महाधनुर्धर अर्जुन
महाभारतातील सर्वश्रेष्ठ धर्नुर्धर कोण ? भीष्मच. पण त्यांनी स्वत:च दुर्योधनाला सांगितल्याप्रमाणे " बाबा रे, मला हरविणारे या त्रिभुवनात कोणी नाही, पण आज मी वृद्ध झालो आहे व तरुण अर्जुनाकडे सर्व दिव्यास्त्रे आहेत. तेव्हा त्याच्या तोडीचा आज तरी कोणी दिसत नाही." हा एकच दाखला अर्जुनाचे अद्वितीय स्थान सिद्ध करतो. हे स्थान त्याने अपार मेहनत, एकाग्रता, गुरुनिष्ठा, इत्यादी गुणांनी मिळवले आहे लहानपणापासून धनुर्धारी व्हावयाचा ध्यास त्याने घेतला व गुरूकडून विद्या मिळवावयाची ठरवल्यावर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अगदी पहिल्यांदी द्रोणांनी एकशे पाच जणांना गोळा करून विचारले " मी तुम्हाला विद्या दिल्यावर माझे एक काम आहे ते तुम्ही करणार का ?" एकट्या अर्जुनाने " हो " म्हटले. द्रोण सर्वांना पाणी आणावयास सांगतात पण सर्वांना लहान तोंडाचे कमंडलू व फक्त अश्वत्थाम्याला मोठ्या तोंडाचा. हे ध्यानात आल्यावर आपला कमंडलू वारुणास्त्राने भरून अर्जुन, द्रोण आपल्या मुलाला शिकवतात ते शिकू लागला. नदीत जलविहाराकरत्ता गेले असतांना मगरीने द्रोणांचा पाय पकडला. स्वत:ची सुटका करावयास सम्रर्थ असूनही द्रॊण " सोडवा, सोडवा " असे ओरडू लागले. इतर मुले गोंधळून इकडेतिकडे पळू लागली. फक्त अर्जुनाने बाण सोडून मगरीला मारले. रात्री अंधारात सरावाने घास तोंडातच जातो हे पाहून अर्जुन रात्रीचा अंधारात सराव करू लागला. हे सर्व पाहून व त्याची गुरुनिष्ठा पाहून द्रोणांचा तो लाडका शिष्य झाला व त्यांनी स्वत:च्या मुलाप्रमाणेच त्याला सर्व अस्त्रे दिली. भास पक्षाची गोष्ट सर्वांना माहित आहेच.
आज मला अर्जुनाच्या संग्रामांमधील कौशल्याबद्दल थोडक्यात सांगावयाचे आहे. द्रौपदी स्वयंवर, गोग्रहण, अठरा दिवसांचे युद्ध सगळ्यांना माहित असते.पण स्वर्गात इन्द्र व इतर देवतांकडून दिव्यास्त्रे मिळवल्यावर इंद्राच्या सांगण्यावरून त्याने निवातकवच व देवांनाही अजिंक्य असलेले पौलोम-कालकंज दैत्यांचा वध करून देवांना गुरुदक्षिणा दिली. हे सर्व विजय त्याने स्वत:चे धैर्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळवले. तो नेहमीच अपराजित राहिला का ? एका लढाईची माहिती पुढे आपण बघणार आहोतच पण आयुष्यातील शेवटची लढाई तो फार लज्जास्पद रीतीने हरला. सर्व यादव यादवीत एकमेकांशी लढून मेले, कृष्ण गेला, द्वारका बुडाली व मागे राहिल्या यादव स्त्रीया व लहान मुले. स्त्रीयांना घेऊन आणावयास अर्जुन गेला. असंख्य स्त्रीयांना घेऊन एकटा अर्जुन चालला आहे असे पाहून अभीर गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला व ते स्त्रीयांना पळवून नेऊ लागले. ध्यानात घ्या, सैनिक नव्हेत, हातात लाठ्याकाठ्या असलेले गुंड ! रागावून त्यांच्यावर प्रतिहल्ला करावयास अर्जुनाने गांडिव धनुष्यास प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कळले की त्याच्या दंडातील ताकदच नाहिशी झाली आहे. महाप्रयासाने त्याने प्रत्यंचा चढवली खरी पण त्याला एकही अस्त्र आठवेना. त्याने नुसते बाण सोडून गुंडांना मारावयास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे अक्षय भात्यातले बाणच संपले ! हताश अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी ही पळवापळवी पाहिली व जमल्या तेव्हड्या स्त्रियांना घेऊन तो परतला. ही त्याची शेवटची लढाई.
