दास्तान ए हिंदुस्तान भाग २(पिचोलीया लेक, जग मंदिर पेलेस, जगदीश टेंपल , सहेली कि बाडी )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in भटकंती
5 Apr 2012 - 6:52 pm

http://www.misalpav.com/node/21196 भाग १तलावांचे शहर म्हणून विख्यात असलेले उदयपुर मधील सर्वात प्रसिद्ध तलाव म्हणजे लेक पिचोलीया. मानवनिर्मित हा तलाव सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महाराणा उदय सिंह द्विदीय ह्यांनी बांधला होता. तलावाच्या दुतर्फा टेकड्या, मंदिर, हवेल्या आणि आपला सिटी पेलेस आहे. तलावाची खोली जास्त नसून त्यातील दोन बेटांवर त्यावरील असलेल्या दोन मोठ्या महालांचे मोठ्या हॉटेलात रुपांतर झाले आहे .
१) जगनिवास म्हणजेच लेक पेलेस २) जग मंदिर

लेक पेलेस-
१७व्या शतकात महाराणा जगत सिंह द्वितीय हे आपल्या राण्या, मैत्रिणी अगर अंगवस्त्रे ( ह्याबाबत नक्की माहित नाही.) अश्या लवाजमा घेउन जग मंदिर च्या महालात म्हणजे त्या बेटावर विहार करत असत. त्यांच्या वडलांना हे कळले आणि तेथे जायची वाट बंद झाल्याने कालांतराने त्यांनी ह्याच तलावातील दुसर्या बेटावर आग्र्याच्या तत्कालीन शुभ्र संगमरवरी बांधकाम शैलीवर आधारित एक अवर्णीय महाल बांधला. जगनिवास महाल म्हणून ख्याती पावलेला हा महाल कालांतराने लेक पेलेस म्हणून ओळखला जाऊ लागला. ८० च्या दशकात ऑक्टोपसी ह्या बॉंड पटाचे बहुतांशी चित्रीकरण येथे झाले होते. प्रोतिमा बेदी ह्यांच्या आत्मचरित्रात ह्या सिनेमाच्या निमित्ताने परवीन बाबी पासून दुरावलेला कबीर आणि त्या कसे परत एकदा जवळ आल्या. आणि ह्या महालातील चित्रीकरणाच्या सुखद आठवणी शब्दबध्द केल्या आहेत.

१९५९ साली ह्या महालाचे रिसोर्ट मध्ये रुपांतर करण्यात आले. आणि ७० च्या दशकात ताज ग्रुप ने येथे जगातील खर्या अर्थाने राजेशाही हॉटेल बांधले. ताज मध्ये कॉलेज जीवनात उमेदवारी करतांना त्यांच्या बुक लेट मध्ये ह्या रिसोर्ट चा समग्र सचित्र इतिहास पाहून आयुष्यात एकदा तरी ह्या वास्तूत जायला मिळावे अशी मनशा होती. सहा महिन्यापूर्वी बुकिंग केल्यामुळे तेथील उपहारगृहात दोघांसाठी एक संध्याकाळ आरक्षित करण्यात आली. दोघांचा कवर चार्ज फक्त २७०० रुपये. आणि रक्त वारुणी आणि इतर पेय, बक्षिशी असे सर्व मिळून हा आकडा ५ हजारापर्यंत गेला. त्या वास्तूच्या सानिध्यात चंद्रप्रकाशात सैचल स्नान करत अवीट गोडीचे जेवण आणि त्यास साजेसे आदरातिथ्य ह्या गोष्टी जमा धरल्यास ५००० हजाराचे ते कागद आयुष्यभर गाठीशी राहीन अश्या अनुभावापुढे अगदीच तोकडे वाटतात. महालाचे दर्शन घेण्याचा योग आमच्या नशिबी नव्हता. आयुष्यात कधी बक्कल पैका गाठीशी आला तर ७० खोल्यांच्या ह्या महालात जो अनेक कोर्ट यार्ड, तलावा चे मनोरम दृश्य दाखवण्यार्या गच्च्या व राजेशाही दालनांनी समृध्द आहे तेथे काही दिवस श्रमपरीहारासाठी उतरणे मी पसंद करेन.
लेक पेलेस

