प्रचीतगड कंदहार धबधबा भाग १

ऐक शुन्य शुन्य's picture
ऐक शुन्य शुन्य in भटकंती
23 Apr 2012 - 11:43 pm

२३ जानेवारी, उदयचा वाढदिवस, ठरविले की उदयचा वाढदिवस प्रचीतगडला साजरा करायचा. पण त्याआधी आम्ही प्रचीतगडला जायचा प्रयत्न केला होता. चांदोली धरणाच्या बाजूने प्रचीतगडला जाण्यासाठी आम्ही २६ डिसेंबरला आम्ही चांदोली गावात जाण्यासाठी पोहोचलो होतो. तेथील वनविभागाने फक्त एकादिवसची परवानगी दिली. एक दिवसात प्रचीतगड कंदहार धबधबा शक्य नव्हते, आणि अर्धा गाव आमच्या मदतील धावला. ट्रक्टर मध्ये गवत भरु, त्यात सगळे (५ जण) झोपतील, अर्धा रस्ता असा पार करु, प्रचीतगड फिरु. एका दिवसात परत येवू. गावकरयनी सुचवलेल्या शक्यतांपैकी ही एक शक्यता. रात्री मित्राच्या घरी झोप काढून सकाळी क्रिकेट खेळायला मी घरी पोहोचलो, सुजीत त्याच्या घरी. पण विकास आणि इतर मित्र कोयनेच्या बाजुने २ दिवसात प्रचीतगड कंदहार धबधबा इथे जावून आले. शेवटी २३ जानेवारी २०१० ही तारीख ठरली.

मी, सुजीत, उदय आणि स्वप्नील मुंबई मधून २२ तारखेला चिपळूण मार्गे कोयनेला निघालो. राजा पुण्यावरुन निघून २३ तारखेला सकाळी कोयनेला पोहोचणार होता. प्रथम कांदेपोहे आणि गुलाबजामुन खाऊन उदयचा वाढदिवस साजरा झाला. तेवढयात जीप (६ की मी चालण्याचे कष्ट १००० रूपये मोजून वाचविले) घेवून चालक हजर झालाच होता मग निघालो पाथरपुंज गावाकडे.

कोयना ते पाथरपुंज (दूरवर शिवसागर जलाशय)

कोयनेच्या प्रचीतगड आणि कंदहार धबधबा हा जंगलाचा भाग वाघासाठी राखीव आहे म्हणून मानव संचाराला प्रतिबंध आहे. एका दिवसाची परवानगी आणि प्रचीतीगडच्या वाटेला न जाण्यासाठी दंड आणी तुरुंगाची भीती वनविभागाकडून पावती आणि अधीभार :) भरुन मिळाली. आम्ही पाथरपुंज गावी पोहोचलो. पाथरपुंज ही एक छोटीशी वाडी आहे. वाघासाठी उठवलेल्या वाडयातून आलेले लोक इथे रहात आहेत आणि पुर्वापारचे उद्योग मुख्यतः शेती करत आहेत. वनविभाग सातत्याने हा गाव पण उठविण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. गावामध्ये एक शाळा असुन ती रहिवाशी शिक्शक चालवतात.

पहिल्या ग्रुपने वाटाडयाची माहिती दिली होती. पण रघु नावाचा वाटाडया त्यावेळी तेथेच चालू असलेल्या युवा शिबिरामध्ये काम करत होता आणि १५ दिवसाच्या कामापुढे त्याला आम्हाला होकर देता येत नव्हता. वनविभगाच्या कायद्यामुळे तो पण घाबरला होता. फिरण्याच्या दोन दिवसात जर वन कर्मचार्याना सापडलो तर दंडाची आणि तुरूंगाची हवा असा हिशोब होता. शेवटी रघूचे वडील आणि त्यांचा आणि एक म्हातारा मित्र यांची नेमणूक आमचे वाटाडया म्हणून झाली. त्या दोघांना नदीतून पलिकडे गेल्यावर रस्ता कोठे आहे माहिती नव्हती. त्यांनी ती रघूकडून जाणुन घेतेली पण तेवढीच. पावसानंतर जंगलात गवत वाढून रस्ते बदलतात. रघु बरयाचदा जावून आल्यामुळे त्याला रस्ते माहिती होते पण त्याच्या वडीलाना जावून बरीच वर्षे झाल्यमुळे आम्हाला अनुभवाची आणखी एक गाठ जमवता आली.तेथील मुलांना चोकोलेट वाटली अन आम्ही प्रचीतीगडाकडे निघालो.

