असुर कोण ? (१)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 8:16 am

असुर कोण ? (१)

मागील एका धाग्यात "असुर" बद्दल उल्लेख झाला होता. आज असुर बद्दल काही माहिती बघू. ही माहिती दोन प्रकारांनी पाहिली पाहिजे. पहिली आपले वैदिक/पौराणिक वाङ्मय काय सांगते व दुसरी ऐतिहासिक/वांशिक माहिती. लहानपणापासून दैत्य, दानव, असुर, राक्षस हे सगळे एक, क्रूर, दुष्ट, अन्यायी, देवांचे शत्रु, थोडक्यात वाईट. अर्थात जरी हे सगळे भिन्न असले तरी एकाच वर्गांत ढकलले गेलेले. रावण. नरकासुर, हिरण्यकश्यपु वगैरे. या विरुद्ध दुसरी बाजू मोठ्या विद्वानांनी घेतलेली, विशेषत: साम्यवादी विद्वानांनी मांडलेली. त्यात असुर हे आर्य येण्यापूर्वीचे भारतातील रहिवासी. सुसंस्कृत, नागरी, शांतताप्रिय. सिन्धु संस्कृती यांची. आक्रमक आर्यांनी यांचा बिमोड केला. पुरावा म्हणून इंद्र-वृत्र युद्धाचे उदाहरण देतात. वर्गविद्रोहाचे उदाहरण. आपण दोघांकडेही बघू

वेदांमध्ये इन्द्र-वृत्र यांच्या युद्धाचे वर्णन आढळते. देव-असुरांमधील सर्वात जास्त गाजलेले युद्ध. कोण हा वृत्र? त्याकरिता एक वंशावळ पाहिली पाहिजे.ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रातले दोन, (१) मरिची व (२) दक्ष प्रजापती. मरिचीचा मुलगा कश्यप याला दक्षाने आपल्या तेरा मुली भार्या म्हणून दिल्या. त्यातील एक अदिती. अदितीला १२ मुलगे, अदितीची मुले म्हणून त्यांना आदित्य म्हणावयाचे. आज आपल्याला त्यांतील तीन बघावयाचे आहेत. (१) त्वष्टा, (२) इन्द्र व (३) वरुण. त्वष्टा व इन्द्र भाऊ-भाऊ. त्वष्ट्याचा मुलगा त्रिशिरा. हा इन्द्राचा पुतण्या. हा मोठा तपस्वी, जितेंद्रिय असून वेदांचे अध्ययन करत असे. एकदा देवगुरू बृहस्पती रागावून इन्द्राला सोडून गेला तेव्हा इन्द्राने याला देवगुरू म्हणून नेमले. तर असा हा त्रिशिरा इन्द्रपद मिळावे या इच्छेने तप:चर्या करू लागला म्हणून इन्द्राला भिती वाटू लागली व त्याने त्रिशिराचा वध केला ! आपल्या मुलाला इन्द्राने मारले म्हणून त्वष्ट्याला राग आला व इन्द्रवधार्थ पुत्र निर्माण करण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्यामुळे झालेला मुलगा म्हणजे वृत्र. पण यज्ञात उच्चारांत चूक झाली म्हणून इन्द्राचा वध होण्याऐवजी इन्द्राकडून वृत्राचाच वध झाला. म्हणजे इन्द्राने आपले दोन पुतणे मारले व यामुळे त्याच्यामागे ब्रह्महत्येचे पातक लागले. देव-असुरांतला हा झगडा म्हणजे कोल्हापुर जिल्ह्यात जमीन वाटपावरून भावाभावात मारामारी व्हावी असा मामला होता.

