प्रथम तुजं पाहता........!!!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
25 Jul 2013 - 9:36 am

एका ऑस्ट्रेलिअन शॉर्ट स्टोरीवर आधारित.
मुळ कथा Hate at First Sight , Kathy Lette

[मानवी मनाच्या अनेक कंगोर्‍यापैकी हा एक कंगोरा! सहसा न चर्चीलेला, पण का कुणास ठाउक; ऑस्ट्रेलिअन लिटरेचर मध्ये मी अश्या दोन चार कथा वाचल्या. आपल्या "ताई" या संज्ञेला तडा देणार्‍या या कथा वाचुन त्यावर आधारित काही लिहावं अस वाटल खरं,पण खरच आपल्या संस्कृतीत असुनही नसलेला असा हा कंगोरा आहे. मी ही या कंगोर्‍याची सांगड आपल्या भाषेत मांडु नाही शकले. म्हणुन मुळ कथेच्या स्वैर अनुवादाचा हा प्रयत्न! गोड मानुन घ्याल अशी आशा.]

"सुझी....?" आश्चर्याने काठोकाठ भरलेल्या त्या हाकेसरशी चेलोची भली मोठी केस गाडीच्या डिकीत ठेवत असलेली सुझी अक्षरशः धपकन पडणारच होती. त्या सेलोचा आकार, त्यात तिचे स्वतःचे आकारमान, अन अवचीत आलेल्या त्या हाकेने गर्र्कन वळायचा तिचा प्रयत्न, या सगळ्या गणिताचे उत्तर फक्त तिच्या पाय पसररुन पडण्याकडेच नेत होते. स्वतःला कसबस सावरत सुझीने कॅरोलिनकडे नजर वळवली. पुन्हा एकदा कॅरोलिन; तिची मोठी बहिण तिच्यासमोर उभी आहे हे मनापर्यंत पोहोचायच्या आधी तिच्या नजरेने समोर उभे असलेले ते शीडशीडीत, सुडौल सुंदर व्यक्तीमत्वच टिपल. स्वतःशीच उसासत तिने आता मोठ्या बहिणीवर लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न केला.
आपल्या हाय हिल्सवर टकटक चालत कॅरोलिन अगदी हक्काने तिच्या गाडीपर्यंत पोहोचली. सुझीच्या हातातली अवजड चेलो केस ओढुन घेत तिने ती जमिनीवर आदळली. "कुठे? कुठे चालली आहेस आता तू? "गाडीत मागच्या सिटवर असलेली सुझीची भली मोठी ट्रॅव्हलिंग बॅग आता तिला दिसली. चेहर्‍यावर नाराजी अगदी अशी ओसंडुन वाहु लागली तिच्या.
आता सुझीला अगदी म्हणजे अगदी कानकोंड झालं. आपण काही फार मोठा अपराध करत आहोत अस आता तिला अगदी मनःपुर्वक वाटु लागलं. पण मग, गेले १५ दिवस तिने या विषयावर केलेले चिंतन अखेरीस तिच्या कामी आले. मनाचा सारा निर्धार एकवटुन तिने कॅरोलिनच्या हातातली चेलो केस काढुन घेतली अन कारच्या डिकीत व्यवस्थीत ठेवायला सुरवात केली. तिचा तो अविर्भाव पाहुन, नाही म्हंटल तरी कॅरोलिन जरा वरमलीच. "सुझी...." आवाजात किंचीत नरमाई आणत तिने विचारले, "अग्..काय हा खुळेपणा? कोठे निघाली आहेस तू?"
" हे बघ कॅरी, इथे मला भवितव्य नाही. मी सिडनी सोडुन चालले आहे." सुझीने अगदी निर्णायक आवाजात सांगितले.
"हं!" कॅरोलिन उसासली. या सुझीला कधी समजणार असा प्रश्न तिला मनोमन पडला
" अग पण, अस काय घडलं की तू सिडनीवर राग काढावास?"
"काय घडायला हवय? काही घडतच नाही आहे हेच तर माझ्या जाण्याचे कारण आहे." सुझी उसळुन म्हणाली
कॅरोलिनच्याही चेहर्‍यावर राग, नाराजी उमटली. ही तिची लहाण बहिण! अन तिचे हे पुरुषसंगाचे वेड! कधी समजणार आहे ह्या वेडीला देव जाणे.
"अग! तू जरा वजन कमी कर! सहज मिळुन जाइल तुला कोणीही इथेच. त्या साठी एव्हढा स्वतःचा ठावठिकाणा कशाला सोडायला हवा?"