दुसर्या बेटावर १५५१ साली बांधायला घेतलेल्या जगजग मंदिर महालाचे काम १६५२ मध्ये पूर्णत्वास गेले.सध्या तेथे सुद्धा लीला ग्रुप चे मोठे रिसोर्ट आहे. पण मुळात ह्या महालाची रचना राज परिवाराच्या उन्हाळ्यातील सुट्या आणि मोठ्या मेजवान्या आयोजित करण्यासाठी बांधल्याने मूळ संकल्पनेला तडा न जाऊ देता लीला रिसोर्ट येथे भव्य जलसे आणि लग्नाचे राजेशाही सोहळे पार पडते. एक महिन्यापूर्वी शकिरा येथे एक खाजगी जलसा करून गेली. तर रविना टंडन ला ती पूर्वाश्रमी राजपूत राजकन्या असल्याचे स्वप्न पडले म्हणून थडानी ह्या सिनेवितरक असलेल्या तिच्या नवर्याच्या खिशाला भुर्दंड बसला नि त्यांच्या लग्नाचे सूप येथे वाजले.
जगजग मंदिर पेलेस

..दुसर्या दिवशी न्याहारी साठी अस्सल राजस्थानी धाब्यावर गेलो. तेथे मिसळी ला महाराष्ट्रात जे स्थान आहे तेच स्थान राजस्थान असलेल्या शेव कचोरी चटणी सोबत खाऊन तृप्त झालो. राजस्थानी भटाचा चहा आणि त्याची चव जरी नवी नसली , तरी शर्करेचा सढळ हस्ते वापर हि नवीन गोष्ट त्या चवीत अंतर्भूत झाली. ह्या बहिणींसाठी महत्प्रयासाने सी सी डी शोधून काढले. पण तेथील अप्रशिक्षित कर्मचार्यांमुळे प्रचंड विलंबा नंतर अत्यंत बेचव कॉफी पियुन त्या बहिणींचा मूड गेला. मात्र तेथून सिटी पेलेस जवळील प्राचीन जगदीश मंदिर व तेथील अर्वाचीन शिल्पकला पाहून त्या तृप्त झाल्या. महाराणा जगत सिंह ह्यांनी सोळाव्या शतकात तीन मजली हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर बांधले. ह्याचे मुळनाव जगन्नाथ पुरी होते पण आता जगदीश जी चे मंदिर असे म्हणतात.

मंदिराच्या सुरवातीला दोन अजस्त्र गजराजाचे मुर्तीखांब आपले लक्ष वेधून घेतात. थोडे पिरेमिड सारखे दिसणारे हे मंदिर आपल्या वास्तृशास्त्रांच्या नियमानुसार बांधले आहेत.पायर्या चढून वर गेल्यावर पहिले लक्ष विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची ब्रास च्या अत्यंत देखण्या मूर्तीकडे गेले. अर्धा मनुष्य व अर्धा गरुड असलेली हि मूर्ती आपला एक आब राखून होती. मंदिराची रचना इंडो आर्यन पद्धतीच्या नुसार केली आहे. येथे संपूर्ण राजस्थान दौर्यात मंदिर पाहत असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि भावली की ह्या मंदिरातील पुजारी विदेशी पर्यटक आले कि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधून त्यांना रसाळ वाणीत मंदिराविषयी माहिती देतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. अर्थात त्यांना भरपूर बिदागी देखील मिळते. विदेशी प्रवासी आपल्या सारखे भक्तीभाव ठेवून मंदिर पाहत नाही. त्यांना उत्सुकता मंदिराची बांधणी त्यामागील इतिहास व त्याजोगे आपल्या संस्कृतीची सखोल माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा असते. म्हणुनच कि काय मंदिराच्या भव्य मंडपात माझे आईवडील व मी आरती चालू असतांना तल्लीन झालो होतो. तर ह्या बहिणी मात्र मंदिराच्या गाभ्याची रचना न्याहाळत होत्या. त्यांच्या मनातील शंकांचे तेथील पुजार्याने अत्यंत सुरेख निरसन केले.त्याने सागितले कि ह्या मंदिराकडे तुम्ही निरखून पहिले तर असे वाटेल कि कोणी पद्मासन घालून ध्यानाला बसले आहे.

