दावणगिरी लोणी स्पंज डोसा

बाळ सप्रे's picture
बाळ सप्रे in पाककृती
20 Jun 2013 - 12:25 pm

आज काल पुण्यात बर्‍याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना..

साहित्य-
१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते.

कृती-
हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे.
नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये.
त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे.
Batter
डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे.
Batter 2
इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.
Dosa1
डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे.
Dosa2

वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल.

Dosa3
लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.

Dosa4
Dosa5

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Jun 2013 - 12:36 pm | पैसा

पाकृ वेगळीच आहे. मस्त एकदम! आणि फोटो सॉलिडच आलेत!

जबरदस्त दिसतो आहे तो शेवटचा फोटो.

एकदम जमून आला आहे.. करुन पाहणार..

सस्नेह's picture

20 Jun 2013 - 1:13 pm | सस्नेह

शेवटचा फोटो एकदम कातिल.

डावखुरा's picture

20 Jun 2013 - 1:45 pm | डावखुरा

दावणगिरि... :प

ओह्ह्ह्ह... काय सही दिसतोय डोसा... मी नक्की करुन बघणार ह्या वीकएन्डलाच. :)

अनन्न्या's picture

20 Jun 2013 - 5:45 pm | अनन्न्या

सोडा आधी घालायचे कारण काय? त्यामुळे तेल जास्त लागत नाही का? आणि मीठ पीठ आंबण्यापूर्वी घातल्यास ते नीट आंबत नाही, पण तुमचे डोसे तर झकास जमलेत!

बाळ सप्रे's picture

20 Jun 2013 - 10:12 pm | बाळ सप्रे

तेल अजिबात जास्त लागलं नाही.. मीठ आधी घातल्यास आंबत नाही हे माहित नव्हते.. मीठ आधी घालुनही कदाचित उन्हाळा असल्यामुळे चांगले आंबले असावे.. :-)

प्रचेतस's picture

20 Jun 2013 - 6:38 pm | प्रचेतस

मस्तच.

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 7:11 pm | प्यारे१

छानच.

राघवेंद्र's picture

20 Jun 2013 - 7:39 pm | राघवेंद्र

मस्त जमलाय दोसा !!!

अजो's picture

20 Jun 2013 - 7:41 pm | अजो

मस्त जमले आहेत डोसे.

Pearl's picture

20 Jun 2013 - 8:17 pm | Pearl

रेसिपीबद्दल धन्यवाद. खूप दिवसांपासून हवी होती ही पा.कृ.
फोटो छान आहेत. एकदम तोंपासु.

निवेदिता-ताई's picture

20 Jun 2013 - 8:34 pm | निवेदिता-ताई

.मलाही हवी होती ही रेसिपी....धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2013 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी

रोचक पाकॄ. दावणगिरी दोसा अजून खाल्लेला नसल्याने बरीच उत्सुकता आहे.

तपशीलवार वर्णनाबद्द्ल धन्यवाद.

लगेच साबुदाणे आणते. अगदी भारी प्रकार आहे.

स्पंदना's picture

21 Jun 2013 - 6:42 am | स्पंदना

अच्छा! असाही काही डोसा असतो तर?
करुन बघायला हवा. काय जाळी आलीय डोश्याला. मस्तच.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2013 - 8:20 am | मुक्त विहारि

झक्कास..

पाककृती आणि फोटो ... दोन्हीही छान आहेत.
करून बघायचा विचार आहे..

अक्षया's picture

21 Jun 2013 - 9:19 am | अक्षया

आणि टपरीवरच खावा लागतो सहमत.
आता इतकी डिटेल पाककॄती मीळाल्यावर नक्कीच करुन बघणार.
फोटॉ मस्तच. धन्यवाद. :)

शेवटच्या फोटोतला डोसा अगदी अहाहा दिसतोय.. या वीकेण्डला नक्की करून बघेन.

शिल्पा ब's picture

21 Jun 2013 - 9:34 am | शिल्पा ब

मस्त दिसतोय डोसा.
हाटेलातल्या गोष्टीबद्दल : एकदा एखाद्या चांगल्या हाटेलाचे किचन पहाच..दृष्टीआड सृष्टी !

