आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे.
साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर
कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या.चिरलेली फरसबी घालून परता.झाकण ठेवून शिजवा.शिजल्यावर चवीनुसार मीठ व साखर घाला.कोथिंबिरीने सजवा.
ओल्या खोबर्याऐवजी सुके खोबरे/डेसिकेटेड कोकोनट घालूनही ही भाजी करता येईल पण ओल्या खोबर्याची चव अर्थातच जास्त चांगली लागते.
प्रतिक्रिया
10 Jun 2008 - 11:32 pm | चकली
मी पण अशीच करते. मी एका कानडी मित्राकडून शिकले. पण तो करतो तशी चव नाही जमत मला. मी या भाजीचे असे पाहीलय की आपण फरसबी कशी चिरतो त्यावर चव अवलंबून आहे. चिरली बरोबर कि जमते.
चकली
http://chakali.blogspot.com
10 Jun 2008 - 11:38 pm | प्रियाली
ही तर आमची भाजी खास. ;) पण कांद्याशिवाय करतो आणि फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही.
11 Jun 2008 - 2:06 pm | विसुनाना
आम्हीही अशीच खातो. ;)
11 Jun 2008 - 12:16 am | स्वाती दिनेश
फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही.
करेक्ट..फरसबी बारीक,चौकोनी चिरली तरच चव येते.
स्वाती
11 Jun 2008 - 9:24 am | यशोधरा
ओलं खोबरं घालून मस्तच लागते ही भाजी... :)
11 Jun 2008 - 9:52 am | अमोल केळकर
फरसबी हे नाव पहिल्यांदाच ऐकत आहे.
याला काही दुसरे नाव पण आहे का ?
11 Jun 2008 - 11:37 am | मनिष
फरसबी = फ्रेंच बीन्स!
11 Jun 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश
फरसवी =फ्रेंच बीन्स,ग्रीन बीन्स, श्रावणघेवडा
11 Jun 2008 - 11:55 am | अमोल केळकर
मनिष, स्वाती ताई धन्यवाद
श्रावणघेवडा =फरसवी
हे माहीत नव्हते
11 Jun 2008 - 2:03 pm | विसोबा खेचर
फरस्बीची भाजी, माझी एकदम आवडती! :)
स्वाती, पाकृ मस्त!
तात्या.
11 Jun 2008 - 6:03 pm | स्वाती राजेश
त्यात छोटा आमसोल चा तुकडा टाकनू पाहा..
मी कधी कधी टोमॅटो सुद्धा टाकते..
वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते....
11 Jun 2008 - 6:52 pm | स्वाती दिनेश
वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते....
हो अगदी.. आमसुल,टोमॅटो ह्या प्रकारच्या भाजीत मी नाही घालत.पण फरसबी बारीक चिरून फोडणीला टाकायची,त्यात बारीक चिरलेलं आलं,खोबरं,कोथिंबिर,मीठ,साखर.. ती पण मस्त लागते.
स्वाती
11 Jun 2008 - 6:06 pm | राजे (not verified)
ही फणसाची भाजी आहे का ???
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)
11 Jun 2008 - 6:54 pm | स्वाती दिनेश
नाही हो राजे,अगदी साधी फरसबी/श्रावण घेवडा/फ्रेंच बिन्स ची भाजी आहे.
11 Jun 2008 - 8:22 pm | वरदा
ओवा पण घालून पहा..तिखट अशी ओव्याची चव झक्कास लागते ह्या भाजीत...
श्रावड घेवडा म्हणजे वालपापडी असते ना? फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स.....
11 Jun 2008 - 9:32 pm | चतुरंग
हा श्रावणघेवडा (वालपापडी)
आणि हे फ्रेंच बीन्स (फरसबी)

चतुरंग
11 Jun 2008 - 10:02 pm | वरदा
पण पुणेरी भाषा काही आम्हाला माहित नाही बॉ!
11 Jun 2008 - 9:38 pm | स्वाती दिनेश
वरच्या चित्रातील वालपापडी आणि खालील चित्रातील फरसबी,तिलाच पुण्याकडे श्रावण घेवडा म्हणतात. (असे वाटते)
कुठेतरी वाचले होते फरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश आहे.(नक्की आठवत नाही कुठे वाचले ते,चूभूदेघे)
12 Jun 2008 - 2:12 am | भाग्यश्री
मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते.. माझी आई पण बहुधा असंच म्हणते, कदाचित पुण्यात अशीच नावं असावीत!! :?
http://bhagyashreee.blogspot.com/
13 Jun 2008 - 10:50 pm | ईश्वरी
>>मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते..
पुण्यात तरी फोटोतील २ र्या भाजीला घेवडा / श्रावण घेवडा म्हणतात. आणि फोटोतील १ ल्या भाजीला वालपापडी म्हणतात. वालपापडी म्हणजे श्रावणघेवडा हे आधी माहीत नव्हते...प्रथमच ऐकले (वाचले) ईथे.
ईश्वरी
13 Jun 2008 - 11:55 pm | चतुरंग
:O इतके उलट्-सुलट ऐकून मीच आता गोंधळून गेलोय #:S
(स्वगत - रंगा, तुला पुन्हा एकदा भाज्या नीट ओळखायला शिकून घ्यायला हव्यात! ;))
चतुरंग