कोरोना विरूध्द भारताचा लढा

तद्दनबाई गेली...................................!

Primary tabs

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
12 Jul 2014 - 8:13 pm

शीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे.

तर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता!

तो मूकपटांचा जमाना होता. मुंबईत इनमिन चार- पाच सिनेमा हॉल तेव्हा होते. त्यातील ऑपेरा हाऊस व स्वस्तिक आम्हा मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या सोयीचे! म्हणजे पिला हाऊसचे सूप्त आकर्षण खूप असायचे आम्हा सर्वांच्या मनांत, पण तिथे जाण्याचे धैर्य मात्र आम्हा कुणाचेच नव्हते. त्या वस्तीतून जाणार्‍या ट्रामींच्या वरच्या मजल्यावर बसून तेव्हढीच जातायेता आजूबाजूस पाहून जी काय मजा चाखायची तितकीच. पण ते असो.

तर तद्दनबाई तेव्हा ऑपेरा हाऊसमध्ये मध्यंतरात पिटातून गायची. मंडळी काय आवाज होता तिचा सांगू! एकदम छप्पर फाडके!! बाजूस पायपेटीवर शिवा कांबळे आणि तबला गळ्यात बांधून तिच्याबरोबरीने उभा नाना पोफळे! काय धम्माल करायची ही तिघे! रात्रीच्या शेवटच्या शोची गंमत तर अगदी न्यारीच. ट्रामी थांबल्या असायच्या, व्हिक्टोरीयांतून येजा करणार्‍या शेटजींची वर्दळ कमी व्ह्यायची. तेव्हा तद्दन जो आवाज लावायची!! आहा.... काय सांगू महाराजा, तो आवाज पार पलिकडच्या स्वस्तिकात जाऊन घुसायचा. तिथे त्यांचा शो बंद करावा लागायचा त्यांना! तिथले पब्लिकही मग तद्दनच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचे! ही मध्यंतरे संपूच नयेत असे तेव्हा वाटायचे. पण ती संपायची, चित्रपटाच्या उर्वरीत भागातील मारामार्‍या वगैरे पाहून मंडळी घरोघर पांगायची तेव्हा रात्रीचे २ वाजून गेलेले असायचे.

पुढे ते सगळेच चित्र विस्कटत गेले. मूकपटांचा जमाना गेला, चित्रपट बोलपट झाले. नायक- नायिका स्वतःच गाऊ वगैरे लागल्या. नंतर तर पार्श्वगायनाचा प्रकार सुरू झाला. तरीही हे नायक व नायिका गाण्यात मजबूत होते बरं का? जोहराबाई अंबावाली, राजकुमारी, अमुक बेगम, तमुक बेगम.... काय ते त्यांचे बुलंद आवाज!! व्वा, व्वा. मग हेही चित्र अजून विस्कटले, ती तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज घेऊन आल्यावर. नंतर तर मला काही ऐकवेना.

तद्दनच्या जाण्याने त्या सगळ्या आठवणी, आमचे फोरास रोड, केनेडी ब्रिज असल्या रस्त्यांवरून जाणार्‍या ट्रामींत वरच्या मजल्यावर बसून घेतलेली 'मज्जा', तद्दनचे रात्रीचे खुल्या आवाजातले पिटातले गाणे... हे सगळे पुन्हा एकदा जागे झाले मनांत!

विनोदलेख

प्रतिक्रिया

तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज

पटले नाही.
आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान करणे हि कोती मनोवृत्ती आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2014 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2014 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

हा ट्यार्पी वाढवायचा क्षीsssण प्रयत्न आहे.

सन्जोप राव's picture

12 Jul 2014 - 8:57 pm | सन्जोप राव

हे 'टंग इन चीक' स्फुट आहे असा संशय आहे. अर्थात असे पंचाखेचू प्रयोग पूर्वी झाले आहेतच म्हणा! यावरून 'रम्य भूतकाळ' ची जुनी घिसीपिटी रेकॉर्ड लावणारे एक तज्ज्ञ आठवले आणि मन सैरभैर झाले.

