चिऊ गं चिऊ गं दार उघड...!

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
6 Jun 2014 - 1:41 pm

खूप काम झाल्यावर आपण दमतो. खूप दमल्यावर जे काही करतो तेही परफेक्ट असेलच अशी हमी आपण नाही देऊ शकत. बर्याचदा आपलं आपल्याला ही कळत नाही कि पण हे काय केलंय. देवानं स्त्रीला खूप मेहनतीनं बनवलं. नंतर तो खूप दमला असावा आणि तश्याच अवस्थेत त्यानं त्या स्त्रीचं मन बनवलं असावं. आणि नंतर त्याचाही खूप गोंधळ उडाला असेल कि आपल्याला काय करायचं होतं आणि आपण काय केलंय... त्यामुळेच स्त्रीचं मन ब्रह्मदेवालापण समजणार नाही असं म्हणत असावेत ..
तर हे सांगायचं कारण असं कि सगळं सरळ आणि सुरळीत चालू असताना आमच्या हिला आली हुक्की.. आणि उगाच म्हणजे अगदी उगाच मला म्हणाली (म्हणजे मला असं वाटलं.. )
"तीच तीच कामं करून मला खूप कंटाळा आलाय.. "
"मग मी काय करू?"
"… "
"आता काय बाई बीई लावायची कि काय तुला?.. अगं बाई असलं काही चुकूनसुद्धा मनात आणू नकोस…. आधीच तर मिळत नाही आणि मिळाली तर टिकत नाही आणि टिकलीच तर तिचे नखरे आपल्याला परवडत नाहीत" मी धास्तावत म्हणालो.
"पण कुठे काय म्हणतीये मी??"
"मग??"
"आज चिरंजीवांना आपण झोपवा.. "
चिरंजीवांना झोपवणं हे महाभयानक काम तसं आम्हीच करायचो म्हणजे करतो. आणि हिला एकाच दिवसात कंटाळा आला? एकतर आमचे चिरंजीव म्हणजे महाडांबरट. शब्दात पकडणे ह्यात वाकबगार. आणि हि तर शब्दात लगेच अडकते. तर काल झालं असं.… साहेब झोपत नव्हते म्हणून हिनं कुठलीतरी चंद्राची गोष्ट सांगितली. त्यावर चिरंजीवांनी विचारलं, चंद्र म्हणजे कोण? हि म्हणाली मामा. चिरंजीव म्हणाले कोणाचे?. हि म्हणाली तुझा आणि अडकली. तेंव्हापासून मला मामाला भेटायचं चा तगादा मागं लागला. आता आभाळातला मामा खाली कसा आणायचा? हे सांगितलं तर, तुझा भाऊ आहे आणि तुझं ऐकत नाही असं कसं होइल? म्हणून जो भोंगा सुरु केला रात्रभर.. तो उद्या भेटवते म्हटल्यावरच थांबला. म्हणून बाईसाहेबांना आज चिरंजीवांना झोपवणं टाळायचं होतं. आणि मला हे माहित होतं..
"अजिबात नाही" मी ठामपणे. "एकवेळेस बाकीची सगळी कामं मी करतो पण आज नाही मी झोपवणार"..
"असं का रे…?"
"हो"
"तो नाही रे ऐकत माझं"
"त्याला मी काय करू?आपणच निस्तरा... "
"बरं ना तुझं ना माझं .... आपण चिटठ्या टाकू.. "
"आता हे चिटठ्याचं काय मधूनच??"
"एवढं पण नाहीस ऐकणार??"
"काय लावलंस गं दररोज तर मीच "
"प्लीज………"
"कसल्या चिटठ्या??"
"मी दोन चिटठ्या टाकते एक चिरंजीवांची आणि एक इतर कामाची.. जो जी चिट्ठी उचलेल तो ते काम करेल.. "
