प्रचीतगड कंदहार धबधबा भाग २

ऐक शुन्य शुन्य's picture
ऐक शुन्य शुन्य in भटकंती
30 Apr 2012 - 3:55 pm

भाग १ इथे वाचा.
http://www.misalpav.com/node/21480

जंगलात मध्येच राहू शकत नव्ह्तो, जनावरे आणी वनविभागाची भीती, आग पण पेटवु शकत नव्हतो. थोडक्यात सगळ्यांची तंतरली होती. एका मार्गदर्शकने सांगितले की उजव्या बाजुला नदी आहे. जर रस्ता नाही सापडला तर सरळ घळ उतरून नदीकाठी जाउ किंवा उठवलेल्या एकाद्या वस्तीमध्ये रात्री राहू आणि सकाळी रस्ता शोधू. सगळेच घाबरलेले होते कोणीच दाखवत नव्हते पण उसना आवेश आणून ठीक आहे म्हणालो.
**************************************************************

थोडया वेळ चालल्यानंतर किंचीत खेदप्रर्दशन होऊ लागले. परत जाऊन किल्ल्यावर राहू वगैरे वगैरे... पण मार्गदर्शकाने आम्हाला एका जागी थांबवुन परत एकदा जंगलाचे अवलोकन केले आणि सांगितले कि त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठीमागून चालत रहा. त्याने कोय्ताने समोर आडव्या आलेल्या झुडुपांच्या फांद्या कापायला सुरुवात केली. असे करत जवळपास एका छोटया उंचवटयापासुन खाली उतरू लागलो. एव्हाना संधीप्रकशात वारणा नदीचे पात्र दूरवर दिसू लागले होते. तीच एक मनात आशा होती की बरोबर जागी पोहोचू म्हणून. असा रस्ता पार करीत एका दगडाजवळ (मोठी शिळा) पोहोचलो. तो दगड पहाताच मार्गदर्शकानी सुटकेचा निश्वास टाकला आणि त्यापुढील पायवाट पाहून आम्हीसुद्धा...

थोडस जंगल

संधीप्रकाश एव्हाना अंधारात बदलत होता आणि आम्ही रहाण्याच्या जागे पासून बरेच दूर. पायवाट घनदाट जंगलातून जात होती अन अंधार गडद होत होता. विजेरी वापरणे म्हणजे गस्तीवर असलेल्या वनकर्मचार्यांच्या नजरेत भरण्यासारखे होते अन विजेरीमुळे बाजूचा अंधार पण गडद होत होता. अर्धा ते एक तास चालल्यावर आम्ही नदीकाठी पोहोचलो. सात साडे सात वाजले असावेत. पण नदीवर सुंदर चांदण्याचा उजेड पसरला होता. नदी पात्रातून पंधरा वीस मिनटे चालल्यानंतर आम्ही मुक्कामाच्या जागी पोहोचलो. मुक्कामाची जागा म्हणजे नदीकिनारी असलेला वाळूचा भाग होता. सातजणांसाठी झोपण्यासाठी जागा होती. मागील भाग हा वीस फूटांची कडा होती. मार्गदर्शक तरुणपणी शिकारीसाठी किंवा जनावरे चरण्यासाठी घेवून येत असताना इथे मुक्काम करायचे. मार्गदर्शकानी थोडीफार लाकडे गोळा केली अन दोन्ही बाजुला शेकोटया पेटीवल्या. समोर नदी, मागे कडा अन दोन्ही बाजूला शेकोटया, आम्ही जनावरांपासून सुरक्षित होतो. रात्रीचा मेनु होता तेथेच बनिवलेला बटाटयाचा रस्सा, भात अन तयार मेथीचे धपाटे. भूक जबरदस्त लागली होती पण त्यातच एकच भांडे. आधी बटाटयाचा रस्सा तयार केला. रस्स्याच्या वासानेच भूक खवळली होती पण भात शिजायला बराच वेळ लागत होता. मी अन सुजित जेवण तयार करत असताना, उदय इतरांना जमवून अंधारात फोटो काढायचे प्रयत्न करत होता.
जेवण तयार होताच सर्वजण अक्षरशः तुटून पडले. थोडा वेळ शेकोटीभोवती गप्पांचा फड रंगला. शेकोटीभोवती गप्पा अन डोळ्याभोवती झोप नाचत होती. अखेरीस निद्रादेवीचा विजय होऊन प्रत्येकजण झोपेच्या अधीन झाला. थंडीमुळे रात्री जाग आली तेव्हा शेकोटया मंद झाल्या होत्या. लाकडे व्यवस्थीत करुन परत झोपलो. पहाटे पहाटे तर थंडी बरीच वाढली होती.

