रविवार सकाळ आणि समोर ढीगभर पुरवण्यांसहित पडलेले पेपर्स.. अशा वेळेला पोहे, शिरा, उपमा असे हपीसकॅन्टीनी नाश्ते समोर येऊ नयेत असं वाटतं. मटार करंजी किंवा शेप बदलून त्याचेच मटारसामोसे असा खुसखुशीत पदार्थ पेपरमधल्या वैचारिक लेखांसोबत मस्त.
आजच हा पदार्थ बनवता बनवता लाईव्ह इथे अपलोडवतोय. यापूर्वीही पेठकरकाका आणि इतर सन्माननीय बल्लवाचार्यांनी या पदार्थाच्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स इथे दिलेल्या आहेत. पण आज पुन्हा एकदा ही ताजी गरमागरम पेशकश.
साहित्यः टीप - इथे चित्रात दाखवलेलं साहित्य मोजण्यापूर्वीच्या स्थितीतलं आहे.
१. दोन वाट्या मटार:
२. सात आठ पाकळ्या लसूण, दीड इंच आलं, पाच सहा मिरच्या.. (या स्वतःच्या जबाबदारीवर वाढवता येतील.)
३. कोथिंबीर.. भरपूर... पण ही नंतर वरुन घालायची आहे
४. लिंबू, अर्धं
५. साखर एक चमचा
६. हिंग आणि हळद चिमटीभर किंवा आवडीप्रमाणे
७. कांदा बारीक चिरुन (वाटीभर), आणि गरम मसाला दोन्ही ऑप्शनल
८. ओलं खोबरं (खोवलेलं) एक वाटी
आता पुढचं..
मिरच्या, लसूण, आलं मिक्सरमधे वाटून घ्या..
मटार किंचित तेलावर वाफवत ठेवायचे. थोडेसेच वाफवले गेले की कांदा (ऑप्शनल), खोवलेलं खोबरं, हिंग, हळद, साखर, कोथिंबीर, मीठ घालून झाकण ठेवून आणखी जरा वाफवा.
मटार मऊ झाले की आधी वाटलेलं आलं, लसूण, मिरची मिश्रण ऊर्फ खर्डा त्यात मिसळा.
वरुन थोडं जिरं आणि गरम मसाला (ऑप्शनल) .. गरम मसाला काहींना फार आवडतो तर काहींना अजिबात नाही. मी दुसर्या प्रकारातला.
यात चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा हे सर्व जरासं वाफवून डावाने चेचून घ्या.. झेझरणे हा शब्द फिट्ट बसेल इथे..
मग हे सारण ग्यासवरुन उतरवुन गार करा. त्यात वरुन अर्धं लिंबू पिळा..
वरच्या पारीसाठी.. जर खुसखुशीत पारी हवी असेल तर मैदा हवा. अन्यथा टाळता येईल.
दीड वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा (ऑप्शनल).. मैदा न वापराल तर दोन वाट्या कणीक.
दोन मोठे चमचे गरम तेल घालून अतिशय घट्ट भिजवावं. घरातल्या स्त्रीवर्गाची मदत घ्यावी आणि एकदाच त्यांच्याकडून कणकेचं तंत्र शिकून घ्यावं.
कणकेच्या लाट्या करुन मग त्यांचं लाटण्याने पुरीत रुपांतर करा. त्यात वरचं गार झालेलं सारण भरा.
टॅकोप्रमाणे दुमडून नंतर गठडी वळा. मग कातण्याने न कातता, चिमटींनी दाबून दाबून मुरड, दुमड घाला..हॅ हॅ..तेवढीच तेलात फुटण्याची शक्यता कमी होईल..
तेल कढईत तापत ठेवा. उत्तम तापल्याची खात्री करुन त्यात बेताने करंजी सोडा. खुसखुशीत तांबूस तळल्या गेल्या की निथळून काढा.
टॉमॅटो चिली सॉस, चिंचगुळाची चटणी, ओल्या खोबर्याची चटणी, किंवा पुदिन्याची चटणी यापैकी कशाहीमधे बुडवून फुंकत फुंकत वाफाळत्या खुसखुशीत करंज्या खाता येतील. कणकेची पट्टी बनवून सामोश्याचा आकार दिला तर याचाच सामोसा बनेल हे वेगळं सांगायला नको.
आज पेपर्सना सुट्टी आहे, पण कालच्या पुरवण्या तोंडी लावायला घेतल्या आहेत. अक्षरशः लाईव्ह पाककृती सादर केली आहे, आणि आता मात्र समोर तयार करंज्यांचं ताट घेऊन यापेक्षा जास्त टंकन शक्य नाही.. या करंज्या गार होऊ देणं म्हणजे महापाप..