रुमानी's picture

21 Jun 2013 - 10:02 am | रुमानी

मस्त ...!
छानच दिस्तोय करुन बघ

रुमानी's picture

21 Jun 2013 - 10:03 am | रुमानी

मस्त ...!
छानच दिस्तोय करुन बघते

गणपा's picture

21 Jun 2013 - 1:04 pm | गणपा

यात साबुदाणा ही असतो हे माहित नव्हतं.
साबुदाण्याबद्दलचा गैरसमज दुर झाला आहेच. ;)
लगेच विकांताला करावे म्हणतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Jun 2013 - 3:06 pm | लॉरी टांगटूंगकर

कर्णाटकात सेट डोसा मिळतो तो असाच दिसतो. सेमच प्रकरण म्हणायचं काय?

सेट डोसा बर्‍याच हॉटेलातदेखिल मिळतो. तो इतका स्पाँजी नसतो.. तो बराचसा उत्तप्प्यासारखा वाटतो..

ओक्के... म्हणजे याचे पीठ वेगळे असते तर.

मागच्या आठवड्यात एका पारंपारीक डोसा करणार्‍या टपरीवाल्याला "दावणगिरी डोसे करून द्या" अशी मागणी केल्यावर त्याने "काय हे अज्ञान!" अशा नजरेने का पाहिले ते आता कळाले. ;-)

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2013 - 8:41 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसतो आहे डोसा,
स्वाती

सुहास झेले's picture

22 Jun 2013 - 10:02 am | सुहास झेले

भारीच !!

टक्कू's picture

10 Jul 2013 - 10:30 pm | टक्कू

मी हा डोसा पुण्यात खाल्ला होता आणि तेव्हापासून त्याच्या प्रेमात पडले होते :)
काल अचानक बाळ सप्रेंची हि recipe मिळाली आणि आज लगेच करुन पाहिला. अप्रतिम चव आणि लुसलुशित texure!
खूप धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2013 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा

अत्ताच जेवान जालं...आनी ह्यो धागा उगडला..त्ये फोटू बगत...बगत...शेव्टाला आलू,आनी त्ये शेवटच फोटू बगून त्वांड खवळलं कि वो परत... !!! :)

चंबु गबाळे's picture

11 Jul 2013 - 8:01 am | चंबु गबाळे

जबरी १ नंबर...सकाळी सकाळी असला फोटो... छळवाद

रेवती's picture

11 Jul 2013 - 7:55 pm | रेवती

आज हे दोसे केले होते. मऊ, लुसलुशीत वगैरे झाले पण फोटूतल्यासारखे दिसेनात म्हणून पुन्हा एकदा पाकृ वाचली तर पीठ आंबवताना त्यात सोडा घालायला विसरले हे लक्षात आले. आता पुढच्यावेळी ती पायरी न विसरता करीन.

बाळ सप्रे's picture

12 Jul 2013 - 11:07 am | बाळ सप्रे

एक लिहायचे राहिले..
रात्रभर उबदार जागेत राहिल्यावर पीठ दुप्पटीहून जास्त फुलुन येते.. पातेल्यात अर्ध्याहून अधिक जागा मोकळी ठेवावी.. नाहितर पीठ सांडते..
सोडा न घातल्याने कदाचित इतके फुलले नसेल पीठ..

रेवती's picture

13 Jul 2013 - 12:48 am | रेवती

हो. नंतर सोडा घातला आणि अर्ध्यातासाने दोसे केले तर मस्त जमले. सोडा मात्र लागतोच असे लक्षात आले.

मटकी/मसूर/धान्ये जेव्हा भीजत घालते तेव्हाही असच अंधारं - ऊबदार वातावरण मिळण्यासाठी, ओव्हनमध्ये अन्डिस्टर्बड (व्यत्ययहीन) ठेऊन देते. कसले लवकर अन मोठे मोड येतात.

भन्नाट पा.कृ.

