विक्रांत वरील आयुष्य

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 May 2013 - 11:14 pm

एका विमान वाहू नौकेवरील आयुष्य कसे असते त्यावरील हा चक्शुर्वैसत्यम अनुभव
विक्रांत हि १९६१ च्या डिसेम्बर मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. तेंव्हापासून ती समुद्रात उभी असल्यामुळे गंज लागणे हा भाग नित्याचा असतो. त्यामुळे काहीही केले नाही तरी त्याचा गंज लागलेला भाग साफ करणे आणि त्याला पुन्हा रंग लावणे हा नित्य देखरेखीच भाग होता. त्यावर साधारण पणे ८००-८५० नौसैनिक आणि ७० ते ८० अधिकारी कामावर हजर असत आणि जेंव्हा समुद्रावर जात असू तेंव्हा त्या ५० अधिकारी आणि २०० सैनिक गोव्याच्या नौदल तळावरून येत असत यात वैमानिक अभियंते आणि तंत्रज्ञ असत. हे सर्व लोक विमानाची पूर्ण दुरुस्ती जहाजावरच करू शकत असत. त्यामुळे युद्ध सरावासाठी जेंव्हा हे लोक जहाजावर येत तेंव्हा जहाज पूर्ण भरलेले वाटे आणि एक एक महिना किनार्याला स्पर्श सुद्धा न करता तुम्ही पाण्यात २४ तास राहता.
तेंव्हा तेथे वृत्तपत्र टीव्ही वगैरे काहीच नसे इंटरनेट तर नव्हतेच दिवस भर काम केल्यावर विरंगुळा म्हणून सर्व अधिकारी मेसच्या बार मध्ये दारू/शीतपेय पिण्यासाठी जमत. जहाज दिवसभर तापत असे सर्व ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा नसे. पंखा डोक्यावर फिरत असूनही घाम घाम होत असे कारण सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा जास्त असे त्यामुळे संध्याकाळी बारमध्ये बसून शीतपेय पिणे हा एक विरंगुळा असे एकत्र १०० च्या वर अधिकारी गप्पागोष्टी करण्यासाठी जमत हास्य विनोद आणि एक किंवा दोन पेग पिउन लोक हलके होत. ज्या वैमानिकांना दुसर्या दिवशी पहाटे उड्डाण करायचे असे ते दारू पीत नसत. जेवण झाल्यावर उड्डाण तळावर( flight deck) फिरणे हा एक विरंगुळा असे. दिवस सकाळी ६ वाजता सुरु होई सव्वा सहा ते पावणे सात वाजता PT(physical training) असे. त्यापूर्वी ५ . ४५ वाजता चहा येई.(मी कधी चहा साठी उठत नसे कारण तेवढाच अर्धा तास झोपायला मिळत असे. अंघोळी साठी पाणी सकाळी ०७. ०० ते ०७.०५ असे पाच मिनिटे येत असे. अधिकाऱ्यांचे स्नानघर वेगळे होते. त्यात २ x २ फुट असे दहा बारा कक्ष असत तीन बाजूला भिंती आणि समोर एक प्लास्टिकचा पडदा. फक्त कमरेला टॉवेल गुंडाळून साबण घेऊन आत जायचे शोवर घ्यायचा साबण लावायचा परत शोवर घायचा आणि बाहेर यायचे अंग पुसणे बाहेरच कारण पाच मिनिटात तीन जणानची तरी अंघोळ झाली पाहिजे. हाच प्रकार सैनिकांना. दिवसात दोन वेळा असे पाणी येत असे दुसरे संध्याकाळी सहा ते सहा पाच.
अंघोळ झाल्यावर गणवेश घालून नाश्त्यासाठी वार्ड रूम मध्ये. नाश्ता जेवण मात्र फारच छान असे. नाश्त्यासाठी एक ग्लास फळांचा रस त्यानंतर पाव, अंडी(आम्लेट, भुर्जी, स्क्रम्बलड एग )जे ऑर्डर कराल ते. त्यानंतर चहा किंवा कॉफी. शाकाहारी लोकांना टोमाटो आम्लेट कटलेट किंवा तत्सम पदार्थ गरम गरम येत असे. त्यानंतर ८ वाजता प्रत्येक अधिकारी आपल्या कक्षात कामासाठी जात असे. रोज सकाळी आपण आपले घड्याळ GMT(greenwitch mean time) प्रमाणे लावले जाते. सर्व कक्षात उद्घोषणा होत असे कि when I say time will be 07.30.fifteen seconds,पाच सेकंदानी ten seconds, परत पाच सेकंदानी five four three two one, time-- zero seven three zero . रोज दिवसात दोन वेळा आपण आपले घड्याळ बरोबर लावून घेत येत असे. माझे घड्याळ पुढे होते मागे होते अशी कारणे मुळीच स्वीकारली जात नसत. वेळ म्हणजे वेळ
रोज दुपारी साडे बारा ते दीड जेवणाची वेळ असे आणि दुपारी दीड ते साडे तीन परत काम.
