीत टायर त्यामुळे ही सायकल अत्यंत वेगवान असते.
या सायकलचा आकार विचित्र दिसत असला तरी ही सायकल बसल्यानंतर खूप आरामदायी असते.

(या सायकलची मला फारशी माहिती नाही)

MTB सायकल

.

MTB सायकल ही खाचखळग्यांच्या रस्त्यावरून आणि अत्यंत खराब रस्त्यांवरून जाण्यासाठी उपयोगी पडते.
दणकट फ्रेम, जाऽऽड; मोठे व मजबूत टायर्स, टायरवर असलेली भरपूर नक्षी आणि वजनाला बर्‍यापैकी जड असलेली ही सायकल खूप मजबूत असते. टायरची जाडी, मजबुती आणि नक्षीमुळे ही सायकल रस्त्यावरती व्यवस्थीत पकड घेते. ही सायकल चिखल, वाळू किंवा खडीवरून सहजासहजी घसरत नाही.
ही सायकल जड असल्याने ती चालवण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागतात.

हायब्रीड सायकल

.

आपण मुख्यतः शहरात किंवा ठीकठाक डांबरी रस्त्यावरून सायकल चालवणार असल्यास ही सायकल योग्य ठरते. चांगल्या कंपनीची हायब्रीड सायकल असेल तर थोडा खराब रस्त्यावरही सायकलला काही फरक पडत नाही. (येथे खराब रस्ता = डांबराचा स्पर्शही न झालेला मातीचा रस्ता किंवा भरपूर खड्डे असलेला रस्ता असेही गृहीत धरले तरी हरकत नाही.)
मोठे टायर्स (२८ इंच), कमी जाड आणि टायरवर कमी नक्षी असल्याने ही सायकल रस्त्यावरून वेगाने जाते आणि जास्त श्रम करावे लागत नाहीत.
जाडीला कमी आणि थोडे नाजूक टायर्स असल्याने ही सायकल लगेचच पंक्चर होते. अगदी दुमडलेल्या स्टेपलर पिन मुळे सुद्धा आमच्या ग्रूपमधली एक सायकल पंक्चर झालेली आहे..!

आणखी सायकलचे प्रकार असल्यास मला माहिती नाहीत. युनीसायकल वगैरे चालवण्यात किती लोक्स उत्साही असतील माहिती नाही. ;)

सायकलचे गिअर्स,

.

सायकलमध्ये गिअर्स दोन ठिकाणी असतात मागच्या चाकांजवळ आणि पेडल्स जवळ. मागच्या चाकांजवळ ६ ते ९ आणि पुढे शक्यतो ३ गिअर व्हील असतात ज्यावरून चेन फिरते. २४ गिअर्सची सायकल म्हणजे चाकांजवळ ८ आणि पेडल्स जवळ ३ गिअर्स असलेली सायकल.
सायकलची सर्वसाधारण गुणवत्ता ठरवताना किती गिअर्स आहेत आणि कोणत्या प्रतीचे आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात.

.

गिअर्स हे मुख्यतः शिमानो कंपनीचे असतात.
सायकलच्या मध्यमश्रेणीमध्ये शिमानो टर्नी, अल्टस, अ‍ॅसेरा, अ‍ॅलिव्हिओ आणि ड्योरे ही गिअरच्या प्रकारांची नावे आहेत. गुणवत्तेनुसार टर्नी हे सर्वात खालचे तर ड्योरे हे सर्वात वरचे गिअर्स आहेत. याहूनही अद्ययावत गिअर्स असतात परंतु त्या सायकलची किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात जाते.

सायकलची किंमत ठरताना सायकलची कंपनी, फ्रेमचे मटेरीयल, गिअरचा प्रकार, सोबत असणार्‍या सोयी (सस्पेन्शन, डिस्क ब्रेक्स, अ‍ॅडजेस्टेबल स्टेम) वगैरे गोष्टी महत्वाच्या ठरतात.
सर्वसाधारणपणे चांगल्या सायकलसाठी किमान २० हजारांची गुंतवणूक करावी लागते. अ‍ॅक्सेसरीज आपण घेण्यानुसार असतात त्यासाठी पाच-सहा हजार रूपये वेगळे लागतात.

सायकल घेताना काय काळजी घ्यावी.

१) सायकल घेताना सर्वप्रथम आपल्याला सोयीस्कर आणि आपल्या गरजेला योग्य असलेला सायकलचा प्रकार ठरवावा.
२) गिअर्स कोणत्या प्रकारचे आणि किती हवेत तेही ठरवावेत. उदा. १-८ या गिअरच्या गुणोत्तराने आपण साधारणपणे ४० अंशाचा चढही आरामात चढू शकतो त्यामुळे आपण जर नेहमी भरपूर चढउताराच्या रस्त्यावरून / कोकणामध्ये सायकल चालवणार असल्यास जास्ती गिअर्स असावेत.
३) शहरां किंवा गावांमध्ये / डांबरी रस्त्यावर सायकलचा वापर होणार असेल तर हायब्रीड सायकल सर्वोत्तम ठरते. अन्यथा MTB सायकलचा पर्याय निवडण्यास हरकत नाही.
४) आपल्याला सोयीची आणि व्यवस्थीत अशा मापाची सायकल फ्रेम निवडावी. चुकीच्या फ्रेमची सायकल दीर्घकाळ वापरली तर शरीरावर अनावश्यक ताण येवून खांदे आणि पाठीला दुखापत होवू शकते.
५) आपण ज्या वेगाने जातो त्या वेगाला डिस्क ब्रेकची आवश्यकता नसते त्यामुळे शक्यतो डिस्क ब्रेक टाळावेत.
६) सायकलचे सर्विसींग कोठे करून मिळणार आहे त्याची नीट चौकशी करावी व तेथले मेकॅनीक सायकलचे तज्ञ असावेत.
७) घरी सायकल ठेवण्यासाठी सुयोग्य जागा आहे का..? नसल्यास तशी सोय करून घ्यावी. सायकल ठेवण्याची उत्तम जागा म्हणजे आपल्या घराची गॅलरी; अन्यथा पार्किंगमध्ये एखाद्या गाडीला साखळीने बांधून ठेवावी. तेही शक्य नसेल तर पार्किंगमधील एखाद्या कॉलमला हूक ठोकून घ्यावा व साखळी त्यातून ओवून घ्यावी.
८) बाहेर फिरतानाही सायकल नजरेआड होवून देवू नये. सायकल खूप पटकन चोरीला जाते.