" हो! मिळतील ना!" सुझी फुत्कारली, " पण ते टिकतील जोवर तू भेटत नाहीस तोवरच. त्या नंतर ते कुठे हवेत गायब होतात, की त्यांना जमिन गिळते देव जाणे!"
कॅरोलिन थोडीशी वरमली. "अग त्यातला एकही तुझ्या लायकिचा नव्हता." ती अजीजीने म्हणाली, " भेटेल ना! भेटेल तूला कोणी ज्याला तुझी किंमत असेल, तोवर तू थोडा दम धरायला हवा."
सुझन कॅरीपेक्षा एक वर्षाने लहाण! अगदी बालपणापासुन कॅरीने आपल्या या बाळसेदार बहिणीला जळीस्थळी सांभाळले होते. शाळेत सुद्धा कायम तिच्या अवतीभोवती असायची ती. जे तिला जमणार नाही त्यापासुन तिने कायमच तिला दुर ठेवले. शाळेच्या मैदानावर बाकिची मुले चिडवतात म्हणुन सुझीला चेलो शिकायलापण प्रोत्साहन द्यायला कॅरीच तर पुढे होती. अगदी दोन वर्षापुर्वी त्यांची आई वारली तेंव्हा सुझीला कायम सांभाळेन अस वचन तिने आईला दिले होते. शिक्षणात जास्त गती नाही तर बाकिचे छोटे मोठे जॉब्ज करायचा सल्लाही तिनेच तर दिला होता सुझीला. जर कॅरी नसती तर बिचार्‍या सुझीच काय झाल असत?
मग सुरु झाले यौवनाचे दिवस. अगदी शाळेपासुन जर कुणी एखादा मुलगा अथवा तरुण सुझीच्या चेलो वाजवण्यावर, तिच्या बुद्धीमान वक्तव्यावर ,(सुझी डीबेटींग मध्ये कायम पुढे असायची, पण त्यामुळे माणसाचा स्वभाव वादावादीचा, भांडखोर होतो अस कॅरीच म्हणन ऐकुन आईने तिला डीबेट्मधुन काढुन टाकल होत) भाळुन जर घरी आला, तर तो दुसर्‍या दिवसापासुन फक्त आणि फक्त कॅरीच्याच मागे हिंडायचा.
सुझी पुन्हा एकदा उसासली. वीतभर कमरेची ५ फुट ९ इंच उंचीची ही कॅरी होतीच तशी सुंदर. सुवर्ण कांती, निटस जिवणी, किंचीत निळसर झाक असणारे तिचे डोळे, चेहर्‍याला शोभेल असा क्युट ब्लंट! पाहणार्‍याच भान हरपायच पहाता पहाता! त्यात ती बॅकिंगमध्ये उत्तम करीअर करुन होती.
त्या दोघींच्यात बहिणी म्हणुन जराही साम्य नव्हते राखले देवाने. सुझी मेणाहुन मऊ स्वभावाची, तर कॅरी जणु एक रसरशीत लाव्हा! सुझीच लक्षणीय जडत्व, तर चटपटीत कॅरी! हुषार कॅरी! शहाणी कॅरी! व्यवहारी कॅरी! अन प्रत्येक गोष्टीत उजवी कॅरी! तिने ठरवले असते तर चेलो वाजवणेही काही अवघड नव्हते तिला, पण अभ्यासाचा एव्हढा ताण होता तिच्यावर की तिने चेलो तिच्या बहिणीसाठी सोडुन दिला. अन त्यासाठी सुझी खरच मनापासुन कृतज्ञ होती.
" किती वाट पहायची मी? आज मी ३८ वर्ष पार केली. माझ्या शरीरातली प्रजनन क्षमता मला आणि जास्तीत जास्त दोन वर्षे साथ देइल, मग ती ही हात टेकेल माझ्या पुढे. मला घर हवय माझ स्वतःच!" सुझी रडवेली झाली, " एक कुटुंब हवय माझं! एखादा साधासाच माणुस, एखादं गोंडस छोटुलं........."
"अन हे तूला सिडनी सोडल्यावर मिळायच आहे?" कॅरी ताडकन म्हणाली. "कोण देणार आहे हे सगळ तुला? मला सोडुन तू कुठे जाणार? कोण काळजी घेइल तूझी? सोड हा मुर्खपणा, अन चल घरात! मला काहीही न कळवता तू हे असले वेडाचार करुच कशी शकतेस? आपण पहिला शांतपणे बोलु या विषयावर."