आता जरा वरुणाकडे वळू. ऋग्वेदात वरुणाचा उल्लेख असुरो विश्ववेदा,(सारे विश्व जाणणारा असुर), असुर:पित न: (असुरांचा पिता), असुरस्य वेधस: (असुरांचा प्रजापती) असा केला आहे. हा असुरांचा प्रजापती वरुण वैदिकांची प्रमुख देवता आहे. म्हणजे असुर हे आर्यांच्या कळपातीलच आहेत. बाहेरचे, "उपरे" नव्हेत. वरुणाचा मुलगा भृगु व अंगिरा हे "वारुणी" वरुणाचे पुत्र म्हणून ओळखले जातात. भृगूचा मुलगा शुक्र हा असुरांचा गुरु जसा बृहस्पती देवांचा. ऋग्वेदात "असुर" यज्ञाचे निर्माते असे म्हटले आहे. इन्द्रपदासाठी भांडणं होत असतील तर सर्व भांडणांची जातकुळी एकच, कौरव-पांडच, यादव, मोगल राजे, राघोबा-नारायणराव पेशवे यांच्यातल्या वैरासारखीच. असुरांतीलच बली, प्रल्हाद वगैरे देवविरोधी नव्हतेही. म्हणजे सगळे काही एकच होते असेही नव्हे. जसजसे जगभर(फक्त भारतातच असे नव्हे) पसरू लागली तेव्हा दोहोंत काही फरक पडलेलाही दिसतो, उदा. वेदांत रुद्राला त्याने यज्ञात विघ्ने आणू नयेत म्हणून त्याची प्रार्थना केलेली दिसते तर असुरांचे लाडके दैवत शंकरच ! असो. आता असुर मुळचे कुठले ते पाहू.

इ.स.पूर्व १५००-२००० च्या दरम्यान आर्य घोड्यावरून दौडत आले, इथल्या शांततावादी रहवास्यांना जिंकून, त्यांचा बिमो’ड करून, त्यांच्या संस्कृतीचा (हडप्पा) नाश केला ही संकल्पना आता मोडींत निघाली आहे. भारतात अनेक प्रकारचे लोक इ.स.पूर्व ४०००-५००० पासून येतच होते, आर्य त्यातले, असुरही त्यातलेच. आलेल्या सगळ्यांनी येथील रहिवासी व एकमेकांशी जुळवून घेतले व साधारणत: सहिष्णुतेने वागून एका समाजाची घडी बसवली. झगडे नव्हते का? होते की. माणुस फार शांतताप्रिय प्राणी म्हणून कधीच नावाजलेला नव्हता. पण त्याचे स्वरूप आक्रमक-स्थानिक असे नव्हते ( उदा. दाशराज्ञ युद्ध). फार कशाला, नावजलेल्या भारतीय युद्धात कौरव-पांडव ( व त्यांचे थोडे नातेवाईक ) सोडले तर बाकीचे राजे युद्धाची खुमखुमी म्हणून आले होते की नाही ?

पुढे बौद्ध धर्माचा प्रसार, चीन, अतिपूर्व, मध्य आशियात झाला तेव्हा कोण घोडे-धनुष्यबाण घेऊन गेले होते ? स्थानिकांनी बाहेरची संस्कृती स्विकारली म्हणजे तलवारीच्या धाकाखालीच हे काही खरे नव्हे. (त्या॒ची सुरवात झाली इस्लाम व त्यानंतर ख्रिश्चन धर्म प्रसारकांपासून. ते सोडा.) जर वरील मांडणी पटत नसेल तर उपक्रमवरील श्री. चंद्रशेखर यांचे "सुरकोटलाचा अश्व " हे तीन लेख वाचा. अभ्यासपूर्ण आहेत. उपक्रमवरचे लेख ’आपल्या"करिता नाहीत असेच समजावयाचे कारण नाही. वाचाच.