त्यांच्या म्हण्यानुसार कोणत्याही इंडो आर्यन धाटणीच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती व त्यांची मुल्ये दिसून येतात. आणि त्यांच्या नक्षी कामात एक सुसूत्रता आढळून येते. उदा वरील चित्रात पहा. सगळ्यात तळाशी राक्षस ,डिमोन आढळून येतात कारण त्यांचे वास्तव्य पाताळात असते. दुसर्या लेवल मध्ये प्राणी त्यातही अश्व आणि हत्ती आढळून येतात. कारण प्राण्यांशी आमच्या संस्कृतीची नाळ जोडल्या गेली आहे. तिसर्या लेवल मध्ये प्राणी आणि मनुष्य एकत्र दाखवले आहेत. तर चौथ्या लेवल वर गंधर्व ,अप्सरा ,यक्ष ,किन्नर ह्यांना स्थान दिले असून देवांचे मनोरंजन हे त्यांचे कार्य असते. सरत शेवटी मंदिराच्या कळसावर देवाची प्रतिमा असते.

ह्या मंदिराच्या कळसाच्या येथे ब्रम्हा ,विष्णू , महेश ह्यां त्रीमुर्तींची शिल्पे आहेत.

भारावलेल्या अवस्थेत आम्ही जवळील एका स्थानिक उपहारगृहात जाऊन जेवण केले. येथील छोले भटुरे राजस्थानी मसाल्यात एका वेगळ्याच चवीचे बनले होते. पण ह्या बहिणीं भारतीय जेवणाचा हेंग ओवर वर उतारा म्हणून युस पिझा ह्या उपहारगृहात गेल्या व संतुष्ट जाहल्या. बेंगळूर येथे सुरु झालेल्या व भारतातील नंबर १ पिझ्झा अशी जाहिरात करणारी हि साखळी दक्षिण भारतासोबत आता उर्वरित भारतात सुद्धा प्रवेश करत आहे. डॉमिनोज ला येत्या काळात कडवी टक्कर मिळणार अशी खात्री पिझ्झाचा एक तुकडा तोंडात टाकल्या सरशी झाली.

आता आम्ही सहेली कि बाडी कडे कूच केले .
उदयपुर मधील प्रसिद्ध फतेहपुर लेक जवळ हि बाडी आहे. राणा ह्यांचा अर्थ राजा , नृप ,भूपती हा आहे. म्हणून जसे आपण महाराजा म्हणतो तसे हे राजपूत महाराणा म्हणतात.

तर अश्याच एका महाराणाच्या लग्नात राजकन्ये सोबत ४८ दास्या हुंडा म्हणून आल्या. त्या काळी दासी हि राणीची अर्धवेळ मैत्रीण समजली जायची. तर राणी आणि तिच्या दास्या ह्या त्या काळात त्यांच्यावर असलेल्या सामाजिक बंधनामुळे व राजेशाही संकेतानुसार सार्वजनिक उद्यानात फिरू शक्त नव्हत्या. म्हणून राजाने त्यांच्या मनोरंजन , आणि फिरण्यासाठी मोठ्या हौसेने हि सहेली कि बाडी बनवली.