बोलणे! तेच तर टाळत होती सुझी! कॅरोलिन अगदी बघता बघता सुझी कशी वेडी आहे, तिच म्हणनं कस चुकीचे आहे हे सुझीलाच पटवु शकत होती. मुर्ख सुझी फक्त कॅरोलिन ऐनवेळी अन वेळोवेळी तिच रक्षण करत होती म्हणुन या जगात टिकुन होती, नाहीतर तिची कधीची वाट लागली असती. पण आज सुझीने अगदी ठरवल होतं. जे होइल ते माझ्यामुळे, चांगल घडो वा वाईट ! माझी मी जबाबदार! अर्थात यातुन काही चांगल घडेल याची तिला स्वतःलाही खात्री नव्हतीच पण आता हे असह्य झाल होत. आयुष्यात निदान एक पाउल तिला स्वतःच्या जोरावर, स्वतःच्या निर्णयावर टाकायच होतं.आज ती परतुन घरात गेली तर परत बाहेर पडु शकणार नव्हती. गेले १५ दिवस तिने हाच एक विचार करण्यासाठी घेतले होते.
" मला काहीही बोलायच नाही आहे, मला जाउ दे " सुझी विलक्षण शांतपणे म्हणाली. तिने तिच्या सेकंड हँड कारच दार उघडलं अन स्वतःला ड्रायव्हर सीटमध्ये कोंबल.
तिच्या त्या एकदम शांत आवाजाने आता कॅरी भानावर आल्यासारखी झाली. सुझी थांबणार नाही हे तिच्या लक्षात आलं. "पण तू चालली कोठे आहेस ते तरी सांगुन जा!" आपल्या लहाण बहिणीच्या काळजीने तिचा चेहरा विवर्ण झाला. "कोण आहे आपल्या दोघींना एकमेकाशिवाय रक्ताचं?"
"तुला, तुझे करीअर, तुझा बॉयफ्रेंड आहे. नसेल तर फक्त मलाच कुणी. " सुझनचे शब्द आता जरा धारदार झाले होते.
"ठिक आहे. " कॅरीने माघार घेतली, "पण असं कोण बसलय तुझ्यासाठी घर अन संसार तयार घेउन ते तरी सांग." नाही म्हंटल तरी कॅरीच्या आवाजात उपहास उमटलाच.
"अॅलीस स्प्रींग!"
"काय? वाळवंटात? कोण आहे हा ठग?" कॅरी किंचाळलीच. आईची सारी इस्टेट तिने तिच्या लहाण बहिणीला मोठ्या उदार मनाने देउ केली होती. म्हणजे नावावर नव्हती केली, पण काढुनही नव्हती घेतली. सुझी रहात होती ते घर त्यांच्या आईचे होते. अन या सिडनीच्या उपनगरातल्या घराची किंमत काही साधीसुधी नव्हती. जो कोणी या मुर्ख सुझीला नादाला लावतोय , त्याचा डोळा या इस्टेटीवरच असणार! दुसर आहे काय या पोरीत?
"कोणीही नाही आहे." सुझी शांतपणे म्हणाली. "१५ दिवसांपुर्वी अॅलीस स्प्रिंगच्या मेयरची पेपरात जाहिरात आली होती. अॅलीस स्प्रिंगच्या तरुणांना मुलीच मिळत नाही आहेत. म्हणुन उपवर तरुणांसाठी त्यांनी दोन दिवसांनी उपवर तरुणींच गेट टुगेदर ठरवलं आहे. मी माझं नशिब त्यात आजमावुन पहायच ठरवलय. काय घडेल ते घडेल. अन जे घडेल त्याचा दोष फक्त माझा असेल. मी घराचे पेपर्स अन किल्ली तुला दोन दिवसापुर्वीच पोस्टाने पाठवली आहे, मिळेल आज उद्या. माझ सामान म्हणजे माझे कपडे, माझ्या म्युझिक सिडीज अन हा चेलो, तेव्हढच, फक्त तेव्हढच घेउन चाललेय मी. अन याच्यावर तुझा काहीही आक्षेप असण्याचे कारण नाही. "
"अग! मी तसं नव्हते म्हणतं. " खरतर कॅरोलिन हादरलीच होती. "हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण आपली, म्हणजे मला नकोच आहे ती, तुझ्यासाठीच आहे ती, इस्टेट जर बळकावायला जर कोणी तुला नादाला लावेल तर? मग तुझ्याकडे काय रहाणार? असा विचार करुन मी म्हणत होते."
"आता ती इस्टेट तुझ्याकडे आहे तेंव्हा माझा रस्ता सोड!" सुझीने कार सुरु केली.
" हे बघ! अजुन वेळ गेली नाही....." कॅरी तिच्या कारच्या पुढ्यात उभी राहिली, पण सुझीने रिव्हर्स मारत गाडी मागे घेउन झटक्यात ड्राइव्ह वे सोडुन लॉन मध्ये घातली अन, आरामात नेचर्स स्ट्रीप वरुन रस्त्याला लावली सुद्धा.

