कादंब-या वाचन अनेक झालं पण बरेच विसरल्याही जाते. मला शिकत असतांना आणि शिकवायलाही ब-याच कादंब-या असतात. ग्रामीण दलित असं तर बरच साहित्य. व्यंकटेश माडगुळकर. शंकर पाटील, रणजीत देसाई, उद्धव शेळके, ना.धो. महानोर आनंद यादव अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, भालचंद्र नेमाडे, असे बरेच..स्त्री-पुरुष आत्मकथने असं बर्रच आठवतं. बनगरवाडी एक मास्तराची कथा तर केवळ सुंदर, उद्धव शेळक्यांची धग, महानोरांची गांधारी, असे कितीतरी आठवतं. रा.रं.बोराड्यांच्या चारापाणी, सावट्, आमदार सौभाग्यवती. गांधारी. गांधारी ही निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतर खेड्याने कसे नवे रुप धारण केले, हे महानोरांनी गांधारीत अतिशय सुरेख टीपलं आहे.
वाचता वाचता वाढे... साठी. मी घेतलाय रा.रं.बोराड्यांची 'आमदार सौभाग्यवती'ही कादंबरी. याच कादंबरीवर पुढे अनेक नाटकांचे प्रयोग झालेत. राजकारणात स्त्रीला संधी मिळाली तर ती निश्चितपणे जनतेल न्याय देऊ शकते. 'आमदार सौभाग्यवती मधील सुमित्रा हे सिद्ध करुन दाखवते. दोन मुलं, एक दीपक एक मुलगी दीपा आणि राजकारणी नवरा, असं हे कुटुंब. चिमणरावांचं आमदारकीचं तिकिट मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणारा नेता म्हणुन चर्चा होत असते आणि विद्यमान मुख्यमंत्र्याकडून त्यांचं तिकिट कापल्या जातं. मुलाला किंवा पत्नीला तिकिट देऊ असे धोरण पक्षश्रेष्टी घेते आणि मग मुलाला राजकारणात काही इंट्रेष्ट असत नाही. सुमित्रा मग पुढे येते. समाजात पुरुष म्हणुन स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी आणि स्त्री घराबाहेर पडली की पुरुषांचे आडवे येणारे अहंकार. घ्ररातुनच सुमित्राचे चारित्र्यहनन होते, तिच्या बाहेर फिरण्याच्या कारणावरुन तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात. राजकारणात सुमित्रा आमदार होते आणि तिला घर सोडावं लागतं, अशी एक सुंदर कादंबरी.
पत्नी निवडून आली तर हव तेव्हा तिचा राजीनामा घेता येईल असा विचार करणा-या चिमणरावांना निवडणुकीत सुमित्रा जेव्हा निवडून येते. तिचा मान सन्मन पाहता चिमणरावांची इर्षा वाढत जाते. मुख्यमंत्र्यांनी चहा पाण्याला सुमित्राला जेव्हा बोलावलं तेव्हा चिमणराव तिला जाऊ देत नाही, कारण या निमित्तानं तिला मंत्रीपद मिळालं आणि तिने स्वीकारलं तर आपली राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल असे त्यांना वाटतं. आणि आपण आमदार आहोत आणि आपण जर चिमणरावांची पत्नी म्हणून समोर येत असू तर हे चांगलं नाही, ही सुमित्राची भावना प्रबळ होतांना या कांदबरीत दिसते.
मतदार संघातील दौरे, भेटी गाठी, बैठका, सभा यामुळे सुमित्राचा वेळ अधिक घराबाहेर जातो. परिणामी घरातील जीवन विस्कळीत व्हायला लागते. तिच्या भेटीगाठींचा गैर अर्थ काढला जातो. विरोधीपक्षातील टीका हिन दर्जाची असते. मुलगाही या गैरसमजाच्या वातावरणात वाहून जातो. नेहमी आईची बाजू घेणारा दीपक तिला पाहुन थुंकतो. ''खाली थुंकायच्या ऐवजी तिच्या तोंडावर थुंक जोपर्यंत ती राजीनामा देत नाही, असे चिमणराव बोलतात. तिच्याबद्दल पुढे गैरसमज, मतदार संघात बेअदबी, मोर्चे, निदर्शने, घेराव असे विरोधी गटातले नेते करतात आणि ती राजीनामा द्यायच्या ऐवजी घर सोडायचा निर्णय घेते.
दुसरी कादंबरी, नामदार श्रीमती' हा खरं तर त्या कादंबरीचा दुसरा भाग म्हणावं लागेल. याच सुमित्राची यशस्वी अशी कारकिर्द या कादंबरीत रेखाटली आहे, समाज काय विचार करतो त्याच्याशी हिला अजिबात घेणं नाही. कुणी काही म्हणो एकदा पुढे पाऊल टाकलं की परत मागे नाही. पुरुषांच्या अहंकाराचा विचार न करता निर्धाराने पुढे जाणारी सुमित्रा 'नामदार श्रीमती' मधे उत्तम उतरली आहे.
आता मूळ संदर्भ पटकन आठवत नाही, अनिल बर्वे यांची "अकरा कोटी गॅलन पाणी" ही मला वाटते बिहार मध्ये वास्तवात झालेल्या एका खाणीतील अपघातावरील कादंबरी आहे. राजकारण्यांचे प्रेशर आणि खाण मालकांची नालायकी या मुळे (मला वाटते) तिथल्या एका सनदी अथवा तत्सम अधिकारी व्यक्तीकडे दुर्लक्ष करून खाणकाम चालूच ठेवले जाते आणि शेवटी अचानक ११ कोटी गॅलन पाणी खाणीत शिरते आणि अनेक जण मृत्यूमुखी पडतात. शेवटी त्यासर्वाला त्या अधिकार्यालाच जबाबदार धरले जाते.
या कादंबरीचा किती उपयोग केला गेला माहीत नाही, पण अमिताभचा "काला पत्थर " याच घटनेवर आधारीत आहे.
नेमक्या कोणत्या पुस्तकाबद्दल लिहावे याचा निर्णय घेता येत नाही . अफाट वाचन केले , आधाश्यासारखे मिळेल ते वाचले. पन गेल्या ८-१० वर्षात जरा सिलेक्टिव झालो आहे. पुनः पुन्हा वाचतो ती पुस्तके पुढे देत आहे . ही पुस्तके मी कोणत्याही पानापसून सुरुवात करतो -
१. कुण्या एकाची भ्रमण गाथा - गोनीदा
२. स्मरण गाथा- गोनीदा
३. पैस - दुर्गा भागवत
४. दुर्दम्य -
५.राजा शिवछत्रपती
६.पुलं चे कोणतेही
७. राष्ट्राय स्वाहा
८. नर्मदा परिक्रमा - भारती ठाकूर
९. दास डोंगरी राहतो -गोनीदा
ही पुस्तके माझी अत्यंत आवडती आहेत . नवीन वाचून फारसे पदरात पड्त नाही म्हणून जुनेच पुन्हा पुन्हा वाचतो.
यशोताई ,
परवा लिहायला बसलो तेव्हा नावे पटापट आठवता येत नव्हती .. पन तसे मला गोनीदांचे लेखन फार फार आवडते. त्यांची शैली अप्रतिम आहे. समोर बसून सांगताहेत असे वाटते. त्यात प्रामाणिकपणा शिगोशिग असतो.
भपका अजिबात नाही ! सारे काही प्रचितीचे लिहिणे. अत्यंत प्रासादिक आणि ओघवते, मनाला भिडणारे , चांगुलपणावर श्रद्धा बळकट करणारे लेखन !
खरे तर मला आप्पांच्या व्यक्तित्वाबद्दलच नितांत आदर आणि कुतुहल होते , ते जे मनस्वी आणि स्व्च्छंदी आयुष्य जगले त्याचेच सुप्त आकर्षण माझ्या मनात होते. दुर्दैवाने मी त्यांना भेटलो तेव्हा ते फार म्हनजे फारच थकले होते , फारसे बोलणे झाले नाही .. ते आकर्षण आज ही कायम आहे !
आणि म्हणूनच मैय्याच्या किनारी मला इतका आनंद वाटला .. ज्याक्षणी मी लौकिकाचे लक्तरे उतरुन तिच्या कुशीत शिरलो.. तो क्षण पुनरनुभुती साठी माझ्या आनंदमय कोषात जपून ठेवला आहे. तो जन्म- जन्मांतरासाठी तसाच राहील. त्या क्षणासाठी मी गोनिंदांचा र्।ऊणी आहे !
शेवटी ज्याला " अ "क्षर म्हणतात , ते असेच असायला हवे ना !
पुल का आवडतात - याचे उत्तर देणे आवश्यक नाही !
बाकी अन्य पुस्तके माझ्या आदर्शांच्याबद्दल असल्याने ती माझी वैयक्तिक आवड असू शकते !
वाचतोय आणि एक सुचवतो .सर्व प्रतिसाद महणण्यापेक्षा चांगले वाचन -अनुभव यात लिहिले गेले आहेत .ते थोडक्यात आवरावे लागले आहेत . एक छानसे दोन दिवसांचे शिबिर ठेवले तर खूपच मजा येईल ऐकायला .यासाठी एक चांगली जागा आहे .युसूफ मेहेरली सेँटर ,कर्नाळा किल्याजवळ ,पनवेल .इथे शांतिनिकेतनसारखे वातावरण आहे .पनवेल पेण रस्त्यावरच आहे ,
ऐतिहासिक कादंबर्यांमधे ना सं इनामदारांच्या कादंबर्या आवडत्या. शिकस्त, शहेनशाह, झुंज आणि झेप ह्या आवडत्या. सगळ्यात आवडती शिकस्त. शिकस्तमध्ये पार्वतीबाईंच्या मनस्थितीचे प्रभावी चित्रण केले आहे. कादंबरी लिहिताना घेतलेले लेखनस्वातंत्र्य लक्षात घेतले तरीही कुठेही कादंबरी भडक वा शब्दबंबाळ झालेली वा उगाच पाल्हाळ लावत लांबवलेली वाटत नाही. स्वामी कधीकाळी खूप आवडली होती. अजूनही काही परिच्छेद फार आवडतात.
रारंगढांगबद्दल मनिषने आधीच लिहिले आहे, माझी अतिशय आवडती कादंबरी.
गोनिदांच्या शब्दकळेसाठी आणि प्रसंग फुलवण्याच्या हातोटीसाठी त्यांच्या पडघवली, जैत रे जैत, रुखातळी, वाघरु, दास डोंगरी रहातो सारख्या कादंबर्या. भ्रमणगाथाही आधी आवडले होते पण आता वाचताना ते इतके उजवे वाटत नाही. (गोनिदाप्रेमी मारणार आता मला!)
ब्र ही कविता महाजन ह्यांची कादंबरी.
अजून लिहिते थोड्या वेळाने. एकूणातच माझे कादंबरी वाचन जरा कमीच आहे हे जाणवले ह्या धाग्यानिमित्ताने.
<<<<भ्रमणगाथाही आधी आवडले होते पण आता वाचताना ते इतके उजवे वाटत नाही
भ्रमण्गाथा इतकी सुंदर आहे की मी ती जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हाच ठरवलं आपण परिक्रमेचा स्वाद घ्यायचाच ! जे साहीत्य परिमाण करु शकते तेच उजवे असे म्हणता येईल का ?
आणि पूर्णामायची लेकरं?शितू? माचीवरला बुधा ?
ब्र बद्दल ब्र अदेखील नको .
टुकार हाच शब्द योग्य !
नर्मदा परिक्रमेवरचे मला आवडलेले पुस्तक म्हणजे भारती ठाकुरांचे. अतिशय सुरेख चिंतन ह्या पुस्तकात त्यांनी मांडले आहे. भ्रमणगाथा एक कादंबरी आहे. प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेविषयी त्यात काहीच नाही. कादंबरी इतकेच त्याचे महत्त्व.
ब्र बद्दल तुमचे मत तुमच्यापाशी आणि माझे माझ्यापाशी :)
हो होत्या की विटेकरकाका :) बाकी काही असले तरी ब्र ही कादंबरी आवडते मला त्यांची. तितकेच. जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणायला माझी काहीच हरकत नाही. ते सोडून बाकी त्यांच्या फेबुवरच्या पोस्टीदेखील मला आवडत नाहीत, हेही नमूद करते.
तुम्हांला ब्र आवडली नसे ल तर तुम्ही बिंन्धास्त म्हणा की तसं :) आवड सापेक्ष असणार ना? पण तुमच्याशी मी कुंटेंच्या पुस्तकांबाबत सहमत आहे. तरी त्यांचे पहिले पुस्तक नर्मदामाईच्या परिक्रमेवरचे आहे, ते फारच बरे. अजून एक मी आणले होते, ते वाचून तर माणूस भंपक तर नाही ना, असेही मनात आले होते.
'टू किल अ मॉकिंगबर्ड' ही हार्पर ली या लेखिकेने १९६० साली लिहून प्रसिद्ध केलेली कादंबरी. कृष्णवर्णीय नागरिकांच्या समान हक्कांसाठी झगडणारी 'सिव्हिल राईट्स मूव्हमेंट' ऐन भरात येण्याआधी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक रसिकांइतकेच जाणकारांकडूनही नावाजले गेले. १९६१ च्या पुलित्झर पारितोषिकासोबतच अनेक सन्मान या कादंबरीला मिळाले. ग्रेगरी पेकची भूमिका असलेला चित्रपटही तीन ऑस्कर पुरस्कार जिंकून गेला. या कादंबरीत ज्या बदलांचे, ज्या संघर्षाचे चित्रण झाले आहे, त्याचे संदर्भ अजूनही कमीअधिक प्रमाणात कायम आहेत. बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले सभोवतीच्या समाजातले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणिवेचीही अधूनमधून जोड देणारी, नर्मविनोदाची पखरण असणारी या कादंबरीची निवेदनशैली अजूनही लक्षावधी वाचकांना भुरळ घालत आलेली आहे.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काही वर्षांतला अमेरिकन समाज हे एक खदखदते रसायन होते. कृष्णवर्णीयांना गुलामीतून मुक्त करण्याच्या हेतूने लढले गेलेले यादवी युद्ध संपून सात-एक दशके उलटली असली तरी दक्षिणेतल्या राज्यांत त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नव्हता. तुलनेने उदारमतवादी असलेल्या उत्तरेकडच्या राज्यांत मिळेल त्या मार्गाने कृष्णवर्णीय गुलामांचे स्थलांतर चालू होते. ('ग्रेट मायग्रेशन' या संज्ञेने ओळखल्या जाणार्या या सामाजिक उलथापालथीच्या काळात जवळजवळ पन्नास लाख कृष्णवर्णीय गुलाम उत्तरेतील राज्ये आणि कॅलिफोर्निया राज्यात निसटून जाण्यात यशस्वी ठरले.) अशातच जागतिक मंदीत अमेरिका आणि त्यातही औद्योगिकदृष्ट्या पिछाडीवर असलेली दक्षिणेतली राज्ये होरपळून निघत होती. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडून आलेले फ्रॅंकलिन रूझवेल्ट त्यांची प्रागतिक, क्रांतिकारक धोरणे धडाक्याने राबवत होते. युरोपावर दुसर्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. सामाजिक सुधारणा घडून येण्यासाठी जे पोषक वातावरण लागते, त्याची वानवा असली तरी थोडी दारे किलकिली होऊ लागली होती. १९३२ ते ३५च्या या कालावधीत दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात, मेकॉम्ब नावाच्या एका काल्पनिक जागी ह्या कादंबरीचे कथानक आकार घेते.
पहिल्याच काही पानांत निवेदनातले दुहेरी आवाज/दृष्टिकोन वाचकाला सांधेबदल जाणवूही न देता वापरण्याचे हार्पर लीचे कौशल्य दिसून येते. हा किस्सा सांगताना सुरुवात कुठून करायची, यावर आपल्या भावाचे मत खोडून काढताना एका सात-आठ वर्षांच्या मुलीच्या नजरेतून लिखाण उतरते; तर युरोपातल्या छळाला कंटाळून अमेरिकेत स्थायिक झालेल्या सायमन फिन्च या मूळ पुरुषाने कृष्णवर्णीय गुलामांना कामाला जुंपून बस्तान कसे बसवले, यामागची विसंगती न बोलताही दाखवून देण्यामागचे प्रौढ स्त्रीचे निवेदनही जवळजवळ त्याच सुरात येते.