इ.स.पूर्व ५०००-७००० या काळात गेलात तर काय दिसले असते ? कास्पिअन ( कश्यप ?) समुद्रापासून पूर्वेकडे पंजाबपर्यंत व पश्चिमेकडे पार हंगेरीपर्यंत निरनिराळ्या टोळ्या स्वैर संचार करत होत्या. "व्हिसा-पासपोर्ट" वगैरे भानगड नव्हती ना. बायका-पोरे, गुरेढोरे घ्यावयाची व मनाला वाटेल तिकडे सुटावयाचे. वाटेत भेटलेल्या लोकांत मिसळून जावयाचे, गरज पडली तर युद्धे करावयाची. जिंकलात तरीही तेथे थांबले पाहिजेच असेही नाही. खर्‍या अर्थाने "जिप्सी". आज तुम्ही जिथे आहात तेथेही मागून पुढून, वरून खालून दुसर्‍या टोळ्या येतच असत. आज पूर्वेला जाताजाता पंजाब लागला म्हणजे पुढेला गंगेकडे जायचे असेही नाही. दक्षिणेकडे वळा वा परत घूमजाव करून इराणकडे वळा. वस्ती छोट्या छोट्या गावांत विखुरलेली होती, राज्ये लहान लहान होती. साम्राज्ये नव्हतीच. तर भारतातील परिस्थिती अशी होती. या लहान लहान वस्त्यामंध्ये तथाकथित आर्य, असूर, नाग, हुण, वानर, राक्षस, यक्ष सगळे नांदत होते. निरनिराळ्या प्रकारची आराधना करत होते. युद्धे होत नव्हतीच असे नाही पण एकुण गुण्यागोविंदाने चालले होते असे म्हणावयास हरकत नाही. यात असुर कुठे बसतात ते आता पुढील भागात बघू..

शरद

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

9 May 2013 - 8:35 am | चित्रगुप्त

छान. अशीच माहिती मिळत राहो.
एक शंका:
....नावजलेल्या भारतीय युद्धात कौरव-पांडव ( व त्यांचे थोडे नातेवाईक ) सोडले तर बाकीचे राजे युद्धाची खुमखुमी म्हणून आले होते की नाही ?...
....
तर खरोखरच युद्धाची खुमखुमी म्हणून हे एवढे युद्ध झाले का? की त्याकाळचे आणखी व्यापक असे काही राजकारण त्यात होते, यावर प्रकाश टाकावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 3:11 am | डॉ सुहास म्हात्रे

इरावती कर्वे यांचे "युगांत" वाचा. अप्रतिम एकदम सुंदर ओघवत्या भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. त्याकाळच्या राजकारणाचे, समाजाचे आणि माणसांचे (महाभारताच्या सर्व महत्वाच्या पात्रांचे) उत्तम संशोधीत वर्णन पण एकाद्या सुंदर कादंबरीसारखे हातातून खाली न ठेवता वाचावे असे.

चित्रगुप्त's picture

10 May 2013 - 10:19 am | चित्रगुप्त

'युगांत' खरेतर दोन-तीनदा वाचले आहे, पण शेवटल्यांदा वाचूनही आता पंचवीसेक वर्षे झाली असतील, त्यामुळे विस्मरण झाले आहे. आता पुन्हा वाचतो.
याखेरीज आणखी या विषयावर(महाभारतकालीन व्यापक राजकारण) कुठे आहे का काही?

शैलेन्द्र's picture

10 May 2013 - 8:29 pm | शैलेन्द्र

पर्व.. भैरप्पा..

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 10:08 pm | बॅटमॅन

+११११११११११११.

भारी प्रकार आहे तो. मष्ट रीड- ऑप्शनच नाही त्याला.

प्रचेतस's picture

11 May 2013 - 8:50 am | प्रचेतस

नै राव.
पर्व आवडले नाही आपल्याला.
भैरप्पांसारखा ताकदवान लेखक महाभारताचा एका वेगळ्याच अंगाने शोध घेण्यात अपयशी ठरलाय असे मला वाटते. शिवाय पर्व ही कादंबरी असल्याने बरेच नाटकियीकरण केले गेलेले आहे. पण शिवाजी सावंतांच्या 'युगंधर' पेक्षा पर्व निश्चितच अधिक वाचनीय आहे. सावंतांनी तर कृष्णाचे भयानक उदात्तीकरण करून महाभारताची पूर्ण वाट लावून टाकलीय.

बाकी दुर्गाबाईंचे 'व्यासपर्व' वाचायलाच हवे असे आहे.

