गडदेचा बहिरी

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
3 Jan 2012 - 12:11 am

दूर सह्याद्रीच्या कडेकपारीत मुग्ध होऊन बसलेल्या ढाकच्या बहिरीला प्रकाशात आणण्याचे श्रेय जाते ते गोनिदांना.आतापर्यंत केवळ तिथल्या ठाकरांमध्येच परिचीत असणार्‍या ढाकच्या बहिरीची सर्वसामान्यांना ओळख झाली ती गोनिदांच्या 'गडदेचा बहिरी' या कादंबरीवाटे.

सुहासच्या इर्शाळच्या जबरदस्त चढाईमुळे पुर्वी आम्ही केलेल्या ढाकच्या बहिरीच्या सफरीची आठवण ताजी झाली .

पिंपरीहून आम्ही ८ जण रात्री ९.३० च्या लोकलट्रेनमध्ये बसून तासाभरातच लोणावळ्याला उतरलो. तुंगार्ली, पांगळोली मार्गे राजमाचीच्या वाटेवर लागलो. पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणारा फाटा डावीकडे ठेऊन ४ तासांची १६ किमीची प्रदीर्घ वाटचाल संपवून रात्री कधीतरी वळवंड गावात पोहोचलो. मंदिरात पथार्‍या टाकून दिल्या व शिणलेल्या अंगाला जरा आराम दिला, परत पहाटे लवकर उठून पुढच्या १२/१५ किमीची ढाककडे जाणारी वाट पकडली. सुरुवातीची एक दमछाक करणारी खडी चढण चढून आपण पुन्हा सह्यधारेवर येतो. पाठीमागे राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले दिसत राहतात, शेजारी मांजरसुंबा आभाळात घुसलेला दिसतो. अरूंद असा तो ट्रॅव्हर्स पार करता करताच दूरूनच ढाकचा महाकाय पहाड अचानक नजरेसमोर उभा राहतो. त्याचे भव्य दर्शन अगदी भयचकित करणारे असते.

ट्रॅव्हर्स पार करताच एक झळझळीत उतार लागला, जवळपास घसरगुंडी करूनच आम्ही खालच्या पठारावर आलो. इथे कोंडेश्वरवरून ढाकला येणारा दुसरा जवळचा मार्ग आहे. इथून आता सह्याद्रीच्या पदरातल्या दाट झाडीत आम्ही शिरलो. इथे जाळी वेलींचे अ़क्षरश: साम्राज्य पसरले आहे. पायातळी वाळलेला पालापाचोळा पसरलेला होता. मधूनच एखादा हुप्प्या दात विचकून जात होता, स्वर्गीय नर्तक मधूनच दर्शन देत होता, तांबटाची किटीर किर्र अशी साद ऐकू येत होती.

१. दूरून होणारे ढाकच्या पहाडाचे अद्भूत दर्शन

२. ढाक व कळकराय सुळका

३. ढाक व कळकराय सुळकायांमधील खिंड

आता परत ढाकच्या चढणीला लागलो. तीव्र अशी चढण चढून ढाकच्या भेदक असा कळकराय सुळका आणि ढाकच्या पहाडाला जोडून असलेल्या खिंडीपाशी आलो. पहाडाच्या जवळजवळ २/३ उंचीवर ही खिंड आहे. माथ्यावर काही पाण्याची टाकी, काही फुटकळ अवशेष आहेत. बाकी किल्ल्यावर पाहण्यासारखे काहिही नाही. ढाकला जाणार्‍यांचे लक्ष्य असते ते तिथल्या कड्यातल्या अनवट गुहेत-गडदेत जाउन बसलेल्या बहिरीकडे.

आता आम्ही खिंडीच्या मुखात होतो. जेमतेम एक माणूस कसाबसा जाईल इतकीच अरूंद ही खिंड, अत्यंत घळघळीत उतार, घसार्‍याची वाट यामुळे उतरणे अत्यंत जिकीरीचे होत होते. खिंड संपताना शेवटी एक छोटासा रॉकपॅच आहे. पुढे खाली ३५०० फूट गेलेली पाताळवेरी खोल दरीतून होणारे कोकण दर्शन व शेजारी उंचच उंच ढाकचा कातळ असे अनोखे दृश्य दिसते.

