अडगळीतल्या आठवणींचा पसारा..

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
16 Sep 2013 - 11:38 pm

सुरवातीला मी अगदी घारीच्या नजरेनं पुस्तकं राखत असे (कारण मित्रांची बरीच पुस्तकं मी हक्कानं ढापलीत). पण आताशा तेवढा आग्रह राहिला नाही. त्यामुळे पुस्तकांना पाय फुटले आणि आवडीची बरीच पुस्तकं परागंदा झाली. उरलेली पुस्तकं थोडी कपाटात, तर बाकीची घरात इकडे, तिकडे, चोहीकडे पसरलेली असतात. त्यात निवांत बसून पुस्तकं वाचायचं ठिकाण म्हणजे टॉयलेट असा माझा ठाम विश्वास. त्यामुळे तिथेही एखाद्-दुसरे पुस्तक सापडलं की आई आणि हिचा ओरडा खावा लागतो. म्हणून एक शनिवार कपाटं आवरण्यासाठी सार्थकी लावायचा ठरवला.

बरेच दिवस न आवरल्यानं वरच्या कप्प्यातल्या पुस्तकांवर धूळ साचुन राहिलेली. आधी ती झटकायला घेतली. मग हळुहळु खालचे कप्पे. त्यात इवान दानिसोविचचा एक दिवस, गुलाग, रूट्स, ग्रेप्स ऑफ राथ, रेड सन अशी जंत्री निघाली. एका कोपर्‍यात कागदी कवर घातलेलं अस्वस्थ दशकाची डायरी. पिवळं पडलेलं. सहज चाळलं. अमृतसर १९८४, आसाम गण परिषद, प्रफुल्लकुमार महंता इ. विषय मांडलेले. वाटलं किती दिवस झाले हे सगळं वाचुन! मधेमधे रेड सन सारखं पुस्तक डोळे खाडकन् उघडायला लावतं, पण सध्या वाचनाचा कल बदललाय हे खरं. क्षितीजं विस्तारली आहेत म्हणावं की घडणारं वास्तव डोळे उघडे ठेऊन पहाणार्‍या, क्षणी गुमान स्विकारलं तरी संधी मिळताच झुगारणार्‍यांची तळी उचलून धरण्याची उमेद कमी झाली म्हणावं? समजत नाही, समजत नाही..

कवर फार जीर्ण झालं असणार कारण त्याचा कण्याचा कागद मोडुन हातात आला आणि सगळं कवर सुट्टं झालं. इलस्ट्रेटेड वीकलीचा जुना कागद. चित्र विरलेलं पण टिपिकल फाँट आणि ढोबळ प्रिंट असलेलं फ्रंट पेज. किती वर्षांनी एखादा जुन्या ओळखीचा चेहरा अवचित समोर यावा तसं झालं.

लहान होतो तेव्हा घरात १०-१२ वर्तमानपत्रे येत असत. वडिल स्वतः पत्रकार होते त्यामुळे घरात काही न काही कानावर पडत असे. छगन भुजबळ बेळगावात धुमकेतूसारखे प्रगट झाले तेव्हा बाबांनाही कर्नाटकी पोलिसांचे तडाखे बसलेले. किरण ठाकुर घरी येत असत तेव्हा चर्चा घडत असे. अर्थात काही कळायचे ते वय नव्हते, पण कान उघडे होते आणि डोकं म्हणजे अनक्लेम्ड टेरिटरी होती. घरी इलस्ट्रेटेड वीकली येऊ लागला आणि बातमीमागचे दृश्य, तडफड, आक्रोश आणि सुकलेल्या रक्ताचा रंग समजायला लागला. खुशवंत सिंगाची टीम. मोठ्ठी लक्षवेधक मथळ्याची अक्षरे, सुंदर प्रेझेंटेशन आणि फोटोज्. आणि फोटोज्!

