प्रांतांच्या गोष्टी ७ - ‘संवेदनशील’ प्रशासन!

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
23 Mar 2011 - 8:24 pm

विभागीय आयुक्तांकडे एका जमीन हडप प्रकरणात कलेक्टर स्वत:च अर्जदार होते. त्यांनी प्रांतांना आपल्या तर्फे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. महसूल कायद्याच्या लीज, हुकुमनामा, म्युटेशन, आदि बाबींचा सांगोपांग अभ्यास प्रांतांच्या हातून व्हावा आणि पुढे कलेक्टर झाल्यावर त्यांच्या कामी यावा अशी कलेक्टरांची यामागे योजना होती. प्रांतही त्यांना निराश करणाऱ्यातले नव्हते. केवळ पुस्तकी अभ्यास करुन न थांबता त्यांनी साइटला प्रत्यक्ष भेट दिली, तसेच जुन्या जाणत्या रेव्हेन्यू इन्स्पेक्टरांकडून प्रकरण नीट समजाऊन घेतले. सरकारी वकीलांबरोबर बसून हायकोर्टाचे निरनिराळे निकाल जाणून घेतले.

तपशीलवार टिपण काढून ठरल्या तारखेला प्रांत संबलपूरला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात हजर राहिले. सुनावणी झाली. आयुक्तांनाही प्रांतांच्या अभ्यासाचे कौतुक वाटले. त्यांनी कोर्ट संपल्यावर त्यांना चेंबरमध्ये भेटायला सांगितले.

चेंबरमध्ये अगोदरच सुवर्णपूरचे कलेक्टर बसले होते. थोड्याच वेळात आयुक्त आले. आल्यावर त्यांनी अगोदर गाऱ्हाणी घेऊन आलेल्या मंडळींना एकेक करुन बोलावले. तातडीने आयुक्त एकेक तक्रार निपटून काढत होते. आवश्यक तिथे ताबडतोब फोन लावून व्यवस्था लावत होते. प्रांत बघत होते.

थोड्या वेळाने एक तरुण लंगडत लंगडत आला. त्याच्या हातात एक्सरे फोटो होते. त्याच्या पायाचे ऑपरेशन झाले होते आणि पायात सळी बसवली होती. त्याला मदत हवी होती. त्याने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज केला होता आणि रेव्हेन्यू इन्स्पेक्टर त्यावर सही करायला नकार देत होता. हा तरूण सुवर्णपूर जिल्ह्यातून आला होता. कलेक्टरांना ही छोटी बाब कशाला माहीत असेल असे वाटून आयुक्तांनी कलेक्टरांना यावर काही विचारले नाही. त्यांनी त्या तरुणालाच विचारले, ‘आराय का सही करत नाही? काय म्हणतो?’

‘अग्यां, तो म्हणतो, कलेक्टर मना करीछन्ती.’

आयुक्तांनी हे हसण्यावारी नेत कलेक्टरांकडे पाहिले. तर कलेक्टर उत्तेजित स्वरात म्हणाले,

‘हो, मीच मना केलंय!’

आयुक्तांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. प्रांतही सावरून बसले. कलेक्टर म्हणाले,‘सर, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वार्षिक उत्पन्न कमाल अकरा हजार असावे अशी अट आहे.’

हा नियम प्रांतांना माहीत होता. पण सचिवालयाची इडिओसिंक्रसी म्हणून या नियमाकडे कुणीही शहाणा अधिकारी दुर्लक्ष करत असे. भिकाऱ्याचेदेखील वार्षिक उत्पन्न अकरा हजारापेक्षा जास्त असण्याच्या काळात ही अट म्हणजे क्रूर मूर्खपणा होता. त्यामुळे कलेक्टरांच्या तोंडून हा नियम ऐकताच प्रांत अविश्वासाने त्यांच्याकडे पाहू लागले.

कलेक्टर पुढे सांगू लागले,‘सर हा डिझर्व्हिंग कॅंडीडेट नाही. हा माणूस माझ्याकडे आला होता. याला मी विचारले तर मला म्हणाला महिना दोन हजारावर एका ठिकाणी काम करतो. वर याचे वडीलही कुठेतरी महिना हजार रुपयांवर काम करतात. म्हणजे याचे उत्पन्न कमीतकमी छत्तीसहजार झाले. मग याचा अर्ज कसा मंजूर व्हावा?’