(क्रमश: )
__/\__
अपर्णा

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

25 Jul 2013 - 9:49 am | यशोधरा

वाचतेय..

रुमानी's picture

25 Jul 2013 - 9:53 am | रुमानी

पुढचा भाग लवकर येउ देत...

भावना कल्लोळ's picture

25 Jul 2013 - 6:32 pm | भावना कल्लोळ

मस्त...

आतिवास's picture

25 Jul 2013 - 10:41 am | आतिवास

विषय वेगळा दिसतोय. वाचतेय.

कवितानागेश's picture

25 Jul 2013 - 11:11 am | कवितानागेश

हम्म... इन्ट्रेस्टिन्ग.

स्वाती दिनेश's picture

25 Jul 2013 - 11:19 am | स्वाती दिनेश

हा भाग आवडला.
पु भा प्र,
स्वाती

बॅटमॅन's picture

25 Jul 2013 - 11:51 am | बॅटमॅन

रोचक!! ताईपणाच्या भानगडीत सूझी खुरटलेलं झुडूपच राहिली हे तर दिस्तंच आहे.

दादा कोंडके's picture

25 Jul 2013 - 11:59 am | दादा कोंडके

उत्तम सुरवात

प्रभाकर पेठकर's picture

25 Jul 2013 - 1:34 pm | प्रभाकर पेठकर

बाह्यरुपावर भाळून किंवा आज ह्या तरूणीच्या मागे तर लगेच उद्या त्या तरूणीच्या मागे अशा भ्रमरवृत्तीचे तरूण तिच्या आयुष्यातून दूर गेले ह्यात खरेतर सुझीने दैवाचे आभार मानले पाहिजेत.
अडतीस वर्षांच्या आयुष्यात एक चेलो (वाद्य असते का?) वाजविण्यापलीकडे व्यक्तिमत्त्व विकास करण्याचा किंवा शारीरीक विकास रोखण्याचा तिने प्रयत्न केल्याचे दिसत नाही. ही तिचीच चुक. तरी पण, स्थूल मुलींनाही (स्थूल) तरूण मिळतातच. तिने एवढे निराश का व्हावे समजत नाही. कदाचित कॅरोलीनला वाटते तशी सुझीची अपरिपक्वता असेल. त्यासाठी स्थानबदलाचा निर्णय मनाला तितकासा पटत नाही.

"हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण.....

हे वाक्य एक स्त्री दुसर्‍या स्त्रीस उद्देशून म्हणते आहे, तेही स्वतःच्या लहान बहिणीला, हे पाहता सुझीचा निर्णय, कॅरोलिनापासून दूर राहण्याचा, योग्यच म्हणावा लागेल.

कथा, क्रमशः असल्याने पुढील भागात कांही प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटते आहे.

दादा कोंडके's picture

25 Jul 2013 - 7:32 pm | दादा कोंडके

बाह्यरुपावर भाळून किंवा आज ह्या तरूणीच्या मागे तर लगेच उद्या त्या तरूणीच्या मागे अशा भ्रमरवृत्तीचे तरूण तिच्या आयुष्यातून दूर गेले ह्यात खरेतर सुझीने दैवाचे आभार मानले पाहिजेत.

झालेल्या गोष्टीबद्दल उगाच एक समाधान वाटून घेण्यासाठी ही सबब छान आहे. पण वास्तविक तरूणांचे 'वफादार' आणि 'बेवफा' असे दोनच प्रकार असत नाहीत. अनेकजणं संधी न मिळाल्यामुळे वफादार रहात असं वाटत नाही का? आणि कॅरोलिना मुद्दामच घरी आलेल्या तरूणांना फूस असेल असं सुझीला वाटण्याची शक्यता आहेच की. आपल्याकडेसुद्धा मुलगा बघायच्या वेळी मुलीपेक्षा सुंदर बहिणीला फार पुढे-पुढे करू नकोस असा दम मिळतो.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jul 2013 - 8:13 pm | प्रभाकर पेठकर

झालेल्या गोष्टीबद्दल उगाच एक समाधान वाटून घेण्यासाठी ही सबब छान आहे.

चला! तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सबब आहे असे मानले. पण त्या तरूणांमधल्या एकाशी लग्न केले असते आणि नंतर तो कॅरोलिना किंवा इतर कोणी सुंदर मुलीकडे वळला असता तर पश्चाततापच झाला असता नं? त्यापेक्षा अशा तरूणांपासून आपण वाचलो ही समाधानाची बाब नाही का? स्त्री-पुरुष संबंधात (लग्नसंबंधात) प्रेम हे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. तेच नसेल तर वरील प्रकार घडतो. म्हणजे जे पुरूष कॅरोलिना किंवा इतर कोणाच्या फुस लावण्याने सुझीपासून दूर गेले त्यांच्या मनांत प्रेम नव्हते फक्त शारीरीक आकर्षण होते. असे उमेदवार लग्ना आधीच बाद ठरले आणि सुझी संभाव्य धोक्यापासून वाचली म्हणून तिने देवाचे आभार मानले पाहिजेत.

अनेकजणं संधी न मिळाल्यामुळे वफादार रहात असं वाटत नाही का?

नाही. तसं वाटत नाही. प्रेम नांवाची अशी एक ताकद असते ती पुरूषांना आणि स्त्रियांना गैरवर्तनापासून रोखते. हं, मुळात प्रेमच नसेल, फक्त शारीरीक आकर्षण असेल तर एका शरीराला उपभोगून झाल्यावर पुरूष दुसर्‍या शरीराचा शोध सुरु करेल.
प्रेम असेल तर पुरूष पत्नी पासून, कितीही प्रलोभने असली तरी, दूर जात नाही. कित्येक मुल न होऊ शकणार्‍या स्त्रियांशी त्यांचे नवरे प्रामाणिक असतात. कित्येक आजारी पत्नीची सेवा करणारे पती असतात. तिथे प्रेम भावना वास करीत असते.