गुणविशेष
नर ऋषीचा अवतार मानलेल्या अर्जुनावे वर्णन महाभारतात असे केले आहे :" ... अभिजात शोभा, शील, रूप, व्रत, दम, बल, वीर्य, प्रतिभा इत्यादिकांनी युक्त असलेला, ज्याच्या शरीरावर विद्या, ऐश्वर्य यांचे तेज झळकते, अतिशय शूर, क्षमाशील, अंत:करणाला मत्सराचा स्पर्शही नसलेला, बुद्धिमत्तेचे सर्व गुण असलेला, अहंकार नसलेला, आपल्याविषयी व आपल्या श्रेष्ठतेविषयी काहीही न बोलणारा, सर्वांना प्रिय वाटणारा..." आपण यांतील काहींची माहिती घेऊ.
इंद्रप्रस्थात असतांना एके रात्री एका ब्राह्मणाच्या गायी चोर चोरून नेऊ लागले. त्याच्या आरड्याओरड्याने अर्जुन जागा झाला व शस्त्रे आणावयास शस्त्रागारात गेला. त्याने तेथे धर्म व द्रौपदीला एकांतात पाहिले. शस्त्रे घेऊन त्याने चोरांना मारून ब्राह्मणाच्या गायी परत दिल्या. पांडवांत असे ठरले होते की एकाने दुसरा भाऊ व द्रौपदी यांना एकांतात पाहिले तर पहिल्यने बारा वर्षे वनवासात ( इंद्रप्रस्थाबाहेर) जावयाचे. युधिष्ठिराचा विरोध असतांनाही अर्जुनाने धर्माशी कपट करावयाचे नाकारले व तो बाहेर पडला. फ़िरतफ़िरत तो गंगेत स्नानाला गेला असतांना त्याच्यावर भाळून उलूपी नावाच्या नागकन्येने त्याला चक्क पळवून पाताळात नेले. तेथे तिच्या आर्त विनवणीवरून त्याने तिच्याशी विवाह केला व एक रात्र तेथे राहून सकाळी परत गंगाकाठी आला. नंतर तो मणिपूर राज्यात गेला असता तेथील राजकन्या चित्रांगदा त्याच्या दृष्टीस पडला. त्याचे मन तिच्यावर बसले व राजाकडे त्याने तिची मागणी केली. राजाने सांगितले की हिचा पहिला पुत्र वंशवृद्ध्यर्थ मला देणार असशील तर मला मान्य आहे. ते कबूल करून चित्रांगदेशी विवाह करून अर्जुन तेथे तीन वर्षे राहिला. तेथे बभ्रुवाहनाचा जन्म झाला. मुलाला व बायकोला तेथे ठेवून तो परत बाहेर पडला. नंतर प्रभासक्षेत्री त्याची व कृष्णाची गाठ पडली व दोघे द्वारकेला गेले. तेथे सुभद्रेच्या प्रेमात पडला.मग कृष्णाच्या संमतीने सुभद्राहरण करून त्याने सुभद्रेशी विवाह केला.
चतुराई
बारा वर्षे झाल्यावर आता इंद्रप्रस्थात परतावयाचे होते. आणि एक मोठा प्रश्न अर्जुनासमोर उभा राहिला. सुभद्रा व द्रौपदी यांची गाठ कशी घालून द्यावयाची ? मोठ्या चतुराईने सुभद्रेला गोपीवेष घालून त्याने द्रौपदीकडे पाठविली. अतिशय नम्रतेने तिने द्रौपदीला नमस्कार करून सांगितले, " माझे नाव भद्रा, मी आपली दासी आहे ". प्रसन्न झालेल्या द्रौपदीने उठून कृष्णभगिनीला आलिंगन दिले. दोघींचे प्रेम जुळलेले पाहून सर्वच आनंदित झाले. कुंतीचे नकुल-सहदेव यांवर प्रेम होते तसेच द्रौपदीचे अभिमन्युवर होते व " पांडवांना लढाई नको असेल तर अभिमन्युला पुढे करून माझे पाच पुत्र कौरवाशी लढतील, आईच्या अपमानाचा बदला ते घेतील " असे तिने आत्मविश्वासाने पांडवांना ठणकाविले !
शील
अर्जुनाने द्रौपदीशिवाय आणखी तीन विवाह केले म्हणून " हलकट, कामी इंद्राचा मुलगा " (तो दुसरे काय करणार) अशी टीका एका प्रतिसादात केली गेली. पण पुढील दोन उदाहरणांवरून उलटेच दृष्य समोर येते.
