जराशी खिडकी उघडा राव..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
25 Jul 2008 - 10:43 am

पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशी खिडकी उघडा राव..!
आले तर येऊ देत दोन थेंब आत
तेवढाच जरा भिजायला वाव..!

भिजला तर भिजू दे कोट,
उद्या पुन्हा वाळेल ना..!
पण आजचा असाच पाऊस
उद्या पुन्हा मिळेल का ?

आम्ही आपले देतोय म्हणून
खाऊ नका इतका भाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
थोडीशीच खिडकी उघडा राव..!

तुम्हाला आपली एकच काळजी
बिघडेल आपली कडक इस्त्री.
पण कधी शोधून पहा ना
धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..!

एटीकेट आणि फ़ॉर्मॅलिटीजची
नकोच तुमची डराव डराव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जरा तरी खिडकी उघडा राव..!

एसी मध्ये बसून बसून
जीव अगदी शीणला आहे.
बघू आकाशाने कसा
इंद्रधनू विणला आहे.

खरं सौंदर्य पाहू आता
स्क्रिनसेव्हरला "चले जाव"..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
थोडी खिडकी उघडा राव..!

खड्ड्यात जाऊ दे वर्क प्रेशर
विसरा प्रोजेक्ट विसरा हुद्दा.
पाऊस पडताना असूच नये
भिजण्याशिवाय दुसरा मुद्दा..!

कटिंग आणि वडे भजीवर
सगळे मिळून मारू ताव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशी खिडकी उघडा राव..!

मान्य आहे मन तुमचं
कामात अडकून पडलेलं.
पण तुमच्यातही असेल ना
खोडकर मूल दडलेलं ?

बरेच दिवस खेळला नसाल
खेळून बघा हाही डाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशीच खिडकी उघडा राव..!

रिमझिम असो की मुसळधार
मनसोक्त हवं भिजायला.
आपलं मायेचं माणूस असतंच
टॉवेलने डोकं पुसायला.

त्याच्या कुशीत शिरुन क्षणभर
पुन्हा भिजायला घ्यायची धाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशीच खिडकी उघडा राव..!

किंचित करा काच उघडी
मृद्गंधानं होऊ वेडं.
शहरी पुटं झटकू देहाची
मनामधलं जपू खेडं.

हात केलात नकळत पुढे,
मागं घ्यायचं काढू नका नाव.
पाऊस कधीचा साद घालतोय,
सगळीच खिडकी उघडा राव..!

-- अभिजीत दाते

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 11:40 am | मदनबाण

तुम्हाला आपली एकच काळजी
बिघडेल आपली कडक इस्त्री.
पण कधी शोधून पहा ना
धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..!

हे फार आवडल..

(मिस्ट्रीयस बॉय)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अनिल हटेला's picture

25 Jul 2008 - 12:38 pm | अनिल हटेला

बरेच दिवस खेळला नसाल
खेळून बघा हाही डाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशीच खिडकी उघडा राव..!

मस्तच !!!!!!

( नेहेमी पावसात मनसोक्त भिजणारा )

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बेसनलाडू's picture

25 Jul 2008 - 2:28 pm | बेसनलाडू

(थेट)बेसनलाडू

शितल's picture

25 Jul 2008 - 6:49 pm | शितल

मस्तच रचली आहे.
सर आणी साधे शब्द वापरून केलेली कविता आवडली.

राधा's picture

25 Jul 2008 - 7:22 pm | राधा

अगदी मनातल लिहिलत...............

चतुरंग's picture

25 Jul 2008 - 8:16 pm | चतुरंग

मनमुराद आवडली कविता!!

(अवांतर - मागच्या आठवड्यात मुसळधार पावसात माझ्या मुलाबरोबर बाहेर चिंब भिजण्यासाठी गेलो आणि त्याच्याबरोबरच डबक्यातून उड्या मारत मारत घरी आलो ती आठवण पुन्हा ताजी झाली! :))

चतुरंग

मिसळपाव's picture

25 Jul 2008 - 11:21 pm | मिसळपाव

अभिजीत, सुंदर कविता आहे. साधासा आशय, पण काय सुरेख मांडला आहे. व्वा!

प्राजु's picture

26 Jul 2008 - 12:00 am | प्राजु

कविता वाचून भिजवासे वाटते आहे पावसात...
अभिजित, अभिनंदन..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

26 Jul 2008 - 7:23 am | विसोबा खेचर

वा वा! सुरेख कविता...! प्रत्येक कडवं दाद देण्याजोगं!

या ओल्याचिंब कवितेबद्दल अभिनंदन दातेसाहेब!

तात्या.

यशोधरा's picture

26 Jul 2008 - 9:12 am | यशोधरा

मस्तच कविता!! अगदी सगळ्यांच्या मनातलं लिहिलय!!

नरेंद्र गोळे's picture

27 Jul 2008 - 6:48 am | नरेंद्र गोळे

कविता हे अंतरीचे गूज सांगण्याचे माध्यम आहे.

अभिजीत, तुम्हाला खरेच काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे.

म्हणूनच कविता सुंदर झाली आहे. शुभेच्छा!

मनी's picture

31 Jul 2008 - 11:59 am | मनी

channe !!! :)

जितेन्द्र's picture

5 Sep 2008 - 4:49 pm | जितेन्द्र

सुरेख!!!!!!

ईश्वरी's picture

6 Sep 2008 - 1:13 am | ईश्वरी

सुरेख कविता. प्रत्येक कडवं छान जमलयं . आवड्ली कविता.
ईश्वरी