फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले
तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले
रणीँ हासुनी बोलले जे महात्मे
जरा टोकता मी किती कृद्ध झाले
किती सर्वव्यापी तुझा न्याय होता
मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले
चिता जाळण्याची नको आज चिँता
पहा लोक सारे इथे गृद्ध झाले
किती हाय करुणे तुझा बोलबाला
कसाई जुने ते अता बुद्ध झाले
तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला
बलीदान माझे पहा शुद्ध झाले
तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला
तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
12 Mar 2014 - 8:06 am | अत्रुप्त आत्मा
खूप छान रचना!
12 Mar 2014 - 8:12 am | स्पंदना
:(
12 Mar 2014 - 2:34 pm | drsunilahirrao
अत्रुप्त आत्मा, अपर्णा अक्षय,
खूप खूप आभार
12 Mar 2014 - 3:59 pm | पोटे
कसाई जुने ते अता बुद्ध झाले
13 Mar 2014 - 2:09 am | बॅटमॅन
ही ओळ तर क्लायमॅक्स अन कहर आहे!!!!
12 Mar 2014 - 8:56 pm | बॅटमॅन
खूप आवडली रचना. सुंदर!
12 Mar 2014 - 9:02 pm | गवि
अत्यंत सुंदर आहे रचना.. सुनीलराव, धन्यवाद मस्त कविता दिल्याबद्दल.
13 Mar 2014 - 1:29 am | सुहास झेले
सुंदर ...
15 Mar 2014 - 7:00 am | drsunilahirrao
पोटे, बॅटमॅन, गवि, सुहास झेले धन्यवाद
15 Mar 2014 - 9:10 am | सुधीर
सुंदर! रचना आवडली!!
15 Mar 2014 - 9:35 am | शैलेन्द्र
सुंदर, खुपच छान..
15 Mar 2014 - 11:50 am | सस्नेह
अन आशयगर्भ रचना.
15 Mar 2014 - 12:21 pm | drsunilahirrao
सुधीर शैलेन्द्र स्नेहांकिता खूप खूप आभार.
15 Mar 2014 - 12:42 pm | kurlekaar
“कसाई जुने ते अता बुद्ध झाले”
ही ओळ खरंच छान आहे. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला या वाक्यात जेवढी ताकद आहे तेवढीच तुमच्या या ओळीत आहे. पण या उलट असंही वाटतं की तुम्ही ‘युद्ध, बुद्ध, क्रुद्ध, वृद्ध, शुद्ध’ यांना यमकांत गुंफण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या कवितेला विनाकारण बंदिस्त करून टाकलंत. ‘समृद्ध युद्ध’ म्हणजे तुम्हांला नेमकं काय म्हणायचंय ?
16 Mar 2014 - 6:53 am | drsunilahirrao
कुर्लेकार सर,
इथे छान, समृद्ध शब्द उपरोधाने आले आहेत. आपल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. गजलेसारखी रचना लक्षणीय आणि सुंदर होऊ शकते पण कवितेएवढी मुक्त होऊ शकत नाही.
27 Mar 2014 - 9:49 am | पैसा
अर्थपूर्ण आणि शब्दसमृद्ध.
28 Mar 2014 - 4:31 pm | drsunilahirrao
पैसा, खूप खूप आभार !