तेव्हा लेखनसीमा.
प्रतिक्रिया
27 Jan 2013 - 12:57 pm | सुखी
सुरेख.....
27 Jan 2013 - 1:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
पाककॄती मस्तच आहे. तोंपासु. आमच्या चितळ्यांकडे मिळणारी म.क. पण मस्त असते.
शिर्षकात मात्र प्रचंड विसंगती जाणवली.
पैजारबुवा,
27 Jan 2013 - 1:14 pm | गवि
मान्य.. बदल केला. धन्यवाद..
27 Jan 2013 - 1:09 pm | दिपक.कुवेत
करंज्या फारच मोहक दिसतायत....चवीलाहि तितक्याच अप्रतिम असतील ह्यात दुमत नाहि. अहाहा....अश्या करंज्या आणि पाती चहा घालुन केलेला चहा म्हणजे निव्वळ रसतॄप्ती.
27 Jan 2013 - 1:38 pm | क्रान्ति
मस्त, खमंग पाकृ.
27 Jan 2013 - 1:47 pm | बॅटमॅन
वा लेको, करा चैन!! खा रोज शिक्रण खा!!! मटार करंजी खा!!!!!
27 Jan 2013 - 2:41 pm | मुक्त विहारि
+१
27 Jan 2013 - 4:59 pm | नंदन
हे एका मुंबैकराला ऐकवून सांगून माफक 'सूड' काढलेला दिसतोय :)
28 Jan 2013 - 12:15 am | बॅटमॅन
कोटिनंदन :)
28 Jan 2013 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा
+३
27 Jan 2013 - 2:09 pm | पैसा
गवि तुस्सी ग्रेट हो! एवढा उपद्व्याप ब्रेकफास्टसाठी दुसर्या कोणी केला तर नक्कीच आवडेल! मी फार तर संध्याकाळी करीन. तुमची बायको आज खूष झाली असणार यात काही शंका नाही!
फोटो, लेखन याबद्दल काही ब्वॉलायलाच नको. मस्त! मलाही मटाराबरोबर गरम मसाला आवडत नाही. गरम मसाल्यामुळे मटाराची वरिजिनल चव मारली जाते.
27 Jan 2013 - 2:37 pm | आदूबाळ
अहाहाहा...
सारण जमेलसं वाटतंय, पण करंजीकरण अवघड दिसतंय.
27 Jan 2013 - 2:42 pm | मुक्त विहारि
झक्कास..
27 Jan 2013 - 2:48 pm | श्रावण मोडक
एवढी चांगली मटार करंजी आहे. स्वतः केल्याचंही सुख - समाधान आहे. आणि तोंडी लावायला काय, तर वृत्तपत्रांच्या पुरवण्या? करंजीचा हा तर अपमान आहे राव... :-)
27 Jan 2013 - 2:58 pm | पियुशा
मस्त :)
27 Jan 2013 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर
अप्रतिम. मटार करंज्या चहा बरोबर काय गरम गरम असतील तर कशाबरोबरही झकास लागतात.
ह्यात काळजी घ्यायची गोष्ट अशी की मटार पूर्ण शिजले पाहिजेत कच्चे राहता कामानयेत तरीही जास्त शिजून मेण होता कामा नये. कच्चे राहिले तर गोडसर कच्ची चव लागते. नीट शिजल्यावर मटारची परिपक्व चव आणि त्याला आलं, लसूण, मिरच्यांची जोड त्या सोबत ओल्या नारळाची 'चव' म्हणजे 'सोनेपे सुहागा'.
आजच, ८० करंज्यांच्या मागणीसाठी नमुना करंज्या बनवायच्या आहेत.
गवि,
'झेझरणे' हा शब्द फार वेगळ्या प्रक्रियेत वापरला जातो. इथे योग्य वाटत नाही.
27 Jan 2013 - 3:35 pm | दादा कोंडके
आणि या डिशसाठी मटारच पाहिजेत. वाटाणे भिजत घालून केले तर तोंडातली करंजी संपली तरी वाटाण्याच्या सालीचा चोथा तोडात तसाच रहातो.
27 Jan 2013 - 3:42 pm | अनन्न्या
नवय्राने करून खायला घातल्या तर अहाहा!! बाकी नवय्राची मजल चहाच्या पुढे जात नाही त्यामुळे रविवारी अजिबात करणार नाही!!
27 Jan 2013 - 3:50 pm | किसन शिंदे
झक्कास!!
शिळ्या पुरवण्यांबरोबर ताजी मटार करंजी! भारी काँबिनेशन!!
27 Jan 2013 - 4:01 pm | सूड
संपादक झाल्यापासून किसनाच्या लिखाणात एको येऊ लागलाय.