‘पण या आजारपणात माझं कामही बंद होतं’, तरुण प्रतिवादाचा क्षीण प्रयत्न करत म्हणाला.

हाताने त्याला वारीत त्या तरुणाकडे वळून कलेक्टर पुढे म्हणाले, ‘काय रे, मुख्य सचिवांकडे पण गेला होतास ना? इथेही आलास. हे असं फिरायला पैसे आहेत तुझ्याकडे, आणि दवाखान्यात द्यायला नाहीत काय? फुकटे कुठले!’

आयुक्त कलेक्टरांना म्हणाले,‘हे बघा, हा बिचारा एवढा लांब आशेने आला आहे, तर तुम्ही त्याला ही मदत नियमामुळे देऊ शकत नसाल तर रेडक्रॉस फंडातून काही टोकन रक्कम द्या.’ कलेक्टरांनी मान डोलावली. त्यांनी त्या तरुणाला जायला सांगितले.

प्रांतांना हे असह्य झाले. आयुक्तांना म्हणाले, ‘सर मला रजा द्यावी.’

‘जातोस?’ आयुक्त हसत त्यांच्याकडे पहात म्हणाले.

‘सर, जाण्यापूर्वी काही बोलू शकतो का?’

‘बोल, बोल.’

‘या प्रकरणात बोलण्याचा मला काही अधिकार नाही. सरकारी नियमावर पण मी काही टिप्पणी करु इच्छीत नाही. पण नियम बनवणारे आपणच. हा नियम निरर्थक आहे हे आपल्याला समजत नाही का? आणि नियमावर बोट ठेऊनच काम करायचे असेल तर मग अधिकारी कशाला हवेत? कम्प्यूटरपण काम करु शकतोच की. फक्त नियम आपले फीड करायचे, झालं. महिना कसेबसे दोन तीन हजार मिळवून हातातोंडाची गाठ घालणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री सहायता निधीची गरज नसेल असं वाटणं म्हणजे आश्चर्य नाही? एका बाजूला सरकार काळजी व्यक्त करत राहतं की हा निधी खर्च होत नाहीये, पडून राहतोय. आणि इकडे आपण डिझर्व्हिंग कॅण्डिडेट शोधत बसलोय. येतो मी सर. गुड डे.’

चकीत झालेल्या आयुक्तांना हात जोडून नमस्कार करीत सुवर्णपूर कलेक्टरांकडे न पाहता प्रांत चेंबरबाहेर पडले. खिन्न होऊन.

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ
प्रांतांच्या गोष्टी १
प्रांतांच्या गोष्टी २
प्रांतांच्या गोष्टी ३(१)
प्रांतांच्या गोष्टी ३(२)
प्रांतांच्या गोष्टी ४(१)
प्रांतांच्या गोष्टी ५
प्रांतांच्या गोष्टी ६

कथा

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

23 Mar 2011 - 9:38 pm | प्रसन्न केसकर

संख्येने कमी असले तरी ते काळ्या ढगाची सोनेरी कड आहेत. त्यांच्याच पुण्याईवर देशाचा कारभार सुरु आहे.

या प्रांतांच्या कथांचा मी प्रथमपासूनच फॅन आहे. चांगले काहीतरी होऊ पहातेय याचा पुरावा म्हणजे या कथा!

--असुर

रामदास's picture

23 Mar 2011 - 10:12 pm | रामदास

आणखी महसूल वार्ता !!
(भाऊसाहेब) रामदास

आत्मशून्य's picture

23 Mar 2011 - 11:35 pm | आत्मशून्य

.

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2011 - 1:48 am | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म.. :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2011 - 9:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

टॅग बंद करत आहे.

टॅग इथून बंद होत नाही, इंटरनेटस्नेही यांनी कृपया आपल्या सहीतले टॅग उघडे सोडू नयेत ही विनंती.