माझ्या सायकलींगच्या (आहे तितक्या) अनुभवावरून सायकल कशी नसावी याचे काही ठोकताळे तयार झाले आहेत.
१) सायकल खूप जड नसावी. डबल चिमटा, कॅरीयरवाल्या सायकल आपल्याला अकारण दमवतात.
२) सायकल खूप लहान (२४" टायर) साईझची शक्यतो नसावी.
३) चुकीच्या आकाराच्या फ्रेमची सायकल कधीही चालवू नये.
४) मध्ये सस्पेंशन स्प्रिंग असलेल्या प्रकारची सायकल शक्यतो टाळावी. या सायकलच्या उभ्या सस्पेंशन मुळे आपण सायकल चालवताना सीटवर बसल्यामुळे Vertical Force तयार होतो आणि सायकल रस्त्याला समांतर जात असताना जो वेग पकडलेला असतो त्या वेगाला हा Vertical Force लक्षणीयरीत्या कमी करतो.
उदा.
.

सायकल चालवताना लागणारी आयुधे (अ‍ॅक्सेसरीज ;) )

सायकलींगसाठी लागणार्‍या आवश्यक त्या सर्व अ‍ॅक्सेसरीज वापराव्यात असे माझे आग्रही मत आहे. या अ‍ॅक्सेसरीजमुळे सायकल चालवताना अनावश्यक ताण येवून वेदना होणे / दुखापत होणे वगैरे प्रकार न होता सायकलींग हा एक सुखद अनुभव ठरतो.

१) सायकलींग हेल्मेट -

.

सायकल चालवताना हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक असते. दुचाकी वापरताना हेल्मेट जितके आवश्यक आहे तितकेच सायकल चालवतानाही हेल्मेट गरजेचे असते. हे हेल्मेट हाय ग्रेड थर्मोकॉलचे असते. वरील फोटोमध्ये जो निळा पॅच दिसतो आहे तो पॅच आणि बाजूची काळी पट्टी यांमुळे हेल्मेट घातल्यानंतर आपल्या डोक्याभोवती एक रिंग तयार होते ती रिंग घट्ट / सैल करण्याची सोय असते. हेल्मेट घट्ट बसल्यानंतर लाल क्लिप असलेला पट्टा हनुवटीखाली घेवून हेल्मेट पक्के बसवावे.
हेल्मेट निवडताना त्याची पुढची गोल बाजू आपल्या चेहर्‍याच्या किमान दोन इंच पुढे यावी. नाकाच्याही पुढे; त्यामुळे चुकून अपघात झालाच तर पहिला आघात हेल्मेटवर होतो आणि चेहरा बचावतो.

मी कोकणवारी करताना सायकलवरून पडलो त्यावेळी मी ताम्हिणी घाट उतरण्यास सुरूवात केली होती आणि सायकल बर्‍यापैकी वेगात होती. मी अक्षरशः पाण्यात सूर मारतो तसा दगड आणि काचांमध्ये सूर मारला होता. आघात इतक्या जोरात झाला होता की माझ्या हेल्मेटला तडे गेले, पण मला फक्त चेहर्‍याला खरचटले आणि हाताला मुका मार लागला. त्यामुळे हेल्मेट वापरावेच अशी आग्रहाची विनंती - स्वानुभवावरून. ;)
सायकलींग हेल्मेट किमान १ हजार रूपयांना मिळते.

२) लाईट्स

.

रात्रीचे सायकलींग करणार असाल तर उत्तम प्रकाश देणारे लाईट्स गरजेचे असतात. रस्त्याकडेला पडलेले काटे, टोकदार फांद्या, काचा किंवा खिळे न दिसल्याने अपघात / पंक्चर होतात.
चांगला आणि प्रखर प्रकाश देणारे लाईट्स थोडे महाग असतात - ३,५००/- ते ४,०००/- रूपये. आमच्या सायकल ग्रूपमधल्या सर्वांनी असे लाईट्स भारताबाहेरून मागवले आहेत. मी अजून रात्रीचे सायकलींग सुरू केले नाहीये.

.

सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षीततेसाठी टेललाईट्स गरजेचे असतात.
माझे दोन ब्रॅंडेड टेललाईट्स अनवधानाने पडल्यामुळे मी चायनीज लाईट्स वापरतो. रू. १००/- ;)

३) सायकलींग शॉर्ट्स

.

जर आपण दूरवर किंवा जास्त वेळ सलग सायकलींग करणार असाल (एक ते दीड तासांपेक्षा जास्त) तर वरील प्रकारची सायकलींग शॉर्ट्स वापरणे हितावह असते.
या शॉर्ट्सचे कापड वेगळ्या प्रकारचे असते (Breathable) आणि शरिराला एकदम चिकटून बसणारे फिटींग असल्याने सायकल चालवताना पायांच्या हालचालींमध्ये सहजता येते. या शॉर्ट्सला आतून एक कुशन / जेलची सीट जोडलेली असते त्यामुळे सायकलची सीट टोचत नाही आणि सायकलवर बसल्यानंतर आपल्याला सुयोग्य आधार मिळतो. आपण किती वेळ सायकलींग करणार त्यानुसार शॉर्ट्स वापरावी. ८ तास सायकलींग करणार असल्यास ८ तासांची किंवा जास्ती वेळाची शॉर्ट्स वापरावी. कमी प्रतीची वापरल्यास त्रास होवू शकतो.
शॉर्टस् ची किंमत १०००/- ते ३०००/- रू. असते.

४) जेल सीट

.

जेल सीट ही सुध्हा सायकल चालवताना शरिराला योग्य आधार मिळावी म्हणून वापरावयाची असते.
सायकलींग शॉर्ट्स असताना जेल सीट वापरावी की वापरू नयेत असे दोन प्रवाद आहेत. आपण आपल्याला सोयीस्कर असेल तो पर्याय निवडावा.
मी शॉर्ट्स आणि जेलसीट दोन्ही वापरतो.
जेलसीट पाण्यात भिजू देवू नये, हे कापड पाणी शोषून घेते. किंमत ६००/- ते ८००/-

५) ग्लोव्हज

.

