सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
28 Mar 2013 - 12:37 pm

हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता.
एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी
वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता.
आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा.
यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला.
यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली.
आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत)
शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे
माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते.
माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत.
हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

खबो जाप's picture

2 Apr 2013 - 12:09 pm | खबो जाप

मला एकच वाटत कि नैसर्गिक रित्या येणाऱ्या आजारात जसे कॅन्सर किव्हा अनुवौशिक रोगांमध्ये रुग्णापासून काही माहिती लपवणे किव्हा नातेवाईकांना थोडी ज्यास्त माहिती सगुण काळजी घेण्यास सांगणे ह्याला हरकत नसावी,पण आपण होवून ओढवून घेतलेल्या आजारात ( अनैतिक संबंध, एड्स, ड्रग्स किव्हा तत्सम ) रुग्णाला मुदाम सगळे खरे सांगावे कि त्याची चूक काय आहे किव्हा काय चूक केली आहे आणि काय होणार आहे .....

डॉक्टर साहेब तुम्ही लिहित राहा, तुमचे विचार / अनुभव किव्हा त्यवाराची चर्चा साधक/बाधक कशीही असो पण त्याने आमच्या ज्ञानात भरच पडत राहील ...
आणि एक
पुढे पुढे चालावे, ज्याला समजावून पटत नाही त्यासी फाट्यावर मारावे !!.........

सुबोध खरे's picture

4 Aug 2013 - 10:44 am | सुबोध खरे

काल सकाळी माझ्याकडे एक तरुण जोडपे आले होते. त्यातील बाईना ओटीपोटात दुखत होते. त्यांचा सहा महिन्यापूर्वी गर्भपात झाला होता त्यावेळी मी त्यांची सोनोग्राफी केली होती त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता.( मी सोनोग्राफी करताना रुग्णाची परवानगी असेल तर जवळच्या नातेवाईकाला तेथे उपस्थित राहण्याची परवानगी देतो) सोनोग्राफी करताना त्यांचे यजमान मला अतिशय काळजीने विचारत होते कि डॉक्टर तिचे पोट फुगले आहे काही गैस वगैरेचा प्रकार तर नाही. मी त्यांना सांगितले कि असे काही नाही. त्यांनी परत परत काळजीने विचारले कि मग पोट का फुगले आहे. मी शेवटी त्यांना पडद्यावर मोजून दाखवले कि त्यांच्या पोटावर दीड इंच चरबी चढली आहे.यावर त्या बाईना कानकोंडे झालेले दिसत होते (मधल्या सहा महिन्यात त्या बाईंचे वजन बर्यापैकी वाढले होते).(बाकी त्यांना अपचनच होते) आता मला परत हाच प्रश्न पडला कि हे सत्य नवर्याला सांगणे चूक कि बरोबर?

डॉक्टरसाहेब, खूप दिवसांनी आपला लेख वाचायचा योग आला व लेख वाचून बरे वाटले. दोनेकशे प्रतिसादही आलेले दिसत आहेत म्हणजे या संथळावरही आपले छान स्वागत झालेले दिसते. सुरेख,,,,,!
न्या.मू. काटजूंच्या संजय दत्तवरील ब्लॉगवर भाष्य करताना (http://justicekatju.blogspot.com/2013/03/i-have-read-views-of-those-crit...) मी हा पूर्ण श्लोक शोधला होता तो असा:
सत्यम्ब्रूयात्प्रियम्ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम .
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:..
सत्य वदावे, प्रिय वदावे, सत्य पण अप्रिय कधी बोलू नये (कारण) अप्रिय ऐकवणारे व ऐकणारे दुर्लभच असतात.
तेंव्हां तुमच्या ज्येष्ठ डॉक्टरने योग्यच केले असे म्हणावे लागेल.

सुबोध खरे's picture

6 Aug 2013 - 9:42 am | सुबोध खरे

माझे तसे बरेच लेख( डझनभर तरी) मिसळपाव वर प्रसिद्ध झाले आहेत आणि काही लेख लोकांना आवडले. काही नाही आवडले. मुळात मी एक सिद्धहस्त लेखक नाही मी जे लिहितो ते बहुतांश माझे वैयक्तिक अनुभवच आहेत आणि त्यात नवनिर्मिती काही नाही या माझ्या कमतरतेची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या लिखाणावर येणाऱ्या प्रतिकूल प्रतिसादाचे मी नक्कीच स्वागत करतो कारण कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू त्यातून कळते. एक कायद्याचे तत्व आहे कि DONT SIT ON JUDGEMENT OF DISPUTED FACTS. पण काही प्रतिसाद हे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या स्वरूपाचे असतात ते पाहून मात्र करमणूक होते.
लोकांनी टीका केली तरी त्याचा मला राग नाही. वैयक्तिक/ खालच्या पातळीवर उतरू नये एवढेच माझे नम्र पणे सांगणे असते.