अधिकार्यांना केबिन तुमच्या हुद्द्याप्रमाणे असे कनिष्ठ अधिकार्यांना चार जणांना एक केबिन . रेल्वे च्या ए सी टू तयार च्या कक्षा इतकी. मध्यम अधिकार्यांना तीच केबिन दोन जणांसाठी. यात चार फुटावर गादी आणि खाली कपडे इ ठेवण्यासाठी खण. वरच्या दर्जाच्या अधिकार्यांना तीच केबिन एकट्यासाठी त्यामुळे त्यात एक टेबल आणि खुर्ची पण येत असे. विभाग प्रमुखासाठी त्याहून मोठी केबिन असे. माझ्या सुदैवाने मी एकटाच डॉक्टर असल्याने मला अशी मोठी केबिन पण मिळाली होती ज्यात एक वाश बेसिन आणि आरसा सुद्धा होते. शिवाय कपाटे पलंग वगैरे गोष्टी पण होत्या.
या गोष्टी मला फक्त २ वर्षाच्या नोकरीत मिळाल्या होत्या. आणि माझ्याबाजुच्या केबिन मध्ये असलेले इतर अधिकारी अठरा ते वीस वर्षे नोकरी झालेले होते त्यामुळे त्यांच्यात एक मत्सराची छटा सुरुवातीला मला जाणवत असे. जसा जसा काळ गेला तेंव्हा ती भावना मावळत गेली आणि ते लोक माझे चांगले मित्र झाले. एकतर मी अश्विनी रुग्णालयातून थेट तेथे आलो होतो त्यामुळे माझे तेथील तज्ञ डॉक्टर बरोबर चांगले संबंध होते त्यामुळे त्यांच्या वैयक्तित अडचणीत मी त्यांना मदत करू शकलो आणि मला मिळालेल्या अधिकाराचा मी कधीही गैर वापर केला नाही. विक्रांत मध्ये विभाग्प्रमुखाना वापरण्यासाठी एक जीप होती मी तिचा एकदाही वापर केला नाही.(कारण त्या जीपची आणि माझी वेळ जुळवणे हे कटकटीचे काम होते) त्यापेक्षा स्वतःची मोटार सायकल वापरणे हे मला जास्त सोयीचे वाटे विक्रांत वर कितीतरी अधिकारी असे होते कि काटेकोर नियमांप्रमाणे ते थोडेसे वजनात अधिक होते. परंतु मी एकालाही केवळ तेवढ्या कारणासाठी बढतीसाठी अपात्र केले नाही कारण त्यांची शारीरिक क्षमता शारीरिक प्रशिक्षणाच्या दरम्यान जर व्यवस्थित होती तर केवळ ३ किंवा चार किलो वजन जास्त असेल तर त्या अधिकार्याला किंवा सैनिकाला अपात्र ठरवणे हे मला पटणारे नव्हते.
काही अधिकारी स्वतःला फारच महत्त्वाचे समजत असत. विक्रांत मध्ये एक तोफखाना अधिकारी होता( चार तोफखाना अधिकारी त्या खात्यात होते हा अधिकारी तिसर्या ज्येष्ठतेचा होता. हे अधिकारी तेथे असलेल्या चार विमानवेधी तोफा विमानात असणारी क्षेपणास्त्रे इ गोष्टीचे काम पाहत असत)
या अधिकार्याच्या मुत्र पिंडात खडे झाले होते ते त्याने जसलोक रुग्णालयात जाऊन lithotripsy करून आला होता. (यात कर्णातीत ध्वनी (ultrasound) ने त्या खडयानवर मारा केला जातो त्याने त्या खड्यांचा चुरा होतो आणि हा चुरा मुत्रा वाटे बाहेर पडतो.
तसा चुरा बाहेर पडल्यामुळे त्या अधिकार्याला अतिशय वेदना आणि लघवीत जळजळ होत होती. मी त्याला दोन दिवस वैद्यकीय रजा दिली. पण त्याने काम भागत नव्हते. मी त्याला सांगितले कि तुझी वर्षाची रजा शिल्लक आहे ती घे आणि आराम कर त्यावर तो म्हणाला डॉक्टर माझ्या विभागाचे काम कसे चालेल? मी त्याला शांत पणे म्हटले कि एक बैलगाडी चालली होती तिच्या खालून एक किडा जात होता त्या किड्याला वाटत होते कि आपल्यामुळे बैलगाडी चालली आहे तुझी तशी अवस्था आहे. विक्रांत तुझ्या जन्माच्या अगोदरपासून नौदलात आहे त्यामुळे तू आहेस कि नाहीस याने काहीही फरक पडत नाही. त्याला आपल्या विभाग्प्रमुखाला रजा मागण्याची लाज वाटत होती. मी तडक त्याच्या विभाग प्रमुखाला फोन केला आणि विचारले कि या अधिकार्याला रजा देण्यात काय अडचण अहे. विभाग प्रमुख म्हणाला कि डॉक्टर हा lithotripsy करून आला आहे हेच मला मुदलात माहित नाही तर त्याला रजा पाहिजे हे मला कसे कळणार? तू म्हणतोस तर त्याला एक महिना सुट्टीवर आजपासूनच जाऊदे मला काय अडचण येणार?काहीवेळा संकोचामुळे आपण आपले नुकसान करून घेत असतो
अशा तर्हेने तो अधिकारी एक महिना सुखात रजेवर गेला आणि परत येण्याअगोदर त्याचा अश्विनीत मी अल्ट्रा साउंड पण करवून घेतला. यानंतर तो माझा चांगला मित्र झाला.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