हि बाडी म्हणजे छोटेखानी उद्यान असून येथे एकेकाळी २००० कारंजी होती. त्या काळात म्हणजे १६ व्या शतकात पंप नसल्याने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्यांची रचना केली होती. तेथे असलेले संगमरवरी हत्तीची मूर्ती हि एकाच दगडातून कोरल्या गेली होती. म्हणजे एका अखंड शिळेतून मूर्ती साकारतांना जमिनीखालून पाण्याच्या पुरवठा होऊन ते पाणी मूर्तीच्या सोंडेतून कसे येते हे आजतागायत एक कोडे आहे. उद्यानात सर्वत्र पाण्याचे फवारे उडत असल्याने पाऊस पडतांना होणारा नादध्वनी आमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत करत होत्या.
एकेकाळी आपण किती प्रगत होतो. ह्याची जाणीव येथे मला झाली. त्या बहिणी तर काय बरे लॉजिक असेल ह्या मागे ह्यावर मंथन करत होत्या. नंतर मोर्चा फतेहसागर लेक कडे निघाला. प्रत्यक्ष लेक एवढा काही प्रेक्षणीय आम्हाला वाटले नाही. आणि उन्हामुळे अंगाची लाही लाही झाल्यामुळे आम्ही गाडीतूनच त्याचे दर्शन घेतले. मुळात गेल्या दोन दिवसात प्रेक्षणीय ह्या शब्दाचा अर्थ व तो वापरण्यासाठी आमचे निकष कमालीचे बदलले होते. प्रत्यक्षात हा लेक उदयपुर मधील सर्वात दर्शनिय असल्याचे आमच्या वाहन चालकाने सांगितले.
आम्ही आता अल्पोपहार करावा ह्या हेतूने मूळ शहरच्या बाजारात आलो. नि एका मिठाई च्या दुकानात शिरलो. येथे शेकड्याने मिठाई ची दुकाने होती. आम्ही चहा आणि मग गरम गरम गुलाब जाम च्या प्रत्येकी दोन वाट्या फस्त केल्या. ह्या तोडीचा गुलाबजाम मुंबईत फक्त सायनच्या गुरुकृपात मिळतो. आजही तोंडात टाकताच विरघळणारा आणि आमची रसना असीम आनंदाने तृप्त करणर्या त्या गुलाबजामच्या आठवणीने मन व्याकूळ होतो. बहुदा कातरवेळी तो खाल्ला म्हणून ओघाने मन व्याकूळ होणे आले.

आता संध्याकाळी प्रसिद्ध सन सेट पाहून दुसर्या दिवशी पुढचा थांबा म्हणजे रणक पूर येथील जैनांचे मंदिर पाहणे हा होता. हे मंदिर पाहून आमचाकडे वर्णन करायला शब्द नव्हते. ह्याहून सुंदर मंदिर आम्ही आमच्या आयुष्यात पहिले नव्हते. कोणतीही कंजुषी न करता हे सौंदर्य आम्ही चित्र बध्द केले.

दूर डोंगरावरून टिपलेला पिचोदिया तलाव आणि त्यातील दोन रिसोर्ट

प्रतिक्रिया

प्रास's picture

5 Apr 2012 - 8:17 pm | प्रास

निनादराव, एकदम फर्मास वर्णन केलं आहे आणि छायाचित्रेही सुंदर उतरलेली आहेत.

त्यातच पुन्हा गुलाबजाम वगैरे खादाडींची छायाचित्रे न टाकल्याने जगनिवास आणि जगमंदिर पाहून डोळ्यांना आलेला थंडावा पोटात जळजळ न उठल्याने बरकरार राहिला. बरोबर अर्थात इनो घेण्याची गरचच पडली नाही त्याबद्दल मनापासून आभारी आहे.

तेवढे राणकपूरच्या देरासरांचे फोटो टाकता आले तर जास्त आनंद होईल.