27 Jan 2013 - 4:57 pm | नंदन
'सर्वांनी एकोपा राखावा' ही सूचना उ.सं.डु.ची बळी ठरली असावी काय? :)
28 Jan 2013 - 12:01 pm | यशोधरा
व्हॉट इज उ.सं.डु?
28 Jan 2013 - 12:04 pm | बॅटमॅन
उसंडु= उपसंपादकाच्या डुलक्या.
28 Jan 2013 - 12:07 pm | यशोधरा
:D भारी शब्द आहे!
28 Jan 2013 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या लहानपणी 'अमृत' नांवाचे एक सुंदर मासिक यायचे. त्यात 'मुद्राराक्षसाचा विनोद' आणि 'उपसंपादकाच्या डुलक्या' ही दोन मस्तं सदरं असायची. तिथेच ह्या दोन शब्दांची ओळख झाली होती.
28 Jan 2013 - 3:47 pm | गवि
"अमृत" या रीडर्स डायजेस्ट शेपच्या अंकातल्या उपरिनिर्दिष्ट सदरांतील काही वाक्यं आठवतात.
- तू उगीच चहात पाय गाळतोस.
-बंदूक घेऊन पळणार्या सशाचा पाठलाग करताना तो ठेच लागून पडला.
- मुख्यमंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले.
- याने आपल्या दाताचा एक ठोसा मारून त्याला खाली पाडले.
काहीकाही बरेच जोरदार हसू येणारे आणि काही स्वराज्य टाईप असत.. आठवणीबद्दल धन्यवाद.
10 Feb 2013 - 5:46 am | शुचि
हाहाहा आवळले वाला भीषण आहे =))
27 Jan 2013 - 4:21 pm | सूड
करंज्यांची दुमड अगदी मस्तच आहे.
27 Jan 2013 - 5:00 pm | नंदन
झकास पाकृ!
27 Jan 2013 - 5:59 pm | श्रिया
तुम्ही बनविलेल्या मटार करंज्या आणि त्यांचे फोटो एक नंबर! थंडीच्या दिवसात नाष्टयासाठी गरमा गरम मटार करंजी म्हणजे सुखच!
27 Jan 2013 - 7:45 pm | तर्री
एकदम फिदा ह्या डिश वर आपण.
27 Jan 2013 - 8:41 pm | jaypal
प्रकार आहे. करंज्या छान दिसतायत.
गवि ओलखोब-याच कधी आणि काय करायच त्याचा तपशील द्या की राव.
(बहुदा घाईघाईत चुकुन उल्लेख राहुन गेला असावा.)
28 Jan 2013 - 11:30 am | गवि
हो तर.. लाईव्ह काम केलं की असं होतं बघा.. :)
आता योग्य जागी खोबरं टाकलं आहे. धन्यवादस...
27 Jan 2013 - 8:58 pm | आनन्दिता
व्वा व्वा... अगदी तोंपासु...
27 Jan 2013 - 9:08 pm | इन्दुसुता
झेझरणे हा शब्द फिट्ट बसेल इथे
सापडला, सापडला ... हाच शब्द केव्हाचा शोधत होते ( तुमच्या 'दास्ताने आवारगी' मधला..) तुमच्या 'जळ-ली' मध्ये टाकायला विसरला असाल तर सुचविण्यासाठी... आणखी एक्, तुमचा असाच आवडीचा शब्द... झळंबणे.. तो ह्या पाकृ मध्ये दिसला नाही कुठे आणि 'जळ-ली' मध्येही.... :)
पाकृ आवडली .. पण आम्हाला संध्याकाळ साठी...
स्वगतः आता येथे घरातला स्त्रीवर्ग शोधणे आले.. :)
27 Jan 2013 - 9:12 pm | आनन्दिता
व्वा व्वा... अगदी तोंपासु...
27 Jan 2013 - 9:56 pm | रेवती
वा!! छानच.
गविंनी विमानकंपनी चालू केली तर त्यात सगळ्यांना असे मराठमोळे प्रकार देतील. ;)
करंज्या या कातून न देता गवि त्या मुरडीच्या देतील असा अंदाज बांधत आहे.
28 Jan 2013 - 1:54 am | कवितानागेश
मस्त. :)
कुणाला बरं सांगू आता करायला? :(
28 Jan 2013 - 11:14 am | सुहास झेले
सहीच... :) :)
28 Jan 2013 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा
28 Jan 2013 - 11:33 am | पिलीयन रायडर
कालच करुन हाणण्यात आल्या आहेत..!!!
28 Jan 2013 - 2:02 pm | धनुअमिता
तों पा सु.
28 Jan 2013 - 2:21 pm | स्मिता.
मटार करंज्या तर लईच भारी दिसत आहेत. चवीलाही छानच असतील. आता करून हादडल्याशिवाय चैन पडायची नाही.