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2011 - 1:48 am | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म.. :(

नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारे लेखन. तुमच्याकडे नक्कीच एखादी दीर्घकथा लिहीण्याची सामुग्री असेल. घुसमटून टाकणारे तपशील असतील.नेहमीपेक्षा अतिशय वेगळा परिसर , बोली , रितीरिवाज आहेत.प्रांतांसारखा नायक / प्रतिनायक तर आहेच . अशी एखादी दीर्घकथा वाचायला अतिशय उत्सुक आहे.

नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारे लेखन.
या वाक्याशी सहमत.

हरिप्रिया_'s picture

24 Mar 2011 - 11:30 am | हरिप्रिया_

खरोखर अस्वस्थ करणारे लेखन...
:(

पैसा's picture

27 Mar 2011 - 11:12 am | पैसा

पण मी तरी आशावादी आहे...

नगरीनिरंजन's picture

24 Mar 2011 - 4:30 am | नगरीनिरंजन

प्रांत नेहमीप्रमाणेच लाजवाब!

सहज's picture

24 Mar 2011 - 7:08 am | सहज

संवेदनाशील प्रशासनाचा पैलू दिसणे भाग होते. प्रसन्नदाने वेळोवेळी लिहलेल्या प्रतिसादात पोलीसात देखील अशी बाजू दिसुन येते.

अर्थात तरीही प्रशासन,पोलीस व जनता यातले अंतर पार व्हायचे आहे. पुन्हा एकदा अंडे आधी की कोंबडे प्रमाणे माणसासाठी नियम की नियमासाठी माणूस हा प्रश्न.. सरकारी काम आज नाही उद्या या, आम्हाला पॉवर नाय अशी कारणे, किंवा हे काम जरी केले तरी अमुक नियमबाह्य काम केले म्हणून उद्या अश्या उमद्या अधिकार्‍याला त्याचे प्रशासनातील स्पर्धक कशातरी गुंतवायला, डावलायला कमी करणार नाहीत. मधे कधीतरी बालमजदूर ठेवल्याच्या आरोपाखाली एका हॉटेलवाल्याला केवळ काही शेकडा रुपये दंड झाला होता. गुन्हामधे दंड व्हायच्या रक्कमेत वाढ झाली आहे का? नियम कालसुसंगत आहेत की नाही हे वेळ न दवडता बघणे व बदल करुन अमलात आणणे, सध्या काय परिस्थीती आहे यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

५० फक्त's picture

24 Mar 2011 - 8:05 am | ५० फक्त

नेहमीप्रमाणे एका वेगळ्या विश्वावर उजेड टाकणारी लेखमाला, तुमचं सगळं लेखन आणि त्यावर तज्ञ व अज्ञानी लोकांच्या चर्चा वाचलेल्या आहेत.

एक तक्रार आहे, तुम्ही तुमच्या नावाला फार जागता बुवा.

अर्धवट's picture

24 Mar 2011 - 8:53 am | अर्धवट

मस्त

चिगो's picture

24 Mar 2011 - 2:07 pm | चिगो

पण विभागीय आयुक्तांनाही जर ही उत्त्पन्नाची अट मुर्खपणाची वाटत असेल तर सेक्रेटरी / मंत्रीमंडळाशी बोलून त्यात सुधारणा का करुन घेत नाहीत/ प्रयत्न करीत नाहीत? त्यांना ते (म्हणजे बोलणे / चर्चा) सहज शक्य आहे म्हणून... नाही म्हणजे, नियमाबाहेर जावून कलेक्टरांनी / प्रांतांनी माणूसकीपायी "एक्सेप्शन" करावे आणि नंतर "ऑडीट पॅरा" किंवा "इन्कायरी"चा भुंगा लागायचा पाठीमागे...

(पुर्वीच्या/ आधीच्या अधिकार्‍यांपायी "ऑडीट पॅरां"ना उत्तरे देत असलेला) चिगो

आळश्यांचा राजा's picture

24 Mar 2011 - 8:48 pm | आळश्यांचा राजा

सर्वांचे आभार!