सात-आठ वर्षांची स्काऊट, तिच्याहून चार वर्षांनी मोठा भाऊ जेम, घरातली कृष्णवर्णीय दाई कॅलपर्निया आणि पन्नाशीकडे झुकलेले वडील अॅटिकस फिन्च ही फिन्च कुटुंबातली मंडळी. दोन वर्षांची असताना आई निवर्तल्यावर गावात प्रतिष्ठित वकील असणार्या वडिलांच्या सुसंस्कृत वळणात वाढलेल्या स्काऊटची मूळची थोडी हूड, बंडखोर वृत्तीही अधूनमधून उफाळून येत असते. मग तो 'काय मुलीसारखी वागतेस?', म्हटल्यावर डिवचली जाण्याचा प्रसंग असो की शेजारच्या रॅडली कुटुंबाच्या घरात बंदिस्त असणार्या आर्थर रॅडलीबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी रात्री त्यांच्या मळ्यातून जाऊन खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रसंग.
अशा गावात स्काऊटच्या घराशेजारी राहणारे रॅडली कुटुंब मात्र अगदी वेगळे. इतरांत अजिबात न मिसळणारे. अशा घरातल्या आर्थर या मुलाला त्याच्या कुमारवयातल्या पुंडाईबद्दल गावातल्या अधिकार्याने शिक्षा केल्यावर, त्याच्या वडिलांनी त्याला घरात बंदिस्त केलेले असते. गेली कित्येक वर्षे त्याचे नखही कुणाच्या दृष्टीस पडलेले नसते. परिणामी आसपासच्या लहान मुलांमध्ये त्याच्याबद्दल भयमिश्रित कुतूहल असतं. आर्थर हे त्याचे मूळ नाव मागे पडून लहान मुलांत एक बागुलबुवा म्हणून ’बू रॅडली’ हे नाव रूढ झालेले असते. शाळेत जाताना स्काऊट आणि जेमही वाटेवरचे हे घर कायम जीव मुठीत धरून धावतपळत ओलांडतात. त्याच्याबद्दल अनेक दंतकथा गावात प्रचलित आहेत. कधी न पाहूनही जेम त्याचे वर्णन ’भयानक दिसणारा, साडेसहा फूट उंच, काळोख्या रात्रीं इतरांच्या खिडकीवर नखाचे ओरखडे काढणारा, खारींसारखे प्राणी कच्चे खाऊन जगणारा’ असे करतो. शेजारी आलेल्या त्यांच्याच वयाच्या डिल नावाच्या मुलाने डिवचल्यावर तिघे मिळून ’बू’ कसा दिसतो, हे पाहण्याचे दोन-तीन निष्फळ प्रयत्न करतात.
बू रॅडलीबद्दल लहान मुलांत आणि काही अपवाद वगळता गावात पसरलेली मते ही प्रतीकात्मक आहेत. बहुमतापेक्षा वेगळे असणार्या, आपले जीवन स्वेच्छेने वेगळ्या प्रकारे जगू पाहणार्यांबद्दल एक अनामिक दहशत बहुसंख्यांना वाटत असते. त्या भीतीची प्रतिक्रिया म्हणून मग त्या व्यक्तीशी किंवा समूहाशी ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही, अशांच्या दुरवस्थेला जबाबदार असण्याचा आळ तिच्यावर घेणे हेही नेहमीचेच. इंग्रजीतल्या 'कॉल अ डॉग मॅड, अॅंड शूट इट' या वाक्याप्रमाणे समाजाची बव्हंशी असणारी वागणूकच इथे प्रतिबिंबित झालेली दिसते.
आपल्या मुलांच्या या वागण्याकडे, चुकांकडे पाहण्याचा अॅटिकसचा दृष्टिकोन त्यांनी चुका करत करत शिकले पाहिजे असा आहे. शक्यतो उपदेशाचे डोस न पाजण्याकडे कल असणारा अॅटिकस, स्काऊटला दुसर्यांच्या नजरेतून जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करण्याचा आणि निरुपद्रवी जिवांना त्रास न देण्याचा सल्ला देतो. एरवी पापपुण्याची भीती न घालणारा तो, नाताळची भेट म्हणून खेळण्यातला बंदुका घेऊन दिल्यावर मात्र मॉकिंगबर्डससारख्या आपल्या गाण्याने रिझवणार्या, पिकांची वा बागांची नासाडी न करणार्या पक्ष्यांची शिकार करणे हे पाप आहे, असे बजावून सांगतो.
कादंबरीचा हा पहिला भाग बिल्डुंग्जरोमान (Bildungsroman) या प्रकारात - म्हणजे ज्यात कथेतल्या मुख्य पात्राचा निरागस बालपणाकडून प्रौढपणाकडे होणारा अटळ प्रवास चित्रित केलेला असतो, अशा स्वरुपाच्या पुस्तकांत मोडतो. कथानकात याच सुमारास अॅटिकसने स्वीकारलेल्या एका वादग्रस्त वकीलपत्राची चाहूल लागते. एका गौरवर्णीय स्त्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कृष्णवर्णीय गुलामाच्या बाजूने कोर्टात लढण्याचे परिणाम आपल्या मुलांवर काय होतील, यावरचे त्याचे विचार 'द इयर्लिंग' किंवा 'पाडस'मधल्या ज्योडीच्या बापाच्या धडपडीची आठवण करून देतात. एकीकडे मुलांना बाहेरच्या जगाची झळ लागून नये, त्यांचे निरागस बालपण तसेच रहावे, ही धडपड आणि दुसरीकडे हे फार वेळ टिकणार नाही, बाहेरच्या जगाचे टक्केटोणपे खाऊन शहाणपण अटळपणे शिकावे लागेल, ही जाणीव अशा द्विधा अवस्थेत सापडलेले दोन्ही सुजाण बाप. फरक शोधायचाच झाला तर एकोणिसाव्या शतकातल्या, फ्लोरिडातल्या जंगलात राहणार्या पेन बॅक्स्टरला आपल्या मुलाला निसर्गाच्या दयामाया न दाखवणार्या रूपाची ओळख करून द्यावी लागते, तर अॅटिकस फिन्चला माणसांच्या जंगलातल्या त्याहूनही अधिक क्रूर गोष्टींबद्दल.
कादंबरीचा दुसरा भाग बराचसा टॉम रॉबिन्सन या गुलामावर चालवलेल्या खटल्याने व्यापला आहे. खटला सुरू होण्यापूर्वी त्याला गावातल्या तुरुंगात ठेवलेले असताना, तो फोडून स्वतःच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याकरता रात्री आलेला जमाव, अवचित तिथे पोचलेल्या स्काऊटने आपल्या वर्गातील एका मुलाच्या वडिलांना ओळखल्यावर त्याला समूहाच्या बेभान मानसिकतेतून बाहेर पडून आलेले भान, अॅटिकसने परिस्थितिजन्य पुराव्यांनिशी त्याचा निरपराधीपणा सिद्ध करण्याचा केलेला प्रयत्न हे सारे मुळातून वाचण्याजोगे आहे. काहीही काम न करता सरकारी मदतीवर, उकिरड्यावर पोरांचे लेंढार घेऊन जगणार्या बॉब यिवेलनेच आपल्या मुलीला टॉम रॉबिन्सनला मोहाच्या जाळ्यात ओढताना पाहून कशी मारहाण केली आणि गोर्या माणसाचा शब्द हा काळ्या माणसाच्या साक्षीपेक्षा ग्राह्य धरला जाईल, या खात्रीपायी उलट बालपणी अपघातात एक हात निकामी झालेल्या टॉमनेच बलात्कार केल्याचा बनाव कसा रचला, हे ज्युरींपुढे मांडूनही अखेर टॉमला दोषी ठरवले जाते.
असे असले तरी, शहरातील अनेक सुशिक्षितांना टॉमच्या निरपराधीपणाची खात्री पटलेली असते. वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाऊ नयेत म्हणून किंवा काहीएक निर्णय घ्यायला जे धाडस लागते, ते अंगी नाही म्हणून ज्युरींत बसायचे नाकारणार्या या वर्गाला अॅटिकस फिन्चने त्यांची लढाई लढायला हवी असते. परिणामी निर्णय आपल्या बाजूने लागला तरी गावात आपली छी:थू होते आहे, हे बॉब यिवेलला जाणवते. त्याचा सूड म्हणून तो स्काऊट आणि जेम शाळेतल्या हॅलोवीनच्या समारंभानंतर रात्री परतताना त्यांच्यावर हल्ला करतो. त्या प्रसंगी, आत्तापर्यंत वर्षानुवर्षे केवळ आपल्या घरात बसून असणारा आणि शेजारच्या या दोन मुलांनी आगळीक करूनही झाडाच्या ढोलीत त्यांच्यासाठी लहानसहान भेटवस्तू ठेवून त्यांच्याशी मूक संवाद साधणारा बू रॅडली त्यांच्या मदतीला धावून येतो. झटापटीत त्याच्या हातून बॉब यिवेलचा खून होतो. असे असले तरीही, बचावासाठी केलेली झटापट आणि मुख्य म्हणजे बू रॅडलीचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार अबाधित रहावा म्हणून, अॅटिकसचा विरोध डावलून पोलिस अधिकारी टेट या मृत्यूची बॉब यिवेलचा आपल्याच चाकूवर पडून झालेला मृत्यू अशी नोंद करतो.
इतके दिवस ज्याला प्रत्यक्ष न पाहताही आपण ज्याची धास्ती घेतली होती, त्या आर्थर रॅडलीला स्काऊट प्रथमच पाहते. सगळा गोंधळ संपून आर्थर रॅडलीला त्याच्या घरी पोचवून परत येताना तिला आपले घर, घरासमोरचा रस्ता यापूर्वी न पाहिलेल्या कोनातून दिसतो आणि इतकी वर्षे अपरिचित असणारा आर्थर रॅडली कसा विचार करत असेल, हे समजून घेण्याचा; नकळत आपल्या वडिलांनी सांगितलेला सल्ला कृतीत आणण्याचा ती प्रयत्न करते. वेगळ्या संदर्भात सांगायचे तर या 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे'च्या टप्प्यावर कादंबरी संपते.
. . .
थोडा विचार केला तर या कादंबरीत आपले आयुष्य गमवावे लागलेला टॉम रॉबिन्सन, विक्षिप्त आणि हट्टी वडिलांमुळे घराबाहेरच्या आयुष्याला पारखा झालेला आर्थर रॅडली आणि बालपणातली निरागसता, भाबडा विश्वास संपलेली स्काऊट असे किमान तीन तरी मॉकिंगबर्डस् आहेत. पहिला सामाजिक पातळीवर; तर बाकी दोघे वैयक्तिक, खाजगी पातळीवर. पण एकाच पुस्तकात कुठेही मुद्दामहून रचल्याचा संशयही न येता या तीन अपरिहार्य कहाण्या एकाच कथानकात फार सुरेखपणे गुंफल्या गेल्या आहेत. जे काही सांगायचे आहे, ते आतापर्यंत अनेकदा सांगून झालेले असले ('व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' इ.) तरी सांगण्याची ही निराळी शैली गालिबच्या 'अंदाज-ए-बयॉं और'प्रमाणे या कादंबरीच्या अनेक बलस्थानांपैकी एक.
दुसरे म्हणजे, यात कुठेही उसना क्रांतिकारक आव नाही. कृष्णवर्णीय हे आपल्यापेक्षा वेगळे, कमी दर्जाचे आहेत, ही समजूत पिढ्यानपिढ्या दक्षिणेतील गौरवर्णीय समाजात इतकी खोलवर रूजलेली होती की, अचानक एका भाषणाने संपूर्ण शहराचे हृदयपरिवर्तन झालेले दाखवणे, वस्तुस्थितीशी फारकत घेणारे ठरले असते. 'श्यामची आई'मधल्या, कुणबिणीला सहृदयपणे वागवूनही जनरीतीप्रमाणे घरदार बाटल्याचा आळ येऊ नये म्हणून, अंगावर पाणी घेऊन मगच घरात येण्याच्या प्रसंगाची आठवण करून देणारे काही प्रसंग या पुस्तकात आहेत.
कुठल्याही प्रभावी पुस्तकाप्रमाणे या कादंबरीचाही तिच्या प्रकाशनावेळी असलेल्या सामाजिक परिस्थितीशिवाय सुटा, वेगळा विचार करणे हे अपूर्ण ठरेल. १९६० साली जेव्हा ही कादंबरी प्रथम प्रसिद्ध झाली तेव्हा 'सिव्हिल राईट्स' चळवळ नुकतेच बाळसे धरू लागली होती. हार्पर लीच्या आधी अनेक लेखकांनी कृष्णवर्णीयांवर होणार्या जुलमांना साहित्यातून वाचा फोडली असली तरी दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात वाढलेल्या एका गौरवर्णीय स्त्रीने बहुतांशी आपल्या बालपणात घडलेल्या घटनांवर बेतलेले इतके प्रभावी परंतु त्याचवेळी अनाग्रही चित्रण करणारे पुस्तक प्रसिद्ध करणे, हे अपूर्व होते. इतर अनेकांनी दाखवलेल्या धैर्याप्रमाणे आणि अनेक इतर गोष्टींप्रमाणे एका लहान मुलीच्या नजरेतून ही अन्याय्य विसंगती दाखवून देणार्या या पुस्तकाचाही कृष्णवर्णीयांना आपला हक्क मिळवून देण्यात खारीचा वाटा आहे.
अर्थात त्यापलीकडेही आज वेगळ्या संदर्भात या पुस्तकात चित्रित झालेला संघर्ष अजूनही चालू आहे. याच आठवड्यातील बातम्यांवर नजर टाकली तर बळी पडलेले असे कैक मॉकिंगबर्डस् दिसतील. मग ती समलिंगी म्हणून चिडवले गेल्यामुळे आत्महत्या केलेली सहा किशोरवयीन मुले असोत किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग असूनही अॅबओरिजिनल (आदिवासी) जमातीतील असल्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या अमानुष छळाला तोंड द्यावे लागलेला माणूस असो. कदाचित उत्क्रांतीच्या ओघात राहून गेलेल्या, जे जे आपल्यापेक्षा वेगळे ते दुय्यम, धोकादायक मानण्याच्या आदिम प्रवृत्तीचा हा दोष असावा. या प्रवृत्तीचे चित्रण करण्याचा प्रयत्न, तिच्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने साहित्यात होत आला आहे. या प्रयत्नांतून जी काही मोजकी पुस्तके स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहतात; त्या अक्षरकृतींमध्ये 'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा माझ्या मते नक्कीच समावेश होतो.
कालच एक '१२ इयर्स अ स्लेव्ह' (चुभू दे घे) अशा नावाचा चित्रपट पाहिला (बघवला नाही म्हणून पळवत :( ). नायक नि त्याचं कुटुंब कृष्णवर्णीय असणं हे वरच्या पोस्टबाबतचं साधर्म्य. (ह्याच नावाचं पुस्तक देखील आहे)
गोर्यांनी ह्या नि नेटिव्ह लोकांवर केलेले अत्याचार हा एक दडपशाहीनं दाबला गेलेला विषय वाटतो आहे.
नंदनचे लिखाण म्हणजे आपल्याला मेजवानी. मी हे पुर्वी वाचले नव्हते - अर्थातच खूप आवडले. कादंबरी वाचली नाही, पण चित्रपट पाहिलाय! नंदनचे विश्लेषण फार आवडले.
कदाचित उत्क्रांतीच्या ओघात राहून गेलेल्या, जे जे आपल्यापेक्षा वेगळे ते दुय्यम, धोकादायक मानण्याच्या आदिम प्रवृत्तीचा हा दोष असावा. या प्रवृत्तीचे चित्रण करण्याचा प्रयत्न, तिच्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने साहित्यात होत आला आहे. या प्रयत्नांतून जी काही मोजकी पुस्तके स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहतात; त्या अक्षरकृतींमध्ये 'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा माझ्या मते नक्कीच समावेश होतो.
वा, काय सुंदर सांगितलाय मर्मांश. हा चित्रपटही तितकाच सुरेख आणि विचार करायला लावणारा आहे.
मी पहिली इंग्रजी कादंबरी द गुड अर्थ ,पर्ल बकची वाचली .नववीत होतो .पाचवी ते आठवी शाळेतल्या नो सूनर -दैन अॅज सून अॅज घोटलेल्या धड्यांवर भिस्त ठेवून ठायी ठायी डिक्शनरी पाहून पूर्ण केली होती .फारच आवडली होती .चीनमधील शेतकऱ्याच्या जीवनावर आहे .त्यावेळी वाटलं कोणी चांगली पुस्तके सुचवेल तर फार बरं होईल .
