Skip to main content

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३)

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 19/09/2013 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2) Alice! a childish story take, And with a gentle hand Lay it where Childhood's dreams are twined In Memory's mystic band, Like pilgrim's withered wreath of flowers Plucked in a far-off land.. ~Alice's Adventures in Wonderland त्या घडामोडींकडे वळण्याआधी एक दुसरा आठवणींचा, विचारांचा पसारा निवारायला हवा. लिहायला घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती हे असे गाय रिचीच्या फिल्मसारखे नॉन्-लिनिअर होईल. हा सगळा 'वर्म्स् आय व्ह्यु' बघताना थोडे मागे-पुढे व्हायचंच असं म्हणुया. मागे जाऊया जरा. कॉन्ग्रेस ही एक बाधा आहे असंच आमच्या भागात, नागपुरात, सगळे म्हणायचे. मोठमोठ्या नावांपुढे खास वर्‍हाडी हेलाने 'भोऽऽसडीचा' लावल्याखेरीज आजुबाजुचे बोलत नसत. '७७ च्या आणीबाणीत मी फारच लहान होतो आणि काही कळत नव्हतं. पण तरी नागपुरातले ते दिवस मला लख्ख आठवतात. कुंपणाचे लाकडी खांब उपटायचे आणि पेटवायचे दिवस म्हणजे होळीचे! हे समीकरण मोडलं ते त्या काळात. आमच्या घराशेजारी मा.गो. वैद्यांचे घर होते. त्या एका रात्री मोठ्ठा जमाव निषेधाच्या घोषणा, शिव्या देत, इंदिरा गांधी झिंदाबाद ओरडत आमच्या रस्त्यावर चालुन आला होता. त्यांचा रोख वैद्यांच्या घराकडे असावा. घरातुन बाहेर पडायचं नाही कोणी, असं वातावरण. फार वेळ ऐकलं, ऐकलं आणि बाबा - काका दोघे गरम डोक्याने लाठ्या घेऊन बाहेर पडले. आई, आजी हात धरून थांबवू लागल्या पण दोघे हट्टाला पेटले आणि बाहेर पडले. थोडे पुढे गेले असतील, नसतील तोच मोठा धोंडा भिरभिरत आला आणि बाबांचा हात पार फोडून गेला. रक्ताची मोठी धार लागली आणि लाठी कुठच्या कुठे उडून पडली. मारामारी झाली का नाही ते आठवत नाही. शेजार्‍यांनी, आईने हिंमत करून त्यांना आत खेचून आणलं म्हणून बरं. पण तेवढ्यावर कुठलं थांबायला? आम्ही उंदरांसारखे आतल्या खोलीत बसून होतो, डोकावुन पहात होतो. तेवढ्यात समोरच्या दाराचा अडसर फोडून एक हेऽऽ मोठा बल्ल्या (लाकडाचा सोट) घरात शिरला. वाटेतल्या वस्तु फोडाफाड करत स्वैंपाकघरात येऊन थांबला. मी आश्चर्याने सगळे बघत होतो. लोक बाहेरुन शिव्या देत होते, बाहेर तर या! म्हणत होते. पण आमच्या सुदैवाने ते आत आले नाहीत. वैद्य त्यांच्या घरात नसावेत तेव्हा. कारण काही कमीजास्त न होता लोक आले तसे शिव्या देत निघून गेले. अशा वातावरणातुन आम्ही आलेलो, कोल्हापुरात, कॉन्ग्रेसच्या चिरेबंदी गडात! दर दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत (हो! उन्हाळ्याच्या सुद्धा!) नागपुरची फेरी ठरलेली, महाराष्ट्र एक्स्प्रेस ह्या ३० तास घेणार्‍या ढकलगाडीतुन. अधेमधे ब्रेक-जर्नी. शेगाव-खामगांव, भुसावळ. मोठी गंमत यायची. '८३ च्या दिवाळीच्या सुट्टीत मला कपिल देव ह्या माणसाने केलेले पराक्रम समजले, क्रिकेट हा खेळ असतो हे समजले आणि पेपरातली चित्रे गोळा करायला सुरवात झाली. '८४ च्या दिवाळीच्या सुट्टीत मी बदललो. घडले ते असे: दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आली