सायकलींग ग्लोव्हज वापरणे हातांना आरामदायक असते. या ग्लोव्हजमध्ये जे पॅचेस दिसत आहेत ते जेल पॅचेस आहेत ते पॅचेस आपल्या तळव्याला बसणारे हादरे कमी करतात. अर्धेच ग्लोव्हज असल्याने हाताचा घाम जास्तवेळ टिकत नाही. वरील फोटोमध्ये उजव्या अंगठ्याला लागून दिसणारी काळी पट्टी टर्कीशच्या टॉवेलसारख्या मटेरीयलची आहे. अगदी छोटी दिसत असली तरी घाम पुसायला एकदम उपयोगी पडते. किंमत ८००/- रू.

६) एर्गो ग्रीप -

.

थोडीशी चिकन लेगपीस सारखी दिसणारी ही ग्रीप तळव्याच्या "हार्ट एरीया"ला, हाताच्या Carpals नामक हाडांना आणि आजूबाजूच्या स्नायूंना सपोर्ट करते. मी दोन तीन महिने गोल ग्रीप वापरून नंतर या प्रकारची ग्रीप बसवली. ही अत्यंत आरामदायी ग्रीप असते. किंमत - कंपनीनुसार - ६००/- ते १८००/- रू.

७) बॉटल होल्डर / बॉटल केज

सायकलींग करताना पाणी पिणे अत्यंत आवश्यक आते. शरीरातली पाण्याची पातळी खालावली तर त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. सायकल चालवताना पाणी पिण्यासाठी दरवेळी थांबणे शक्य नसते त्यामुळे सायकलला बॉटल होल्डर बसवून घ्यावेत. सायकलला बॉटल होल्डर बसवण्यासाठी दोन ठरलेल्या जागा असतात. तितके पाणी पुरेसे असते. एखाद्या थांब्या दरम्यान पाणी पुन्हा भरून घ्यावे. किंमत १००/- रू.

८) पंक्चर किट

सायकल पंक्चरली की सायकल चालवण्याच्या उत्साहावर पाणी पडते आणि अनेकदा पंक्चर काढण्याचा आळस केल्यानेही सायकल घराबाहेर निघत नाही. एक पंक्चर किट सोबत ठेवावे. पंक्चर किट मध्ये टायर उघडण्यासाठी दोन बोथट स्क्रू-ड्रायव्हरसारखी पाती, रबर पॅच, रबर चिटकवण्यासाठी लागणारे जेल आणि एक पॉलीश पेपर इतके साहित्य आवश्यक असते. एक पोर्टेबल पंपही घ्यावा. हलके आणि हायड्रॉलीक तत्वावर चालणारे हवेचे पंप सहज उपलब्ध आहेत आणि त्यांचे हँडल सोडवता येत असल्याने सहज सोबत ठेवता येतात.
पंप - २००/- रू आणि संपूर्ण पंक्चर किट १०० रू पर्यंत येते.

९) अ‍ॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट / स्वीस नाईफ

.

बहुतेक सर्व आधुनीक सायकल्सना साधे / स्टार स्क्रू आणि नट बोल्टची जोडणी नसते. अ‍ॅलन की ने उघडता येणारे सर्व स्क्रू असतात. आपल्या सायकलच्या प्रकारानुसार उपयोगी असा अ‍ॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट सोबत ठेवावा. एक वेगळा स्वीस नाईफही जवळ बाळगावा. हे सेट हार्डवेअरच्या दुकानात मिळतात. किंमत - कंपनीनुसार २५०/- रू. ते कितीही..

१०) वेगवेगळे पाऊच

सायकलच्या आकाराच्या आणि प्रकाराला अनुसरून वेगवेगळे पाऊच मिळतात. आपल्याला योग्य वाटेल असा पाऊच घ्यावा. मोबाईल, गोळ्या चॉकलेट्स आणि नेहमी लागणार्‍या वस्तू लगेच हाताला येतील अशा पद्धतीने ठेवण्यासाठी हे पाऊच उपयोगी पडतात.

इतके सगळे वापरण्याची आवश्यकता आहे का..?? या प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. मात्र आपण आपली व सायकलची योग्य काळजी घेतल्याने सायकलींग हा एक सुखद अनुभव ठरतो आणि "उद्या सायकलींग करायचे आहे!" ही भावना टिकून राहते.

सायकल चालवताना घ्यावयाची काळजी / काही सुचना..

१) वेग आणि संतुलन
सायकल चालताना नेहमी रस्ता आणि रहदारीच्या अंदाजाने योग्य वेगामध्ये सायकल चालवावी. शहरातून सायकल चालवताना अचानक वळणारी वाहने किंवा बागेत फिरल्यासारखे फिरणारे पादचारी यांची काळजी घ्यावी. सायकलची फ्रेम चाके वगैरे दणकट असली तरी मोटारसायकल धडकली तर मोडतोड होते. त्यामुळे सायकलची काळजी करतच सायकल चालवावी.

२) थांबलेल्या गाड्या
थांबलेल्या गाड्यांच्या बाबतीत अचानक दार उघडण्याचा धोका असतो. त्याची काळजी घ्यावी. थोडे अंतर राखूनच सायकल चालवावी.

३) आहार / पाणी
दूरवरचे सायकलींग करताना आहाराची योग्य काळजी घ्यावी. खूप तिखट, मसालेदार, जळजळीत पदार्थ किंवा मिसळ, तर्री सारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. इडली किंवा पोहे ब्येष्ट.
जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी - किमान ३० मिनीटे. जेवण झाल्याझाल्या लगेचच सायकलवर स्वार होवू नये.

४) सोबत घ्यावयाचे सामान
सायकल राईडला निघताना पंक्चर किट, पंप, पाणी सोबत असावे. सोबतच्या वस्तू एखाद्या सॅकमध्ये नीट भरलेल्या असाव्यात म्हणजे फक्त सायकलींगवर लक्ष केंद्रीत करता येते.

५) सॅक / बॅगपॅक
सायकलींग करताना कमीतकमी वजन वागवायचे असल्याने सायकलींगसाठी वापरावयाची सॅक शक्य तितकी हलकी असावी. सॅकचे सर्व पट्टे नीट बांधलेले असावेत आणि सॅकचा कोणताही भाग सायकल चालू असताना चाकात अडकणार नाही याची काळजी घ्यावी.
सॅक भरताना, नेहमी लागण्यार्‍या वस्तू, क्वचित लागणार्‍या वस्तू अशी विभागणी करावी व त्यानुसार सॅक भरावी. न लागणार्‍या वस्तू. उदा ड्रायव्हींग लायसन्स, सोबत नेवू नयेत. पैसे, एखादे डेबीट आणि क्रेडीट कार्ड वगैरे जवळ बाळगावे.

