मराठमोळे शेंगोळे

गौरीबाई गोवेकर's picture
गौरीबाई गोवेकर in पाककृती
19 Apr 2013 - 2:03 pm

हा पदार्थ अगदी अनवट आहे. अगदी एखद्या अनवट रागासारखा, दुर्मीळ पण अत्यंत श्रवणीय (खवणीय :)) हा काही खासाहेबांचा पदार्थ नाही. याचा शोध मला खूप नंतर म्हणजे मी स्वतंत्रपणे मैफीली करायला सुरवात केल्यानंतर. कसा लागला ते सांगेन शेवटी. पण आधी पाकृ. पाहू. पदार्थ दिसायला एवढा अ‍ॅट्रेक्टीव दिसत नाही गार्नीशिग केल्यास छान दिसेल. कसले करावे ते सुचवा.

शेंगोळे: साहित्य कुळथाचे पीठ ३ वाट्या, लाल सुक्या मिरच्या सहा सात (आवडी प्रमाणे अजूनही चालतील)., १ वाटी चिरलेली कोथिंबिर , १ चमचा जिरे पावडर, आठ दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी तेल. मीठ.

कुळथाचे ताजे पीठ घ्यावे.
ithe
सुक्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरेपुड असे एकत्र बारीक वाटून घ्या.

मसाला

हा वाटलेला मसाला कुळथाच्या पिठात घाला चवीप्रमाणे मीठ घाला. पाणी घालून पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरा घट्ट मळून घ्या, त्याला तेलाचा हात लावून गोळा करून घ्या.
तयार पिठाचा गोळा

आता पोळपाटाला जरा तेलाचा हात लाउन लांब शेवयांप्रमाणे पण जाड अशा शेंगा करायच्या आहेत त्या वळताना जरूर पडल्यास तेलाचा हात लावत रहा.
शेंगोळे

वळलेले शेंगोळे (शेंगा)

गॅसवर एका पातेल्यात अंदाजे शेंगा बुडून दोन बोटे उरेल एवढे पाणी घेऊन आधण ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात तीन चमचे तेल घाला.उकळी येउद्या. आता वळलेल्या शेंगा त्यात हळू हळू सोडायच्या आहेत. सगळ्या शेंगा सोडल्यावर पाच ते दहा मिनिटे त्या शिजूद्या.
i

मस्त खमंग वास सुटलेला असेल तोंपासू. एखादी शेंग काढून शिजल्या का पहा. शिजल्यावर खाली उतरवा. गरमा गरम सर्व करा.

तयार शेंगोळे

ह्यात अजूनही एक व्हेरिएशन करता येते.तेही अतिशय चविष्ठ लागते ते करायचे असल्यास वरीलप्रमाणे शिजलेले शेंगोळे गरम असतानाच चाळणीवर काढून पाणी असल्यास काढून टाका. मग मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट याची मस्त फोडणी करा, त्या वर हे शेंगोळे मस्त खरपूस परता. वर कोथिंबीर, अगदी बारीक चिरलेला कांदा घालून फस्त करा.

हा पदार्थ पोट भरीचा म्हणून वन आयटम मील म्हणून करता येतो. नुसताच खायचा असतो.

आता ही रेसिपी कशी मिळाली या विषयी:
गाव कुठले ते आठवत नाही पण नाशीकच्या पुढचे कुठलेतरी शुगर लॉबीचे होते. एका साखर कारखान्याच्या वार्षिक समारंभात एका दिवशी माझी मैफल ठरलेली. संध्याकाळची. मी आणि साथीदार त्या दिवशी सकाळीच पोचलो. कारण ती एकच गाडी होती. स्टेशनवर त्यांची गाडी नेण्यासाठी आलेली. दीड तासांचा प्रवास करून त्या ठिकाणी पोचलो. कारखान्याच्या रेस्ट हाउसवर सगळे उतरलो. व्यवस्था उत्तम. कार्यक्र्म छान झाला, आधी श्याम कल्याण गायलेला आठवतो.
त्यांचे साहेब म्हणजे राजकारणातले, सहकारातले मोठे प्रस्थच होते. म्हणाले बाई, आमच्या शेतावर तुम्हा सग़ळ्यांना पार्टी आहे आमच्या घरची मंडळी देखील आहेत. मी जरा घाबरलेच. पण पार्टी म्हणजे वनभोजनासारखे असे समजले. त्यांच्या घरून बायका मंडाळी येऊन बोलावू लागली. शेवटी साथीदारांसकट जायचे ठरवेले तिथे हा पदार्थ केला होता. जोडीला भुईमुगाच्या शेंगा, शेतातला गुळ असे काही पदार्थ होते. पदार्थ समोर आला तर खाण्याचे धैर्य होइना. पण माणसे निर्मळ होती. विश्वास ठेउन खाल्ला. लाजबाब चव. आणि मग कृति वगैरे विचारली. भरपूर हाणला. नंतरही अनेकदा कार्यक्रमासाठी तिथे जाणे झाले.