गेल्या आठवड्यात करुन पाह्यले. शन्वारी संध्याकाळी सातच्या दरम्यान सगळे जिन्नस भिजत घातले आणि रात्री अकरा साडेअकराच्या दरम्यान वाटून एकत्र करुन ठेवले. रैवारी नेमकं बाहेर जाणं ठरलं. सकाळी काही पीठ आलं नव्हतं म्हणून पातेल्याखाली परात ठेऊन घराबाहेर पडलो (आधी एकदा पातेलं असंच ठेवल्यामुळे पीठ वाया गेलं ते निराळं सबंध ओटा पुसावा लागला होता, तेव्हापासून कानाला खडा ;) ). दुपारी घर गाठेपर्यंत पीठ फुगून परातीत उतरलं होतं.

सोडा न घालताही डोसे अप्रतिम झाले. फक्त एक काळजी घेतली ती म्हणजे डोसा तव्यावर टाकला की वाटीने पसरायचा नाही.

पीठ नीट यावं म्हणून एका सौंदिंडियन मैत्रीणीने दिलेला सल्ला असा की तांदूळ, उडिद वैगरे ज्या पाण्यात भिजवतो तेच पाणी हे जिन्नस वाटताना लागलं तर वापरायचं. सगळं वाटून झालं की एकत्र करताना डाव वैगरे न वापरता हाताने कालवायचं. मला या प्रकाराने अपेक्षित रिझल्ट मिळालेला आहे.

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2013 - 3:56 pm | प्रभाकर पेठकर

पीठ नीट वर येण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे उडिदाची डाळ धुताना कमीतकमी ४ वेळा खुप चोळून धुवायची.

वाटीने नाही तर कसा पसरवायचा?

मी डोसे करते तेव्हा तवा हलवत, कलंडवत डोसे घालते. म्हणजे तवाच इकडे-तिकडे/वर-खाली करायचा.मग ते घन-द्रव जे काही पीठ आहे त्याला व्हेलॉसिटी मिळून ते पसरतं आपोआप.

म्हणजे चांगला नॉनस्टिक तवा पाहिजे :)

शुचि's picture

9 Apr 2014 - 7:27 pm | शुचि

होय होय बरोबर!

>>वाटीने नाही तर कसा पसरवायचा?
हा डोसा करताना पिठाची कन्सिस्टन्सीच इतकी ठेवायची की डावाने मधोमध ओतलं की आपोआप पीठ गोलाकार पसरत जाईल. शुचिमामी म्हणते तसा तवा हलवलात तरी टेक्श्चर गंडेल.

इतर वेळेस डोसे करताना खुश्शाल वाटीच्या बुडाने आतून बाहेर असं पीठ पसरवत न्यायचं. या डोशाला तसं केलंत तर डोसा हवा तसा स्पॉन्जी रादर स्पॉन्जीच होत नाही,असा अनुभव आहे.

पद्माकर टिल्लु's picture

13 Jul 2013 - 11:55 pm | पद्माकर टिल्लु

डोसाचे पिठ दळताना त्यात शिजलेला भात मुठ्भर टाकल्यास पिठ छान फुगुन वर येते. सोडा अजिबात टाकावा लागत नाहि.

सुबक ठेंगणी's picture

21 Jun 2015 - 11:12 am | सुबक ठेंगणी
शिजलेला भात (अक्की) किंवा भिजलेले जाडे पोहे (अवलक्की) पण चालतात. दावणगिरी बेण्णे दोसा साबुदाणा घालून करतात माहित नव्हतं. आता करुन बघेन. दोश्याचं स्पाँजीपण अगदी तंतोतंत दिसतंय फोटोतून :)मस्त.
स्मिता चौगुले's picture

15 Jul 2013 - 5:22 pm | स्मिता चौगुले

मी सोडा न घालताच केले होते.. फक्त एक काळ्जी घेतली कि तांदूळ, उडिद वैगरे ज्या पाण्यात भिजवले तेच पाणी हे जिन्नस वाटताना वापरले, चान्गले जमले होते