४. निरूंद खिंड

५. खिंड संपतानाचा छोटासा पण अवघड भासणारा रॉकपॅच

खिंड उतरल्यावर आता परत इथे ट्रॅव्हर्स लागतो इथेही जेमतेम फूटभर वाट कड्याला लगटूनच जाते. शेजारी खोल दरी, साधारण दीडेकशे मीटर्स गेल्यावर कड्यात एके ठिकाणी वर जाणार्‍या खोदीव पावठ्या दिसतात. जणू स्वर्गारोहण मार्गच. आमच्या पूर्वीच इथे पुण्याहून गिरीदर्शनचा ट्रेकिंग ग्रूप ३०/४० जणांना घेऊन आले होते व मार्गावर त्यांनी सुरक्षिततेसाठी दोर लावले होते. निसर्गाचे रौद्र दर्शन पाहून भयचकित झालेल्या आम्हास आयताच आधार मिळाला. दोराचे आधार घेऊन पावठ्या चढून गेलो आता जेमतेम एक पाउल मावेल इतकीच निरुंद वाट परत उजवीकडे वळून हळूहळू वर चढत जाते. कड्याला बिलगून, दोरांचा आधार घेउन हा चाळीस एक फूटांचा टप्पा कसाबसा पार केला.

आता ऐन कड्यातली गुहा खुणावयाला लगलेली दिसते. खोबण्या दिसेनाश्या होतात, इथे एक झाडाचे खोडच कड्याला लटकावून ठेवले आहे व त्याच्या फांद्यांचा उपयोग पायर्‍यांसारखा केलेला आहे. डगमगणारे ते खोड चढून जाताच आम्ही अजून एक छोटासा कातळटप्पा ओलांडून या बहिरीच्या गडदेत प्रवेश करते झालो. इथे शेजारीशेजारी दोन गुहा असून एका गुहेत ठाकरांचा अनवट देव बहिरी वसलेला आहे. शेजारीच पाण्याची २ टाकी खोदलेली आहेत. दुसरी गुहा मोठी असून ४०/५० माणसे बसू शकतील इतकी प्रशस्त आहे. खोदीव अशी ही गुहा कदाचित सातवाहनकालीन असावी मोक्याच्या घाटवाटेवर लक्ष्य ठेवता यावे म्हणूनही खोदली गेली असावी. इतक्या अवघड जागी गुहा खोदणार्‍या त्या अज्ञात शिल्पकारांचे खरोखर कौतुक आहे.

ढाकच्या बहिरीला इथली ठाकरं, आदिवासी लोक बरेचदा कोंबडं, बकरं बळी देतात. इतक्या वर खांद्यांवर प्राणी वाहून आणणार्‍या त्यांच्या हिंमत जबरी. ती तर या रानचीच लेकरं. बहिरीच्या गडदेतल्या पाण्याच्या एका टाक्यात ताटे, वाटी, भांडी असा सर्व संरंजाम आहे. बळी देऊन तिथेच शिजवायचे आणि टाक्यातली भांडी वापरून परत विसळून टाक्यातच ठेऊन द्यायची ही तिथली पद्धत. जीवापेक्षा भांडी जड नसल्याने आणि बहिरीच्या कोपापायी ती कधी चोरीसही जात नाहीत. अर्थात या प्रकारांमुळे गुहेत तशी अस्वच्छताच आहे. पाणी पिण्यासाठी एक स्वछ टाके बाजूचस आहे.

६. कड्याला लगटून जाणारी बारीक आडवी वाट

७. पाठीमागे दिसणारा कळकराय

८. पावठ्यांवर चढाई सुरु

९. एका अवघड टप्प्यावर

१०. गुहा आता नजरेच्या टप्प्यात

११. शिडी म्हणून लावलेले खोड

१२. गडदेचा बहिरी

१३. आतली प्रशस्त गुहा

१४. गुहेच्या तोंडाशी लावलेला त्रिशूळ

गुहेतून कोकणाचे रौद्र दर्शन होते. बाजूने सरळसोट तुटलेले कडे आहेत. लोक अजून वर चढताना दिसत होते. आता आम्हाला चिंता होती की येथून खाली कसे उतरायचे याची. गिरीदर्शनवाल्यांच्या मदतीने दोरांचा आधार घेऊन नजाकतीने एकेक पाउल टाकत शेवटी तो कडा उतरलो , ट्रॅव्हर्स पार करून परत ती खिंड चढून वर आलो.

