पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशी खिडकी उघडा राव..!
आले तर येऊ देत दोन थेंब आत
तेवढाच जरा भिजायला वाव..!
भिजला तर भिजू दे कोट,
उद्या पुन्हा वाळेल ना..!
पण आजचा असाच पाऊस
उद्या पुन्हा मिळेल का ?
आम्ही आपले देतोय म्हणून
खाऊ नका इतका भाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
थोडीशीच खिडकी उघडा राव..!
तुम्हाला आपली एकच काळजी
बिघडेल आपली कडक इस्त्री.
पण कधी शोधून पहा ना
धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..!
एटीकेट आणि फ़ॉर्मॅलिटीजची
नकोच तुमची डराव डराव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जरा तरी खिडकी उघडा राव..!
एसी मध्ये बसून बसून
जीव अगदी शीणला आहे.
बघू आकाशाने कसा
इंद्रधनू विणला आहे.
खरं सौंदर्य पाहू आता
स्क्रिनसेव्हरला "चले जाव"..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
थोडी खिडकी उघडा राव..!
खड्ड्यात जाऊ दे वर्क प्रेशर
विसरा प्रोजेक्ट विसरा हुद्दा.
पाऊस पडताना असूच नये
भिजण्याशिवाय दुसरा मुद्दा..!
कटिंग आणि वडे भजीवर
सगळे मिळून मारू ताव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशी खिडकी उघडा राव..!
मान्य आहे मन तुमचं
कामात अडकून पडलेलं.
पण तुमच्यातही असेल ना
खोडकर मूल दडलेलं ?
बरेच दिवस खेळला नसाल
खेळून बघा हाही डाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशीच खिडकी उघडा राव..!
रिमझिम असो की मुसळधार
मनसोक्त हवं भिजायला.
आपलं मायेचं माणूस असतंच
टॉवेलने डोकं पुसायला.
त्याच्या कुशीत शिरुन क्षणभर
पुन्हा भिजायला घ्यायची धाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय,
जराशीच खिडकी उघडा राव..!
किंचित करा काच उघडी
मृद्गंधानं होऊ वेडं.
शहरी पुटं झटकू देहाची
मनामधलं जपू खेडं.
हात केलात नकळत पुढे,
मागं घ्यायचं काढू नका नाव.
पाऊस कधीचा साद घालतोय,
सगळीच खिडकी उघडा राव..!
-- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4350
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला
अप्रतिम!
बरेच दिवस
थेट कविता आवडली
सगळीच कविता आवडली.
१ नंबर............
सुंदर! अत्यंत सुंदर!
झक्क जमली आहे कविता
जबरदस्त...
वा वा!
मस्तच
सुंदर कविता!
channe !!!
सुरेख!!!!!!
सुरेख