बालगंधर्व's picture

12 Apr 2014 - 1:14 pm | बालगंधर्व

कुहुप चहान जमेलेलेले आहे. अव्द्ले. तसेच निर्निरल्याआ सह्बासदनेइ दिलेय्ला तीप्स पन कुह्कुप सोपया अहेत.
बल स्र्पे- तुह्मे ग्रेत अहत. मधये एद्का याच थिकनी पेथन्कर ककानेई पन हेच रेशिपी तक्ली होतोती. तेअपन चहन च होते.
बच्लर मुलन्सथि पन हे रेसिपि सुसय्ह अहे. मे नक्कि करुन बघेन. धय्नव्द. :) :( ;) ">>"

बॅटमॅन's picture

15 Apr 2014 - 4:36 pm | बॅटमॅन

दह्न्य झलो हे वह्चुन, बल्गन्ह्द्र्व तुह्मि म्हन अहत _/\_

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2013 - 2:33 am | प्रभाकर पेठकर

आजच केले होते डोसे. मस्त झाले. मजा आली खाताना.

सोडा न घालता पण छान होतात फक्त उडिदाच्या डाळीचे प्रमाण वाढवायला लागते. (तांदूळाच्य निम्मी उडीदाची डाळ घ्यावी) पण वर दिलेलेच प्रमाण आणि सोडा घालूनही जरा वेगळे आणि मस्त झाले. आवडले. साबुदाण्याच्या सहभागाने डोसे वरून कुरकुरीत होतात असे निरिक्षण नोंदवितो.

बाळ सप्रे's picture

22 Jul 2013 - 10:58 am | बाळ सप्रे

"पाककृती/फोटो आवडले" याबरोबरच बर्‍याच जणांनी पाककृती करुनही बघितली आणि नंतर प्रतिसादही दिले ..
सर्वांनाच धन्यवाद !!

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2013 - 11:30 am | दिपक.कुवेत

नक्कि करुन बघिन आणि कळवीन. दोन शंका - १. डोसा घालत्यावर फक्त वरुन लोणी/बटर घालायचं का? आय मीन बाजुने नाहि ना? २. हे पीठ फ्रिज मधे ठेवल्यास प्रत्येक वेळी पण असेच सुटतील का तेव्हाच्या तेव्हा सगळे घालुन संपवावे लागतील?

बाळ सप्रे's picture

22 Jul 2013 - 11:46 am | बाळ सप्रे

फक्त वरुनच लोणी घालयच.. बटर स्प्रे वगैरे असेल तर उत्तम..
फ्रीजमध्ये २-३ टिकु शकत.. मी २ दिवस वापरलं.. दुसर्‍या दिवशीही तसेच डोसे झाले..

सस्नेह's picture

22 Jul 2013 - 1:16 pm | सस्नेह

अतिशय उत्कृष्ट झाला ! हा पहा.
a

छान रेसिपी. मीपण करुन पाहिला. यात साबुदाणा घालायचे माहीत नव्हते. चिरमुरे घालूनही चांगला होतो असे ऐकले आहे.

मला पण भारी आवडला होता हा दोसा. पाककृतीबद्दल धन्यवाद !!
फोटो एकदम झकास !!

अनिता ठाकूर's picture

4 Sep 2013 - 12:25 pm | अनिता ठाकूर

मीहि करून बघितला, छानच झाला. नावाचा संदर्भ लागला नाही तरी नाव एकदम भारी आहे.

बाळ सप्रे's picture

4 Sep 2013 - 9:52 pm | बाळ सप्रे

दावणगिरी हे कर्नाटकातील एक गाव आहे. पाकृ मूळ तिथली आहे..

जातवेद's picture

9 Apr 2014 - 7:24 pm | जातवेद

अहो काही गाडेवाले त्याला दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा असे पण म्हणतात. मी मुद्दामहून म्हैसूरला जाताना दावणगिरी स्टेशनल उतरलो होतो.