होती. फराळ, फटाके अशी सगळी धमाल होती. ३१ ऑक्टोबरचा दिवस काही वेगळा नव्हता. अमर-ज्योती मंगल कार्यालयाजवळ मामा रहात होता, त्याच्या घराच्या अंगणात सकाळी खेळत होतो. तेवढ्यात मामाचा साळा, अनिल, धावत घरात शिरला आणि जरा वेळानं धावत बाहेर आला. मी म्हटलं का रे अनिलमामा, काय झालं? तो दोन मिनिटं बघत राहिला आणि म्हणाला 'इंदिरा गांधींना ठार मारले रे!' कोणी मारले हे कुणाला माहित नसावे. पण प्रत्येकाला धाकधुक वाटत होती. मग मामा घाईघाईने आला आणि मला आत घेऊन गेला. त्यानंतर दुपारी बाहेर धांदल उडालेली दिसली. समोरच्या हितवादच्या ऑफिससमोर लोक गोळा झाले होते आणि माहिती मिळवायचा प्रयत्न करत होते. तोवर उडत उडत समजले होते की पंतप्रधानांना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या होत्या. बिअंतसिंह आणि सतवंतसिंह ही नावे संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी होती. ती संध्याकाळ नाही नाही त्या चर्चा करण्यात गेली. महात्मा गांधींना मारले त्यानंतर झालेले 'ब्रह्मसत्र' बर्‍याच लोकांना महितीहोते. त्याच्या कटू आठवणी निघाल्या आणि शेवटी एका विचारावर सगळे थांबले. शीखांसाठी उद्याचा दिवस काळ असणार! पण तेवढे थांबायला लोकांना वेळ नव्हता, त्याच रात्री नागपुरात एका शीख ढाबेवाल्याला जाळले, त्याच्याच बाजेला बांधुन. दुसर्‍या दिवशी तयारी जास्त 'प्रोफेशनल' झालेली असावी. शहरभर 'इंदिराजी के हत्यारों को फांसी दो, फांसी दो' असे नारे देत घोळके हिंडू लागले होते. दिसेल त्या शीखाला केस धरून, ओढून, लाथा-बुक्क्यांनी तुडवत जमाव न्याय करू लागला होता. मी स्कूटरवर मागे बसून बर्डीवर जात असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. अर्थात माझ्या लेखी तो फारसा घृणास्पद प्रकारच नव्हता त्यावेळी! कांगारू कोर्ट प्रत्येक माणसाच्या (आणि मुलांच्याही) मनात लपलेलं असतंच आणि म्हणुनच जमावाचे मानसिक वय लहान मुलापेक्षा मोठं नसतं हे मला पटतं. हा झटपट न्याय करण्याचा पायंडा आपल्याच अंगाशी येऊ शकतो हे जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा माणसाची जात सुधरेल. अर्थात हे दिवास्वप्नच रहाणार. तसा समजावायचा प्रामाणिक प्रयत्न, सर्वार्थाने, एका म्हातार्‍याने केला होता. त्याच्या मागे, नव्हे त्याच्या हयातीतच, त्याच्या विचारांचे काय कडबोळे झाले ते काय सांगायला पाहिजे? असा अनैतिहासिक दृष्टीचा ऐतिहासिक पुरुष जगात दुसरा झाला नाही असे कुरुंदकर म्हणतात, ते काही खोटे नाही. त्या प्रसंगांनी मला जाण आली. माणसे मारामारी करतात, ते मुले मारामारी करतात तसे नसते, हे प्रत्यक्ष कळाले! आजही मला वाटते की त्या अनुभवा-आधीचा आणि नंतरचा मी यात एक दरी आहे, जी सांधता येत नाही. I know it's no use going back to yesterday, because I was a different person then. पेपर, पुस्तके वाचुन जे बापजन्मात समजले नसते ते एका क्षणात समजले. मोठे व्हायची किंमत निरागसपणा, चांगुलपणाला मोठमोठे पोचे पडणे असावी ही आपली शोकात्मिका. शोकांतिका म्हणत नाही कारण नवी पिढी तो निरागसपणा घेऊन येतेच आणि चक्र चालुच रहातं. हे असंच चालु रहाणार हा ऐतिहासिक, डोळस दृष्टिकोन. पण त्या म्हातार्‍यासारखे वेडे व्हावेत, होत