"काहीतरीच"
"ए प्लीज ना.. "
"अज्जिबात नाही…"
"प्लीज.. प्लीज... प्लीज ना… "
"बरं ठीके…. टाक" काय करणार.... स्त्री हट्ट
"हे बघ टाकल्या… उचल आता"
मी त्यातली एक चिट्ठी उचलली…
"कुठली आली रे..?? "
"चिरंजीवांची…."
"येस्स्स…. मी सुटले..."असं म्हणून हि आत गेली. आणि आम्ही अडकलो.
मला जरा संशय आला म्हणून मी दुसरीही चिट्ठी उचलली तर त्यातही चिरंजीवांचंच नाव.. तरीच हि पळत का आत गेली…?
पर्यायच नव्हता.. गेलो आम्ही चिरंजीवांकडं...
"आमि नाई बोलनार दावा थिकदं"
"कोणीतरी आज चिडलंय वाटतं..... "
"दाऊ द्या… तुमी पन तथलेच"
"का?"
"तुमी पन नाई आमाला थंदुमामाला भेतवनाल.. "
"चल तुला भेटवतो..."
चिरंजीवांची कळी एकदम खुलली.
"थला"
आम्ही दोघं बाहेर अंगणात आलो.
"बघ कुठाय चन्दुमामा.."
"कुथं गेला?"
"तो किनई... जरा बाहेर गेलाय... परत येतो म्हणालाय"
"कधी?????" नाराजीच्या सुरात.
"फोन करतोय म्हणालाय आल्यावर... "
"थोतं... "
"मामा दिसतोय का वर?"
"नाई"
"मग?"
"…"
"कुठून आणू मग?"
हिरमुसलेले चिरंजीव मग आले घरात आणि मी त्याच्या मागे अमावस्येचे आभार मानत...
"चला झोपा आता... "
"नाही"
"का ?"
"गोथ्थ..."
"आता कुठून हि तुझी 'गोथ्थ' आणू??"
"जा……. थंदुमामा पण नाई, गोथ्थ पण नाई... जाSSSSSSS" म्हणून भोकाड पसरायची पूर्ण तयारी करत चिरंजीव बोलले.
"आता रडू नको बाबा.. सांग कुठली सांगू??" काय करणार.... बाल हट्ट
"चिऊ - काऊ ची"
खस्स्स्स्स्स. खूप जोरात काळजात काहीतरी घुसलं..
कधी कुठल्या गोष्टी, कुठल्या स्वरूपात तुमच्या समोर येतील.. काहीच म्हणजे काहीच सांगता येत नाही.. ह्या चिऊ - काऊ च्या गोष्टी भोवती माझा भूतकाळ कधी काळी बराच रेंगाळलाय.... आणि अश्याप्रकारे रेंगाळला असेल ह्याची कोणालाच कल्पना असेल असं वाटत नाही... अपवाद फक्त "तिचाच".
"बोल नाआआआआआ"
चिरंजीवांच्या ह्या आलापानं माझी तंद्री मोडली.
"...... "
"बोल……थांग... "
"ती सोडून…"
"अंहं"
"दुसरी कोणतीही सांगतो पण खरंच ती नको.. "
"का???"
"मला नाही येत ती..."
"थोत्तं.. "
"थोत्तं नाही रे.. खरंच मला नाही सांगता येत ती .. "
"जाआआआ" .... पुन्हा भोकाड पसरायची पूर्ण तयारी करत…
"आता रडू नको रे बाबा…. सांगतो"........ काय करणार .... बालहट्ट
स्वतः बाबा होऊनही जेंव्हा आपल्या बाळाला बाबा म्हणायची वेळ येते तेंव्हा समजावं कि आपण आता खरंच बाबा झालो आहोत.
तर मी असं म्हटल्याबरोबर चिरंजीवांच्या डोळ्यातल्या अश्रूंची जागा उत्सुकतेनं घेतली आणि माझ्या पुढ्यात येउन बसले..