रमेश आठवले's picture

12 Jul 2014 - 10:15 pm | रमेश आठवले

जोहराबाईचे नाव जोहराबाई अम्बावली नसून अंबालावाली असे होते. त्या वेळच्या बर्याच गायिकांना लेखन-वाचन करता येत नसे आणि, म्हणून की काय, त्यांच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचे गाणे सम्पल्यावर त्या स्वताचे नाव आणि गाव सांगत असत. एक उदाहरण म्हणजे सुंदराबाई यांच्या 'तुम्ही माझे सावकार'. असे धृपद असलेल्या गाण्याच्या शेवटी मेरा नाम सुंदराबाई पूनावाली असे तांनी रेकॉर्ड मध्ये सांगितले आहे..

पैसा's picture

12 Jul 2014 - 11:38 pm | पैसा

मस्त जमलंय!

तद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर विस्मृतीत दडपून जायचे, "नाही चिरा नाही पणती" यासम गत व्हायची, पण आज प्रदीप यांच्यासारख्या तद्दन रसिकोत्तमाने त्यांची आठवण जागवली म्हणून आज एक मिपाकर म्हणून ऊर आनंदाने भरून आला.

तद्दनबाईंचे चरित्र प्रा. बभ्रुवाहन झिगराजी नाळगुंदे यांनी लिहिले होते, पण पानशेतच्या पुरात ... मराठी अक्षर वाङ्मयाची अपरिमित आणि न भरून येणारी हानी ... वगैरे

नंदन's picture

13 Jul 2014 - 4:51 am | नंदन

तद्दन सुरेख लेख! जिंकलंत....!
धन्य तो काळ आणि धन्य ते दर्दी रसिक ज्यांनी तो अनुभवला.....!! तुम्ही ग्रेट आहात.......!!!

तिमा's picture

13 Jul 2014 - 10:02 am | तिमा

प्रदीपजी, तुम्ही जी मज्जा केली आहे तिला चक्क, खरेसाहेब गंडल्याचं बघून आश्चर्य वाटलं.
पण लताला नावं ठेवणारे मी बघितले आहेत. एक बंगाली बुजुर्ग दांपत्य कायम लताला नावं ठेवत 'ज्युतिका रे' ची स्तुती करत.
परवाच, सुमन कल्याणपूर यांचं 'ए मेरे वतनके लोगो' बद्दलचं वक्तव्य वाचलं. पण, माझ्या मते, सी. रामचंद्र, यांना देवाने सुबुद्धी दिली आणि हे गाणं सुमनताई किंवा आशाच्या वाट्याला गेलं नाही. नाहीतर ते असं अजरामर झालंच नसतं.

अनुप ढेरे's picture

13 Jul 2014 - 10:14 am | अनुप ढेरे

हा हा... मस्तं जमलय.

साती's picture

13 Jul 2014 - 10:43 am | साती

मस्तं!
गेले ते दिवस!
राहिल्या त्या आठवणी.
तद्दनबाईंच्या जमान्यात तुमचे वय उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असेल नै!
:)

चौकटराजा's picture

13 Jul 2014 - 11:39 am | चौकटराजा

त्या "बेगमी "तसेच "बाई" बाजाच्या आवाजाचे ज्याना वेड होते त्यानी लता की फता हे म्हणणे स्वाभविक आहे. विशेषतः लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणारी बहुतशी लता " किंचाळणारी" वाटणे शक्य आहे. पण लताबाई- मदनमोहन, लताबाई- रोशन, लताबाई सी- रामचंद्र ,लताबाई-सलील चौधरी या चार संकरांची दोनशे एक गाणी संग्रही ठेवा बास ! सगळे बाकी फिके फिके वाटू लागेल.