१५. गुहेतून दिसणारी दृश्ये

१६. गुहेतून दिसणारी दृश्ये

१७. गुहेतून दिसणारी दृश्ये

१८. उतरण्याच्या तयारीत आम्ही

आता पाय जाम थकलेले होते पण पुढचा मार्ग सोपा होता. आता आम्ही आलो कोंडेश्वर फाट्यापाशी. ३/४ किमीची उतरण उतरून पायथ्याच्या कोंडेश्वर मंदिरापाशी आलो. इथे प्राचीन शिवमंदिर व काही वीरगळ आहेत. इथून थोड्याच अंतरावर असलेल्या जांभिवली गावात दुपारी दीड वाजेपर्यंत पोचलो ते २.३० ची तळेगाव एसटी पकडण्यासाठी. तळेगावला परत पिंपरीला जाणारी लोकल पकडून घरी आलो ते ढाकच्या स्मृती कायम मनात ठेऊनच.

१९. कोंडेश्वर फाट्यावरून

२०. कोंडेश्वरचे शिवमंदिर

२१. वीरगळ

जावे कसे-
१. लोणावळा-तुंगार्ली-वळवंड-ढाक- (३०/३५ किमीची लांबलचक वाटचाल.)
२. तळेगाव्/कामशेत-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक (-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक ७/८ किमी पण जांभिवली एसटी अगदी कमी आहेत. स्वतःच्या वाहनाने यायचे झाल्यास रस्ता खराब आहे याची नोंद घेणे)
३. कर्जत-सांडशी-ढाक (दमछाक करणारी ४ तासांची १००० मीटर्सची तीव्र अशी घाट चढाई.)

अगदी अनुभवी सहकारी बरोबर असल्याशिवाय ढाकच्या वाटेला शक्यतो जाऊ नये. कळकराय सुळक्याच्या खिंडीपर्यंतचा रस्ता तुलनेने बराच सोपा आहे. जो काही थरार आहे तो शेवटच्या अर्ध्या पाऊण तासातच.उतरतांना अत्यंत काळजी आवश्यक.

*तेव्हा आमच्याकडे कॅमेरा नसल्याने मोबाईलमधून काढलेलेच फोटो इथे टाकत आहे.

प्रतिक्रिया

धन्या's picture

3 Jan 2012 - 12:23 am | धन्या

मस्त रे वल्ली.

बाकी ते कातळाच्या चिकटून जाणार्‍या, दिसेल न दिसेल अशा वाटेचे फोटोच अंगावर शहारे आणतात. त्या वाटेने चढताना काय होत असेल ही कल्पनाच करवत नाही. :)

मराठमोळा's picture

8 Jan 2012 - 4:15 am | मराठमोळा

>>बाकी ते कातळाच्या चिकटून जाणार्‍या, दिसेल न दिसेल अशा वाटेचे फोटोच अंगावर शहारे आणतात. त्या वाटेने चढताना काय होत असेल ही कल्पनाच करवत नाही.

+१ सहमत आहे...

अन्या दातार's picture

3 Jan 2012 - 12:51 am | अन्या दातार

जबरी आहे हा ट्रेक. एकदातरी करायलाच हवा असं वाटतंय.

मोदक's picture

3 Jan 2012 - 1:42 am | मोदक

ज ब रा...

गणेशा's picture

3 Jan 2012 - 2:06 am | गणेशा

झकास ....

पाषाणभेद's picture

3 Jan 2012 - 3:04 am | पाषाणभेद

फारच थरारक अन दमछाक करणारा ट्रेक आहे.
फोटो मोबाईल मधून काढल्याचे अजिबात जाणवले नाही.