"थांगा..."
"तर…. एक होती चिऊ.. " माझ्यासोबत चिरंजीवांचेही डोळे छोटे, तोंडाचा चंबू आणि संस्कार भारतीची रांगोळी काढताना हाताची बोटं जशी होतात ना तशी...
लहान बाळांचं एक खरंच भारी असतं. फार निष्पाप असतात. आता हीच गोष्ट हिनं कमी वेळा सांगितली असेल का?? पण दरवेळेस ऐकण्याचा उत्साह असा कि पहिल्यान्दाच ऐकतोय. मुलं ही देवाघरची फुलं का म्हणतात माहितीये.. ? त्यांचंही देणंघेणं भावाशीच असतं. सगळ्यात सुरुवातीला असतं ते ऐकणं, आणि नंतर सुरु होतं ते अनुभवणं... आणि आमच्या चिरंजीवांचं अनुभवणं सुरु होतं...
"आणि एक होता काऊ.. " माझ्यासोबत त्याच्याही चेहर्यावर नापसंतीची छटा आणि तोंड कडू कारलं खाल्ल्यासारखं ..
"चिऊचं घर होतं मेणाचं" आम्हा दोघांच्याही चेहर्यावर किंचितशी प्रसन्न झाक..
"आणि.. काउचं घर शेणाचं" आता आमच्या चेहर्यावर श्शीSSS चे भाव..
"एकदा काय झालं??"
"काय धालं??"
"खूSSSSSप मोठ्ठा पाउस आला.. " ऒऒऒऒ.... आणि तोंडावर दोन्ही हात झाकून..
"आणि काउचं घर वाहून गेलं.. " बरं झालं चे भाव..
"मग तो आला चिउच्या दारात.. आणि चिऊचं दार तर बंद होतं.. "
"मग"..... 'अरे बाप रे आता काय होणार??'
"त्यांनं आत हाक दिली... चिऊताई चिऊताई दार उघड.. "
"चिऊ म्हणाली, थांब माझ्या बाळाला दुध पिऊ दे.. "
"थोड्यावेळानं काऊ पुन्हा ... चिऊताई चिऊताई दार उघड"
"चिऊ म्हणाली, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.. "
"थोड्यावेळानं परत… चिऊताई चिऊताई दार उघड.. "
"थांब माझ्या बाळाला पावडर लाऊ दे.. "
"अश्याप्रकारे काऊ म्हणत राहिला… चिऊताई चिऊताई दार उघड आणि चिऊताईनं काही दार उघडलंच नाही"
"बलं धालं... " आता ह्या काऊ नं आमच्या चिरंजीवांचं काय बिघडवलं होतं देव जाणे.
"मग पुधं काय झालं ले.. "
"काहीच नाही.. वाट बघून काऊ उडून गेला.. "
"त्याला थर्दी धाली अथेल ना??"
"असेलही ... " हे असलं ह्यांच्याच डोक्यात येणार...
"हे हे हे हे.. " आमचे चिरंजीव मधूनच हसू लागले...
"काय झालं?"
"मी थांगु पुधं काय धालं ते... "
"काय रे??"
"काऊ चा पोपत धाला... हे हे हे हे …."
चिरंजीवांच्या डोळ्यावर एव्हाना पेंग येऊ लागली होती.. तिकडच्या कुशीवर वळून लगेच झोपले सुद्धा.. चिरंजीवांच्या ह्या गोष्टीनं माझी झोप मात्र चांगलीच चाळवली.
गतकाळाला भूतकाळ का म्हणतात? भुताप्रमाणे तो कधीही आपल्या मानगुटीवर बसू शकतो, म्हणून.. आणि अश्यावेळेस आपल्या हातात काहीच नसतं.. आपल्याला त्याला झेलावंच लागतं.. पण ह्या गोष्टीनं खूप आतला कप्पा उघडला गेला.
…………………