मी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा, सभोवताली जे पाहीले, मला वाटत नाही की मी आता त्याचे शब्दात वर्णन करू शकेन म्हणून. हिमालयातील पहिल्यांदा हिमशिखराशी झालेली नजरभेट, व्हली ओफ़ फ़्लोवर पाहाताना झालेली मनाची अवस्था, कोकणकडया वरून अन तिकोना किल्ल्यावरून पाहीलेला सुर्यास्त अन ही सकाळ म्हणजे, ज्यांना मी माझ्या जीवनातील Ecstacy (पर्यायी मराठी शब्द सुचवा) म्हणतो, तो क्षण होता. नदी पात्राच्या दोन्ही बाजुला असलेली झाडे, हळूच वाकून अल्लड नदीचे कौतुक करत होती. अल्लड नदी पायात पैंजण असल्यासारख प्रत्येक खडकावरून उडी मारून खळखळ आवाज करीत होती. आणि नुकताच उगवलेला सुर्य किरणांनी अल्लड नदीचे सौंदर्य टिपत होता. सगळे झोपून उठल्यावर त्या अल्लडपणात भरच पडली. थोडया अंतरावर नदी स्वःताला कडयावरून झोकुन देत होती अन झोकून देताना सुर्याच्या किरणांनी पकडले म्हणून त्या छोटया डोहात लाजुन दारामागे लपलेल्या अवखळ तरूणीसारखी एकदमच शांत झाली होती.

रम्य सकाळ

ह्या जागेवरून निघण्याआधी चहाचा कार्यक्रम झाला. कडक थंडीमध्ये, सगळी चहा दूध भुकुटी अन साखर वापरून कडक चहा बनिवला होता. त्या सुंदर जागेवरून पाय निघत नव्हता पण आज कंदहार धबधबा पाहून रात्री मुंबईला परतायचे होते.

आता आम्ही नदीपार करून धबधब्याच्या दुसर्याबाजुने धबधब्याच्या दरीमध्ये उतरणार होतो. पुर्वी चांदोली धरणातून निघणारी बोट धबधब्याजवळ (जवळपास २ कि मी दूर) आणुन सोडायची, धबधबा पाहून परत घेवून जायची. पण ती आता बंद आहे किंवा वनविभाग फक्त गस्तीसाठी वापरतो. दरीजवळ पोहोचताच धबधब्यातुन पडणार्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. बहूदा जंगलातील शांत वातावरण, उंचीवरून डोहात कोसळणारे पाणी, यामुळे आवाज फार दूरवर सुदधा स्पष्ट ऐकू येत होता. हा धबधबा म्हणजे अवघी नदी सुमारे १०० मी अंतरावरून कोसळते ती कंदहार डोहात. कंदहार धबधब्यापेक्षा प्रसिदध आहे तो कंदहार डोह, तो त्याच्या खोलीमुळे अन त्या जागेच्या गुढतेमुळे. मार्गदर्शकांच्या बोलण्यातून जागेच गूढ थोड जास्तच वाढत होत. संशोधन करणारी पाणबुडी डोहात गायब होणे किंवा ठराविक रात्री पाण्यातून विचित्र गोष्टी बाहेर येणे, सकाळी परत पाण्यात जाणे, साती आसरा इतर आणि काही (ऐकीव कहाण्या). गावातील पाणी पिण्याच्या मुख्य विहीरीमध्ये कोणी पोहू नये किंवा लहान मुलांनी विहीरीजवळ जावू नये म्हणुन साती आसरांच्या कहाण्या पसरवल्या जायच्या, तसाच काहीसा प्रकार असावा. पुर्वी कंदाहार डोहावरचा स्थानिक वर्तमानपत्रामध्ये लेख वाचला होता, त्यात सुदधा डोहामधील प्राण्यांच्या संशोधनची गरज वगैरे व्यक्त केली होती.