निघतांना कुळथाचे पिठ जवळ जवळ पाच सहा किलो असेल. दिले होते. नंतर अनेकदा केला अजूनही करते. माझा मुलगा शिकायला परगावी होता करायला सोपे, पोट भरणारे म्हणून त्यालाही देत पीठ देत असे बरोबर. त्याला आणि त्याच्या मित्रांना प्रचंड आवडायचे. आता या गोष्टीला चा़ळीस एक वर्ष झाली असतील. आमच्याकडे सगळ्यांना आवडतो. अगदी नातवंड सुध्दा खातात. पण जरा याचे रूप सुधारायचे आहे, काय करता येईल तुम्ही सांगा. चवीची मात्र गॅरेंटी आहे.

गंम्म्त म्हणजे कुळीथ कोकणात पण होतो पण हा पदार्थ मात्र कोकणात केल्या जात नाही नाशिक पासून खानदेश पर्यंत एक विशिष्ट पट्टा आहे. तिथेच हा पदार्थ माहित आहे. करुन बघा आणि सांगा.

टीप: ईथे चित्रे दिसत नसतील तर ईथे पहा: https://plus.google.com/photos/113291661719853313847/albums/586845538734...

प्रतिक्रिया

गौरीबाई गोवेकर's picture

19 Apr 2013 - 2:09 pm | गौरीबाई गोवेकर
मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 2:30 pm | मुक्त विहारि

आता नक्की करुन पाहिन. म्हणजे, बायको करेल आणि मी खाईन.

चांगली आहे पाकृ.. करुन बघायला पाहिजे. ह्या शेंगोळ्या तांदळ्याच्या किंवा गव्हाच्या पीठाच्या असतात, असं कुठे तरी वाचले होते. पण ह्या कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या एकदम नवीन वाटल्या.

रोहिणी पानमंद's picture

19 Apr 2013 - 4:27 pm | रोहिणी पानमंद

शेंगोळ्या तांदळ्याच्या किंवा गव्हाच्या पीठाच्या असतात हे जरा नवीनच वाटले. आमच्याकडे शेंगोळ्या कुळथाच्या पिठाच्याच करतात. फार जुना पदार्थ आहे हा आणि हेल्दीसुद्धा!!!!!!!!!

किसन शिंदे's picture

19 Apr 2013 - 4:25 pm | किसन शिंदे

शेवटी आली म्हणायची शेंगोळ्याची पाककृती, मला वाटतं गविंना हि पाककृती हवी होती.

कुळीथ आणि हुलग्याचं पीठ म्हणजे एकच का?

गौरीबाई गोवेकर's picture

19 Apr 2013 - 6:35 pm | गौरीबाई गोवेकर

होय. कुळीथाच पिठ म्हणजेच हुलग्याचं पिठ.

भारतात खान-पानाचे केवढे वैविध्य आहे. हा पदार्थ माहीतच नव्हता.

माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात खाद्य वैविध्य सर्वात अधिक आहे.
उदा. बटाट्याची भाजी घ्या..
काचर्‍या, उकडून, कांद्यासह काचर्‍या, उकडून कांद्यासह, बटाटा कांदा रस्सा काळ्या मसाल्याचा चिंच गूळ घालून, बटाटा उकडून
वांग्यासह रस्सा, बटाटा उपवासाची भाजी, बटाटा किसून भाजी बटाटा हिरवे टमाटो रस्सा नारळाचा कीस घालून ...दही बडीशेप बटाटा रस्सा .. यादी लांब आहे ,

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 5:29 pm | स्मिता चौगुले

ह्या शिंगोळ्या आम्ही चनाडाळीच्या पिठाच्या(बेसन) करतो, या तशाच खातात किंवा

या शिंगोळ्या आमटीत सोडून "शिंगोळ्याची आमटी " हा प्रकार केला जातो

आता कुलीथाच्या करून पाहायला हव्यात

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 11:46 pm | प्यारे१

ह्या शिंगोळ्या आम्ही चनाडाळीच्या पिठाच्या(बेसन) करतो, या तशाच खातात किंवा

या शिंगोळ्या आमटीत सोडून "शिंगोळ्याची आमटी " हा प्रकार केला जातो

+१
साधारण 'कटा'ची आमटी असते तशा आमटीबरोबर भाकरी.
ढासू लागतो हा प्रकार. व्यवस्थित शिजला पाहिजे मात्र.

स्पंदना's picture

19 Apr 2013 - 5:43 pm | स्पंदना

ओह्ह! धिस्श इज पास्ता? सो कुऽऽल!

मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 6:03 pm | मुक्त विहारि

पास्ता = भारतीय शेंगोळ्या.

पैसा's picture

19 Apr 2013 - 6:22 pm | पैसा

छान प्रकार आहे. दिसण्याचं राहू द्या. पण खूप पौष्टिक आहे हा प्रकार.

हाहाहा दिसण्याचं राहू द्या ;) खरय!!!

आदूबाळ's picture

19 Apr 2013 - 8:10 pm | आदूबाळ

दिसण्याचं राहू द्या.

हे शब्द पाकॄंच्या संदर्भात धोक्याचा लाल दिवा आहेत!

सुरेख आहे पदार्थ! असे पदार्थ पहायचे नसतात, खायचे असतात. ;) आमच्याकडे हा पदार्थ बाजरीच्या पिठापासून करतात. जाडसर शेंगोळे कडबोळीसारखे पोळपाटावर वळतात व जो मसाला तुम्ही पिठात घातलाय तो उकळी आलेल्या पाण्यात घालून त्यात शेंगोळ्या शिजवतात. सुकंखोबरं आणखी काय काय मसाला भाजून कुटून त्यात अर्धा चमचा बाजरीपीठ घालून पाण्याला लावतात. दाटपणा व चव येण्यासाठी. आता आठवण आलीये तर करून बघते. तुम्ही इतके बारीक शेंगोळे कसे वळलेत? शेवेचा सोर्‍या वापरला की काय?

गौरीबाई गोवेकर's picture

19 Apr 2013 - 8:26 pm | गौरीबाई गोवेकर

हो. तू म्हणतेस तसा पण एक प्रकार ऐकलाय. सुकं खोबर पण घालतात. जास्तच खमंग लागतात.

तुम्ही इतके बारीक शेंगोळे कसे वळलेत? शेवेचा सोर्‍या वापरला की काय?

पोळपाटावरच हातानेच वळलेत. जरा वेळ लागतो. पण आजीबात कच्चे नाही रहात.

रेवती's picture

19 Apr 2013 - 9:55 pm | रेवती

ओक्के. धन्यवाद.

उपास's picture

19 Apr 2013 - 9:11 pm | उपास

देशावरचा पदार्थ आहे. पोलिस (निळ्या वाटाण्यांची उसळ - कारण त्या काळी पोलिस हवालदाराम्चा ड्रेस निळा असे), शिंगोळे, कळण हे पदार्थ हाटेलात मिळणार नाहीत. जुनी जाणती सुगरणच पाहिजे त्यासाठी. आजीच करायची बरेचदा.
शिंगोळे नीट शिजणे महत्त्वाचे, कच्चट राहाता उपयोगी नाही. पोटभराऊ आणि चविष्ट पदार्थ एकदम.
पाकृ बद्दल धन्यवाद!

त्रिवेणी's picture

19 Apr 2013 - 9:29 pm | त्रिवेणी

माझ्या आवडीचा पदार्थ पण कधीच नाही जमलेल्या पद्धर्थांमधील एक. माझी एक मैत्रीण कॉलेजला असताना डब्यात आणायची. मी हे शेंगोळे पाणी उकल्यावरच टाकते तरी प्रत्येक वेळी विरघळतात.
मग मी ते नवर्‍याला सूप म्हणून पाजते.

मग मी ते नवर्‍याला सूप म्हणून पाजते.

हाहा :)

अभ्या..'s picture

21 Apr 2013 - 3:45 pm | अभ्या..

नवरेबुवा काय म्हणून पितात? ;)
(ह. घ्या हो तै)

मॄदुला देसाई's picture

20 Apr 2013 - 6:22 am | मॄदुला देसाई

एकदम तोंपासु पाककृती...फार पुर्वी खाल्ला होता हा पदार्थ. आता करुन बघेन एकदा. पाककृतीसाठी आभार :)

कच्ची कैरी's picture

20 Apr 2013 - 7:55 am | कच्ची कैरी

आमच्याकडे शेंगोळ्या बेसनाच्य करतात आणि भाजलेल्या कांद्याच्या आणि भाजलेल्या सुक्या खोबर्याच्या आमटीत शिजवुन बाजरीच्या भाकरीसोबत खातात .हा घ्या फोटो -
shengolya

चंपाबाई's picture

3 Jul 2016 - 11:25 am | चंपाबाई

बेसनाचे शेंगोळे पोळी / भाताबरोबर खातात. साइड डिश / भाजी

कुळथाचे / ज्वारीचे शेंगोळे ही स्वतःच वन डिश मील आहे.

http://www.maayboli.com/node/52479

सान्वी's picture

20 Apr 2013 - 11:12 am | सान्वी

मी नाशिक चीच. हे शेंगोळे लहाणपणापासुन खात आले आहे आईच्या हातचे. तीची पद्धत जरा वेगळी आहे. तुम्ही नन्तर फोडणी देतात, त्याऐवजी ती तयार शेंगोळे नुसते पाण्यात सोडण्याऐवजी त्याच पाण्याला आधी हिन्ग, हळद, थोड तिखट याची फोडणी देते. आणि ज्यादा पाणी फेकुन न देता त्यातच शिजवते. थोड पाणी राहिले तरी चालते. अफलातून लागतात.... करुन पहा....