मिपावर ही माझी पहिलीच पोस्ट. पहिल्या पोस्ट साठी चांगला विषय मिळाला. अगदी खास आवडत्या पुस्तकांमध्ये पुढील नाव घेईन. –
१) कविता महाजन यांची ‘ब्र’- मन विदीर्ण करणारी कादंबरी. शहरी व ग्रामीण समाजाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी, तथाकथित शहरी सुसंस्क्तुत कुटुंबात होणारी स्त्रियांची कुचंबणा, आणि ग्रामीण स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या यातना, राजकारणातल स्त्रियांचं स्थान आणि वापर, सेवाभावी संस्थांचे स्वार्थ आणि राजकारण, एकाच वेळी अस्वस्थ करणारे अनेक मुद्दे लेखिकेने मांडले आहेत. एक अत्यंत वास्तवदर्शी कादंबरी.
२) मिलिंद बोकिलांची 'शाळा' - खरतर या कादंबरीत वर्णन केलेला काळ, खूप जुना. माझ्या आई- बाबांच्या शाळेच्या वेळचा. मी शाळेत असताना गोष्टी फारच बदलेल्या होत्या. मुला-मुलींच्या मैत्रीत खूपच मोकळेपणा आलेला होता. पण तरिही वास्तव जगाची जाणीव होऊ लागण्यापूर्वीच्या वयातील तरल मनाचे जे चित्रण कादंबरीत आहे, ते विलक्षण. कादंबरीच्या शेवटी स्वप्नील जग हळूहळू विरून जात कोरड व्यवहारी वास्तव नायकासमोर उभ राहत तो अनुभव सार्वत्रिक आणि सार्वकालिक म्हणावा लागेल. त्यामुळेच 'शाळा' भावते.
३) ओरहान पामुकची 'स्नो' ही इंग्रजी कादंबरी - ओरहान पामुक हा तुर्कस्तानचा लेखक. मनाचा ठाव घेणारी लेखनशैली हे स्नोच वैशिष्ट्य. या कादंबरीतून तुर्कस्तान हा तसा अपरिचित देश काहीसा समजतो. त्याच भौगोलिक स्थान युरोप आणि पश्चिम आशियाच्या मध्ये. त्यामुळे इस्लामिक पुराणमतवाद आणि युरोपियन आधुनिकता यांच्या मध्ये अडकलेला हा देश. देशाला या दोन्ही दिशांनी ढकलू पाहणाऱ्या परस्परविरोधी सामाजिक- राजकीय शक्ती सतत सक्रीय. छोटया मोठया राजकीय क्रांत्या ही एके काळी या देशातली नित्याची बाब. अशाच एका छोटया शहरातील तात्कालिक लष्करी उठाव आणि त्या पार्श्वभूमीवर घडणारी एकतर्फी अपयशी प्रेम कहाणी हा कादंबरीचा विषय. संस्कृती रक्षण आणि संस्कृती भंजन यांनी पेटून उठणाऱ्या वा त्याचे राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि समूह आणि या समूहांपासून चार हात दूर राहू इच्छिणारी पण नाईलाजाने त्या विळख्यात ओढली गेलेली सामान्य जनता या बहुपेडी नाट्याच मनाला भिडणार चित्रण कादंबरीत आहे. ही कादंबरी समजून घेण्यासाठी खरतर किमान दोनदा वाचावी लागेल. पण तो एक उत्तम अनुभव असेल.
४) 'कोसला' ही मला खूप आवडली, पण ती अनेकांनी वाचली असेल. म्हणून त्याविषयी लिहीत नाही.
एक आवडतं पुस्तक आणि लेखक म्हणजे 'All creatures great and small' by James harriot. या पुस्तकाला कादंबरी म्हणता येइल का हे माहित नाही. कदाचित 'कथासंग्रह' म्हणता येइल. :)
साध्या शब्दात सांगायचं तर प्राण्याच्या डॉक्टरचे अनुभव. प्राण्याबद्दलचे आणि त्याबरोबर ते पाळणार्या वेगवेगळ्या माणसांच्या नमुन्याचेसुद्धा. काही साधेसरळ तर काही इरसाल शेतकरी, काही समजूतदार तर काही हट्टी प्राणी, मध्यरात्री येणार्या विचित्र केसेस, सगळे बरेवाईट अनुभव या डॉक्टरनी अगदी नर्मविनोदी शैलीत मांडले आहेत. त्याचे दुसरे पुस्तक वाचायची इच्छा आहे, पण अजून वाचलं नाही. हे वाचूनपण फार वर्षं झाली. पण एकंदरीत प्राण्यांबद्दल वाचतना छानच वाटतं. अलिकडेच ४ दिवसात 'नेगल' चे दोनही भाग वाचले. अतिशय आनंददायक अनुभव आहे.
त्याशिवाय फार पूर्वी 'ब्लॅक ब्युटी' नावाच्या घोडीचे ती स्वतः सांगतेय अशा पद्धतीनी लिहिलेलं एक पुस्तक वाचलं होते. लेखक आठवत नाही. पण आधीच्या काळात रेसमध्ये आणि नंतर टांग्यासाठी धावणार्या त्या घोडीचं आयुष्य पुस्तक लिहिण्यासारखं निश्चितच होतं.
अलिकडे अनुराधा वैद्यांचे (माझी चिन्ध्यांची बाहुली आणि चौफुला लिहिणार्या) 'श्वानप्रस्थ' वाचलं. तेपण असंच घरात पाळलेल्या कुत्र्यांचे स्वैर मनोगत आहे. फार गमतीदार आहे.
अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख हे माधुरी शानभाग यांनी अनुवादित केललं हे वाचल्यावर ह्या माणसाबद्दलचा आदर खूप वाढला. अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा पण अतिशय तीव्र बुद्दीमत्ता घेऊन आलेला यशाच्या शिखरावर गेल्यावरही यांचे पाय जमिनीवरच राहीले आहेत. आपले भाग्य की त्यांचा जन्म भारतभूमीत झाला.
नववी दहावीत असताना विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर या पुस्तकाने फार अस्वस्थता आणली होती नंतरही इतक्या वेळा वाचुनही ती अस्वस्थता परत येते. सगळी पात्र राघोबा, विश्वासराव, भाऊ, दत्ताजी, महादजी शिंदे डोळयासमोर उभे रहातात. ज्या गोष्टीत लाखो रुपये वाचवता आले असते, काही साध्या गोष्टी केल्या असता तर महाराष्ट्रातील लाखो बायका विधवा झाल्या नसत्या, ते असे वाया गेलेले आणि नंतर माधवरावांच्या खांद्यावर इतके ओझे लहान वयात पडलेले पाहुन अजुनच वाईट वाटते. काही वर्षांपूर्वी वाचनात आले होते की पाटलांनी पानिपतपर्यंत स्वतः प्रवास केला होता, नक्की तो रस्ता कसा आहे, मराठे कुठे, कुठे थांबले असतील असा अनेक प्रकारे अभ्यास करण्यासाठी. पण अजुनही हे पुस्तक खिळवुन ठेवते हे नक्की.
वपु वाचायचे एक वय असतं असे जाणकार म्हणतात :) ते पटतही. पण त्यांची पार्टनर ही कांदबरी मला आवडली, वपुंच्या अनेक कथांमध्ये असते तसे मध्यमवर्गीय वातावरण, दोन भावांमध्ये असलेली अजाणता स्पर्धा, त्यांच्या आईचा जास्त कल मोठ्या मुलाकडे आणि त्यामुळे टिपिकल सामान्य माणसाची चाळ सोडुन फ्लॅट घेण्याची प्रबळ इच्छा आणि त्याचे हफ्ते फेडताना होणारी दमछाक हे सगळं छान टिपलं आहे.
>>>> विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर या पुस्तकाने फार अस्वस्थता आणली होती
सहमत. त्याची(अस्वस्थतेची), मी माझ्यापुरती केलेली कारणमिमांसा अशी की मराठेशाहीच्या इतिहासात सर्वात जास्त प्रभाव आपल्या मनावर असतो तो छत्रपतींच्या इतिहासाचा. बाकीचे कथानायकसुद्धा जसे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि पुढे पेशवाईत थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव, शेवटचे बाजीराव ह्यांच्या यशाने आपण भारावलेले असतो. जे कांही थोडेफार पराभव झाले ते त्यांच्या 'थोर'पणा पुढे छोटे असतात. पण पानिपतात सामरिक दृष्टीने सुयोग्य स्थानी असूनही मराठ्यांच्या पराभवाचे मोठे वर्णन, पेशवाईतली राजकारणं, हार, नंतर सुरू झालेला पळ, मराठ्यांची कत्तल इ.इ.इ. घटनांनी प्रचंड दु:ख आणि अस्वस्थता येते. चढाई आणि यशाला चटावलेल्या मनाला हा पराभव पचत नाही. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीकोनातून कादंबरी चांगली आहे. यशस्वी मराठ्यांच्या इतिहासातील दारूण पराभवाचे यथार्थ वर्णन त्यात आहे.
मी ही कादंबरी विकत घेतली तेंव्हा त्यात मधलीच २५ पाने नव्हती. त्यामुळे कथानकाने एका प्रसंगी मोठी उडी घेतली. त्या बद्दल मी श्री. विश्वास पाटील ह्यांना व्यक्तिशः पत्र लिहून कळविले परंतू त्या पत्राची त्यांनी कांहीच दखल घेतली नाही. हा अजून एक पराभव मला अनुभवास आला. त्याने एकूणात अस्वस्थता वाढली.
मस्त उपक्रम . पर्व आणि 'टू किल अ मॉकिंगबर्ड" ही माझ्या यादी मध्ये वरच्या क्रमांकावर गेली आहेत . पेठकर काकांचा प्रतिसाद तर खास च .
मी एवढ्यात वाचलेलं: झिम्मा . प्रचंड भारावून गेले होते . विजयाबाईंच्या नाट्य कारकीर्दीवर चं एक अतिशय संयत आणि प्रवाही आत्मचरित्रात्मक पुस्तक . पूर्ण आत्मचरित्र नाही कारण मुख्य भर त्यांच्या कारकीर्दीवर आणि संदर्भ आलाच तर त्या अनुषंगाने त्यांचं खाजगी जीवन . कलाकाराची कला आणि त्याचं खाजगी जीवन वेगळंच राहावं , ते तसं ठेवलंय ही सगळ्यात पहिली जमेची बाजू .
बाईंचा अभ्यास , त्यांचा आवाका आणि त्याचं आभाळा एवढं मोठ्ठ काम - मराठी आणि भारतीय रंगमंचाला त्यांनी जागतिक पातळीवर मिळवून दिलेली ओळख या सगळ्यानी मन थक्क होतं . नाटक उभं राहताना दिग्दर्शकाची , निर्मात्याची , नटांची आणि मुख्य म्हणजे कथानकाची एकमेकांशी गुंतलेली तरी ही स्वतंत्र पणे ठसा उमटवणारी स्वभाव वैशिष्ट्य, पडद्यामागच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं असलेलं स्वतःचं असं महत्त्व , एक एक प्रसंग बसवताना उलगडत गेलेले पात्रांचे विशेष , त्या कथेची बलस्थानं हे सगळं एखाद्या तलम वस्त्रातल्या वेगवेगळ्या रंगांसारखा मनावर उमटत जातं . रंगमंचावर दिसणारे प्रसंग आपल्यासमोर येण्यापूर्वी आणि येण्यासाठी किती लोकांची किती मेहनत आणि प्रतिभा पणाला लागलेली असते हे सामान्य प्रेक्षकाला सहज कळत नाही . या पुस्तकाने ते प्रभावीपणे पोहचवलं आहे .
आणखीन एक खूप अप्रूप वाटलेली गोष्टं म्हणजे भारतीय कथांचं परदेशी कलाकार घेउन परदेशी केलेले प्रयोग . मुळात अत्यंत सशक्त असलेली आणि भरपूर नाट्यमय प्रसंग पुरेपूर असलेली महाभारतासारखी कथावस्तू ,विजयाबाईन्सारखी नाट्य माध्यमाची नेमकी जाण असलेली दिग्दर्शिका आणि उत्साहाने भरलेले जर्मन कलावंत …. या संयोगानी उभा राहिलेला प्रयोग किती सुंदर असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो .
एक मराठी स्त्री एका ठाम विचाराने आणि प्रेरणेने एवढं भरीव काम करते याचा मला प्रचंड अभिमान वाटला आणि हे पुस्तक वाचेपर्यंत विजयाबाई म्हणजे "अखेरचा सवाल " मधल्या पहिल्या संचामधल्या भक्ती बर्वे च्या आई एवढीच जुजबी ओळख असल्याची तितकीच खंत वाटली .
आपल्यालाकडे संस्कृतात नाट्यशास्त्र उपलब्ध आहे . नेहमी प्रश्न पडायचा की एखाद्या कलेला शास्त्राचं स्वरूप कसं बरं दिलं असेल ? मानवी स्वभावातल्या वेग वेगळ्या छटा , अनेक दृक्श्राव्य गोष्टींचा नकळत साधला जाणारा परिणाम , त्यातून अत्यंत कमी वेळात , कमी शब्दांत नेमकेपणाने पोहोचवला जाणारा एक विचार या सगळ्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास म्हणजे केवढं मोठं शास्त्र असेल हे पहिल्यांदा लक्षात आलं. हे पुस्तक वाचल्यावर कलेमधली उस्त्फुर्तता अनेक वर्षांच्या अभ्यासाच्या कोंदणाने किती प्रखर होते हे समजलं आणि कलाकारांबद्दल आधीच असलेला आदर खूप वाढला . माझ्या मते हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश .
एवढं समृद्ध साहित्य आपल्या सगळ्या भाषांमध्ये आहे , प्रतिभावंत लोकांची एवढी मोठी परंपरा आहे पण नाट्यसृष्टी ला महाराष्ट्राच्या बाहेर खूप ओळख नाही . न्यूयॉर्क च्या ब्रॉडवे ची प्रसिद्धी आपल्या ही नाट्यसृष्टी ला मिळत नाही याची कधी नाही एवढी खंत वाटली .
बाकी आवडणाऱ्या कादंबरींवर लिहायचं तर वेळ कमी पडणार. नाट्यसृष्टी शी संबंधीत अजून एक चांगलं पुस्तक म्हणजे तिसरी घंटा . लेखक: मधुकर तोरडमल .
आत्मचरित्र म्हणलं तर वोल्ट डीजने चं आत्मचरित्र खूप सकारात्मक आणि त्याच्या कार्टून पात्रांसारखंच प्रसन्न . व्हर्गीस कुरियन चं आय टू हॅड अ ड्रीम हे पण एक सुंदर पुस्तक . आनंद यादवांची झोंबी आणि त्याच्याच पुढची नांगरणी आणि घरभिंती ही तिन्ही पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली होती आणि माणसाचं आयुष्य इतकं अवघड असू शकतं हे पचायला पण त्या वयात खुप जड गेलं होतं.
वपुंच्या पुस्तकांचा वर उल्लेख आहे . मी वपुंची पुस्तकं खूप वाचली त्या वाचायच्या वयात पण सगळ्यात भावलेलं आणि मनात रेंगाळलेल पुस्तक म्हणजे नवरा म्हणावा आपुला . ही खरं तर कादंबरी नाही पण सहज आठवलं म्हणून … साधारण विषय नवरा बायको आणि मध्यमवर्गीयांचे कधी भिडस्तपणामुळे कधी आर्थिक ओढाताणीमुळे होणारे वाद , वैताग , भांडणं असाच . पण सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्वसामान्य समर (!) प्रसंगांमधल्या प्रतिक्रिया , ते साधे प्रसंग पण त्या वेळी खूप मोठे वाटणे , त्यातून परिस्थितीमुळे निर्माण होणारे कधी नर्म तर कधी केविलवाणे विनोद आणि या सगळ्यातून त्या सामान्य माणसाने आपल्या माणसाच्या साथीने किंवा त्याच्या / तिच्या साठी काढलेला मार्ग …सगळंच विलक्षण . तसंही मला जीवन मरणाच्या "larger than life " समस्यांपेक्षा या साध्या नाट्यातून होणारी तारांबळ आणि त्यातून मार्ग काढताना सामान्य माणसाचं एक वेगळीच उंची गाठणारं व्यक्तिमत्त्व याचंच जास्त कुतूहल वाटत आलंय . फार भरकटते आहे का ? हे संपादित केलं तरी हरकत नाही .
