पारदर्शक वागण्याची आंधळी स्थित्यंतरे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे
खोल गर्तेतील जाणिव उन्मळावी सारखी
संपल्यावरती पुन्हा इच्छा बळावे आणखी
सूर्य,तारे,चंद्र सारे टांगलेली झुंबरे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे
सुप्त इच्छा गुप्त होता लुप्त झाली वादळे
लाट येते लाट जाते की किनारी आदळे
वेदना,दु:खे ,निराशा माजली अवडंबरे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे
ओलसर अंतर्मनातिल पापणी तर कोरडी
धडधडत शिरते उरी संवेदना माजोरडी
पोट भरल्यावर कशाने वासरागत हंबरे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे
वादळाने वादळागत वादळावे वादळा
मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा
जीव गेला ,जावु दे त्याची कुणाला खंत रे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे
-- डॉ.कैलास गायकवाड
प्रतिक्रिया
30 Aug 2013 - 7:13 am | स्पंदना
सुरेख कविता डॉक्टर!
फक्त सुरवातीचा शब्द पारदर्शक ऐवजी पारदर्शी होउ शकते अस वाटत.
30 Aug 2013 - 8:19 am | निवेदिता-ताई
सुंदर कविता.
30 Aug 2013 - 9:13 am | चित्रगुप्त
व्व्व्व्वा.
>>वादळाने वादळागत वादळावे वादळा
मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा
जीव गेला , जावु दे त्याची कुणाला खंत रे
वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे ..
हे तर उदाहरणार्थ खासच.
30 Aug 2013 - 11:03 am | psajid
क्या बात है ! एकदम सही !
30 Aug 2013 - 1:17 pm | Bhagwanta Wayal
खुपच छान...!
30 Aug 2013 - 2:11 pm | पद्मश्री चित्रे
छान आहे कविता. खूप आवडली
30 Aug 2013 - 4:33 pm | कैलास गायकवाड
सर्व प्रतिसाद दात्यान्चा मनःपूर्वक आभारी आहे.
30 Aug 2013 - 9:57 pm | दत्ता काळे
कविता चांगली आहे.
30 Aug 2013 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त.....!