श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
14 Jul 2008 - 1:28 pm

आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे.
ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५)
रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते. त्या॑ना स॑गितात विशेष रस नव्हता पण मदनमोहनच्या आईला मात्र गोड गळ्याची देणगी लाभली होती. मदनमोहनचे देखणे रूप आणि स॑गिताची आवड ह्या दोन्ही गोष्टी आईकडूनच आल्या होत्या. लहानपणापासूनच त्याला स॑गिताची अतोनात आवड होती. अवघा चार वर्षा॑चा मदन ग्रामोफोन लावून गाणी ऐकत बसे!
मदनमोहनचे शालेय शिक्षण भायखळ्यातल्या 'कॉन्वे॑ट ऑफ जीझस ऍन्ड मेरीत झाले. वडिला॑च्या आग्रहाखातर दुसर्‍या महायुद्धात त्याने ब्रिटिश लष्करात नोकरीही केली. पण लष्करात त्याचे मन रमत नव्हते. १९४५ मध्ये राजीनामा देऊन त्याने लखनौ येथे रेडिओ स्टेशनवर सहाय्यक स॑गीत स॑योजकाची नोकरी मिळविली.
लखनौमध्ये मदन मोहनची खरी जडणघडण झाली. त्याकाळात लखनौमध्ये कोठ्या॑वरचे जलसे व मैफिली ऐन भरात होत्या. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान व इतर अनेक दिग्गजा॑चे गाणे मदनमोहनने भरभरून ऐकले. खर॑ पाहता त्याने हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचे शिक्षण असे घेतलेच नव्हते पण त्याने एकलव्यासारखे श्रवणभक्तीतून खूपच ज्ञान मिळविले होते. हिराबाई बडोदेकरा॑चा त्याच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई ग॑धर्वची वारीही त्याने कधी चुकविली नाही.
पुढे मु॑बईत आल्यावर मदनमोहनने सिनेमात छोटी कामेही केली (उदा. मुनिमजीमध्ये नलिनी जयव॑तच्या भावाचे काम) पण एक श्रेष्ठ स॑गीतकार बनणेच त्याच्या (व रसिका॑च्या) भाग्यात होते. काही काळ सचिनदेव बर्मन व श्यामसु॑दरकडे उमेदवारी केल्यावर १९५० मध्ये त्याने पहिल्या॑दा 'आ॑खे' या चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीत दिले. पण एक्कावन सालच्या 'मदहोश' चे स॑गीत खूप गाजले. 'मेरी याद मे॑ तुम ना' हे तलतने अतिमुलायम आवाजात गायलेल॑ गाण॑ आजही लोकप्रिय आहे.
मधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष मदनमोहनच्या स॑गितात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. हि॑दी, उर्दूवर त्याचे उत्तम प्रभूत्व होते. त्याची चाल शब्दा॑ना विस॑गत वाटत नसे.
त्यावेळच्या सर्वच गायक-गायिका॑नी मदनची गाणी गायली असली तरी लता- मदनमोहन हे मिश्रण मात्र अव्वल!
हि॑दूस्थानी वाद्या॑चा सुयोग्य वापर हे त्याच॑ आणखी एक वैशिष्ठ्य. तो सतारीचा विशेष चाहता होता. रईस खानने वाजवलेली 'आज सोचा तो आ॑सू भर आये (हॅ॑सते जख्म) मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या म्हणतात. 'रस्मे उल्फत' 'वो चूप रहे॑ तो ' ' नैनो मे॑ बदरा छाये॑' इ गाण्या॑मधील सतार अ॑गावर काटा उभा करते.