साधारण संध्याकाळच्या आठची वेळ..
"मी प्रभात रोडवर आलोय.. "
"फेकू नकोस.. "
"मी खरंच सांगतोय"
"कुठे आलायेस?? "
"स्वरूप हॉटेल.. "
"ठीके.. मग तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर"
"मी एकटाच आहे.. "
"खोटं.. "
"अगं नाही गं बाई.. तुझ्यासाठीच आलोय.. "
"उगं फालतूपणा करू नकोस. मला माहितीये तू काही आला नाहीस आणि आला जरी असशील तरी कुणासोबत तरी असशील… तू.. आणि .. माझ्यासाठी प्लीजच आणि मी जरा बाहेर चाललीये बाय.. "
मी काही बोलायच्या आत तर तिने फोन ठेवलापण..
एका तासानंतर मी पुन्हा
"मी अजून तिथेच आहे.. "
"फेक्या आता बास कर… आय नो.. तू तुझ्याच रूमवर आहेस"
"अगं मी खरंच तिथेच आहे अजून"
"बरं.. झालं का मग जेवण??"
"मी जेवायला नाही आलेलो"
"मग??"
"तुला भेटायला आलोय"
"तुझं ना काय करू.. काही कळंत.. "
"काहीच नको करू.. तुझी वाट बघतोय.. "
"गप बस.. तू उगं टाइम पास साठी फोन केलायेस मला माहितीये.. चले काकू बोलावत आहेत. मी चाललीये जेवायला चल बाय.. "
"अगं.." काही बोलायच्या आत तर तिने फोन परत ठेवलापण.
अर्ध्या तासानं
"I am still here... "
"बास ना रे आता.. "
"आता तुला कसं पटवून देऊ मलाच कळत नाहीये.. मी आठ वाजल्यापासून इथेच आहे.. एकटाच आलोय.. जेवायला नाही ... तुलाच भेटायला... कधीतरी सिरीयसली घे.. प्लीज... मी आत्ता स्वरूपच्या बोर्डाच्या अगदी पुढेच उभा आहे गं.. अजून काय सांगू..? "
".........."
".........."
"तू खरंच खरं बोलतोयेस??" आवाज जरा जरा गंभीर होऊ लागला.
"अजूनही तुला खोटंच वाटतंय..? "
"आईशप्पथ... मला खरंच वाटलं तू चेष्टा करतोयेस.."
"नेहेमीप्रमाणे.. "
"अरे शट्…. सॉरी रे मला … नं … काय…"
"नाही तू काहीच बोलू नकोस"
"कठिणे... "
"खूप"
"आता जवळपास दहा वाजत आलेत. आणि आता तर बाहेर निघणं अशक्य आहे"
"आणि शक्य जरी असलं तरी तू आलीच नसतीस"
"तसं काही नाहीये"
"मला माहितीये ना तसंच आहे"
"अरे मी खरंच आले असते रे.. "
"I know I am not worth for it… "
"हे कोणी सांगितलं तुला… "
"कोणी कशाला सांगायला पाहिजे??"
"काय करू काही समजत नाहीये.. "
"काहीच नकोस करू."
"…."