या तरूणांना फूस असेल असं सुझीला वाटण्याची शक्यता आहेच की.

त्यासाठी वयाची तारूण्याची २०-२२ वर्षे खर्ची पडत नाहीत. वर्ष दोनवर्षात अंदाज येतो. संपूर्ण तारूण्य संपून गेलं आणि प्रजनन शक्ती संपायला २ वर्षे राहिली असताना असा साक्षात्कार होणे हे मुळात सुझीच्या मूर्खपणाचे लक्षण मानावे लागेल. प्रत्येक तरूणाला कॅरोलिन फूस का लावेल? हं, एखादा आवडला आणि बहिणीकडून हिसकाऊन घेतला आणि लग्न करून मोकळी झाली असे होऊ शकते. पण तिच्या आयुष्यात येणारा प्रत्येक तरूण कॅरोलिना हिसकावते हे पटत नाही.

आपल्याकडेसुद्धा मुलगा बघायच्या वेळी मुलीपेक्षा सुंदर बहिणीला फार पुढे-पुढे करू नकोस असा दम मिळतो.

धाकटी बहिण सुंदर असेल तर मोठ्या बहिणीच्या लग्न ठरवण्याच्या प्रसंगी तसे म्हंटले जाऊ शकते. एकदाच. पण जर बघायला आलेल्या नवर्‍यास धाकटी बहीण आणि तिला तो तरूण आवडला असेल तर तिचे लग्न लावून दिले की प्रत्येक वेळी मोठ्या बहिणीच्या लग्नात ही समस्या उद्भवू शकत नाही. (कारण तेंव्हा ती विवाहीत असणार). इथे विस-बावीस वर्षे सातत्याने हे घडत आहे. त्यामुळे ह्या दोन समस्या वेगवेगळ्या आहेत. कॅरोलीना मोठी असून तिचे लग्न का झाले नाही हेही कळत नाही.

दादा कोंडके's picture

26 Jul 2013 - 10:52 am | दादा कोंडके

प्रेम नांवाची अशी एक ताकद असते ती पुरूषांना आणि स्त्रियांना गैरवर्तनापासून रोखते.

प्रेम असेल तर पुरूष पत्नी पासून, कितीही प्रलोभने असली तरी, दूर जात नाही. कित्येक मुल न होऊ शकणार्‍या स्त्रियांशी त्यांचे नवरे प्रामाणिक असतात. कित्येक आजारी पत्नीची सेवा करणारे पती असतात. तिथे प्रेम भावना वास करीत असते.

सहमत. पण त्यासाठी अवधी जावा लागतो. प्रेम सहवासातून तयार होते. त्यामुळे सुरवातीला त्यांच्या मध्ये बांधून ठेवणारं काहीतरी असावं लागत. प्रत्येकवेळी वाग्चातुर्य, विनोदबुद्धी चालेलच असं नाही. प्लेटॉनिक रिलेशनशिप असेल तर ते चालेल. पण त्याव्यक्तीबरोबर संसाराची स्वप्न बघायची असतील तर ते काहीप्रमाणात शारिरीकसुद्धा असायलाच हवं. तो अवकाश मिळायच्या आतच जर संबंध दुरावले तर तिथपर्यंत ते जाउ शकणार नाहीत. असं होउ शकणारे सगळेच तरूण चंचल असतात असं वाटत नाही.

इथे विस-बावीस वर्षे सातत्याने हे घडत आहे. त्यामुळे ह्या दोन समस्या वेगवेगळ्या आहेत. कॅरोलीना मोठी असून तिचे लग्न का झाले नाही हेही कळत नाही.

हो तेही खरच. सो लेट्स वेट फ्वार नेक्ष्ट एपिसोड.

अनन्न्या's picture

25 Jul 2013 - 4:20 pm | अनन्न्या

पु.भा.प्र.