दरीतून उतरताना वारणा नदीच्या खोर्याची सुरुवात

दरीची उतरण बरीच दमवणारी होती. दरी उतरून जसे धबधब्याकडे जात होतो, तसा पाण्याचा आवाज पण चांगलाच वाढला होता. अन धबधब्याचे दर्शन झाले. उंचीवरून पडणारे पाणी दिसु लागले होते अन आमचा चालण्याचा वेग वाढला. ऐका दगडाला वळसा घालून आल्यावर समोर पसरालेल्या भव्य डोह दिसला. गर्द झाडी, धबधब्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या भिंती, त्याला असलेली पाच सहा फूट उंचीची मधमाशांची पोळी, काळ्या कातळावर खडूने जाड रेषा मारावी, असा पाण्याचा सूरू होणारा प्रवाह, दगडावर आदळून प्रवाहाचे उडणारे तुषार, मुख्य प्रवाह डोहाच्या नितळ पाण्यात गायब होवून सतत तयार होणारी वलये अन पडणार्या पाण्याचा आवाज. काही क्षण निसर्गाचे ते अनोखे रूप निहाळत होतो.

कंदहार धबधब्याचे पहिले दर्शन

कंदहार धबधबा आणि डोह

पाण्यात पाय ठेवताच लक्षात आले की हा जानेवारी महिना आहे, पाय क्षणात गारठून गेले. पाणी जबरदस्त थंड होते. मग आजुबाजूचा परिसर फिरणे चालु झाले. धबधब्याच्या जवळ गेलो. तिथे छोटी गुहा होती. तिथे पाण्याचे तुषार अंगावर येत होते आणि तिथुन डोह पण सुंदर दिसत होता. पट्टीचे पोहोणारे (आमचाच स्वःताबद्दल असणारा गैरसमज) असल्याने डोहाचा तळ कसा गाठता येइल यावर साधकबाधक(?) चर्चा केली ती पण काठाशी उभे राहून. सरतेशेवटी पाण्यात डुंबायचे ठरविले आणि थंड पाण्यात उतरलो. ह्या पाण्याची आठवण हेमकुंड साहिबच्या तळ्यात डुबुकी मारताना झाली होती. आम्ही पाण्यात असताना मार्गदर्शकांनी डोहाबददलच्या भीतीने दूरच रहाने पंसद केले आणि फार आत जावू नका असा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही सुद्धा काठाशीच पोहोत होतो. बराच वेळ पोहोल्यानंतर थंडीची जागा आता भूकेने घेतली होती. सुके धपाटे असा बेत होता. मधमाशांच्या भीतीने मॅगीचा बेत रद्द करावा लागला.

इतर काही

जवळपास ५ ते ६ तास चालल्यानंतर आम्ही पाथरपुंज गावाजवळच्या दुसर्या वाडीत कोयनेकडे जाणार्या जीपची वाट पहाण्यासाठी पोहोचलो.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Apr 2012 - 4:15 pm | प्रचेतस

वर्णन छान. फोटो तर खूपच छान.

प्यारे१'s picture

30 Apr 2012 - 4:44 pm | प्यारे१

खूपच रोमांचक!

मोदक's picture

1 May 2012 - 11:52 pm | मोदक

हेच बोल्तो.. :-)

पियुशा's picture

30 Apr 2012 - 4:16 pm | पियुशा

वॉव्,सुपर्ब ,क्लास, चेपस ,मस्त !!!!!!!!!!
भन्नाट फोटु आल्येत सगळे :)

सुजित पवार's picture

30 Apr 2012 - 4:18 pm | सुजित पवार

जमुन अले अहे. चालु ठेव प्रयत्न असेच

स्मिता.'s picture

30 Apr 2012 - 4:33 pm | स्मिता.

अतिशय सुरेख फोटो आहेत.

शेवटच्या फोटोत वीजेच्या तारा नसत्या (ही लेखकाची किंवा छायाचित्रकाराची चूक नाही... उगाच मला वाटले म्हणून) तर आणाखी सुंदर वाटले असते.

कवितानागेश's picture

30 Apr 2012 - 4:38 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर वर्णन आणि फोटो.
या अनुभवकथनाबद्दल धन्यवाद. :)

उत्तम जंगल भटकंती.
सगळेच फोटो आणि वृत्तांत मस्तच.
सक्काळ सक्काळ काढलेले डोहाचे फोटो फार आवडले, एवढ्या भर दुपारीही सकाळचा गार वारा नाकात शिरल्यासारखे वाटले ;-)

चित्रगुप्त's picture

30 Apr 2012 - 6:48 pm | चित्रगुप्त

गजब.

निशदे's picture

30 Apr 2012 - 6:53 pm | निशदे

एकदम झकास केले आहे वर्णन आणि प्रचिसुद्धा सुंदर....... :)

रेवती's picture

30 Apr 2012 - 7:29 pm | रेवती

वृत्तांत आवडला पण एकदम संपल्यासारखा वाटला.
शेवटचा फोटू भारी.