६) लाईट आणि रिफ्लेक्टर्स
लाईट आणि रिफ्लेक्टर्स आपल्या सुरक्षिततेसाठीच असतात. ते नियमीतपणे वापरावेत. पेडलला असलेले रिफ्लेक्टर्स नेहमी स्वच्छ ठेवावेत.

७) गॉगल्स
सायकलींग करताना गॉगल्सचा वापर आवर्जून करावा. खूप वेळ उन्हात सायकलींग करताना डोळ्यांवर भरपूर ताण येतो. आपापल्या सवयीनुसार काळजी घ्यावी.
उन्हातील सायकलींग मुळे शरीरही भरपूर काळे पडते (टॅन होते) त्याची काळजी करणार्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

८) अनोळखी सायकलस्वार
आपल्याला अनोळखी सायकलस्वार दिसल्यास एखादी साधी गोष्ट "हात उंचावणे" किंवा "चीअर अप" करणे खूप सोपे असते. तितके केले तरी दोघांचाही उत्साह नक्की वाढेल.

हा धागा वाचणार्‍या वाहनचालकांना नम्र विनंती. वाहन चालवताना तुम्हाला एखादा सायकलस्वार दिसला तर त्याला नक्की प्रोत्साहन द्या. अगदी थांबून अभिनंदन करण्याची गरज नाही परंतु हात उंचावण्यासारखी एखादी कृती समोरच्याला सुखावून जावू शकते.

.

**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
या सूचना खूप जास्ती झाल्या असे वाटण्याची शक्यता आहे - जितक्या उपयोगी वाटतील तितक्या घ्याव्यात. ;)
सर्व छायाचित्रे अंतर्जालावरून - साभार.
**********************************************************

(समाप्त.)

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 9:12 pm | कवितानागेश

मस्त माहिती.
न वाचताच लिहितेय ;) .... आता वाचते.

खटपट्या's picture

18 Sep 2014 - 4:19 am | खटपट्या

अरेरे, किती ती मी पयली येण्याची धडपड

निखळानंद's picture

17 Sep 2014 - 9:32 pm | निखळानंद

इतकी साद्यंत माहिती लिहिण्यासाठी लागणारे efforts आणि patience केवळ त्या विषयाबद्दलच्या अतीव प्रेमातूनच येत असावे.. तुमच्या सायक्लिंग आणी सायकल प्रेमाला सलाम ! *good*
अनोळखी सायकल स्वार दिसल्यावर हात उंचावण्याचा प्रयत्न नक्की होईल..

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 9:33 pm | टवाळ कार्टा

भारी

आदूबाळ's picture

17 Sep 2014 - 9:37 pm | आदूबाळ

वाटच पहात होतो. :)

वरच्यापैकी कोणत्याच सायकलचं हँडल "ग्रँडमॉम सायकल" सारखं (म्हणजे आपल्या नेहेमीच्या पहाण्यातल्या सायकलसारखं) नाही.
असं (वरून बघताना):
___
( )

ताठ हँडलच्या सायकली दंडांवर - विशेषतः ट्रायसेप्सवर - अवाजवी ताण टाकतात का?

त्या सायकल्स "लीजर बाईक्स (leisure bikes)" प्रकारात येतात.

मी सायकलींग करताना सुरूवातीलाच त्या प्रकाराकडे बघायचे नाही असे ठरवले होते त्यामुळे मी त्यावर जास्त भर दिला नाही.

ताठ हँडलच्या सायकलने येणारा ताण मला कधीही जाणवला नाही.
मात्र सुरूवातीला ट्रायसेप्समध्ये, बरगड्यांमध्ये आणि पाठीमध्ये क्रँप्स यायचे; आपण व्यवस्थीत पाणी प्यायले तर हा त्रास होत नाही असे लक्षात आले. त्यामुळे जर तुम्हाला ताण जाणवत असेल तर एकदा व्यवस्थीत हायड्रेटेड राहून बघा.

स्वामी संकेतानंद's picture

10 Oct 2014 - 5:12 pm | स्वामी संकेतानंद

'रोडस्टर बाइक' नावाने शोधले तर सापडतील त्या सायकली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Sep 2014 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोदक गुर्जी एम.टी.बी. कितीपरंत बसेल? एक अंदाज द्या.

हिरो किंवा क्रॉस कंपनीची ८५००/- पासून सुरू होते.

एकदा काळेवाडीच्या मेन रोडवर असलेल्या शोरूमला भेट द्या. तेथे भरपूर प्रकार पहायला मिळतील. पुण्यापेक्षा तेथे सायकल १०००/- ते १५००/- रूपयांनी स्वस्त आहे.

सायकल घेताना व्यवस्थीत बारगेन करा. ;)

शैलेन्द्र's picture

17 Sep 2014 - 9:58 pm | शैलेन्द्र

चांगली घ्यायला जाल तर ३० च्या पुढे..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Sep 2014 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या दुव्यातली किंमत वाचुन डोळे गरगरले.

http://www.choosemybicycle.com/in/en/bicycles/fuji/mtb/fuji-slm-29-1.1-2014

तशा याहूनही जास्त किमतीच्या सायकली बाजारात उपलब्ध आहेत.

कार मार्केट जसे मारूती \ नॅनो पासून फेरारी लँबॉर्गिनी पर्यंत पसरले आहेत तसेच काहीसे... ;)

शैलेन्द्र's picture

17 Sep 2014 - 9:49 pm | शैलेन्द्र

मस्त माहीती..

माझ्या अनुभवावरुन काही गोष्टी-

१) जेल सीट वापरायला मला आवडत नाही, सारख सरकत, पॅडेड शॉर्ट मस्त.
२) हेल्मेट नक्की वापरावे.
३) मधल्या सस्पेंशन बद्दल १०१% सहमत.. त्याची गरजही नाही..
४) मी स्वत:साठी एक हलका रीअर व्ह्यु मीरर करुन घेतलाय, १.५ इन्च व्यासाचा, बराच उपयोग होतो.
५) सायकलींग पुर्वी व नंतर स्त्रेचींग जरुर करावे.. मोठी सफर असेल तर अधे मधेही करावे..

तुमच्या सायकलच्या रीअर व्ह्यु मीरर चा फोटो देता का..?

स्ट्रेचींग बद्दल सहमत..!!