महाभारताची कहाणी प्रत्यक्ष कशी घडली असेल याचा मागोवा पर्व सोडून अन्य कुठल्या कादंबरीत घेतला असेल असे वाटत नाही. त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतले असेलही, परंतु ती सोडून अन्यत्र कुठे त्या ताकदीचे चित्रण आढळले नाही.

प्रचेतस's picture

11 May 2013 - 1:44 pm | प्रचेतस

हम्म.
खरंय ते. पण पर्व लैच कंटाळवाणं आहे.

:) मला तरी कंटाळवाणे वाटले नाही कुठेच. युद्धातली ग्लोरी काढल्यामुळे तसे झाले असण्याची शक्यता जास्त असावी. परत प्रत्येकाला एकेकदा का होईना कुणाच्या तरी दृष्टिकोनातून झोडलेले आहेच.

संपूर्ण महाभारत वाचलेले असेल तर पर्व खरेच कंटाळवाणे वाटते राव. युद्धावर फोकस कमी दिलाय भैरप्पांनी हे खरेच.

हम्म :) अंमळ असहमतीशी सहमत इथे :) असो.

प्रचेतस's picture

9 May 2013 - 9:43 am | प्रचेतस

उत्तम सुरुवात.

पैसा's picture

9 May 2013 - 9:57 am | पैसा

असुर हे असीरीयातले असे कुठे तरी वाचले होते. त्याबद्दल काही माहिती द्याल का?

माझ्या पिल्लुच्या वर्गात एक असीरीयन मुलगा आहे.

चित्रगुप्त's picture

10 May 2013 - 10:22 am | चित्रगुप्त

'एक असीरीयन मुलगा ' म्हणजे हल्लीच्या संदर्भात कोण्या देशाचा, त्याची मातृभाषा कोणती ?

त्याचे आई वडील इराण मधुन आलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते मुसलमान नाहीत असीरीअन आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. नावं ख्रिश्चन आहेत...ख्रिश्चनांचाच एक प्रकार आहे असं त्या मुलाची आई सांगत होती.

ईंटरेस्टिंग. बहुतेक सीरिअन ख्रिश्चन असेल असे वाट्टे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

शक्य आहे... सिरियचे अरबीतले नाव "अस्सुरिया" असेच उच्चारले जाते. लिहिताना "अल् सुरिया" असे लिहितात. उच्चारताना (काही वेळेस लिहितानाही) अल् मधला ल् नंतर येणार्‍या व्यंजनाप्रमाणे बदलतो. जसे अल् नूर (प्रकाश) = अन्नूर, अल् दम्माम (दम्माम शहर) = अद्दमाम, इ.

आता प्रश्न असा आहे की: (१) "अल् सुरिया" मुळे ही सुरभूमी / देवभूमी मानयची की (२) "अस्सुरिया" मुळे ही असूरभूमी मानायची ?

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 1:56 pm | बॅटमॅन

इंटरेस्टिंग! अल् मध्ये संधीमुळे असाही बदल होऊ शकतो हे माहितीच नव्हते. मजा आहे :)

आता प्रश्न असा आहे की: (१) "अल् सुरिया" मुळे ही सुरभूमी / देवभूमी मानयची की (२) "अस्सुरिया" मुळे ही असूरभूमी मानायची ?

अवघड प्रश्न, टु से द लीस्टः नेम ऑफ सिरिया हे विकी आर्टिकल पाहिले. सिरिया अन असिरिया ह्या दोन्ही संज्ञा थोड्याफार फरकाने एकाच प्रदेशाला वापरल्या जात होत्या असे दिसते. असीरियाचे विकी आर्टिकल पाहता याबद्दल काही दिसत नाही. कुठे काही दिसले तर जरूर सांगतो. पण सध्या तरी काही दिसत नाही. वेदकालीन भारताशी समकालीन संस्कृतींसंदर्भात मला माहिती असलेल्या एखाददुसर्‍या पुस्तकातही यासंबंधी विशेष काही दिलेले आठवत नाही. इथे जाणकार अजून सांगतीलच. विशेषतः शरद यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

आताचे जॉर्डन, लेबॅनॉन, सिरिया, इराक या देशांच्या भूमीवरचे इस्लामपूर्व संस्कृतीचे सर्व अवशेष, काही रोमन अवशेष वगळता, नष्ट केले गेले आहेत. मात्र याला एक फार मोठा अपवाद आहे.