पैसा's picture

30 Apr 2012 - 9:07 pm | पैसा

वर्णन आणि फोटो पहिल्या भागासारखेच अप्रतिम!

झकास फोटो नि अप्रतिम वर्णन, मिस्टर शंभर (किंवा शून्य शून्य ऐकवणारे)..... :-)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा

मानलं भाऊ तुम्हाला...पहिले जंगल/झाडीचे फोटो तर लै खास आहेत... तुमचा क्यामेरा पण झ्याक हाय. :-)
लाइक..लाइक...सुप्पर लाइक..!

नरेंद्र गोळे's picture

1 May 2012 - 9:54 am | नरेंद्र गोळे

वरून आठव्या प्रचितले दृश्य मला स्वतःलाच जगायला आवडले असते असे आहे!

म्हणून हा "अरमान का ऐलान"!

अशीच रम्य पहाट, समोरी उमलत यावी ।
तळात निर्मळ डोह, जळावर लहर फिरावी ॥
विशाल पत्थर छान, तयावर बैठक व्हावी ।
प्रकाश उधळित मंद, सूर्यकिरणांनी न्हावी ॥

वाचनखुण साठविली आहे, दंडवत घातला आहे , किलोभर ईनो पिलो आहे .....

मुक्त विहारि's picture

1 May 2012 - 11:03 am | मुक्त विहारि

मस्त प्रवासवर्णन....

सुधीर's picture

1 May 2012 - 4:31 pm | सुधीर

सुंदर फोटो अन् वर्णन! डोहात सूर मारावासा वाटतोय. डुंबतानाचा एक फोटो असला तर टाकाच.

सार्‍यांचे प्रतिसाद टाकुन होइ पर्यंत मुद्दामच थांबुन, मी शेवटी प्रतिसाद टाकते आहे.

तुमच्या पहिल्या भागा मध्येच तुम्ही फक्त कंधार धबधबा पाहण्याची परवानगी मिळाली असुनही तुम्ही प्रचिती गडाकडे गेल्याचा उल्लेख आहे. अन त्याच भागात वाघाच्या पाउलखुणांचाही फोटो टाकलाय तुम्ही. हा असा कायदा धाब्यावर बसवुन जीव धोक्यात घालण्याच धाडस कश्यासाठी? तुम्ही तिथल्या स्थित्यंतरीत लोकांच्या भावनांचा जो उल्लेख केलाय तो ही ठिकच, पण सरकारला कुठे ना कुठे प्रगतिच्या वाटेवर असे निर्णय घ्यावेच लागतात. ती उजाड गाव पहाताना जीव तळमळलाच, पण मग वाघाचे ठसे पाहुन आनंदलाही.
आज तुम्ही हा जो धागा टाकलाय , त्यामुळे त्या प्रतिबंधित भागात चार दमड्या फेकल्या की नेणारी माणस मिळतात हे एक सत्य बाहेर पडल. अन त्या सत्याच्या आधारावर उद्या जर तिथे 'पोचर्स ' नाही पोहोचले तरच नवल! अर्थात तुम्ही धागा टाकेपर्यंत लोकांना हे माहित नसेल, अस मी अजिबात नाही म्हणत आहे. पण या धाग्याद्वारे जरा आणखी जास्त प्रसिद्ध झाल अस म्हणेन मी.
विनंती एव्हढीच, आपण असल्या वन्यजीव, अन वन संवर्धानाच्या कामात थोडा संयम बाळगुन सरकारला हातभार लावावा. नाहीतर पर्यटकांनी , मजा मारायला म्हणुन वाटोळ करुन ठेवलेल्या बाकी सार्‍या पर्यटन स्थळात या ही स्थळाची लवकरच भर पडेल.

५० फक्त's picture

3 May 2012 - 7:44 am | ५० फक्त

+१, बाकी काही नाही.

मी-सौरभ's picture

3 May 2012 - 6:56 pm | मी-सौरभ

५० शी सहमत.
लेख, फोटो मस्त असले तरी अशी रिस्क घेणे चांगले नाही :)

जातीवंत भटका's picture

18 May 2012 - 12:03 pm | जातीवंत भटका

झक्कास भ्रमंती, आम्ही रामघळ-भैरव-पाथरपुंज-प्रचित-कंधार असा लांबलचक ट्रेक केला होता अनेक वर्षांपूर्वी.. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या..धन्यवाद

वर्णन आणि फोतो दोन्ही छान.