पुलेप्र

भारी हो निनादराव!
तलावाच्या मध्ये असलेल्या महालाचा पहिला फोटो भारी आलाय.
खाद्यपेयाचे वर्णन वाचून माझ्या राजस्थानी मैत्रिणीची आठवण झाली.
तिकडच्या अशा पदार्थांमुळेच तिला अमेरिकेत इतर काहीही आवडत नाही.
पिझ्झ्यामुळे तुमच्या कुटुंबाची सोय झाली म्हणून बरे नाहीतर आपले पदार्थ चांगले वाटले तरी रोजरोज मानवणारे नव्हेत त्यांना.

झकास रे निनाद.
फोटो आणि वर्णन दोन्हीही अप्रतिम.

५० फक्त's picture

5 Apr 2012 - 10:08 pm | ५० फक्त

हा भाग पण सुंदर झालेला आहे,

मागच्याच भागातली विनंती पुन्हा एकदा, प्रवासव्यवस्थेची माहिती देता आली तर पहा,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Apr 2012 - 12:47 am | निनाद मुक्काम प...

चार्षद भाऊ एक डाव माफ करा की मी पहिल्या भागात दिलेल्या माझ्या प्रतिसादात हे नमूद करायचे विसरलो.

आम्हाला ५ जणांना राजस्थान टूर करायची होती. वाजवी दरात जास्तीजास्त पर्यटन करायचा मनसुबा होता. म्हणून आम्ही सहा महिन्या अगोदर ह्या प्रवासाची आखणी केली होती.

विमान प्रवास स्वस्त हवा असेल तर आगाऊ बुकिंग करणे गरजेचे होते. आमचे भारतातील वास्तव्य दोन आठवड्यांचे होते. तेव्हा एखाद्या प्रख्यात प्रवासी कंपन्याकडून आधीच आयोजित केलेली टूर करणे आम्हाला जमणे शक्य नव्हते. तेव्हा आमच्या साठी सर्वोत्तम पर्याय स्वतः साठी खाजगी टूर स्वतः आयोजित करणे हा होता.

त्या नंतर आंजा वर विपुल संशोधन करून अनेक टूर कंपन्यांतून काही कंपन्या शोर्ट लिस्ट केल्या. ज्यांच्या कडे ४ दिवस ते १ आठवडा ते दोन आठवडे अश्या कालखंडात तुम्हाला तुमच्या सोयीने टूर आखून देतात.

ह्या टूर चा फोर्मेट हा त्यांच्या साईट वर आधीच दिला असतो. म्हणजे उदा आमची टूर १० दिवसांची होती. ह्यात कोणत्या शहरात कोणती स्थळे पाहणार व कोणत्या हॉटेलात उतरणार ह्याची पूर्व कल्पना असते.

आमची टूर मुंबई ते दिल्ली हा विमान प्रवास त्यांच्या नंतर इनोवा गाडीतून त्यांचा ड्रायवर आम्हाला हिंडवून शेवटचा टप्पा उदयपुर येथे सोडून तेथून विमानाने मुंबई गाठायचा होता.

आम्हाला मुंबईत ते दिल्ली आणि मग उदयपूर ते मुंबई असा विमानप्रवास होता. पण आजांवर शोधल्यावर उदयपुर ते मुंबई प्रवास महाग पडत होता, म्हणून आम्ही टूर कंपनीला विनंती करून आमची टूर उदयपुर येथे सुरु करून शेवटी दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. म्हणजे उलट प्रवास केला.

एकूण टूर चे बजेट हे तुम्ही कोणत्या सिझन ला जाणार ह्यावर अवलंबून असते. आम्ही हिवाळा हा ऑफ सिझन निवडल्याने आणि ६ महिने आधी बुकिंग केल्याने आम्हाला हॉटेलचे रेट व पर्यायाने टूर अत्यंत स्वस्तात पडली.

ह्या टूर चे वैशिष्ट्य म्हणजे गाडी आणि वाहनचालक २४ तास आमच्या सोबत होता. त्यांची खायची आणि प्यायची सोय केल्याने तो आम्हाला सहलीचा कार्यक्रम फिरवून आणायचा पण शहरात जर बाजारहाट किंवा उदरभरण करायचे असेल तरी फिरवून आणायचा. दिवस भर एखाद्या शहरात काय काय पहायचे हे आधीच ठरले होते. त्यामुळे ते कधी आणि कितीवेळ पहायचे हे आम्ही ठरवू शकत होतो.

