"अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
8 Jul 2008 - 8:00 pm

"अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला."
"करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे"

मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली.खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
" काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?"
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.
चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
"स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?"
स्नेहा मला म्हणाली,
"कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा "फाया" म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला."
"असा काय मेसेज मिळाला सांग पाहू "असं मी तिला म्हणालो.
"तेच सांगते"
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
"त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती
पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे"सदा मरे त्याला कोण रडे" अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचा
प्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसल तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही."आलिया भोगासी असावे सादर" ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?."
"तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर." असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
" मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो.तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो.तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितीत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
" आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, "निरोगी मौज" बरोबर नां?"
"होय अगदी बरोबर असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे

ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं "सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे"
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.

ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम
मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
"खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?"
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे "अत्तर" "फाया" हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.

"सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया"

श्रीकृष्ण सामंत

कथा