हरवली पोर माझी कविता नावाची !

गणेशा's picture
गणेशा in विशेष
3 Mar 2011 - 9:45 pm
मराठी दिन

प्रस्तावना : ही कविता काव्य विभागात दिलेली होती(http://www.misalpav.com/node/1708). पण कविता टाकल्यानंतर आणि पैसा जीं शी बोलण्या नंतर असे वाटले की या कवितेला अजुनही बोली भाषेत उत्तरे देता येतील, असेच काव्य पुढे लिहिता येइल ..
ज्यांना ज्यांना त्यांच्या बोली भाषेत उत्तरे देता येतील त्यांनी तसे प्रयत्न केल्यास छान वाटेल ..
थिम : कवी आनि कविता यांच्यामधील संवाद .. सोबतीला खरे खुरे बाप्-मुलगी यांचे मन ही त्यामध्ये दिसले पाहिजे ...
---

कविता १ :

काय सांगु कहानी
या वेड्या बापाची
हरवली पोर माझी
कविता नावाची !

कामाच्या ओझ्यामंधी
भान हुतं गेल सरुन
डोळ्यात टिपुस ना परि
ओढ पोरी तुझीच तिथुन

कारभारनीच तुकडं
काही ग्वॉड लागना
शेतांमधी पाटाच
काही पाणी वाहिना

वाटच्या धुळीसंग
कोणी चालना
चिमण्यांही आज कुठं
दाणं टिपना

सांगतो मी कहानी
या वेड्या बापाची
हरवली पोर माझी
कविता नावाची !

दारातल्या अंगणात
काही रात निजना
पारिजाताचा सडा
आज काही सांगना

चंद्राची कोर बी
कुठ दिसना
आभाळाची माया
आज काही बोलना

उसवल मन आज
इचार करवाना
हरवली पोर माझी
कुठ सापडना..

- शब्दमेघ ( ३ मार्च २०११)
भाषेचे स्थान : बारामती

प्रतिक्रिया

गणेशा's picture

4 Mar 2011 - 12:32 pm | गणेशा

नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई

हातानी तुझ्या जेंव्हा
मला भरवला घास
कामामध्ये असे तुझ्या
फक्त माझाच ध्यास

कसे विसरेल बाबा
तुझी करुण कहानी
फाटलेल्या सदर्‍यात
विनलेली नाती

धुळीमधी माखलेली
तुझी जिंदगाणी
आधाराची परि माझ्या
प्रेमाची सावली

अंगणात विसावता
मायेची अंगाई
वेड्या या पोरीची
बाबा तुच विठाई

प्राजक्ताच्या सड्यामध्ये
होती ओघळली कविता
सासराला जाताना
तुझी रडवेली बोली

फाटक्या या संसाराला
ठिगळाची घाई
दूराव्याच्या अंतरात
जीव जाळीत राहि

नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई

रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई !!

- शब्दमेघ ( ४ मार्च २०११)

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 2:16 pm | नगरीनिरंजन

काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून
कविता लै हट्टी आमची बसली असंल हटून

जवा मी येतो स्वच्छपैकी आंघोळ कधी करून
तवा ही येती केस पिंजारत गावभर उंडारून

जवा मी म्हण्तो आराम करावा थोडंसं पडून
तवा ही बया ओढत म्हण्ती चल डोंगर चढून

जवा मी बस्तो लपवत सल कडीकुलूप लावून
तवा हळूच जवळ येती अन जाती मलम लावून.

काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून
बाहेर जाय्चं म्हण्ल्यावर बघ कशी निघाली नटून.

पैसा's picture

4 Mar 2011 - 8:31 pm | पैसा

असं विनोदी पण उत्तर देता येतं!

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 8:57 pm | धमाल मुलगा

इथं तर कवितांच्या टकरी लागल्यात की. :)

लढा बाप्पू लढा :)

प्रकाश१११'s picture

9 Mar 2011 - 10:13 pm | प्रकाश१११

गणेशा - अप्रतिम कविता

कामाच्या ओझ्यामंधी
भान हुतं गेल सरुन
डोळ्यात टिपुस ना परि
ओढ पोरी तुझीच तिथुन

कारभारनीच तुकडं
काही ग्वॉड लागना
शेतांमधी पाटाच
काही पाणी वाहिना

ह्या कवितेला ,गाण्याला मस्त चाल लावता येयेल. छान गाणे होईल. तुझ्या कवितेचे एक गीत येंकले होते .तसेच हे भन्नाट होईल.
बघ त्याना विचारून. नकार नाही मिळणार मित्रा. मला आतून वाटते आहे. शुभेच्छा आहेतच.