1 May 2013 - 11:34 pm | राघवेंद्र

डॉक्टर साहेब, मस्त सुरुवात झाली आहे. क्रमशः पाहुन बरे वाटले.
तुमच्या अनुभवातुन बरेच शिकण्यासारखे असते.
राघवेन्द्र

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 May 2013 - 10:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

+१००००

रेवती's picture

1 May 2013 - 11:42 pm | रेवती

वाचतीये.

आजकाल लोक फार वैताग्ले आहेत याला !!!

पिवळा डांबिस's picture

2 May 2013 - 12:39 am | पिवळा डांबिस

छान सुरवात आहे. वाचतोय.
पूर्वी यु एस एस रोनाल्ड रीगन या जगातील सध्याच्या सर्वात मोठया आण्विक विमानवाहू नौकेवरची फिल्म पाहिली होती. त्यात तिच्या कॅप्टनला मुलाखतीत एक प्रश्न विचारला गेला होता, "तुम्हाला या शिपवर काही डेंजरस असं वाटतं का?"
कॅप्टनचं उत्तर, "छे, छे, अजिबात नाही! असं बघा, हिच्या पोटात एक सोडून दोन न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर आहेत, डेकवर अ‍ॅक्टिव्ह एअरपोर्ट आहे आणि जिथे-तिथे ठासून भरलेला दारूगोळा आहे! छे, डेंजर कसलं!!!"
:)
गेल्या महिन्यातच सान डियागोला गेलेलो असतांना यु एस एस मिडवे ला भेट देऊन ती आतून-बाहेरून पहाण्याचा योग आला. तेंव्हा यु एस एस रोनाल्ड रीगन आणि यु एस एस कार्ल व्हिन्सेन (जिच्यावरून ओसामाला जलसमाधी दिली ती) या देखील बाहेरून पाहिल्या. त्यावेळेस या विमानवाहू नौकांवरच्या आयुष्याची बरीच माहिती मिळाली. फोटोही घेतले आहेत, तुमची मालिका संपली की इथे टाकीन मिपाकरांसाठी....