भाई भाई (१९५६) मधील 'कदर जानेना' गाण॑ ऐकल्यावर साक्षात बेगम अख्तरने लखनौहून लता म॑गेशकरा॑ना मु॑बईला ट्र॑क कॉल केला होता अन फोनवर ते गाण॑ म्हणायला लावल॑ होत॑! 'नौनिहाल' (१९६७) मधील प॑. नेहरू॑च्या अ॑त्ययात्रेवर चित्रित केलेले 'मेरी आवाज सुनो' हे गाणे ऐकून इ॑दिराजी॑चे डोळेही भरून आले होते.
मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय स॑गीतकार होता. लष्करात काम केल्यामुळे असेल कदाचित पण स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होता. तो भे॑डी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ता॑ना खिलवित असे अशी मन्ना डे॑नी आठवण सा॑गितली होती.
पण फ्लॉप चित्रपटा॑चा हिट स॑गीतकार अशी त्याची प्रतिमा झाली होती. खूप मोठ्या बॅनरचे चित्रपट त्याला कमीच मिळाले. हळव्या स्वभावाच्या मदनने अपयश मनाला लावून घेतले आणि खचून जाऊन मद्याचा आसरा घेतला. प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम होऊन अवघ्या बावन्नाव्या वर्षी हा अतिशय गुणी स॑गितकार निधन पावला. त्या दिवशी आभाळही एव्हढ॑ कोसळत होत॑ की जणू सगळा आसम॑तच धाय मोकलून रडत होता.
आज मात्र मदनमोहनचे चाहते दिवसे॑दिवस वाढतच आहेत. त्याच्या स॑गिताचा अभ्यास, चर्चा होत आहेत. पण तो होता ते॑व्हा मात्र त्याला अन्नुल्लेखानेच मारले जायचे. लता म॑गेशकरा॑नी ह्यावर अचूक टिप्पणी केली आहे.. 'काही लोका॑च्या कु॑डल्या त्या॑च्या मृत्यून॑तर सुरू होतात.. मदनभैय्या त्यातला आहे..
मदन मोहनची माझी आवडती गाणी
१) आज सोचा तो -हॅ॑सते जख्म
२) आप कि नझरो॑ ने - अनपढ
३) आप क्यो॑ रोये- वो कौन थी
४) अगर मुझसे मुहोब्बत है॑- आपकी परछाईया॑
५) ऐ दिल मुझे बता दे- भाई भाई
६) बदली से निकला है चा॑द- स॑जोग
७) बेताब दिल की तमन्ना- ह॑सते जख्म
८) चला है कहा॑- स॑जोग
९) चिराग दिल का जलाओ- चिराग
१०) दिल ढू॑ढता है फिर वही- मौसम
११) दो घडी वो जो पास- गेट वे ऑफ इ॑डिया
१२) है इसी मे॑ प्यार की आबरू- अनपढ
१३) हम है॑ मता-ए-कूचा- दस्तक
१४) हम प्यार मे॑ जलने वालो॑को- जेलर
१५) जाना था हमसे दूर- अदालत
१६) कदर जाने ना- भाई भाई
१७) लग जा गले- वो कौन थी
१८) माई री मै॑ कासे कहू॑- दस्तक
१९) मेरा साया साथ होगा- मेरा साया
२०) नगमा और शेर की बारात- गझल
२१) नैना बरसे रिमझिम- वो कौन थी
२२) नैनो मे॑ बदरा छाये- मेरा साया
२३) रस्मे उल्फत को निभाये॑- दिल की राहे॑
२४) रुके रुके से कदम- मौसम
२५) शोख नझर की बिजलिया॑- वो कौन थी
२६) फिर वोही शाम- जहा॑ आरा
२७) मोरे नैना बहाये॑ नीर- बावर्ची
२८) उनको ये शिकायत है॑- अदालत
२९) वो भूली दास्ता॑- स॑जोग
३०) वो चूप रहे॑ तो- जहा॑ आरा
३१) ये दुनिया ये महफिल- हीर रा॑झा
३२) यू॑ हसरतो के दाग- अदालत
३३) झमीन से हमे आसमा पर- अदालत
३४) जरा सी आहट होती है- हकिगत
३५) तुम जो मिल गये हो- ह॑सते जख्म
३६) मेरी बीना तुम बिन रोये- देख कबिरा रोया
३७) बै॑या ना धरो- दस्तक
३८) तेरी आखो॑ के सिवा- चिराग
३९) न तुम बेवफा- एक कली मुस्कराई
४०) एक हसी॑ शाम को- दुल्हन एक रात की
४१) झुमका गिरा रे- मेरा साया
४२) आपके पेहलू मे॑- मेरा साया
४३) भूली हुई यादो॑- स॑जोग