जयंत कुलकर्णी's picture

3 Jan 2012 - 7:59 am | जयंत कुलकर्णी

व्वा ! वल्ली मी आणि माझा एक मित्र फडके दोघांनीच केलेल्या १९७३ साली केलेल्या या ट्रेकची आठवण जागी करून दिलीस.

आम्ही दोघे त्या मधल्या जंगलात हरवलो होतो. हे जे देऊळ आहे ना तेथे एक साधूबाबा आम्हाला भेटल्याचे मला स्मरते. ते एक भले मोठे इंग्रजी पुस्तक वाचत होते "दास कॅपिटल" त्यांनी रस्ता सांगितल्यावर आम्ही मार्गस्थ झालो आणि परत चुकलो. दमून एका झाडाला टेकून बसलो होतो तेवढ्यात एक माणसांचा घोळका आमच्या बाजूला येताना दिसला. आम्हाला बघून आमची चौकशी केल्यावर ते चाट पडले. लक्षात घ्या त्या काळात ट्रेकिंग एवढे माहीत नव्हते आणि लोक ते करतही नसत. आम्हाला मात्र बापू काका पटवर्धनांमुळे याचे वेड लागले होते. त्यानंतर आम्हाला राम-लक्ष्मणाची उपमा देत ते म्हणाले "देवाचे आमच्यावर लई उपकार झालेती तुमची जोडी आम्हाला भेटली" त्या काळात खेडेगावातील माणसे ही अशी होती. बहिरीला घेऊन जातो म्हणाले पण त्याला चामडे चालत नाही. चामड्याच्या सगळ्या वस्तू येथे काढून ठेवा म्हणाले. मग काय काढले बूट, पट्टा, घड्याळ आणि ठेवले त्या झाडाखाली. मला अजुन आठवते त्यांच्या बरोबर एक लहान बकरीही होती. तू जो मार्ग्/रस्ता दाखवला आहेस तो ते बकरी गळ्यात बांधून चढले. तेव्हा दोर इ... असायचा प्रश्नच नव्हता. शेवटची शिडी मात्र होतीच. मग वरती काय झाले हे सांगायची गरज नाही. या सगळ्या प्रकारात मग आम्ही सगळ्यांनी मुक्काम टाकला त्या गुहेत. तेथेच त्या पाण्यात स्वयंपाकाची सर्व भांडी असल्याचे आठवते. हे झाल्यावर जेवढी लाकडे आम्ही जाळली होती तेवढी त्यांनी परत जंगलातून तोडून आणली आणि तेथे ठेवली. मग आम्ही परत आलो येताना काढून ठेवलेले साहित्य घेतले आणि लोणावळ्याची वाट धरली.

परत त्या आठवणी जाग्या केल्यास वल्ली ! धन्यवाद. हा माझा मित्र सध्या कोठे असतो हे माहीत नाही.... त्याच्याही वाचनात हा लेख यावा ही परमेश्वराशी स्वप्नवत प्रार्थना...........

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2012 - 8:31 am | अत्रुप्त आत्मा

बाबौ...कसला खत्री ट्रेक हो हा...पण ही माहिती सगळी अप्रतिम आहे हो वल्ली..नेहेमी प्रमाणेच अमचा तुंम्हाला सलाम...!

वल्ली अहो एकदा तरी तुमच्यासह ट्रेकींगला येण्याचा मानस आहे. फोटो अप्रतिम आहेत. मजा आली गडदेचा बहीरी अनूभवण्यात. :)

स्पा's picture

3 Jan 2012 - 9:00 am | स्पा

जबरदस्त ट्रेक आहे बे हा....

जबराट

प्यारे१'s picture

3 Jan 2012 - 9:10 am | प्यारे१

जबराट ट्रेक आहे हा... करायचा का?
वल्लीला पाहिलेल्यांसाठी :
दोर/दोरी त्याचं वजन व्यवस्थित घेत असेल का? ;) ;)

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 9:30 am | प्रचेतस

२ वर्षांपूर्वी आम्ही जरा बारीक होतो हो प्यारेकाका. शिवाय दोरीला वजन पेलण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही रॅपलिंग किंवा रोप क्लायम्बिंग केले नव्हते. बुडत्याला काडीचा आधार इतपतच दोरखंडाचा सहारा होता.