अर्जुन अस्त्रे संपादन करण्यासाठी स्वर्गात गेला असता एके दिवशी इंद्राच्या दरबारात अप्सरांचा नाच चालू होता. त्या वेळी अर्जुन उर्वशीकडे अनिमिष दृष्टीने पहात आहे असे इंद्राला दिसले. त्याचे मन उर्वशीवर गेले आहे अशा समजुतीने इंद्राने तिला रात्री अर्जुनाकडे जावयास सांगितले. तीलाही तेच पाहिजे होते. रात्री मोठा शृंगार करून ती अर्जुनाच्या महालात गेली. गोंधळलेल्या अर्जुनाने तिचे स्वागत करून " मी आपली काय सेवा करू ?" असा प्रश्न विचारला. त्यावर तिने येण्याचा उद्देश सांगितला. डोळे मिटून, कानावर हात ठेवून अर्जुन म्हणाला " छे,छे. ही पुरुरव्याची पत्नी, म्हणजे कुरुवंशाची जननी , असे मनात आल्याने, लहान मुलाने आईकडे पहावे, तसे मी तुमच्याकडे पहात होतो. पृथ्वीवर कुंती किंवा माद्री, स्वर्गात शची, तसे किंवा त्याहूनही जास्त मला आपण आईसारख्या अहात." उर्वशीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की " पृथ्वीवरील नाती इथे लागू नाहीत. कुरुवंशातील तुझ्या पूर्वजांनी आमचा उपभोग घेतला आहे." पण अर्जुन काहीच ऐकावयास तयार नाही हे पाहिल्यावर संतापून तिने अर्जुनाला "तू षंढ होशील" असा शाप दिला. अर्जुनाने सकाळी इंद्राला सर्व प्रकार सांगितल्यावर त्याने तो शाप एका वर्षापुरता मर्यादित केला व " याचा उपयोग तुला अज्ञातवासात होईल" असे सांगितले.
दुसरा प्रसंग आहे विराटाला पांडवांची ओळख पटल्यानंतरचा. आपण पांडवांना दासासारखे वागवले व अर्जुनाने आपले राज्य वाचविले याबद्दल उतराई व्हावे म्हणून तो म्हणाला " आमच्या कुलाचा व कुरु कुलाचा विवाहसंबंध जुळून येवो. मी माझी मुलगी उत्तरा अर्जुनाला देतो." एक तरूण, सुंदर राजकन्या पदरात पडत असतांना अर्जुनाने उत्तर काय दिले बघा : तो म्हणतो " राजा, विवाहसंबंध जुळून यावेत हे उत्तमच. पण मी उत्तरेला पत्नी म्हणून स्विकारत नाही. ती माझी स्नुषा म्हणून मी तिला स्विकारतो. माझा मुलगा, कृष्णाचा भाचा, अभिमन्यु हा तुझ्या मुलीला योग्य वर आहे. तो तरुण, सुस्वरूप, थोर योद्धा आहे." विराटाने "असे का ?"
विचारल्यावर अर्जुन म्हणाला " राजा, तुझी मुलगी एक वर्ष माझ्याकडे शिक्षण घेत होती. आम्ही एकत्र अंत:पुरापासून सर्वत्र वावरत होतो. आता आमचे लग्न झाले तर लोक शंका घेतील. शिष्या म्हणजे मुलगी व मी स्नुषा व मुलीत फरक धरत नाही. उत्तरा माझी स्नुषाच होईल ". राजाने अनेक स्त्रीयांशी लग्ने करणे हा त्या काळी रिवाज होता. त्यावरून शील ठरत नाही. उर्वशीसारखी अप्सरा वा तरुण राजकन्या नाकारण्यात खरी परिक्षा आहे.