शैलेन्द्र's picture

17 Sep 2014 - 10:03 pm | शैलेन्द्र

नक्की पाठवतो.. बेसिकली कारमधे जे ब्लाईंड स्पॉट मीरर असतात त्यातले दोन एका जाड तारवर (रबर इन्सुलेशन असलेली) बसवुन ती तार उजव्या फ्रंट फोर्क वर बसवायची. सायकल पार्क करताना काढुनही घेता येते. हीच अरेंजमेंट आवडत असल्यास आपल्या दंडावरही पिळता येते.

शैलेन्द्र's picture

17 Sep 2014 - 10:06 pm | शैलेन्द्र

दंडावर ऐवजी कोपरावर किंवा किंचीत खाली..

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 1:07 am | बॅटमॅन

मस्त धागा रे मोदका!!!!! लय उपयुक्त माहिती.

पण एक शंका आहे. अशा आधुनिक सायकलीवर बसायचं तर वाकून बसायला लागतं त्याचा लै त्रास होतो राव. काय मार्ग नाय का?

मला ताठ बसून रिलॅक्स्ड मध्ये सायकल मारायची सवय आहे. हे एका वेळी २०- २५ किमी पर्यंत असे सायकलिंग केले आहे अन त्याचा त्रास झाला नै म्हणून इच्यारतो. हे वाकायचं कंपल्शन नको वाट्टं पण साल्या सगळ्या भारी सायकली अशाच.

शैलेन्द्र's picture

18 Sep 2014 - 7:42 am | शैलेन्द्र

तुम्ही हाय्ब्रीड/MTB बाईक घेतलीत तर वाकायचे कंपल्शन राहणार नाही, पण वाकुन चालवलीत तर हवेचा रोध जानवत नाही. वेगात खुप फरक पडतो.

हायब्रीड \ MTB सायकलचा आकार तसा वाटला तरी फारसे वाकून सायकल चालवावी लागत नाही.

मी अलिकडेच आणखी एक MTB सायकल घेतली. त्याच्या हँडलला शेवटी थोडा बाक दिला आहे आणि आपण बसल्यावर फक्त ग्रिपचा भाग आपल्याकडे झुकल्यासारखा वाटतो. कमाल आराम मिळतो त्या सायकलमुळे.

दोन्ही सायकली चालवून बघायच्या असतील तर घरी चक्कर मार. :)

वा रे मोदका. एकदा नक्की येईन, धन्यवाद :)

रेवती's picture

18 Sep 2014 - 1:42 am | रेवती

उपयुक्त सूचना. आवडल्या.

चांगला माहितीपुर्ण लेख. आवडला.

८) बाहेर फिरतानाही सायकल नजरेआड होवून देवू नये. सायकल खूप पटकन चोरीला जाते.

१००% सहमत. आमचं सायकल पुराण... :(

व्यासंग म्हणतात तो हाच असावा.
नाहीतर आम्ही!!! साध रोज चालायला जायच म्हंटल तरी १० विघ्न येतात आमच्या आडवी, अन मग आम्ही आडवे होतो...

विंजिनेर's picture

18 Sep 2014 - 12:05 pm | विंजिनेर

हे घ्या अजून एक प्रक्रार
http://www.amazon.com/dp/B00HNEAC8Q?psc=1

इनिगोय's picture

18 Sep 2014 - 12:51 pm | इनिगोय

कधी काळी सायकलिंग करायचा विचार केला तर या सूचना नक्की उपयोगी पडतील. :-)

मदनबाण's picture

18 Sep 2014 - 3:24 pm | मदनबाण

जबरदस्त माहिती...
आता माझा एक प्रश्न ! अर्थात मी गियरवाली सायकल चालवली नसल्याने हा प्रश्न मला पडला आहे.
गियर बदलताना पॅडल मारणे थांबवावे लागते का ? की पॅडल मारत असतानाही गियर टाकता येतो ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

बाळ सप्रे's picture

18 Sep 2014 - 3:45 pm | बाळ सप्रे

गिअर बदलताना पॅडल मारणे आवश्यक आहे.. थांबलेल्या स्थितीत गिअर बदलू नयेत!!

शैलेन्द्र's picture

20 Sep 2014 - 2:30 pm | शैलेन्द्र

गीअर बदलताना पायडल मारावाच लागतो, चेन फिरल्याशिवाय गीअर बदलला जात नाही. पण गिअर बदलल्यावर पायडल मारताना त्यात जोर नसावा, तसे केले तर चेन जास्त घासली जाते.

मदनबाण's picture

21 Sep 2014 - 10:30 am | मदनबाण

@ बाळ सप्रे / शैलेन्द्र

ओक्के. धन्यवाद.... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }

आनंदी गोपाळ's picture

8 Mar 2015 - 3:47 pm | आनंदी गोपाळ

सायकलचे गियर मोटारसायकलच्या गियरसारखे वापरू नयेत. ते तसे काम करणार नाहीत.
उदा. खालचा गियर टाकल्यावर स्पीड कमी होणार नाही, तर पुढे येणार्‍या चढ वा अडचणीच्या दरम्यान तुम्हाला कमी कष्टात पुढे जायला मिळेल. इथे गाडीचे इंजिन तुम्ही स्वतः आहात हे लक्षात घेऊन गियरचा अँटिसिपेटरी वापर कारायचा आहे.
सर्वच नव्या गोष्टींसारखी याही बाबतीत थोडी सवय व अभ्यास आवश्यक आहे.

माझी दणकट रोडबाईक आहे आणि मोदकला त्या बाइकचा चांगलाच अनुभव आहे.. ;)

मदनबाण's picture

18 Sep 2014 - 5:14 pm | मदनबाण

अरे पिंगू त्या धाग्यातला पिंगू तुच का असे मी मोदकाला विचारणारच होतो !{ पसरणी घाटात - पिंगू आणि किरण }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

काय राव. चेहरा लवकरच विसरला का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Sep 2014 - 3:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

मोदकराव,
माहिती बद्दल प्रचंड धन्यवाद.
माझ्या सायकलचे पुढच्या चाकाचे ब्रेक पॅड फार वेगाने झिजतात. जवळ जवळ २ ते ३ महिन्यात नवे पॅड टाकावे लागतात. सायकल वाला म्हणतो दोन्ही ब्रेक एकावेळी दाबत जा म्हणजे असे होणार नाही. माझ्या मते मी दोन्ही ब्रेक एकाच वेळी दाबत असतो. तरीसुध्दा असे का व्हावे. यात होणार्‍या खर्चा पेक्षा सुध्दा सुरक्षेचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे असे वाटुन प्रश्र्ण विचारला आहे.(माझे रोजचे सायकलिंग किमान १० कि.मी. आहे.) (माझी सायकलवर १० वर्ष जुनी आहे त्याने काही फरक पडत असावा का?)