अजून वाचायची राहिलेली पण ती न वाचताच प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली दोन पुस्तकं म्हणजे : १. फेल्युअर इज नॉट एन ऑप्शन आणि २. स्कीईंग अगेन्स्ट द atom . या पैकी पहिलं पुस्तक हे नासा च्या निवृत्त अधिकार्याने लिहिलेलं आहे आणि दुसरं हे दुसर्या महायुद्धामधल्या एका थरारक घटनेवर आधारीत आहे .. मूठभर नॉर्वेजियन सैनिकांनी धैर्यानी नाझी अणुबॉम्ब प्रकल्पाला उधळून लावलं , हे सगळे सैनिक त्या साठी कित्येक मैल बर्फातून स्कीईंग करत गेले , त्याची ही कथा .
नाझी वरून आठवलं , नाझी भस्मासुराचा उदयास्त हे असंच भयानक आवडलेलं पुस्तक . पण माझ्या पहिल्याच प्रतिसादात तुम्हाला फार कंटाळा आणत नाही आणि शिवाय स्वैपाक राहिलाय. छ्या मिपा बंद होतं तेच बरं :P
स्रुजा प्रतिसाद खूपच आवडला, झिम्मा मलाही आवडलं फक्त काहीच मोजके प्रसंग सोडुन, पण तू किती तटस्थपणे त्याच्या सगळ्या बाजु सकारात्मक रित्या मांडल्या आहेस. तुझा प्रतिसाद अजिबात भरकटत नाही वा कंटाळा आणत नाहीस. तू लिहिती झालीस हा खरच आनंदाचा ठेवा आहे, त्यामुळेच की काय पण आज इथल्याच इंद्रराज पवारांची आठवण झाली, त्यांचेही प्रतिसाद असेच अभ्यासु, मुद्द्याला धरुन असायचे, सध्या कोठे आहेत कोणाला माहीती आहे का?
तुझ्या यादीतली शेवटची दोन पुस्तके माहीती नव्हती, या धाग्यामुळे तेही कळतयं की अजुन कितीतरी वाचायचं राहीलयं.
इथले एकेक प्रतिसाद वाचताना जादूच्या दुनियेत फिरून आल्यासारखं वाटतंय. कितीतरी नवी पुस्तकं यादीत जोडली गेली आहेत.
अनेक कादंबर्यांपैकी एकीबद्दल लिहिणं खरंच कठीण. जी एंनी अनुवाद केलेल्या रान, गाव्,शिवार या तीन कादंबर्या, गोनीदांची पडघवली, श्री ना पेंडसेंची रथचक्र अशा अनेकांतून एकावर तरी मला लिहिता येईल का ???
श्री. श्रीना पेंडसे ह्यांची कोकण पार्श्वभूमीवरील 'गारंबीचा बापू' ही कादंबरी आम्हाला कॉलेजच्या दूसर्या वर्षाला होती. ती वाचताना त्याकाळी नव्याने ओळख होणार्या कोकण वर्णनाने आणि तिथल्या अस्सल कोकणी माणसांनी भारून टाकले. कादंबरी वाचताना आपणही कोकणच्या वातावरणात एकरूप होऊन जातो. प्रत्येक प्रसंग, स्थळ अनुभवत जातो. शहरी जीवनापासून वेगळे होऊन कोकणमय होऊन जातो.
त्याच वेळी डॉ. काशिनाथ घाणेकरांचे 'गारंबीचा बापू' हे नाटक रंगभूमीवर गाजत होते. ते पाहण्याचाही योग आला, नव्हे जुळवून आणला. आधीच दमदार कादंबरीचे नाट्यरुपांतर आणि डॉ. काशिनाथ घाणेकरांसहीत सर्वच पात्रांचे कसदार अभिनय. संपूर्ण नाटक आपल्याल एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना ह्या गोष्टीही वाखाणण्याजोग्या होत्या.
आजही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी कादंबरी आणि नाटक म्हणजे......गारंबीचा बापू.
गारंबीच्या बापूचा प्रीक्वेल म्हणजे 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी. बापूच्या आईचे -यशोदेचे अध्:पतन यात दर्शवले आहे.
पेंडश्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणजे 'तुंबाडचे खोत'.
त्यांच्या 'हत्या' आणि 'कलंदर' ह्या फारश्या परिचित नसलेल्या कादंबर्या पण मज्कडे आहेत. दोन्ही तितक्यात सुरेख. एकात कोकणाचे तर एकात तत्कालीन मुम्बैचे सुरेख दर्शन होते.
ह्या दोन्हीं कादंबर्या मैजेस्टिक च्या गोडावून मधून धूळ खात असलेल्या अवस्थेत मिळाल्या होत्या.
मला आवडलेल्यातली आता आठवत असलेल्या कादंबर्यांपैकी एक म्हणजे गोनीदांची 'पडघवली'. कादंबरीची सुरुवातच मुळी मस्त जेवणं झालीयेत, अंगणात गप्पा चालू आहेत आणि अशातच घरातली एखादी जुनी जाणती व्यक्ती एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करते अशा थाटात झालीय. पूर्वीच्या लढाया, बाटवाबाटवी, माहेरवाशिणीच्या हाकेला धावलेली दुर्गाबाय, तिनं दिलेली सामक्षा..सगळं एकामागे एक वाचता वाचता भुलवून ठेवतं.
नंतरचं मेघना पेठेंचं 'नातिचरामि', याला कादंबरी म्हणावं की नाही माहीत नाही. पण एक अत्यंत सुंदर पुस्तक. एकंदरीतच लग्नसंथेवर ताशेरे ओढणार्या पुस्तकांपैकी एक. लग्नाच्या वेळेस शपथा घेताना तेवढं नातिचरामि म्हणून नंतर दुसर्या व्यक्तीच्या मोहात पडणं, वाहावत जाणं, काही बिनसलं की पुढचे घटस्फोट. वाचावं असं पुस्तक!! लग्नसंस्थेचं रुप किती बेगडी आहे आणि तरीही ठराविक वय झालं की आपल्या समाजात असणारा लग्नाचा अट्टाहास यावर विचार करायला लावणारं पुस्तक. अर्थात असं मोहात पडणं वैगरे जर स्वाभाविकच असेल तर लग्नसंस्था किती आदर्श आहे हे दुसर्यांना पटवून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न का? असे अनेक प्रश्न उभे करुन त्यावर विचार करायला लावणार्या पुस्तकांपैकी एक!!
कधीही वाचावी अशी ही अनिल बर्वे यांची मस्त कादंबरी. यातला 'कमराद म्हातारा' तर विलक्षण जिवंत उतरला आहे. 'नाही रे' वर्गाचा 'आहे रे' वर्गाशी संघर्ष, जगण्याचा संघर्ष: थोडक्यात पण परिणामकारकपणे सांगणारी अनिल बर्वे यांची लेखनशैली भन्नाट आहे.
'थॅक यू मिस्टर ग्लाड', 'स्टडफार्म', 'अकरा कोटी गॅलन पाणी' या अनिल बर्वे यांच्या आणखी तीन कादंब-या वाचल्या आहेत. तिसरी आत्ता आठवत नाहीये, पण पहिल्या दोन्ही अवश्य वाचाव्यात अशा आहेतच.
या सगळ्या यादीत जी ए आभावानेच आले . जी ए आवडण्याचे ही एक वय असावे . एकी काळी मला जी ए तुफान आवडले .. त्यावयात त्यांच्या सलग दोन कथा वाचणे देखील अवघड वाटे . अधाश्यासारखी वाचली त्यांची पुस्तके ..पारवा, पिंगळावेळ , निळा सावळा , हिरवे रावे.. कुसुमगुंजा ( हे त्यातल्या त्यात अलिकडचे )
अगदी बिम्मची बखर देखील वाचले !
पण सगळ्यात आवडले ते माणसं अरभाट आणि चिल्लर .. ! अजून ही आवडते .. कितीतरी दिवस पिशव्या विठोबा आणि भ्रूशुंड पक्षी सतत समोर येत असत .. अरभाट पुस्तक आहे .. त्यात विचारलेला एक प्रश्न फार दिवस छळत होता.
"जर सगळ्याच गोष्टीचे कर्तृत्व जर नियतीकडे आहे तर आपल्या करण्या अथवा न करण्याला तसा काय अर्थ उरतो ?" खूप वर्षेया प्रश्नाने मला छळले .. हळू हळू जसा मोठा होत गेलो अधिक वाचत गेलो तेव्हा उकल होत गेली ,, मला वाटते गीता प्रवचने ( विनोबा) वाचताना या प्रश्नाची उकल झाली..
पण जी ए अफाट .. यात वादच नाही ! आज ही कधीतरी स्वामी , बांगड्या या कथा निखळ साहित्यिक आनंद देतात!
अभिजात मराठी साहित्याची चर्चा होताना जी ए यायलाच हवेत म्हणून हा प्रतिसाद !
'कादंबरी' असा विषय असल्याने! ;-)
अर्थात जी. एं. नी अनुवादित केलेल्या कादंब-यांबद्दल लिहिता येईल म्हणा!
स्वातंत्र्य आले घरा, रानातील प्रकाश, शिवार, लॉर्ड ऑफ द फ्लाईज....
'एक अरबी कहाणी' माझा आवडता अनुवाद (आणि आवडती कादंबरी) आहे - त्याबद्दल कधीतरी सवडीने!
बर्याच जणांना न आवडलेले आणि तरीही मला आवडलेलं एक पुस्तक- बाकी शून्य! :)
अत्यंत संवेदनशील, स्वतःला कुठेही झोकून देणार्या आणि तरीही त्रयस्थपणे आयुष्याकडे बघू शकणार्या व्यक्तीचे प्रामाणिक निवेदन असं थोडक्यात याबद्दल सांगता येइल. संपूर्ण वाचल्यावर 'कोसला'शी तुलना का करतात हे मात्र कळलं नाही. फक्त थोडंफार बॅचलर लाईफ असल्यानी दोन्ही कादंबर्या एकसारख्या होत नाहीत. बाकी शून्य मध्ये खूप गोष्टी 'between the lines' 'किंवा subtle' आहेत असं मला वाटलं.
सुरुवातीला सावकाश वाचत होते, मध्येच महारोग्यांबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलची सहानुभूती, स्वतःला त्या जागी बघणं, हे एक क्षण इतकं अन्गावर आलं, की वाटलं पुस्तक ठेउन द्यावं.तिथेच लक्षात आलं की इथे फक्त जनरल घटनाक्रम आणि विचार नाहीये. प्रत्येक अनुभव खोल जाउन खळबळ माजवतोय... पुढे झपाटल्यासारखी वाचत गेले. आणि एका दिवसात पुस्तक संपवलं. पूर्ण पुस्तकातकाही वाक्य अगदी चपखल आहेत. जसे 'टीव्हीसमोर बसलं की आयुष्य थिजतं'... निवेदकाचे आणि 'वेताळाचे' संवाद तर मला फार आवडले.
शिवाय एक आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अर्धवट माहितीवर आधारीत काही नाही. UPSCच्या अभ्यासाबद्दल वाचताना , निदान मला तरी, ढोबळ चुका आढळल्या नाहीत. अभ्यासाचे विषय आले की बर्याच कादंबर्यांमध्ये अश्या चुका सापडतात आणि मग वाचताना चव बिघडते.
मला तरी कादंबरीतल्या निवेदकाची एकंदरीत धारणा choice-less awareness च्या जवळ जाणारी वाटली. फक्त कादंबरी वाचेपर्यंत हा choice-less awareness असा जोरात अंगावर येउन, गदागदा हलवून जागं करतो, हे मला माहित नव्हतं. :)
मात्र पुन्हा कधीतरी वाचण्यासाठी मला जरा हिम्मत गोळा करावी लागेल.
अन्तराळ हे पुस्तक केवळ भेदक आहे. दलित साहित्यातील सर्वोत्क्रुश्त पुस्तक आहे. माणसे माण्साला किति वाइट वागवतात ते वाचुन अन्गावर काटा येतो. विशेशतः मेलेला बैल खाण्यासाठि केल्या जाणार्या वाट्णीचे वर्णन सुन्न करणारे आहे.
मी नुकतीच पंजाबातल्या शिखांच्या, नानकाना पंथाच्या इतिहासावर, खालसा पंथाच्या स्थापनेवर लिहिलेली 'व्याध' ही कादंबरी वाचली. लेखक प्रशांत असलेकर, मधुरा प्रकाशन. कादंबरीचा काळ सुमारे १६६६ ते १७१६ हा आहे.
शांतताप्रिय आणि शांततेबाबत आग्रही असणार्यालाही जुलूम, विश्वासघात, कपटीपणापायी अखेरीस सशस्त्र प्रतिकाराचाच मार्ग निवडावा लागतो हा या सा-या इतिहासाचा सारांश आहे. अर्थात कादंबरी असल्याने तपशीलाचे स्वातंत्र्य घेतले असणारच. पण एकंदरीत विषयच इतका जहाल आहे की परिणाम होतोच. काही काही भाग वाचून तर पुरंद-यांच्या 'सातशे वर्षांची काळरात्र'ची आठवण येते. मुघल सत्तेशी संबंधित कुठल्याही लेखनातून अमानवी क्रौर्य वगळणं शक्य नसावंच बहुधा..
या विषयावर हाती आलेलं हे पहिलंच पुस्तक, अजून वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
4 Jul 2014 - 3:46 pm | बबन ताम्बे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
आत्मचरित्र - त्यावेळच्या समाजस्थिचे भेदक चित्रण
4 Jul 2014 - 3:53 pm | बबन ताम्बे
झाडाझडती - विश्वास पाटील
खिळवून ठेवणारी कादंबरी. धरणे, त्याभोवतीचे राजकारण, अभागी धरणग्रस्त - पानीपतकारांनी इथे पण कमाल केली आहे. चुकवू नये अशी कादंबरी.
4 Jul 2014 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कादंब-या वाचन अनेक झालं पण बरेच विसरल्याही जाते. मला शिकत असतांना आणि शिकवायलाही ब-याच कादंब-या असतात. ग्रामीण दलित असं तर बरच साहित्य. व्यंकटेश माडगुळकर. शंकर पाटील, रणजीत देसाई, उद्धव शेळके, ना.धो. महानोर आनंद यादव अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, भालचंद्र नेमाडे, असे बरेच..स्त्री-पुरुष आत्मकथने असं बर्रच आठवतं. बनगरवाडी एक मास्तराची कथा तर केवळ सुंदर, उद्धव शेळक्यांची धग, महानोरांची गांधारी, असे कितीतरी आठवतं. रा.रं.बोराड्यांच्या चारापाणी, सावट्, आमदार सौभाग्यवती. गांधारी. गांधारी ही निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतर खेड्याने कसे नवे रुप धारण केले, हे महानोरांनी गांधारीत अतिशय सुरेख टीपलं आहे.
वाचता वाचता वाढे... साठी. मी घेतलाय रा.रं.बोराड्यांची 'आमदार सौभाग्यवती'ही कादंबरी. याच कादंबरीवर पुढे अनेक नाटकांचे प्रयोग झालेत. राजकारणात स्त्रीला संधी मिळाली तर ती निश्चितपणे जनतेल न्याय देऊ शकते. 'आमदार सौभाग्यवती मधील सुमित्रा हे सिद्ध करुन दाखवते. दोन मुलं, एक दीपक एक मुलगी दीपा आणि राजकारणी नवरा, असं हे कुटुंब. चिमणरावांचं आमदारकीचं तिकिट मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणारा नेता म्हणुन चर्चा होत असते आणि विद्यमान मुख्यमंत्र्याकडून त्यांचं तिकिट कापल्या जातं. मुलाला किंवा पत्नीला तिकिट देऊ असे धोरण पक्षश्रेष्टी घेते आणि मग मुलाला राजकारणात काही इंट्रेष्ट असत नाही. सुमित्रा मग पुढे येते. समाजात पुरुष म्हणुन स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी आणि स्त्री घराबाहेर पडली की पुरुषांचे आडवे येणारे अहंकार. घ्ररातुनच सुमित्राचे चारित्र्यहनन होते, तिच्या बाहेर फिरण्याच्या कारणावरुन तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात. राजकारणात सुमित्रा आमदार होते आणि तिला घर सोडावं लागतं, अशी एक सुंदर कादंबरी.
पत्नी निवडून आली तर हव तेव्हा तिचा राजीनामा घेता येईल असा विचार करणा-या चिमणरावांना निवडणुकीत सुमित्रा जेव्हा निवडून येते. तिचा मान सन्मन पाहता चिमणरावांची इर्षा वाढत जाते. मुख्यमंत्र्यांनी चहा पाण्याला सुमित्राला जेव्हा बोलावलं तेव्हा चिमणराव तिला जाऊ देत नाही, कारण या निमित्तानं तिला मंत्रीपद मिळालं आणि तिने स्वीकारलं तर आपली राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल असे त्यांना वाटतं. आणि आपण आमदार आहोत आणि आपण जर चिमणरावांची पत्नी म्हणून समोर येत असू तर हे चांगलं नाही, ही सुमित्राची भावना प्रबळ होतांना या कांदबरीत दिसते.
