मी गोनिदा अन ओ पी नय्यर
मी, गोनिदा अन ओ पी नय्यर !
१९६५ चा सुमार. भारत पाक लढाई चालू. मी तळेगाव दाभाडे येथे सातव्या यत्तेत शिकत असावा. तेथील तरूणांचा एक क्रिकेट क्लव होता. त्यानी संरक्षण निधीला मदत म्हणून एक रांगोळी प्रदर्शन काही प्रवेश फी ठेवून आयोजित केले होते. त्यावेळी मुंबई आकाशवाणी ब केंद्रावरून शनिवारी सकाळी साडेसात वाजता " भावसरगम" हा भावगीतांचा कार्यक्रम सादर होत असे. परिकथेतील, ही वाट दूर जाते, पहिलीच भेट झाली, हात तुझा हातात अशी एकसो एक गाणी त्या कार्यक्रमातील निर्मिती आहेत. त्यांचा सरताज म्हणजे " शुक्रतारा मंदवारा" . या गीताच्या प्रथम प्रसारणाचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी वय ११ असेल. ते गीत मला व माझ्या पेक्षा दीड वर्षाने मोठया असणार्या व माझ्या पेक्षा जास्त तयारी असलेल्या माझ्या थोरल्या भावाला फारच आवडले. चारही शनिवार ते गीत ऐकले व पाठ करून टाकले. त्यातील सुधा मलहोत्रा यांची कडवी भाउ म्हणत असे तर मधले अरूण दाते यांचे कडवे हे माझे काम असे.
असे ते प्रदर्शन पहायला गेलो असताना तिथे लाउड स्पीकर वर गाणी चालू होती. तेथील माईकवाल्याला पटवून आम्ही दोघेही ते गाणे माईक वरून म्हणू लागलो. नेमके त्याच वेळी तळेगावचे रहिवासी असलेले गो नी दांडेकर उर्फ अप्प्पा खालून रस्त्या वरून चाललेले होते, गाणे ऐकून ते माडीवर आले व सरळ आम्ही गात होतो तिथेच आले. " पोरानो , नावं काय तुमची? " वगैरे चौकशी करून त्यानी दुसरे दिवशी आम्हा दोघाना त्यांचे घरी येण्याचे निमंत्रण दिले. दुसरे दिवशी आम्ही दबकतच त्यांचे कडे गेलो. कारण त्यांचेकडे लताबाई , आशाताई सहज म्हणून सुद्धा काही वेळेस चक्क्कर मारीत असत. त्यामुळे खरेतर अप्पा ना आम्ही घाबरूनच रहात होतो. पण गेल्यावर त्यानी आम्हाला त्यांचे बाहेरचे खोलीत वसविले. त्यांची उणीपुरी दोन खोल्यांची जागा. बाहेर बाल्कनी. स्वंयंपाक घराची जमीन सारवलेली. अप्पांची म्हातारी आई बाल्कनीत बसलेली दिसत असे." हा आमचा अप्पा लहानपंणी पळून गेला गाडगेबाबाकडे " अशी हकिगत त्या भेटणार्याना सांगत असत. बाहेरच्या खोलीत गाद्या एकमेकावर टाकलेल्या .एका बाजूला काही पुस्तके भरलेले कपाट व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक वस्तू म्हणजे चावी मारायचा फोनो.
आम्ही गेल्यावर कोणकोणती गाणी येतात असे विचारल्यावरून माझ्या भावाने काही गाण्यांची नावे सांगितली. त्यात " मावळत्या दिनकरा " या भा रा तांबे यांच्या रचनेच्या समावेश होता. अप्पांच्या सुचनेप्रमाणे भावाने ते गीत गायला सुरूवात केली. गाणे लक्षपूर्वक ऐकल्या नंतर जो तो पाठ फिरवी मावळल्या असे हवे " जो तो पाठफिरवि मावळत्या असे नको वगैरे सूचना त्यानी दिल्या. व गाणे कसे गायचे ते मी तुम्हाला
ऐकवितो. असे म्हणून त्यानी एक तबकडी बाहेर काढली. " ही आशाबाईंनी मला दिली की जी ओपी नय्यर यानी त्याना भेट दिली होती अशी ही तब़कडी आहे." अशी माहिती देऊन त्यानी फोनोची चावी फिरविली..
गाणे चालू झाले. " ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये. ........." तीन मिनिटे तो उत्तम उतान गायकीचा डेमो आम्ही दोघेही मन लावून ऐकत होतो.माझ्यावर तर जादू झाल्यासरखेच झाले. मग ते गाणे मेरे सनम " या तील आहे हे कळले. मग आतापर्यत शंकर जयकिशन च्या प्रेमात असलेला मी एकदम ओ पी च्या नादी लागलो. मग रेडीओवर "कशमीरकी कली, फिर वही दिल लाया हू, ... पासून सावनकी घटा"
पर्यत गीतांची पारायणे होउ लागली.
क्रमशः
- मी गोनिदा अन् ओ पी नय्यर - लेखांक २
- मी, गोनीदा अन ओ पी नय्यर
- मी. गोनीदा अन ओ. पी .नय्यर ( लेखांक शेवटचा )
Book traversal links for मी गोनिदा अन ओ पी नय्यर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
व्वा चौ.रा. काका!
नशिबवान राजा.
सुरेख !
सुंदर अनुभव
चौरा, ग्रेट!
ज्जे बात! मस्तच चौरा काका.
वा वा वा
ओ पींच्या सर्व खास बाबी घेऊन
वा!
लेखन चांगले पण
ते लक्षात आले पण ...