नमस्कार!
माझी पुतणी वास्तुस्थापत्यशास्त्राची विद्यार्थिनी असून भारतात वास्तुस्थापत्यशास्त्र (architecture) या शाखेत पदवीसाठी अभ्यास करते आहे. तिला शोधनिबंधासाठी विषय निवडावयाचा होता, तेंव्हा या व्यवसायातील ज्या भ्रष्टाचाराची तिला मनापासून चीड आहे, त्या भष्टाचाराची तिने निवड केली आहे. या संदर्भात इथल्या अनुभवी वाचकांनाकडून काही मदत मिळेल या आशेने इथे प्रतिसादाची / चर्चेची विनंती करीत आहे.
तिला सध्या अभिप्रेत असलेले काही मुद्दे असे:
१. भ्रष्टाचारामुळे निकृष्ठ दर्जाचा माल वापरला जाऊन होणारं नुकसान
२. नियमांतील पळवाटांमुळे टेंडरशी विसंगत दर्जाचं काम केलं जाऊन पैसे देऊन ते 'पास' करून घेतलं जाणं
३. एंजिनियरने सांगितलेल्या दर्जाचे पालन न करता निकृष्ठ दर्जाचा माल वापरून काम करणे (उदाहरणार्थ, १२ इंचाच्या सळईऐवजी ८ इंचाच्या सळया वापरून बांधकाम RCC चे काम करणे)
४. काम करतांना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता चोख, दर्जेदार व सुरक्षित काम करणे अपेक्षित असतांना, प्रत्यक्ष कामात मात्र 'भेटी' स्वीकारून 'तडजोड' केली जाते ('माननीयांच्या' वा नगरसेवकांच्या 'फॅकटरी' च्या आराखड्यासाठी समव्यावसायिकाची फॅक्टरी पाहून येण्यासाठी 'सिंगापूरची सफर' करून येणे, वगैरे),
५. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दुसर्या आर्किटेक्टने केलेलं डिझाईन चोरणं, त्याच्या/तिच्या 'रेट्'पेक्षा कमी किंमतीत काम करून देण्यास तयार होऊन अखेरीस कामाच्या दर्जात तडजोड करणे.
६. स्वतःच्या डिझाईनचा दर्जा उत्तम असूनदेखील चांगल्या आर्किटेक्टलाही नगरविकास खात्यातील प्रत्येक टेबलावर 'पाकिट' द्यायला लागणे.
७. रोजंदारीवर काम करणार्या गवंडी, वीटा वाहणार्या बायका, वगैरेंकडून त्यांना कामावर ठेवण्याच्या 'हमी'च्या बदल्यात त्यांच्या विवक्षित रोजगारापेक्षा कमी पैसे देऊन आर्किटेक्टने 'टक्का' वसूल करणे (१२ रु. प्रति-तासाऐवजी १० रू. प्रति-तास मेहेनताना देऊन पैसे वाचवणे), इत्यादि.
तुम्हाला या किंवा अशा इतर काही गैरप्रकारांविषयी माहिती/अनुभव असल्यास या निबंधात मदत करू शकाल काय?
विषय धाडसी असल्याने लिखाणात कोणतेही वैयक्तिक संदर्भ येणार नाहीत याची तिला अर्थातच काळजी घ्यावी लागेल. तेंव्हा प्रतिसादकांनीही माहिती देतांना विशिष्ट नाव/ संदर्भ टाळावेत ही अपेक्षा.
मदतीबद्दल सर्वांचे आधीच आभार!