जॉर्डनच्या जगप्रसिद्ध पेत्रा व्हॅलीत इस्लामपूर्व संस्कृतीचे अवशेष आहेत. त्यांत रोमनपूर्व आणि रोमन अशा दोन्ही संस्कृतींची सरमिसळ दिसते. तेथे माणसे मृत झाल्यावर त्यांचे दहन करून नंतर अस्थी /राख डोंगराच्या खडकांत कोरलेल्या थडग्यांच्या दरवाज्यावर कोरलेल्या कलशात ठेवण्याची प्रथा होती.

तसेच पेत्रा व्हॅलीच्या वेशीवर आपल्याकडे गावाच्या वेशीवर असते तशी गावाचे रक्षण करणार्‍या देवाची मुर्ती आहे... आणि मुख्य म्हणजे त्या देवाशेजारी त्याच्या पत्नीचीही मुर्ती कोरलेली आहे !

फटूबद्दल धन्यवाद :) देवाशेजारी पत्नीची मूर्तीही कोरलेली असणे हे रोचक आहे! बाकी इस्लामपूर्व अवशेष नष्ट करण्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे. प्रत्यक्ष प्रेषित महंमदाच्या आईचे थडगेही सौदीत उद्ध्वस्त केले तिथे बाकी अवशेषांची काय कथा?

अन जॉर्डनमधल्या त्या पेट्रा /अल खजानेह् बद्दलही कधी लिहा अशी विनंती. इंडियाना जोन्स वगैरे पिच्चरमध्ये पाहून तो भाग लै लै आवडला आहे. :)

चित्रगुप्त's picture

10 May 2013 - 6:52 pm | चित्रगुप्त

प्रेषित महंमद आणि थडगे यांबद्दल एकेरी उल्लेख?
तोबा तोबा.

नारद नव्हे. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 7:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

जॉर्डन लिखाणाच्या यादीत समाविष्ट आहेच. सद्या मिपावर लिहायचा उत्साह वाढल्याने "वेळ कमी सहली फार" असे झाले आहे :) पण जॉर्डनकाभी नंबर जरूर आयेगा +D

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 7:07 pm | बॅटमॅन

:) हर्कत नै, येऊद्या जॉर्डन आरामात! आम्हाला भारताबाहेरचे सगळेच पर्वणीसारखे असते :)

नेटवर शोध घेताना हे सापडले.

असीरियन चर्च ऑफ द ईस्ट.

तुमच्या मुलाच्या वर्गातला मुलगा याच पंथाचा असावा.

चावटमेला's picture

9 May 2013 - 10:22 am | चावटमेला

छान माहिती. पुभाप्र

पिंपातला उंदीर's picture

9 May 2013 - 10:32 am | पिंपातला उंदीर

पण आर्य दक्षिणेकडच्या द्रविड लोकाणा त्यांच्या झिंझाळे केस काळा वर्ण आणि शरीर्यष्टीमुळे असुर म्हणत अशी पण थियरी ऐकली आहे. जसे की रावण

आदूबाळ's picture

9 May 2013 - 11:44 am | आदूबाळ

वाचतोय... पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:03 pm | मुक्त विहारि

पु.भा.प्र.

असुर हल्ली अजिबातच दिसत नाही.. कुठे आहे कोण जाणे..

लेखविषय उत्तम आहे. चर्चा वाचनीय होईल असे वाटते.

jaypal's picture

11 May 2013 - 1:17 pm | jaypal

वाचनीय आणि ज्ञानवर्धक चर्चेच्या प्रतिक्षेत