इष्टुर फाकडा's picture

12 Sep 2013 - 5:22 pm | इष्टुर फाकडा

तंतोतंत कृती बरहुकूम करून पहिल झ्याक झाले होते...धन्यवाद :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Dec 2013 - 6:47 am | कैलासवासी सोन्याबापु

आयला!! जंगली महाराज रस्त्यावरच्या एका जागच्या लोणी स्पंज अन एकंदरीतच पुण्यनगरीची आठवण ताजी झाली

आज करुन पाहिला,अप्रतिम झालेला...धन्यवाद
संध्याकाळी उरलेल्या पिठात सोया,शेजवान,पिझा&पास्ता,चीलि असे घरात असलेले सगळे साॅस वापरुन जाडसर डोसा टाकुन लगेच त्यावर कांदा,टाॅमेटो, कोबी व हिरव्या मिरचीचं टाॅपिंग टाकुन भन्नाट वेगळाच पिझ्झा बनवला, मस्त झालेला :-)

राघवेंद्र's picture

26 Mar 2014 - 1:09 am | राघवेंद्र

+१

अपूर्वयोग's picture

22 Mar 2014 - 9:47 am | अपूर्वयोग

sundar pakkruti. khupach avadali

मेघना मन्दार's picture

4 Apr 2014 - 4:55 pm | मेघना मन्दार

आत्तपर्यन्त हा डोसा बाहेर च खाल्ला होता..इथे पाक्रु वाचल्यावर तीन चार वेळा घरी करुन पाहिला.. सर्वाना खुप आवड्ला!! पाक्रु दिल्याबद्दल धन्यवाद!!:-)

सानिकास्वप्निल's picture

9 Apr 2014 - 12:14 am | सानिकास्वप्निल

आजच केले होते हे डोसे, मस्तं झाले होते खूप आवडले :)
मऊ, लुसलूशीत आणी स्पाँजी.
पाकृसाठी धन्यवाद

.

बॅटमॅन's picture

9 Apr 2014 - 12:27 am | बॅटमॅन

आईच्यान्!!!!!!!!!!!!! काय कातिल फटू. चटणीची रंगसंगती तर थेट वॉटरकलर!!!!!!!

डोसे तर जबरीच, अन सांबारही एकदम खंग्री!!!!! उद्याचं लंच आंध्रा मेशीत करायला लागतंय आता.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2014 - 11:05 am | अत्रुप्त आत्मा

@ उद्याचं लंच आंध्रा मेशीत करायला लागतंय आता.>>> - १
मी अत्ताच चाल्लू..राश्ता पेठीत..मद्राशी मेसवर..येताव काय? :)

आंध्र अन मद्राशी मेस.. रास्ता पेठेत..?

हाय रे हाय.. काय हे पुण्यपत्तनावर दाक्षिणात्य द्रविडांचं आक्रमण..!!

रेवती's picture

9 Apr 2014 - 2:30 am | रेवती

लगेच धान्ये भिजत घालते. तुम्ही असे फोटू देता व आम्हाला कामाला लावता. ;)

पिलीयन रायडर's picture

9 Apr 2014 - 1:27 pm | पिलीयन रायडर

काय छळ आहे हा? भरल्या पोटी पण भुक लागतेय..

वैताग झालाय हल्ली फार ह्या बाईचा...

अजया's picture

9 Apr 2014 - 8:25 am | अजया

मी ही घातलं भिजत धान्य! त्रास आहे हा!!!

स न वि वि's picture

9 Apr 2014 - 10:44 am | स न वि वि

वा सुरेख ..खाण्याचा सोडा नसल्यास flavour नसलेले eno टाकले तर चालेल का?

शुचि's picture

9 Apr 2014 - 5:46 pm | शुचि

हाहाहा आजकाल असल्या धाग्यांमुळे इनो मात्र सगळ्या मिपाकरांकडे handy असतंय :)

बाळ सप्रे's picture

25 Apr 2014 - 5:24 pm | बाळ सप्रे

सोड्याऐवजी इनो चालतं.. या पीठात नाही पण इडलीसाठी वापरलय याआधी..

सरदार's picture

9 Apr 2014 - 11:42 am | सरदार

नाद कुळा

प्यारे१'s picture

9 Apr 2014 - 1:07 pm | प्यारे१

मिपा वरुन पाकृ विभाग बंद करावा ही नम्र विनंती.

कवितानागेश's picture

10 Apr 2014 - 11:35 am | कवितानागेश

सुपरहिट पाककृती. १४४९५ वाचने झालियेत.
लेखकाचे अभिनंदन.