प्रतिक्रिया
6 Aug 2012 - 1:56 am | सुनील
वास्तुस्थापत्यशास्त्रातील भष्टाचाराबद्दल तज्ञ त्यांचे मत देतीलच पण पाकशास्त्रातील ह्या भ्रष्टाचारांचे काय?
http://misalpav.com/node/10519#comment-298447
http://misalpav.com/node/10388#comment-167470
6 Aug 2012 - 4:35 pm | तुषार काळभोर
हितं पण
6 Aug 2012 - 8:26 am | ५० फक्त
आपण वर नमुन केलेल्या गोष्टी ' भ्रष्टाचार' या कलमाअंतर्गत येतात असे विद्यार्थी द्शेत असताना वाटणे स्वाभाविक आहे,
शिक्षण पुर्ण करुन प्रत्यक्ष जगात काम करण्यासाठी उतरायची वेळ येते तेंव्हा ह्या गोष्टी ' ब्रेड अँड बटर' आहेत हे लक्षात येतं आणि मग काळजी करतो पोटाची खळगी भरण्याची अशी वेळ येते.
6 Aug 2012 - 10:22 am | प्यारे१
आम्हाला किती देता ते बोला आधी....!
अशीच बरी मदत करु आम्ही! :)
(ते बारा नि आठ 'एमेम' आहे. इन्च नव्हे!)
6 Aug 2012 - 11:28 am | चिरोटा
आपण जे मुद्दे मांडले आहेत त्याला सध्याच्या काळात भ्रष्टाचार म्हंटले जात नाही. बांधकाम क्षेत्रातील हे नेहमीचे आहे.कुठल्याही बिल्डर्/आर्किटेक्टला विश्वासात घेतलेत तरीही बरीच माहिती मिळेल.
6 Aug 2012 - 11:31 am | बिपिन कार्यकर्ते
या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे फक्त मध्यम आणि उच्च वर्गिय लोकांना त्रास होतो. सबब, हा भ्रष्टाचार त्याविरुद्ध लढा देण्या योग्य नाही. ;)
6 Aug 2012 - 11:55 am | ५० फक्त
आता सरकारने लढा देण्या योग्य आणि अयोग्य अशा भ्रष्टाचाराची यादी जाहिर करावी अशी नम्र विनंती करावी काय. ?
6 Aug 2012 - 12:19 pm | गणामास्तर
>>>या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे फक्त मध्यम आणि उच्च वर्गिय लोकांना त्रास होतो. सबब, हा भ्रष्टाचार त्याविरुद्ध लढा देण्या योग्य नाही.
मग मध्यम आणि उच्च वर्गिय लोकांनी कमीत कमी फेसबुकी पाठिंबा तरी द्यायलाचं हवा. ;)
6 Aug 2012 - 12:53 pm | नितिन थत्ते
एकूण मध्यम आणि उच्च वर्गाची व्याख्या तपासायला हवी. :)
शिवाय यातले काही प्रकार खाजगी क्षेत्राशी संबंधित (डिझाइन चोरणे वगैरे) असल्याने त्याला भ्रष्टाचार म्हणता येत नाही. केवळ सरकारी कामात होतो तोच आणि तेवढाच भ्रष्टाचार असतो. ;)
6 Aug 2012 - 11:59 am | एम.जी.
आधी चेक करा..
असे विषय शोध निबंधाला चालतील का..?
आमच्यावेळेला माझा विषय टाउन प्लानिंगशी निगडित होता तरी खूप वाद झाला होता.
त्यानंतर शोधनिबंधाचा विषय हा बिल्डिन्ग डिझाईनशी निगडितच असावा असा नियम आणण्यात आला होता असे मला आठवते.. ही १९८६ सालची गोष्ट आहे... बदल झाले असतील पण तरीही या विषयावर शोध निबंध लिहिणे हे आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात बसणार नाही असे वाटते...
आणि जर विषय महाविद्यालयाने मान्य केला असेल तर चार पाच शोध निबंध होतील इतके मटेरिअल देईन...
एम.जी.
6 Aug 2012 - 12:11 pm | एम.जी.
अजून एक प्रष्ण..
आपल्या पुतणीला आर्किटेक्ट व्हायचे आहे का नगरसेविका...?
एम.जी.