रहावेत. इतिहास बी डॅम्ड्! माणुसपणा त्यातच आहे. त्या मोठ्या भुकंपानंतर (डार्क पन् इंटेन्डेड) मग एकामागुन एक घटना घडायला लागल्या. पेपर्स फेथफुली गाळीव वृत्तांत सांगु लागले. गेलेल्यांचे आकडे समजू लागले. मेलेली माणसे इतरांसाठी आकडे होऊन राहिली. आकडे मनातुन झाडता येतात, नावे नाहीत. तेवढे निलाजरे आपण झालो नाही हीच समाधानाची बाब! पण खरंच एक दिवस सगळ्या मारलेल्यांचे फोटोसहित नाव/पत्ते एका पेपरात यायला हवे होते असं मला वाटतं. हजार पानी पेपर काढावा लागला तरी बेहत्तर! निदान लाज वाटुन तरी ते सगळे थांबलं असतं. बरं! कदाचित नसतंही. माणसांची लांडगेतोड होत असताना सगळ्या साक्षेपी संपादकांत एकही खमका निघाला नाही. कदाचित माझ्या वाचनात, ऐकण्यात आले नसेल म्हणुया. सारे क्षीण आवाजात हळहळत. राजा ओंगळ, नागडा आहे हे ठणकावुन सांगायचे धैर्य कोणीही दाखवले नाही. ठेचलेले लोक हंबरडा फोडत कोर्टाकडे धावले आणि नावं समोर यायला लागली. एच के एल भगत, सज्जनकुमार, राजेश पायलट, ललीत माकन, ब्रह्मानंद गुप्ता.... ललीत माकन हे शंकरदयाळ शर्मांचे जावई. अतिरेक्यांच्या गोळ्यांना नंतर बळी पडले आणि सुडाचा एक चॅप्टर संपला. पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो जवळजवळ दोन वर्षांनी. जनरल वैद्यांची पुण्यात कॅम्पात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली तेव्हा. हे सगळं तांडव सुरू असताना पंजाब बदलत होता. रिबेरोंवर प्राणघातक हल्ला झाला आणि सरकारने त्यांना बाजुला करून एक नवा पोलिसप्रमुख नेमला: के.पी.एस. गिल! गोळीला उत्तर मोठी गोळी. ईंट का जवाब़ पत्थर. एक पोलिस गेला तर मारणार्‍याचे ३ नातेवाईक गेले. मारणाराही गेला. सीमेवर कुंपण पक्कं झाल्यावर पळवाटा बंद झाल्या आणि अतिरेकी प्रेशर कुकरमध्ये सापडले. एकेक करून सारे म्होरके मारले गेले. काही कॅनडातुन पत्रकं वाटण्यापुरते राहिले, काही न्युयॉर्कच्या रस्त्यांवर निषेधमोर्चे काढुन धुगधुगी कायम ठेवु लागले. तसे काही शीख मला सॅन होजेच्या गुरुद्वारात बरेचदा दिसले होते. राज करेगा खालसा! च्या खाली भिंद्रनवालेंचा फोटो असलेला टी-शर्ट घालुन एक पिकलेला म्हातारा हळुहळु पायर्‍या चढत होता. लंगरमध्येही तो फोटो होताच आणि शेजारी गुरू गोविंदसिंहांचा! पण जेवण छान होते, कीर्तन छान होते, रागींचे गायन छान होते. केशधारी आणि मोना शीख एकत्र मिसळत होते. अमेरिकेचा मेल्टिंग पॉट सगळ्यांना घुसळून काढत होता. '८७ च्या ब्लॅक थंडर नंतर दहशतवाद पंजाबातुन खरवडून काढला गेला. '९२ पर्यंत पाळंमुळं खणून काढली गेली. त्यावेळी भारतात काय काय सुरू होतं? सुभाष घिसिंग गोरखालँड चळवळ चालवत होते. आयझॅक्-मुईवा नागांचा प्रश्न पेटवत ठेवत होते. लालडेंगा मिझो नॅशनल फ्रंट चालवत होते. मणिपुरात कांगलैपाक पार्टी सुरू झाली होती. नक्षलवाद दबा धरून होता. भोपाळ दुर्घटनेचे रामायण सुरू झाले होते. आसाम विद्यार्थी चळवळ सत्तेत आली होती. महंता आता विरोधकाच्या भुमिकेतुन राज्यकर्त्याच्या भुमिकेत आले होते. तमिळनाडुत द्रविड पार्ट्या लंकेतल्या आगीत तेल ओतत होत्या. सगळा भवताल खदखदत होता..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6354
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

