विषय: श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्या
बुधवार दिनांक २६-१२-२०१२. स्थळ: मालवण नगरवाचन मंदीर.
प्रथम ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाची ओळख करून दिली.
त्यांचे भाषण नीटनेटके आणि छोटेसे आणि त्यामुळे हवेहवेसे वाटणारे होते. मालवण नगरवाचनालय. १०६ वर्षांपासून सुरू असलेली संस्था. ३२ ह्जारांच्या वर गेलेली ग्रंथसंपदा. ६०० च्या वर गेलेली सदस्यसंख्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या एका छोट्याशा, नयनरम्य, टुमदार अशा गाववजा शहरातली ही आकडेवारी नक्कीच कौतुकास्पद आहे. शिंदे यांनी ही आकडेवारी रंजकतेने पेश केली. या वाचनालयाला शासनाचा काही लाखांचा पुरस्कार लाभला आहे हे पाहून शासनाचेही कधी नव्हे ते कौतुक वाटले. शासनाचे कौतुक खरेच केले पाहिजे.
नंतर कार्यक्रमाच्या परीक्षकादि मान्यवरांची ओळख करून दिली. ग्रंथालय समितीचे एक सक्रीय सदस्य श्री. प्रकाश कुशे यांचे छोटेसे पण छान भाषण झाले.
त्यांनी ग्रंथालय संस्थेच्या हस्ताक्षर विकास कार्यशाळा, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या निवारण कार्यशाळा इत्यादी विधायक उपक्रमांची ओळख करून दिली. त्यामुळे संस्थेच्या कार्याबद्दलचा आणि ते करणार्या मान्यवरांबद्दलचा आदर दुणावला.
नंतर त्यानंतर श्रीमती मनीषा इंगळे, एम. ए., बी. एड. आणि एक अनुभवी शालेय शिक्षक श्रीयुत रामदास नाईक, वाळपई, गोवा, या दोन्ही मान्यवर परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन
आणि नंतर ग्रंथालयाच्या समितीवरील एक सक्रीय सदस्या श्रीमती राळकर यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आजकाल गायन स्पर्धा, नाच स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा इ. स्पर्धांना लोकप्रियतेमुळे प्रसिद्धीच्या आणि गर्दीच्या वलयाची झळाळी भरपूर असते. त्यामानाने वक्तृत्व स्पर्धेसाठी तुरळकच उपस्थिती असते. (खासकरून छोट्या शहरात. लेखनवाचन, साहित्य, अभिजात कला इ. विषयी जनमानसातली अनास्था तीही समाजातल्या बौद्धिकतेचा अभिमान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात; ही गोष्ट तशी मला चटका लावूनच गेली.) अशा समाजात कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता वाचनालयातल्या संस्था अजून तग धरून आहे हे पाहून संस्थेसाठी झटणार्या मंडळींचे कौतुक वाटले. या संस्थेला शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
स्पर्धेतली दोन शाळकरी मुलींची उमेदवारी उल्लेखनीय होती.
प्रथम उपरोल्लेखित श्रीमती राळकर यांचे भाषण झाले. तुरळक उपस्थितीमुळे नाउमेद न होता आपला सहभाग उत्साहाने घ्या. तालुका स्तरावरील या स्पर्धेतील पहिले तीन उमेदवार पुढच्या – जिल्हा स्तरावरील स्पर्धेत जाणार आहेत. त्या स्तरावर जास्त उपस्थिती असणार आहेत. १००० मीटर स्पर्धा जर पूर्ण करता आली नाही तर कधीही खेद बाळगू नये. आपण ८०० मीटर धावू शकतो हे तर आपल्याला कळले आहे. पुढील स्पर्धेत आपण १००० मीटर पूर्ण करू याचा आत्मविश्वास मिळवा. असे मोलाचे मार्गदर्शन करून श्रीमती राळकर यांनी स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवला आणि स्पर्धा सुरू होत असल्याचे जाहीर केले. जरी विषय श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्या. जरी हा विषय असला तरी गुणात्मक दृष्ट्या ही वक्तृत्त्वस्पर्धा आहे हे सर्व स्पर्धकांनी ध्यानात घ्यावे अशी त्यांनी मोलाची सूचना केली.
पहिले भाषण कु. मैत्रेयी बांदेकर हिचे झाले. नीटनेटक्या सोप्या शब्दयोजनेला उत्कृष्ट आवाजाची आणि त्याच्या समर्पक चढउताराची जोड यामुळे तिचे भाषण रंजक आणि श्रवणीय झाले. स्पर्धेची सुरुवात तर जोरदार झाली. नंतर इतर स्पर्धकांची भाषणे झाली. इतर भाषणे देखील चांगली झाली. तरी मैत्रेयीच्या भाषणाची सर मात्र त्या भाषणांना आली नाही. नंतर स्पर्धेचा निकाल येईपर्यंत उपस्थितांपैकी एकदोघांची भाषणे झाली.