दूरदर्शीपणा
सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनही अर्जुनाच्या ठिकाणी विलक्षण दूरदर्शीपणा होता. पहिला नमुना तो व दुर्योधन कृष्णाकडे मदत मागावयास गेले तेव्हाचा. कृष्णाने मी लढणार नाही व दुसर्या बाजूला दहा हजार यादव लढवय्ये असा प्रस्ताव दिला. अर्जुनाने लगेच कृष्णाची निवड केली. दुर्योधन आनंदाने योद्धे घेऊन गेल्यावर कृष्णाने कारण विचारल्यावर अर्जुन म्हणाला, " मी सगळ्यांना जिंकू शकतो पण तू जेथे असशील तेथेच यश व कीर्ती जाणार, मला त्यांची इच्छा आहे." अर्जुनाची निवड किती अचुक होती हे युद्धातील कृष्णाच्या कामगिरीवरून लक्षात येते. दुसरा आहे अर्जुन अश्वमेध यज्ञानिमित्त अश्वाबरोबर हिंडत असतानाचा. त्याने तेथून युधिष्ठिराला निरोप पाठवला की अग्रपूजेच्या वेळी तंटा उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालवध झाला होता. तसे काही घडू नये म्हणून ही काळजी. गंमत म्हणजे हा निरोप कृष्णाबरोबर पाठवलेला आहे !
अपार करुणा व मानवतावाद
एवढ्या युद्धांत लाखो माणसे मारावी लागली तरीही अर्जुनाचे हृदय करुणेने भरलेले होते. रात्री शिबीरात
पांडवपुत्रांची, पांचालांची हत्या करून अश्वत्थामा पळून गेला. द्रौपदीच्या आक्रोशाने भी्म त्याला मारावयास निघाला. अश्वत्थाम्याकडील ब्रह्मशिरस अस्त्रामुळे भीमाचा निभाव लागणार नाही हे माहीत असल्याने त्याच्यामागून कृष्ण-अर्जुन निघाले. अश्वत्थामा त्यांना बघून घाबरला व त्यने "पांडवांच्या नाशाकरिता : म्हणून अस्त्राचा प्रयोग केला. प्रतिकारार्थ अर्जुनाने त्याच अस्त्राचा प्रयोग केला पण प्रथम " अश्वत्थाम्याचे कल्याण असो " असे म्हणून "फक्त अस्त्र निवारणार्थ " अस्त्र टाकले. गुरुपुत्राबद्दलचे प्रेम व सर्वसंहारक विनाश नको म्हणून ही काळजी. नंतर नारद व व्यास यांच्या सांगण्यावरून त्याने अस्त्र मागेही घेतले. अश्वमेध यज्ञाच्या वेळी त्याने जास्तीतजास्त सामोपचाराने घेतले. त्याच्या इतर गुणांबद्दल लिहण्यासारखे बरेच आहे पण बभ्रुवाहनाची गोष्ट सांगून थांबूया.
अश्व मणिपूरच्या राज्यात आल्यावर बभ्रुवाहन नजराणा घेऊन वडिलांना भेटावयास आला. अर्जुनाला ते पसंत
पडले नाही. तो बभ्रुवाहनाला म्हणाला " मी घरगुती कामासाठी आलो नाही, क्षत्रीय राजा असा वागत नाही .क्षात्रधर्माप्रमाणे वाग." बभ्रुवाहन खट्टु झाला. नागकन्या उलूपीला हे सहन झाले नाही. जमीन फाडून ती वर आली व बभ्रुवाहनाला म्हणाली " बाळा, मी तुझी आई आहे. माझे ऐक. तुझ्या पित्याला क्षात्रधर्माची आवड आहे ना, मग लढ त्याच्याशी. तेणे करूनच तो तुझ्यावर संतुष्ट होईल." मातेचे उत्तेजन मिळाल्यावर महातेजस्वी बभ्रुवाहनाने लढाई करावयचे ठरविले व नंतर झालेल्या घनघोर युद्धात दोघांनी एकमेकांना पाडले. दोघे पडलेले पाहून चित्रांगदा उलूपीला म्हणाली " तू मुलाकडून पतीला मारवलेस व तरीही शोक करत नाहीस हे कसे ?.पुत्र मेल्याचा मला फर शोक नाही पण त्याने पतीचे असे आतिथ्य केले हे अतिशोककारक आहे ". इतक्यात निचेष्ट पडलेला बभ्रुवाहन जागा झाला व उलूपीला म्हणाला "मी पित्याचा वध केला याचे प्रायश्चित्त म्हणून मी आजच येथे प्राण देणार." उलूपी म्हणाली , " मुला, शोक सोड. तूच काय, जगातील कोणालाही हा जिष्णु अजिंक्य आहे. मी माझ्या मोहिनी मायेचा प्रयोग केला होता. ""अधर्माने भीष्मांना मारले याचे निरशन केल्याशिवाय पार्थाचा जीव गेला असता तर त्याला नरकात पडावे लागेल असे वसूंनी व गंगेने ठरविले होते. त्या पासून सुटका मिळावी म्हणून माझ्या पित्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, मणिपूरच्या तरुण राजाने याला जमीनीवर पाडले म्हणजे तो पापमुक्त होईल. आता हा मृतसंजीवनी मणि घे व तुझ्या पित्यच्या हृदयावर ठेव. म्हणजे पार्थ जिवंत झाल्याचे तुझ्या दृष्टीस पाडेल.