वाचतोय.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत! अवांतर - बुलेट फॉर बुलेट - जे एफ रिबेरोंचे आत्मचरित्र वाचले आहे का..?

In reply to by प्यारे१

निर्वाणषटकातल्या या श्लोकाचा पाठभेद असाही आहे का? "अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् "

In reply to by शिवोऽहम्

ठाऊक नाहीये. सदा मे समत्वं जास्त सयुक्तिक वाटत असावं असं वाटतं. 'न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय:' चा नक्की अर्थ काय?

In reply to by शिवोऽहम्

"न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयः"
श्लोकात "मी" असा आहे याचे वर्णन आहे. बाकी सगळीकडे पुल्लिंगी विशेषणे इ. आहेत, सबब असंगतं च्या ऐवजी असंगतः असे पाहिजे असे वाटते. शिवाय "नैव मुक्तिर्न मेयः" मधल्या 'मेय' चा अर्थ लागत नाही. संधी इ. असेल असेही वाटत नाही. अजून इकडेतिकडे पाहतो/विचारतो, पण सकृद्दर्शनी तरी हे चूक वाटतेय.

छान लेख .... लहानपणी राजीव गांधींची हत्या झाली होती तेव्हा एक अनामिक भय सार्‍या घरावर दाटून आले होते .. आईने लहानग्यांना कुशीत घेतले होते ..आणि सर्वांना मारणारा कोणी आपल्या जातीचा असेल तर पुढे काय ?? असा प्रश्न पडला होता ...भीतीचे ते सावट आठवला की अजूनही अंगावर काटा येतो ..

तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना गालिच्याखाली सरकवून (न विसरलेले पण) सहजपणे न आठवणारे बरेच काही परत पुढे येत आहे... लिहीत रहा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना गालिच्याखाली सरकवून (न विसरलेले पण) सहजपणे न आठवणारे बरेच काही परत पुढे येत आहे... लिहीत रहा. असेच काहीसे म्हणायचे होते, ते इस्पिकचा एक्का ह्यांनी नेमक्या शब्दात व्यक्त केले आहे. स्वाती

या सगळ्या लिखाणाला कुठलं विशेषण वापरू तेच कळत नाही. यात सगळ्याच भावनांचा आपलासा वाटणारा असा पसारा आहे.

शिवोऽहम्, उत्कृष्ट लेखन आहे. आठवणी अडगळीतील असूनही धगधगत्या आहेत हे जाणवतेच. असेच आणखी वाचायला आवडेल. अवांतर : वर तुम्ही लिहीले आहे त्याप्रमाणे मी देखील "न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् " हेच सदैव वाचले आहे.

खुप खुप सुन्दर आणि रोमांच आणणारे लेखन.... आतुरतेने पुढ्च्या भागच्या प्रतिक्शेत.....

लेख फार वाचनीय आहे. 'history is bunk ' असे हेनरी फोर्ड म्हणाला होता. मी या वचनाशी सहमत नाही. आपल्या समोर प्रत्यक्ष घडणार्या गोष्टींचा अर्थ इतिहासाच्या ज्ञानामुळे आपल्याला जास्त लक्ख समजतो असे माझे मत आहे. गांधी वध, इंदिरा गांधींचे मरण आणि राजीव गांधी यांच्या हत्येच्या वेळी आपण कुठे होतो आणि काय करत होतो याची आठवण झाली. इंदिरा गांधींच्या वधा नंतर सापडेल त्या शिखाची हत्या करण्यात आली व त्या समुदायाचे होईल तेवढे नुकसान करण्यात आले. महाराष्ट्रात मात्र गांधी वधा नंतर एका विशिष्ट समाजाच्या लोन्कांच्या स्थावर संपत्तीचे नुकसान झाले आणि काही कुटुंबाना परागंदा व्हावे लागले होते परंतु त्यांना शारीरिक इजा केली गेल्याचे वाचनात नाही. याला 'सिल्वर लायनिंग टू ए डार्क क्लाउड' -असे म्हणावे काय ?

In reply to by रमेश आठवले

तशा तुरळक घटना घडल्या होत्या. माहितीतल्या एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे डोळे काढले होते, ते हिंदु महासभेशी निगडित होते असे मला समजले. त्यापुढे अनेक वर्षे जगले.

तुमच्या लिखाणाने अस्वस्थ दशकाची डायरी आठवली

तुम्हाला असं एका लाईनने जाता येणार नाहीच. बरेच फाटे फुटत आणार आहेत. तो सगळा काळ तुमच्याबरोबर परत जगत आहे. धार्मिक आणि जातीय दंगली सरकारतर्फे स्पॉन्सर्ड हे फार भयानक आहे. आणि स्वतःचा थोड्या काळासाठीचा स्वार्थ साधण्यासाठी राजकीय पुढारी भाडोत्री गुंडांकडून हे घडवून आणतात हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. शीख समाज या सगळ्यातून परत उभा राहिला आणि तोही फार कडवटपणा न ठेवता हा त्यांचा चांगुलपणा. म्हणूनच शीखांबद्दल सर्वांना प्रेमच वाटतं. निष्पाप नागरिकांना मारणे हे केव्हाही वाईटच पण आता नरेन्द्र मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे आपला हा नजीकच्या भूतकाळातला इतिहास निर्लज्जपणे विसरतात हे जास्त दु:खद आहे. सगळ्यांचेच हात काळे आहेत.

उत्तम लेखन ! पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

सगळे भाग एकदमच वाचून काढले,बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या त्याची आत्ता कल्पना आली. लिहित राहा.