गूढ भाषा नयनांच्या
मृदुल आसवे झेलीत ओंजळ
हृदयी जागल्या स्वप्नांच्या ....
मौनाहूनही मूक असे
हृदयबिंबही तरी दिसे
धुंद मनाने छेडीत जाव्या
अगणित तारा देहाच्या ....
गूढ भाषा नयनांच्या
परी कधीतरी अश्रू ढळावे
कधी ज्योतीवर पतंग जळावे
मनी साचल्या कृष्णघनांतून
सरी बरसाव्या दु:खाच्या ....
गूढ भाषा नयनांच्या
आयुष्याच्या स्वप्नंझुल्यावर
शोधीत जावे आकाशी घर
डोळे मिटुनी हात गुंफुनी
मिठीत मिटावे सजणाच्या ....
गूढ भाषा नयनांच्या