28 Jan 2013 - 3:05 pm | गणपा
भल्या माणसा मिपाचा एखादं तरी दालन सुटलंय का तुझ्या तावडीतून?
असो सध्या मार्केटात मटार उपलब्ध असल्याने करणेत येईल.
पण डीप फ्रायला पर्याय म्हणून बेक करून पाहू.
28 Jan 2013 - 3:16 pm | हासिनी
मस्त!
28 Jan 2013 - 5:22 pm | Mrunalini
मटार करंज्या एकदम मस्त दिसतायत.. ह्या विकांताला नक्कीच करुन बघायला पहिजेत.
29 Jan 2013 - 4:38 am | सानिकास्वप्निल
मटार करंज्या एकदम खुसखूशीत दिसत आहे आणी मुरड घातलेली काय दिसतेय ...अहाहा सुपर्ब
आता लवकरच बनवाव्या लागतील :)
29 Jan 2013 - 9:01 am | दीपा माने
अगदी निगुतीने केल्या आहेत. खुपच आवडल्या.
29 Jan 2013 - 2:49 pm | नक्शत्त्रा
मटार करंजी....
कालच केली होती ..!!खुसखूशीत न मस्त झाल्या होत्या.
धन्यवाद सोपी पाककृती दिल्याबद्दल ....
29 Jan 2013 - 2:52 pm | सस्नेह
फोटो आणि डिट्टेल पाकॄ बहिणीला दाखवल्यावर एकाच लुकमधे ती मिपाची फॅन झाली आहे..
31 Jan 2013 - 6:58 pm | कुलभूषण
मंचीन्यादु....
1 Feb 2013 - 1:08 pm | बॅटमॅन
मीरु तेलुगु माटलाडतुन्नारु कदा?
1 Feb 2013 - 1:48 pm | गवि
%)
31 Jan 2013 - 11:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा काय खत्रा आहे, मटार करंजी.
चखना म्हणूनही वापरता येईल असे वाटते. :)
-दिलीप बिरुटे
1 Feb 2013 - 11:30 am | मी-सौरभ
अधिक काही बोलणे नाही...
1 Feb 2013 - 1:05 pm | वेताळ
___/\____
1 Feb 2013 - 1:46 pm | अधिराज
मटार करंज्या आन रेसिपी एक्दम फक्कड,नादच करायचा नाही.
2 Feb 2013 - 1:30 pm | शुचि
काय मस्त चव असेल. कल्पना करता येते आहे.
10 Feb 2013 - 4:52 pm | निवेदिता-ताई
+१
2 Feb 2013 - 2:52 pm | प्रेरणा पित्रे
उद्या सकाळ्च्या नाश्त्याचा मेनु पक्का.
4 Feb 2013 - 8:10 pm | दादा कोंडके
मग कसा झाला नाष्टा? चव कशी होती?
4 Feb 2013 - 9:18 am | खादाड
लवकरात लवकर बनवल्या जाईल !!!
5 Feb 2013 - 2:45 am | मी_आहे_ना
मस्त, झकास पाकृ. -^-
5 Feb 2013 - 2:57 am | श्रीरंग_जोशी
पाककृती आवडली.
अवांतर - वाटाण्यांना मटार म्हंटले जाते असा माझा समज आहे (चूकीचा असू शकतो). की वाटाणे अन मटार हे दोन्हीही वेगळे आहेत? हिंदीमधले मटर म्हणजेच मराठीमधले मटार का?
5 Feb 2013 - 3:01 am | श्रीरंग_जोशी
पाककृती आवडली.
अवांतर - वाटाण्यांना मटार म्हंटले जाते असा माझा समज आहे (चूकीचा असू शकतो). की वाटाणे अन मटार हे दोन्हीही वेगळे आहेत? हिंदीमधले मटर म्हणजेच मराठीमधले मटार का?
5 Feb 2013 - 11:59 am | इरसाल
मटर=मटार
मटर्,मटार ही सुकविली की वाटाणे तयार होतात.
6 Feb 2013 - 10:31 pm | आदूबाळ
गवि आणि इतर जाणकार पाकतज्ज्ञ:
ते मुरड/दुमड घालायचं शास्त्र जरा उलगडून सांगितलं तर फार मदत होईल. तूनळीवर प्रत्यक्ष पहाता आलं तर फारच!
माय ग्रीन-पी डंपलिंग्स हॅव स्माईल्ड व्हेन आय ट्राईड टू डीप-फ्राय इट... :(
10 Feb 2013 - 7:57 pm | त्रिवेणी
मस्तच गवि दा.
नास्त्याला मटार करंजी मग जेवायला काय?