6 Aug 2012 - 1:50 pm | ५० फक्त
प्रत्यक्ष एम्.जीं. ना हा प्रश्न पडावा ? एम्.जी. रोड मध्ये जे एम्.जी. असतात ते तर नाही ना तुम्ही?
6 Aug 2012 - 1:12 pm | sagarpdy
बाबो! १२ इंचाची सळई! खांब केवढा म्हणायचा?
6 Aug 2012 - 1:27 pm | आर्य
मलाही हेच वाटते.
हा विषय प्रबंधा करीता / शोध निबंधा करीता चालणार नाही.
विद्यापिठाने मान्य केले असल्यास, भरपुर पुरावे देतो.
आर्य
आर्कीटेक्ट - अर्बन-प्लानर
दादर, (प) मुंबई
6 Aug 2012 - 1:38 pm | सर्वसाक्षी
भ्रष्टाचार या विषयावर संशोधन करताना हा विषय तिच्या शिक्षणक्रमासाठी कितपत सुसंबद्ध आहे ते तपासून पाहा. शिवाय असा निबंध लिहिल्याने तिच्या गुणवत्तालेखात का मुल्यवान भर पडेल यावरही विचार करा. जर ती समाजकार्यविषयक अभ्यास करत असेल तर हा विषय ठिक आहे. मात्र वास्तुशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाचा भाग मानला जाणार नाही आणि जाऊ नये.
तिला भ्रष्टाचाराची चीड असेल तर ते चांगलेच आहे पण त्यावर स्वतंत्र कार्य करावे, त्याची सांगड अभ्यासक्रमाशी घालु नये.
6 Aug 2012 - 4:26 pm | विजुभाऊ
सर्वसाक्षींशी सहमत.
ती तांत्रिक विषयाचे शिक्षण घेत आहे. संशोधन हे त्या तांत्रिक विषयासंदर्भातच असावे. त्या संषोधनाचा तीला पुढील करीयरमधे उपयोग होणार आहे. ( निदान इंटर्व्ह्यू मध्ये तरी ).
भ्रष्टाचार हा तांत्रिक पेक्षा व्यावहारीक विषय आहे. त्याचे सामाजिक पैलु निराळेच आहेत.
6 Aug 2012 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार
तरी म्हणलं ह्या स्पावड्याची डिझाईन्स येवढी भारी कशी असतात.
6 Aug 2012 - 2:56 pm | स्पा
तरी म्हणलं ह्या स्पावड्याची डिझाईन्स येवढी भारी कशी असतात.
$%$#%^%^&&^&^%$%$#%
6 Aug 2012 - 3:26 pm | बॅटमॅन
खी खी खी
6 Aug 2012 - 4:23 pm | जानकी
आधी माझ्या मापनातील चुकीबद्दल क्षमस्व, १२ एमएम च्या सळया, १२ ईंचांच्या नव्हे!
तिला तिच्या प्राध्यापकांनी या विषयासाठी परवानगीच नव्हे तर आग्रहही केला आहे, त्यामुळे विद्यापीठाला मान्य असावा.
मदत करू इच्छिणार्या प्यारे-१, एम जी, आर्य आणि सर्वसाक्षी या सर्वांचे आभार! आपल्याला या व्यवसायाशी संबंधित बरीच माहिती असावी असे दिसते. कृपया उपयुक्त माहिती इथे द्या, वा व्यनि ने कळवा. धन्यवाद!
6 Aug 2012 - 8:22 pm | नितिन थत्ते
प्राध्यापकांनी आग्रह केला आहे ही गोष्ट चिंताजनक वाटते.
प्राध्यापकांनी तिच्या खांद्यावरून बंदूक चालवण्याऐवजी सरळ चालवावी.
विद्यापीठाने हा विषय अयोग्य म्हणून नाकारला तर प्राध्यापक जबाबदारी घेणार आहेत का?