काही क्षण अबोला पसरला…

"आणि खरं तर तू आली नाहीस तेच चांगलं झालं.. "
"म्हणजे??"
"जाऊ दे"
"पण मला एक सांगशील??"
"काय??"
"कसं काय आला होतास??"
"बोलायचं होतं.. "
"काय?"
"ते असं फोन वर नाही सांगता येत"
"असं ना तसं आपण उद्या भेटतोच आहोत कि.. "
"तिथे काही नाही सांगता येणार..."
"असं काय सांगायचं होतं?"
"ते मला प्रत्यक्षच सांगायचं होतं.. हे असं फोनवर नव्हे.. "
"काय?"
"……. "
"अशी कुठली गोष्टंय कि जी तू मला फोनवर नाहीस सांगू शकत??"
"कसं सांगणार ना??"
"काय??"
"अगं बाई मी फोनवर कसं सांगू.... कि तू मला प्रचंड आवडतेस????"
"............... " बहुधा तिकडे बॉम्ब पडला असावा.
"मिळालं का उत्तर…?"
"….………"

काहीक्षण पुन्हा अबोला एक्के अबोला...

"आता ह्या असल्या गोष्टी फोनवर सांगायच्या कि प्रत्यक्ष??"
"चेतन आय एम शॉक्ड... "
"तूच कशाला मी पण त्याच शॉक मध्ये आहे अजून.. "
"काय चालवलंय हे? वी आर गुड फ्रेंड्स यार"
"आय नो"
"देन??"
"आता मला वाटलं .. मी बोललो.. "
".... "
"आणि बोलल्याशिवाय मला नाही चैन पडत.."
"पण मी असं काय वागले??"
"मी कुठं म्हणालो कि तू असं काही वागलीस म्हणून??"
"मग?"
"तू माझ्याशी मित्र म्हणूनच वागलीस.. त्यात कसलीच शंका नाही.. पण मला माझ्याकडून असं काही वाटू शकत नाही का??"
"माझ्या वागण्यात तुला असं काही जाणवलं का??"
"अजिबात नाही ... कसंय??? चंद्र उगवतो आणि मावळतो.. त्याचा हेतू असा अजिबात नसतो कि एखाद्यालाच जास्त चांदणं द्यायचं आणि एकाला कमी.. तो सगळ्यांना सारखंच देतो… घेणारेच त्याचा अर्थ काढत बसतात.. मला माझ्या चंद्रावर मालकी गाजवायची नाहीये. माझ्या वाट्याला जे काही थोडं चांदणं आलंय… तेच तुला दाखवायचं होतं... पण तू आलीच नाहीस.."
"…काय बोलू काही कळत नाहीये... मला तर ना…"
"चिऊ-काऊ ची गोष्ट माहितीये.. " मी तिचं बोलणं तोडत म्हणालो.
"हम्म.. "
"एक असते चिऊ.. एक असतो काऊ.. चिऊचं घर मेणाचं.. काउचं घर शेणाचं.. एकदा काय होतं खूप मोठ्ठा पाउस येतो.. आणि काऊचं घर वाहून जातं मग तो जातो चिउच्या घरी आणि म्हणतो.. चिऊ गं चिऊ गं दार उघड. चिऊ काही दार उघडत नाही. कधी तिला तिच्या बाळाला उठवायचं असतं.. कधी अंघोळ घालायची असते.. कधी गंध पावडर करायची असते.. काऊ तसाच बाहेर म्हणत राहतो 'चिऊ गं चिऊ गं दार उघड' आणि शेवटपर्यंत काही चिऊ दार उघडत नाही. त्या काऊला चिउच्या घरात जायचं होतं... आणि ह्या काउची काय इच्छा आहे माहितीये??"
"…"
" असं ना तसं घर वाहून गेलंच होतं.. पण ... चिऊ नं एकदाच दार उघडून बघावं कि मी किती भिजलोय ते…. बास्स... एकदा का ते बघणं झालं कि मग आपण होउन उडून जाईन... मी तुला प्रपोज करत नाहीये.. ज्या गोष्टी कधीच घडू शकणार नाहीत त्यांच्या मागं मी कधीच नाही गं लागत.. पण कसंय... तुझ्यामुळे खूप छान अनुभव आलेत .. बोलायचं होतं तेच खूप.. तुझ्यावर काही अभंग लिहिले गेलेत माझ्याकडून त्यातला सगळ्यातला शेवटचा असा आहे कि ... "एव्हढे मागणे । ऐक रे श्रीरंग । पडो हा अभंग । तिच्यापायी" तसंच काहिसं करायचं होतं. तुझ्यामुळेच हुरहुरणारा मोहोर आणि मोहोरलेली हुरहूर कशी असते हे नव्यानं कळालं.. पण काय करणार ह्याही काउला त्याचं काऊपण नडलं…."
"तसं काही नाहीये.. "
"मला माहितीये ना.. नेमकं कसंय ते.. "
.
.
"...... "
"......."
"आता अजून किती वेळ थांबणार आहेस??"
"वाट्टेल तेवढा वेळ... "
"नखरे करू नकोस.. जा आता घरी"
"यायचं तुझ्या हातात होतं... जाणं माझ्या हातात आहे.. "
"कठीणे..."
"तसं काहीच कठीण नव्हतं.. फक्त दार उघडून बघायचं होतं तेही एकदा.. फक्त एकदा"
असं म्हणून मी फोन ठेवला.
………….………….........