पाथरपुंज गाव

गावापलीकडून ऐक पाण्याचा प्रवाह जातो. असे बरेच प्रवाह मिळतात आणि त्याची वारणा नदी बनते. रात्रीची झोप प्रवाहातील थंड पाण्याने धुवुन काढली. आम्ही प्रवाह पार करून शेतात उतरलो अन जंगलाकडे निघालो. ११ वाजले होते, ४ ते ५ तास चालावे लागणार होते. अखेर जंगलाच्या रस्त्याला लागलो. दोन तासांच्या चालण्यानंतर एका दरी जवळ पोहोचलो. समोर कोकण पसरला होता अन डावीकडे कोकणात उतरायची वाट कथुर्डी कोंडी घाट पण आमचा रस्ता विरुद्ध बाजूला होता, प्रचीतगडाकडे. दरी सोडुन जंगलामध्ये घुसलो. एका पाण्याच्या प्रवाहाजवळ विश्रांती घेतली आणि राजाच्या घरातील धपाठयावर (घीरडे) ताव मारला. संपुर्ण प्रवासात आम्ही पाणी घेतलच नाही. जानेवारी महीन्यातील कमी ऊन, झाडांची गर्द सावली आणि मधूर पाण्याचे झरे. पाणी बाळगण्याची गरज जाणवलीच नाही. म्हातारे मार्गदर्शक आणि माझी थोडीफार ओळख झालीच होती मग त्यानी त्यांच्या तरूण वयातील शिकारीबद्ल सांगीतले. अस्वलाने त्याच्यावर केलेला हल्ला आणि त्याच्या हातावर खादंयावर ओरबडल्याची चिन्हे दाखवली. रस्त्यात मध्येच आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे दाखिवले.

त्यापैकी ऐकाचे गाव उठवून सांगली जिल्ह्यात पुनर्वसन केले होते पण त्याचे मन रमत नव्ह्ते. नवीन जागा, पाणी जवळ असलेल्या जागेच्या बद्ल्यात कोरडवाहू जमीन, आपली जागा गेली म्हणून मुळ गावकर्यांनी दिलेली दुय्यम वागणूक. जंगलात राहीलेल्या वाढलेल्या साठी गावकुसाबाहेरचे जीवन, इथे तर वनविभागाचे कायदे, ज्या जंगलात लहानाचे मोठे झाले, तिथे फिरणे सुदधा गुन्हा झाला आहे तर शिकेकाई, लाकुड, ताडी गोळा करणे हे वडीलोपार्जित उदयोग चोरी, त्यात खरे कायदे हे फक्त अंमलबजावणी करणार्यानाच माहीती. एकूणच काय तर झाडाझडती कांदबरी सारखीच अवस्था होती. मग तो त्याच्या नातेवाईकाबरोबर ईथे परत आला आणि शेती करत होता.
दरी