नियोजित सहलींमध्ये टूर लीडर च्या मर्जीवर सगळे अवलंबून असते.

हॉटेलात सकाळची न्याहारी मोफत होती. मात्र नंतरचे जेवण स्वखर्चाने होते. ह्यामुळे आम्हाला स्थानिक शहरातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ त्या ठिकाणच्या प्रसिद्ध ठिकाणी खाण्याचे भाग्य लाभले.

मात्र दोन ´शहरामधील अंतर किमान ५ तास ते १० तास होते. तेव्हा दिवसाआड एवढा प्रवास घडायचा. पण राजस्थान चे महामार्ग सुस्थित असल्याने तो बर्यापिकी घडला. येथे १० तासाच्या प्रवासात खुपदा मुश्किलीने काही चांगली हॉटेल दिसायची. आम्हाला मग कळले कि आमच्या वाहन चालकाचा एखाद्या विशिष्ट हॉटेलात खाचा असल्याने तो आम्हाला ते स्थान सुचवायचा. मात्र एकदा सुमार चवीचे महागडे अन्न खाऊन आम्ही धडा शिकलो. व आम्हाला हवे तेच हॉटेल आम्ही निवडू लागलो.

पण प्रवासात कोरडा खाऊ किंवा टिकणाऱ्या पुरण पोळ्या किंवा चिवडा असे बरोबर जरूर न्यावे. असा सल्ला देऊ इच्छितो.
कोणतीही प्रसिद्ध टूर कंपनी अश्या प्रकारच्या खाजगी टूर आयोजित करते. तेव्हा आपल्याला हवी ती आपण निवडायची त्यात हवे ते बदल करून घ्यायचे.

सरत शेवटी आम्ही ठाण्यातील घाणेकर ह्यांच्या टूर कंपनीची जी टूर निवडली ती हि

http://www.crossworldholidays.com/web/indian_package_tours_royal_rajasth...
टूरटूर करणारे आम्ही ५ जण सिटी पेलेस मध्ये

हवेलीच्या गच्चीवर परकीय पाशवी शक्ती म्हणजेच प प श
आम्ही हुकामावरून चित्र बध्द केल्या.

पैसा's picture

5 Apr 2012 - 11:48 pm | पैसा

सगळे फोटो आणि वर्णन फार छान आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2012 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा

माहिती आणी फोटो दोन्ही जबराट :-)

इरसाल's picture

6 Apr 2012 - 10:13 am | इरसाल

अतिशय उत्तम माहीती.आवडले.

तुझ्या लेखनात आमुलाग्र बदल घडल्याचे स्पष्ट जाणवतेय.

प्यारे१'s picture

6 Apr 2012 - 10:54 am | प्यारे१

मस्त वाटतंय तुझ्या'बरोबर' फिरायला!

स्मिता.'s picture

6 Apr 2012 - 4:56 pm | स्मिता.

हा ही भाग छान झालाय. जलमहालांचे आतल्या भागातले फोटो नसल्याने काहिसं खट्टू झालं ;)
वर्णनासोबतच थोडक्यात इतिहासही सांगितल्यामुळे वाचायला मजा येतेय. थोडे आणखी फोटोसुद्धा चालतील. पुलेशु.

यकु's picture

6 Apr 2012 - 5:40 pm | यकु

फर्मास्स!!!

मुक्त विहारि's picture

8 Apr 2012 - 3:09 pm | मुक्त विहारि

पुढचा भाग जरा लवकर येवु द्या....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2012 - 8:15 pm | निनाद मुक्काम प...