चिऊ नं दार उघडलंच नाही. काउनंच रस्ता बदलला.

……………………………

एखादी जखम बरी झाली असं वाटत असतानाच कुणी तरी घाव घालावा आणि जखम पुन्हा भळभळायला लागावी.. असलंच काहीतरी झालं.. आमची झोप उडवून चिरंजीव शांत झोपले होते.. अजिबात झोप येईना म्हणून मी खिडकीत आलो. खिडकीबाहेरच्या आंब्याच्या झाडावर नजर गेली.
.
.
.
.
माझ्यासारखाच एक कावळा..... अजून जागा होता...

ता.क. प्रस्तुत कथेचा पूर्वरंग पूर्णपणे काल्पनिक तर उत्तररंग हे वास्तव आहे…!

कथा

प्रतिक्रिया

खूप छान असं तरी कसं म्हणू? स्वताची काऊ चिऊ ची गोष्ट आठवली.
तुमचा लेख आवडला.पूर्वरंग आणि उत्तररंग दोन्हीही आवडले.

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:16 am | वटवट

आभारी आहे… :)

कवितानागेश's picture

6 Jun 2014 - 2:01 pm | कवितानागेश

चिऊ नं एकदाच दार उघडून बघावं कि मी किती भिजलोय ते…. बास्स... :(

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:16 am | वटवट

:)

हाडक्या's picture

6 Jun 2014 - 2:46 pm | हाडक्या

सुंदर लिहिलय हो, वटवट राव .. कोणता पूर्वरंग आणि कोणता उत्तररंग हे मात्र कळालं नाही .. ;)

पुढच्या वेळी अजून चांगलं लिहायचा प्रयत्न करेन… आभारी आहे… :)

विअर्ड विक्स's picture

6 Jun 2014 - 3:24 pm | विअर्ड विक्स

कथा आवडली … सुंदर

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:18 am | वटवट

आभारी आहे… :)

ब़जरबट्टू's picture

6 Jun 2014 - 3:38 pm | ब़जरबट्टू

आवडेश.. छान आहे...

एखादी जखम बरी झाली असं वाटत असतानाच कुणी तरी घाव घालावा आणि जखम पुन्हा भळभळायला लागावी

काही जखमा कधीच भरुन येऊ नये असे वाटत असते.. आयुष्यभर कुरवाळला आवडणार्‍या सुगंधी जखमा पण असतात..

पुलेशू

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:18 am | वटवट

आभारी आहे… :)

माधुरी विनायक's picture

6 Jun 2014 - 3:41 pm | माधुरी विनायक

सुरेख लिहिलंय... सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असतं हेच खरं...
हा अनुभव वाचल्यानंतर साहित्याबद्दलचं एक अतिशय समर्पक असं इंग्रजी विधान आठवलं... As you write more and more personal, it becomes more and more universal.

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:18 am | वटवट

खरंय…. आभारी आहे… :)

सविता००१'s picture

6 Jun 2014 - 4:32 pm | सविता००१

खूप छान

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:19 am | वटवट

आभारी आहे… :)

स्पा's picture

6 Jun 2014 - 4:49 pm | स्पा

अप्रतिम.. क्लासच

साला ज्याम आवडली

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:19 am | वटवट

खूप आभारी आहे… :)

आपल्या गोष्टीतल्या नायकाचे वागणे, वोलणे योग्य नाही. सुसंगत नाही. (-उत्तररंगातील)

पुढच्या वेळी अजून चांगलं लिहायचा प्रयत्न करेन… आभारी आहे… :)

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2014 - 11:46 pm | स्वाती दिनेश

खूप छान लिहिलंय,
स्वाती

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:20 am | वटवट

धन्यवाद...