6 Aug 2012 - 5:18 pm | सर्वसाक्षी
जानकीदेवी,
आपला गैरसमज झाला अहे असे वाटते. मी मदतीचा उल्लेख केला नसून मुळात हा विषयच स्थापत्यशास्त्रसंबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीच्या दृष्टीने अभ्यासक्रमांतर्गत शोधनिबंधासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
प्राध्यापक भले आग्रह करोत, तुमच्या पुतणीने नकार देणे इष्ट. कारण एकच - हा शोधनिबंध लिहिल्याने तिच्या ज्ञानात अभ्यासक्रमाच्या दृष्टिने काहीही भर पडणार नाही आणि अभ्यास्क्रमांतर्गत प्रकल्प/ उपक्रम यांचा उद्देश हा निश्चितच अनुशंगिक ज्ञानार्जन, अनुभव संपादन व सर्जनशिलतेस वाव हा असतो.
प्राद्यापक महाशयांना विशेष स्वारस्य असल्यास त्यांना स्वतःला शोधनिबंध लिहायला हरकत नाही.
6 Aug 2012 - 5:35 pm | अभिज्ञ
आर्किटेक्चर व स्थापत्य शास्त्र ह्यांमध्ये भ्रष्टाचार हा काहि नवीन नाही अन कोणीहि कितीहि आपटली तरी तो अजिबात नाहिसा होणार नाही.
साधारणतः एखाद्या कामात आर्किटेक्ट-स्ट्रक्चरल इंजिनीयर-बांधकाम करणारा बिल्डर अशी साधारणपणे रचना असते.
ह्यात आर्किटेक्ट व स्ट्रक्चरल ईंजिनीयर ह्यांचे काम हे एखाद्या शिंप्याप्रमाणे असते.
कमीत कमी कापडात जास्तीत जास्त कपडे शिवणारा शिंपी जसा यशस्वी होतो तसेच ह्यांचे असते.
एकतर बिल्डर साधारणपणे अव्वच्या सव्वा किमतीला प्लॉट विकत घेत असतो.
दिलेल्या किमान जागेत जास्तीत जास्त जागा विकता येण्याजोग्या जागेचा प्लॅन बनवता आला तरच ह्या मंडळिंचा निभाव लागू शकतो. त्याकरिता दिलेल्या भागातल्या नगरपालिका/मनपा ह्यांचे ह्याविषयीचे नियम काय आहेत हे माहीती असणे आवश्यक असते. एफएसआय, बिल्टअप एरिया, सुपरबिल्टअप एरिया ह्या सर्व भानगडीत बिल्डरचा नफा होणे आवश्यक असते, तरच तो तुम्हाला पुढच्या वेळेला काम देउ शकतो.
तीच गोष्ट स्ट्रक्चरल इंजिनीयरची. किमान खर्च येइल व सुरक्षित असेल असेच डिझाईन देणे ह्याच्यावर बंधनकारक असते.
ह्या सर्व बाबी पाहिल्या कि हि सर्वच मंडळी भ्रष्टाचारात कळत नकळतपणे का होईना पण सामील होतात.
बर आपले डिझाईन दिले तरी ह्यात हि बिल्डर मंडळी चो-या करतातच हे देखील स्टक्चरल इंजीनीयरला माहिती असावे लागते. शक्यतो सर्व यशस्वी मंडळी ह्या करता जास्त सेफ्टी फॅक्टरला बिल्डिंग डिझाईन करत असतात.
वा तशी काळजी घेतात.
एक उदाहरण सांगतो
स्ट्रक्चरल ईंजी नियर एखाद्या बिल्डिंगचे डिसाईन देतो. त्यात स्लॅब मध्ये किति, कॉलम मध्ये किती व बिम मध्ये किती असे सर्व स्टिल (मराठीत सळया) ह्याचे डिझाईन दिलेले असते.
हे सर्व स्टिल एकमेकात गुंफलेले असते. जेणेकरून एकसंधता निर्माण होते.