बाळ सप्रे's picture

10 Apr 2014 - 9:09 pm | बाळ सप्रे

धन्यवाद!!

रेवती's picture

10 Apr 2014 - 5:56 pm | रेवती

आज पुन्हा हा दोसा केला. पद्माकर टिल्लू यांनी सुचवल्याप्रमाणे पिठात सोडा न घालता तांदूळ वाटतानाच शिजलेला भात पाव वाटी घातला आणि पीठ मस्त फुलून आले. श्री. टिल्लू यांचे आभार.

कालच केला द्रोणागिरी डोसा .पिठात संजिवनी टाकल्यागत फुगले म्हणून सौ०कंजूसकडून "झाला हं तुमचा द्रोणागिरी "असं नामकरण झाले .आमच्या घरातले सर्वजण खुश आहेत .पीठ आंबून त्याचा राजाबाई टॉवर झाला पण अगोदरच खाली परात ठेवलेली होती .पुढचा त्रास वाचला .
टिव्हीवरच्या कार्यक्रमातल्या पाकृ बऱ्याच वेळा खोट्या असतात .
वरच्या सर्व फोटोंसारखेच डोसे झाले .

तुमचा अभिषेक's picture

12 Apr 2014 - 11:54 am | तुमचा अभिषेक

पण शेवटचा फाडलेला डोश्याचा फोटो पाहिला आणि कळले वेगळे प्रकरण आहे.
मग रेसिपीत पीठही वेगळ निघाले, कधी ऐकले पाहिले नव्हते हे, स्साला मी तर करून बघतो असेही बोलू शकत नाही, अरे मुंबईत हे कुठे मिळतील कोणी सांगेल का?
दक्षिण मुंबई वा नवी मुंबई वाशीजवळ कुठे असतील तर आणखी सोयीचे पडेल.

मी रेवाक्का बरोबरच बनवला होता हा डोसा.
घरात कोणालाच माहीत नाही. त्यामुळे मी एकदम फुल्ल शायनिंग मारत केला.
मस्त झाला अन सगळ्यांना आवडला. फोटो टाकू शकत नाही कारण मी रात्री बाहेरुन येउन करेपर्यंत फार वेळ झाला होता.

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2014 - 6:31 pm | दिपक.कुवेत

मातब्बर लोकांनी बनवल्यावर आता मला पण बनवुन बघीतलाच रादर खाल्लाच पाहिजे.

वाटाड्या...'s picture

15 Apr 2014 - 7:31 pm | वाटाड्या...

नक्कीच..लय भारी दिसता हय...
- वाट्या

निवेदिता-ताई's picture

16 Apr 2014 - 2:35 pm | निवेदिता-ताई

आज मी करुन पहाणार आहे......

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 5:06 pm | पिलीयन रायडर

ही मिपावरची फार हीट पा.कृ झाली आहे!! मी सुद्धा करेनच!

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 6:50 pm | प्यारे१

>>>मी सुद्धा करेनच!

मग खाणार कोण? ;)
(हलकं घ्या हो बिनाघोडातलवार झा.रा.ल.बा.)

मनीषा's picture

17 Apr 2014 - 4:22 pm | मनीषा

मी केला होता ... छान झाला होता
फोटो आहे पण इथे कसा द्यायचा माहीत नाही

पियू परी's picture

30 Apr 2014 - 7:23 pm | पियू परी

मी एकदा करुन झाला आहे इथले वाचुन.. पण घरात कोणी फोटो काढेपर्यंत दम धरत नाहीत.
अक्षरशः तुटुन पडलेत या डोशांवर.
आभार..
इतर कोणाची मदत न घेता मी केलेली आयुष्यातली पहिली रेसेपी.
अज्जीबात फसली नाही.
आज पुन्हा ऑन डिमांड पीठ आंबवायला टाकले आहे.
आज शक्य झाले तर फोटो नक्की टाकेल.

त.टि.: मला सोडा वापरायचा नव्हता म्हणुन मी वर कोणीतरी सांगितल्याप्रमाणे २ वाटी उडीद डाळ घेऊन केलेले. सेम झाले.