मोदक's picture

25 Jan 2012 - 12:53 am | मोदक

त्या ठिकाणी ३ दोर्‍या आहेत. त्यांना एकत्र पकडून वल्ली आजही सहज वर जावू शकतो. ;-)

जांभीवलीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आले, एखादा ट्रॅक्टर / ट्रक आला तरच खाली उतरावे लागते. रस्ता अगदी गुळगुळीत नसला तरी व्यवस्थीत आहे.

चिंचवडहून सकाळी ७ ला निघून दुपारी ४ वाजता सोमाटणे फाट्यावर परत आलो आहे.

मोदक

किसन शिंदे's picture

3 Jan 2012 - 9:41 am | किसन शिंदे

अगं बाब्वो!

खरचच हा ट्रेक जबराट दिसतोय. एकदा जायलाच हवं.

मस्त रे, फोटो पाहुनच घाबरायला होतंय प्रत्यक्ष जाण्याचं धाडस होईल का नाही माहित नाही.

मी-सौरभ's picture

3 Jan 2012 - 10:16 am | मी-सौरभ

आधी २-४ तुलनेने सोपे ट्रेक करुन मग हा पण करुया असे या वर्षाचे ध्येय ठेवुया का??

मन१'s picture

3 Jan 2012 - 10:25 am | मन१

भारिच...

झकासराव's picture

3 Jan 2012 - 10:56 am | झकासराव

अर्र...
जेवढे म्हणुन हे ढाकचे फोटु बघतोय ते बघुन तिक्डे न जाण्याचा निर्णय बळकट होतोय.
फोटो सुंदर आहेत. :)

वल्लि साहेब

जबराट मस्त फोटो

एक च शब्द : अफाट............

वल्लि साहेब

जबराट मस्त फोटो

एक च शब्द : अफाट............

गणपा's picture

3 Jan 2012 - 1:04 pm | गणपा

आजवर केवळ ईतिहासाच्या पुस्तकातुन उल्लेख वाचला होता.
आज फोटोही पहायला मिळाले.

मदनबाण's picture

3 Jan 2012 - 1:39 pm | मदनबाण

*तेव्हा आमच्याकडे कॅमेरा नसल्याने मोबाईलमधून काढलेलेच फोटो इथे टाकत आहे.
तरीच ! पण वांदो नथी. अपुनको आवडेला हय.

पुर्वी आम्ही केलेल्या ढाकच्या बहिरीच्या सफरीची आठवण ताजी झाली .
तरीच... मला हे नाव लक्षात होते.म्हंटल हा नवा बिहारी कंचा ? ;)

मन१'s picture

3 Jan 2012 - 1:49 pm | मन१

भन्नाट दिसतोय ट्रेक.
मागे धम्यानी पण ढाकची बहिरीवर काहीतरी चढाई केल्याचा धागा टाकला होता.
http://www.misalpav.com/node/1872

जाम टरकवनारा ट्रेक वाटतोय.

धमाल मुलगा's picture

3 Jan 2012 - 3:33 pm | धमाल मुलगा

एकदम खंग्री ट्रेक आहे/होता हा. शहाण्यानं ढाकच्या बहिरीच्या वाटे जाऊ नये..पण ट्रेकचं वेड लागलेले कुठे शहाणे उरलेले असतात? :) अस्स्ल काटाकिर्र भानगड आहे ही. :)

जो एकदा ढाकला जाऊन येतो, विशेषतः ट्रेकिंगमध्ये रुळला नसताना, तो ह्या आयुष्यात तरी ढाकचा अनुभव विसरु शकत नाही.

मध्यंतरी साधारण एक-दिड वर्षाखाली परत गेलो होतो तेव्हा पुर्वीच्या मानानं बराच सोपा वाटला ट्रेक. जागोजागी वाट दाखवणारे फलक वगैरे लावले होते.. गर्दीही बक्कळ होऊ लागली होती त्यामुळं चुकण्याची वगैरे भानगड नाही. आम्ही आधी गेलो होतो तेव्हा त्या जंगलात रस्ता चुकला नाही असं होऊच शकणार नाही अशी गत होती.
पण अर्थातच ढाकचं खरं आकर्षण म्हणजे कडा. तो चढून जाण्याला पर्याय नाही, आणि खरी गंमत त्यातच.