तेवढ्यात आणखी एक स्पर्धक मुलगी येऊन पोहोचली. काही कारणामुळे तिला उशीर झाला होता. तरी ती उपस्थित राहिली हे विशेष. परंतु स्पर्धा पूर्ण झाली असून ती आता स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही असे परीक्षकांनी जाहीर केले. परंतु तिला निदान भाषणाची तरी संधी द्यावी अशी उपस्थितांपैकी श्री. शरद कदम
यांनी आयोजकांना विनंती केली. निदान तिला बोलण्याचा अनुभव मिळावा म्हणून. ती मान्य करून आयोजकांनी मनाचा मोठेपणा दाखवला.
त्यानंतर श्रीमती मनीषा इंगळे, एम. ए., बी. एड. आणि एक अनुभवी शालेय शिक्षक श्रीयुत रामदास नाईक, वाळपई, गोवा, या दोन्ही मान्यवर परीक्षकांची भाषणे झाली आणि त्यांनी निकाल जाहीर केला. बक्षीस न मिळालेल्यांना नाउमेद होऊं नये, ही पुढील यशाची पायरी आहे असे समजावे असे देखील परीक्षकांनी सांगितले. अपेक्षेनुसार मेत्रेयी बांदेकर हिचा प्रथम क्रमांक आला. आज स्पर्धेत बोलायचे आहे हे तिला त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता कळले होते. त्यानंतर तिने मामुली
तयारीवर एवढे उत्कृष्ट भाषण केले याचे सर्वांनाच कौतुक वाटले.
समारोपाच्या छोट्याशा भाषणानंतर एक नीटस कार्यक्रम संपन्न झाला.
प्रतिक्रिया
2 Jan 2013 - 4:29 pm | दादा कोंडके
पण फोटू दिसत नाहीत.
2 Jan 2013 - 4:34 pm | गवि
१०६ वर्षांपासून हे वाचनालय चालू आहे हे अभिमानास्पद आहे मालवणकरांना.
@दादा: फोटो दिसत नाहीत याचे कारण बहुधा गूगल प्लसच्या लिंका काही कार्यालयांमधे ब्लॉक असाव्यात. सेम हियर.
2 Jan 2013 - 5:02 pm | गणपा
वाचनालय अजुनही तग धरुन आहेत हे अत्यंत सुखावणारं आहे.
शेवटी वाचेल तो 'वाचेल' हे खरं.
फोटोच्या लिंका सुधारण्याचा प्रयत्न केलाय. संबंधितांना ओळखत नसल्याने नावे आणि फोटोंचा ताळमेळ जमलाय का ते सुधीररावच जाणोत.
2 Jan 2013 - 7:54 pm | यशोधरा
अभिनंदन :)
2 Jan 2013 - 8:02 pm | पिंपातला उंदीर
वा. अभिनंदन. अशा लहान शहरान मध्ये सांस्कृतिक चळवळी चालवणार्या लोकाना लाख सलाम.
2 Jan 2013 - 8:10 pm | अत्रुप्त आत्मा
+1 :-)
3 Jan 2013 - 1:37 am | विकास
खूप चांगला प्रकल्प! येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मालवण नगरवाचन मंदीरास मनःपूर्वक शुभेच्छा!
3 Jan 2013 - 3:20 pm | मदनबाण
अरे वा... :)
मालवण नगरवाचन मंदीर खरचं कौतुकास पात्र आहे. :)
3 Jan 2013 - 3:48 pm | राही
सिंधुदुर्ग आणि केरला हे दोन विभाग साक्षरतेमध्ये संपूर्ण भारतात अव्वल क्रमांकावर आहेत आणि साक्षरतेचे प्रमाण ९५%हूनही अधिक आहे असे मागच्या शिरगणतीच्या आकडेवार निकालात वाचले होते.त्यामुळे ग्रंथालये चालू रहावीत हे ओघानेच आले.इथे मलयाली मनोरमाप्रमाणे नसली तरी वाचन संस्कृती बर्याच पूर्वीपासून रुजलेली आहे हे जाणवते.आणखी एक जाणवते ते इथे सौरऊर्जेचा वाढलेला वापर.मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या वापरामध्ये हा जिल्हा आघाडीवर असावा. डोंगराळ आणि खाडीप्रदेश लक्षात घेता रस्तेही त्या मानाने बरे वाटतात. एकंदरीत दक्षिण कोंकणात दृष्टिगम्य बदल घडत आहे हे आशादायक आहे.कोणी म्हणतात की गिरणीसंपानंतर बरेचसे चाकरमानी नाइलाजाने गावाकडे परतले पण त्यांच्याबरोबर शहरी वारे आणि औद्योगिक मानसिकताही गावात शिरली,ज्याची दृश्य फळे एका पिढीनंतर आज मुंबईतून मनीऑडरचा ओघ कमी होण्यापासून इतर अनेक गोष्टीतून अनुभवास येतात.काही का असे ना,कोंकण आळस झटकून कामाला लागले आहे हे खरे.
3 Jan 2013 - 4:34 pm | ऋषिकेश
राही यांचा प्रतिसाद आणि मुळ धागा दोन्ही उत्साहवर्धक आहे!
मालवणकरांना मराठी ग्रंथालय अजून किमान १०० वर्षे टिकवण्यासाठी शुभेच्छा!
7 Jan 2013 - 10:05 am | सुधीर कांदळकर
धन्यवाद. 'राही' यांना विशेष.