आणखी काही पात्रांची ओळख करून द्यावी अशी काही मित्रांनी विनंती केली आहे पण मी पडलो मुळचा कथेकरी बुवा. गोष्टी सांगावयाची आवड. लेख किती लिहणार हो ? श्री. अपर्णा अक्षय यांनी अचुकपणे सांगितल्याप्रमाणे "परिक्षेतील उत्तरपत्रिका " कशास लिहावयाच्या ? पण एक चांगली गोष्ट म्हणजे श्री मृत्युंजय
यांनी पुढील लेख लिहण्याचा मानस व्यक्त केला आहे. तेव्हा धर्म, दुर्योधन, भीम (व श्रीकृष्णही!) त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून वाचावयास मिळतीलच. हां, पण एक नक्की, कुणाला महाभारतातील गोष्टी ऐकावयाच्या असतील (उदा. जयद्रथ) तर सांगा, मला आवडेल.
शरद
प्रतिक्रिया
3 May 2012 - 7:34 pm | मृगनयनी
धन्यवाद शरद'जी! :)
बरीच नवीन माहिती मिळाली! :)
यामध्ये "अभीर" शब्दाचा नक्की अर्थ काय? .. आणि त्याचा गुन्डांशी काय संबंध? :)
4 May 2012 - 8:51 am | शरद
आभीर
(अभीर चुकून टंकले गेले) महाभारतातील उल्लेख देतो ...स्त्रीयांना घेऊन निघालेल्या अर्जुनाला वाटेत पंचनद नावाचा देश लागला. तेथे त्याने मुक्काम केला.त्या ठिकाणी आभीर नामक रानटी लोकांची वस्ती होती.या हजारो अनाथ स्त्रीयांचे संरक्षणास एकताच वीर आहे असे पाहून त्यांचे तोंडास पाणी सुटले... मग ते हजारों दस्यु (आभीर) आपल्या काठ्या सरसावून यादवमंडळींवर धावून आले....
आज आभीर लोकांची वस्ती उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजराथ व सौराष्ट्र या भागात आहे. हे वृत्तीने गवळी आहेत.
शरद
3 May 2012 - 7:50 pm | पैसा
सर्वश्रेष्ठ नर आणि धनुर्धराचं तितकंच सुंदर व्यक्तिचित्रण. अर्जुन असा होता म्हणून तर द्रौपदीचं सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर होतं. पांडवांचा वंश पुढे चालवला गेला तोही अर्जुनाच्या नातवाकडून. कृष्णाने गीता सांगितली तीही अर्जुनालाच. कृष्णाच्या पायाशी बसून तो जागा व्हायची वाट पाहणारा आणि एकाग्रतेने विद्याभ्यास करणारा अर्जुन नेहमीच मोहवतो.
तुम्ही व्यक्तिचित्रं इथे थांबवताय तर तो तुमचा निर्णय, आम्हाला तर आणखी वाचायला नक्कीच आवडली असती. असो. इतर गोष्टी सांगणं मात्र सुरू ठेवा ही विनंती!
3 May 2012 - 8:05 pm | धन्या
या महाभारत कथांचं आजच्या काळात प्रयोजन काय?
थोडा वेळ गृहीत धरलं की महाभारत खरच भारतभूमीवर होऊन गेलंय, तरीही आज महाभारतात वर्णन केलेला काळही राहीलेला नाही आणि तसे चमत्कारही आज होत नाही.
कुणी जर "व्यासोत्च्छिष्टं जगत्सर्वम" या उक्तीचा दाखला देत असे म्हणत असेल की महाभारतात "कसे वागू नये आणि कसे वागावे" याचे शिक्षण मिळते तर मग प्रश्नच मिटला.
4 May 2012 - 1:52 am | बॅटमॅन
>>या महाभारत कथांचं आजच्या काळात प्रयोजन काय?
हा कसला प्रश्न आहे? त्या हिशेबाने शिवाजीमहाराज, पेशवे, गांधीजी, टिळक, इ. कोणाच्याच कथांचे आजच्या काळात प्रयोजन ते काय? तो काळ आता नाहीच राहिला. त्याचप्रमाणे सहित्य, ललित लेखन, इत्यादी तद्दन अनुत्पादक गोष्टींचा उपयोग तरी काय?