सुबोध खरे's picture

2 May 2013 - 9:58 am | सुबोध खरे

पिडा साहेब,
अमेरिकन विमानवाहू जहाजे हि आण्विक शक्तीवर चालणारी असल्याने ती पूर्णपणे वातानुकुलीत असतात शिवाय त्यांचा आकार चार ते पाचपट मोठा(विक्रांत अठरा हजार टन आणि रोनाल्ड रेगन १ लाख टन) असल्याने आणि अणुभट्ट्या असल्याने ती जहाजे अतिशय स्थिर असतात त्यामुळे त्यात जहाज "लागणे " असे प्रकार होत नाहीत.रोनाल्ड रेगन ची किंमत २१६० अब्ज रुपये होती. शिवाय अमेरिकेत बर्याच विमानवाहू नौका असल्याने त्यांच्या देखभालीला पूर्ण वेळ दिला जाऊ शकतो या विरुद्ध भारतात पूर्वी आणि आता एकच आणि नंतर फक्त काही काळासाठी दोनच विमानवाहू नौका होत्या त्यामुळे युद्धनीती आणि डावपेचांसाठी(strategy and tactical reasons) त्यांची देखभाल पूर्ण झाली नसेल तरीही त्यांना परत ताफ्यात पुढच्या कामगिरीसाठी पाठविले जात असे याचा परिणाम त्यांच्या उर्वरित आयुष्यावर होत असतो.
भारतीय रेल्वे आणि युरेल किंवा TGV यात दिसणाऱ्या फरकासार्खाच हा फरक आहे.
एकच आहे कि अमेरिकन जहाजे एकावेळी वर्षानुवर्षे समुद्रात असतात आणि फारच क्वचित किनार्याच्या जवळ येतात त्यामुळे त्यावरील आयुष्य जास्तच एकसुरी(monotonous) असते.
आपले फोटो आपण यात आत्ताच टाकले तर जास्त बरे होईल कारण लोकांना विमानवाहू नौका म्हणजे काय ते जास्त चांगले समजू शकेल.विक्रांतचे फोटो माझ्याकडे पण आहेत पण ते सार्वजनिक व्यासपीठावर टाकण्यासाठी मला परवानगी घ्यावी लागेल अन्यथा नसते लचांड मागे लागण्याची शक्यता आहे.
काही फोटो विकिपीडिया वर आहेत http://en.wikipedia.org/wiki/INS_Vikrant_(R11)

पिवळा डांबिस's picture

3 May 2013 - 8:54 am | पिवळा डांबिस

पहिल्याप्रथम,
हे पिडासाहेब वगैरे म्हणायचं थांबवा पाहू!
अहो, इथे मिपावर साहेब वगैरे म्हणवून घ्यायचं असतं तर 'पिवळा डांबिस' हा आयडी घेतला असता का?
तेंव्हा पिडां म्हणा, डांबिस म्हणा, किंवा या मिपाचा संस्थापक तात्या अभ्यंकर म्हणायचा तसं 'डांबिसा फोकलीच्या' म्हणा!!!
:)
तुम्ही वर्णन केलेली आण्विक विमानवाहू नौकेबद्दलची माहिती खरी आहे. तिथे (एन्क्लोज्ड स्पेसमध्ये) उकाडा होणे, बोट लागणे वगैरे गोष्टी होत नसाव्यात. मी लिहिलेला प्रतिसाद हा साध्या आणि आण्विक विमानवाहू नौकांची तुलना करण्यासाठी लिहिलाच नव्हता. दुर्दैवाने मला विक्रांत पहाण्याचं भाग्य लाभलं नाही. मी जेंव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलो तेंव्हा ती अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिसमध्ये होती. मी जेंव्हा ही इथली जहाजं पाहिली तेंव्हा त्यांच्या प्रचंड आकारांनी आणि क्षमतेने मी भारावून गेलो. पाण्याच्या वर सात मजले (पाण्याखाली आणखी दोन्-तीन मजले असतील)निव्वळ अस्सल आणि उत्कृष्ट पोलाद, क्लास वन मशिनरी, अत्युकृष्ट दारूगोळा आनि हे सगळं हॅन्डल करणारी ती पोलादी हिंमतीची (छातीची म्हणत नाहिये कारण त्यात सबस्टॅन्शियली महिलाही आहेत) माणसं!!!!