सहजराव आणि चिगो,
आपले मुद्दे अगदी योग्य आहेत. सहमत आहे. कालसुसंगत नियम बनायला हवेत, बदलत रहायला हवेत.

मी अजून थोडासा वेगळा मुद्दा मांडतो. नियमावर बोट ठेऊन एखादा अधिकारी अशी भूमीका घेत असला (म्हणजे इथल्या कलेक्टर सारखा) तर त्याला काहीच उत्तर नसते. हे माझ्या मते "मॅलिशियस" नियमपालन आहे. हा कलेक्टर सगळीकडे असेच कठोर नियमपालन करत असेल का? स्वतःच्या बाबतीत असा कठोर वागत असेल का? सरकारी फोनने खाजगी फोन करायचा नाही, सरकारी गाडी खाजगी कामासाठी वापरायची नाही, असे कठोर निर्बंध स्वतःवर लावत असेल का? याचे उत्तर माझ्या मते नकारार्थी येते. ग्रे शेड्स सगळीकडेच असतात. मग या केसमध्ये तो ग्रे शेडमध्ये का नाही जात? याचं उत्तर निव्वळ सत्तेच्या आणि अधिकाराच्या मूर्ख कल्पना आहेत, एवढेच आहे. अजून थोडं स्पष्ट करतो. एखाद्या आमदाराने किंवा इव्हन स्थानिक (मोठ्या आवाजात बोलणार्‍या) नेत्याने अशी एखादी केस आणली की असे अधिकारी एकदम मऊ पडतात आणि वाट्टेल तसले रिपोर्ट द्यायला तयार होतात. तिथे ऑडिटची काळजी वाटत नाही. इतर वेडावाकडा झालेला खर्च - उच्च अधिकार्‍यांची/ मंत्र्यांची फुकटात खाण्या-पिण्याची सोय करायला वाट्टेल तसे कागदी फेरफार करता येतात, आणि असा एखादा दुबळा गरजू आला की लगेच सगळे नियम आठवतात.एखाद्या खोट्या केसमध्ये त्या आरायला एखाद्या माणसाने त्या निधीतले काही पैसे द्यायची तयारी दाखवली तर तो त्याला वार्षिक पाच हजार उत्पन्नाचा दाखला देईलही, आणि कलेक्टर त्यावर डोळे झाकून सही करीलही.

तारतम्य नसलेली बरीच माणसे सत्तेच्या जागी बसलेली दिसतात.

दु:ख हेच आहे.

चिगो's picture

25 Mar 2011 - 5:47 pm | चिगो

एखाद्या आमदाराने किंवा इव्हन स्थानिक (मोठ्या आवाजात बोलणार्‍या) नेत्याने अशी एखादी केस आणली की असे अधिकारी एकदम मऊ पडतात आणि वाट्टेल तसले रिपोर्ट द्यायला तयार होतात. तिथे ऑडिटची काळजी वाटत नाही. इतर वेडावाकडा झालेला खर्च - उच्च अधिकार्‍यांची/ मंत्र्यांची फुकटात खाण्या-पिण्याची सोय करायला वाट्टेल तसे कागदी फेरफार करता येतात, आणि असा एखादा दुबळा गरजू आला की लगेच सगळे नियम आठवतात.एखाद्या खोट्या केसमध्ये त्या आरायला एखाद्या माणसाने त्या निधीतले काही पैसे द्यायची तयारी दाखवली तर तो त्याला वार्षिक पाच हजार उत्पन्नाचा दाखला देईलही, आणि कलेक्टर त्यावर डोळे झाकून सही करीलही.<<