चांदोली जंगल

वाघाच्या पायाचे ठसे

आता प्रचीतगडाविषयी थोडस... सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्हांच्या सीमेवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याकाळाच्या सुर्व्यांचे श्रिंगारपूर (संभाजीमहाराजांचे सासर) आहे. कोकणातून चढायचे तर सह्याद्रीची संपुर्ण उंची चढावी लागेल पण कोयना आणी चांदोली बाजूने किल्ला अगदी जमीनीच्या उंचीवर आहे म्हणजे ह्या बाजूने फारसा चढावा लागत नाही. वंदता अशी आहे की शिवाजीमहाराजानी प्रथम सुरत लूटुन आणलेला ऎवज ह्या मार्गानेच कोकणात उतरवला होता.(पुरावा नाही). किल्याच्या ईताहासातील युदधाची नोंद फक्त १८१८ ची आहे. पण तोपर्यंत दुर्गमतेमुळे आणि उंचीमुळे हा किल्ला अंजिक्य राहीला.
घनदाट जंगल पहात पहात जाताना परत एका दरीजवळ आलो आणि समोर प्रचीतीगड किल्ला. आता किल्याकडे जायची वाट म्हणजे किल्ला आणि जमीन यामधील दरी निम्मी उतरून जायची आणि बुरुजाला वळसा घालुन किल्ल्यावर जायचे. बुरुजावरील एक बंदूकधारी हा रस्ता कितीही दिवस रोखू शकेल आणि दुसर्याबाजूला श्रिगांरपूराला लागून असलेली दरीवजा भिंत. किल्ला जिंकण्याचा प्रयत्नच झाला नसावा. आता आम्ही एक एक जण दरीमध्ये उतरत होतो. खाली पाहिले कि पाणी वाहून झालेली घळ दिसत होती. दरीचा शेवट दिसत नव्हता. दरीमधील चिंचोळीवाटे वरून एकच जण जात होता. मी पुढे होतो. बुरूजाला वळसा घालून गेलो, पाहीले तर उजव्याबाजूला खाली खोल दरी, कोकणाकडचा भाग, अन डाव्याबाजूला किल्ल्याची भिंत. किल्ल्याचा कोसळलेला भाग जोडण्यासाठी गंजलेली आणि मधूनच वाकलेली शिडी. बहूतेक दुसरा कोणी घाबरलला की मी पण घाबरतो म्हणून मी पहिल्यांदा गेलो. सावकाश जा असा सल्लावजा सूचना म्हातार्या मार्गदर्शकाने दिला. शिडीच्या मध्यभागी पोहोचल्यावर जाणवले की शिडी हालतेय, शांत उभा राहिलो अन खालच्या दरीत पाहिले, शिडी थोडी जोरात हलू लागली मग कळाले की शिडी पायाच्या थरथरण्याने हालत आहे. सावकाश एक एक पाउल टाकत शिडी पार केली आणी दगड पकडून इतरांची मजा पहात बसलो.

प्रचीतगड

दरीमध्ये उतरताना

शिडी

शिडीवरून खाली पाहाताना

सगळे वर चढून आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिराजवळ गेलो. दोन तोफा मंदिराच्या बाजूला होत्या. किल्ल्याच्या एका बाजूने पाण्याच्या टाक्याकडे पोहोचलो, एव्हाना आम्ही तळपत्या सुर्यासमोर होतो. दुपारचे तीन साडे तीन वाजले होते. थंड पाण्याने हात पाय धुतले. एका झाडाखाली जावून प्रत्येकाने ताणून दिली. रात्रभरची जागरण, दिवसभराचे चालणे, शांत सावली आणि थंडगार वारा, झोपेला काय पाहिजे? अर्धा तास झाला नसेल तेवढ्यात मार्गदर्शक आम्हाला उठवू लागले आणि सांगू लागले की बरच चालायचे आहे. निवांत उठून किल्ला फिरु लागलो. किल्ल्याची बाहेरच्या तटबंदीची पडझड झाली होती, आतली तटबंदी ठीक होती. किल्ल्यावर जुन्या घरांच्या खुणा आहेत. किल्ल्याच्या शेवटी जावून फिरून आलो. किल्ला उतरायला सुरूवात केली (शिडीवरून उतरणे आणि दरीचा उभा कड चढणे).

प्रचीतगड किल्ला

चढामूळे अन उन्हामुळे प्रत्येक जण बराच दमला होता. थोडी विश्रांती घेवून पुढे निघालो. मार्गदर्शक फारच घाई करत होते. जगंलामध्ये अंधार लवकर पडतो आणि बरेच चालायचे होते. नदीकिनारी रात्र काढून दूसर्यादिवशी कंदाहार धबधबा पहायचा होता. चालता चालता आम्ही सडयाजवळ पोहोचलो. सडा म्हणजे लाव्हयापासून बनलेली दगडी जमीन जिथे माती नसल्याने झाडे उगवू शकत नाहीत. चांदोलीच्या जंगलात असे बरेच सडे आहेत. दख्खनच्या पठाराची ही सुरूवात आहे अस तर सुचवत नसतील? सडा पार करून जंगलात शिरलो. एकाजागी गाडीच्या चाकाचे ठसे दिसले. वनविभागाच्या गाडया गस्तीसाठी येथेपर्यंत येत असाव्यात.