बिल्डरने काँक्रिटिंग पुर्वी हा सर्व सांगाडा जागेवर स्ट्रक्चरल ईंजिनीयर कडून तपासून घ्यावयाचा असतो.
हुशार बिल्डर लोक अशी तपासणी झाली कि बिम मधले, स्लॅब मधले बरेचसे स्टील काढून घेतात. एकदा का काँक्रीट झाले कि हे सर्व तपासणे अवघड असते.
अशाच एका साईटवर स्ट्रक्चरल इंजिनीअर ने स्लॅब कास्टिंगच्या आधी बिल्डर कडून आधी सर्ब बिम मध्ये काँक्रीट ओतून घेतले होते. एकदा का बीम मध्ये काँक्रिट ओतले कि ह्या चो-या करता येत नाहीत.
बरीचशी डिझाईनर मंडळी ह्या चो-या लक्षात घेऊन मुळातच हेवी डिझाईन करतात जेणे करून ह्या चो-या झाल्या तरी स्ट्रक्चरला फारसा धोका रहात नाही.
अर्थात ह्या सर्व धंद्यातल्या खाचाखोचा आहेत. हुशार आर्किटेक्टने स्वतःला बाजारात कसे स्थापित वा एस्टॅब्लिश होता येइल ते पहावे. नको त्या भानगडीत पडू नये.
भ्रष्टाचाराचे अनेक नमुने इथे पहायला मिळतील परंतु ह्याची व्याप्ती हि फारशी लोकांना अफेक्ट करत नसल्याने त्याकडे फारसे लक्ष देण्यात अर्थ नाही.
उलट तुमच्या पुतणीने अभ्यासात जास्त लक्ष द्यावे हा सल्ला.
असो
अभिज्ञ
6 Aug 2012 - 5:44 pm | विजुभाऊ
आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजीनियर या दोन्हीत गल्लत होतेय.
आर्किटेक्ट हा वास्तुचे डिझाईन ठरवतो तर स्ट्रक्चरल इंजीनीयर हा मटीरीयल आणि बाम्धकामातील वास्तुवर / खांबांवर्/स्लॅबवर पडणारा ताण /वजन यांचे गणीत करून सळ्या / स्लॅबची जाडी इत्यादी ठरवतो.
मुळात प्राध्यापकानी हा विषय सुचवला कसा हेच आश्चर्य आहे. भ्रष्टाचार हा विषय अभ्यासक्रमाला अनुसरून नाही तेंव्हा करीयर /ज्ञान आणि संशोधनातुन मिळणारा कार्य अनुभव लक्षात घेता तीने या विषयाला नकार देणेच योग्य ठरेल
6 Aug 2012 - 6:11 pm | मन१
अवघड आहे...
7 Aug 2012 - 9:03 pm | मराठे
राजू बन गया जंटलमॅन बघा!
8 Aug 2012 - 12:03 pm | एम.जी.
प्रबंधामधे चार भाग येतात.
सिनॉप्सिस : हे या विषयाच्य बाबतील शक्य आहे.
डेटा कलेक्शन : हेही प्रयत्नांती शक्य आहे.
केस स्टडीज : या बाबतीत काय करणार ? एखादी केस घेतली तर तुमच्यावरच अब्रुनुक्सानीची केस होऊ शकते..
डिझाईन सोल्यूशन : डिझाईनचं सोडा पण सोल्यूशन देता देता आण्णा थकले तर ही चिमुरडी काय सोल्यूशन देणार...
कुठल्या कॉलेजच्या प्राध्यापकाने हा विषय घ्यायला सांगितले आहे हे कळले तर बरे होईल...
एम.जी.
8 Aug 2012 - 11:40 pm | शिल्पा ब
मला तर या जानकीबैं डुआय आहेत असं वाटतंय.
13 Aug 2012 - 3:58 pm | जानकी
प्रकाटाआ