पैजारबुवा,

ब्रेकचे रबर बरोब्बर रिमला टेकत आहेत का ते पहा. बाकी मला यात काही बिघाड वाटत नाहीये.

माझ्या सायकलचे ब्रेक रबर मी तीन महिन्यांनीच बदलले. आणखी एक महिना चालले असते पण मला BRM दरम्यान कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती.

ब्रेक दाबताना सुरूवातीला मागचा ब्रेक आणि नंतर एक दोन सेकंदात पुढचा ब्रेक दाबला असता सायकल नियंत्रणात राहते असा माझा अनुभव आहे.

शैलेन्द्र's picture

24 Sep 2014 - 11:38 am | शैलेन्द्र

सायकलचे मॉडेल कोणते आहे? ब्रेक कसे आहेत? फोर्क तीरपा झालाय का? रीम आउट आहे का? ब्रेक्पॅड खराब क्वॉलीटीचे वापरले जातायेत का? ब्रेक केबल पुरेशी मोकळी आहे का, अडकत तर नाही ना?

विअर्ड विक्स's picture

20 Sep 2014 - 3:47 pm | विअर्ड विक्स

उपयुक्त लेख. एकूणच तुमच्या शैलीवरून तुम्ही अभियंता असाल असे वाटते. Detail Engg. करणाराच असा लेख लिहू शकतो. आपला अंदाज…
वाचन खूण साठवण्यात आली आहे.

मोदक's picture

22 Sep 2014 - 7:31 pm | मोदक

धन्यवाद...! :)

सर्व प्रतिसादकांचेही आभार्स..!!

मोदक's picture

22 Sep 2014 - 7:34 pm | मोदक

आता माझी एक शंका...

शैलेंद्र साहेबांसारखाच मलाही सायकलची जेल सीट सरकण्याचा त्रास होतो.

यावर काही उपाय आहे का..?

जेल सीट वापरु नये या मताचा मी आहे. कारण जेल सीट हा प्रकार निव्वळ ऐच्छिक आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Sep 2014 - 10:23 am | ज्ञानोबाचे पैजार

सायकलची सीट थोडी तिरपी बसवून बघा.

म्हणजे सीट जमिनीला समांतर ठेवण्या ऐवजी सीटचा पुढचा भाग किंचीतसा वरती उचलायचा.

पैजारबुवा,

शैलेन्द्र's picture

24 Sep 2014 - 11:17 am | शैलेन्द्र

पॅडेड शॉर्ट घालाल तर जेल सीट वापरायची गरजच नाही. मी ४०-५० किमी साठी पॅडेड शॉर्टसुध्धा वापरत नाही. सुरवातीला कदाचीत तुम्हाला त्रास होइल पण नंतर हाडांना त्या कठीण सीट्ची सवय झाली की अजिबात दुखात नाही. उलट जेल सीटवर घर्षण जास्त होते असा माझा अनुभव आहे.

मोदक's picture

24 Sep 2014 - 12:23 pm | मोदक

ह्म्म... प्रयत्न करतो.

तुम्ही शॉर्ट्स कोणती वापरता..? मी "बिट्वीन - रोड ७००" घ्यायच्या विचारात आहे.

आणखी काही सजेशन्स..?

शैलेन्द्र's picture

24 Sep 2014 - 12:43 pm | शैलेन्द्र

मी एक साधी शॉर्ट घेतलीये, पुण्याला गरवारे समोरच्या दुकानातुन.
त्या शॉर्ट्ला आतुन डक्बॅकचा पॅड आहे.

तुम्ही पहात असलेली शॉर्ट अजुनच चांगली आहे.

रोड ७०० मिळाली नाही म्हणून डेकॅथलॉन ने मला त्याच किमतीत एक बिब-शॉर्ट्स दिली. (रू. २२००/-)

कमाल आराम मिळतोय बिब-शॉर्ट्स मुळे.

सीट कव्हर एक साईज छोटे बसवून पहा... मलाहि हाच त्रास व्हायचा.

पैसा's picture

23 Sep 2014 - 3:07 pm | पैसा

अगदी भरपूर माहिती लिहिलीस! शैलेन्द्र कडेही भरपूर माहिती आहे!

मंदार दिलीप जोशी's picture

23 Sep 2014 - 6:20 pm | मंदार दिलीप जोशी

छान माहिती. अजून घर ते ऑफिस असंच चालवतोय. पाहू लांबचा पल्ला जमतोय का

चौकटराजा's picture

24 Sep 2014 - 8:21 am | चौकटराजा

मी अलिकडे युरोपमधील काही व्हिडिओ पाहिले. प्रगत देशातही अनेक लोक सायकल चालविताना दिसत होते. अगदी पॅरिस
मधेही लोक सायकल चालवितात.आपण जरा कष्ट न करताच श्रीमंत ( खरोखरच का हा प्र्शनच आहे १) होत चालले आहोत
त्यामुळे सायकल चालवायला लाज वाटतेच व अस्रुरक्षित ही ! पण छंद म्हणून का होईना काही मिपाकर सायकलिंग मुळे
मिळणारे अनुषंगिक फायदे मिळवीत आहेत.हे वाचणे देखील सुखावह आहे.

प्रमोद देर्देकर's picture

24 Sep 2014 - 12:50 pm | प्रमोद देर्देकर

हायला आम्ही कधी सायकली विषयी एवढा विचारच केला नव्हता. आम्चं आपलं एका पॅडलवर पाय ठेवायचा आणि दुसरी टांग मग सिट वरुन पलिकडे न्यायची. कि चाललो फिरायला.

पण टन्स ऑफ धन्स रे मोदका अतिशय माहिती पुर्ण धागा.

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2014 - 4:37 pm | टवाळ कार्टा

थोडास्साच पाठदुखीसारखा त्रास असेल तर सायकल चालवू का?? दर दिवशी २० मि...."भारतीय" रस्त्यांवर????

मोदक's picture

30 Sep 2014 - 3:28 pm | मोदक

कॉलींग डॉक्टर खरे... ;)

मोदक's picture

30 Sep 2014 - 3:30 pm | मोदक

बादवे.... पुण्यातल्या सायकलोत्साहींसाठी.