सडा

जंगलात शिरल्यावर बराच वेळ चालत होतो. थोडया उंचीवरून आम्हाला वारणा नदी दिसत होती. बराच वेळ चालल्यावर आणी दोन तीन टेकडया पार केल्यावर मार्गदर्शक गोंधळलेले दिसले. पावसानंतर गवत वाढून पायवाटा बूजून जातात आणी मग रस्ते शोधावे लागतात. त्यापैकी एक जण आम्हाला एका ठिकाणी थांबवून समोरच्या टेकडावर जावून आला. अन सांगितले की आपण रस्ता चुकलो आहोत आणि त्यांना रस्ता सापडत नाही. दिवस मावळत होता. किल्ल्यावर परत जावे तर उलटे दोन तास चालवे लागेल. जंगलात मध्येच राहू शकत नव्ह्तो, जनावरे आणी वनविभागाची भीती, आग पण पेटवु शकत नव्हतो. थोडक्यात सगळ्यांची तंतरली होती. एका मार्गदर्शकने सांगितले की उजव्या बाजुला नदी आहे. जर रस्ता नाही सापडला तर सरळ घळ उतरून नदीकाठी जाउ किंवा उठवलेल्या एकाद्या वस्तीमध्ये रात्री राहू आणि सकाळी रस्ता शोधू. सगळेच घाबरलेले होते कोणीच दाखवत नव्हते पण उसना आवेश आणून ठीक आहे म्हणालो.

क्रमशः

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

24 Apr 2012 - 12:01 am | बॅटमॅन

आत्ताच वाचले. सविस्तर प्रतिक्रिया देईन सावकाश. तोपर्यंत पहिला प्रतिसाद लिहून जागा धरून ठेवतो.

पैसा's picture

24 Apr 2012 - 12:03 am | पैसा

अगदी गुंगवून टाकणारं लिखाण झालं आहे आणि फोटो पण मस्तच! ते कडे बघूनच घाबरायला होतंय. छाती दडपून जाते. पार करणार्‍या तुम्हा लोकांचं कौतुक.

प्यारे१'s picture

24 Apr 2012 - 2:28 pm | प्यारे१

+१.
>>>ते कडे बघूनच घाबरायला होतंय. छाती दडपून जाते.
हो ना रे मोदक???? ;)

नाय हो काका.. आपल्याला सवय हाय..

१९९४ ते १९९८ हा सुवर्णकाळ म्हणावा अशी वर्षे होती. मित्रांचे टोळके घेवून दिवस दिवस चांदोलीच्या जंगलातून फिरणे, मनसोक्त फणस, आंबे, जांभळे आणि करवंदे खाणे.. खूप जास्ती कंटाळा आला असेल तर डोहात डुंबणे (नदीच्या वाटेला जायचे जमायचे नाही.. धरणातून कधी पाणी सुटेल ते सांगता यायचे नाही..) यामध्ये बरेच रविवार घालवले आहेत..

शाळेसाठी घरातून रोज ४ / ५ किमी चालत जावून आणि एक मोठ्ठी टेकडी चढून जायला लागायचे.. मजा होती ते दिवस म्हणजे.

चांदोली नाव ऐकले की आठवतो तो रस्ता शेवाळणारा प्र चं ड पाऊस.

(चांदोलीला ४ वर्षे राहिलेला, हुतात्मा नानकसिंग विद्यालयाचा विद्यार्थी ) मोदक. :-)

बापरे! लेख तर भारी झालाच आहे पण फोटो पाहून बोबडी वळलीये.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Apr 2012 - 4:12 am | निनाद मुक्काम प...

सहजसुलभ भाषेत मती गुंगवून टाकणारे लेखन आणि चित्तथरारक तुमचा प्रवास
दैनंदिन अळणी आयुष्यात झणझणीत फोडणी टाकल्यागत वाटला.
पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.

