"स्वामी तिन्ही जगाचा"

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
30 Aug 2013 - 4:22 pm

गोंडस रुप तुझे,
घेतले डोळ्यात भरुन।
बोबडे तेझे बोल,
ठेवले हृदयी कोरुन॥

दुडू दुडू चाल तुझी,
पायी खणकतो वाळा।
दॄष्ट लागेल म्हणोन,
लावला काजळाचा टिळा॥

चिऊ काऊचा करुन,
भरविला दुध-भात।
पोट भरताच तुझे,
धरीसी तू माझा हात॥

काम करता करता,
हाती पाळण्याची दोरी।
झोप लागावी म्हणुन,
ओवी होती ओठावरी॥

लागलास चालायला,
आंगण झाले थोडे।
होई काळ्जाचे पाणी,
जेंव्हा दॄष्टीस न पडे॥

जमविले सवंगडी,
खेळ मांडला दारात।
जेवायला किती वेळा,
बोलाविले मी घरात॥

तहाण भूक विसरुन,
खेळ खेळ्ण्यात रंगला।
लागला मित्रांचा संग,
आईलाच विसरला॥

आईविन नाही माया,
असो रंक अथवा राव।
ठेच लागताच येते,
मुखी आईचेच नाव॥

सर्व मिळेल विकत,
या मायेच्या बाजारी।
"स्वामी तिन्ही जगाचा",
आईविण भिकारी॥

...............बी.डी.वायळ

कविता

प्रतिक्रिया

psajid's picture

30 Aug 2013 - 4:53 pm | psajid

दुडू दुडू चाल तुझी,
पायी खणकतो वाळा।
दॄष्ट लागेल म्हणोन,
लावला काजळाचा टिळा॥
तुमच्या या कवितेने "लिंबलोन उतरू कशी ? असशी दूर बाळा तू ! इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू… थांब तू… " या गीताची आठवण आली. खुप छान कविता !

प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन आभार साजीदभाई.