'८४ च्या उन्हाळ्यात इलस्ट्रेटेड वीकलीचा बाज एकदम अंगावर आल्याचे आठवते. गुडघ्यापर्यंत येणारी कफनी, डोक्यावर उंच खालसा पगडी, भरघोस दाढी, हातात घेतलेला मोठा बाण आणि बेदरकार नजर टाकत घोळक्यात बसलेला भिंद्रनवाले. त्याचे दमदमी टकसालमधले फोटोज, काही मुलाखती ज्यात सिक्ख कौम़ वगैरे येणारे शब्द. पंजाब केसरीच्या संपादकांची हत्या, त्याचे फोटो आणि सरतेशेवटी विनाशाचे पडघम, सैनिकांचे मोर्चाबंद जथे, अकाल तख़्ताचा भग्न, गोळागोळीत छिन्नभिन्न झालेला चेहरा. हे असं भारतात होतंय? का? असे प्रश्न मनात चुळबुळ करायला लागले. अर्थात, कोणी सांगितलं तरी कळालं नसतंच. कारण आम्ही पडत्या बाजुचे. हमखास. शिखांचे मंदिर पाडले, त्यांची खलिस्तानाची मागणी हाणुन पाडली हे कारण माझ्यासाठी पुरेसे होते तेव्हा. मला आठवते की मी भिंद्रनवालेंचे फोटो कापुन जमा करत असे तेव्हा.

तेच लंकेचे. भारतीय शांतीसेना लंकेत पाठवली त्याच्या १-२ वर्षे आधी तरी लंकेबाबत बरंच पहायला मिळालं होतं. अंगावर शहारे यायचे एकेक फोटो पाहुन. शून्य काचडोळ्यांनी लहान नातवाच्या कलेवराकडे पहाणारी म्हातारी, तिच्या कपाळीच्या सुरकुत्यांचे जाळे, तिचा मातकट काळा रंग हे अजुन विसरलो नाही. बालासिंघमची आणि प्रभाकरनची मुलाखत, मला वाटते १९८६-८७ ची गोष्ट असावी. तमिळ ईलम् नाव सांगणार्‍या अनेक संघटनांचे पेव फुटले होते तो काळ. एलटीटीई स्थापन केल्यापासुन तोवरच्या वाटचालीत असे अवघड दिवस प्रभाकरनला दिसले नव्हते. त्यात भारतीय गुप्तचर संस्थांचा आडगिर्‍हाईकी कारभार, सैन्याने चालवलेली मनमानी, मुत्सद्द्यांनी पटावरच्या सोंगट्यांसारखा केलेला वापर असे बरेच काही असावे. आता पुरते आठवत नाही पण याच्या जवळ जाणारे विचार होते हे नक्की. सिंहलांनी तमिळांचा चालवलेला वंशविच्छेद, त्याविरुद्ध एकाकी झुंज देणारा हिकमती प्रभाकरन, त्याचे जिवावर उदार सैन्य आणि त्यांचा निर्धार. सगळेच रसायन जबरी होते माझ्यासारख्या अंड्यातुन बाहेर येऊ पाहाणार्‍या मुलाच्या दृष्टीने.

||क्रमशः||

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

16 Sep 2013 - 11:44 pm | चित्रगुप्त

छान आठवणी.

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 6:15 am | स्पंदना

क्रमशः महत्वाचं.
किरण ठाकुरना ओळखता?

पैसा's picture

17 Sep 2013 - 8:46 am | पैसा

क्रमशः वाचून जीव भांड्यात पडला. आता हे क्रांती वगैरे खरंच वाचायला परवडत नाही.

शिवोऽहम्'s picture

17 Sep 2013 - 9:58 am | शिवोऽहम्

आधी ही अशी पुस्तकं वाचली की अगदी थरथर होत असे. ग्रेप्स ऑफ राथ वाचले आणि त्या सगळ्या डिटेलिंगने पार दबून गेलो होतो. वाचवत नव्हते आणि सोडवतही नव्हते. ताकदीचा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या अनुभवांची, प्रतिभेची धग फार जबरदस्त असते! आता थोडा निर्लेप आणि सिनिकल झालोय पण हे लोक ओढून नेतात त्यांच्या विश्वात.

फार सिनिकल व्हायला लागलं की उतारा म्हणुन दुसरी पुस्तकं आहेतच म्हणा.. आणि घरातली छोटी कंपनी!

आतिवास's picture

17 Sep 2013 - 8:51 am | आतिवास

वाचते आहे ....

आदूबाळ's picture

17 Sep 2013 - 9:31 am | आदूबाळ

पुभाप्र!

स्वाती दिनेश's picture

17 Sep 2013 - 10:13 pm | स्वाती दिनेश

आठवणींचा पसारा आवडला,
पु भा प्र.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2013 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान सुरुवात ! पुभाप्र.

मोदक's picture

17 Sep 2013 - 10:47 pm | मोदक

वाचतोय.

पुभाप्र...!

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 2:14 am | प्यारे१

मस्त.