"डेकॅथलॉन" वाघोली येथे क्लीअरन्स सेल सुरू आहे आणि अनेक भन्नाट अ‍ॅक्सेसरीज कैच्याकै कमी किमतीत मिळत आहेत.

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2014 - 3:58 pm | टवाळ कार्टा

कोणा मिपाकरांकडे जूनी वापरात नसलेली सायकल असेल तर कृपया मला व्यनी करावा :)

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 11:34 am | मुक्त विहारि

भरपूर माहिती मिळाली.
मदकरावांचे आणि शैलेंद्र ह्यांना अनेक धन्यवाद....

आयुर्हित's picture

10 Oct 2014 - 1:09 pm | आयुर्हित

छान उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.

हा एक वीडीओ जरूर पाहावा:
100% Stunning! Danny Macaskill's new video - "The Ridge".

स्वामी संकेतानंद's picture

10 Oct 2014 - 5:18 pm | स्वामी संकेतानंद

उपयुक्त माहिती मोदकराव. शाळेनंतर सायकल सुटलीच. :(

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2014 - 5:36 pm | llपुण्याचे पेशवेll

गियरच्या एका प्रकारात जिथे चाकाच्या एक्सलला चकरे नसून तिथे एक डबा असतो आणि त्यात सगळी असम्ब्ली असते त्या प्रकाराला काय म्हणतात? भारता५ त्याची किंमत किती आहे?

मोदक's picture

14 Oct 2014 - 7:18 pm | मोदक

हब गीअर्स..?

.

भारतातली किंमत माहिती नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2014 - 11:08 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म
भारतात हब गीअर दिसत पण नाहीत.पूर्वी माझ्या आजोबांच्या सायाकला होते. ती मिलिटरी सायकल होती व प्रचंड जड़ होती. आमचि वाट लागायाची. बी एस ए होती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2015 - 10:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेटिंग करताना असा धागा कधी येणार?

ती स्वप्नसुंदरी फार छळतीये. बघु कधी जमतीये घ्यायला ते.

मोदक's picture

15 Sep 2015 - 12:02 pm | मोदक

Mahiti kharach khup chan ahe.......me Cycle gheyach tharaw ahe pan nakki kalat anhi konti ghyavi. Me tumachya mhitichya adhare GIANT chi model pahile...parantu tyat performance ani sport do prakarat gallat hot ahe...cycle frame material aluminium ahe ...he jara khatakatay....maje 15 te 20 hajarant paryant rakkam guntau shakato.....tumhi jankar ahat ..ekhade model suchau skhakal ka...

On Road Ani off Road chale...ashi cycle pahato...atta survat karun nantar motta palla gathawa asa vichar ahe ....fakta swasukhasathi...

तुम्ही "माँट्रा" कंपनीच्या सायकल्स बघा. जायंट, मेरीडा, स्कॉट, ट्रेक वगैरे सायकल इम्पोर्टेड असल्याने; इम्पोर्ट ड्युटीमुळे सायकलची किंमत १०-१५ हजार रूपयांनी वाढते. माँट्रा स्वदेशी असल्याने किंमत कमी असते (साधारणपणे १५-१८ हजार रू.)

या सायकलच्या फ्रेम्स अ‍ॅल्युमीनीयमच्या असतात त्यामुळे वजनाला हलक्या आणि टिकायला मजबूत असतात. हे बटेड अ‍ॅल्युमीनीयम असते (साधे अ‍ॅल्युमीनीयम नसते) आणि अशा प्रकारच्या आणखी प्रक्रिया केलेल्या अ‍ॅल्युमीनीयम चा उपयोग स्पेसशीप आणि मिसाईल्स मध्ये केला जातो त्यामुळे अ‍ॅल्युमीनीयम फ्रेम बाबत निश्चिंत रहावे.

लई भारी's picture

2 Apr 2016 - 9:19 pm | लई भारी

नवीन सायकल घेण्याचा विचार आहे. थोडी मदत हवी आहे :)
सध्या कोलेस्ट्रोल, ट्रायग्लिसराईड नामक शत्रूंची संख्या वाढलीय. आणि जिम चा तिटकारा तसेच जॉगिंग करेन तर (मातीच्या) मैदानावरच या अट्टाहासामुळे सध्या फक्त 'चालणे' चालू आहे. त्यामुळे फिटनेस हा एकमेव हेतू आहे सध्या, पण पुढे मागे छोट्या-मोठ्या सफारी करायची इच्छा आहे.
मिपा वरची माहिती वाचून 'हायब्रीड' प्रकारातील सायकल घ्यावी असे वाटते. माझी उंची ६ फूट आहे.
काळेवाडी/रहाटणी फाट्या जवळ बोडके सायकल मध्ये चक्कर टाकली. त्यांचा दावा आहे कि पुण्यात सगळ्यात जास्त व्हरायटी आहे वगैरे. मला तितक काही वाटलं नाही.
त्यांच्याकडे हायब्रीड मध्ये फॅंटम, रॅले(Raleigh) होत्या. रॅले २९'' सुचवली आणि खूप चांगला रिपोर्ट आहे अस सांगितलं. मला थोडी उंची जास्त वाटली. किमत साधारण १७,०००+ होती.
वर सुचवल्याप्रमाणे, 'माँट्रा' बघायची होती पण तिकडे उपलब्ध नव्हती.
रॅले/माँट्रा मध्ये कोणती बरी आहे. कि अजून कुठला ब्रांड बघू. २०,००० च्या वर खर्च करावे कि नाही संभ्रमात आहे.
माँट्रा, पुण्यात कुठे बघायला मिळेल, पिं.चिं. च्या जवळपास? नाहीतर मग डेकेथलोन ला जाव लागेल बहुधा.

सूचनांचे स्वागत :)

माँट्रा फडके हौदाजवळ किंवा पौड रोडवर झेम्स सायकल्स मध्ये मिळेल.

सहा फूट उंची आणि तसेच वजन असेल तर शक्यतो MTB घ्या. लवकर पंक्चर होत नाही आणि भक्कम असते. मात्र सायकलचे वजनही हायब्रीड पेक्षा जास्त असते..

पुढील प्रवासाला शुभेच्छा.. आणखी काही माहिती लागल्यास बिन्धास्त विचारा. :)

लई भारी's picture

7 Apr 2016 - 7:31 pm | लई भारी

हो, वजन जरा भरभक्कमच आहे ;-) ८६ कि.
त्यामुळे MTB बघतो आता.