कोस्टल नेव्ही आणि ब्ल्यू वॉटर नेव्हीचे इश्श्यूज वेगवेगळे आहेत हे पूर्णपणे मान्य आहे. पण रात्रंदिवस चालणारं टेक्-ऑफ आणि लॅन्डिंग, महिला सैनिक-इव्हन फायटर पायलट्स देखील, जवळ-जवळ ५००० क्रू, त्यांचा स्वतःचा पिन कोड नंबर, इव्हन वॉरमध्ये नसतांनाही ही सगळी अजस्त्र यंत्रणा घड्याळाच्या काट्याबरहुकूम चालवायची हे मलातरी इंप्रेसिव्ह वाटलं.

जर माझा प्रतिसाद तुम्हाला अप्रस्तुत वाटला असेल तर त्याबद्दल मनःपूर्वक क्षमस्व. तुमचं लिखाण मला आवडतं त्यामुळे हा धागा हायजॅक करण्याचा विचारही मनात नव्हता. तेंव्हा पुढील भागांच्या प्रतिक्षेत....
चूभूद्याघ्या...

सुबोध खरे's picture

3 May 2013 - 9:29 am | सुबोध खरे

पिडासाहेब,
धागा हायजॅक वगैरे माझ्या मनात काहीही आलेले नव्हते उलट मला लोकांना काही गोष्टी यथातथ्य दाखवायच्या होत्या. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारणे आवश्यक असते. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आपली सद्य स्थिती काय आहे आणि आपल्याला कोठे जायचे आहे हे जर नक्की माहिती असेल तरच आपण प्रगती करू शकतो तेंव्हा आपले सैन्य जगातील कोणत्याही देशाला भारी पडेल आणि आपण चीन किंवा पाकिस्तान मध्ये सैन्य घुसवून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे अशा राणा भीमदेवी गर्जना करणाऱ्या लोकांना वस्तुस्थिती माहित होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे नक्कीच आहे.
सैन्यात असताना आम्हाला सुद्धा अशा अमेरिकन किंवा रशियन लष्करातील अद्ययावत गोष्टींची माहिती व्हिडियो वगैरे दाखविले जात असत किंवा चर्चा केली जात असे कि आपण कुठे आहोत आणि कुठे जात आहोत ज़र आज तुम्ही पुढच्या पन्नास वर्षांच्या आराखड्याचा विचार केला नाहीत तर तुम्ही दिशा हीन होण्याची शक्यता असते. आता राजकीय पातळीवर होणार्या दिरंगाई/ भ्रष्टाचारा बद्दल लष्करी अधिकार्यांना काही करता येत नाही हा भाग वेगळा.
तेंव्हा तुम्ही क्षमा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट या गोष्टी समोर आणल्याबद्दल मीच तुमचे आभार मानु इच्छितो.म्हणूनच मी रोनाल्ड रेगन चा उत्पादन खर्च किती आहे तो आकडा टाकला होता.
गैरसमज नसावा
क लो अ
आपला
सुबोध

पिवळा डांबिस's picture

3 May 2013 - 9:55 am | पिवळा डांबिस

आपले सैन्य जगातील कोणत्याही देशाला भारी पडेल आणि आपण चीन किंवा पाकिस्तान मध्ये सैन्य घुसवून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे अशा राणा भीमदेवी गर्जना करणाऱ्या लोकांना वस्तुस्थिती माहित होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे नक्कीच आहे.

१००% सहमत. मी अन्यत्र खालील अरण्यपंडिती प्रतिसाद जेंव्हा वाचला तेंव्हा मी हतबुद्ध झालो. सांगावसं वाटलं की, "बडी, थिंक बिफोर व्हॉट यू विश!!!"
http://www.misalpav.com/comment/483105#comment-483105
:)
सारांश काय, नो गैरसमज फ्रॉम माय साईड!
:)

अजितजी's picture

2 May 2013 - 1:00 am | अजितजी

सुरेख लिखाण !

मोदक's picture

2 May 2013 - 1:17 am | मोदक

पु भा प्र.

सानिकास्वप्निल's picture

2 May 2013 - 2:03 am | सानिकास्वप्निल

वाचत आहे.

स्पंदना's picture

2 May 2013 - 7:37 am | स्पंदना

वाचते आहे.

सहज's picture

2 May 2013 - 8:16 am | सहज

क्रमशः आहे हे फार आवडले.