मतदार संघातील दौरे, भेटी गाठी, बैठका, सभा यामुळे सुमित्राचा वेळ अधिक घराबाहेर जातो. परिणामी घरातील जीवन विस्कळीत व्हायला लागते. तिच्या भेटीगाठींचा गैर अर्थ काढला जातो. विरोधीपक्षातील टीका हिन दर्जाची असते. मुलगाही या गैरसमजाच्या वातावरणात वाहून जातो. नेहमी आईची बाजू घेणारा दीपक तिला पाहुन थुंकतो. ''खाली थुंकायच्या ऐवजी तिच्या तोंडावर थुंक जोपर्यंत ती राजीनामा देत नाही, असे चिमणराव बोलतात. तिच्याबद्दल पुढे गैरसमज, मतदार संघात बेअदबी, मोर्चे, निदर्शने, घेराव असे विरोधी गटातले नेते करतात आणि ती राजीनामा द्यायच्या ऐवजी घर सोडायचा निर्णय घेते.
दुसरी कादंबरी, नामदार श्रीमती' हा खरं तर त्या कादंबरीचा दुसरा भाग म्हणावं लागेल. याच सुमित्राची यशस्वी अशी कारकिर्द या कादंबरीत रेखाटली आहे, समाज काय विचार करतो त्याच्याशी हिला अजिबात घेणं नाही. कुणी काही म्हणो एकदा पुढे पाऊल टाकलं की परत मागे नाही. पुरुषांच्या अहंकाराचा विचार न करता निर्धाराने पुढे जाणारी सुमित्रा 'नामदार श्रीमती' मधे उत्तम उतरली आहे.
-दिलीप बिरुटे
4 Jul 2014 - 5:30 pm | यशोधरा
पोस्ट आवडली.
4 Jul 2014 - 4:54 pm | विकास
आता मूळ संदर्भ पटकन आठवत नाही, अनिल बर्वे यांची "अकरा कोटी गॅलन पाणी" ही मला वाटते बिहार मध्ये वास्तवात झालेल्या एका खाणीतील अपघातावरील कादंबरी आहे. राजकारण्यांचे प्रेशर आणि खाण मालकांची नालायकी या मुळे (मला वाटते) तिथल्या एका सनदी अथवा तत्सम अधिकारी व्यक्तीकडे दुर्लक्ष करून खाणकाम चालूच ठेवले जाते आणि शेवटी अचानक ११ कोटी गॅलन पाणी खाणीत शिरते आणि अनेक जण मृत्यूमुखी पडतात. शेवटी त्यासर्वाला त्या अधिकार्यालाच जबाबदार धरले जाते.
या कादंबरीचा किती उपयोग केला गेला माहीत नाही, पण अमिताभचा "काला पत्थर " याच घटनेवर आधारीत आहे.
4 Jul 2014 - 6:10 pm | विटेकर
नेमक्या कोणत्या पुस्तकाबद्दल लिहावे याचा निर्णय घेता येत नाही . अफाट वाचन केले , आधाश्यासारखे मिळेल ते वाचले. पन गेल्या ८-१० वर्षात जरा सिलेक्टिव झालो आहे. पुनः पुन्हा वाचतो ती पुस्तके पुढे देत आहे . ही पुस्तके मी कोणत्याही पानापसून सुरुवात करतो -
१. कुण्या एकाची भ्रमण गाथा - गोनीदा
२. स्मरण गाथा- गोनीदा
३. पैस - दुर्गा भागवत
४. दुर्दम्य -
५.राजा शिवछत्रपती
६.पुलं चे कोणतेही
७. राष्ट्राय स्वाहा
८. नर्मदा परिक्रमा - भारती ठाकूर
९. दास डोंगरी राहतो -गोनीदा
ही पुस्तके माझी अत्यंत आवडती आहेत . नवीन वाचून फारसे पदरात पड्त नाही म्हणून जुनेच पुन्हा पुन्हा वाचतो.
4 Jul 2014 - 6:22 pm | यशोधरा
ह्या पुस्तकांमधले तुम्हांला काय आवडले हेच लिहा :)
7 Jul 2014 - 12:16 pm | विटेकर
यशोताई ,
परवा लिहायला बसलो तेव्हा नावे पटापट आठवता येत नव्हती .. पन तसे मला गोनीदांचे लेखन फार फार आवडते. त्यांची शैली अप्रतिम आहे. समोर बसून सांगताहेत असे वाटते. त्यात प्रामाणिकपणा शिगोशिग असतो.
भपका अजिबात नाही ! सारे काही प्रचितीचे लिहिणे. अत्यंत प्रासादिक आणि ओघवते, मनाला भिडणारे , चांगुलपणावर श्रद्धा बळकट करणारे लेखन !
खरे तर मला आप्पांच्या व्यक्तित्वाबद्दलच नितांत आदर आणि कुतुहल होते , ते जे मनस्वी आणि स्व्च्छंदी आयुष्य जगले त्याचेच सुप्त आकर्षण माझ्या मनात होते. दुर्दैवाने मी त्यांना भेटलो तेव्हा ते फार म्हनजे फारच थकले होते , फारसे बोलणे झाले नाही .. ते आकर्षण आज ही कायम आहे !
आणि म्हणूनच मैय्याच्या किनारी मला इतका आनंद वाटला .. ज्याक्षणी मी लौकिकाचे लक्तरे उतरुन तिच्या कुशीत शिरलो.. तो क्षण पुनरनुभुती साठी माझ्या आनंदमय कोषात जपून ठेवला आहे. तो जन्म- जन्मांतरासाठी तसाच राहील. त्या क्षणासाठी मी गोनिंदांचा र्।ऊणी आहे !
शेवटी ज्याला " अ "क्षर म्हणतात , ते असेच असायला हवे ना !
पुल का आवडतात - याचे उत्तर देणे आवश्यक नाही !
बाकी अन्य पुस्तके माझ्या आदर्शांच्याबद्दल असल्याने ती माझी वैयक्तिक आवड असू शकते !
4 Jul 2014 - 6:30 pm | कंजूस
वाचतोय आणि एक सुचवतो .सर्व प्रतिसाद महणण्यापेक्षा चांगले वाचन -अनुभव यात लिहिले गेले आहेत .ते थोडक्यात आवरावे लागले आहेत . एक छानसे दोन दिवसांचे शिबिर ठेवले तर खूपच मजा येईल ऐकायला .यासाठी एक चांगली जागा आहे .युसूफ मेहेरली सेँटर ,कर्नाळा किल्याजवळ ,पनवेल .इथे शांतिनिकेतनसारखे वातावरण आहे .पनवेल पेण रस्त्यावरच आहे ,
4 Jul 2014 - 8:59 pm | कपिलमुनी
Indian Philosophy (Volume -1) , Indian Philosophy (Volume - 2)
डॉ. राधाकृष्णन यांनी लिहिलेली नितांत सुंदर पुस्तके..
भारतीय तत्वज्ञानावर खुप सुंदर भाष्य केला आहे ..वेदांपासुन ते आजच्या धर्मांमधील तत्वज्ञान !
इंग्लिश कठीण आहे आणि रेफर्न्स टाईप असल्याने सुरुवातीला बोअर होता,,पण २-३ प्रकरणानंतर "माताय , असा डावं हाये व्हय ;) " असे वाटून इंटरेस्ट वाढत जातो
फ्लिपकार्ट वर आहेतभाग १
भाग २
4 Jul 2014 - 10:30 pm | पैसा
मोठे नाव वाचून पुस्तक घेतले आणि अज्याबात आवडले नाही, मात्र पुस्तक लै फेमस आहे, असं झालं तर लिहिलेलं चालेल का?
4 Jul 2014 - 10:35 pm | प्रचेतस
चालेल चालेल.
माझ्या लिस्टात ' युगंधर' पहिलं.
नाव मोठं लक्षण खोटं.
4 Jul 2014 - 10:46 pm | कवितानागेश
आज पुन्हा एकदा सेम पिन्च. :)
4 Jul 2014 - 10:40 pm | यशोधरा
त्यासाठी वेगळा धागा काढूयात गं पैसाताई.
5 Jul 2014 - 3:58 pm | यशोधरा
ऐतिहासिक कादंबर्यांमधे ना सं इनामदारांच्या कादंबर्या आवडत्या. शिकस्त, शहेनशाह, झुंज आणि झेप ह्या आवडत्या. सगळ्यात आवडती शिकस्त. शिकस्तमध्ये पार्वतीबाईंच्या मनस्थितीचे प्रभावी चित्रण केले आहे. कादंबरी लिहिताना घेतलेले लेखनस्वातंत्र्य लक्षात घेतले तरीही कुठेही कादंबरी भडक वा शब्दबंबाळ झालेली वा उगाच पाल्हाळ लावत लांबवलेली वाटत नाही. स्वामी कधीकाळी खूप आवडली होती. अजूनही काही परिच्छेद फार आवडतात.
रारंगढांगबद्दल मनिषने आधीच लिहिले आहे, माझी अतिशय आवडती कादंबरी.
गोनिदांच्या शब्दकळेसाठी आणि प्रसंग फुलवण्याच्या हातोटीसाठी त्यांच्या पडघवली, जैत रे जैत, रुखातळी, वाघरु, दास डोंगरी रहातो सारख्या कादंबर्या. भ्रमणगाथाही आधी आवडले होते पण आता वाचताना ते इतके उजवे वाटत नाही. (गोनिदाप्रेमी मारणार आता मला!)
ब्र ही कविता महाजन ह्यांची कादंबरी.
अजून लिहिते थोड्या वेळाने. एकूणातच माझे कादंबरी वाचन जरा कमीच आहे हे जाणवले ह्या धाग्यानिमित्ताने.
7 Jul 2014 - 12:00 pm | विटेकर
<<<<भ्रमणगाथाही आधी आवडले होते पण आता वाचताना ते इतके उजवे वाटत नाही
भ्रमण्गाथा इतकी सुंदर आहे की मी ती जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हाच ठरवलं आपण परिक्रमेचा स्वाद घ्यायचाच ! जे साहीत्य परिमाण करु शकते तेच उजवे असे म्हणता येईल का ?
आणि पूर्णामायची लेकरं?शितू? माचीवरला बुधा ?
ब्र बद्दल ब्र अदेखील नको .
टुकार हाच शब्द योग्य !
7 Jul 2014 - 12:37 pm | यशोधरा
नर्मदा परिक्रमेवरचे मला आवडलेले पुस्तक म्हणजे भारती ठाकुरांचे. अतिशय सुरेख चिंतन ह्या पुस्तकात त्यांनी मांडले आहे. भ्रमणगाथा एक कादंबरी आहे. प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेविषयी त्यात काहीच नाही. कादंबरी इतकेच त्याचे महत्त्व.
ब्र बद्दल तुमचे मत तुमच्यापाशी आणि माझे माझ्यापाशी :)
7 Jul 2014 - 2:47 pm | विटेकर
ब्र बद्दल पुन्हा मी ब्र देखील काढणार नाही ... सहमत.
ब्र च्या लेखिका मिपावर होत्या ना ?
7 Jul 2014 - 4:11 pm | यशोधरा
हो होत्या की विटेकरकाका :) बाकी काही असले तरी ब्र ही कादंबरी आवडते मला त्यांची. तितकेच. जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणायला माझी काहीच हरकत नाही. ते सोडून बाकी त्यांच्या फेबुवरच्या पोस्टीदेखील मला आवडत नाहीत, हेही नमूद करते.
तुम्हांला ब्र आवडली नसे ल तर तुम्ही बिंन्धास्त म्हणा की तसं :) आवड सापेक्ष असणार ना? पण तुमच्याशी मी कुंटेंच्या पुस्तकांबाबत सहमत आहे. तरी त्यांचे पहिले पुस्तक नर्मदामाईच्या परिक्रमेवरचे आहे, ते फारच बरे. अजून एक मी आणले होते, ते वाचून तर माणूस भंपक तर नाही ना, असेही मनात आले होते.
5 Jul 2014 - 4:03 pm | यशोधरा
पाडस - राम पटवर्धन ह्यांनी केलेला अनुवाद
तत्वमसि आणि अकूपार - दोन्ही ध्रुव भट - अनुवादित अंजली नरवणे.
6 Jul 2014 - 8:09 pm | मनिष
तत्वमसि मलाही फार आवडली - बर्याच गुजराती मित्रांना विचारले पण 'तत्वमसि' किंवा 'ध्रुव भट' यांचे नावही कोणी ऐकले नाही :(
6 Jul 2014 - 8:19 pm | यशोधरा
काय सांगता? खरेच?
त्याम्ची अकूपार आणि सागरांतिकेही वाचून पहा. पैकी अकूपार मी वाचले आहे, सागरांतिके (सागरतीरी हा अनुवाद) मिळाली तर मलाही द्या वाचायला प्लीज :)
6 Jul 2014 - 1:30 pm | नंदन
'टू किल अ मॉकिंगबर्ड' ही हार्पर ली या लेखिकेने १९६० साली लिहून प्रसिद्ध केलेली कादंबरी. कृष्णवर्णीय नागरिकांच्या समान हक्कांसाठी झगडणारी 'सिव्हिल राईट्स मूव्हमेंट' ऐन भरात येण्याआधी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक रसिकांइतकेच जाणकारांकडूनही नावाजले गेले. १९६१ च्या पुलित्झर पारितोषिकासोबतच अनेक सन्मान या कादंबरीला मिळाले. ग्रेगरी पेकची भूमिका असलेला चित्रपटही तीन ऑस्कर पुरस्कार जिंकून गेला. या कादंबरीत ज्या बदलांचे, ज्या संघर्षाचे चित्रण झाले आहे, त्याचे संदर्भ अजूनही कमीअधिक प्रमाणात कायम आहेत. बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले सभोवतीच्या समाजातले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणिवेचीही अधूनमधून जोड देणारी, नर्मविनोदाची पखरण असणारी या कादंबरीची निवेदनशैली अजूनही लक्षावधी वाचकांना भुरळ घालत आलेली आहे.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काही वर्षांतला अमेरिकन समाज हे एक खदखदते रसायन होते. कृष्णवर्णीयांना गुलामीतून मुक्त करण्याच्या हेतूने लढले गेलेले यादवी युद्ध संपून सात-एक दशके उलटली असली तरी दक्षिणेतल्या राज्यांत त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नव्हता. तुलनेने उदारमतवादी असलेल्या उत्तरेकडच्या राज्यांत मिळेल त्या मार्गाने कृष्णवर्णीय गुलामांचे स्थलांतर चालू होते. ('ग्रेट मायग्रेशन' या संज्ञेने ओळखल्या जाणार्या या सामाजिक उलथापालथीच्या काळात जवळजवळ पन्नास लाख कृष्णवर्णीय गुलाम उत्तरेतील राज्ये आणि कॅलिफोर्निया राज्यात निसटून जाण्यात यशस्वी ठरले.) अशातच जागतिक मंदीत अमेरिका आणि त्यातही औद्योगिकदृष्ट्या पिछाडीवर असलेली दक्षिणेतली राज्ये होरपळून निघत होती. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडून आलेले फ्रॅंकलिन रूझवेल्ट त्यांची प्रागतिक, क्रांतिकारक धोरणे धडाक्याने राबवत होते. युरोपावर दुसर्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. सामाजिक सुधारणा घडून येण्यासाठी जे पोषक वातावरण लागते, त्याची वानवा असली तरी थोडी दारे किलकिली होऊ लागली होती. १९३२ ते ३५च्या या कालावधीत दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात, मेकॉम्ब नावाच्या एका काल्पनिक जागी ह्या कादंबरीचे कथानक आकार घेते.
पहिल्याच काही पानांत निवेदनातले दुहेरी आवाज/दृष्टिकोन वाचकाला सांधेबदल जाणवूही न देता वापरण्याचे हार्पर लीचे कौशल्य दिसून येते. हा किस्सा सांगताना सुरुवात कुठून करायची, यावर आपल्या भावाचे मत खोडून काढताना एका सात-आठ वर्षांच्या मुलीच्या नजरेतून लिखाण उतरते; तर युरोपातल्या छळाला कंटाळून अमेरिकेत स्थायिक झालेल्या सायमन फिन्च या मूळ पुरुषाने कृष्णवर्णीय गुलामांना कामाला जुंपून बस्तान कसे बसवले, यामागची विसंगती न बोलताही दाखवून देण्यामागचे प्रौढ स्त्रीचे निवेदनही जवळजवळ त्याच सुरात येते.