पाषाणभेद's picture

24 Apr 2012 - 4:52 am | पाषाणभेद

दया पता करो ये लडके लोग कैसे वहाँ पहूंचे |

५० फक्त's picture

24 Apr 2012 - 7:29 am | ५० फक्त

'कोयनेच्या प्रचीतगड आणि कंदहार धबधबा हा जंगलाचा भाग वाघासाठी राखीव आहे म्हणून मानव संचाराला प्रतिबंध आहे. एका दिवसाची परवानगी आणि प्रचीतीगडच्या वाटेला न जाण्यासाठी दंड आणी तुरुंगाची भीती वनविभागाकडून पावती आणि अधीभार भरुन मिळाली.'

हे मात्र खटकलं, अशा ठिकाणी वन विभाग जर इमानदारीत काम करुन तिथं असलेली गावं उठवुन वाघासारख्या प्राण्याला जपण्यासाठी जिवाचं रान करत असेल तर त्यांच्या नियमाला फाटे फोडुन काही झालं तरी हे करायचंच हा अट्टाहास कशासाठी ? जर परवानगी नसताना तुम्ही प्रचीतीगडावर गेले होता हे वनविभागाला समजलं तर काय होईल याची कल्पना तुम्हाला त्यांनी दिलेली होतीच, तरी सुद्धा हे करणं हे अयोग्य वाटतं.

फ़ोटो, वर्णन - लय लय, भारी भारी!
डोंगरांत भटकताना त्या त्या भागातली सामाजिक परिस्थिती डोळसपणे सहानुभूतीपूर्वक निरीक्षिली तर त्या वणवणीला जास्त अर्थ लाभतो. ऐक-शून्य-शून्य यांनी लिहिलेला हा भाग - "त्यापैकी ऐकाचे गाव उठवून सांगली जिल्ह्यात पुनर्वसन केले होते पण त्याचे मन रमत नव्ह्ते. नवीन जागा, पाणी जवळ असलेल्या जागेच्या बद्ल्यात कोरडवाहू जमीन, आपली जागा गेली म्हणून मुळ गावकर्यांनी दिलेली दुय्यम वागणूक. जंगलात राहीलेल्या वाढलेल्या साठी गावकुसाबाहेरचे जीवन, इथे तर वनविभागाचे कायदे, ज्या जंगलात लहानाचे मोठे झाले, तिथे फिरणे सुदधा गुन्हा झाला आहे तर शिकेकाई, लाकुड, ताडी गोळा करणे हे वडीलोपार्जित उदयोग चोरी, त्यात खरे कायदे हे फक्त अंमलबजावणी करणार्यानाच माहीती. एकूणच काय तर झाडाझडती कांदबरी सारखीच अवस्था होती. मग तो त्याच्या नातेवाईकाबरोबर ईथे परत आला आणि शेती करत होता." - फ़ार महत्वाचा आहे.
एक मित्र मिलिंद थत्ते नाशिक जिल्ह्यातून आदीवासी प्रश्नांवर काम करतो. त्याचा अनुभव अगदी हाच आहे. वनविभाग करतो ते सगळंच चांगलं नाही. अर्थात्‌ या सूत्राचा उद्देश हा बृहद्‌ प्रकल्पांच्या वा तत्संबद्ध पुनर्वसनातल्या त्रुटींवरच्या वा वनविभागाच्या अहरित कृत्यांच्या चर्चेचा नसल्याने इथेच आवरते घेतो. पण याही जाणीवेला स्पर्श केल्याबद्दल ऐक-शून्य-शून्यचे अभिनंदन!

पियुशा's picture

24 Apr 2012 - 9:55 am | पियुशा

वॉव ! मस्त फोटु़ज अन वर्णन :)
पावसाळ्यात तर हा गड जन्नत जन्नत असेल :)

सुजित पवार's picture

24 Apr 2012 - 2:51 pm | सुजित पवार

पावसाल्यात इथे नहि जाउ शकत. खुपच पाउस असतो, वाटा सापडत नाहित

मस्त लिखाण भारी फोटोज्.

बाकी त्या धबधब्याचं नाव 'कंधार' आहे. कंदहार नव्हे.