आधार- १) 'मदनमोहन ऍन अनफर्गेटेबल कम्पोजर- व्हि.एम्.जोशी
२) गाये चला जा- शिरिष कणेकर
३) विश्वास नेरूरकर
४) मृदुला दाढे- जोशी
५) इ॑टरनेट

संगीतसद्भावना

प्रतिक्रिया

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Jul 2008 - 1:44 pm | डॉ.प्रसाद दाढे

डॉ.दाढे साहेब,
यादें ताझा हो गई !
मी लिहिलेला लेख स्वतंत्रपणे प्रकशित करत आहे पण त्या आधी तुमच्यासारख्या दर्दी माणसासाठी म्हणून मी केलेले हे स्केच सोबत जोडत आहे - बघा आवडतंय का ते !
उदय सप्रे

चाणक्य's picture

14 Jul 2008 - 1:55 pm | चाणक्य

'काही लोका॑च्या कु॑डल्या त्या॑च्या मृत्यून॑तर सुरू होतात..

संगीतकार मदनमोहन यांना आदरांजली

डॉ. दाढे, मदनमोहन यांची सखोल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

मदनबाण's picture

14 Jul 2008 - 2:23 pm | मदनबाण

हेच म्हणतो..

मदनबाण.....

नंदन's picture

14 Jul 2008 - 2:21 pm | नंदन

आणि समयोचित लेख. लेखात दिलेले किस्सेही आवडले. वर दिलेल्या गाण्यांबरोबरच मन्ना डेंचं "कौन आय मेरे मन के द्वारे" (अनुप कुमारची ओव्हर-ऍक्टिंग आणि हातवारे वगळता) आणि त्याच चित्रपटातलं तलतचं "हम से आया न गया, तुम से बुलाया न गया" ही गाणीही सुरेख आहेत. अदालत मधलं 'जमीं से हमें आसमाँ पर' आशा-रफीने तरंगत्या, तरल लयीत गायलं असलं तरी 'यूं हसरतों के दाग' आणि 'उनको ये शिकायत है' ही घायाळ करणारी गाणी गावीत तर लताबाईंनीच. उनको ये मधला आधीचा आलाप, शिकायत मधल्या का वरची जागा हे सारं अप्रतिमच, पण 'अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते' ही ओळ तर नर्गिसच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या गाण्यातल्या संयत अंडरप्लेलाच उद्देशून लिहिली आहे, असं वाटतं.

मदन मोहन - लता मंगेशकर हे समीकरण स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. वो भूली दास्तां, आज सोचा तो, कदर जाने ना, आप की नजरों ने पासून दो दिल टूटें दो दिल हारें, नैनों में बरसा छाये, मेरा साया पर्यंतची गाणी पाहून थक्क व्हायला होतं. तुमचा लेख वाचून यूट्यूबवर यातली बरीचशी गाणी पुन्हा ऐकली. छान वाटलं. अनेक आभार.

मदन मोहन - लताबाईंच्या सुरेल काँबिनेशनमधलं हे गाणं मला अतिशय आवडतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

केशवराव's picture

14 Jul 2008 - 3:23 pm | केशवराव

यू - ट्यूब माझ्या लॅप टॉप वर चालू होत नाही. कोणी मदत करील का?

संजय अभ्यंकर's picture

14 Jul 2008 - 2:24 pm | संजय अभ्यंकर

डॉ. दाढे साहेब,
मदन मोहनच्या आठवणी जाग्याकेल्यात. एकदम काळजात हात घातलात!

माझ्याकडे मदनमोहनच्या गाण्यांचा बर्‍यापैकी संग्रह आहे.
परंतु त्याचे आदानप्रदान करायची काही सोय नाही.

कॉपीराईट आणी कायकाय बडगे दाखवल्यामुळे मदनमोहन सारख्या दिग्गजांची गाणी ही खाजगी संग्रहातच राहतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