खरच खुपच छान ! आम्हाला पण खुप आवड्तो हा पदार्थ

पण कुळिथ पीठ आवडत नाहि (त्याचं पिठलं तर दुरच) म्हणुन कच्ची कैरी प्रमाणे बेसन वापरुन करुन बघिन. पण शीजल्यावर हे एवढे सुटे राहतात का? आय मीन गोळा होउन लगदा नाहि ना होत?

कुठीथाच्या पिठाला एक वेगळ्याच प्रकारचा नैसर्गीक स्वाद, खमंगपणा असतो तो बेसनाला नाही. तुम्ही कुठीथ पीठ जरासे भाजून घेऊन बघा आवडते का..

माझी आजी करायची शेंगोळ्या आणि त्यासाठीचा रस्सा. आजी शेंगोळयांसाठी तुरडाळीचं रवेदार पीठ वापरायची. बाकी कृती कच्ची कैरी यांनी सागितल्याप्रमाणेच.

सानिकास्वप्निल's picture

22 Apr 2013 - 4:45 pm | सानिकास्वप्निल

शेंगोळ्या कधी खाल्ल्या नाही , घरी कुळीथ नाही त्यामुळे बाजरीच्या करुन बघेन.
पौष्टीक पाककृतीबद्दल धन्यवाद :)

ललिता भारति's picture

28 Aug 2013 - 5:45 pm | ललिता भारति

हा पदार्थ माजि आई बनवते हा पुने नगर भागात बनवला जातो खुपच छान, अप्रतिम लगतो , आई नेहमी पावसाल्यात बनवते. दोन दिवसान पुवी मि ओफिस मधे याचि रेसिपि सागित्लि. शेगोले लसुन मिरचि चतनि बरोबर पन खातात . खुप चुका आहेत माफि असावि

चौकटराजा's picture

28 Aug 2013 - 6:06 pm | चौकटराजा

मधून मधून आमच्याकडेही हा पदार्थ होतो. कारण बायकोचे आजोळ नसिकला आहे. आम्ही कणिक वापरतो. पण खमंग भाजणीत थोडे डाळीचे पीठ मिसळून ही हा पदार्थ मस्त होईल. जोडीला आंबा, लिंबू, किंवा माईन मुळीचे लोणचे असले म्हणजे वा !

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 6:51 pm | पिलीयन रायडर

समजा आपल्याला मॅगी सारख्या जाड नुडल्स घरी करायच्या आहेत. आणि त्या उकडुन मग त्यात भाज्या टाकुन मस्त परतुन घ्यायच्या आहेत. तर त्या साठी कोणते पीठ वापरावे? म्हणजे नुडल्स तुटणार नाहीत

कुळीथ खूप आवडतो, त्याचे उसळ, कळण, पिठले, लाडू हे प्रकार माहित आहेत, ते आवड्तात सुध्दा! पण हा प्रकार नव्हता माहित! आता नक्की करून पाहिन.

चौकटराजा's picture

29 Aug 2013 - 8:18 am | चौकटराजा

कुळीथ आवडणारच !

आमच्याकडे शेंगोळ्या करताना दोन्ही टोके जुळवून त्याची कडी करतात. मग मातीच्या बैलाच्या शिंगात एकेक कडी अडकवायची. शिंगात घालतात म्हणून नाव शेंगोळ्या असावे असेच मला वाटत होते.

बरखा's picture

4 Jul 2016 - 4:43 pm | बरखा

शेंगोळे हा माझा आवडीचा पदार्थ आहे. आमच्या कडे उन्हाळा सोडुन बाकी सर्व ऋतूत केला जातो. ह्याला चकली सारखा गोल आकार देउन करतो आम्ही त्या मुळे दिसायला छान दिसतो. खास करुन भाकरी बरोबर खायला छान लगतो. तसेच ह्याच्या रस्स्या मधे गरम गरम भात आणि तुप टाकुन पण खायाला छान लगत. ( आवडत असल्यास सोबतीला कच्चा कांदा खाउन बघा)

माझाही हा पदार्थ अगदी जीव की प्राण म्हणावा इतका आवडीचा आहे. हुलगे उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात खात नाहीत. मीही लहानपणी तिखटपणा कमी व्हावा म्हणून यात बाजरीची भाकरी कुस्करुन खायचे. तूप अजूनही घालते ;) सोबतीला थंड ताक म्हणजे अर अहाहा!