झेन काव्य - २

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
13 Sep 2011 - 4:27 pm

खिन्नमनस्क

जराजर्जर धरतीच्या डोईवर, नभात घोन्घावणारे वादळी वारे, उन्मळून पडलेली हिरवळ सर्वत्र विखुरली आहे.
माझ्या नजरेसमोरचे जग पुरते भकास आणि अर्थहीन आहे, अगदी माझ्या अस्तित्वासारखेच.
वसन्तातल्या शीतल झुळुकेविनाच हे वर्ष सरत आले.
त्यात आता माझी चिमुकली चन्द्रमौळी झोपडीपण बर्फाळ मृत ढग गिळून टाकत आहेत.

प्रणय प्रार्थना

देहाचे सारे चोचले पुरवून थकल्यावर, मी घरी परतून पत्नीच्या बाहुपाशात विसावतो.
जाचक व्रतस्थतेच्या चिन्चोळ्या बोळकान्डातून सरपटणे हा माझा मार्गच नाही -
माझ्या ओढाळ मनाला नेमकी त्या विपरीत दिशेने धावण्याची अनावर ओढ आहे.
ध्यानधारणेबद्दल प्रवचनबाजी करणे हा प्रचितीहीन पोरखेळ आहे, मी त्या बाबतीत पूर्ण मौन बाळगतो.
अहोरात्र चालणार्या प्रणय प्रार्थनेवर मात्र माझी निस्सीम श्रद्धा आहे.

ताज्या ऑक्टोपस चे भोजन

त्याचे अगणित टेन्टॅकल्स, अष्टभुज देवतेच्या हातासारखे.
खास माझ्यासाठी बळी गेलेल्या ऑक्टोपसचे, चविष्ट मसाल्याने सजवलेले, माझे अत्यन्त प्रिय असे भोजन!
जीभेवर रेन्गाळणारी दर्याची ती अनोखी लज्जत, जणू स्वर्गसुखच ...
तथागता, क्षमा करा, हा आणखी एक जाचक नियम आहे जो मी मुळीच पाळू शकणार नाही.

अहोभाव

तो वृक्ष पुरता निष्पर्ण झालेला, पण तुझ्या स्पर्शाने वसन्तातला बहर परतला.
सशक्त हिरवेगार अन्कुर, मुग्ध कलिका, फुलान्चे घोस, फिरुन एक आश्वासक सुरूवात....
मीरे, तुझ्याविषयीची प्रगाढ कृतज्ञता क्षणभरही विसरलो -
तरी बेशर्त अनन्त काळ मला नरकयातनात दग्ध होऊ दे!

(Ikkyu या झेन फकिराच्या काव्याचा स्वैर भावानुवाद. Mori या त्याच्या दृष्टीहीन प्रेमिकेचे नाव अनुवादात 'मीरा' केले आहे.)

Translated from the following text:

The world before my eyes is wan and wasted, just like me.
The earth is decrepit, the sky stormy, all the grass withered.
No spring breeze even at this late date,
Just winter clouds swallowing up my tiny reed hut.
________________________________________
Exhausted with gay pleasures, I embrace my wife.
The narrow path of asceticism is not for me:
My mind runs in the opposite direction.
It is easy to be glib about Zen -- I’ll just keep my mouth shut
And rely on love play all the day long.
________________________________________
(A Meal of Fresh Octopus)
Lots of arms, just like Kannon the Goddess;
Sacrificed for me, garnished with citron, I revere it so!
The taste of the sea, just divine!
Sorry, Buddha, this is another precept I just cannot keep.
________________________________________
(To Lady Mori with Deepest Gratitude and Thanks)
The tree was barren of leaves but you brought a new spring.
Long green sprouts, verdant flowers, fresh promise.
Mori, if I ever forget my profound gratitude to you,
Let me burn in hell forever.

- मूकवाचक

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Sep 2011 - 6:11 pm | नगरीनिरंजन

खिन्नमनस्क आणि प्रणय प्रार्थना विशेष आवडल्या.

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2011 - 11:12 pm | राजेश घासकडवी

शब्दाला शब्द ठेवण्याऐवजी तोच अर्थ, तोच भाव येण्यासाठी नवीन शब्द वापरण्याचं, ओळींचा क्रम बदलण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे. ते आवडलं.

जाचक व्रतस्थतेच्या चिन्चोळ्या बोळकान्डातून सरपटणे हा माझा मार्गच नाही

ही व इतर काही ओळी आवडल्या.

अभिजीत राजवाडे's picture

14 Sep 2011 - 2:11 am | अभिजीत राजवाडे

परभाषेतील कवितेचे मराठीमधे भावानुवाद करणार्‍या सर्व कविंचे मला मनापासुन कौतुक वाटते. जसे मातृभाषेतील कवितेचा आस्वाद घेताना आपल्याला आपल्या नेणीवेतील अनुभवांचा अन संस्कारांचा फायदा होत असतो. कविता जेवढी या अनुभवांशी सुसंगत तेवढे आपण त्या कवितेशी नकळत जुळलो जातो.
जेंव्हा एखादा कवि परभाषेतील कवितेचा भावानुवाद करतो तेंव्हा तो नुसताच मराठी-इंग्रजी शब्दकोष घेऊन केलेले भाषांतर नसते तर त्या कवितेचा भाव अन तात्कालिन संदर्भ समजुन घेऊन मातृभाषेच्या जगतात हि कविता कशी प्रकट होईल याचेही भान बाळगावे लागते. जणु एखाद्या नवविवहितेचा माहेराहुन सासरी येण्याचा तो एक प्रयास असतो. येथे घरंदाजपणाच लागतो नाहितर नवनिर्मिती तर होते पण त्या नवनिर्मिताला निर्मलता लाभत नाही.

तुमचेही अभिनंदन!!!

कवितानागेश's picture

14 Sep 2011 - 2:32 pm | कवितानागेश

सुंदर.

मूकवाचक's picture

14 Sep 2011 - 4:19 pm | मूकवाचक

श्री. राजवाडे यान्च्या प्रतिसादातले भावानुवादाविषयीचे विचार आवडले. प्रतिसाद देणार्या सर्वान्चे मनःपूर्वक आभार.

सुंदर भावानुवाद. :) खरच फारच सुंदर.

धनंजय's picture

14 Sep 2011 - 8:54 pm | धनंजय

छान.

भावानुवादाशिवाय गत्यंतर नव्हते! (जपानीमधून इंग्रजीमध्ये केलेले भाषांतर अकुशल वाटले. त्याच्या बांधणीत मुळात सौष्ठव नाही, ते मराठीमध्ये आणण्याचा मोह तरी का होणार?)

मिताक्षर असते तर आणखी मजा आली असती. त्यामुळे झेन/जपानी मित-काव्याची सूचकता आणि व्यापकता वाढू शकते.

भुजाभुजांची दिव्य देवी
शिंपून लिंबू, सागर हुंगून
अन्नात पडली आहुती...
न हिंसा बुद्धा - अगतिक मी!

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 9:06 pm | आत्मशून्य

.