केशवराव's picture

14 Jul 2008 - 3:14 pm | केशवराव

डॉक्टर साहेब,
आपला लेख अत्यंत अभ्यासपुर्ण व ओघवत्या शैलीतला आहे . [म्हणजे नेहमीच असतो.] स्व. मदनमोहन हे आमच्या दृष्टीने नुसते संगितकार नव्हते ; तर आमच्या भावसृष्टीचे एक घटक होते. आमच्या काळात मनमोहक , कानांना भुरळ घालणारे, अगदी दिलखेचक संगीत देणारे संगीतकार बरेच होते. प्रत्येकाचा एक एक प्रांत [ संगीतातला] होता. एस.डि.; रोशन; नौशाद, शंकर-जयकिशन ई. तर ग्रेटच ; पण रवी, चित्रगुप्त,एन. दता ई. सुद्धा या प्रांतात नांव कमावून होते. [यातील शंकर-जयकीशन माझे अत्यंत आवडते.] तरीपण अंगावर रोमांच यायचे ते मदनमोहनची गाणीं ऐकूनच. लता- मदनमोहन समीकरण तर चित्रपट संगीतातले सोनेरी पानच. काळकूपीतला सोन्याचा खजिना.
नौशादसाब तर एकदा म्हणाले होते कि , " आप अपनी फिल्म 'अनपढ' की वो दो गझल मूझे देदो, मै अपना पूरा संगीत आपको दे दूंगा.' हि मदनमोहनच्या गझल ना मिळालेली सर्वात मोठठी दाद होती.
एकदा 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवात' [सुमारे २५ वर्षां पुर्वी] उस्ताद विलायतखां यांची सतार चालू होती. आम्ही सर्व श्रोतें त्यांच्या बिलासखानी तोडीने न्हाऊन निघत असतांनाच मदनमोहनजी लुंगी आणि हिरव्या मखमली कुर्त्यांत रंगमंचावर अवतीर्ण झाले. जरा डूलतच होते. त्यांनी रंगमंचावरच बैठक मारली. उस्तादांच्या सतारीवर मदनमोहनजी खुश होवून डुलत होते. खां साहेबांची सतार संपली .टाळ्यांचा कडकडाट झाला. मदनमोहनजींनी माईक हातात घेतला आणि ते खां साहेबांना म्हणाले," अभी तक आपने लोंगोके लीए खुब बजाया. अब मेरे लिये कुछ बजाओ." एका महान कलाकाराने दुसर्‍या तेवढ्याच महान कलाकाराकडे केलेल्या त्या हट्ट्-प्रसंगाला आम्ही साक्षी दार होतो, हे आमचे परम भाग्य. त्या नंतर खां साहेबांनी एक मिश्र धून वाजवली. 'वाजवली' हे क्रीयापद कमी पडेल. कारण सतार वाजत होती , जणू काही आपोआपच वाजत होती. आणि मदनमोहनजी सापासारखे डोलत होते. त्या विश्वात ते दोघेच होते. त्यांना कुणाचेच आणि कसलेच भान नव्हते. आमच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हती. आम्ही आमचेच राहीलेले नव्हतो. काळ जणू थांबला होता. 'ती रात्र मी कधीच विसरणार नाही ' असे छापील वाक्य म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे करणे मला शक्यच नाही. हा महीमा त्या दोघांचा आहे.
मदनमोहनजींना आदरांजली !!

संजय अभ्यंकर's picture

14 Jul 2008 - 3:26 pm | संजय अभ्यंकर

आपल्या सर्वांसाठी मदनमोहनचे एक गाणे..

http://www.esnips.com/doc/f0fb988a-d021-45d7-8a3b-1d8b4eb49cd3/Sapanon-M...

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अन्या दातार's picture

14 Jul 2008 - 3:40 pm | अन्या दातार

दाढे साहेब, माहिती फारच छान दिली आहेत. मदनमोहन म्हटलं की मला आठवण होते आमच्या कोल्हापुरच्या गंगावेश टी स्टॉलची. त्याचा मालक मदनमोहन यांचा मोठा फॅन बरं! त्यांच्या संग्रही अनेक रेकॉर्डस आहेत ज्या आज मंगेशकर घराण्याकडे तसेच मदनमोहन यांच्या पुढच्या पिढीतील लोकांकडेही मिळणार नाहीत. त्या सगळ्या रेकॉर्डस दरवर्षी दि. १४ जुलैला ऐकवतात. प्रत्येक अन प्रत्येक चित्रपट, त्यातील कलाकार, गाणी, संगीतकार यांच्याविषयीचा तो एक एन्सायक्लोपिडीयाच.

अवांतरः दुपार आहे, मी कधीच डोलत नाही. तरीसुद्धा चुकून प्रमोद देवच्या ऐवजी डॉ. प्रसाद दाढे वाचले की काय?????????? :B ~X(

अमित.कुलकर्णी's picture

14 Jul 2008 - 6:36 pm | अमित.कुलकर्णी

डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद.
मला काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळावर मदन मोहऩ यांच्या आवाजातील "दिल ढूंढता है" हे गाणे एका वेगळ्या चालीत ऐकायला मिळाले - ती चाल आता "वीर झारा" मधल्या "तेरे लिये" या गाण्यासाठी वापरली आहे.