कविता लिहून का कुठे फॅक्टरीत उत्पादन होते? तेव्हा जगात फक्त शेती आणि इंजिनिअरिंग व डॉक्टरकी शिकवा, फक्त त्याचीच चर्चा करा, कारण आजच्या काळात बाकी कशाचाच उपयोग/प्रयोजन नाही आणि निरुपयोगी गोष्टींवर चर्चा करून फुकटचा वेळ का वाया घालवताय?
बाकी मुख्य म्हणजे उत्सुकता हे प्रयोजन आहे. आणि मानवी जीवन हे कुठल्याही काळात इतर सर्व कालखंडांपेक्षा वेगळे असते तसेच सारखे देखील असते. त्यामुळे जीवनातील त्याच त्या समस्यांवर तोडगा त्या जुन्या काळि लोकांनी कसा काढला, हे पाहणे उद्बोधक ठरते. पण मूलतः महाभारत असो किंवा अन्य कुठलीही कथा असो, "दर्जेदार टाईमपास" हे अशा गोष्टींचे एकमेव प्रयोजन आहे.
अशा टनावारी गोष्टी असतात, की ज्यांची उपयुक्तता अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन यांच्या भाषेत सांगता सांगता येत नाही. पण तरीही त्या गोष्टी नि:संशयपणे आवश्यक असतात. पण त्यासाठी जर गिर्हाईक आणि मतदार या भूमिका व अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन ही चौकट सोडून आयुष्याकडे पाहता येत असले, तर ठीक आहे. नसेल जमत तर कोण काय करणार बापडा? तरीही कोणी जर अशा इंटँजिबल गोष्टींची उपयुक्तता उगीच खोदून काढू लागला, तर माझी जाम सटकते.
4 May 2012 - 10:51 am | धन्या
डोक्याला खुपच शॉट लावून घेता ब्वॉ तुम्ही. :)
किती छान उत्तर दिलंत माझ्या प्रश्नाचं. मग याच्या आधीचा आणि नंतरचा परिच्छेद का बरे वाकडयात शिरुन लिहिलात?
अशी सटकत जाऊ देऊ नका. सटकली की माणूस विचार करण्याची क्षमाता गमावून बसतो. आणि हो, अन्न-वस्त्र-निवारा-मैथुन ही मुलभूत गरजांची चौकट आजच्या काळात बरीच रुंदावली आहे हो. याच्यात निदान थाळी* दुरदर्शन आणि भ्रमणध्वनी या दोन गोष्टी तरी आता समाविष्ट करायला हव्यात. (शहरी भागासाठी आंतरजाल अधिक हवं याच्यात.)
* हा शब्द रिनिभाकाघासं (रिकामटेकडे निवृत्त भाषांतर काशी घाला संघ) यांच्याकडून प्रेरणा घेऊन बनवलेला आहे.
4 May 2012 - 12:46 pm | बॅटमॅन
>>किती छान उत्तर दिलंत माझ्या प्रश्नाचं. मग याच्या आधीचा आणि नंतरचा परिच्छेद का बरे वाकडयात शिरुन लिहिलात?
कारण तुमचा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला गेला नव्हता अशी मला आलेली शंका. पण तुमच्या या प्रतिसादावरून तुमचा प्रश्न प्रामाणिक होता, हे सहजच सिद्ध झाले, सबब आता सरळात जातो ;)
4 May 2012 - 1:05 pm | प्यारे१
>>>> रिनिभाकाघासं (रिकामटेकडे निवृत्त भाषांतर काशी घाला संघ)
___/\___
ह्याच्यासाठी तुला एक बिअर/ पराठा/लस्सी रे धन्या.... !
(भाषांतर वापरला नसतास तर बार्बेक्यु नेशनला नेलं असतं ;) )
4 May 2012 - 9:53 pm | अर्धवटराव
महाभारत काव्य मनाला आणि बुद्धीला पौष्टीक खुराक देणारं आगार आहे. जोपर्यंत त्यातले संदर्भ जीवंत राहातील ( म्हणजे राज्य व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न संस्था, रक्ताचे आणि कृत्रीम नाते सबंध वगैरे )तोपर्यंत ते उपयोगी राहिल. त्यानंतर त्याचा खरा उपयोग करायला आपल्या एकता कपूर वगैरे आहेच कि :)
अर्धवटराव
3 May 2012 - 8:06 pm | मदनबाण
वाह...