खटपट्या's picture

7 Jun 2014 - 12:27 am | खटपट्या

ज आणि ब आणि री

थोड्या फार फरकाने असा अनुभव घेतला आहे. पण शब्दबद्ध आपण छान केले.

क्या बात है...
आभारी आहे… :)

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 12:55 am | आत्मशून्य

वाचल्याचा भास झाला.

?? अभिप्राय समजला नाही...

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2014 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट आवडली. उत्तरार्ध तर खासच आहे.
काउ आणि चिउ ही प्रतिके पण आवडली.

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:21 am | वटवट

आभारी आहे… :)

एका दु:खी काऊमुळे चारजण दु:खी होतात. त्याची चिऊ, दुसरी चिऊ, तिचा काऊ आणि हा काऊ!

जे आहे ते नको आणि नाही ते हवं या काऊच्या वृतीचा तो परिणाम आहे. काऊला हवं तेव्हा विचारायचं साहस करता आलेलं नसतं आणि दुसरी चिऊ याला (पावसाळ्यात!) नादी लावते. हातातली चिऊ असहाय आणि असल्या प्रकारात दुसर्‍या चिऊचा काऊ तिसरी चिऊ शोधण्याची शक्यता जास्त. च्यायला, त्या लहानग्यानं मस्त कमेंट मारलीये!

"काऊ चा पोपत धाला... हे हे हे हे …."

तस्मात, आहे त्या चिऊनं आपल्या वेळेला दार उघडलंय हे लक्षात आलं तर काऊ-चिऊ सुखी आणि त्यांचा छोटा काऊ देखिल सुखी.

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:22 am | वटवट

धन्यवाद...

बाबा पाटील's picture

7 Jun 2014 - 10:27 am | बाबा पाटील

प्रेमाचे सगळेच रंग आवडतात.मग ते प्रियकर प्रेयसी असु द्यात अथवा मित्र मैत्रिण. पण बाप लेकाच प्रेम त्याची सर कशालाच नाही.

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:22 am | वटवट

आभारी आहे… :)

वटवट's picture

9 Jun 2014 - 9:16 am | वटवट

सर्व प्रतिसादकर्त्यांचे खूप खूप आभार…

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2014 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

हल्ली लग्नात गुरुजी सांगतात स्टेज वरुनच वाकुन हॉल मधे हजर असलेल्या सगळ्या मोठ्यांना एकदाच नमस्कार करा. सगळ्यांना मिळुन एक नमस्कार पुरतो.

आभार मानताना तसे केले असते तरी चालले असते.

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2014 - 10:20 am | संजय क्षीरसागर

पण पब्लिकला वाटतं जितके वाकू तितके नम्र दिसू!

स्पा's picture

9 Jun 2014 - 10:42 am | स्पा

संजय सरांशी सहमंत

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2014 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

स्रां'चा विनम्र शिष्य स्पा... यांचेशी सहमंत!

प्यारे१'s picture

9 Jun 2014 - 12:58 pm | प्यारे१

वरील सर्वांशी सहमत!

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2014 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

.. चिऊ चिऊ दार उघड म्हटल्यावर.... "
" थांब माझ्या बाळाला दुध पिऊ दे.. "
" थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.. "
"थांब माझ्या बाळाला पावडर लाऊ दे.. "

हीच ट्यून लावत असते यावर सर्वकाऊसहमती होईल! आणि त्यामुळे `काऊचा पोपट कसा होतो' ते छोट्या काऊला, मोठा झाल्यावर कळेल!

आत्मशून्य's picture

9 Jun 2014 - 1:34 pm | आत्मशून्य

आयला... चायला... माताय.. कं लिवलय कं लिवलय. जिंकलत, संजय सर तुम्ही. आपलं मन जिंकलतं...! या प्रतिसादातुन.