चित्रगुप्त's picture

13 Jul 2014 - 4:07 pm | चित्रगुप्त

'श्रावन गगने घोर घनघटा' (रविन्द्रनाथ ठाकुर यांचे) हे गीत कणिका बंदोपाध्याय यांच्या आवाजात, आणि लताच्या आवाजात ऐकावे, म्हणजे 'लता का फत्ता' असेही का म्हटले जाऊ शकते हे कळेल.
कणिका बंदोपाध्याय:
http://www.youtube.com/watch?v=EtuygiXKiac
लता:
http://www.youtube.com/watch?v=kfLJbf0y9lI

लताच्या या गायनात व्यावसायिक सफाई असली, तरी कणीका यांच्या गायनात समर्थतेने व्यक्त झालेल्या विरहिणी राधेच्या आर्त व्याकुळतेचा लवलेशही नाही.

'भानुशिंगेर पदावली' या रविंद्रनाथांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील रचनांवर एक धागाच काढायचे फार दिवसांपासून मनात आहे, पण अजून ते जमून आलेले नाही.

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 4:11 pm | प्यारे१

लेखनविषयः विनोद

प्रदीप's picture

13 Jul 2014 - 6:29 pm | प्रदीप

प्रशांत आवलेंनी दर्शवल्याप्रमाणे ह्या लेखाची कॅटेगरी 'विनोद' अशी होती. सन्जोप राव, पैसा, नंदन, अनुप ढेरे, तिमा व साती ह्यांनी लेखाची नस अचूक पकडली. सातींनी 'तद्दन'च्या मूकपटांच्या जमान्यात तरूण असलेल्या लेखकाचे वय तेव्हा उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असावे, असा सही अंदाज मांडला आहे. तो जमाना सुमारे १९३५- ४० च्या दरम्यान संपला असे मानले, तर हा सदरहू लेखक आता नव्वदीत आला असावा! मी स्वतः तर अजून काका दशेतच आहे, नव्वदीत नाही!तेव्हा 'तो मी नव्हेच!'

लेखात किमान एक अतिशयोक्त उल्लेखही आहे, तो म्हणजे ऑपेरा हाऊसमधे गात असलेल्या 'तद्दन' चा आवाज थेट स्वस्तिकमधे पोहोचायचा! दोघांतील अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे, आणि स्वस्तिक आता कसे आहे, किंबहुना ते अस्तित्वात आहे की नाही, हेही मला ठाऊक नाही. पूर्वी आम्ही (म्हणजे आजचे 'काक'लोक) मॅटिनीस तिथे जात असू तेव्हा बाल्कनीस तोलून धरणारे खांब, खालील मजल्यावरील मागच्या 'रो'जच्या मधे येत. सरावाने कुठल्या सीटा घेऊ नयेत, हे आम्ही शिकलो होतो. म्हणाजे स्वस्तिक सत्तरीच्या दशकांत इतके वाईट असले, तरीही बाहेरील आवाज थेट आत येईल, इतके वाईट ते मूकपटाच्या जमान्यातही नसावे!!

'लता का फत्ता' असल्या थाटाचा उल्लेख आमच्या एका दूरच्या, आत्ता हयात असते तर शंभरीच्या पलिकडे असते अशा वयाच्या काकांनी केलेला होता असे आठवते. दर पिढीस पुढील पिढीचे संगीत, त्यांचे साहित्य, किंबहुना त्यांचे सगळेच सर्वसाधारणपणे आवडत नाही, त्याचे हे एक प्रतिबिंब होते.

लताच्या गाण्याबद्दल इतकेच नव्हे तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी जी काही अत्यंत जिव्हाळ्याची मते आहेत, ती येथे अनेकदा वेळोवेळी मी प्रकाशित केलेली आहेतच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2014 - 4:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद दिलेला आहेत तर निमित्तही सांगून टाका.

प्रदीप's picture

15 Jul 2014 - 11:01 am | प्रदीप

काही नाही.