जग मंदिर आयलेंड पेलेस आता लीला ग्रुप च्या ताब्यात आहे. ह्याबाबत माहिती गाईड ने अजिबात दिली नाही. लीला व आमच्या केम्पेंसी ह्या दोन अनुक्रमे भारतीय व जर्मन हॉटेलसमूहाचे चे सौदाह्पूर्ण संबंध असल्याने हा महाल ओझरता पाहण्यास मिळाला. मात्र ह्याबत अत्यंत रोचक माहिती हि संपूर्ण सहल झाल्यावर विकी वर शोधली असता सापडली.

शहाजहान हा बादशहा होण्यापूर्वी राजकुमार खुर्रम म्हणून ओळखल्या जायचा. त्याने युद्धात राणा करण सिंह ह्यांच्या वडिलांचा पराभव केला होता. ह्यामुळे करण सिंह मुघल दरबारी रुजू झाले. तेव्हा खुर्रम च्या आदराप्रीत्यार्थ त्यांनी जग मंदिर पेलेस बांधला. मुघल परंपरेनुसार बादशहा जहांगीर विरुध्ध खुर्रम ह्याने बगावत केली. आणि करण सिंह ह्याने राजकुमार खुर्रम ह्याची माता रजपूत असल्याने त्याची बाजू घेतली व राजकुमार आपली पत्नी मुमताज आणि दोन लहान अपत्ये दारा., औरंगजेब ह्यांच्यासह ह्या महालात काहीकाळ राहिले पुढे खुर्रम बादशहा झाल्यावर म्हणजे शहेजाहान झाल्यावर त्याने उपकाराची परतफेड म्हणून मेवाड राज्याची पुनर्रचना करत उदयपुर चे गतवैभव परत मिळवले.

सदर माहिती वाचून डोक्यात एकच विचार आला

थोडक्यात राणाप्रतम ने जे युध्धात गमावले ते अश्य्यारीतीने कमावले.

दारा आणि औरंगजेब दोन भिन्न प्रवृत्तीचे भाऊ लहानपणी ह्या महालात एकत्र राहिले. पुढे औरंगजेब ने दारा मारून त्यांच्या मुलीला आपली सून करून घेतले. आणि संगीत आणि कलेचा तिटकारा असलेल्या औरंग जेब जेव्हा सत्तेवर आला तेव्हा जीझाया कर ह्या उदयपुर वर लादून त्याने लहानपणी झालेल्या उपकारांची परतफेड केली.

मात्र आंजा वर ठळक रीत्या म्हटले आहे की मराठ्यांनी मेवाड राज्यात जबर खंडणी सत्र आरंभले. आणि इंग्रजांनी येऊन त्यांची सुटका केली. व इंग्रज कालखंडात मेवाड राज्याची प्रगती झाली.

माझ्या मनात नेहमीच हा प्रश्न येतो. कि मुघल व इंग्रजांना राजपुताण्यात आपले पाय रोवता आले. मराठ्यांची प्रतिमा मात्र लुटारू म्हणूनच येथे का राहिली.?

पानिपत च्या वेळी उभा उत्तर हिंदुस्थान मराठ्यांची कशी जिरते म्हणून तटस्थ गंमत का पहात राहिला.? कूटनीतीत आपण कोठे कमी पडलो.? शत्रूचा प्रदेश जिंकल्यावर त्यांची मने का बरे जिंकू शकलो नाही.

मात्र सर्व भारतात शूर वीर म्हणून ख्याती मिळवलेल्या राजपुतांना मराठ्यांकडून पेशवाई च्या काळात धूळ चारल्या गेली. हा इतिहास आपल्या महाराष्ट्रात का सांगितला जात नाही. राऊ म्हटले कि मस्तानी आठवते आणि आज आज पुण्यात मस्तानी मिळते. मात्र राऊ चा पुतळा किंवा स्मारक दिसत नाही. निदान ह्या राज्यात मराठ्यांच्या नावाने बोट मोडली तरी त्या निमित्ताने पेशव्यांनी दाखवलेले शौर्य व कर्तुत्व तरी कोणी नाकारू शकत नाहीत.