अप्पा जोगळेकर's picture

8 May 2017 - 11:56 am | अप्पा जोगळेकर

बोडके सायकल फालतू दुकान आहे.. साधे रिम आउट सुद्धा नीट काढता येत नाही या लोकांना.
सायकलची व्हरायटी शून्य.

इथले पण फोटो अपडेट केले आहेत. हुश्श..!!

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 6:06 pm | संदीप डांगे

माझ्याकडे ट्रेक ची 4300 D २०११ होती. दोन वर्षं चालवली. इन्फॅक्ट ठाण्यात काहीकाळ ऑफिसलाही घेउन जात होतो. नंतर पडतीच्या काळात विकायला लागली. बट आय रियली मिस हर!!

सायकलवर बसल्यानंतर चालवण्याचा आनंद म्हणजे अप्रतिम. अनेकांना इतकी महाग सायकल का घेतली हेच समजत नसे. एवढ्यात मोटरसायकल आली असती म्हणत असत, मी फक्त स्माईल देत असे! मनात, "हाय कम्बख्त, तुने चलाईही नहीं!"

आता परत ते दिवस आणायचे आहेत! दोन्ही पोरं, बायको अणि मी अशा चौघांना चार फर्मास सायकली घेऊन भटकायला जायचे आहे.

मागच्या महिन्यात मला सायकल रिस्टोरेशनचा झटका आला होता. शेवटी बर्‍याच लोकांनी सांगून सांगून परावृत्त केले.

..पण ती MTB ची हौस अजून राहिलीच आहे.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 6:59 pm | संदीप डांगे

तुम्ही आत्ता चालवताय तीच योग्य आहे, माउन्टेन बाईक लॉन्गरुटसाठी मला तरी जरा अयोग्य वाटते.

ही सायकल घेवून दगडातून जाताना लै टेन्शन येते. माऊंटन बाईकने झकास ऑफरोडिंग करायचे आहे.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 7:22 pm | संदीप डांगे

दुसरी घ्या! ;))

ही पण आहे हो.. फक्त वापरली जात नाही म्हणून सध्या एका मित्राला दिली आहे.

.

रिस्टोरेशन सहज करायचे म्हणून करायचे होते.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 7:47 pm | संदीप डांगे

Wow!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 May 2017 - 5:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच उपयुक्त ..
व योग्य माहीती ..
व्हॉल्व्ह च्या प्रकाराबद्दल ही माहीती द्या ..

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 May 2017 - 5:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच उपयुक्त ..
व योग्य माहीती ..
व्हॉल्व्ह च्या प्रकाराबद्दल ही माहीती द्या ..

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 May 2017 - 5:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच उपयुक्त ..
व योग्य माहीती ..
व्हॉल्व्ह च्या प्रकाराबद्दल ही माहीती द्या ..

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 May 2017 - 5:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच उपयुक्त ..
व योग्य माहीती ..
व्हॉल्व्ह च्या प्रकाराबद्दल ही माहीती द्या ..

आपल्या हायब्रीड सायकलला दोन प्रकारचे वॉल्व येतात.

एक प्रेस्टा आणि दुसरा श्रेडर.

.

यातला श्रेडर वॉल्व म्हणजे दुचाकी / चारचाकी गाड्यांना असतो तो. मी हाच वापरतो जेणेकरून कोणत्याही पंक्चरच्या दुकानात आपल्या सायकलमध्ये हवा भरता येते.

प्रेस्टा वॉल्वला एक कन्वर्टर जोडून श्रेडर वॉल्व सारखे ओपनिंग तयार करता येते आणि मग त्याला आपण श्रेडरसारखे वापरू शकतो.

(प्रेस्टा वॉल्व बहुदा रोड बाईकमध्ये वापरतात जेथे हवेचे जास्ती प्रेशर सहन करण्याची आवश्यकता असते - अधिक माहिती डॉक, पाध्ये आणि आपले सायकलिस्ट लोक्स देतीलच.)

भ ट क्या खे ड वा ला's picture

8 May 2017 - 9:57 am | भ ट क्या खे ड वा ला

जेल पॅंट वापरत असाल तर इनर गार्मेंट वापरु नयेत ...
असे वाचनात आले आहे ...
आपले मत व अनुभव काय याबाबत ..

बरोबर आहे. चांगली जेल वाली पॅडेड शॉर्ट वापरत असाल तर फक्त ती शॉर्टच वापरावी. जेल सीट किंवा आणखी कपडे वापरू नयेत.

अर्थात शॉर्ट जेल वाली आहे याची खात्री करून घ्या. अनेकदा साधी / स्पंज / फोमवाली शॉर्ट बिन्धास्त जेल वाली म्हणून खपवली जाते.

अप्पा जोगळेकर's picture

8 May 2017 - 12:01 pm | अप्पा जोगळेकर

माझ्या मते सायकल शॉर्ट किंवा जेल सीट वापरुच नये. खूप जाणत्या लोकांनी सायकल शॉर्ट वापरण्याचा सल्ल देऊनही माझे हे मत वैयक्तिक अनुभवा अंती कायम आहे. साधी ट्रॅक पन्ट किंवा स्पोर्ट्स शॉर्ट ओके आहे.

>>माझ्या मते सायकल शॉर्ट किंवा जेल सीट वापरुच नये

किती किमी पर्यंत?

विकास...'s picture

6 Oct 2017 - 7:00 am | विकास...

कोणती घ्यावी

1. Montra Downtown (2017)
2. MERIDA Crossway 15V MY18 (Black)

महासंग्राम's picture

18 Jun 2019 - 10:57 am | महासंग्राम

सायकलिंग साठी शूज कोणते वापरायचे ?

महासंग्राम's picture

20 Aug 2020 - 12:15 pm | महासंग्राम

जल्ला या फोटोंचं काहीतरी करा राव फोटोच दिसत नाही

प्रसाद_१९८२'s picture

20 Aug 2020 - 2:48 pm | प्रसाद_१९८२

'Lectro essentia tx', 'Lectro glide ss' या हिरोच्या ई सायकल बद्दल इथे कोणाला अनुभव आहे का ?

महासंग्राम's picture

19 Oct 2020 - 5:23 pm | महासंग्राम

आता वाकडला सुद्धा हायवे लगत जिंजर हॉटेल जवळ डिकॅथलॉन सुरु होतंय.