मन१'s picture

25 Jul 2013 - 4:56 pm | मन१

प्रभावी चित्रण.
पुढील अंकाच्या प्रतिक्षेत.

अभ्या..'s picture

25 Jul 2013 - 5:00 pm | अभ्या..

छान लिहिलय अपरणातै.
येऊंद्या पुढचे भाग.
.
.
बाकी ती युवराज मध्ये कट्रीना चेलो वाजवताना लैच भारी दिसतीय राव. तसला एखांदा अनिलकपूर मिळू नये म्हण्जे बरय. ;)

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 5:20 pm | मदनबाण

वाचतोय !

चाणक्य's picture

26 Jul 2013 - 10:23 pm | चाणक्य

+१

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

मोदक's picture

25 Jul 2013 - 6:09 pm | मोदक

वाचतोय!!

स्वाती२'s picture

25 Jul 2013 - 6:33 pm | स्वाती२

वाचतेय!

उपास's picture

25 Jul 2013 - 6:49 pm | उपास

छान सुरुवात.. वाचतोय!

पुढचा भाग वाचण्यासाठी उत्सुक...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jul 2013 - 8:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

उत्सुकता वाढवली आहे या भागाने.

सखी's picture

25 Jul 2013 - 10:09 pm | सखी

पुढचा भाग वागण्यास उत्सुक आहे अर्पणाताय, छान झालाय हा भाग. (नेटावर मिळाला नाही अजुनतरी, त्यामुळे उत्सुकता फार ताणू नये ही कळकळीची विनंती.

मिहिर's picture

26 Jul 2013 - 1:20 pm | मिहिर

वाचतोय.
अवांतरः शब्दांच्या शेवटच्या अक्षरांवरील अनुस्वारांच्या चुका बऱ्याच खटकल्या. सगळ, संपल वगैरे ठिकाणी आवश्यक असतानाही दिसत नाहीत. एके ठिकाणी जिथे 'स्वतःचं'च्या ऐवजी 'स्वतःच' लिहिले आहे. हे गोंधळवणारे आहे.
शीर्षक वाचून माझ्या मनात 'काय?' असा प्रश्न आला. :P

मृत्युन्जय's picture

26 Jul 2013 - 1:36 pm | मृत्युन्जय

कथा छानच अशी वाटते. दूसरा भाग कधी?

अरुण मनोहर's picture

26 Jul 2013 - 2:25 pm | अरुण मनोहर

जास्त उत्कंठा ताणू नका!

उत्सुकता रोखून धरली आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे.

किसन शिंदे's picture

26 Jul 2013 - 7:04 pm | किसन शिंदे

पुढचा भाग केव्हा?

स्पंदना's picture

29 Jul 2013 - 6:23 am | स्पंदना

सर्वांना धन्यवाद.
खरतरं आपल्या येथेही अश्या गोष्टी घडतात नाही असं नाही. पण आपल्या येथे लग्न करुन देणे ही पालकांची जबाबदारी असते, तरीही ..तुझ्या पेक्षा माझ बरं आहे..किंवा मला शोधताना असा का नाही शोधला ..अश्या बारीक कुरबुरी असतात्च. काही ठिकाणी अगदी हमरी तुमरीवर आलेली प्रकरण पाहिली आहेतं. एकुण वर्चस्व गाजवने हा भाग अधिक असतो..अन पाश्च्यात्त देशात, जेथे आपला जोडीदार आपण निवडायचा असतो, तेथे थोडाफार प्रभाव टाकता येतो.
अर्थात आपल्याकडे मोठ्या बहिणीच्या नवर्‍याबरोबर लग्न केल्याची उदाहरणे काही नवी नाहीत. अरुण सरनाईक हे अगदी माहीतीच अन प्रसिद्ध उदाहरण!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2013 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा आहे. अनुवादही छान झालाय !

"प्रथम तुला नीट पाहता..." हे नाव जरा जास्त ठीक वाटतंय का?