सात-आठ वर्षांची स्काऊट, तिच्याहून चार वर्षांनी मोठा भाऊ जेम, घरातली कृष्णवर्णीय दाई कॅलपर्निया आणि पन्नाशीकडे झुकलेले वडील अॅटिकस फिन्च ही फिन्च कुटुंबातली मंडळी. दोन वर्षांची असताना आई निवर्तल्यावर गावात प्रतिष्ठित वकील असणार्या वडिलांच्या सुसंस्कृत वळणात वाढलेल्या स्काऊटची मूळची थोडी हूड, बंडखोर वृत्तीही अधूनमधून उफाळून येत असते. मग तो 'काय मुलीसारखी वागतेस?', म्हटल्यावर डिवचली जाण्याचा प्रसंग असो की शेजारच्या रॅडली कुटुंबाच्या घरात बंदिस्त असणार्या आर्थर रॅडलीबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी रात्री त्यांच्या मळ्यातून जाऊन खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रसंग.
अशा गावात स्काऊटच्या घराशेजारी राहणारे रॅडली कुटुंब मात्र अगदी वेगळे. इतरांत अजिबात न मिसळणारे. अशा घरातल्या आर्थर या मुलाला त्याच्या कुमारवयातल्या पुंडाईबद्दल गावातल्या अधिकार्याने शिक्षा केल्यावर, त्याच्या वडिलांनी त्याला घरात बंदिस्त केलेले असते. गेली कित्येक वर्षे त्याचे नखही कुणाच्या दृष्टीस पडलेले नसते. परिणामी आसपासच्या लहान मुलांमध्ये त्याच्याबद्दल भयमिश्रित कुतूहल असतं. आर्थर हे त्याचे मूळ नाव मागे पडून लहान मुलांत एक बागुलबुवा म्हणून ’बू रॅडली’ हे नाव रूढ झालेले असते. शाळेत जाताना स्काऊट आणि जेमही वाटेवरचे हे घर कायम जीव मुठीत धरून धावतपळत ओलांडतात. त्याच्याबद्दल अनेक दंतकथा गावात प्रचलित आहेत. कधी न पाहूनही जेम त्याचे वर्णन ’भयानक दिसणारा, साडेसहा फूट उंच, काळोख्या रात्रीं इतरांच्या खिडकीवर नखाचे ओरखडे काढणारा, खारींसारखे प्राणी कच्चे खाऊन जगणारा’ असे करतो. शेजारी आलेल्या त्यांच्याच वयाच्या डिल नावाच्या मुलाने डिवचल्यावर तिघे मिळून ’बू’ कसा दिसतो, हे पाहण्याचे दोन-तीन निष्फळ प्रयत्न करतात.
बू रॅडलीबद्दल लहान मुलांत आणि काही अपवाद वगळता गावात पसरलेली मते ही प्रतीकात्मक आहेत. बहुमतापेक्षा वेगळे असणार्या, आपले जीवन स्वेच्छेने वेगळ्या प्रकारे जगू पाहणार्यांबद्दल एक अनामिक दहशत बहुसंख्यांना वाटत असते. त्या भीतीची प्रतिक्रिया म्हणून मग त्या व्यक्तीशी किंवा समूहाशी ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही, अशांच्या दुरवस्थेला जबाबदार असण्याचा आळ तिच्यावर घेणे हेही नेहमीचेच. इंग्रजीतल्या 'कॉल अ डॉग मॅड, अॅंड शूट इट' या वाक्याप्रमाणे समाजाची बव्हंशी असणारी वागणूकच इथे प्रतिबिंबित झालेली दिसते.
आपल्या मुलांच्या या वागण्याकडे, चुकांकडे पाहण्याचा अॅटिकसचा दृष्टिकोन त्यांनी चुका करत करत शिकले पाहिजे असा आहे. शक्यतो उपदेशाचे डोस न पाजण्याकडे कल असणारा अॅटिकस, स्काऊटला दुसर्यांच्या नजरेतून जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करण्याचा आणि निरुपद्रवी जिवांना त्रास न देण्याचा सल्ला देतो. एरवी पापपुण्याची भीती न घालणारा तो, नाताळची भेट म्हणून खेळण्यातला बंदुका घेऊन दिल्यावर मात्र मॉकिंगबर्डससारख्या आपल्या गाण्याने रिझवणार्या, पिकांची वा बागांची नासाडी न करणार्या पक्ष्यांची शिकार करणे हे पाप आहे, असे बजावून सांगतो.
कादंबरीचा हा पहिला भाग बिल्डुंग्जरोमान (Bildungsroman) या प्रकारात - म्हणजे ज्यात कथेतल्या मुख्य पात्राचा निरागस बालपणाकडून प्रौढपणाकडे होणारा अटळ प्रवास चित्रित केलेला असतो, अशा स्वरुपाच्या पुस्तकांत मोडतो. कथानकात याच सुमारास अॅटिकसने स्वीकारलेल्या एका वादग्रस्त वकीलपत्राची चाहूल लागते. एका गौरवर्णीय स्त्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कृष्णवर्णीय गुलामाच्या बाजूने कोर्टात लढण्याचे परिणाम आपल्या मुलांवर काय होतील, यावरचे त्याचे विचार 'द इयर्लिंग' किंवा 'पाडस'मधल्या ज्योडीच्या बापाच्या धडपडीची आठवण करून देतात. एकीकडे मुलांना बाहेरच्या जगाची झळ लागून नये, त्यांचे निरागस बालपण तसेच रहावे, ही धडपड आणि दुसरीकडे हे फार वेळ टिकणार नाही, बाहेरच्या जगाचे टक्केटोणपे खाऊन शहाणपण अटळपणे शिकावे लागेल, ही जाणीव अशा द्विधा अवस्थेत सापडलेले दोन्ही सुजाण बाप. फरक शोधायचाच झाला तर एकोणिसाव्या शतकातल्या, फ्लोरिडातल्या जंगलात राहणार्या पेन बॅक्स्टरला आपल्या मुलाला निसर्गाच्या दयामाया न दाखवणार्या रूपाची ओळख करून द्यावी लागते, तर अॅटिकस फिन्चला माणसांच्या जंगलातल्या त्याहूनही अधिक क्रूर गोष्टींबद्दल.
कादंबरीचा दुसरा भाग बराचसा टॉम रॉबिन्सन या गुलामावर चालवलेल्या खटल्याने व्यापला आहे. खटला सुरू होण्यापूर्वी त्याला गावातल्या तुरुंगात ठेवलेले असताना, तो फोडून स्वतःच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याकरता रात्री आलेला जमाव, अवचित तिथे पोचलेल्या स्काऊटने आपल्या वर्गातील एका मुलाच्या वडिलांना ओळखल्यावर त्याला समूहाच्या बेभान मानसिकतेतून बाहेर पडून आलेले भान, अॅटिकसने परिस्थितिजन्य पुराव्यांनिशी त्याचा निरपराधीपणा सिद्ध करण्याचा केलेला प्रयत्न हे सारे मुळातून वाचण्याजोगे आहे. काहीही काम न करता सरकारी मदतीवर, उकिरड्यावर पोरांचे लेंढार घेऊन जगणार्या बॉब यिवेलनेच आपल्या मुलीला टॉम रॉबिन्सनला मोहाच्या जाळ्यात ओढताना पाहून कशी मारहाण केली आणि गोर्या माणसाचा शब्द हा काळ्या माणसाच्या साक्षीपेक्षा ग्राह्य धरला जाईल, या खात्रीपायी उलट बालपणी अपघातात एक हात निकामी झालेल्या टॉमनेच बलात्कार केल्याचा बनाव कसा रचला, हे ज्युरींपुढे मांडूनही अखेर टॉमला दोषी ठरवले जाते.
असे असले तरी, शहरातील अनेक सुशिक्षितांना टॉमच्या निरपराधीपणाची खात्री पटलेली असते. वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाऊ नयेत म्हणून किंवा काहीएक निर्णय घ्यायला जे धाडस लागते, ते अंगी नाही म्हणून ज्युरींत बसायचे नाकारणार्या या वर्गाला अॅटिकस फिन्चने त्यांची लढाई लढायला हवी असते. परिणामी निर्णय आपल्या बाजूने लागला तरी गावात आपली छी:थू होते आहे, हे बॉब यिवेलला जाणवते. त्याचा सूड म्हणून तो स्काऊट आणि जेम शाळेतल्या हॅलोवीनच्या समारंभानंतर रात्री परतताना त्यांच्यावर हल्ला करतो. त्या प्रसंगी, आत्तापर्यंत वर्षानुवर्षे केवळ आपल्या घरात बसून असणारा आणि शेजारच्या या दोन मुलांनी आगळीक करूनही झाडाच्या ढोलीत त्यांच्यासाठी लहानसहान भेटवस्तू ठेवून त्यांच्याशी मूक संवाद साधणारा बू रॅडली त्यांच्या मदतीला धावून येतो. झटापटीत त्याच्या हातून बॉब यिवेलचा खून होतो. असे असले तरीही, बचावासाठी केलेली झटापट आणि मुख्य म्हणजे बू रॅडलीचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार अबाधित रहावा म्हणून, अॅटिकसचा विरोध डावलून पोलिस अधिकारी टेट या मृत्यूची बॉब यिवेलचा आपल्याच चाकूवर पडून झालेला मृत्यू अशी नोंद करतो.
इतके दिवस ज्याला प्रत्यक्ष न पाहताही आपण ज्याची धास्ती घेतली होती, त्या आर्थर रॅडलीला स्काऊट प्रथमच पाहते. सगळा गोंधळ संपून आर्थर रॅडलीला त्याच्या घरी पोचवून परत येताना तिला आपले घर, घरासमोरचा रस्ता यापूर्वी न पाहिलेल्या कोनातून दिसतो आणि इतकी वर्षे अपरिचित असणारा आर्थर रॅडली कसा विचार करत असेल, हे समजून घेण्याचा; नकळत आपल्या वडिलांनी सांगितलेला सल्ला कृतीत आणण्याचा ती प्रयत्न करते. वेगळ्या संदर्भात सांगायचे तर या 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे'च्या टप्प्यावर कादंबरी संपते.
. . .
थोडा विचार केला तर या कादंबरीत आपले आयुष्य गमवावे लागलेला टॉम रॉबिन्सन, विक्षिप्त आणि हट्टी वडिलांमुळे घराबाहेरच्या आयुष्याला पारखा झालेला आर्थर रॅडली आणि बालपणातली निरागसता, भाबडा विश्वास संपलेली स्काऊट असे किमान तीन तरी मॉकिंगबर्डस् आहेत. पहिला सामाजिक पातळीवर; तर बाकी दोघे वैयक्तिक, खाजगी पातळीवर. पण एकाच पुस्तकात कुठेही मुद्दामहून रचल्याचा संशयही न येता या तीन अपरिहार्य कहाण्या एकाच कथानकात फार सुरेखपणे गुंफल्या गेल्या आहेत. जे काही सांगायचे आहे, ते आतापर्यंत अनेकदा सांगून झालेले असले ('व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' इ.) तरी सांगण्याची ही निराळी शैली गालिबच्या 'अंदाज-ए-बयॉं और'प्रमाणे या कादंबरीच्या अनेक बलस्थानांपैकी एक.
दुसरे म्हणजे, यात कुठेही उसना क्रांतिकारक आव नाही. कृष्णवर्णीय हे आपल्यापेक्षा वेगळे, कमी दर्जाचे आहेत, ही समजूत पिढ्यानपिढ्या दक्षिणेतील गौरवर्णीय समाजात इतकी खोलवर रूजलेली होती की, अचानक एका भाषणाने संपूर्ण शहराचे हृदयपरिवर्तन झालेले दाखवणे, वस्तुस्थितीशी फारकत घेणारे ठरले असते. 'श्यामची आई'मधल्या, कुणबिणीला सहृदयपणे वागवूनही जनरीतीप्रमाणे घरदार बाटल्याचा आळ येऊ नये म्हणून, अंगावर पाणी घेऊन मगच घरात येण्याच्या प्रसंगाची आठवण करून देणारे काही प्रसंग या पुस्तकात आहेत.
कुठल्याही प्रभावी पुस्तकाप्रमाणे या कादंबरीचाही तिच्या प्रकाशनावेळी असलेल्या सामाजिक परिस्थितीशिवाय सुटा, वेगळा विचार करणे हे अपूर्ण ठरेल. १९६० साली जेव्हा ही कादंबरी प्रथम प्रसिद्ध झाली तेव्हा 'सिव्हिल राईट्स' चळवळ नुकतेच बाळसे धरू लागली होती. हार्पर लीच्या आधी अनेक लेखकांनी कृष्णवर्णीयांवर होणार्या जुलमांना साहित्यातून वाचा फोडली असली तरी दक्षिणेतल्या अलाबामा राज्यात वाढलेल्या एका गौरवर्णीय स्त्रीने बहुतांशी आपल्या बालपणात घडलेल्या घटनांवर बेतलेले इतके प्रभावी परंतु त्याचवेळी अनाग्रही चित्रण करणारे पुस्तक प्रसिद्ध करणे, हे अपूर्व होते. इतर अनेकांनी दाखवलेल्या धैर्याप्रमाणे आणि अनेक इतर गोष्टींप्रमाणे एका लहान मुलीच्या नजरेतून ही अन्याय्य विसंगती दाखवून देणार्या या पुस्तकाचाही कृष्णवर्णीयांना आपला हक्क मिळवून देण्यात खारीचा वाटा आहे.
अर्थात त्यापलीकडेही आज वेगळ्या संदर्भात या पुस्तकात चित्रित झालेला संघर्ष अजूनही चालू आहे. याच आठवड्यातील बातम्यांवर नजर टाकली तर बळी पडलेले असे कैक मॉकिंगबर्डस् दिसतील. मग ती समलिंगी म्हणून चिडवले गेल्यामुळे आत्महत्या केलेली सहा किशोरवयीन मुले असोत किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग असूनही अॅबओरिजिनल (आदिवासी) जमातीतील असल्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या अमानुष छळाला तोंड द्यावे लागलेला माणूस असो. कदाचित उत्क्रांतीच्या ओघात राहून गेलेल्या, जे जे आपल्यापेक्षा वेगळे ते दुय्यम, धोकादायक मानण्याच्या आदिम प्रवृत्तीचा हा दोष असावा. या प्रवृत्तीचे चित्रण करण्याचा प्रयत्न, तिच्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने साहित्यात होत आला आहे. या प्रयत्नांतून जी काही मोजकी पुस्तके स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून टिकून राहतात; त्या अक्षरकृतींमध्ये 'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा माझ्या मते नक्कीच समावेश होतो.
(जुजबी बदल वगळता अन्यत्र पूर्वप्रकाशित)
6 Jul 2014 - 1:36 pm | यशोधरा
सुरेख पोस्ट नंदन! अजूनही पुस्तकांबद्दल लिही प्लीज.
6 Jul 2014 - 3:10 pm | आतिवास
पुस्तक वाचण्याच्या यादीत जोडले आहे.
परिचय आवडला.
6 Jul 2014 - 8:18 pm | प्यारे१
+२.
(साव काश वाचणार आहे नंदन ची पोस्ट)
कालच एक '१२ इयर्स अ स्लेव्ह' (चुभू दे घे) अशा नावाचा चित्रपट पाहिला (बघवला नाही म्हणून पळवत :( ). नायक नि त्याचं कुटुंब कृष्णवर्णीय असणं हे वरच्या पोस्टबाबतचं साधर्म्य. (ह्याच नावाचं पुस्तक देखील आहे)
गोर्यांनी ह्या नि नेटिव्ह लोकांवर केलेले अत्याचार हा एक दडपशाहीनं दाबला गेलेला विषय वाटतो आहे.
9 Jul 2014 - 2:03 pm | सखी
अतिशय सुरेख पोस्ट. विशेषतः अंगणात गमले मजला आणि 'श्यामची आई'मधल्या कुणबिणीचा संबध आपल्याला अगदी समर्पक सुचला.
6 Jul 2014 - 5:33 pm | अजया
टू कील अ मॉकींग बर्ड माझेही अत्यंत आवडते पुस्तक आहे . तुमच्या लिखाणाचा शेवटचा परिच्छेद पुस्तकाचं मर्म सांगुन गेलाय
6 Jul 2014 - 7:40 pm | विकास
चांगले पुस्तक आहे!
6 Jul 2014 - 8:06 pm | मनिष
नंदनचे लिखाण म्हणजे आपल्याला मेजवानी. मी हे पुर्वी वाचले नव्हते - अर्थातच खूप आवडले. कादंबरी वाचली नाही, पण चित्रपट पाहिलाय! नंदनचे विश्लेषण फार आवडले.