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2014 - 12:51 am | राजेश घासकडवी

माझ्या मते हा प्रतिसाद यायला नको होता. विशेषतः इतर काही वाचकांनी गंमत ओळखलेली असताना असा बचाव करण्याची गरज नव्हती. काही लोकांना हे खरं वाटणं हेच टंग इन चीक विनोदाच्या यशाचं गमक आहे.

'वा म्हाराजा, काय ते दिवस होते' असं म्हणणारे अनेक जण 'ह्याः आताचं सगळं फालतू आहे' असं म्हणतात. याची खिल्ली फारच छान उडवलेली आहे.

शीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा गुगल सर्च करायचा बेत होता.
पण म्हटलं आधी लेख वाचावा.
लेख वाचून शंका फिटली पण काही प्रतिसाद वाचून ती पुन्हा निर्माण झाली ;-)

विकास's picture

13 Jul 2014 - 7:16 pm | विकास

मस्तच! जरी वाचायला सुरवात केल्यावर गाडी कुठे चालली आहे याचा अंदाज आला होता तरी लता बद्दलचे वक्तव्य वाचून एक तर विरंगुळा/विडंबन आहे अथवा आय डी हॅक झाला आहे हे समजले! :)

नगरीनिरंजन's picture

13 Jul 2014 - 7:31 pm | नगरीनिरंजन

झकास! याला म्हणतात सटल्टी.
जद्दनबाई असं नाव ऐकलं होतं पण तद्दनबाई हे नाव वाचतानाच थोडी गंमत वाटली आणि लेख वाचल्यावर दोनेल मिनीटं मात्र गोंधळलो इतकं बेमालूम लिहीलं आहे.
फारच आवडलं. तद्दनबाई हे नाव पर्फेक्ट!

विजुभाऊ's picture

13 Jul 2014 - 8:20 pm | विजुभाऊ

जीओ प्रदीपजी जीओ.
लेख सम्पल्यावर तुमचा कोणावर जीव आहे ते साम्गाल का आता ;)

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 10:37 pm | प्यारे१

झोहरा सहगल आजी गेल्या त्यांच्यावर काही लिहीलंय की काय असं आधी वाटलेलं.
तसं काही न दिसल्यानं लेख वरुन खाली नि खालून वर वाचला.
प्रकरण काय ते समजायला जरा उशीर लागला म्हणा!

पुण्याचे वटवाघूळ's picture

14 Jul 2014 - 6:04 pm | पुण्याचे वटवाघूळ

पूर्ण लेख डोक्यावरून गेला. कोण तद्दनबाई?

ऋषिकेश's picture

15 Jul 2014 - 2:35 pm | ऋषिकेश

:)

धमाल मुलगा's picture

15 Jul 2014 - 2:43 pm | धमाल मुलगा

लेखाची ब्याकग्राऊंड, कारणं वगैरे ठाऊक नाहीत, पण एकदम सटल प्रकारात केलेली ब्याटिंग लै आवडली. :)
बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला.

विकास's picture

16 Jul 2014 - 12:14 am | विकास

नवीन सभासद वाटतं? मिपावर आपले स्वागत आहे! ;)

ज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं पाहून एक कनिष्ठ मिपाकर म्हणून......... आनंद झाला.

बाकी घासकडवी सरांच्या ह्या धाग्यावरील मतास ;) सहमती आहे.

बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला

हे श्री श्री श्री धमाल याम्च्याबातीतही व्हावे ही इच्छा.

शिद's picture

15 Jul 2014 - 4:44 pm | शिद

१००% अनुमोदन.

कोण तद्दनबाई? धन्यवाद !!

बॅटमॅन's picture

15 Jul 2014 - 6:05 pm | बॅटमॅन

तद्दनबाई डिस्को, इतर बाई खिसको =))

बाकी कोण तद्दनबाई इ.इ. काय बी *टा समजले नाय.