असेच लेखन येउंदे... वाट पाहतोय ! :)
3 May 2012 - 10:34 pm | प्रचेतस
सुंदर अभ्यासपूर्ण लेख.
स्वर्गारोहणासाठी महाप्रस्थान करणार्या अर्जुनाचे जेव्हा हिमालयात पतन होते तेव्हा भीम युधिष्ठिराला म्हणतो ह्या पराक्रमी अर्जुनाने थट्टेत सुद्धा कधी खोटे बोलल्याचे आठवत नाही मग याचे असे पतन का व्हावे. ह्यावर युधिष्ठिर म्हणतो की अर्जुनाला आपल्या शौर्याचा फार अभिमान असे. एकाच दिवसांत मी सर्वांचा संहार करीन असे हा म्हणत असे पण याने असे केले नाही. इतर धनुर्धरांना हा कधीही खिजगणीत धरत नसे.
महाभारतातील व्यक्तिचित्रे इतक्यातच थांबवू नका ही विनंती.
अधिक लिखाण वाचावयास नक्कीच आवडेल.
3 May 2012 - 11:04 pm | अशोक पतिल
अतिशय छान लेख ! महाभारता मधे एक अर्जुन व भीम यांच्या वरच पुर्ण युद्धाचा भार होता . दुसरे म्हणजे भगवदगीता आपल्या पर्यंत पोहचविण्याचा मान अर्जुनाकडेच जातो . सख्य भक्तीचे अर्जुन हा मुर्तिमंत उदाहरण होय . त्याने पुर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही युद्धातुन पाठ दाखवली नाही . आजही एकाग्रता म्हणजे अर्जुन असेच मानले जाते ते काही उगाच नाही.
4 May 2012 - 4:42 am | शुचि
अतिशय सुंदर लेख. खूप आवडला.
ज्ञानेश्वरीतील खालील ओळी अर्जुनाचे दैवी गुणसामर्थ्य व्यक्त करतात. नारायणाने प्रत्यक्ष पित्याला वसुदेवाला, मातेला देवकीला जे गुज सांगीतले नाही, भावाला बलरामाला जे कधी बोलला नाही एवढेच नाही तर देवी लक्ष्मी इतकी निकट असूनही तिच्याशी जे गुज कधी जे श्रीविष्णू बोलले नाही ते गुज अर्जुनांस सांगीतले. जे थोर योगी जाणू शकत नाहीत, जे वेदांना आकळले नाही ते निजस्वरुप श्रीविष्णू सख्या पार्थास सहज दाखवून गेले.
ते वेळी संजयों रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगे माते देवकीसी । जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळीक । तेही न देखे या प्रेमाचे सुख । आणि कृष्णस्नेहाचें पिक । यांतेचि आथी ॥ ९ ॥
सनकादिकांच्या आशा । वाढिनल्या होत्या कीर बहुवसा । परी त्याही येणें माने यशा । येतीचिना ॥ १० ॥
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
एर्हवीं हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी येणे मानें सकृप । जाहला असे ॥ १४ ॥
हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥
4 May 2012 - 5:29 am | अर्धवटराव
अर्जुनाचे व्यक्तीमत्व समजुन घ्यायला श्रीकृष्ण-अर्जुन आणि कर्ण-अर्जुन हे दोन चश्मे अत्यावष्यक आहेत. त्याच्या शिवाय अर्जुन गाथा म्हणजे केवळ घटनांची जंत्री !!
आणि अर्जुनाच्या आयुष्यातील सगळ्या महत्वाची घटना म्हणजे भारतीय युद्धारंभी त्याचा शोक. हा शोक/हळवेपणा.. किंबहुना त्या प्रसंगी अर्जुनाचा मानसीक दुबळेपणा म्हणजे त्याच्या मानव्याची प्रचिती होय. अर्जुन या पात्राचा हा आत्मा आहे.
अर्धवटराव
4 May 2012 - 6:41 am | स्पंदना
>>आणि अर्जुनाच्या आयुष्यातील सगळ्या महत्वाची घटना म्हणजे भारतीय युद्धारंभी त्याचा शोक. हा शोक/हळवेपणा.. किंबहुना त्या प्रसंगी अर्जुनाचा मानसीक दुबळेपणा म्हणजे त्याच्या मानव्याची प्रचिती होय. अर्जुन या पात्राचा हा आत्मा आहे.>>
सत्य ! सत्य!
4 May 2012 - 6:55 am | स्पंदना
की हा अर्जुन या व्यक्तिरेखे बद्दलचा जिव्हाळा असावा?