7 Jul 2014 - 10:26 am | एस
वा, काय सुंदर सांगितलाय मर्मांश. हा चित्रपटही तितकाच सुरेख आणि विचार करायला लावणारा आहे.
6 Jul 2014 - 10:04 pm | कंजूस
मी पहिली इंग्रजी कादंबरी द गुड अर्थ ,पर्ल बकची वाचली .नववीत होतो .पाचवी ते आठवी शाळेतल्या नो सूनर -दैन अॅज सून अॅज घोटलेल्या धड्यांवर भिस्त ठेवून ठायी ठायी डिक्शनरी पाहून पूर्ण केली होती .फारच आवडली होती .चीनमधील शेतकऱ्याच्या जीवनावर आहे .त्यावेळी वाटलं कोणी चांगली पुस्तके सुचवेल तर फार बरं होईल .
7 Jul 2014 - 10:05 am | MANDY
मिपावर ही माझी पहिलीच पोस्ट. पहिल्या पोस्ट साठी चांगला विषय मिळाला. अगदी खास आवडत्या पुस्तकांमध्ये पुढील नाव घेईन. –
१) कविता महाजन यांची ‘ब्र’- मन विदीर्ण करणारी कादंबरी. शहरी व ग्रामीण समाजाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी, तथाकथित शहरी सुसंस्क्तुत कुटुंबात होणारी स्त्रियांची कुचंबणा, आणि ग्रामीण स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या यातना, राजकारणातल स्त्रियांचं स्थान आणि वापर, सेवाभावी संस्थांचे स्वार्थ आणि राजकारण, एकाच वेळी अस्वस्थ करणारे अनेक मुद्दे लेखिकेने मांडले आहेत. एक अत्यंत वास्तवदर्शी कादंबरी.
२) मिलिंद बोकिलांची 'शाळा' - खरतर या कादंबरीत वर्णन केलेला काळ, खूप जुना. माझ्या आई- बाबांच्या शाळेच्या वेळचा. मी शाळेत असताना गोष्टी फारच बदलेल्या होत्या. मुला-मुलींच्या मैत्रीत खूपच मोकळेपणा आलेला होता. पण तरिही वास्तव जगाची जाणीव होऊ लागण्यापूर्वीच्या वयातील तरल मनाचे जे चित्रण कादंबरीत आहे, ते विलक्षण. कादंबरीच्या शेवटी स्वप्नील जग हळूहळू विरून जात कोरड व्यवहारी वास्तव नायकासमोर उभ राहत तो अनुभव सार्वत्रिक आणि सार्वकालिक म्हणावा लागेल. त्यामुळेच 'शाळा' भावते.
३) ओरहान पामुकची 'स्नो' ही इंग्रजी कादंबरी - ओरहान पामुक हा तुर्कस्तानचा लेखक. मनाचा ठाव घेणारी लेखनशैली हे स्नोच वैशिष्ट्य. या कादंबरीतून तुर्कस्तान हा तसा अपरिचित देश काहीसा समजतो. त्याच भौगोलिक स्थान युरोप आणि पश्चिम आशियाच्या मध्ये. त्यामुळे इस्लामिक पुराणमतवाद आणि युरोपियन आधुनिकता यांच्या मध्ये अडकलेला हा देश. देशाला या दोन्ही दिशांनी ढकलू पाहणाऱ्या परस्परविरोधी सामाजिक- राजकीय शक्ती सतत सक्रीय. छोटया मोठया राजकीय क्रांत्या ही एके काळी या देशातली नित्याची बाब. अशाच एका छोटया शहरातील तात्कालिक लष्करी उठाव आणि त्या पार्श्वभूमीवर घडणारी एकतर्फी अपयशी प्रेम कहाणी हा कादंबरीचा विषय. संस्कृती रक्षण आणि संस्कृती भंजन यांनी पेटून उठणाऱ्या वा त्याचे राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि समूह आणि या समूहांपासून चार हात दूर राहू इच्छिणारी पण नाईलाजाने त्या विळख्यात ओढली गेलेली सामान्य जनता या बहुपेडी नाट्याच मनाला भिडणार चित्रण कादंबरीत आहे. ही कादंबरी समजून घेण्यासाठी खरतर किमान दोनदा वाचावी लागेल. पण तो एक उत्तम अनुभव असेल.
४) 'कोसला' ही मला खूप आवडली, पण ती अनेकांनी वाचली असेल. म्हणून त्याविषयी लिहीत नाही.
बाकी पुस्तके कादंबरी या सदरात येत नाहीत.
7 Jul 2014 - 5:51 pm | कवितानागेश
एक आवडतं पुस्तक आणि लेखक म्हणजे 'All creatures great and small' by James harriot. या पुस्तकाला कादंबरी म्हणता येइल का हे माहित नाही. कदाचित 'कथासंग्रह' म्हणता येइल. :)
साध्या शब्दात सांगायचं तर प्राण्याच्या डॉक्टरचे अनुभव. प्राण्याबद्दलचे आणि त्याबरोबर ते पाळणार्या वेगवेगळ्या माणसांच्या नमुन्याचेसुद्धा. काही साधेसरळ तर काही इरसाल शेतकरी, काही समजूतदार तर काही हट्टी प्राणी, मध्यरात्री येणार्या विचित्र केसेस, सगळे बरेवाईट अनुभव या डॉक्टरनी अगदी नर्मविनोदी शैलीत मांडले आहेत. त्याचे दुसरे पुस्तक वाचायची इच्छा आहे, पण अजून वाचलं नाही. हे वाचूनपण फार वर्षं झाली. पण एकंदरीत प्राण्यांबद्दल वाचतना छानच वाटतं. अलिकडेच ४ दिवसात 'नेगल' चे दोनही भाग वाचले. अतिशय आनंददायक अनुभव आहे.
त्याशिवाय फार पूर्वी 'ब्लॅक ब्युटी' नावाच्या घोडीचे ती स्वतः सांगतेय अशा पद्धतीनी लिहिलेलं एक पुस्तक वाचलं होते. लेखक आठवत नाही. पण आधीच्या काळात रेसमध्ये आणि नंतर टांग्यासाठी धावणार्या त्या घोडीचं आयुष्य पुस्तक लिहिण्यासारखं निश्चितच होतं.
अलिकडे अनुराधा वैद्यांचे (माझी चिन्ध्यांची बाहुली आणि चौफुला लिहिणार्या) 'श्वानप्रस्थ' वाचलं. तेपण असंच घरात पाळलेल्या कुत्र्यांचे स्वैर मनोगत आहे. फार गमतीदार आहे.
9 Jul 2014 - 2:47 pm | सखी
अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख हे माधुरी शानभाग यांनी अनुवादित केललं हे वाचल्यावर ह्या माणसाबद्दलचा आदर खूप वाढला. अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा पण अतिशय तीव्र बुद्दीमत्ता घेऊन आलेला यशाच्या शिखरावर गेल्यावरही यांचे पाय जमिनीवरच राहीले आहेत. आपले भाग्य की त्यांचा जन्म भारतभूमीत झाला.
नववी दहावीत असताना विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर या पुस्तकाने फार अस्वस्थता आणली होती नंतरही इतक्या वेळा वाचुनही ती अस्वस्थता परत येते. सगळी पात्र राघोबा, विश्वासराव, भाऊ, दत्ताजी, महादजी शिंदे डोळयासमोर उभे रहातात. ज्या गोष्टीत लाखो रुपये वाचवता आले असते, काही साध्या गोष्टी केल्या असता तर महाराष्ट्रातील लाखो बायका विधवा झाल्या नसत्या, ते असे वाया गेलेले आणि नंतर माधवरावांच्या खांद्यावर इतके ओझे लहान वयात पडलेले पाहुन अजुनच वाईट वाटते. काही वर्षांपूर्वी वाचनात आले होते की पाटलांनी पानिपतपर्यंत स्वतः प्रवास केला होता, नक्की तो रस्ता कसा आहे, मराठे कुठे, कुठे थांबले असतील असा अनेक प्रकारे अभ्यास करण्यासाठी. पण अजुनही हे पुस्तक खिळवुन ठेवते हे नक्की.
वपु वाचायचे एक वय असतं असे जाणकार म्हणतात :) ते पटतही. पण त्यांची पार्टनर ही कांदबरी मला आवडली, वपुंच्या अनेक कथांमध्ये असते तसे मध्यमवर्गीय वातावरण, दोन भावांमध्ये असलेली अजाणता स्पर्धा, त्यांच्या आईचा जास्त कल मोठ्या मुलाकडे आणि त्यामुळे टिपिकल सामान्य माणसाची चाळ सोडुन फ्लॅट घेण्याची प्रबळ इच्छा आणि त्याचे हफ्ते फेडताना होणारी दमछाक हे सगळं छान टिपलं आहे.
10 Jul 2014 - 10:23 am | प्रभाकर पेठकर
>>>> विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर या पुस्तकाने फार अस्वस्थता आणली होती
सहमत. त्याची(अस्वस्थतेची), मी माझ्यापुरती केलेली कारणमिमांसा अशी की मराठेशाहीच्या इतिहासात सर्वात जास्त प्रभाव आपल्या मनावर असतो तो छत्रपतींच्या इतिहासाचा. बाकीचे कथानायकसुद्धा जसे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि पुढे पेशवाईत थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव, शेवटचे बाजीराव ह्यांच्या यशाने आपण भारावलेले असतो. जे कांही थोडेफार पराभव झाले ते त्यांच्या 'थोर'पणा पुढे छोटे असतात. पण पानिपतात सामरिक दृष्टीने सुयोग्य स्थानी असूनही मराठ्यांच्या पराभवाचे मोठे वर्णन, पेशवाईतली राजकारणं, हार, नंतर सुरू झालेला पळ, मराठ्यांची कत्तल इ.इ.इ. घटनांनी प्रचंड दु:ख आणि अस्वस्थता येते. चढाई आणि यशाला चटावलेल्या मनाला हा पराभव पचत नाही. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीकोनातून कादंबरी चांगली आहे. यशस्वी मराठ्यांच्या इतिहासातील दारूण पराभवाचे यथार्थ वर्णन त्यात आहे.
मी ही कादंबरी विकत घेतली तेंव्हा त्यात मधलीच २५ पाने नव्हती. त्यामुळे कथानकाने एका प्रसंगी मोठी उडी घेतली. त्या बद्दल मी श्री. विश्वास पाटील ह्यांना व्यक्तिशः पत्र लिहून कळविले परंतू त्या पत्राची त्यांनी कांहीच दखल घेतली नाही. हा अजून एक पराभव मला अनुभवास आला. त्याने एकूणात अस्वस्थता वाढली.
10 Jul 2014 - 7:02 am | स्रुजा
मस्त उपक्रम . पर्व आणि 'टू किल अ मॉकिंगबर्ड" ही माझ्या यादी मध्ये वरच्या क्रमांकावर गेली आहेत . पेठकर काकांचा प्रतिसाद तर खास च .
मी एवढ्यात वाचलेलं: झिम्मा . प्रचंड भारावून गेले होते . विजयाबाईंच्या नाट्य कारकीर्दीवर चं एक अतिशय संयत आणि प्रवाही आत्मचरित्रात्मक पुस्तक . पूर्ण आत्मचरित्र नाही कारण मुख्य भर त्यांच्या कारकीर्दीवर आणि संदर्भ आलाच तर त्या अनुषंगाने त्यांचं खाजगी जीवन . कलाकाराची कला आणि त्याचं खाजगी जीवन वेगळंच राहावं , ते तसं ठेवलंय ही सगळ्यात पहिली जमेची बाजू .
बाईंचा अभ्यास , त्यांचा आवाका आणि त्याचं आभाळा एवढं मोठ्ठ काम - मराठी आणि भारतीय रंगमंचाला त्यांनी जागतिक पातळीवर मिळवून दिलेली ओळख या सगळ्यानी मन थक्क होतं . नाटक उभं राहताना दिग्दर्शकाची , निर्मात्याची , नटांची आणि मुख्य म्हणजे कथानकाची एकमेकांशी गुंतलेली तरी ही स्वतंत्र पणे ठसा उमटवणारी स्वभाव वैशिष्ट्य, पडद्यामागच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं असलेलं स्वतःचं असं महत्त्व , एक एक प्रसंग बसवताना उलगडत गेलेले पात्रांचे विशेष , त्या कथेची बलस्थानं हे सगळं एखाद्या तलम वस्त्रातल्या वेगवेगळ्या रंगांसारखा मनावर उमटत जातं . रंगमंचावर दिसणारे प्रसंग आपल्यासमोर येण्यापूर्वी आणि येण्यासाठी किती लोकांची किती मेहनत आणि प्रतिभा पणाला लागलेली असते हे सामान्य प्रेक्षकाला सहज कळत नाही . या पुस्तकाने ते प्रभावीपणे पोहचवलं आहे .
आणखीन एक खूप अप्रूप वाटलेली गोष्टं म्हणजे भारतीय कथांचं परदेशी कलाकार घेउन परदेशी केलेले प्रयोग . मुळात अत्यंत सशक्त असलेली आणि भरपूर नाट्यमय प्रसंग पुरेपूर असलेली महाभारतासारखी कथावस्तू ,विजयाबाईन्सारखी नाट्य माध्यमाची नेमकी जाण असलेली दिग्दर्शिका आणि उत्साहाने भरलेले जर्मन कलावंत …. या संयोगानी उभा राहिलेला प्रयोग किती सुंदर असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो .
एक मराठी स्त्री एका ठाम विचाराने आणि प्रेरणेने एवढं भरीव काम करते याचा मला प्रचंड अभिमान वाटला आणि हे पुस्तक वाचेपर्यंत विजयाबाई म्हणजे "अखेरचा सवाल " मधल्या पहिल्या संचामधल्या भक्ती बर्वे च्या आई एवढीच जुजबी ओळख असल्याची तितकीच खंत वाटली .
आपल्यालाकडे संस्कृतात नाट्यशास्त्र उपलब्ध आहे . नेहमी प्रश्न पडायचा की एखाद्या कलेला शास्त्राचं स्वरूप कसं बरं दिलं असेल ? मानवी स्वभावातल्या वेग वेगळ्या छटा , अनेक दृक्श्राव्य गोष्टींचा नकळत साधला जाणारा परिणाम , त्यातून अत्यंत कमी वेळात , कमी शब्दांत नेमकेपणाने पोहोचवला जाणारा एक विचार या सगळ्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास म्हणजे केवढं मोठं शास्त्र असेल हे पहिल्यांदा लक्षात आलं. हे पुस्तक वाचल्यावर कलेमधली उस्त्फुर्तता अनेक वर्षांच्या अभ्यासाच्या कोंदणाने किती प्रखर होते हे समजलं आणि कलाकारांबद्दल आधीच असलेला आदर खूप वाढला . माझ्या मते हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश .
एवढं समृद्ध साहित्य आपल्या सगळ्या भाषांमध्ये आहे , प्रतिभावंत लोकांची एवढी मोठी परंपरा आहे पण नाट्यसृष्टी ला महाराष्ट्राच्या बाहेर खूप ओळख नाही . न्यूयॉर्क च्या ब्रॉडवे ची प्रसिद्धी आपल्या ही नाट्यसृष्टी ला मिळत नाही याची कधी नाही एवढी खंत वाटली .
बाकी आवडणाऱ्या कादंबरींवर लिहायचं तर वेळ कमी पडणार. नाट्यसृष्टी शी संबंधीत अजून एक चांगलं पुस्तक म्हणजे तिसरी घंटा . लेखक: मधुकर तोरडमल .
आत्मचरित्र म्हणलं तर वोल्ट डीजने चं आत्मचरित्र खूप सकारात्मक आणि त्याच्या कार्टून पात्रांसारखंच प्रसन्न . व्हर्गीस कुरियन चं आय टू हॅड अ ड्रीम हे पण एक सुंदर पुस्तक . आनंद यादवांची झोंबी आणि त्याच्याच पुढची नांगरणी आणि घरभिंती ही तिन्ही पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली होती आणि माणसाचं आयुष्य इतकं अवघड असू शकतं हे पचायला पण त्या वयात खुप जड गेलं होतं.