झकास रे वल्ल्या. खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. :)

सुहास झेले's picture

3 Jan 2012 - 1:53 pm | सुहास झेले

मस्त रे.... माझा आवडता ट्रेक.

भर उन्हाळ्यात केला होता हा ट्रेक, त्या आठवणी ताज्या झाल्या :) :)

वल्लींचे कितीही कौतुक करावे तितके कमीच आहे.
अप्रतिम ट्रेक.

आम्हीपण एखादा ट्रेक करू म्हणतो पण सद्य स्थितीत "तुंदिलतनु" या व्याख्येत मोडत असल्याने शक्य नाही.

सुहास..'s picture

3 Jan 2012 - 3:56 pm | सुहास..

_/\_

मालक जावुन आलात का ? एकच नंबर !!

तो ईर्शाळा परवडला एक वेळ ...पण ढाक- बहीरी म्हटल की .................

पैसा's picture

3 Jan 2012 - 11:01 pm | पैसा

कोण तुम्हाला असल्या जागी जायला सांगतं रे? फोटो बघूनच या प्रकरणाच्या जवळपास सुद्धा जायचं नाही असं ठरवलंय.
जयंतरावांची आठवण आवडली आणि बारामतीकरांच्या लेखाच्या लिंकमुळे बारामतीकर एकदा असले नसते उपद्व्याप करत होते आणि लिहीतही होते याचा पुरावा मिळाला ;)

वपाडाव's picture

4 Jan 2012 - 2:10 pm | वपाडाव

मला इंक्लुड करुन पुढचा ट्रेक कधी आखताय मंडळी.....

मेघवेडा's picture

4 Jan 2012 - 9:52 pm | मेघवेडा

बाब्बो! थ रा र क! लैच भारी!

स्वाती दिनेश's picture

5 Jan 2012 - 3:01 pm | स्वाती दिनेश

फोटो सॉलिड्ड आहेत!
ट्रेकही मस्तच झाला असणार..
स्वाती

दिपक's picture

5 Jan 2012 - 4:10 pm | दिपक

जबरदस्त ट्रेक वर्णन आणि फोटो.

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:36 pm | अभिजीत राजवाडे

फार ऐकले होते या ट्रेक बद्द्ल. आज पहायला मिळाले. आता लवकरात लवकर जाऊन येतो.

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:36 pm | अभिजीत राजवाडे

फार ऐकले होते या ट्रेक बद्द्ल. आज पहायला मिळाले. आता लवकरात लवकर जाऊन येतो.

गोनीदांच्या पुस्तकात वाचलं होतं या बहिरीबद्दल, पण हे फोटो आणि वर्णन पाहून, खरंच किती कठीण ट्रेक आहे ते समजलं.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jan 2012 - 10:59 pm | जयंत कुलकर्णी

खरे सांगायचे तर एवढा अवघड नाही. गुहेत महाराष्ट्रातील सगळी आडणावं लिहिलेली आहेत.
:-)

गुहेत महाराष्ट्रातील सगळी आडणावं लिहिलेली आहेत.

१९७३ साली जर महाराष्ट्रातील सगळी आडणावं इथे लिहिल्या गेली आहेत तर मग मावळे तेव्हाही किती हुरुपी होते हे लक्षात येते आहे.... तेव्हाही त्यांना एकांतासाठी बहिरीवर जावे लागायचे ही एक शोककळा आहे....

दीपा माने's picture

12 Jan 2012 - 12:05 am | दीपा माने

फोटो आणि माहीती डोळ्यांचे पारणे फेडते. खुपच धाडसी मोहीम पार पाडलीत. जुन्या ऐतिहासिक कथांमधुन मावळे माकडांसारखे सरसर चढुन जात म्हणुन लिहीलेले वाचलेय. त्याकाळी मावळ्यांना तर हा नेहेमीच्याच जीवनातला भाग होता.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jan 2012 - 7:55 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_