वाचत आहे.

प्रीत-मोहर's picture

2 May 2013 - 8:49 am | प्रीत-मोहर

वाचतीये

तुमचा अभिषेक's picture

2 May 2013 - 10:43 am | तुमचा अभिषेक

तुमचे नेहमीच वाचतो.. वेगळ्या जगाची सफर आणि सहजसुंदर लिखाणशैली...
पुढच्या भागाची वाट बघतोय..

चाणक्य's picture

2 May 2013 - 11:54 am | चाणक्य

+१

मन१'s picture

2 May 2013 - 12:04 pm | मन१

वाचतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2013 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग...

विसोबा खेचर's picture

2 May 2013 - 12:40 pm | विसोबा खेचर

येऊ द्या साहेब..

Mrunalini's picture

2 May 2013 - 2:14 pm | Mrunalini

मस्त भाग. पु.भा.प्र. :)

सुमीत भातखंडे's picture

2 May 2013 - 3:24 pm | सुमीत भातखंडे

पु.भा.प्र.

सूड's picture

2 May 2013 - 4:27 pm | सूड

पु भा प्र !!

बॅटमॅन's picture

2 May 2013 - 5:09 pm | बॅटमॅन

पुभाप्र!!!!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

2 May 2013 - 5:10 pm | मनोज श्रीनिवास जोशी

सुबोध - हा भाग खूप आवडला. माहिती नेमकी आणि थेट भिडणारी. फोटो सावकास चालतील.
वेळ आणि वजन पाळणे म्हणजे घड्याळाचा काटा आणि वजन काटा- हे जरा सिविलीयान साठी जास्तच - वाचून मात्र अंगावर "काट" आला.

सुबोध खरे's picture

2 May 2013 - 8:29 pm | सुबोध खरे

जोशी साहेब,
लष्करातील आयुष्य हे काटेकोर असावे लागते कारण लष्करात अधिकार्यांना नेतृत्वगुण शिकवण्याच्या वेळी एक वाक्य परत परत शिकवले जाते.राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये हे वाक्य मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे.
TRAIN YOUR TEAM TO WIN THE WAR AS THERE IS NO RUNNERS UP AWARD IN WAR.
युद्धात दुसरया क्रमांकाला पारितोषिक नसते

ढालगज भवानी's picture

2 May 2013 - 7:24 pm | ढालगज भवानी

कीड्याची उपमा आवडली.

पैसा's picture

2 May 2013 - 7:39 pm | पैसा

क्रमशः वाचून बरे वाटले!

अग्निकोल्हा's picture

2 May 2013 - 9:28 pm | अग्निकोल्हा

पुभालटा.

जेनी...'s picture

2 May 2013 - 9:43 pm | जेनी...

.

कोमल's picture

2 May 2013 - 9:50 pm | कोमल

पु.भा.प्र.

मदनबाण's picture

2 May 2013 - 10:12 pm | मदनबाण

आपले लेखन वाचतो आहे,असेच लिहीत रहा.

फारच छान अनुभव आहेत तुमचे.

अभ्या..'s picture

3 May 2013 - 1:55 pm | अभ्या..

डॉक्टरसाहेब वेगळेच जग आहे हो हे. माहीतीबद्दल धन्यवाद.
बाकी २ मिनिटात आंघोळ हे काय आपल्याला आयुष्यात जमणारा प्रकार नाही. ;)

सुबोध खरे's picture

4 May 2013 - 10:24 am | सुबोध खरे

दिवसात दोन वेळा ५ मिनिटे पाणी येणार.त्यात तुम्ही दिवसभर ३६ ते ३८ सेल्सियस मध्ये ८५ टक्के सापेक्ष आर्द्रतेत राहिल्यावर जे मिळेल ते गोड मानुन घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. विक्रांत हि वाफेवर चालत असे आणि त्या वापरलेल्या वाफेचे शीत करण करून हे साठ टन पाणी रोज मिळत असे म्हणजे दर डोई पन्नास लिटर(तीन बालद्या) यात तुमचे कपडे धुणे भांडी घासणे स्वयंपाक इ सुद्धा येत असे त्यामुळे हे रेशनिंग.
जो मिल गया उसिको मुकद्दर समझ लिया
जो खो गया मै उसको भूलाता चल गया