वपुंच्या पुस्तकांचा वर उल्लेख आहे . मी वपुंची पुस्तकं खूप वाचली त्या वाचायच्या वयात पण सगळ्यात भावलेलं आणि मनात रेंगाळलेल पुस्तक म्हणजे नवरा म्हणावा आपुला . ही खरं तर कादंबरी नाही पण सहज आठवलं म्हणून … साधारण विषय नवरा बायको आणि मध्यमवर्गीयांचे कधी भिडस्तपणामुळे कधी आर्थिक ओढाताणीमुळे होणारे वाद , वैताग , भांडणं असाच . पण सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्वसामान्य समर (!) प्रसंगांमधल्या प्रतिक्रिया , ते साधे प्रसंग पण त्या वेळी खूप मोठे वाटणे , त्यातून परिस्थितीमुळे निर्माण होणारे कधी नर्म तर कधी केविलवाणे विनोद आणि या सगळ्यातून त्या सामान्य माणसाने आपल्या माणसाच्या साथीने किंवा त्याच्या / तिच्या साठी काढलेला मार्ग …सगळंच विलक्षण . तसंही मला जीवन मरणाच्या "larger than life " समस्यांपेक्षा या साध्या नाट्यातून होणारी तारांबळ आणि त्यातून मार्ग काढताना सामान्य माणसाचं एक वेगळीच उंची गाठणारं व्यक्तिमत्त्व याचंच जास्त कुतूहल वाटत आलंय . फार भरकटते आहे का ? हे संपादित केलं तरी हरकत नाही .
अजून वाचायची राहिलेली पण ती न वाचताच प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली दोन पुस्तकं म्हणजे : १. फेल्युअर इज नॉट एन ऑप्शन आणि २. स्कीईंग अगेन्स्ट द atom . या पैकी पहिलं पुस्तक हे नासा च्या निवृत्त अधिकार्याने लिहिलेलं आहे आणि दुसरं हे दुसर्या महायुद्धामधल्या एका थरारक घटनेवर आधारीत आहे .. मूठभर नॉर्वेजियन सैनिकांनी धैर्यानी नाझी अणुबॉम्ब प्रकल्पाला उधळून लावलं , हे सगळे सैनिक त्या साठी कित्येक मैल बर्फातून स्कीईंग करत गेले , त्याची ही कथा .
नाझी वरून आठवलं , नाझी भस्मासुराचा उदयास्त हे असंच भयानक आवडलेलं पुस्तक . पण माझ्या पहिल्याच प्रतिसादात तुम्हाला फार कंटाळा आणत नाही आणि शिवाय स्वैपाक राहिलाय. छ्या मिपा बंद होतं तेच बरं :P
10 Jul 2014 - 7:15 am | सखी
स्रुजा प्रतिसाद खूपच आवडला, झिम्मा मलाही आवडलं फक्त काहीच मोजके प्रसंग सोडुन, पण तू किती तटस्थपणे त्याच्या सगळ्या बाजु सकारात्मक रित्या मांडल्या आहेस. तुझा प्रतिसाद अजिबात भरकटत नाही वा कंटाळा आणत नाहीस. तू लिहिती झालीस हा खरच आनंदाचा ठेवा आहे, त्यामुळेच की काय पण आज इथल्याच इंद्रराज पवारांची आठवण झाली, त्यांचेही प्रतिसाद असेच अभ्यासु, मुद्द्याला धरुन असायचे, सध्या कोठे आहेत कोणाला माहीती आहे का?
तुझ्या यादीतली शेवटची दोन पुस्तके माहीती नव्हती, या धाग्यामुळे तेही कळतयं की अजुन कितीतरी वाचायचं राहीलयं.
10 Jul 2014 - 10:42 am | एस
स्रुजा, तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला.
13 Jul 2014 - 12:59 am | स्रुजा
सखी , स्वॅप्स, धन्यवाद :)
खरंच न वाचलेल्या आणि पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या पुस्तकांची यादी इथल्या एक एक प्रतिसादांमुळे वाढत चाललीये

10 Jul 2014 - 9:53 am | मितान
इथले एकेक प्रतिसाद वाचताना जादूच्या दुनियेत फिरून आल्यासारखं वाटतंय. कितीतरी नवी पुस्तकं यादीत जोडली गेली आहेत.
अनेक कादंबर्यांपैकी एकीबद्दल लिहिणं खरंच कठीण. जी एंनी अनुवाद केलेल्या रान, गाव्,शिवार या तीन कादंबर्या, गोनीदांची पडघवली, श्री ना पेंडसेंची रथचक्र अशा अनेकांतून एकावर तरी मला लिहिता येईल का ???
10 Jul 2014 - 10:45 am | प्रभाकर पेठकर
श्री. श्रीना पेंडसे ह्यांची कोकण पार्श्वभूमीवरील 'गारंबीचा बापू' ही कादंबरी आम्हाला कॉलेजच्या दूसर्या वर्षाला होती. ती वाचताना त्याकाळी नव्याने ओळख होणार्या कोकण वर्णनाने आणि तिथल्या अस्सल कोकणी माणसांनी भारून टाकले. कादंबरी वाचताना आपणही कोकणच्या वातावरणात एकरूप होऊन जातो. प्रत्येक प्रसंग, स्थळ अनुभवत जातो. शहरी जीवनापासून वेगळे होऊन कोकणमय होऊन जातो.
त्याच वेळी डॉ. काशिनाथ घाणेकरांचे 'गारंबीचा बापू' हे नाटक रंगभूमीवर गाजत होते. ते पाहण्याचाही योग आला, नव्हे जुळवून आणला. आधीच दमदार कादंबरीचे नाट्यरुपांतर आणि डॉ. काशिनाथ घाणेकरांसहीत सर्वच पात्रांचे कसदार अभिनय. संपूर्ण नाटक आपल्याल एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना ह्या गोष्टीही वाखाणण्याजोग्या होत्या.
आजही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी कादंबरी आणि नाटक म्हणजे......गारंबीचा बापू.
10 Jul 2014 - 12:07 pm | प्रचेतस
गारंबीच्या बापूचा प्रीक्वेल म्हणजे 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी. बापूच्या आईचे -यशोदेचे अध्:पतन यात दर्शवले आहे.
पेंडश्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणजे 'तुंबाडचे खोत'.
त्यांच्या 'हत्या' आणि 'कलंदर' ह्या फारश्या परिचित नसलेल्या कादंबर्या पण मज्कडे आहेत. दोन्ही तितक्यात सुरेख. एकात कोकणाचे तर एकात तत्कालीन मुम्बैचे सुरेख दर्शन होते.
ह्या दोन्हीं कादंबर्या मैजेस्टिक च्या गोडावून मधून धूळ खात असलेल्या अवस्थेत मिळाल्या होत्या.
10 Jul 2014 - 5:15 pm | आदूबाळ
अगदी १००% सहमत.
तसंच ती "सर्वोत्तम सटकर" या कथानायकाची डायरीच्या फॉर्ममधली कादंबरी (बहुतेक "लव्हाळी" - चुभू) सुद्धा आवडते.
श्री नां चे आत्म(?)चरित्रही झकास आहे.
10 Jul 2014 - 5:36 pm | प्रचेतस
'लव्हाळी'च ती.
त्यांचे आत्मचरित्र म्हणजे 'लेखक आणि माणूस' म्हणायचे आहे का?
मला तरी ते आत्मचरित्रवजा लिखाण वाटले. म्हणजे काहीशा स्मरणगाथा/दुर्गभ्रमणगाथा टाईप.
श्री.नां ची 'हद्दपार' ही कादंबरी पण अविस्मरणीय. मला वाटते ह्याच कादंबरीवर आधारीत 'राजेमास्तर' हे नाटक पण त्यांनी लिहिलंय.
10 Jul 2014 - 12:32 pm | प्रभाकर पेठकर
>>>>गारंबीच्या बापूचा प्रीक्वेल म्हणजे 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी.
प्रिक्वेल हा शब्दप्रयोग आधी लीहीली ह्या अर्थाने असेल तर तो चुकला आहे. कारण गारंबीचा बापू १९५२ ला लिहीली आहे आणि यशोदा १९५७.
पण 'यशोदा' ही बापूच्या आईच्या पूर्वायुष्यावर असल्यामुळे वापरला असेल तर बरोबर आहे. कारण लिहीली जरी नंतर असली तरी ती 'घडते' बापूच्या जन्मा आधी.
10 Jul 2014 - 2:32 pm | प्रचेतस
हो.
त्याच अर्थाने लिहिलेले आहे.
10 Jul 2014 - 4:57 pm | सूड
मला आवडलेल्यातली आता आठवत असलेल्या कादंबर्यांपैकी एक म्हणजे गोनीदांची 'पडघवली'. कादंबरीची सुरुवातच मुळी मस्त जेवणं झालीयेत, अंगणात गप्पा चालू आहेत आणि अशातच घरातली एखादी जुनी जाणती व्यक्ती एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करते अशा थाटात झालीय. पूर्वीच्या लढाया, बाटवाबाटवी, माहेरवाशिणीच्या हाकेला धावलेली दुर्गाबाय, तिनं दिलेली सामक्षा..सगळं एकामागे एक वाचता वाचता भुलवून ठेवतं.
नंतरचं मेघना पेठेंचं 'नातिचरामि', याला कादंबरी म्हणावं की नाही माहीत नाही. पण एक अत्यंत सुंदर पुस्तक. एकंदरीतच लग्नसंथेवर ताशेरे ओढणार्या पुस्तकांपैकी एक. लग्नाच्या वेळेस शपथा घेताना तेवढं नातिचरामि म्हणून नंतर दुसर्या व्यक्तीच्या मोहात पडणं, वाहावत जाणं, काही बिनसलं की पुढचे घटस्फोट. वाचावं असं पुस्तक!! लग्नसंस्थेचं रुप किती बेगडी आहे आणि तरीही ठराविक वय झालं की आपल्या समाजात असणारा लग्नाचा अट्टाहास यावर विचार करायला लावणारं पुस्तक. अर्थात असं मोहात पडणं वैगरे जर स्वाभाविकच असेल तर लग्नसंस्था किती आदर्श आहे हे दुसर्यांना पटवून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न का? असे अनेक प्रश्न उभे करुन त्यावर विचार करायला लावणार्या पुस्तकांपैकी एक!!
16 Jul 2014 - 8:07 am | आतिवास
कधीही वाचावी अशी ही अनिल बर्वे यांची मस्त कादंबरी. यातला 'कमराद म्हातारा' तर विलक्षण जिवंत उतरला आहे. 'नाही रे' वर्गाचा 'आहे रे' वर्गाशी संघर्ष, जगण्याचा संघर्ष: थोडक्यात पण परिणामकारकपणे सांगणारी अनिल बर्वे यांची लेखनशैली भन्नाट आहे.
'थॅक यू मिस्टर ग्लाड', 'स्टडफार्म', 'अकरा कोटी गॅलन पाणी' या अनिल बर्वे यांच्या आणखी तीन कादंब-या वाचल्या आहेत. तिसरी आत्ता आठवत नाहीये, पण पहिल्या दोन्ही अवश्य वाचाव्यात अशा आहेतच.
22 Jul 2014 - 4:51 pm | विटेकर
या सगळ्या यादीत जी ए आभावानेच आले . जी ए आवडण्याचे ही एक वय असावे . एकी काळी मला जी ए तुफान आवडले .. त्यावयात त्यांच्या सलग दोन कथा वाचणे देखील अवघड वाटे . अधाश्यासारखी वाचली त्यांची पुस्तके ..पारवा, पिंगळावेळ , निळा सावळा , हिरवे रावे.. कुसुमगुंजा ( हे त्यातल्या त्यात अलिकडचे )
अगदी बिम्मची बखर देखील वाचले !
पण सगळ्यात आवडले ते माणसं अरभाट आणि चिल्लर .. ! अजून ही आवडते .. कितीतरी दिवस पिशव्या विठोबा आणि भ्रूशुंड पक्षी सतत समोर येत असत .. अरभाट पुस्तक आहे .. त्यात विचारलेला एक प्रश्न फार दिवस छळत होता.
"जर सगळ्याच गोष्टीचे कर्तृत्व जर नियतीकडे आहे तर आपल्या करण्या अथवा न करण्याला तसा काय अर्थ उरतो ?" खूप वर्षेया प्रश्नाने मला छळले .. हळू हळू जसा मोठा होत गेलो अधिक वाचत गेलो तेव्हा उकल होत गेली ,, मला वाटते गीता प्रवचने ( विनोबा) वाचताना या प्रश्नाची उकल झाली..
पण जी ए अफाट .. यात वादच नाही ! आज ही कधीतरी स्वामी , बांगड्या या कथा निखळ साहित्यिक आनंद देतात!
अभिजात मराठी साहित्याची चर्चा होताना जी ए यायलाच हवेत म्हणून हा प्रतिसाद !
22 Jul 2014 - 11:32 pm | आतिवास
'कादंबरी' असा विषय असल्याने! ;-)
अर्थात जी. एं. नी अनुवादित केलेल्या कादंब-यांबद्दल लिहिता येईल म्हणा!
स्वातंत्र्य आले घरा, रानातील प्रकाश, शिवार, लॉर्ड ऑफ द फ्लाईज....
'एक अरबी कहाणी' माझा आवडता अनुवाद (आणि आवडती कादंबरी) आहे - त्याबद्दल कधीतरी सवडीने!
31 Jul 2014 - 5:56 pm | कवितानागेश
बर्याच जणांना न आवडलेले आणि तरीही मला आवडलेलं एक पुस्तक- बाकी शून्य! :)
अत्यंत संवेदनशील, स्वतःला कुठेही झोकून देणार्या आणि तरीही त्रयस्थपणे आयुष्याकडे बघू शकणार्या व्यक्तीचे प्रामाणिक निवेदन असं थोडक्यात याबद्दल सांगता येइल. संपूर्ण वाचल्यावर 'कोसला'शी तुलना का करतात हे मात्र कळलं नाही. फक्त थोडंफार बॅचलर लाईफ असल्यानी दोन्ही कादंबर्या एकसारख्या होत नाहीत. बाकी शून्य मध्ये खूप गोष्टी 'between the lines' 'किंवा subtle' आहेत असं मला वाटलं.
सुरुवातीला सावकाश वाचत होते, मध्येच महारोग्यांबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलची सहानुभूती, स्वतःला त्या जागी बघणं, हे एक क्षण इतकं अन्गावर आलं, की वाटलं पुस्तक ठेउन द्यावं.तिथेच लक्षात आलं की इथे फक्त जनरल घटनाक्रम आणि विचार नाहीये. प्रत्येक अनुभव खोल जाउन खळबळ माजवतोय... पुढे झपाटल्यासारखी वाचत गेले. आणि एका दिवसात पुस्तक संपवलं. पूर्ण पुस्तकातकाही वाक्य अगदी चपखल आहेत. जसे 'टीव्हीसमोर बसलं की आयुष्य थिजतं'... निवेदकाचे आणि 'वेताळाचे' संवाद तर मला फार आवडले.
शिवाय एक आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अर्धवट माहितीवर आधारीत काही नाही. UPSCच्या अभ्यासाबद्दल वाचताना , निदान मला तरी, ढोबळ चुका आढळल्या नाहीत. अभ्यासाचे विषय आले की बर्याच कादंबर्यांमध्ये अश्या चुका सापडतात आणि मग वाचताना चव बिघडते.
मला तरी कादंबरीतल्या निवेदकाची एकंदरीत धारणा choice-less awareness च्या जवळ जाणारी वाटली. फक्त कादंबरी वाचेपर्यंत हा choice-less awareness असा जोरात अंगावर येउन, गदागदा हलवून जागं करतो, हे मला माहित नव्हतं. :)
मात्र पुन्हा कधीतरी वाचण्यासाठी मला जरा हिम्मत गोळा करावी लागेल.
14 Aug 2014 - 9:10 pm | प्यारे१
+१
फक्त शेवटी शेवटी काहीतरी घोळ झालाय.
(कदाचित इथल्या एकाची झाली तशी मनःस्थिती झालेली दाखवायची असावी)
आत्मचरित्रात्मक असावी का असा संशय येण्याइतपत कादंबरी वाटते.
13 Aug 2014 - 11:02 pm | सखी
ऑगस्ट महीन्याचा काही विषय ठरला आहे का? मिपाची लपाछपी चालु असल्याने काही दिवस वाट बघुन आज हा प्रश्न विचारावासा वाटला.
15 Oct 2014 - 2:12 pm | रघुपती.राज
अन्तराळ हे पुस्तक केवळ भेदक आहे. दलित साहित्यातील सर्वोत्क्रुश्त पुस्तक आहे. माणसे माण्साला किति वाइट वागवतात ते वाचुन अन्गावर काटा येतो. विशेशतः मेलेला बैल खाण्यासाठि केल्या जाणार्या वाट्णीचे वर्णन सुन्न करणारे आहे.
16 Oct 2014 - 7:13 pm | इनिगोय