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2014 - 1:55 pm | संजय क्षीरसागर

जुगजुग असा शब्द आहे.

हिंदीत युग युग, जुग जुग, झुग झुग,झुक झुक आणी बरेच र्हाइमींग शब्द असेच टंकले जातात. त्यामुळे हो संजय सर झुक-जुक जियो समजा हवं तर. पण जास्त हट्ट नको.

मृत्युन्जय's picture

9 Jun 2014 - 12:02 pm | मृत्युन्जय

छान लिहलय.

बॅटमॅन's picture

9 Jun 2014 - 1:06 pm | बॅटमॅन

मस्तच!!!

लय आवडलं.

सर्वांचे पुन्हा आभार…
पण पब्लिकला वाटतं जितके वाकू तितके नम्र दिसू!>>> काही लोकांची इच्छा असते कि त्यांना सेपरेट नमस्कार हवा असतो…
असो, सुचवल्याबद्दल धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2014 - 1:57 pm | अत्रुप्त आत्मा

@काही लोकांची इच्छा असते कि त्यांना सेपरेट नमस्कार हवा असतो>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

इनिगोय's picture

29 Jul 2014 - 7:10 pm | इनिगोय

कडक!
पुनःपुन्हा वाचलं. काहीकाही वाक्यं एकदम आवडलीच.

मस्त लिहिता तुम्ही. लिहित रहा.

भिंगरी's picture

29 Jul 2014 - 11:51 pm | भिंगरी

कथा कि व्यथा?
पण छान

वटवट's picture

30 Jul 2014 - 1:38 pm | वटवट

दोन्ही... :)

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2016 - 5:28 pm | मराठी कथालेखक

छान ...

मेघना मन्दार's picture

3 Jun 2016 - 11:50 am | मेघना मन्दार

किती सुंदर लिहिता ओ तुम्ही !!

सविता००१'s picture

4 Jun 2016 - 5:55 pm | सविता००१

काय सुरेख लिहिलंय. एकदम कडक. वाचायचं राहून गेलं होतं.:(

चैला. भारी होती की ही स्टोरी.
वाचलेली पण प्रतिसाद द्यायचा रहून गेला.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Jun 2016 - 7:04 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला सलाम !

वटवट's picture

9 Jun 2016 - 12:38 pm | वटवट

सर्व अनपेक्षित प्रतिसादांबद्दल मनासून आभारी आहे. एव्हढं जुनं लिखाण आवर्जून वाचल्याबद्दल आणि सहृदय प्रतिसादाबद्दल सदैव ऋणी आहे.

पियुशा's picture

9 Jun 2016 - 1:37 pm | पियुशा

मस्त लिहिल्ये चिउ काउ ची गोष्ट :)

साहेब..'s picture

9 Jun 2016 - 2:31 pm | साहेब..

वाचलेली पण प्रतिसाद द्यायचा रहून गेला.

चिऊ नं एकदाच दार उघडून बघावं कि मी किती भिजलोय ते….बास्स..!!!

खल्लास !!!

ह्याच भावार्थाचा कधी काळी मी लिहिलेला एक शेर टंकतोय...

तू प्यार ना कर, पर इतना तो कर,
जरा मेरे प्यार की कदर तो कर !
तू देखा ना कर, पर इतना तो कर,
मेरी नजर से खुदको दूर ना कर !!

जगप्रवासी's picture

9 Jun 2016 - 4:21 pm | जगप्रवासी

२ वर्षापूर्वीच या कथेची प्रिंट करून ठेवली आहे घरी, सेंटी मेंटी झाल्यावर वाचतो कधीतरी मग.

अशा कथा वाचल्यावर मिपावर आल्याच सार्थक वाटत. असेच चाफा यांच्या गूढकथा / भूत कथा , तुमचा अभिषेक यांच्या "सुख म्हणजे काय असत?" या लेखाची सिरीज अशाच प्रिंट करून ठेवल्यात वाचायला.