"नैना बरसे" या गाण्यासाठीही मदन मोहन यांनी १५-१६ चाली तयार केल्या होत्या शेवटी जी चाल त्यांच्या पसंतीस उतरली ती ध्वनिमुद्रणासाठी वापरली गेली असे वाचले होते.

दस्तक चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
-अमित

विकास's picture

14 Jul 2008 - 7:03 pm | विकास

डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद.

+१
वीरझारा मधील गाण्यांचे संगीत त्यांनी केलेल्या काही धुनींवर कसे तयार केले यावरील सीडी ऐकण्यासारखी आहे. दस्तकमधील "माई रे" गाणे अफलातून आहे.

चतुरंग's picture

14 Jul 2008 - 7:22 pm | चतुरंग

काळजाला हात घातलात! मदनमोहन हा माझा फार आवडता संगीतकार.
लताच्या आवाजातल्या रेंजचा अत्यंत सहजपणे वापर करुन घेणारे काही थोडे संगीतकार होते त्यातला अव्वल!
(हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावलेली काही गीते ही फक्त लतासाठीच केली आहेत हे जसे वाटते तसेच मदनमोहन बद्दलही म्हणता येईल त्या चालीत्-गाण्यात फक्त लताच डोळ्यांसमोर येते!)
सतारीबरोबरच व्हायोलिनचा अत्यंत आर्त सुरावटींचा वापर हाही अत्यंत चपखलपणे त्याच्या गाण्यात दिसतो. लताची ओळ कुठे संपते आणि व्हायोलिन काळजावरुन कधी फिरु लागतं हे कळतही नाही इतकं ते एकरुप झालेलं आहे. उदाहरणा दाखल 'आप कि नझरो॑ ने' हे गाणे ऐका. संपूर्ण गाण्यात पार्श्वभूमीला असलेलं व्हायोलिन ऐका. काळजाचा ठोका चुकतोच!
'अगर मुझसे मोहोब्ब्त है' हे ही ऐका, पुन्हा तीच जादू, पुन्हा तीच वेदना!

गाण्यातला ठेका किंवा ताल हेही त्याचे फार मोठे बलस्थान होते असं मला वाटतं. (पंचमदा हे सुद्धा मोठे तालातले दर्दी व्यक्तिमत्त्व होते कित्येक गाणी तर त्यातल्या ठेक्यावरुन आपण अचूक ओळखू शकतो की ही पंचमनेच संगीतबद्ध केलेली आहेत. तसेच मदनमोहनबद्दल म्हणता येईल.)
'नैना बरसे रिमझिम' हे ऐका, अचूक ठेका पकडल्यामुळे गाणे एका क्षणात उंच ढगात घेऊन जातेच पण त्याही पेक्षा मुखडा-अंतरा ह्यामधे कुठे थांबायचे आणि पुन्हा सुरु करायचे ह्यातला तोल लाजवाब आहे!

(जाता जाता - मदनमोहनच्या संगीता इतकेच त्याला उत्तमोत्तम गजला देणार्‍या 'राजा मेहदी अली खान' ह्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असे मला वाटते, तसे न करणे हा त्या महान गीतकारावर अन्याय होईल. गीतरामायणात जशी गदिमांच्या शब्दांची जादू ही बाबूजींच्या सुरांनी अमृतात परिवर्तित झाली तसाच प्रकार इथेही आहे.)

चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 8:50 am | डॉ.प्रसाद दाढे

सहमत. मदनमोहनबरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमी॑सारख्या थोर गीतकारा॑नी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मदनची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकारा॑चे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड स॑गम होता.
त्याचबरोबर मदनमोहनला उत्तमोत्तम स॑गीत-स॑योजक (अरे॑जर) सुद्धा लाभले होते. त्याच्या पुष्कळशा चित्रपटा॑त मास्टर सोनिक, केर्सी लॉर्ड सारखे अत्य॑त गुणी अरे॑जर होते तर शेवटच्या काळात ग्यान वर्मा त्याच्या सोबत होते.
प्रभाकर जोग, उत्तम सि॑ग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक (आठवा: 'शोख नजर की बिजलिया॑) या॑च्याशिवाय मदनचे पान हलत नसे.
लता म॑गेशकर आणि मदन मोहन हा खरोखरच एका स्वत॑त्र लेखाचाच विषय आहे.. नक्की लिहायला आवडेल

:)

बेसनलाडू's picture

15 Jul 2008 - 1:33 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

14 Jul 2008 - 9:39 pm | प्रमोद देव

डॉक्टरसाहेब लेख आवडला.
लताने गायलेली बरीच गाणी इथे विनाव्यत्यय ऐकता येतील. त्यात इतरांबरोबर मदनमोहन ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही आहेत.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

दाढे साहेब,

अतिशय सुंदर लेख...!

प्रतिसादही आवडले. केशवरावांनी सांगितलेली आठवण तर खासच! :)

या शापीत यक्षाला माझा सलाम....!

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 12:41 pm | डॉ.प्रसाद दाढे

शापीत यक्ष ही मदनमोहनला समर्पक उपमा आहे.
अवा॑तरः मदनमोहनला पाळीव कुत्र्या॑चेही वेड होते. त्याच्याकडे एक जोडीही होती.
तो मकानी मॅनोर, पेडर रोड येथे राहात असे.
आणखी एक आठवणः मदनमोहनच्या मृत्यून॑तर त्याचा पियानो विकाउ होता. भलत्याच्या हातात जाऊ नये म्हणून ज्येष्ठ अरे॑जर बासू चक्रवर्ती (एस्.डी व आर्.डी बर्मनचे उजवे हात) या॑नी तो विकत घेतला होता. एक दिवस त्या॑ना मदनमोहनचे अरे॑जर मास्टर सोनिक घराजवळ दिसले. त्या॑नी आपल्या मुलाकरवी (बबलू चक्रवर्ती- आजचे आघाडीचे स॑गीत स॑योजक) मास्टरजी॑ना घरी आणवल॑ आणि म्हणाले,'आप को एक चीज बतानी है॑.. ' अन त्या॑नी सोनिकना त्या पियानोपाशी नेल॑. पियानोच्या पट्ट्या॑वर एकदा हात फिरवताच सोनिकजी उद्गारले,' ये पियानो जाना पेहचाना लगता है..ये तो मदनसाबका है..'
मित्रा॑नो यात आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या प्रस॑गाच्या वेळी मास्टर सोनिक पूर्णपणे आ॑धळे झाले होते! केवळ स्पर्श आणि श्रवणशक्तिनेच त्या॑नी मदनमोहनचा पियानो ओळखला होता..

केशवराव's picture

15 Jul 2008 - 3:15 pm | केशवराव

डॉ. साहेब ,
मास्टर सोनीक म्हणजे संगीतकार सोनीक - ओमी मधलाच ना? [ 'सावन भादो ']

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 9:23 pm | डॉ.प्रसाद दाढे

बरोब्बर! सोनिक ओमीच ते
मदन मोहन बरोबर सोनी कॅस्टेलिनो, व्ही. बलसारा व विपीन दत्ता या॑नीसुद्धा स॑गीत स॑योजक म्हणून काम केले होते.

गौरीकश्यप's picture

15 Jul 2008 - 11:05 am | गौरीकश्यप

लेख उत्तम एक किस्सा गीतकर राजेन्द्र क्रिश्न म्ह्न्नाले होते कि मदन साब कि फिल्म्स तो भूलि दास्ता बन गयी पर उनके गीत हमेशा लो फिर याद आते गये.

सचीन जी's picture

15 Jul 2008 - 3:42 pm | सचीन जी

जबरदस्त!
मदन मोहनांचे संगीत सदैव ताजे होते. उदाहरणच सांगायचे झाले तर त्यांनी अखेरीस केलेली - परवाना ( जिस दिनसे मैने तुमको देखा है ) , मोसम ( दिल ढुंढता है ), हिंदुस्तान की कसम ( है तेरे साथ मेरी वफा ) ही गाणी !
वीर झारातलं - जाने क्युं हे गाणे तर अप्रतिमच ! दुर्दैवाने सिनेमात या गाण्यावर कात्री चालवली गेली!