अगदी बरोबर बोललात, आरा.. खास करुन खोट्या दाखल्यांबद्दल जे बोलत आहात ते जास्तच आढळतं.. माझ्यासमोर आलेला एक किस्सा सांगतो...
इथे आसाममध्ये ४५ वर्षांवरील लग्न न झालेल्या स्त्रीयांना राज्य सरकार १० हजार रुपये उदरनिर्वाहाची काही सोय करावी म्हणून देते. एकदा माझ्यासमोर एक बाई अर्ज घेवून आली व "सही करा" म्हणून सांगायला लागली. तिच्याजवळ सरकारी डॉक्टरांचा "By her own statement and by appearance" ती पंचेचाळीस वर्षांची असल्याचा कागद होता. मी खोलात जाऊन तिने जोडलेली मतदार यादी पाहीली. २००७ च्या मतदार यादीत तिचे वय २६ वर्षे होतं आणि चारच वर्षात (योजना आल्याने) तिचं वय १९ वर्षांनी वाढलं होतं!! मी (स्त्रीदाक्षिण्यापायी) त्या बाईला शिव्या न देता फक्त केस रिजेक्ट करुन टाकली...
मला स्वतःलाही हीच शंका आहे, की किती लोक खरंच गरजू असतात आणि किती लोक सरकारला फसवायला टपलेले असतात.. टारगेट मागे धावणार्‍या आणि पैशापायी गहाण पडणार्‍या अधिकार्‍यांबद्दल तर बोलायचीही गरज नाही... बाकी, कायदे आणि उत्पन्न-सिमा ह्यांच्यात काळ आणि गरजेनुसार बदल हे तर व्हायलाच हवेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2011 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रांतांच्या हातून आणखीही चांगली कामं घडण्यासाठी आणि जिल्हाधिकारी होण्यासाठी शुभेच्छा. आरा यांनी आणखी लिहीत रहावं यासाठी त्यांच्या मागे भुणभूण!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Mar 2011 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते

कृपया, प्रांतांना माझा नमस्कार आणि धन्यवाद पोचवा!

sneharani's picture

26 Mar 2011 - 10:23 am | sneharani

नेहमीप्रमाणे मस्त (अस्वस्थ करणारे) लेखन...!
येऊ द्या आणखीन..!!

भवानी तीर्थंकर's picture

26 Mar 2011 - 4:40 pm | भवानी तीर्थंकर

प्रांतांच्या गोष्टी ही वेगळीच मालिका आहे. पण त्यात हा लेख काही बसत नाही असे वाटले. कारण, बाकीच्या लेखनात खरोखरच्या कथा दिसल्या. म्हणजे तसा ऐवज आहे त्यात. या लेखात तसे नाही. एकूण मालिकेच्या आजवरच्या प्रवासात मुख्य रस्त्यावरून गाडी थोडी सर्विस रोडवर गेल्यासारखी वाटली.
अर्थात, लेखन उत्तम. मालिकेच्या कंटेक्स्टमध्ये मात्र ते उजवे ठरत नाही इतकेच.
इथे अशी भूमिका घेणाऱ्या प्रांतांना माझाही नमस्कार.

राजेश घासकडवी's picture

27 Mar 2011 - 11:06 pm | राजेश घासकडवी

सत्याचं वर्णन असल्यामुळे लेखनशैलीबद्दलचं मत आणि प्रत्यक्ष घटनांबद्दलचं मत या दोन भिन्न गोष्टी असतात. पैकी आरांनी मांडलेल्या मुद्द्याविषयी (नियम कुठे शिथिल करावेत याचं तारतम्य नियमांची अंमलबजावणी करणारांनी बाळगावं) १०० टक्के सहमत.

मात्र लेखमालेविषयी भवानी तीर्थंकर यांच्याशी सहमत. सुरूवातीच्या काही लेखांत जे विस्तृत कॅन्व्हासचं दर्शन व्हायचं तसं या भागात झालं नाही. हा कदाचित लेखमालेच्या रचनेचा प्रश्नही असू शकेल. कदाचित संपूर्ण माला एखाद्या दीर्घकथेसारखी वाचली तर हे जाणवेलच असंही नाही.

असो. आरांच्या पुढच्या लेखनाची उत्सुकतेने वाट पहात आहे.

चेतन's picture

28 Mar 2011 - 12:26 pm | चेतन

आणखी एक सुंदर किस्सा

चेतन

अवांतरः कलेक्टरला कदाचित असंवेदनशील म्हणु शकतो पण जर त्यानी ही फाईल पास केली असती आणि उद्या त्यावरुन वाद झाला असता तर कोणाला सजा झाली असती . (हे होण्याची शक्यता फक्त १% आहे तरीही )