खुप एकुन आहे या जागेबद्दल, ...तु कस जमविलस रे मित्रा ?

जाणंच झाल नाही अजुन !! :(

लिही लिही लवकर

सुहास झेले's picture

24 Apr 2012 - 12:46 pm | सुहास झेले

होय मी पण... कधी जमलेच नाही. ह्यावर्षी आपण काही करून जमवूया :) :)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2012 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

तुमचा लेख वाचून आमचीच सहल झाली असे वाटते आहे.

अवांतर :- त्या घराच्या भिंतीवरील चित्र आणि चित्रावरती मोर लिहिलेले पाहून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. चित्रकलेच्या वहीत मी जे काही चित्र काढायचो त्याला कंपलसरी नाव द्यावेच लागायचे. म्हणजे मग ते नक्की काय आहे ह्याचा शिक्षकांना अंदाज यायचा.

भारदस्त ट्रेक.
फोटो सगळे आवडले.
पुढचा भाग लवकर टाका.

सुजित पवार's picture

24 Apr 2012 - 2:16 pm | सुजित पवार

अप्रतिमच कि रे...

सुजित पवार's picture

24 Apr 2012 - 2:49 pm | सुजित पवार

भाग २ लवकर येउदे

बंडा मामा's picture

25 Apr 2012 - 7:06 am | बंडा मामा

आजकाल मिपावर तेच ते रटाळ ट्रेकचे धागे का येत आहेत. तीच तीच चित्रे आणि त्याच छापाचे वर्णन पाहून कंटाळा आला आहे.

कौन्तेय's picture

25 Apr 2012 - 10:42 am | कौन्तेय

वर्णन न वाचताच जे बोटांना येईल ते टाइप करून मोकळे झालात मामा. तुम्ही जावा नि लिवा काहीतरी अ-रटाळ. आम्ही त्यालाही प्रतिसाद देऊच की ...

चावटमेला's picture

25 Apr 2012 - 4:38 pm | चावटमेला

ती शिडी पाहून रायरेश्वरची आठवण झाली. तिथेही हुबेहूब अशीच शिडी आहे.

मोदक's picture

26 Apr 2012 - 1:37 am | मोदक

ती शिडी पाहून रायरेश्वरची आठवण झाली

रतनगड
घनगड
कळसूबाई..

(बहुदा एकच काँट्रॅक्टर असावा.. :-))

ऐक शुन्य शुन्य's picture

30 Apr 2012 - 9:32 am | ऐक शुन्य शुन्य

अन भीमाशंकर शिडीघाटातील शिड्या

अप्रतिम, धाडसी प्रवास आहे! पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
बरेच फोटोही छान आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2012 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

खत्रनाक ट्रेक... आणी तेवढेच जबरी फोटू

चिगो's picture

27 Apr 2012 - 2:00 pm | चिगो

लैच भारी.. येऊ द्यात.

(सह्याद्रीच्या डोंगरवाटा, कड्या-कपारी हिंडण्याची इच्छा असलेला) चिगो.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2012 - 1:41 pm | प्रभाकर पेठकर

फक्तं एकच (क्रमांक ७चे) छायाचित्र दिसते आहे. बाकी सर्व काळ्या चौकोनात पांढरे उद्गारचिन्ह दिसते आहे. काय समस्या आहे/असावी?

चिंतामणी's picture

28 Apr 2012 - 1:47 pm | चिंतामणी

हा प्रकार काय आहे? मला एकही फटु दिसत नाही आहे.

नुसता लेख वाचुन समाधान नाही होणार. फटु पाहीजेतच दिसायला.

ऐक शुन्य शुन्य's picture

28 Apr 2012 - 2:00 pm | ऐक शुन्य शुन्य

भाग २ साठी पिकासावर फोटो भरताना पुर्वीचे चुकून काढले गेले. थोड्यावेळातच फोटो दिसू लागतील.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2012 - 6:42 pm | प्रभाकर पेठकर

आता दिसत आहेत सर्व छायाचित्रे. झकास आहेत. लेखनाचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
काही अनावश्यक तपशिल आणि टंकलेखनातील चुका टाळल्या असत्या तर लेखन अजून प्रभावी झाले असते.