यात अजुन त्याला गांडिव कस प्राप्त झाल याचा उल्लेख ही गरजेचा होता.
आणखी एक अर्जुनाच वैशिष्ट्य म्हणजे त्याला पुर्ण पुरुष मानतात, त्याचा उल्लेख अन पुर्ण पुरुषत्वाची लक्षणे थोडी उद्ध्रुत केली तर आम्हा लोकांची माहितीवर साठलेली धुळ थोडी बाजुस होइल.
>>पण मी पडलो मुळचा कथेकरी बुवा>>>>
आम्हाला हेच वैशिष्ट्य आवडत तुमच्या बद्दल. कथेकरी कोणतीही कथा त्यात रस भरत सांगत असतो. अन कथा सांगायला तेव्हढ्या अभ्यासाची अन योगदानाची गरज ही असते. तुम्ही अतिशय चांगल्या कवितांचे भावपुर्ण रस ग्रहण करता. जे जे उत्तम त्याचा खुप मोठा संग्रह आहे तुमच्याकडे. त्यातले कण दोन कण येथे सांडाल तर आम्ही उपकृत राहु.
महाभारतातल आणखी एक पात्र मला भुरळ घालत, ते म्हणजे 'विदुर" याच्या बद्दल अतिशय थोड जरी माहित असल तरी ते लिहाल का?
4 May 2012 - 10:17 am | प्रचेतस
खांडववन दहनाच्या वेळी अग्नी ब्राह्मणरूप धारण करून कृष्णार्जुनांकडे येऊन भुकेपोटी खांडवभक्षणाची मागणी करतो. पण हे वन इंद्राद्वारे संरक्षित असल्याने कृष्णार्जुन अग्नीकडे शस्त्रांत्रांची मागणी करतात. तेव्हा अग्नी वरूणाकडून त्याचे गांडीव धनुष्य, दोन अक्षय्य भाते आणि नंदीघोष रथ अर्जुनाला प्रदान करतो तर कृष्णाला चक्र (हे सुदर्शन चक्र नव्हे. तसा उल्लेख खांडवदाहपर्वात नाही) आणि कौमोदकी गदा हे मिळते.
4 May 2012 - 9:10 am | मोदक
>>>आयुष्यातील शेवटची लढाई तो फार लज्जास्पद रीतीने हरला. सर्व यादव यादवीत एकमेकांशी लढून मेले, कृष्ण गेला, द्वारका बुडाली व मागे राहिल्या यादव स्त्रीया व लहान मुले. स्त्रीयांना घेऊन आणावयास अर्जुन गेला. असंख्य स्त्रीयांना घेऊन एकटा अर्जुन चालला आहे असे पाहून अभीर गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला व ते स्त्रीयांना पळवून नेऊ लागले. ध्यानात घ्या, सैनिक नव्हेत, हातात लाठ्याकाठ्या असलेले गुंड ! रागावून त्यांच्यावर प्रतिहल्ला करावयास अर्जुनाने गांडिव धनुष्यास प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कळले की त्याच्या दंडातील ताकदच नाहिशी झाली आहे. महाप्रयासाने त्याने प्रत्यंचा चढवली खरी पण त्याला एकही अस्त्र आठवेना. त्याने नुसते बाण सोडून गुंडांना मारावयास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे अक्षय भात्यातले बाणच संपले ! हताश अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी ही पळवापळवी पाहिली व जमल्या तेव्हड्या स्त्रियांना घेऊन तो परतला. ही त्याची शेवटची लढाई
मनुष्य बली होत नही, समय होत बलवान
भिल्लन लुटी गौपीका, वही अर्जुन वही बाण.
याचा सोर्स कुणी सांगू शकेल का..?
4 May 2012 - 9:25 am | चावटमेला
आधीच्या लेखांप्रमाणेच हा सुध्दा अतिशय वाचनीय झाला आहे.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
4 May 2012 - 11:06 am | मृत्युन्जय
हा ही भाग उत्तम जमला आहे. तुम्ही युधिष्ठिरावर लिहाच हो.
बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देइन.
4 May 2012 - 11:11 am | मुक्त विहारि
अजून लिहा....
4 May 2012 - 1:16 pm | इरसाल
की तुम्ही लिखाण बंद करत नाही आहात.
तुमच्याकडुन अजुन खुप वाचायला आवडेल.
4 May 2012 - 1:55 pm | सुकामेवा
लेखमाला चालू राहुदेत